https://goodworld.in A website by Madhav Bhope

पुण्यातील मनाचे पाच गणपति 5 Most important Ganpati of Pune

punyache manache ganpati

पुण्याचे पांच मानाचे गणपति

5 Most important Ganpati of Pune

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच आणि त्याचा पाया हा पुण्यामध्ये घातला गेलेला आहे, त्यामुळेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा आहे. यामध्ये कालांतराने अनेक गणेश उत्सव मंडळे निर्माण होत गेली आणि आज सध्या हजारो मंडळे पुण्यामध्ये कार्यरत आहेत.

पण त्यापैकी काही निवडक, जुने, ऐतिहासिक आणि मानाचे असे पाच गणपती पुण्यात आजही आहेत. या मानाच्या गणपतींचे दर्शन सुद्धा एका विशिष्ट क्रमाने घ्यायचे असते

पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घेण्याचा क्रम खालीलप्रमाणे

१. दर्शनाची सुरुवात मानाचा पहिल्या गणपती कसबा गणपती पासून करावी.
२. त्यानंतर ४५० मीटर वर असलेल्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेशवरी चे दर्शन घ्यावे.
३. त्यानंतर २३० मीटर वर असलेल्या गुरुजी तालीम या मानाचा तिसरा गणपतीचे दर्शन घेता येईल.
४. इथून १५० मीटर वर असणाऱ्या तुळशीबाग गणपती या मानाचा चौथा गणपती चे दर्शन घ्यावे.
५. आणि सर्वात शेवटी ९०० मीटर वरील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती चे दर्शन घ्यावे.
सर्व गणपतींचे दर्शन जास्तीत जास्त २.५ किलोमीटर मध्ये होईल.

पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीची  माहिती

  1. कसबा गणपती – मानाचा पहिला गणपती  Kasaba Ganapatishri-kasba-ganpati

मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती सापडली. हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी १६३९ साली बांधले होते.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात. पुण्याच्या आयुक्तांसह महापौर यांच्या तर्फे आरती होते आणि नंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते.

शहाजीराजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला त्यावेळी जिजामातांनी या गणपतीची स्थापना केली. येथील मूर्ती स्वयंभू असून प्रारंभीच्या काळात ती तांदळा एवढी होती, आता सातत्याने शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फुट उंचीची झाली आहे असे सांगितले जाते.

2.तांबडी जोगेशवरी – मानाचा दूसरा गणपती- Tambadi Jogeshwaritambdi jogeshwari ganpati

तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिला पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्याची पुनर्स्थापना केली जाते.

हे मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले असले तरी दुर्गादेवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे. सन 2000 पर्यंत मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना केली जात होती. 2000 पासून मंदिरासमोर स्वतंत्र पेंडल लावून मूर्तीची स्थापना चांदीच्या घुमटात केली जाते.

इथल्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाची सुरुवात १८९३ साली झाली झाली. बुधवार पेठेतील या गणेशोत्सवास श्री भाऊ बेंद्रे यांनी प्रारंभ केला. इथल्या पितळी देव्हाऱ्यात गणेश मूर्तीची स्थापना करतात, तसेच चार युगातील बाप्पांचे एकाच ठिकाणी इथे रूप पाहायला मिळतात

3.गुरुजी तालीम – मानाचा तिसरा गणपती  Guruji Talim Ganapatiguruji talim ganpati

गुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली. त्यामुळेच पुण्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गुरुजी तालीम गणपतीचे उदाहरण दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी ६ वर्षे या मंडळाची स्थापना झाली होती; त्यांउळे प्लॅटिनम ज्युबिली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले.

4.तुळशीबाग गणपती – मानाचा चौथा गणपती  Tulshi baag Ganpatitulshibag ganpati

 जगप्रसिद्ध तुळशीबागेतील गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे. याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. 1975 पासून प्रथम ग्लास फायबर ची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. हा शहराच्या मध्यभाग आणि सर्वात गजबजलेला भाग आहे. पुतळा 13 फूट उंच आहे आणि 80 किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने घालतात. कलाकार डी.एस.खटवकर अनेक वर्षांपासून मूर्तीची सजावट करत आहेत.

