https://goodworld.in A website by Madhav Bhope

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

happy-homework

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

Spare 10 minutes to read this

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

मागच्या लेखात आपण पाहिले तसे, आजकाल मुले वाढविणे अत्यंत आव्हानात्मक, challenging झाले आहे- आणि त्यात मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे तर मुलांच्या आयांसाठी रोजची लढाई- आणि मुलांसाठी सुद्धा! त्यामानाने खरेच आमची पिढी खूप भाग्यवान होती. आम्ही जेंव्हा लहान होतो, तेंव्हा आमच्या आई वडिलांना आम्ही कोणत्या वर्गात आहोत एवढे माहीत असणे म्हणजे खूप होते. आणि वर्षाच्या शेवटी- पास झालोय की नापास- एवढ्यापुरता त्यांचा संबंध येई. यात कदाचित आजच्या पिढीला अतिशयोक्ति वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच होती.

आता दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे, आणि मुलांच्या शिक्षणाचा ताण आई वडिलांवर जास्त येतो आहे. शाळेत मुलांना घरून करून आणण्यासाठी एवढे मोठे होमवर्क देतात, निरनिराळे प्रोजेक्ट्स देतात, जे की मुलें स्वतंत्रपणे करूच शकणार नाहीत. त्यामुळे मुलाच्या पालकांना त्यात लक्ष घालावेच लागते आणि त्यातून घरोघर रोजची ‘लढाई’ नित्य झाली आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काही स्किल लागू शकते, याची जाणीव फार थोड्या पालकांना असते, मग त्यांनी त्याची कुठली ट्रेनिंग घेणे तर दूर राहिले. आणि मग पालक, आपल्या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे, आपल्या मर्यादित ज्ञानानुसार, मुलांचा अभ्यास घेण्याचा सोपस्कार पार पाडतात आणि पुरेशा सामंजस्याअभावी हा रोजचा अनुभव ते मूल आणि त्याची आई- दोघांसाठीही थकवणारा होतो.

त्यासाठी पालकांना काही अत्यंत मूलभूत गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

काही पालकांची अशी ठाम समजूत असते की मुलांना ‘धाकात’ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर मुले बिघडतील.. त्यामुळे ते कायम मुलांशी आज्ञार्थी आणि दरडावून बोलण्यावर विश्वास ठेवतात, सतत मुलांच्या चुका दाखवून त्यांना टोकत राहतात, हिणवत राहतात.  तर काही पालक या उलट मुलांचे अत्यंत लाड करतात- त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू देत नाहीत- या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात.

मुलांचे होमवर्क- अर्थात घरून करून आणायचा अभ्यास 

आज आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत.

मुलांचे पालक (जास्त करून आयांना मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो म्हणून आपण या ठिकाणी आयांचे उदाहरण घेणार आहोत) मुलांचा अभ्यास घ्यायला बसतात, तेंव्हा त्यांच्यात पेशन्स नसेल, आपल्या हातातील कामात आनंद घेण्याची वृत्ती नसेल, तर ते शक्यतो लवकर त्यांचे होमवर्क ‘उरकून’ घेण्याचा प्रयत्न करतात.

या ठिकाणी आईला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे-

  1. मुलांची उपजत आणि नैसर्गिक प्रवृत्ती ही ‘खेळण्याची’ असते- त्यांना ‘खेळण्यात’ जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही- त्यामुळे मुले अभ्यासाचे रूपांतर ही खेळण्यात करू पाहतात. खरे तर आपल्यासोबत अभ्यासाला बसून, त्यांनी त्याच्या ‘खेळण्यावर’ पाणी सोडलेले असते हा त्यांच्या दृष्टीने मोठा ‘त्याग’ असतो! आईने मुलांना हसत ‘खेळत’ शिकविले तर त्यांना त्याचे अजिबात टेंशन येणार नाही.
  2. साधारण वयस्कर मनुष्यांचा attention span हा ३२ ते ५० मिनिटे असतो. हे मी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असतांना आम्हाला सांगितले जात असे- त्यामुळे आम्ही वर्गात शिकवतांना ३५ ते ४० मिनिटां नंतर participants ला एखादा जोक सांगून, किंवा विषय बदलून, मग पुन्हा विषयावर येत असू. ५ ते ६ वर्षांच्या मुलां मध्ये हा attention span १२ ते १८ मिनिटे असतो. खाली वयानुसार attention span चा तक्ता दिला आहे.
वयानुसार लक्ष देण्याची क्षमता
• २ वर्षांची मुले: ४-६ मिनिटे
• ३ वर्षांची मुले: ६-८ मिनिटे
• ४ वर्षांची मुले: ८-१२ मिनिटे
• ५-६ वर्षांची मुले: १२-१८ मिनिटे
• ७-८ वर्षांची मुले: १६-२४ मिनिटे
• ९-१० वर्षांची मुले: २०-३० मिनिटे
• ११-१२ वर्षांची मुले: २५-३५ मिनिटे
• १३-१५ वर्षांची मुले: ३०-४० मिनिटे
• १६ आणि त्याहून अधिक वयाचे: ३२-५०+ मिनिटे

