https://goodworld.in A website by Madhav Bhope

फिरते साहित्य Moving Literature

firte sahitya

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*फिरते  “साहित्य”* …

प्राथमिक शाळेत अक्षर ओळख होऊन सलग वाक्य वाचता येऊ लागलं तेव्हा जणू ज्ञानाचा खजिना असलेली अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं. वाचनाचा आनंद, नाविन्याचं औसुक्य आणि वैविध्याची भूक एवढी जास्त होती की शाळेत येता जाताना जे जे काही लिहिलेलं दिसायचं, मग त्या भिंतींवरील जाहिराती असोत वा घरांवरील नावाच्या पाट्या असोत, ते ते सर्व अधाशासारखं भराभरा वाचून काढायचा नादच लागला.

त्यावेळी वाहनांच्या विशेष करून ट्रकच्या पाठीमागे काही ठराविक शब्द लिहिले असत. “हॉर्न प्लिज”, “हॉर्न दिजीए”, “हॉर्न ओके प्लिज”, “ओके टाटा”, “फिर मिलेंगे” असे थोडक्यात लिहिले असायचे. त्यानंतर सुप्रसिद्ध “बुरी नजरवाले तेरा मुँह काला” चा जमाना आला. माझ्या लहानपणापासून ते आजतागायत गेली साठ सत्तर वर्षे भारतातील समस्त ट्रक चालकांचे हे अत्यंत आवडते वाक्य राहिले आहे. या जगात “नजर” टाकण्याजोग्या इतर अनेक “आकर्षक सजीव” गोष्टी असताना त्या सोडून सर्वजण आपली नजर ट्रक सारख्या निर्जिव अनाकर्षक वाहनाकडेच आणि तीही वाकडी म्हणजे “बुरी”च का टाकत असावेत हे मला अजून न सुटलेलं एक कोडंच आहे.

नंतरच्या काळात काही रसिक ट्रक चालक मनोरंजक शेर शायरी ट्रकमागे लिहू लागले. हळूहळू ट्रॅक्टर, बस, जीप आणि सर्वच खाजगी वाहनांमागे अशा चित्तवेधक ओळी दिसू लागल्या. मला तर सुरवातीपासूनच ट्रक, बस मागे लिहिलेलं हे फिरतं साहित्य वाचण्याचा छंद होता. पुढे कॉलेजात गेल्यावर तर हा छंद वाढत जाऊन त्याचं तात्पुरत्या वेडात रूपांतर झालं. ट्रक, बस मागे लिहिलेलं प्रांतोप्रांतीचं, विविधतेनं नटलेलं आणि अतिशय सवंग पण मनोरंजक असं भरपूर साहित्य मला मुखोद्गत होतं. दररोज वाहनांच्या मागे सायकलवर फिरून असं नवनवीन साहित्य मिळवून आम्ही सारी मित्रमंडळी त्यावर चर्चा करत मस्तपैकी टाईमपास करायचो.main qimg beb03676b796c4586df600b0c149e2c4

एकदा मी कॉलेजातून घरी जात असताना लहान मुलांना शाळेत घेऊन जाणारी एक खाजगी स्कुलबस माझ्या सायकल जवळून पुढे गेली. नेहमीच्या सवयीने मी बसच्या मागे लिहिलेलं काही नवीन साहित्य मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसमागे काही अपरिचित ओळी लिहिलेल्या मला अस्पष्ट दिसल्या. पण बस वेगात असल्याने मी त्या ओळी नीट वाचण्यापूर्वीच बस माझ्या दृष्टीआड झाली. त्या अपरिचित ओळींनी माझी उत्सुकता चाळवली गेली. काहीतरी नवीन साहित्याचा लाभ आज आपल्याला होणार या आशेने मी बसच्या मागे वेगात सायकल दामटली.4

दोन तीन किलोमीटर पर्यंत वेगात पाठलाग केल्यावर मला दूरवर ती बस दिसू लागली. मोठया कष्टाने सायकलला टांगा मारत कसाबसा बसपर्यंत पोहोचतो न पोहोचतो, तेवढ्यात बस पुन्हा सुरू झाली. मात्र त्या गडबडीतही मी बसच्या मागे लिहिलेली पहिली ओळ वाचून काढली. ती ओळ अशी होती….

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”

मी एवढी ओळ वाचतो न वाचतो तोच सायलेंसरमधून धूर सोडत आणि धुळीचे लोट उडवीत बस पुन्हा नजरेआड झाली. मी पाहिलं की पायाखालचा रस्ता आता खूप खडबडीत, कच्चा आणि धुळीने भरलेला होता. डोळ्यात व नाकातोंडात सारखी धूळ जात होती. त्यातून सायकल पंक्चर होण्याचीही भीती होती. रस्ता नीट दिसत नसल्याने मी काळजीपूर्वक, धिम्या गतीने पण नेटाने बसचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याचवेळी मनातल्या मनात नुकतीच वाचलेली बस मागील पहिली ओळ आठवीत, पुढील ओळ काय असू शकेल याबद्दल कल्पनेला ताण देत विचार करीत होतो.

आतापर्यंत मी गावाच्या बाहेर पडून शहरापासून बराच दूर आलो होतो. घराकडे जाण्याचा रस्ता तर केव्हाच मागे पडला होता. मात्र मला त्याची फिकीर नव्हती. आज कसंही करून ती दुसरी ओळ वाचूनच मग मागे फिरायचं अशी मनात जिद्द पेटली होती. थोड्यावेळाने तो खराब रस्ता एकदाचा संपला. डोळ्यासमोरील धूळ ही कमी झाली. रस्ता स्वच्छ दिसू लागला तसा मी सायकलचा वेग पुन्हा वाढवला.  वाटेवरील गावांत थांबत थांबत, तेथील लहान मुलांना त्यांच्या  घरी पोहोचवणारी ती स्कुलबस मला पुन्हा दिसू लागली. एव्हाना मी सहा सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. माझा स्टॅमिना आता संपत चालला होता. शेवटचा नेटाचा प्रयत्न म्हणून मी जोरात पायडल मारत धपापत्या उराने त्या थांबलेल्या बसपर्यंत पोहोचलो.cyclist

सायकल बसच्या अगदी जवळ नेत मी घाईघाईने ती दुसरी ओळ वाचली.