5.केसरीवाडा गणपती – मानाचा पाचवा गणपती  Kesariwada Ganpatikesari vada ganpati

टिळकांच्या केसरी संस्थेचा केसरीवाडा गणपती हा पुण्यातील ५वा मानाचा गणपती आहे. १८९४ मध्ये स्थापन झाल्यापासून केसरीवाड्याचा गणेशोत्सव कुमठेकर रोडपासून दूर असलेल्या विंचूरकर वाड्यात आयोजित केला जायचा, जे त्यावेळचे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर ते गायकवाड वाड्यात स्थलांतरित करण्यात आले, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो.

इथे गणेशोत्सव काळात टिळकांची नियमित व्याख्याने होत असत. आजही  या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघते.

माधव भोपे

याच विषयावरील हिंदीतील लेख इथे वाचा 

गणेश पुराण -2

ganesh puran

श्री गणेश पुराणात मागील भागात आपण पाहिले की प्राचीन काळी सोमकांत नांवाचा राजा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन, आपली राणी आणि प्रधानासह अरण्यात गेला. तिथे त्याला आधी ऋषिकुमार च्यवन आणि नंतर त्यांचे वडील भृगू ऋषींची भेट झाली. भृगू ऋषीं नी आपल्या ज्ञानाने राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तान्त जाणून राजाला त्याच्या पूर्व जन्मी केलेल्या पापांची जाणीव करून दिली.

याआधील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आता पुढे-

 भृगू ऋषींच्या तोंडून आपले पूर्वजन्मीचे चरित्र ऐकून राजाच्या मनात संशय निर्माण झाला, आणि त्यावर त्याचा सहजी विश्वास बसेना. तो बराच वेळ काही न बोलता बसून राहिला.

ganesh puran-2

तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर आपल्या चोंचींनी प्रहार करू लागले, त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू आणि तडफडू लागला. त्याने भृगू ऋषींना तळमळून विचारले, “ हा काय प्रकार आहे? हे पक्षी माझ्यावर असे का तुटून पडले आहेत?”

त्यावर भृगू ऋषी म्हणाले, “हे राजन, तुझ्या मनात माझ्या बोलण्याबद्दल विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतःकरणात विश्वास निर्माण झाला, तर माझ्या एका हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील.”

त्यावर सोमकांताने मनातील विकल्प टाकून दिले आणि तो भृगू ऋषींना शरण गेला. तेंव्हा ऋषींनी मोठ्याने हुंकार भरला, आणि काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले.

भृगू ऋषी पुढे म्हणाले, “राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे एवढी भयानक आहेत की त्यांचे निरसन करायला काय करावे हा मला मोठा प्रश्न पडला आहे.

तथापि गणपतीचे माहात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता आणि भक्तांच्या दोषांचा नाश करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून तू आता ‘गणेश पुराण’ श्रवण कर. त्यामुळे तू निष्पाप होशील.”

सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले, आणि तो ऋषींना म्हणाला, महाराज, तुम्ही  माझे कल्याणच करणार याबद्दल माझी खात्री आहे. कृपया मला या रोगातून सोडवा.

तेंव्हा भृगू ऋषींनी श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या प्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्मरूपाने एक काळाकभिन्न पुरुष बाहेर पडला. पाहता पाहता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लालबुंद होते. जीभ बाहेर लोंबत होती, त्याच्या विक्राळ मुखातून अग्निज्वाला आणि रक्त, पू, इत्यादि घाण पदार्थ बाहेर पडत होते. तो आपल्या विक्राळ दाढा चावीत भृगू ऋषींकडे पाहू लागला. मात्र भृगू ऋषीं शांत होते. त्यांनी त्याला विचारले, “तू कोण आहेस?’ तो विकट हास्य करून म्हणाला, “मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्मरूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला राजाच्या देहातून बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे. नाहीतर मी या राजासह सर्वांचा फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस म्हणून माझ्या राहण्याचीही व्यवस्था तूच कर. 

भृगुंनी त्याच्या म्हणण्याने विचलित न होता, त्याला म्हटले, ” तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणाऱ् नाही. आता यापुढे तो समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत रहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजराण कर.” ऋषींपुढे आपले काही चालणार नाही हे ओळखून तो पापपुरुष मुकाट्याने त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय वृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगुंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेंव्हा भृगु  सोमकांताला म्हणाले, “राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील, आणि हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल.

ganesh puran-2
Image credit raja biswas pinterest

त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला गणेश पुराण सांगितले. गणेश पुराण हे एक उप पुराण असून त्याचे 155 अध्याय आहेत.  मूळ पुराण संस्कृतात असून, आजवर बऱ्याच जणांनी त्याचे मराठीत सुलभ भाषांतर केले आहे. 