त्यामुळे, मुलांचा अभ्यास घेतांना त्यांना लागोपाठ एकेक दोन दोन तास अभ्यास करायला लावला, तर त्याचा ‘काही उपयोग’ होत नाही. ५ ते ८ वर्षाच्या मुलाला २०-२५ मिनिटांनंतर मध्ये थोडा ब्रेक घेऊ देणे हे अत्यंत आवश्यक आहे. ही शास्त्रीय माहिती फार थोड्या पालकांना असते आणि शिस्त लावायच्या नावाखाली, किंवा लवकर ‘उरकण्या’ साठी, ते मुलांना नॉनस्टॉप अभ्यासाला बसवू पाहतात, आणि त्यातून मग conflict सुरू होतो- लढाई सुरू होते! मुले चुळबूळ करायला लागतात. त्यापेक्षा मधून मधून मुलांना ब्रेक घेऊ दिला तर त्यांचा अभ्यास नीट पार पडू शकतो.child-playing

  1. मुलांना आपण काय सांगतोय ते समजले नाही तर पालक अत्यंत अधीर होतात, एवढे साधेही कसे समजत नाही म्हणून मुलावर ओरडतात. पण आपण आपल्या लहानपणी किती बुद्दू होतो हे ते विसरतात! आणि शिकवतांना मुलांवर अनेक नकारार्थी शब्दांचा भडिमार करतात! उदाहरणार्थ- उनाडक्या करायला, मोबाईल बघायला बरे आवडते, आणि अभ्यासाच्या वेळेसच बरा कंटाळा येतो! खायला पायजे नुसते! अभ्यासाच्या नांवाने बोंब नुसती! शिकला नाहीत तर कसे व्हावे- मवाली होशील! (त्या मुलाच्या शब्दकोशात ‘मवाली’ हा शब्द नसतो- तो आपण घालतो!) तसेच पालक आपले सर्व frustration, निराशा त्या मुलांवर ओततात. मुलांची आणि आपली समजण्याची पातळी एक असू शकत नाही- मुलाला समजले नाही याचा अर्थ आपण सांगण्यात कुठे तरी कमी पडतो आहोत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे- आणि पेशन्स हा परवलीचा शब्द लक्षात ठेवला पाहिजे.

त्यापुढची पायरी म्हणजे मग मुलांवर ओरडणे, त्यांना मारणे, धमकी देणे  हे प्रकार होतात. मुले या गोष्टी अत्यंत seriously घेतात- त्यांना तुम्ही खरेच बोलताय की पोकळ धमकी देताय हे समजण्या इतपत अनुभव नसतो. पालकांनी या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पालक जेंव्हा मुलांवर ओरडतात, रागावतात, त्यावेळी त्यांचा lower brain अॅक्टिवेट होतो- म्हणजे काय? तर आपले संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली किंवा प्रतिक्रिया त्याच्या शरीरात आणि मनात व्हायला लागतात. त्यांच्या रक्तात  cortisol आणि adrenaline ही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. Cortisol मुळे मेंदूत नवीन पाथ वेज (ज्ञान तंतूंचे मार्ग) तयार होणे कमी होते. Adrenaline मुळे  fight or flight हा रिस्पॉन्स trigger होतो. अशा वेळी त्याचा मेंदू कुठलीही उपयुक्त माहिती ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे पालकांनी पण त्यांचा lower brain वापरण्या ऐवजी, त्यांचा upper brain वापरून, शांत पणे, मुलांना समजून सांगण्याची आवश्यकता असते- म्हणूनच म्हटले जाते की पालकत्व हे पालकांसाठी त्यांच्या संयमाची परीक्षा असते. मुलें स्ट्रेस मध्ये कुठलीही नवीन माहिती ग्रहण करू शकत नाहीत.brain functions