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”  नंतरची ती दुसरी ओळ होती….

“अब तो पिछा छोडो, मैं हूं बाल बच्चों वाली”

या ओळी वाचता वाचताच मला जोराचं हसू फुटलं. माझ्या आजच्या अवस्थेला अगदी समर्पक अशा त्या ओळी होत्या. स्वतःची कींव करत हसतानांच अशा निरर्थक गोष्टींच्या मागे एवढी धावाधाव करण्याच्या माझ्या पोरकट स्वभावाचा मला रागही आला.

……त्या दिवसापासून अशी फिरत्या साहित्यामागे फिरण्याची माझी सवय कायमची सुटली आणि मी नियमितपणे लायब्ररीत जाऊन सकस, अभिजात आणि उत्कृष्ट साहित्य वाचू लागलो.

main qimg d5986d7323955bdbc5d35e8381f76650

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

गल्लीतील यमदूत Demon in a dark lane

demon in dark lane

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*गल्लीतील यमदूत*

मी बँकेत नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. जालना येथील स्टेट बँकेत कॅशियर-कम्-क्लर्क म्हणून 1981 साली मी जॉईन झालो. लवकरच माझ्यावर बँकेचा रोजचा ताळेबंद म्हणजेच कॅश बुक (क्लीन कॅश) लिहिण्याचं अतिशय क्लिष्ट परंतु त्याचबरोबर प्रतिष्ठेचं काम सोपविण्यात आलं.

हे कॅश बुक टॅली करणं फारच जिकिरीचं काम होतं. बँकेत भरपूर काम असल्याने स्टाफही भरपूर होता. रोज एक हजारापेक्षाही जास्त व्हाऊचर्स असायची. ही व्हाऊचर्स योग्यरित्या सॉर्ट करून संबंधित दैनिक पुस्तकात (डे बुक) ठेवण्याचे काम प्यून मंडळी दुपारपासूनच सुरू करत. संध्याकाळी सर्वांची डे बुकं लिहून झाल्यावर मगच कॅश बुक लिहिण्याचे माझे काम सुरू होत असे. त्यामुळे संध्याकाळी चार तास व सकाळी दोन तास अशा दोन भागात माझे कामाचे तास विभागले होते.

शक्यतो त्याच दिवशी हे कॅश बुक टॅली करण्याचा माझा प्रयत्न असे. मात्र कधी व्हाऊचर्स गहाळ झाल्याने तर कधी डे बुक लिहिण्यातील विविध चुकांमुळे क्लीन कॅश टॅली होण्यास नेहमीच खूप उशीर व्हायचा. साहजिकच सर्व काम आटोपून घरी जाण्यास मला रात्रीचे दहा अकरा वाजत. बँकेपासून जराशा दूर अंतरावर असलेल्या एका विडी कामगारांच्या वस्तीत तेंव्हा मी रहात असे. स्टाफला मिळणारं सायकल लोन उचलून मी नुकतीच नवीन सायकल घेतली होती. त्यावरूनच मी बँकेत जाणे येणे करीत असे.

एक दिवस असाच रात्री साडे दहा वाजता काम आटोपून घरी जात असताना वाटेतील एका गल्लीच्या तोंडाशीच एक भला मोठा, हिंस्त्र चेहऱ्याचा कुत्रा, आपले अणकुचीदार दात विचकवीत, माझी वाट अडवून उभा राहिला. कुत्र्याला पाहून मी थोडा घाबरलो आणि त्याला टाळून बाजूने सायकल काढून वेगाने पुढे जाऊ लागलो. त्या धिप्पाड कुत्र्यानेही सायकलमागे वेगाने पळत माझा गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पाठलाग केला.  त्यानंतर बहुदा त्याची हद्द संपल्यामुळे तो तिथेच थांबला. मी मात्र तोपर्यंत भीतीने अर्धमेला झालो होतो. जोरजोरात पायडल मारल्याने मला मोठी धाप लागली होती आणि भीतीने सर्वांगाला चांगलाच घाम फुटला होता.

त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. सारखा तो भयंकर चेहऱ्याचा खुनशी, खूंखार कुत्रा नजरेसमोर येत होता.ferocious dog

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही गोष्ट पार विसरून गेलो. त्या दिवशीही काम आटोपण्यास नेहमीसारखाच उशोर झाला. सायकलवर टांग मारत मी घराकडे निघालो. त्या गल्लीच्या तोंडाशी येताच अचानक कालच्या प्रसंगाची आठवण झाली आणि छातीचे ठोके वाढले. घशाला कोरड पडली. मी घाबरून आसपास पाहिलं. रस्ता सुनसान होता हे पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि निर्धास्तपणे हलकेच शीळ घालीत आरामात हळू हळू पायडल मारण्यास सुरवात केली. इतक्यात अचानक कुणीतरी बाजूच्या झुडुपमागून निघून माझ्या सायकलवर झेप घेतली. मी ब्रेक मारून नीट बघितलं तर तो कालचाच भयंकर कुत्रा होता. बहुदा माझीच वाट पहात झुडुपामागे दबा धरून बसला असावा. मी कालच्यासारखीच वेगात सायकल दामटली. गल्लीच्या टोकापर्यंत माझा पाठलाग करून कालसारखाच तो दुष्ट कुत्रा आपली सीमा येताच थांबला.bike and dog

त्यानंतर हे रोजचंच झालं. मला रात्री घराकडे जायचं म्हंटलं की त्या कुत्र्याच्या दहशतीमुळे अंगावर काटा येत असे. घराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गही नव्हता. मी मॅनेजरसाहेबांकडे कॅश बुक सोडून दुसरं कोणतंही काम देण्याची विनंती केली. मॅनेजर साहेबांनी कारण विचारलं तेंव्हा मी त्यांना त्या कुत्र्याच्या मागे लागण्याबद्दल सांगितलं. ते ऐकून मॅनेजर साहेब खो खो करून हसत म्हणाले की “तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच म्हणून  समज !”