त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.  कोणाला जर ते amazon वरून खरेदी करायचे असल्यास खालील लिंक वरून घेऊ शकतात. 

1. श्री गणेश पुराण कथासार – धार्मिक प्रकाशन 

2. श्री गणेश पुराण कथासार- ह. भ. प. रंगनाथ महाराज खरात 

3. श्री गणेश पुराण कथासार-गोविंदराय 

माधव भोपे 

गणेश पुराण -1

ganesh puran

सध्या गणेश उत्सवाचा उत्साह ऐन भरात आहे. श्री गणेश हे महाराष्ट्राचे प्रमुख आराध्य दैवत आहे. त्यामुळे हे दहा दिवस साहजिकच गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. अशा वेळी आपण श्री गणेश पुराणातील गणेशाच्या काही गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे  राहील असे वाटते.

प्राचीन काळी नैमिषारण्यात एकदा 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. (आजच्या संदर्भात पाहिले तर नैमिषारण्य हे लखनौ पासून 80 किमी दूर, सीतापूर जिल्ह्यात गोमती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थ आहे. हे पूर्वीपासून ऋषींचे अत्यंत आवडते तपस्थळ आहे, मार्कंडेय पुराणात याचा अनेक वेळेला उल्लेख, 88 हजार ऋषींच्या तपस्थळी च्या रूपात आलेला आहे. या ठिकाणी आज ही भागवत पारायण इत्यादि सारखे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.) तर प्राचीन काळी चालू असलेल्या या यज्ञसत्रात शौनकादि ऋषि हे ऋत्विज होते. त्या यज्ञात मध्यंतरात सूत मुनि सर्वांना पुराणातील गोष्टी सांगत होते. त्यावेळी जमलेल्या श्रोत्यांनी त्यांना सर्वांना पावन करणारी अशी कथा सांगायची विनंती केली. त्यावरून सूत मुनींनी सुरूवात केली.

ते म्हणाले की आज मी तुम्हाला श्री गणेशाची कथा सांगतो. अठरा पुराणांचे श्रवण तुम्ही केले आहे. आता उप पुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण तुम्हाला सांगतो.

सूत सांगू लागले, श्रोतेहो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांचा नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूतें त्याच्या अधीन आहेत. विधी, हरी आणि हर हे ज्याची आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे माहात्म्य मी काय वर्णन करणार? तथापि त्याची अल्पशी सेवा म्हणून मी त्याचे चरित्र तुम्हाला सांगणार आहे.

गणेशाचे हे परम पावन चरित्र सर्वप्रथम ब्रह्मदेवाने महर्षि व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगुला सांगितले, भृगुंनी ते सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले.

सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा प्रारंभ करीत आहे.

सोमकांताची कथा1ca20187f65e03635f6cc35d21219deb

सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी

सोमकांत हा एक धर्मशील राजा होता आणि त्याच्या राजवटीत प्रजा आनंदात राहत होती. त्याची तेवढीच धर्मशील पत्नी सुधर्मा नावाची होती, आणि त्यांचा एक कर्तृत्ववान पुत्र हेमकंठ हा होता.

या सोमकांत राजाला अचानक कुष्ठ रोग झाला. या दुर्धर व्याधीमुळे राजाची फार वाईट अवस्था झाली, तो जीवनाविषयी अत्यंत निराश झाला, आणि त्याने सर्वांपासून  दूर, निर्जन अरण्यात जाऊन, उर्वरित काळ ईश्वरचिंतनात घालवायचा  निर्णय घेतला. त्याच्या पत्नी, मुलाने आणि प्रधान इत्यादि सर्वांनी त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण राजाने पक्के ठरवले होते.

राजाने आपला पुत्र हेमकंठ याला राज्याभिषेक केला, आणि पत्नी आणि दोन प्रधानांसह अरण्याकडे निघाला.

भृगू ऋषींची भेट.