  1. मुलांना (खरे तर कोणालाही) प्रोत्साहनाची आवश्यकता असते. कौतुक, प्रोत्साहन यामुळे मनुष्यात Dopamine, Serotonin, Oxytocin, Endorphins ही happy harmones रिलीज होतात. त्यामुळे मुलांकडून उदाहरणे सोडवून घेताना, त्यांनी ५० प्रश्न सोडवले असतील, तर ते तपासतांना, त्यातील एक दोन प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तर नेमके त्यावरच बोट ठेवण्या ऐवजी- आधी त्यांनी जे प्रश्न बरोबर सोडवले आहेत, त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांचे कौतुक करा-किती हुशार आहेस तू! अरे वा! बरोबर उत्तर दिलेस! शाब्बास! अशा शब्दांची मुक्तपणे उधळण करा. त्याला काही पैसे लागत नाहीत! काही पालकांचा अगदी ठाम गैरसमज असतो की मुलांचे कौतुक केले तर ती शेफारतात! त्यामुळे ती चुकूनही मुलांचे कौतुक करत नाहीत. मग मुले हिरमुसली होतात. हा खरे तर मनुष्य स्वभावाचा मूलभूत पैलू आहे! आणि यामुळे खूप गोष्टी सुकर होऊ शकतात. पण काही पालक या बाबतीत अत्यंत चिक्कू असतात.
  2. मुले के. जी, पहिली दुसरी, अशाच वर्गात असतांना सुद्धा काही पालक त्यांनी १०० पैकी शंभर मार्क मिळवलेच पाहिजेत, नाही तर अगदी आभाळ कोसळेल अशा समजुतीत असतात. त्यांनी हा समज काढून टाकायला पाहिजे. मुलांना शाळा शिकणे, अभ्यास करणे हा एक आनंदाचा अनुभव झाला पाहिजे हा उद्देश पालकांचा असला पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास होऊ देणे हा आपला उद्देश असला पाहिजे. याबाबतीत बऱ्याच पालकांचे म्हणणे असते की, तुमच्या वेळी वेगळे होते, आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे अगदी बालपणापासून मुलांकडून मेहनत करून घेतली नाही तर त्यांचे भविष्य काही बनू शकणार नाही. पण पहिली दुसरीतील, शाळेतील अंतर्गत परिक्षेतील गुणांनी मुलाच्या भवितव्यावर कितीसा परिणाम होणार आहे, आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजायची, याचा सापेक्ष विचार प्रत्येक आई वडिलांनी करायचा आहे. 
  3. मुलांना जर रागावून, भीती दाखवून, धमकावून, अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला, तर मुलें त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया देतील. काही मुले जी बुजरी आहेत, ती पालकांच्या धाकाने अभ्यास करतील, पण आपला आत्मविश्वास हरवून बसतील- प्रत्येक गोष्टीत त्यांना पालकांची मदत लागेल. याउलट जी मुलें स्वभावतः आक्रमक आहेत, ती त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अधिकाधिक आक्रमक होत जातील.frustrated-homework
  4. काही पालकांच्या मनात नक्कीच विचार येत असतील- आमच्या काळी असली काही थेरें नव्हती- छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! या उक्तीप्रमाणे, मुलांना धाक दाखवला तर ती वठणीवर येतात, अन्यथा नाही. पण या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्या काळची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. मुलांना वळण लावायला फक्त आई वडीलच नाही तर इतरही वडीलधारे असत. तसेच मुलांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला सुद्धा इतर वडीलधारे, मित्र, नातेवाईक, मोठे, लहान भाऊ बहीण असत असत. खरे तर आजोबा आणि आजी ही मुलांच्या आयुष्यातील buffer किंवा shock absorber म्हणून काम करीत. पण आजकाल न्यूक्लियर families मध्ये मुलें पूर्ण पणे isolated असतात. इतर कुणाशीही त्यांचा क्वचितच संबंध येतो. मित्र मैत्रिणीही अगदी निवडकच असतात- अशा वेळी हा छडी लागे छम छम चा वापर केला, तर त्याचा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त. आई किंवा वडिलांकडून एखादा शब्द चुकीचा गेला, तर त्याला neutralize करायला घरात इतर कोणीही नसते- किंवा काही ठिकाणी आजोबा आजी असतील तरी त्यांना मोकळेपणाने बोलण्याची सोय नसते.

त्यामुळेच मला असे वाटते, आजकालच्या आई वडिलांना मुलांना वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे, आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी  त्यांनी आपली क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच मुलांचा अभ्यास घेण्या आधी १० मिनिटें या लेखात मांडलेल्या मतांवर विचार करा- आणि आपल्या मुलांचा अभ्यास हा आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण एक आनंद यात्रा होईल असा प्रयत्न करा!

हा लेख म्हणजे या विषयावरील मला सुचलेले विचार आहेत. या विषयाला इतर अनेक पैलू आहेत- जसे की differently abled मुलांचा विषय, एकल पालक (single parents) यांनी मुलाला कसे सांभाळावे इत्यादि. तसेच मी काही या विषयावरील तज्ञही नाही. माझी मतें ही माझ्या अनुभवातून आणि मर्यादित ज्ञानातून आलेली असल्यामुळे परिपूर्ण असतील असे नाही. पण हा विषय मांडायला ब्लॉगिंग हा एक उपयुक्त मंच उपलब्ध झाल्यामुळे ती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे.