जालना नगर परिषदेची सर्व बँक खाती आमच्याकडेच होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग  विविध प्रकारच्या कामांसाठी बँकेत नियमित येत असे. मॅनेजर साहेबांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या खात्याच्या  कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची माझ्याशी गाठ घालून दिली. मी त्यांना कुत्र्याचे वर्णन करून तो कुठल्या गल्लीत असतो हे सांगितले. त्यावर “आपण अजिबात काळजी करू नका. उद्याच त्या कुत्र्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल,” असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

त्याही दिवशी रात्री कुत्र्याने माझा नेहमीसारखाच पाठलाग केला. एकदोनदा आपल्या दातांनी माझी पॅन्टही पकडली. पण ह्या क्रूर, पापी कुत्र्याला नगर पालिकेचे कर्मचारी उद्या पकडून नेणार आहेत, हे माहीत असल्याने मी तो त्रास फारसा मनावर घेतला नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅनेजर साहेबांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. नगर पालिकेचे ते कर्मचारी त्यांच्यासमोरच बसले होते. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गल्लीत व आसपास भरपूर शोधाशोध करूनही असा कोणताही भटका कुत्रा आढळला नाही” असं ते म्हणत होते. “बहुदा मला त्या कुत्र्याचा भास होत असावा” असं ते ठासून सांगत होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पहात ते निघून गेले. मॅनेजर साहेबांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता “आजपासून रात्री तुम्हाला घरी सोडण्यासाठी बँकेचा वॉचमन तुमच्यासोबत घरापर्यंत येईल” असे सांगून मला धीर दिला.

पुढचे सलग दोन दिवस बँकेचा वॉचमन मला सोडण्यासाठी घरापर्यंत आला. आश्चर्य म्हणजे तो भयंकर कुत्रा त्या दोन दिवसात गल्लीत फिरकलाच नाही. साहजिकच “नगर पालिकेचे लोक खरंच बोलत होते…असा कुणी कुत्रा त्या भागात नाहीच आहे…सारे या साहेबांच्या मनाचे खेळ आहेत….मी आजपासून त्यांना सोडायला जाणार नाही.” असं वॉचमनने मॅनेजर साहेबांना माझ्यासमोरच ठणकावून सांगितले. शिवाय वरतून ” साहेब, दर शनिवारी मारुतीला नारळ फोडत जा…सारं काही ठीक होईल.” असा मला आगाऊपणाचा सल्लाही दिला

त्या दिवशी रात्री काम आटोपल्यावर मी हताशपणे घराकडे निघालो. मी “त्या” गल्लीत प्रवेश करताच तो  भयंकर कुत्रा माझ्यावर त्वेषाने चाल करून आला. मी अजिबात न डगमगता… “घाबरू नकोस, हा केवळ भास आहे”..असं मनाला बजावीत होतो. मात्र जेंव्हा त्याने माझी पॅन्ट दातात धरून टरकावली तेंव्हा मात्र माझे अवसान गळाले आणि मी जीव मुठीत धरून, कुत्र्यापासून पाय वाचवीत, कशीबशी ती गल्ली पार केली.

आता हा आतंक, हा उपद्रव म्हणजे माझं जागेपणीचं रोजचं दु:स्वप्नच होऊन बसलं. तो भयंकर कुत्रा मी त्या गल्लीत शिरताच माझ्या मागे लागायचा. कधी पॅन्ट धरायचा तर कधी सायकलच्या हँडलवर झेप घ्यायचा. मी या रोजच्या त्रासाने अगदी कंटाळून गेलो होतो. आता तर बँकेतही याबद्दल कुणाला काही सांगायची सोय राहीली नव्हती.

एकदा माझ्या मित्राला त्याच्या घरातील उंदीर मारण्यासाठी औषध घ्यायचे होते, म्हणून त्याच्यासोबत औषधाच्या दुकानात गेलो होतो. “या उंदरांच्या औषधाने कुत्री मरतात का हो ?” असं जेंव्हा मी दुकानदाराला विचारलं, तेंव्हा त्याने “कुत्री मारण्याचे वेगळे विष असते व ते आमच्याकडे उपलब्ध आहे” अशी माहिती पुरवली. त्याचवेळी त्या भयंकर कुत्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी हा जालीम उपाय करण्याचा मी मनाशी निश्चय केला.

त्या दिवशी रात्री घरी जाताना न विसरता दुकानातून कुत्र्याचे विष विकत घेतले. गल्लीतून जाताना रोजच्याप्रमाणेच त्या कुत्र्याने अंगावर धावून येत घाबरवून टाकले, तेंव्हा “ह्या कुत्र्याचा त्रास सहन करण्याचा हा शेवटचाच दिवस !” असं मनात येऊन गेलं. घरी पोहोचताच एका वाटीत पाणी घेऊन त्यात ते कुत्र्याचे विष मिसळून ठेवले. उद्या दुपारी बिस्किटे आणून ती या विषाच्या पाण्यात भिजवून सोबत न्यायची आणि रात्री घरी येताना त्या भयंकर कुत्र्यास खाऊ घालायची असं ठरवून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी दुपारी बँकेत जाण्यापूर्वी, पहिल्यांदा जवळच्या रस्त्यावरील दुकानातून बिस्किटे आणावीत म्हणून बाहेर पडलो. वाटेतच कानावर मृदुंग, वीणा, चिपळ्यांचा आवाज पडला म्हणून तिकडे पाहिलं तर पंढरपूरला जाणारी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी चालली होती. आज पालखीचा मुक्काम जालन्यातच होता. मी मनोभावे पालखीला नमस्कार केला. परमप्रिय दैवताच्या पालखीचं दर्शन झाल्याने माझं मन भक्तिभावानं भरून गेलं. निदान आजच्या दिवशी तरी कुत्र्याला विष घालण्याचं दुष्ट कृत्य करू नये असा विचार करून विकत घेतलेला बिस्किटाच्या पुडा घरी न नेता तसाच बँकेत नेला.

रात्री काम आटोपल्यावर बिस्किटाच्या पुड्याची थैली सायकलच्या हॅंडलला लावली आणि घराकडे निघालो. आज गल्लीत तो खतरनाक कुत्रा दिसला नाही. तरी सावधगिरी म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला पहात मी हळूहळू  सायकल चालवीत होतो. गल्ली संपत आली तरी कुत्रा दिसला नाही पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो.. तोंच अचानक त्या गल्लीतील यमदूताने समोरून येत माझ्या सायकलवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्याने मी पुरता गांगरलो. माझा तोल गेला आणि मी सायकलवरून धाडकन खाली आदळलो. कसाबसा उठून कपड्यांवरील धूळही न झटकता, तशीच सायकल हातात धरली आणि धूम पळत सुटलो. गल्ली पार झाल्यानंतर, तो भयंकर यमदूत मागे फिरल्यावर मगच पुन्हा सायकलवर बसून घरी पोहोचलो.

