Memories-at-Utnoor
लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*उतनूरचे दिवस..*
*थरार… (५-अ)*
तरुण वयात प्रत्येकालाच साम्यवादाचं आकर्षण असतं. तसं ते एके काळी मला ही होतं. ज्या समाजात श्रीमंत गरीब असा वर्ग कलह नाही, निर्बल बलवान असा शक्ती संघर्ष नाही, उच्च नीच असा पंक्तीभेद नाही अशा समाजात राहणं कुणाला आवडणार नाही ? अशा कल्पनारम्य, आदर्श जगाची मोहिनी बहुतांश विद्वान, विचारवंत, प्रोफेसर, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी व कलावंतांना तर कायमच पडत आलेली आहे.
विद्यार्थीदशेत असताना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स यांच्या विचारांच्या काही लहानशा पुस्तिका वाचल्या होत्या. पुढे कुतूहलवश “द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो” आणि “दास कॅपिटल” हे ग्रंथही लायब्ररीतून मिळवून वाचून काढले. त्या कोवळ्या, अपरिपक्व वयात त्यातील विचार फारसे समजले नाहीत आणि त्यामुळे पुढे कम्युनिस्ट साहित्यापासून तसा दूरच राहिलो.
पुढे जॉर्ज ऑर्वेल ची “ऍनिमल फार्म”, “1984” ही पुस्तकं वाचली, स्टॅलिन व माओ यांनी केलेल्या आपल्याच देशवासीयांच्या प्रचंड नरसंहाराची वर्णनं वाचली आणि कम्युनिझम म्हणजे सुद्धा एकप्रकारची निर्दयी हुकूमशाहीच आहे असा माझा पक्का समज झाला. मात्र तरी देखील अमेरिका, ब्रिटन व अन्य पाश्चात्य, युरोपीय देश कम्युनिझमला एवढा विरोध का करतात याचं नेमकं आणि पटेल असं संयुक्तिक कारण मला ज्ञात नव्हतं.
नोकरीच्या निमित्ताने मी सध्या नक्षली मुलुखात होतो. मार्क्स, लेनिन आणि माओ यांच्या विचारांनी प्रेरित असलेला नक्षलवाद हाही एकप्रकारे टोकाचा (extreme) साम्यवादच. मात्र मिलिटरी सारखा नक्षली गणवेश घालून पोलिसांपासून जीव वाचवित जंगलात वणवण हिंडणाऱ्या ह्या भागातील गरीब, निरक्षर, आदिवासी नक्षली तरुणांना लेनिन, मार्क्स, एंगेल्स ची खरीखुरी साम्यवादी विचारसरणी माहित तरी असेल का ? असा प्रश्न मला नेहमीच पडत असे.
तसं पाहिलं तर आतापर्यंत एक दोन सशस्त्र नक्षलवाद्यांना ओझरतं पाहिलं असलं तरी कुणाही नक्षलवाद्याशी अद्याप माझा प्रत्यक्ष आमना सामना झाला नव्हता. मात्र, दुर्दैवाने लवकरच तशी वेळ येणार होती.
उतनूर पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगलपूर बुजुर्ग या गावात आमच्या शाखेचा जुना पीक कर्जाचा फायनान्स होता. पूर्वी हे गाव अत्यंत घनदाट जंगलात वसलेलं होतं. पुढे काही कारणास्तव वन विभागाने हा परिसर अधिग्रहित करून आपल्या ताब्यात घेतला आणि वडगलपुर गावाचं सहा किलोमीटर दूर असलेल्या गुंडाळा या गावाजवळ पुनर्वसन केलं. आज, याच गुंडाळा गावाला जाऊन तेथील पूर्वाश्रमीच्या वडगलपुर वासीयांना भेटून थकीत पीक कर्ज खाती नियमित करण्याचा माझा विचार होता.
दुपारी बारापर्यंत शाखेतील महत्वाची कामे आटोपून प्युन रमेश सोबत निघायचं ठरवलं होतं. परंतु बँकेतून निघे निघेपर्यंत दोन वाजून गेले होते. शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे लहानग्या अनिशला घेऊन बायको पंधरा दिवसांसाठी अकोल्याला गेली होती. त्यामुळे घरी निरोप ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. बस स्टँड जवळील चिन्नय्याच्या मेस मध्ये जेवून तीन वाजता मी व रमेश गुंडाळा गावाकडे निघालो.