राजा, राणी आणि प्रधान एका निबिड अरण्यातून जात असतांना त्यांना एक स्वच्छ पाणी असलेले सरोवर लागले. त्यांनी तिथे स्नान केले आणि तेथील शीतल पाणी पिऊन, तिथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. त्यावेळी तिथे एक सुंदर तेजस्वी ऋषिकुमार त्याठिकाणी आला. राजाची पत्नी सुधर्मा हिला त्याला पाहून आनंद झाला आणि तिने आदराने त्याला बोलावले व त्याची विचारपूस केली. त्यावर ऋषि कुमाराने आपले नांव च्यवन असल्याचे सांगितले आणि आपण भृगू ऋषी आणि पुलोमा यांचा पुत्र असल्याचे सांगितले. नंतर त्या च्यवन ऋषींनी राजा आणि सर्वांची माहिती विचारली व राजाला काय झाले आहे ते विचारले. त्यावर राणीने आपले नशिबाचे भोग त्याला सांगितले. ऋषि कुमार च्यवन याने फार व्यथित झाले. च्यवन जेंव्हा परत त्यांच्या आश्रमात गेले, तेंव्हा त्याने दुःखी अंतःकरणाने आपले वडील  भृगू यांना हा सर्व वृत्तान्त सांगितला. तेंव्हा भृगूंनीही करुणा युक्त अंतःकरणाने त्या सर्वांना आश्रमात घेऊन यायला सांगितले.

च्यवन ऋषि मग त्या सर्वांना आश्रमात घेऊन आले. आश्रमात गेल्यावर राजा सोमकांताने भृगू ऋषींना आपली व्यथा सांगितली. “हे ऋषि, या व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. माझ्या पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले आहे. मी तुमच्या शरण आहे. आता तुम्हीच मला या व्याधीतून मुक्त होण्याचा उपाय सांगा”

सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू ऋषि त्याला म्हणाले, “ राजा, पूर्व जन्मीच्या पापामुळेच तुला या व्याधीने ग्रासले आहे. आता काळजी करून नकोस. तू इथे आला आहेस तेंव्हा आता या व्याधीतून तुझी सुटका होणार याविषयी खात्री बाळग. मग ऋषींनी त्या सर्वांना उत्तम वस्त्रे देऊन, प्रेमाने पोटभर जेवू घातले आणि विश्रांती करावयास सांगितले.

सोमकांताचे पूर्वजन्मचरित्रprocess aws

दुसरा दिवस उजाडल्यावर भृगू ऋषींनी, नित्याची कर्मे आटोपल्यावर सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगू त्रिकालज्ञानी होते. त्यांनी राजाचे पूर्व जन्मचरित्र सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले,

“ विंध्य पर्वता जवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. त्याची पत्नी सुभगा. त्यांना उशिराने एक मुलगा झाला. त्याचे नाव कामदा. तो अत्यंत देखणा होता. दोघा पती पत्नींनी त्याचे खूप लाडात संगोपन केले. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न लावून दिले. त्यांना सात मुले आणि पाच मुली अशी अपत्ये झाली. कालांतराने चिद्रूप आणि त्याची पत्नी मरण पावले.

त्यांच्यानंतर कामदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता. तो अत्यंत अविचारी होता. त्याने त्या संपत्तीची उधळण करायला सुरूवात केली. अनेक व्यसने करू लागला. आपल्या पत्नीचेही ऐकले नाही. त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी व्यसनापाई त्याने राहते घरही विकले.  नंतरच्या काळात तो पैसे मिळविण्यासाठी चोऱ्या करू लागला. लोकांना त्रास देऊ लागला. राजाने त्याला हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना ठार मारू लागला. त्याने आपली टोळी बनवली. अरण्यातच वाडा बांधून तो राहू लागला.

एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या जंगलातून जात असतांना त्याला त्याने अडविले आणि त्याच्याकडे पैसे नसल्याने चिडून त्याला मारू लागला. त्यावर त्या ब्राह्मणाने त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याचे काही न ऐकता कामदाने त्याचा शिरच्छेद केला.

अनेक प्रकारची पापकर्मे करून तो निर्दयी झाला होता. पुढे त्याला वृद्धत्व आले. अनेक व्याधी जडल्या. दिसेनासे झाले. कुटुंब त्याचा तिरस्कार करू लागले.

मग तो अहोरात्र पश्चात्ताप करू लागला. मग त्याने दानधर्म करायचे ठरवले. पण त्याचे दान घ्यायला कोणीच त्याच्याकडे फिरकेना. शेवटी त्याने जंगलातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले. त्याने एक परिचित ब्राह्मणास बोलावून घेतले आणि त्याच्या मार्गदर्शना नुसार बरेच धन खर्च केले. लोकांच्या सोयीसाठी तेथे चार विहिरी बांधल्या. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्याला यम आणि चित्रगुप्तासमोर उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, “धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्य भोगू इच्छितो.” त्यानुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळें भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगा सारखी महाव्याधी झाली आहे.”