आता मात्र मी सूडानं पुरता पेटलो होतो. सायकलवरून पडल्यामुळे थोडं खरचटून मुका मारही लागला होता. आत्ताच बिस्किटं विषात भिजवून ठेवावीत म्हणून मी हँडलची थैली काढली तर आत बिस्किटाचा पुडाच नव्हता. कदाचित मघाशी सायकल पडली तेंव्हा थैलीतून पुडा कुठेतरी खाली पडला असावा.

आता उद्या दुपारी बँकेत जाताना हे कुत्र्याचे विष बाटलीत भरून बँकेत न्यावे व रात्री येताना बिस्किटाचा पुडा सोबत आणून, त्या गल्लीत थांबून बिस्किटावर विष शिंपडून कुत्र्याला खाऊ घालावे असा पक्का निर्धार केला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी रात्री घरी परतताना बिस्किटाचा पुडा विकत घेतला. विषाची बाटली तर दुपारी येतानाच खिशात ठेवली होती. एखाद्या योध्याप्रमाणे सर्व तयारीनिशी मी कामगिरीवर निघालो होतो. आज तो माझा जानी दुश्मन भयंकर कुत्रा गल्लीच्या सुरवातीलाच स्वागतासाठी हजर होता. जणू काही तो माझीच आतुरतेनं वाट पहात होता. मी देखील एकदाची ही ब्याद टळावी म्हणून आसुसलो होतो.

शांतपणे सायकल उभी करून मी खाली उतरलो. कुत्राही आता माझ्या अगदी जवळ आला होता. माझा हात खिशातील विषाच्या बाटलीकडे गेला. अचानक माझी नजर कुत्र्याच्या डोळ्यांकडे गेली. त्या डोळ्यात केवळ प्रेम आणि आपुलकीच भरलेली दिसत होती. तो आनंदाने जोरजोरात शेपटी हलवीत होता. मला पाहून त्याला खूप आनंद झालेला दिसत होता. तो जवळ येऊन प्रेमाने चक्क माझे पाय चाटु लागला. इतक्या दिवसांचा माझा वैरी आज माझा दोस्त झाला होता. ही किमया कशी घडली याचा मला तर काहीच उलगडा होत नव्हता. त्याचं ते प्रेम बघून माझ्या मनातही त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली. त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं. थैलीतून बिस्किटाचा पुडा काढून मी त्याला सर्व बिस्किटं प्रेमाने खाऊ घातली. थोडावेळ त्याच्याशी खेळून, त्याला जवळ घेत कुरवाळून, त्याच्या पाठीवर तोंडावर हात फिरवून मी घरी निघालो. शेपूट हलवीत तो कुत्राही माझ्या मागोमाग गल्लीच्या टोकापर्यंत आला.pexels photo 7269591

a dog eating a treat

……घरी जाण्यापूर्वी खिशातून विषाची बाटली काढून मी दूर भिरकावून दिली. क्रोधाने आंधळा होऊन मी एक मुक्या प्राण्याच्या जीवावर उठलो होतो हे आठवून मला माझीच लाज वाटत होती.

त्या दिवसापासून तो कुत्रा माझा जिवलग मित्र झाला. माझी वाट पहात गल्लीच्या तोंडाशी बसून राहायचा. मी दुरून दिसताच शेपटी हलवत माझ्या जवळ यायचा, मला चाटायचा, माझ्या कडून लाड करून घ्यायचा. मीही त्याच्यासाठी आठवणीने काहीतरी खाऊ घेऊन जायचो. आता संध्याकाळ झाली की मलाही त्याच्या भेटीची ओढ आणि उत्सुकता लागून रहायची.

हा भयंकर कुत्रा अचानक माझा मित्र कसा बनला यावर विचार केल्यावर मला आठवलं की… त्या दिवशी सायकल खाली पडली तेंव्हा हँडलला लावलेल्या थैलीतील बिस्किटाचा पुडा तिथे पडला असावा आणि त्या कुत्र्याला असं वाटलं की मी तो त्याच्यासाठी आणला होता. साहजिकच त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मी त्याला दयाळू, सहृदय वाटू लागलो. त्याने प्रेमाच्या आशेने माझ्याशी मैत्रीपूर्ण सलगी केली आणि माझ्या सकारात्मक प्रतिसादाने आमची दोस्ती पक्की झाली.

खरंच… किती सोप्पं होतं त्याच्याशी दोस्ती करणं ! मी विनाकारण त्याला घाबरून इतके दिवस व्यर्थ तणावात घालवले. सुरवातीलाच त्याला चुचकारून, काहीतरी खायला देऊन, त्याच्यावर प्रेम करून, त्याला आपलंसं करून घेतलं असतं तर त्याचा जीव घेण्याइतका टोकाचा विचार करण्याची काहीच गरज नव्हती.

आपल्या आयुष्यात ही आपण खोट्या मान सन्मान, प्रतिष्ठा व अहंकारापायी कधी कधी अतिशय क्षुल्लक कारणावरून एकमेकांविषयी वैरभाव मनात बाळगून आपसातील संबंध बिघडवितो. गैरसमज न बाळगता, मोकळ्या मनाने जर आपण आपल्या तथाकथित शत्रु पुढे मैत्रीचा हात पुढे केला तर कोणताही वाद, मतभेद कधीच विकोपास जाणार नाहीत व एक सुदृढ समाज निर्माण होईल.

….”काय साहेब, औषध जालीम होतं ना ? कुत्र्याचा बंदोबस्त झाला की नाही ?”

जिथून कुत्र्याचे विष आणले होते तो औषध विक्रेता मला पाहून विचारत होता..