जंगलातील कच्च्या पायवाटेने गुंडाळा गाव तसं फक्त सतरा अठरा किलोमीटर अंतरावरच होतं. बँकेतून निघायला उशीर झाल्याने आज गुंडाळा गावाला फक्त धावती भेट देऊन लगेच पाच वाजण्याच्या आत उतनूरला परतायचं असं आधीच ठरवलं होतं. आम्ही जेमतेम दोन तीन किलोमीटर अंतरावर आलो असतानाच अचानक रमेशचं पोट खूप दुखू लागलं. त्याला मोहाची दारू पिण्याचा खूप नाद होता. जास्त दारू पिल्यावर त्याचं पोट असं नेहमीच दुखायचं.
रमेशचं पोट दुखणं थांबायची वाट पहात आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. परंतु रमेशचं दुखणं थांबण्या ऐवजी आणखीनच वाढलं. शेवटी तो म्हणाला..
“ताबडतोब घरी जाऊन औषध घेऊन पडून राहिलो तरच मला आराम पडेल. मी आता परत उतनूरला जातो. गुंडाळा गावाकडे पायी जाणारा एखादा वाटसरू तुम्हाला पाहून देतो. तो तुम्हाला नीट वाट दाखवील. तसा, गुंडाळ्याचा रस्ता अगदी सरळ आहे. जातांनी रस्ता नीट पाहून ठेवा आणि येतांनी गेले तसेच परत या..”
रमेशचं म्हणणं मला पटलं. तसाही मी आजकाल बऱ्याच गावांत एकट्यानेच जात होतो. तेलगू भाषाही आता मला बरीचशी समजू लागली होती आणि मोडकी तोडकी बोलताही येत होती. याशिवाय बरेचसे आदिवासी बोली भाषेतील रोजच्या वापरातील शब्द ही माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातून आज उतनूरला बँकेत काही विशेष काम नसल्याने रमेशच्या बोलण्यावर मी संमतीदर्शक मान डोलावली.
सुदैवाने त्याचवेळी समोरून पायी येणारा बिरसय्या हा गुंडाळा गावचा रहिवासी रमेशच्या चांगल्याच परिचयाचा निघाला. मला गुंडाळा गावात नेण्याबद्दल त्याला सांगून, एका फॉरेस्ट गार्डच्या दुचाकीवर बसून रमेश उतनूरला निघून गेला.
रमेशनं सांगितल्या प्रमाणेच गुंडाळा गावाकडे जाणारा रस्ता अगदी सरळ सरळ होता. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. आजूबाजूला रमणीय वनश्री आणि छोटे छोटे सुंदर तलाव होते. झाडांवर व तलावाच्या आसपास बसलेल्या चित्रविचित्र रानपक्ष्यांचा सुरेल किलबिलाट कानी पडत होता. त्या अनोख्या पक्ष्यांना एकदा तरी निरखून पाहण्याचा अनावर मोह होत होता. पण समोरची पायवाट एवढी अरुंद होती की कसाबसा मोटारसायकलचा तोल सांभाळण्याकडेच सारं लक्ष द्यावं लागतं होतं.
वीस पंचवीस मिनिटांतच आम्ही गुंडाळा गावात पोहोचलो. संपूर्ण प्रवासात बिरसय्या माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. ग्रामपंचायत ऑफिस समोरील वडाच्या झाडाजवळ उतरून काही न बोलता तो आपल्या घराकडे निघून गेला.
ग्रामपंचायत ऑफिसला कुलूप होतं. तिथल्या लाकडी बाकावर काही रिकामटेकडी माणसं विडी फुंकत बसली होती. मी कोणीतरी सरकारी अधिकारी आहे असाच त्यांचा समज झाला असावा. त्यामुळे लगबगीने हातातील विड्या तशाच बाजूला फेकून देत ते जागीच नम्रपणे उभे राहिले.
त्यांच्या जवळ जाऊन, मी उतनूरच्या स्टेट बँकेतून आल्याचं सांगून वडगलपूर गावातील पुनर्वसित गावकऱ्यांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला..
“वडगलपूरच्या लोकांना गुंडाळा गावामागे अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या जंगलाच्या मध्यभागातील मोकळ्या जागेत वसवण्यात आले आहे. तिकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्यातरी तुम्हाला मोटारसायकल घेऊन त्या रस्त्याने जाता येणार नाही. मात्र या उजव्या बाजूच्या पायवाटेने एक किलोमीटरचा वळसा घालून गेल्यास सहज गावापर्यंत मोटारसायकल नेता येईल.”