या विषयावरील आपली मतें comments मध्ये नक्की कळवा.

माधव भोपे

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा! Bringing up children- the 7-7-7 rule.

happy-family

Bringing up children- the 7-7-7 rule.

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा!

एक गोष्ट आपण सगळेच मान्य करू- आजकाल मुलांना वाढवणे इतके सोपे राहिले नाही, जितके की २५-३०-४० वर्षांपूर्वी होते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती खूप बदलली आहे- वाढत्या वयातील मुलांच्या पालकांचा ताण खूप वाढला आहे- आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील, आणि घरात कोणी वडीलधारे नसतील तर ही परिस्थिती आणखीच बिकट होते.

आजकाल लग्नें खूप थाटामाटाने लावून देतात. लग्न झाल्यानंतर लवकरच दोघेही आई वडील होतात. पण मुलें जशी जशी मोठी व्हायला लागतात, त्यांचे सुरुवातीचे गोड बालपण संपून हळू हळू ती ४-५-६- वर्षांची होतात, के. जी. किंवा शाळेत जाऊ लागतात, तसे तसे त्यांना कसे handle करावे, असा प्रश्न पडू लागतो. खरे तर मूल झाल्यानंतर आईवडिलांचे खरे शिक्षण सुरू होते, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या पेशन्सचा, त्यांच्या संवाद कौशल्याचा, कस लागतो- मुलें आई वडिलांच्या संयमाची परिक्षा पाहतात- आणि बरेच आई वडील या परिक्षेत सपशेल फेल होतात आणि मुलांवर चिडणे, रागावणे, ओरडणे, मारणे, इत्यादि प्रकार सुरू होतात. कधी कधी त्यामुळे एकमेकांवर चिडणे ही सुरू होते.angry-mother

याचे कारण म्हणजे पालकत्व parenting- शिकण्यासाठी वेगळे काही करावे लागेल- शिकावे लागेल, आपल्या स्वभावात काही बदल घडवावे लागतील असे या ‘नवजात’ (!) आई वडिलांच्या गावीही नसते. त्याउलट मूल थोडेसे समजायच्या वयाचे झाले की त्याच्यावर तथाकथित  ‘संस्कार’ करणे ही आपली जबाबदारी, जन्मसिद्ध अधिकार आहे असा पक्का ग्रह प्रत्येक आई वडिलांचा असतो.

खरं तर मूल हे तुम्ही काय ‘सांगता’ यापेक्षा प्रत्येक प्रसंगात तुम्ही कसे ‘वागता’, तुमची काय प्रतिक्रिया असते, देहबोली, आवाजाचा ‘टोन’ डोळे, चेहऱ्यावरचा भाव, इत्यादि कसे आहेत, यावरून शिकत असते, आणि आईवडिलांच्या ‘सांगण्या’ पेक्षा त्यांचे ‘वागणे’ हे अनुकरण करीत असते, आत्मसात करीत असते. एखाद्या आईला छोट्या छोट्या गोष्टींवर कपाळावर हात मारून घ्यायची सवय असेल तर मूल लगेच ती उचलते. मुलाचे वडील जर मोबाईल बघत बघत जेवत असतील तर मूलही तसेच करते.

मुलांना मोठे करण्यात आई वडील दोघांचाही सहभाग असला, तरी त्यात आईचा वाटा खूप जास्त असतो, कारण मुलाजवळ २४ तास राहणारी आईच असते. आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना आईचा सहभाग आणि सहवास हवा असतो. अर्थात मुलांकडून योग्य त्या गोष्टी करून घेण्यासाठी, त्यांना अयोग्य गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी, दिवसातून अनेक वेळा रागवावे लागू शकते, खरे तर मुलांना रागावत नाही ओरडत नाही असे पालक कुणीच नसतील. पण असे करतांना जर एक ७-७-७ चा गोल्डन रूल लक्षात ठेवला, तर मुलांवर त्या रागावण्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही.

काय आहे तो गोल्डन रूल? प्रत्येक आईने(आणि वडिलांनीही) लक्षात ठेवावा असा हा नियम म्हणजे- दिवसातील ३ मुख्य वेळा पाळण्याचा. कोणत्या आहेत या तीन वेळा?

या तीन वेळा म्हणजे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, त्यावेळचे ७ मिनिट, दुसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा शाळेतून घरी येते, त्यावेळचे ७ मिनिट, आणि तिसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा झोपी जाते, त्यापूर्वीचे ७ मिनिट- या अत्यंत महत्त्वाच्या वेळा असतात.