पुढील भागात वाचा:

पुढील भागात, सोमकांत राजाचा आधी ऋषींवर अविश्वास, नंतर दृढ विश्वास, ऋषींचे श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या अंगावर शिंपडणे,  सोमकांता चे पापमुक्त होणे, मग भृगू ऋषींचे सोमकांत राजाला श्री गणेशाचे माहात्म्य वर्णन करणे, 

त्यापुढील भागात ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षरी मंत्राचा उपदेश. 

आठवणीतील गोकुळाष्टमी Gokulashtami 2024

matiche gokul

आठवणीतील गोकुळाष्टमी- विस्मृतीत गेलेले मातीचे गोकुळ Gokulashtami 2024

आज गोकुळअष्टमी, आणि उद्या दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी मुंबईसारख्या महानगरांत आणि इतर शहरात जो ‘राजकीय’ उत्सव होतो, तो आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे.

पण या निमित्ताने मन सहज भूतकाळात गेले, आणि साधारण 50-55 वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी Gokulashtami कशी साजरी व्हायची याचा मन धांडोळा घेऊ लागले.

श्रावण लागल्यापासून एक प्रकारचे धार्मिक वातावरण आपोआपच तयार होत असे. श्रावणतील पाहिला सण- राखी पोर्णिमा होऊन गेल्यानंतर, वेध लागत ते गोकुळाष्टमीचे. Gokulashtami che. श्रावण महिन्यातील भर पावसात, रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त दरवाज्यांच्या आड झालेला कृष्णजन्म- कंसाच्या भीतीने पिता वसुदेवाने त्याला रात्रीच्या अंधारात, उफाण आलेल्या यमुनेला पार करून गोकुळात घेऊन जाणे, गोकुळात यशोदेच्या पोटी जन्मलेली साक्षात आदिमाया हिला घेऊन परत मथुरेला येणे, आणि कंसाचे, प्राण भयाने त्या नवजात कोमल बालिकेला पायाला धरून दगडावर आपटणे. त्या आदिमायेचे आकाशात जाऊन कंस वधाची भविष्यवाणी वर्तवणे. या सगळ्या गोष्टी कितीही वेळेस ऐकल्या तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा उभ्या केल्याशिवाय राहत नाहीत.vasudev and krishna

 पण इतक्या अडचणींवर मात करून झालेला कृष्ण जन्म म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा या कृष्ण जन्मोत्सवाची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी (On the day of gokulashtami) कृष्ण जन्मे पर्यंत घरोघरी लहान थोर, उपवास करून त्या कृष्णाच्या आगमनाची वाट पाहत.

gokulashtami
Image credit-Indrasut2 on Maayboli.com

त्या दिवसाची आठवण म्हणून घरोघरी, लाकडाच्या पाटावर, शेतात जाऊन आणलेल्या काळ्याशार आणि मऊसूत अशा चिकण मातीने गोकुळाची प्रतिकृति साकारली जात असे.

लहान मुले उत्साहाने आजूबाजूच्या शेतात जाऊन काळी माती गोळा करून आणत. त्या निमित्ताने काळ्या आईशी यथेच्छ खेळायला मिळत असे. अंग, कपडे, हात पाय सर्व काळ्या मातीने माखले जात. घरी आणल्यावर घरातील आई, आज्जी, इत्यादि मंडळी त्या मातीतील काडी कचरा खडे गोटे काढून ती स्वच्छ करून पाणी टाकून छान मळून देत.

घरात लाकडाचे अनेक पाट असत. त्यातील मोठयाशा पाटावर मग गोकुळ साकारायला सुरुवात होत असे. त्याला सगळ्यांचेच हात लागत. आधी चहू बाजूंनी गावाची तटबंदी आखली जात असे. मग गोकुळातील विविध गोष्टी साकारल्या जात. आणि विविध पात्रे- त्यात गोप, गोपी, पेंदया, गाई, आणि एक गाढवही असायचे आणि कुत्राही असायचा! निसर्गातील झाडे, प्राणी या सर्वाविषयी आपुलकीची भावना यात दिसून येते. त्या गोकुळात काही ठिकाणी पूतना मावशीही असायची!  पिंपळाचा पार,(त्याच्यावर पिंपळाच्या झाडाची एक फांदी), तुळशी वृंदावन, जाते, उखळ, चूल, तवा. नंद बाबाचे घर, त्या घरातील एक पाळणा, आणि त्या पाळण्यात, एक पिंपळाचे पान आणि/ किंवा एक  छान मऊसूत रंगीत कपडा अंथरूण त्यावर बाळ कृष्णाची स्वारी!