*”अगदी सहज ! आणि अतिशय उत्तमरीत्या….”*

……हात उंचावून अंगठा दाखवून मी हसत म्हणालो…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

पाठांतर स्पर्धेची गोष्ट

images 13

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

पाठांतर स्पर्धेची गोष्ट

——————–

मित्रांनो

आपण लहानपणी अभावितपणे अशा काही गोष्टी करतो, की त्यावेळी त्या किती हास्यास्पद आहेत याचा आपल्याला तेंव्हा पत्ता ही नसतो. पण नंतर कधी त्या गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला त्या आठवून आपलेच आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही.

ही साधारण १९६१-६२ सालची गोष्ट आहे.

त्यावेळी आम्ही जाफ्राबादला होतो.

त्या काळात तिथे लाईट नव्हते . कंदील चिमण्यांचा वापर करावा लागायचा.

 तसेच नळाचे पाणी नव्हते. विहीरीचे पाणीच प्यायला व धुण्याभांड्याला उपलब्ध होते . मी सरकारी शाळेत त्यावेळी आठवीत शिकत होतो.

आमच्या शाळेत दरवर्षी मी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची आतुरतेने वाट पहायचो कारण या दोन दिवशी खूप धमाल करायला मिळायची.

वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या . उदा. चमचा लिंबू रेस, तीनटांगी दौड,  पोत्यात  दोन्ही पाय घालून उड्या मारीत जाणे, हात बांधून उड्या मारून उंच दोरीला बांधलेली जिलबी खाणे, निबंध स्पर्धा , कविता पाठांतर स्पर्धा .

या सगळ्यांमध्ये मी हिरिरी ने भाग घ्यायचो . निबंध स्पर्धा आणि कविता पाठांतर स्पर्धांमध्ये मला हमखास पहिले बक्षीस मिळायचे .  मी फार हुशार होतो अशातला अजिबात भाग नाही . फक्त इतर विद्यार्थ्यांचे पालक बहुधा अशिक्षित होते, त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नव्हते त्यामुळे ते अभ्यासात मागे असत .म्हणून मी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता…

तर मी पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होता .एकूण वीसएक स्पर्धक होते .आमच्या हेडमास्तरांना ( वाघमारे ) सरांना मी बाळबोधपणे विचारले,

” सर किती कविता म्हणून दाखवायच्या ?”

सर म्हणाले , तांदुळजे सर परिक्षक आहेत .जेवढ्या कविता तुला पाठ आहेत तेवढ्या त्यांना म्हणून दाखव.”

…झालं… मला तर पडत्या फळाची आज्ञा मिळाली होती .

स्पर्धा सुरु झाली . तांदुळजे सरांनी माझा नंबर सगळ्यात  शेवटी ठेवला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कविता म्हणून दाखवल्या . कुणी २ कुणी ३ कुणी चार अशा ..माझ्या आधीच्या मुलांपैकी चारच्या वर कुणी गेले नाही. याचा अर्थ सरळ होता की मी पाच कविता म्हटल्या तरी पुरेसे होते .पहिला नंबर पक्का होता.माझा शेवटचा नंबर होता. 

तो आल्यानंतर मी कविता म्हणायला सुरुवात केली …. सहा कविता म्हणून झाल्या .

शाळा संपल्याची घंटा झाली.

तांदुळजे सर म्हणाले. चल आता . तुझ्या सहा कविता झाल्या . शिपायाला शाळा बंद करायची आहे.’

पण माझी मुख्याध्यापकांवर फार दृढ श्रध्दा होती. मी तांदुळजे सरांना म्हटले . ‘सर शिपायाला खुशाल शाळा बंद करू द्या . मला हेडसरांनी सांगितले की तुला जितक्या कविता येतात तेवढ्या म्हण. तेंव्हा आता माघार नाही. मी तुमच्या घरी येतो व तिथे उरलेल्या कविता म्हणून दाखवतो!!’

सर फार भिडस्त होते. मी सगळ्याच सरांचा लाडका विद्यार्थी होतो. तसाच या सरांचाही लाडका विद्यार्थी होतो. सर म्हणाले ,ठीक आहे बाबा..माझ्या घरी चल . तिथे उरलेल्या कविता म्हण. ‘

आम्ही सरांच्या घरी आलो की मी लगेच उरलेल्या कविता सुरु केल्या.   सरांचं लग्न झालं  नव्हतं. म्हणून ते स्वत:च घरी स्वयंपाक करायचे. सर मला म्हणाले मी स्वयंपाक करतो.   तू तुझं चालू दे. इकडे माझ्या कविता चालूच होत्या.

सरांनी कमालीचा संयम राखीत शांतपणे खिचडी टाकली.khichdi

सुमारे वीस मिनिटांनी माझ्या मराठी कविता संपल्या. मी म्हटले सर आता हिंदीच्या आणि इंग्रजीच्या कविता राहिल्यात , त्या म्हणू का ?talking boy   सरांनी समयसूचकपणा दाखवत म्हटले , नको नको.ही स्पर्धा फक्त मराठी कवितांचीच आहे…

सरांना इतका वेळ पीडा देऊन मी घरी परतलो….

मित्रांनो आपल्या मराठी  विनोदी साहित्यात कवी  आणि कविता हे दोन्ही सातत्याने चेष्टेचा विषय राहिले आहेत .पण मी हेडमास्तरांनी  दिलेल्या सूचना पाळतांना तारतम्य न बाळगल्यामुळे तांदुळजे सरांना आपण खूप पीडा देत आहोत हा विचार त्यावेळी माझ्या मनाला शिवला पण  नाही.

तांदुळजे सरांच्या पेशन्सला मात्र माझा त्रिवार सलाम….त्या काळच्या शिक्षकांचे आणि मुलांचे असे वेगळेच नाते होते…

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

Story of a donkey-एका गाढवाची गोष्ट

donkey1

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

एका गाढवाची गोष्ट

ही साधारण १९६३ सालची गोष्ट आहे.

मी त्यावेळी अंबाजोगाईला होतो आणि योगेश्वरी शाळेत ९ वीत शिकत होतो. आमच्या शाळेच्या सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम चालू होता. त्यात एक खूप बिलंदर वक्ता होता. तो नेहमी मास्तर लोकांची चेष्टा करीत असे.