४ ते ७-८ वर्षांचे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, तेंव्हा त्याला आई समोर पाहिजे असते. मूल जेंव्हा के. जी. किंवा शाळेत जायच्या वयाचे होते, आणि सकाळी शाळा असेल, तेंव्हा सकाळी त्याला उठवणे भाग असते. बऱ्याच आया, त्यांच्या कामाच्या ताणामुळे, सकाळी बरीच कामे लवकर आटपायची असल्यामुळे, मुलांना उठवतांनाच खूप वैतागून, आरडा ओरडा करून, मुलांना उठवतात. मुलें उठत असतांनाच बऱ्याच गोष्टी त्यांना ‘सुनावून’’ देतात. वास्तविक पाहता, झोपेतून उठण्याची ही वेळ मुलांसाठी अत्यंत ‘सेंसिटीव्ह’ असते. झोपेतून उठून, बाहेरच्या जगाच्या धावपळीशी जुळवून घेण्यात त्यांनाही बरेच प्रयत्न करावे लागतात. अर्धवट झोपेतून उठून लगेच तोंड धुणे, आंघोळ करणे, शाळेची तयारी करणे, या सर्व गोष्टी लागोपाठ कराव्या लागतात. त्यांच्यासाठी सुद्धा ही रोजची लढाई असते. अशा वेळी मुले उठतात त्यावेळची ७ मिनिटे. जर आईने त्याला थोडे मायेने, प्रेमाने, डोक्यावर हात फिरवून, दोन गोड शब्द बोलून जर झोपेतून जागे केले, फक्त ७ मिनिटे जर पेशन्स दाखविला, तर ते मूल आनंदाने उठते- आजकालची मुलेही बरीच समजूतदार झालीत. त्यांना नीट समजून सांगितले तर ती समजून घेतात- पण नेमक्या या महत्वाच्या वेळेस जर आपले फ्रस्ट्रेशन थोडे बाजूला ठेवून, त्यांच्याशी मायेने वागले नाही, तर दिवसाची सुरुवातच चिडचिड आणि राग  याने होते, आणि संबंध दिवसावर याचा परिणाम होतो.happy-child-1

दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा! मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा त्याला आई समोर हवीच असते! आणि दिवसभर शाळेत काय काय झाले हे अगदी बारीक सारीक तपशीलांसह आईला सांगायचे असते. त्यावेळी आईने हातात कितीही महत्त्वाचे काम असले, तरी ते बाजूला ठेवून, मुलाचे म्हणणे, अगदी इंटरेस्ट दाखवून ऐकले, फक्त ७ मिनिटे! तरी मुलाचे समाधान होते. अशा वेळी बऱ्याच आया मुलाकडे दुर्लक्ष करतात, किंवा, आल्या आल्या, त्याने डबा पूर्ण संपवला नाही, दफ्तर कुठे तरी फेकून दिले, बूट नीट जागेवर ठेवले नाही, अशा काही कारणांमुळे लगेच रागवायला सुरुवात करतात. अशा वेळी खरे तर आई काही कामात असली, तरी तिने आपले लक्ष मुलाकडे आहे असे दाखवणे आवश्यक आहे- तुझ्यापेक्षा मला कोणतेही काम मोठे नाही- अशी जाणीव करून देणे आवश्यक आहे. कमीतकमी सुरुवातीचे काही सेकंद- एखादे मिनिट तरी- मुलाला, आपल्या आगमनामुळे आईला आनंद झाला आहे हे जाणवले पाहिजे-  आणि तुम्ही कोणत्या अत्यंत महत्वाच्या कामात असलात तरी- “थांब हं! मी एवढे करून आलेच!” अशी एक प्रकारे त्याची ‘परमिशन’ घेऊन हातातील काम उरकून लगेच त्याच्याकडे लक्ष दिले तर आपण आईसाठी महत्वाचे आहोत ही खात्री मुलांच्या मनात येते.happy-child-2

तिसरी महत्वाची वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची! झोपेतून उठणे आणि झोपी जाणे या दोन क्रिया एक प्रकारे transition phase असतात! त्यावेळी मुलांना आई जवळ हवी असते. आणि मुले झोपण्याच्या वेळेस कुठल्याही प्रकारे वाद विवाद करून, रागावून (तू लवकर झोपत नाहीस म्हणून) चिडून रडत रडत जर मूल झोपी गेले, तर त्याची तीच मानसिक अवस्था झोपेतही सुरू राहते, आणि सकाळीही मूल तीच मानसिक अवस्था घेऊन उठण्याची शक्यता असते. त्यामुळे आई वडिलांना मूल झोपतांना (किंवा त्याला झोपी घालतांना)ही आपल्या संयमाचा कस लावावा लागतो. दिवसभरात काहीही वाद विवाद झाले असतील, तरी झोपतांना मुलाला जवळ घेऊन, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून, आनंदी अवस्थेत झोपी घातले, तर मुलाची झोप उत्तम प्रकारची होते आणि सकाळी उठतांना ही मूल फ्रेश मूड मध्ये उठते.mother-child

अशा प्रकारे हा ७-७-७ चा नियम जर पाळला तर बऱ्याच पालकांचे आणि त्यांच्या मुलांचे आयुष्य सुकर होईल!