gokul2
Image credit- Anuradha Tambolkar-You Tube channel

या सगळ्या गोष्टी बनवतांना घरातील सगळ्यांच्या कलात्मकतेला, सृजनात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला किती वाव मिळत असेल कल्पना करा. आणि घरातील लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांची त्यात involvement असे. सगळ्या घरात उत्साहाचे वातावरण असे. बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून सुंठ साखरेचे मिश्रण तयार केले जाई. काही ठिकाणी डिंकाचा लाडूही नैवेद्याला केला जाई. या पावसाळ्याच्या दिवसात थंडीमुळे होणारे उपद्रव टाळण्यासाठी सुंठ आणि साखरेची योजना किती योग्य वाटते! वरील गोकुळातील पात्रांना सजविण्यासाठी ज्वारीचे दाणे वापरले जात. तसेच तुळशी वृंदावनावर छोटीशी तुळस ठेवली जाई. नंद बाबाच्या घरी भाकऱ्यांची चळत, लोण्याचे भांडेही साकारले जाई. ठिकठिकाणी गोकर्णाची निळी फुले आणि इतर त्या ऋतुतील फुले ठेवून गोकुळ सजवले जाई. आणि मग संध्याकाळी, सर्वजण जमून कृष्णजन्म साजरा करीत, कृष्णाचा पाळणा म्हटला जाई

गोकुळाष्टमी-(Gokulashtami)- कीर्तन 

गावातील मंदिरात कीर्तनकार कृष्णजन्माची कथा रंगवून रंगवून सांगत. मंदिरातही कृष्णाला पाळण्यात ठेवून, कृष्ण जन्म साजरा केला जाई. आणि त्यावेळी मिळणारा प्रसाद- सुंठ, खोबरे, खसखस,  खडीसाखर इत्यादिचे मिश्रण (याला उत्तरेकडे पंजिरी म्हणतात) अगदी अप्रतिम लागत असे.

मग दुसऱ्या दिवशी दुपारपासून दहीहंडीची धूम सुरू होत असे. पण दहीहंडीला आजच्या सारखे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त झाले नव्हते. तो एक मर्यादित कार्यक्रम असे. मंदिरातही दहीहंडी होत असे. तिथे घराघरातून लोक गोपाळकाल्यासाठी पदार्थ घेऊन येत. त्यात भिजवलेले पोहे, ज्वारीच्या लाहया,कैरीचे आणि लिंबाचे लोणचे, काकडी, डाळिंब, पेरूच्या फोडी, भिजवलेली चण्याची डाळ, दही, इत्यादि साहित्य सगळ्यांच्या घरातून आलेले, निरनिराळ्या चवीचे साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र केल्यानंतर जी अप्रतिम चव तयार होते, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. (आजच्या न्यूट्रिशन च्या दृष्टीने पाहिले तर यात पौष्टिक आणि पाचक पदार्थ एकत्र केल्याचे दिसून येते.)मंदिरातील दहीहंडी छोट्या प्रमाणावर असे, आणि हा एकत्र केलेला गोपालकाला त्या हंडीत ठेवला जाई, आणि हंडी फोडल्यावर त्यातील काही कण आपल्याला मिळावे म्हणून सगळ्यांची झुंबड उडत असे. अर्थात नंतर सगळ्यांना तो मोठ्या पातेल्यातील एकत्र केलेला काला द्रोणात भरून दिला जाई. आणि तो लोक घरी घेऊन जात आणि घरातील इतर सदस्यांना देत.dahi handi

चौकाचौकात जो दहीहंडी चा कार्यक्रम होई, त्याची मजा लोक आजूबाजूच्या घरांच्या गॅलऱ्यांमधून घेत. त्या परिसरातील सधन लोक काही बक्षिस ठेवत. पण हा सर्व कार्यक्रम एका मर्यादेत होता. त्याला बाजारू स्वरूप आले नव्हते.