त्या गावकऱ्यांचे आभार मानून उजव्या बाजूच्या पायवाटेने नवीन वडगलपूर कडे निघालो.
अंदाजे दोन तीन किलोमीटर अंतर कापलं तरी कोणत्याही गावाचा मागमूस दिसेना आणि जंगल तर अधिकाधिक दाट होत चाललं होतं. आपण रस्ता चुकलो तर नाही ? ही शंका मनात येताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, इथपर्यंत आलोच आहोत तर आणखी एक दोन किलोमीटर पुढे जाऊन पाहावे आणि तरी देखील वडगलपूर गाव दिसलं नाही तर सरळ माघारी फिरावं असा विचार करून नेटानं मोटारसायकल दामटीत राहिलो.
त्या एकाकी, सुनसान रस्त्यानं जाताना आपण खूप खोल जंगलात शिरत असल्याचा भास होत होता. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. बहुदा सूर्य मावळू लागल्याने पक्षी आपापल्या घरट्यात परतून चिडीचूप बसले होते. मधूनच दूरवरून हिंस्त्र जंगली प्राण्याचा भीतीदायक चित्कार ऐकू येई. नकळत एक अनामिक भय दाटून आलं आणि अचानक मी मोटारसायकल माघारी फिरवली. आता गुंडाळा गावातही न थांबता सरळ उतनूर गाठायचं असं ठरवलं.
संध्याकाळ होत आली होती. मनगटा वरच्या घड्याळात पाहिलं तर सव्वा पाच वाजले होते. चला..! म्हणजे फारसा उशीर झालेला नाही. आणखी अर्ध्या पाऊण तासात आपण सहज घरी पोहोचू शकतो, या विचारानं मला धीर आला. मात्र यापुढे रमेशला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही अनोळखी रस्त्याने कधीही जायचं नाही म्हणजे नाही, असा मनोमन घोकून घोकून ठाम निश्चय केला.
विचारांच्या नादात किती वेळ झाला, आपण मोटारसायकल चालवीतच आहोत याकडे माझं लक्षच गेलं नाही. अर्धा पाऊण तास झाला तरी अजून गुंडाळा गाव देखील आलं नव्हतं. समोरील रस्ता सुद्धा एकदम अनोळखी वाटत होता. वाहत्या पाण्याचा खळखळाट अगदी जवळून ऐकू येत होता. नक्कीच आजूबाजूला एखादी नदी किंवा ओढा असावा. मी पुन्हा हातातील घड्याळाकडे पाहिलं. सहा वाजून गेले होते. आता मात्र आपण रस्ता चुकल्याची माझी पुरेपूर खात्री झाली.
थोडं पुढे गेल्यावर वाटेत मधोमध एक मोठं झाड आडवं पडलं होतं. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. ते झाड एवढं मोठं होतं की आठ दहा माणसांच्या मदतीशिवाय ते जागेवरून हलवणं शक्यच नव्हतं. वादळ वाऱ्यामुळे ते झाड उन्मळून पडल्याची देखील अजिबात शक्यता दिसत नव्हती. करण आसपास तशा कोणत्याही खुणा नव्हत्या. नक्कीच कुणीतरी रस्ता अडवण्यासाठी हे झाड इथे आणून टाकलं असावं.
पुढे जाण्यास रस्ताच नसल्याने माझी गती आणि मती दोन्ही ही कुंठित झाली आणि दिग्मूढ़ होऊन मी त्या आडव्या पडलेल्या विशाल वृक्षाकडे एकटक पहातच राहिलो. मी भानावर आलो तेंव्हा हातात कुऱ्हाडी व कोयता असलेल्या चार बलदंड आदिवासी तरुणांनी माझ्याभोवती गराडा घातला होता. माझ्याशी एक शब्दही न बोलता त्यांनी माझे दोन्ही हात पाठीमागे नेऊन लवचिक जंगली वेलींनी करकचून बांधून टाकले. त्यानंतर बाजूच्या झाडीत घुसून जंगलातील झाडे झुडुपे व दगड गोटे यातून मार्ग काढीत ते मला कुठेतरी घेऊन चालले होते.