वरील प्रकारे वागतांना आईला आपल्या आवडीनिवडींना, मुरड घालावी लागते- हीच स्वभाव बदलण्याची शाळा-जिच्यात आईवडिलांना नकळत प्रवेश मिळाला असतो. त्यामुळे मुलें मोठी होत असतांना- नुसती मुलें च मोठी (शहाणी) होत नाहीत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांचे- आई वडील म्हणून, आणि माणूस म्हणून- शिक्षण चालू असते!

या विषयावर आपले अनुभव आणि आपली मते जरूर कळवा.

माधव भोपे 

A special bond

cat-5

Children have great creativity. They try to express their feelings effectively whenever there is an opportunity. My granddaughter Saumya, and her friend Sanvi, found a little cat while wandering in the society while playing. They were instantly attracted by her cuteness and went near the cat. They became friends in no time.

Nowadays Saumya and Sanvi are constantly talking of the cat, and they have together composed a little poem for their new friend!

I really liked the  poem composed by them. The poem is presented here for the readers of goodworld.in.

Saumya also has her youtube channel Saumyas corner. If you like the poem, you can subscribe to her youtube channel as well!

A Special Bond

We found a little cat

Walking on the road

We loved the the way she sat

Staring at the road

cat-4

We went a little near

But her face had fear

We called her to us

But she didn’t make a fuss

cat-1

She looked at us

with curious eyes

As though a friend

Would say hies and byes

We stroked her gently

She looked very friendly

She cuddled us with love

With her paws like a glove

cat-2

She had soft fur

My eyes felt blur

She was so cute

As relaxing as a flute

Flute

Then we thought of a name

Not one but three

Curo as she was

Full of curiosity

Biscuits ’cause that’s

What we had in our hand

Sunshine as she makes us

Feel very glad

sunshine

We put three biscuits

All in a row

And named those biscuits

Sunshine, Biscuits, Curo

cat-3

She chose two of them

Sunshine and Curo

Then we had a go again

And Sunshine ho ho ho

 

We had a lot of fun

But it’s time to go home

And then she said ‘meow!’

As though  ‘See you soon!’

cat-5

Poem by Saumya Bhope and Sanvi Ranade

Sankranti Customized Greeting Card

Sankranti-2025-card (1)

Generate your own Greeting Card for Makar Sankranti

Greeting Card Generator

Makar Sankranti Greeting Card Generator

संक्रांतीच्या शुभेच्छा !

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

- Your Name

मकर संक्रांती हा एक आनंद आणि उत्साहाने भरलेला सण आहे. ऋतूमध्ये होणारा अनुकूल बदल, सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याचा काळ, त्याच वेळी शेतीतील रब्बी हंगामाची महत्त्वाची कामें संपून थोडा निवांतपणा, या सगळ्यांना साजरा करण्यासाठी पूर्ण भारतात कुठल्या ना कुठल्या नांवाने आणि प्रकाराने हा उत्सव साजरा केला जातो. 

एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे अपेक्षित असले तरी, आजकाल आधुनिक जीवनाच्या व्यस्ततेमुळे जर असे भेटणे शक्य झाले नाही, तर आपण एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग नक्की पाठवितो. असे ग्रीटिंग जर नेमक्या, योग्य त्या शब्दात, आणि आपल्या नांवासकट पाठविता आले तर किती चांगले! 

खाली दिलेल्या Greeting Card Generator चा वापर करून तुम्ही आपल्या स्नेही जनांना आणि मित्र परिवाराला असे शुभेच्छा कार्ड पाठवू शकता. 