विदर्भातील गोकुळाष्टमी 

विदर्भात गोकुळाष्टमीला कानोबा म्हणतात. गणपतीला करतात तशी आरास करून कृष्णाची मूर्ती बनवतात. फुलोरा ही करतात. सकाळी मूर्तीची स्थापना करतात. त्या दिवशी कुटुंबातील मोठ्या माणसांना उपवास यसतो. दुपारपर्यंत मूर्तीची स्थापना होते. त्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करतात. पूर्वी कृष्णलीलेवर छोटेखानी नाटक सुद्धा बसवत. भरगच्च कार्यक्रम असत. रात्री बरोबर बारा वाजता फुलोरा हलतांना कोणाला तरी दिसायचा. त्यानंतर जन्मोत्सव, आरत्या वगैरे रात्री 2 पर्यन्त चालायचे. दुसऱ्या दिवशी सर्वांना घरी जेवायला बोलावत. संध्याकाळी मूर्तीचे वाजत गाजत विसर्जन करीत. (विदर्भातील माहिती ग्रुप मधील बान्ते कुटुंबीयांनी पुरविली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद)

20240826 074923
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळेतल्या कार्यक्रमात ‘राधा’ म्हणून जायला सजलेली माझी नात- श्रीशा

आजकाल कित्येक दिवस आधी वर्गणी करून केले जाणारे कार्यक्रम, अशा कार्यक्रमांत समाजातील तथाकथित ‘दादा’ आणि ‘भाईंचा’ सहभाग, विविध राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, डीजेचा कर्कश दणडणाट या सर्व पार्श्वभूमीवर, आठवणीतील साधेसुधे पण निसर्गाशी जवळीक सांगणारे, माणसामाणसांतील नाती जपणारे त्या काळातील सण उत्सव आठवले की असे वाटते, की ते दिवस आता पुन्हा कधी येणार नाही!

माधव भोपे 

Shrimat Bhagwat Katha Saar श्रीमद् भागवत कथासार

bhagwat katha mahtava 1

भज गोविन्दं भज गोविन्दं

image 6image 11image 12

 

गणेश वि. रामदासी

छत्रपति संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील समर्थ भक्त श्री गणेश वि. रामदासी यांच्या यू ट्यूब चॅनेल वर (ज्याचे नांव Avirat Dasnavmi Mahotsav-  Ganesh V.Ramdasi असे आहे) नित्यनियमाने अनेक धार्मिक प्रवचने चालू असतात. मला असेच यू ट्यूब वर browse करता करता हे चॅनेल दिसले आणि खूप आवडले. 

सध्या या चॅनेल वर श्रीमद्भागवत कथासार चालू आहे.  आतापर्यंत २०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. यात त्यांच्या अत्यंत रसाळ वाणीने ते रोज ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपासहित भागवत कथेचे निरूपण करीत असतात.  त्यांच्या प्रवचनांची लिंक आपण आपल्या ब्लॉग वर देत आहोत. ही लिंक रोज अपडेट होत राहील. 

अध्यात्माची आवड असणाऱ्या वाचकांना आणि श्रोत्यांना हा उपक्रम आवडेल अशी आशा.

RSS Avirat Dasnavmi Mahotsav – Ganesh V. Ramdasi

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4

shriram

मागील लेखावरून-पुढे 

काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे.  आता त्यापुढील श्लोक:

 

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

 

दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.

 

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

 

वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.

 

श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.

 

 

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 

आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे,  विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.

 

श्रीराम राम रघुनन्दन राम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

 

भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे.  अशा या श्रीरामाला मी शरण आहे.

 

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

 

श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.

 

 

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं

जाने नैव जाने न जाने ॥30॥

 

माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”

 

 

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥

ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती  आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.

 

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.

 

यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.

 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

hanuman

वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.

मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो.  हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली

 

मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः  (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा  वेग)

अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा  आहे

मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.

 

यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.

 

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

valmiki

वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.kokila

 

कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

 

महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:

 

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’

valmiki

हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.

 

त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.

 

यापुढील श्लोक:

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

 

आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.

 

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

 

 

भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम

राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.

 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

 

राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.

 

निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”

 

रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति

परायणं= आश्रयस्थान  

परतर=  इतर,

म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.

रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.

माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!

 

वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.  

 

रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा  भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)

 

[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल

 

एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.


एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.


पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।

ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]

 

 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

 

वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.

मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.

 

भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.

 

पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.

 



 

 

राम       राम       राम.

 

 

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

 

बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.

 

श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.

 

अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे. 

माधव भोपे 

 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1