त्याने गाढवाची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

“एका धोब्याकडे एक गाढव असते. ते मानेने फक्त ‘हो-हो’ असेच म्हणत असते. त्या धोब्याने शर्यत लावली की जो कोणी माझ्या गाढवाकडून ‘नाही- नाही’ म्हणवून दाखवेल, त्याला दहा रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. तेंव्हा बरेच जण आले आणि त्यांनी विविध प्रकारे त्या गाढवाची मान ‘नाही-नाही’ अशी, म्हणजे आडवी हालेल यासाठी प्रयत्न केले.  पण कितीही जंग जंग पछाडले तरी ते गाढव काही ‘नाही-नाही’ म्हणत नव्हते. दर वेळी ते गाढव ‘हो-हो’ अशीच मान हालवित होते.

शेवटी एकजण आला. तो त्या गाढवाच्या कानात काही तरी बोलला. लगेच ते गाढव मानेने ‘नाही-नाही’ असे म्हणू लागले.

धोब्याने आपली हार कबूल केली, आणि ठरल्याप्रमाणे त्या माणसाला १० रुपये दिले. पण मग न राहवून धोब्याने त्या माणसाला विचारले, “मी इतके दिवसांपासून हा खेळ करतो आहे, पण आतापर्यंत कुणीही गाढवाकडून नाही नाही म्हणवून घेऊ शकले नाही, मग तुम्ही असे काय त्या गाढवाच्या कानात सांगितले, की माझे गाढव एवढे जोरजोरात नाही म्हणून मान हलवू लागले?”

त्यावर तो माणूस म्हणाला, “अगदी सोपे आहे. मी त्या गाढवाच्या कानात विचारले, क्या तू मास्टर बनेगा?” त्यावर त्याने जोरात मान हलवली.!!”

त्या वक्त्याच्या या शेवटच्या वाक्याने, पूर्ण हॉल प्रचंड हास्यात बुडून गेला. तिथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, गोरेमोरे झाले.

संयोजकांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारले. पुढचे वक्ते होते संभूस सर. संभूस सर हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते योगेश्वरी  महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तर होतेच पण एक चांगले साहित्यिक पण होते. ते त्या आगाऊ वक्त्याला असे सोडतील असे शक्यच नव्हते.

संभूस सर व्यासपीठावर आले.  त्यांनी सर्व श्रोत्यांकडे नजर फिरविली. त्यानंतर एक कटाक्ष त्यांनी आधीच्या वक्त्याकडे टाकला आणि त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले,

“ आत्ताच तुम्ही एका गाढवाची गोष्ट ऐकली आहे…..

आता माझी गोष्ट ऐका…”

एक क्षणभर शांतता, आणि पुढल्याच क्षणी, आधी झाला होता, त्यापेक्षा, दुप्पट हशा पूर्ण सभागृहात झाला, आणि त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट पण झाला.

तो आधीचा वक्ता, जो इतका वेळ विजयी नजरेने सगळीकडे पाहत होता, त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले, आणि त्याने खाली मान घातली, ती नंतर वर केलीच नाही.man sitting with his head down to the left leaning on his hand one line drawing concept fatigue reflections tiredness drowsiness vector

 

“मास्टर से पंगा लेना इतना आसान नही होता!” हे त्यादिवशी संभूस सरांनी सिद्ध करून दाखवले.

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

गावातील राजकारण

Capture 2

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

गावपातळीवरील
—————

राजकारणाची एका छोटीसी
———————

झलक
——-

साधारणपणे १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी पाणीपुरवठा खात्यात ज्युनियर इंजिनीअर म्हणून काम करीत होतो .ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यांत मला सर्व्हे करण्यासाठी जावे लागायचे. तिथे चार पाच दिवस मुक्काम करावा लागायचा .नदी काठी प्रस्तावित विहीरीच्या जागेचा सर्व्हे , रायजिंग मेन म्हणजे नदीकाठच्या प्रस्तावित विहीरीपासून गावातील प्रस्तावित टाकीपर्यंत टाकायच्या पाईपच्या अलाईनमेंटचा सर्व्हे , प्रस्तावित टाकीच्या जागेचा सर्व्हे आणि Distribution system म्हणजे गावातल्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी वितरण व्यवस्थे साठी करावयाचा सर्व्हे असे साधारणपणे कामाचे तांत्रिक स्वरूप होते.त्या काळात खेड्यापाड्यांमध्ये चुकुन माकुन एखादी दुसरी चहाची टपरी असायची.मुक्काम करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी शहरातल्या सारखी लाॅजिंग बोर्डींगची सोय असणारे हाॅटेल्स खेड्यात नसतं .त्यामुळे
आमचा मुक्काम ग्रामपंचायतीमध्येच असायचा. आम्ही दौऱ्यावर येतांना आपले अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन यायचो. जेवणासाठी आम्ही आमचे किचन किट बरोबरच ठेवायचो. त्यामध्ये स्टोव्ह, पुरेसे राॅकेल, पीठ, मीठ, दाळ, तांदूळ, तेल, तिखट , चहा साखर इत्यादी सर्व आवश्यक वस्तू असंत .भांड्यांचा सेट आम्हाला आॅफिसतर्फे मिळायचा. व आमचे जेवण खाण नाश्तापाणी हे तयार करण्यासाठी एक अटेन्डट सोबत मिळायचा.सर्व्हे करण्यासाठी लागणारे चारपाच मजूर आम्ही डेली वेजेसवर गावातूनच घ्यायचो.त्यावेळी नियमित बससेवा फार कमी खेड्यांमध्ये होती म्हणून आमचे डेप्युटी इंजिनीअर आम्हाला जीपने खेड्यात आणून सोडायचे व ठरल्याप्रमाणे परत चार पाच दिवसांनी आम्हाला वापस घेऊन जाण्यासाठी जीप घेऊन यायचे.
आम्ही गावात आलो की कांही मिनिटांतच पाणी पुरवठ्याचे इंजिनियर लोक आलेत ही बातमी वाऱ्या सारखी गावभर पसरायची. खेड्यात रिकामटेकडे लोक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात . त्यांच्यापैकी कांहीजण नुसतेच आम्हाला पहाण्यासाठी यायचे.आपण झू मध्ये जातो ना वन्य प्राणी पहायला , अगदी सेम तसेच आम्हाला पहायला कांही लोक यायचे. थोडंसं दूर अंतरावर उभे राहून आपसात हळू आवाजात बोलायचे . अर्थात आमच्याबद्दलच ते बोलणे असे. हा प्रकार मोठा आॅकवर्ड वाटायचा. पण काय करणार ना !!!