  1. Select a Sankranti Message या मेन्यू मधून, दिलेल्या १० मेसेजेस पैकी, आपल्याला आवडणारा मेसेज select  करा. लगेच तो मेसेज खालील रंगीत कार्डावर दिसेल. 
  2. Your Name या मेन्यू वर गेल्यावर, तुमचे नांव टाइप करा. तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत. लगेच तुमचे नांवही त्या कार्डवर दिसू लागेल. 
  3. Download Card या बटन वर क्लिक करा. 
  4. तुमचे customized greeting कार्ड तुमच्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर (तुम्ही लॅपटॉप वरून केले असल्यास) डाउनलोड होईल. 
  5. डाउनलोड झालेले कार्ड open करा. त्यात वर share चे बटन आले असेल. ते वापरून हे कार्ड तुम्ही whatsapp किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता !
Customized Greeting Card developed  specially for the readers of goodworld.in and goodlifehub.in.

Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate

jeean praman- Pensioners life certificate

Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate

(See below for English Version)

नोव्हेंबर महिना आला की पेन्शनरांची( निवृत्ती वेतन धारकांची) हयात प्रमाणपत्र सादर करण्याची गडबड सुरू होते. आठवा ते पूर्वीचे दिवस- पेन्शनरांना बँकेत जाऊन तिथल्या गर्दीत, संबंधित विभागात जाऊन, हयात प्रमाणपत्राचा फॉर्म घेऊन, तो भरावा लागे, त्यावर सही करून, तसेच त्यासाठी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सही करावी लागे. मग बँक त्यांना त्याची पोंच पावती देई. ती पोंच पावती जपून ठेवावी लागे. त्यांचे हयात प्रमाणपत्र संबंधित विभागपर्यंत पोंचले आहे की नाही याची धाकधूक बरेच दिवस रहात असे.

कोविड-19 च्या नंतर हे चित्र बदलले आहे. आता निवृत्ती वेतन धारकांना बँकेत जाण्याची गरज उरलेली नाही. घरबसल्या हे प्रमाणपत्र आता फक्त आपल्या स्मार्ट फोनचा वापर करून सादर करता येऊ शकते.

कोणकोणते निवृत्ती वेतन धारक सादर करू शकतात?

  1. राज्य सरकार
  2. केंद्र सरकार
  3. बँका
  4. बी एस एन एल
  5. संरक्षण विभाग
  6. इतर अनेक संस्था, ज्यांनी केंद्र सरकारच्या सादर योजनेत सहभाग घेतला आहे.

यासाठी खालील स्टेप्स घ्याव्या लागतील.

  • आपल्या अँन्ड्रॉईड फोन मध्ये, गूगल प्ले स्टोअर वर जा
  • तिथे सर्च मध्ये jeevan pramaan टाइप करा.
  • त्याठिकाणी jeevan pramaan हे अॅप दिसेल, ते install करा.jeevan pramaan
  • त्यानंतर AadhaarFaceRD (सर्च मध्ये बरोबर असेच type करा) हे अॅप install करा.aadharfacerd
  • आता जीवन प्रमाण हे अॅप उघडा.
  • पेन्शनरची माहिती भरण्यासाठी एक स्क्रीन येईल.
  • त्यात पेन्शनरचा आधार नंबर, PPO नंबर, बँक अकाऊंट नंबर, बँकेचे नांव, आणि स्वतःचा मोबाईल नंबर ही माहिती फक्त पहिल्या वेळेस भरावी लागते. State Bank of India च्या पेन्शनर्स नी PPO च्या जागी आपला HRMS नंबर (7 आकडी) टाकायचा आहे. OTP टाकून, नंतर आपले biometrics (fingerprint or iris scan) authenticate करायचे आहे. रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यावर तुमचा Pramaan Id जनरेट होईल.Screenshot 20241030 202334 Google Play Store
  • त्यात पहिला स्क्रीन Device Registration & Operator Authentication हा येईल.
  • Operator म्हणून तुम्ही तुमचे स्वतःचे नांव टाकू शकता
  • त्यात आपला आधार नंबर टाका.Screenshot 20241030 202302 Google Play Store
  • मोबाईल नंबर टाका (जो की तुमच्या बँकेत आणि आधार मध्ये रजिस्टर्ड असेल.)
  • E-mail address टाका.
  • सबमिट करा.
  • सबमिट केल्यावर NICSMS यांच्याकडून ओटीपी येईल. तो एन्टर करा.
  • एन्टर केल्यावर Device Registration and Operator Authentication स्क्रीन येईल. त्यात operator name मध्ये आपले नांव टाका. त्यावर आपला आधार नंबर वापरण्याविषयी मेसेज येईल. डाव्या बाजूला ते सिलेक्ट करण्यासाठी एक बॉक्स येईल, त्याला टिक करा आणि नंतर scan चे हिरवे बटन दाबा.
  • त्यानंतरच्या स्क्रीन वर Face Authentication Advisories या शीर्षकाखाली यासंबंधीच्या सूचना येतील. त्या समजल्याबद्दल खाली दिलेला एक बॉक्स आहे. त्यात टिक नाही केले तरी चालेल, म्हणजे प्रत्येक वेळी तो बॉक्स दिसेल. तुम्हाला तो बॉक्स पुन्हा दिसायला नको असेल तर त्यावर टिक करा अन्यथा नाही.
  • त्यानंतर Aadhar Auth नावाचा स्क्रीन येईल, आणि त्यात एका गोलामध्ये तुमचा चेहरा दिसू लागेल.
  • नंतर तुम्हाला Please blink to capture असा मेसेज येईल. तो आल्यावर एकदा-दोनदा डोळ्यांची उघडझाप करा.
  • झाले! आता तुमचे जीवन प्रमाणपत्र तयार झाले.
  • तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. तयार तुमचा Pramaan Id दिलेला असेल. आणि एक लिंक असेल. https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login अशा नांवाची.
  • त्या लिंकवर गेल्यावर, तिथे तो Pramaan Id टाकायचा, खाली दिलेला Captcha टाकायचा.
  • Generate OTP वर क्लिक करा. OTP येईल, तो टाका.
  • तुमचे जीवन प्रमाणपत्र Life Certificate, तयार! ते डाउनलोड करा, आणि तुमच्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवा. यापेक्षा अजून काहीही करण्याची गरज नाही.
  • तुमच्या department चे जीवन प्रमाणपत्र संस्थेशी Tie up असतेच. त्यांना ते प्रमाणपत्र प्राप्त होते, आणि संस्थेचे रेकॉर्ड आपोआप अपडेट होते.