अकस्मात झालेल्या या घटनेने मी भांबावून गेलो होतो. भीतीने माझ्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. त्या आदिवासींचे मख्ख, गंभीर चेहरे आणि त्यांच्या हातातील कुऱ्हाडी व कोयते पाहून मी पुरता गर्भगळीत झालो होतो. निःशब्द पणे चालत आम्ही आता डोंगराच्या उतारा वरून खाली दरीत उतरत होतो. लवकरच दुरून डफ, ढोलकीचे व माणसांच्या ओरडण्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. लगेच त्या आदिवासीं पैकी एकाने आपल्या डोक्यावरील मुंडासं काढून ते माझ्या डोळ्यांभोवती बांधलं.
थोड्याच वेळात आम्ही नक्षल्यांच्या तळावर पोहोचलो, तेंव्हा आम्हाला पाहतांच तेथील वाद्यांचे व किंचाळून बोलण्याचे आवाज एकदम थांबले. आदिवासी गोंड भाषेत तिथल्या कमांडरने ओरडून कसली तरी आज्ञा दिल्यावर माझ्या डोळ्यांवरील फडकं काढण्यात आलं. समोर तीन चार खाटांवर हिरव्या गणवेशातील आठ दहा सशस्त्र नक्षली कमांडर बसले होते. त्यांच्यापैकी एका जाडजूड मिशीवाल्या गलेलठ्ठ माणसाने करड्या आवाजात तेलगू भाषेत मला विचारलं..
“तू कोण आहेस आणि इथे जंगलात कशाला आलास..?”
मी थोडक्यात माझी कर्मकहाणी त्यांना सांगितली. अर्थात त्यांचा माझ्या कहाणीवर काडीचाही विश्वास नव्हता. त्यांनी माझी कसून झडती घेतली. पेन, पाकीट, रुमाल आणि वडगलपुरच्या कर्जदारांची यादी एवढंच साहित्य त्यांना या झडतीतून मिळालं. माझी कर्मकथा त्यांना आता थोडी फार पटू लागल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून वाटत होतं.
मला जिथे उभं करण्यात आलं होतं तिथून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या नदीच्या काठावर काही खुर्च्या आणि टेबलं मांडण्यात आली होती. काही पॅन्ट शर्ट घातलेल्या व्यक्ती तिथे बसलेल्या दिसत होत्या. अधून मधून माना वळवून त्या व्यक्ती माझ्याकडे पहात होत्या. माझी चौकशी पूर्ण झाल्यावर तो गलेलठ्ठ कमांडर त्या खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींकडे गेला आणि त्याने त्यांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर तो कमांडर माझ्याजवळ आला आणि त्याने माझे मागे बांधलेले हात सोडले. त्यानंतर त्याने मला त्या पॅन्ट शर्ट घालून खुर्च्यांवर बसलेल्या शहरी बाबूंच्या पुढ्यात नेऊन उभं केलं.
मी त्यांना नीट निरखून पाहिलं. ते एकूण सहा जण होते. चार पुरुष आणि दोन स्त्रिया. स्त्रियांनी लांब बाह्यांची पोलकी आणि पांढऱ्या रंगाच्या साध्या सुती साड्या घातल्या होत्या तर चारही पुरुषांचा पोशाख, टेरिकॉटची काळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा जाड्याभरड्या खादीचा हाफ बाह्यांचा शर्ट, असा होता. ते सहाही जण बुद्धिजीवी, अभ्यासू आणि उच्चभ्रू शहरी वाटत होते. एक किरकोळ देहयष्टीचा आणि तरतरीत चेहऱ्याचा चष्मेवाला त्या सहा जणांचा नेता असावा. माझ्याकडे आपादमस्तक पहात तो हिंदीत म्हणाला..
“अच्छा, म्हणजे तुम्ही बँक अधिकारी आहात आणि केवळ वाट चुकल्यामुळेच इतक्या खोल जंगलात आला आहात तर..!”
केविलवाण्या चेहऱ्यानं मी होकारार्थी मान हलवली.
आपला चष्मा काढून त्याची काच शर्टाच्या कोपऱ्याने पुसत तो शहरी नेता म्हणाला..
“योगायोगाने म्हणा किंवा अपघाताने.. पण सध्या तुम्ही कुठे येऊन पोहोचला आहात याची तुम्हाला कल्पना असेलच..?”