एका खेड्याच्या सर्व्हेसाठी दोन junior engineers पुरे असतात.आम्ही आल्या आल्या कोतवालाला सूचना द्यायचो की , जा सरपंचांना सांग की पाणी पुरवठा योजनेचा सर्व्हे करणारे इंजिनियर लोक आलेयत आणि तुम्हाला बोलावलयं. सरपंच नसले तर उप सरपंचाला सांग आणि ते ही नसले तर चार दोन मेंबरांना बोलाऊन घेऊन ये. आम्ही योजनेची माहिती देणार आहोत म्हणा.’
मग जे कोणी येतील त्यांना आम्ही पाणी पुरवठा योजनेचे स्वरूप त्यांना समजेल अशा स्टाईल मध्ये समजावून सांगायचो व मग यथावकाश survey instruments घेऊन सर्व्हेचे काम सुरू करायचो.
सर्व्हेचे काम साधारणपणे चारपाच दिवसात पूर्ण व्हायचं . मग ठरल्याप्रमाणे आमचे डेप्युटी इंजिनियर जीप घेऊन यायचे व आम्हाला औरंगाबादला परत आणायचे.
पाणी पुरवठा ही एक अत्यावश्यक बाब असल्यामुळे आम्ही ज्या खेड्यात जाऊ तिथल्या लोकांत उत्साह आणि आनंद पसरायचा की चला आता आपल्याला पिण्याचं पाणी आपल्या घरोघरी नळातून मिळणार . रोज दूर अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्याचा आपला आणि विशेषत: आपल्या बायकांचा कित्येक वर्षांपासून होणारा त्रास लवकरच संपणार आणि तो ही सरकारी खर्चाने ! म्हणून तमाम मंडळी खूष असंत .संध्याकाळी गावची तालेवार मंडळी आम्हाला येऊन भेटत .योजनेची माहिती विचारीत . मीही त्यांच समाधान होईल अशी माहिती देत असे. मग कुणीतरी आपल्या गड्याला सांगत असे , जा रे आपल्या घरला जाऊन सायेब लोकान्साठी च्या पोहे घेऊन ये. मग थोड्या वेळानी आमच्या साठी चहा पोह्याचा नाश्ता यायचा. सरपंच आणि इतर लोक सुद्धा अदबीने बोलायचे.कुणीतरी विचारायचं, सायेब सर्वेला किती दिवस लागतील.. मी म्हणायचो .’ चार पाच दिवसात सहज सर्व्हे पूर्ण होईल.’
पुढचा प्रश्न ‘.,अन् मंग तेच्यानंतर काय हुईल ? ‘
माझं उत्तर , ‘ त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादच्या आॅफिस मध्ये बसून या पाणी पुरवठा योजनेचे प्लॅन्स ड्राॅईंग्ज डिझाईन्स आणि एस्टिमेट्स तयार करू. याच्यासाठी आम्हाला औरंगाबादला पंधरा दिवस लागतील.नंतर या योजनेला मंजूरी मिळेल.नंतर निधी उपलब्ध होईल. नंतर टेंडर्स बोलावले जातील . त्यानंतर योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होईल व त्यानंतर साधारणपणे नऊ महिन्यात काम पूर्ण होऊन तुम्हाला घरामध्ये कनेक्शन घेऊन पिण्याचं पाणी मिळू शकेल..’ मी थोडक्यात अशी माहिती देत असे.
मग सगळे लोक आम्हाला काम लवकरात लवकर केलंत तर लई चांगल होईल बघा , त्याच्यासाठी तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आनंदाने द्यायला आम्ही तयार आहोत असं सांगायचे..

हा झाला सर्व साधारणपणे आमचा जनरल अनुभव .

पण एका खेड्यात मात्र वेगळाच अनुभव आला.आमचा सर्व्हे संपायच्या शेवटच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास दोन तीन जण आले. मला म्हणाले . ‘ इंजनेर सायेब यावं का, थोडं महत्वाचं बोलायचं व्हतं .’
मला वाटलं नेहमीप्रमाणे लवकर योजना तयार करा अशी विनंती करायला मंडळी आली असावी. मी म्हटलं ,’ या की, बसा अन् सांगा काय सांगायचं ते.’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला, ‘ तुमी म्हनला व्हता की तुमाला सर्वे कराया पाच दिवस अन् यवजनेचे एष्टीमेट कराया पंधरा दिवस लागतील म्हनून शान..’
मी म्हटलं, ‘ होय की तेवढ्या वेळात मी नक्कीच करू शकतो..’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला., ‘इंजनेर सायेब इतक्या फाष्ट यवजनेचे एष्टीमेट करायची काय पन गरज नाही. आम्ही तर म्हन्तो तुमी चांगले पाचसहा महिने एष्टीमेट लांबवा . तेच्यात काई बी आब्जेक्शन काढा अन् मधी खोडा घाला..’

मी अवाक् झालो आपल्याच गावच्या विरोधात हे लोक अशी मागणी का करताहेत हे मला समजेना.
मी त्यांना म्हटलं अहो प्रत्येक गावातले लोक आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगतात आणि तुम्ही अशी विपरित मागणी कशी करू शकता. त्याचं काय कारण आहे.’..
त्यावर म्होरक्या म्हणाला, ‘ सायेब हे गावचं पाल्टिक्स असतं. तुमच्या सारख्यांना न्हाई समजायचं . तरी बी सांगतो. अावो सायेब जर यवजना लवकर पूर्न झाली तर त्याचं समदं क्रेडिट सरपंचास्नी जाईल. पुडच्या इलेक्शनमधे आमाला त्याला पाडायचंय अन् मला सरपंच व्हायाचंय . त्याच्या काळात पानीपुरवठा यवजना वेळेवर करून घेन्यात हा सरपंच फेल गेला आसं मला प्रचारात त्याच्या आपोजिटमधे बोंबाबोंब करून सांगता आलं फायजे. म्हनून तुमाला मी रिक्वेष्ट करतो की काहीतरी टेक्निकल पाईंट काढून तुम्ही ही यवजना लांबवा.
अन् सायेब अाम्ही काही नुस्तीच कोरडी रिक्वेष्ट करत न्हाई . तुमची काय राजी खुशी आसंल, च्या पानी आसंल ते खुल्लं सांगा . तुमी आमचं यवढं मोठं काम करनार म्हनल्यावर आम्ही बी तुम्हाला खुश करूच की .’