“माफ करा, पण मी स्वतः हुन इथे आलेलो नाही तर मला हात बांधून व डोळे झाकून जंगल तुडवीत येथे आणण्यात आलं आहे. मी तर माझ्या रस्त्याने सरळ पुढे चाललो होतो. झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाल्यानेच नाईलाजाने मला त्या जागी थांबावं लागलं.. “
प्रथमच निर्भय होऊन ताठ मानेने मी प्रत्युत्तर दिलं.
माझ्याकडून अशा बाणेदार प्रत्युत्तराची त्या नेत्याने अपेक्षाच केली नसावी. क्रोधाने त्याच्या भुवया उंचावल्या. करड्या आवाजात तो म्हणाला..
“तुम्ही ज्या रस्त्याने पुढे चालला होतात तोही रस्ता शेवटी इथेच येतो. सामान्य जनतेसाठी हा भाग निषिद्ध आहे. पोलिसही इथे एकट्यानं येण्याचं साहस करीत नाहीत.”
“पण.. मी या भागात नवीन आहे. गुंडाळा गावातून वडगलपुरला जाताना माझा रस्ता चुकला असावा.. तुमच्या कमांडरला मी हे पूर्वीच सांगितलं आहे.”
मी नम्रपणे स्पष्टीकरण दिलं.
“हो.. पण आम्हाला तुमच्या बोलण्यावर असा एकदम विश्वास ठेवता येणार नाही.”
असं बोलून आपल्या सहकाऱ्यांकडे हात करून तो म्हणाला..
“आमच्या पार्टीचा हा जो गट (faction) आहे त्याचे काही वरिष्ठ पॉलिट ब्युरो सदस्य आज इथे हजर आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. कोणतीही लपवाछपवी न करता त्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तुमचं काय करायचं ? याचा निर्णय त्यानंतरच सर्व जण मिळून घेतील.”
माझ्यापुढे अन्य कोणताही पर्याय नसल्याने एखाद्या गुन्हेगारा सारखा खाली मान घालून समोरून येणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यास मी सिद्ध झालो. माझी उलट तपासणी सुरू झाली.
सुरवातीला माझं नाव, माझं मूळ गाव, शिक्षण, बँकेतील सहकाऱ्यांची नावे, पत्नी व मुलांबद्दल माहिती अशी प्राथमिक जुजबी चौकशी त्यांनी केली. मी सांगितलेली सर्व माहिती त्यांच्यापैकी एकाने आपल्या वहीत लिहून घेतली. त्यानंतर चीफ कमांडरला बोलावून त्याच्या हातात ती वही देऊन सांकेतिक भाषेत त्याने काहीतरी सांगितलं. कमांडर ती वही घेऊन निघून गेल्यानंतर हिटलर सारखी तोकडी मिशी असलेल्या एका अन्य पॉलिट ब्युरो सदस्याने चौकशीची सूत्रं आपल्या हातात घेतली.
थेट मुद्द्यालाच हात घालत त्यानं विचारलं..
“कम्युनिस्ट विचारसरणी बद्दल तुमचं काय मत आहे ?”
अत्यंत अक्कल हुशारीने विचारलेला तो प्रश्न खूप अवघड आणि tricky होता. मी साम्यवादी आणि पर्यायानं नक्षलवादी विचारसरणीचं समर्थन करावं अशीच प्रश्नकर्त्याची अपेक्षा असावी. जर मी नक्षली हिंसाचाराचा निषेध केला असता, व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या साम्यवादी विचारांच्या विरोधात माझं खरंखुरं मत प्रदर्शित केलं असतं तर कदाचित मला विचारलेला पहिला प्रश्न हाच माझा अखेरचा प्रश्न ठरला असता.
अर्थात साम्यवादी आणि नक्षलवादी विचारांचं समर्थन करण्यासाठी त्यांची तत्वप्रणाली व त्या चळवळीचा समग्र इतिहास माहीत असणं आवश्यक होतं. आणि त्यादृष्टीने माझं वाचन, माझा अभ्यास तर खूपच तोकडा होता.
शेवटी, पुरेसा अभ्यास न झालेल्या विषयाच्या परीक्षेत ज्याप्रमाणे आपण गोल गोल व तीच तीच उत्तरं देऊन कशीबशी वेळ मारून नेतो, तीच पद्धत इथेही अवलंबवावी असं मी ठरवलं.
(क्रमशः ५-ब)
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही सेवा केली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.