 

अर्थात असे स्वार्थी आणि

गलिच्छ राजकारण

करणाऱ्या 

पुढाऱ्याला मी भीक घातली

नाही हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.

 

 

पण हा अनुभव मात्र मला बरंच कांही शिकवून गेला !!!

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.

चोराच्या उलट्या बोंबा

%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B0 %C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

चोराच्या उलट्या बोंबा

——————-

मित्रांनो

मी इंजिनिअरिंगला शिकत असतांना उस्मानपुऱ्यातल्या एका वाड्यात रहात होतो.तो बराच मोठा वाडा होता. सात आठ खोल्यात मिळून सुमारे पंधरा वीस विद्यार्थी तिथे रहात होते . त्यातले बहुसंख्य आमच्याच काॅलेज मध्ये शिकत होते.

उन्हाळा सुरू झाला की रूममध्ये खूप उकडायचे.फॅन विकत घेण्याची त्यावेळी आमच्या पैकी कुणाची ऐपत नव्हती . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कांही जण अंगणात झोपायचे , तर बरेच जण रूमचे दार रात्रभर चक्क सताड उघडे टाकून झोपायचे . रात्रीचा अभ्यास साधारणपणे बारा वाजेपर्यंत चालायचा व त्यानंतर बहुधा सगळे जण झोपायचे ..

त्यावेळी उस्मानपुऱ्यात रात्री उचलेगिरी करणाऱ्या भुरट्या चोरांची एक टोळी सक्रिय होती.

एकदा मध्यरात्रीनंतर केंव्हातरी आमच्या वाड्यात चोर आले .रूमचे दार रुममधे

उकडते म्हणून सताड उघडे टाकून कांही विद्यार्थी झोपले होते. अगदी गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ज्या खोल्या उघड्या दिसल्या तिथून कपडे म्हणजे शर्ट पॅंट्स चोरून अवघ्या कांही मिनिटांमध्ये चोर पसार झाले ..Host1

ज्यांचे कपडे चोरीला गेले त्यांना सकाळी उठल्यानंतरच कळाले की आपले कपडे  चोरी गेले आहेत.

पोलिस कम्प्लेन्ट करण्यात कांहीच अर्थ नव्हता . कारण वेळ तर नक्कीच वाया गेला असता आणि चोर पकडले जाण्याची आणि चोरी गेलेले कपडे परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे मानून कुणीही कंप्लेन्ट करण्याच्या फंदात पडले नाही.

असाच साधारण महिना गेला. चोरीचा विषय मागे पडला होता . पण एक दिवशी एक हवालदार आमच्या वाड्यात आला आणि म्हणाला आम्ही दोन चोरांना दुसऱ्या गुन्ह्यात अरेस्ट केले आहे . त्यांनी तुमच्या वाड्यात कपड्यांची चोरी केल्याची कबुली पण दिली आहे.तेंव्हा तुम्ही चोरांच्या आयडेंटीफिकेशन साठी व चोरी गेलेल्या कपड्यांच्या आयडेंटीफिकेशन साठी पोलिस स्टेशन मध्ये या..”..

आम्ही सांगितले की आम्ही सगळे जण गाढ झोपेत असतांना चोर येऊन चोरी करून गेले.त्यामुळे आम्ही चोरांना नाही ओळखू शकणार . पण आमचे कपडे जरूर ओळखू . आणि दिवसा आम्हाला काॅलेज असतं म्हणून आम्ही संध्याकाळी येऊ .. चालेल ना.. यावर हवालदार हो म्हणाला .images 10

माझी स्वत:ची एक पॅंट गेली होती . चेन खराब झालेली, हुक तुटलेली, तुरपाई उसवलेली अशी पॅंट होती.

संध्याकाळी आम्ही चारपाच जण पोलिस ठाण्यात गेलो.

तिथे पोलिसांनी आम्हाला लाॅकअप मधला तो चोर दाखवला आणि त्यानी चोरलेले आमचे कपडे म्हणजे शर्ट्स व पॅंट्स दाखवले.ज्यानी त्यानी आपापले कपडे ओळखले व तसे आम्ही तिथल्या हवालदाराला सांगितले .

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चोरट्याच्या चेहेऱ्यावर आपण कांही चुकीचं केलंय अशा भावनेचा लवलेशही नव्हता .drunk story 647 081216111848

त्याचं नाव करीम खान असं होतं असं हवालदाराकडून कळालं .

कांही तरी बोलावं म्हणून मी म्हणालो…कायको चोरी किये मियाॅं हमारे वाडेमे. हम सब तो स्टुडन्टस है. पढाई करने के वास्ते आये है.ऐसा नही करना था तुमने..”

यावर तो मला म्हणाला…images 11

ऐसे कैसे इष्टुडन्ट लोगां है जी तुम….कितने खराब कपडे मिले मेरेकु.किसकी चेन नही तो किसकी हुक नही, किसके बटना टुटे हुए तो किसके कपलिंग गायब तो किसका जेब फटा हुवा.

ऐसे  भंगार कपडे पहनते क्या ? रिपेरिंग मे मेरेकु कित्ता खर्चा करना पडा..

और हाॅं . दूसरी बात … किसीकेभी जेब मे मेरेकु एक धेला भी नही मिला … तुम सब के सब कडके निकले.

तुम लोगोंको घरसे मनिआरडर नही आती क्या  ? मेरेकु कुछ पडतल नही गिरा….”depositphotos 394276510 stock illustration shouting young boy cartoon

म्हणजे पहा…हा xxxx स्वत: चोर !!! पण आमच्या कडे चोरी  करून परत वर आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करीत होता..

आता पर्यंत मी फक्त ‘ चोराच्या उलट्या बोंबा ‘ हा वाक्प्रचारच ऐकला होता . पण या प्रसंगाच्या तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला….

😄😜🤑

v.d.bhope
v.d.bhope

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.