तरीही, यासंबंधी, भारत सरकारच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीच्या लिंक्स येथे देत आहोत. त्या पूर्ण वाचून घेणे.

English Version

Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate

The month of November is important for pensioners to submit life certificates. In the earlier days, the pensioners had to go to the bank, go to the concerned department, take the form of the life ertificate, fill it out, sign it, and sign the register kept for it. Then the bank would give them a receipt for it. The receipt had to be preserved. For a long time, there was a fear of whether his life certificate had reached the concerned department.

That’s changed after COVID-19. Pensioners no longer need to go to the bank. This certificate can now be submitted from home only using your smart phone.

Which  pensioners can submit?

  1. State government
  2. Central government
  3. Banks
  4. BSNL
  5. Department of Defense
  6. Several other organisations which have participated in the central government’s proposed scheme.

 

For this, the following steps have to be taken.

  • In your Android phone, go to the Google Play Store
  • Type jeevan pramaan in the search there.
  • There will be an app called Jeevan pramaan, install  
  • Then  install the AadhaarFaceRD (type correctly in search).  
  • Now open the life scale app .
  • There will be a screen to fill in the pensioner’s information.
  • The pensioner’s Aadhaar number, PPO number, bank account number, bank name, and own mobile number are only required to be filled in the first time. State Bank of India pensioners have to fill the PPO with their HRMS number (7 digits). By entering OTP, then authenticate your biometrics (fingerprint or iris scan). After registration is successful, your Pramaan ID will be generated.
  • The first screen will come up with Device Registration & Operator Authentication.
  • You can enter your own name as an operator
  • Add your Aadhaar number to it.
  • Enter the mobile number (which will be registered with your bank and Aadhaar).
  • E-mail address टाका.
  •  
  • OTP will come from NICSMS  on submission. Enter it.
  • After entering, the Device Registration and Operator Authentication screen will appear. Enter your name in the operator name. It will have a message about using your Aadhaar number. A box will come to select it on the left, tick it and then press the green scan button.
  • The next screen will have instructions under the heading Face Authentication Advisories. There is a box below. It is okay to not tick it, so that every time the box will appear. If you do not want to see the box again, tick it otherwise don’t tick it.
  • Then there will be a screen called Aadhar Auth, and it will show your face in a circle.
  • Then you’ll get a message please blink to capture. When it arrives, blink your eyes once or twice.
  • Done! Now your life certificate is ready.
  • You will receive a message on your mobile, ready with your Pramaan ID , and a link. Https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login of such a name.
  • After going to that link, put pramaan Id, and enter the captcha
  • Click generate OTP will come, enter it.
  • Your life certificate is now ready! Download it, and save it on your phone. Nothing more needs to be done.
  • Your department must be having tie up with the Jeevan Pramaan Authority. Most of the departments and institutions in India are having. Your organization can access your certificate online and the  records of the  organization are automatically updated.

 

 

आठवणीतील पोळा Pola festival in Maharashtra

pola festival

आठवणीतील पोळा How pola was celebrated in Maharashtra

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पूर्वी साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या आठवणी आणि इत्थंभूत वर्णन.

Pola in Maharashtra in old days. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, हे चार महिने सणावारांचे. श्रावणातील पहिल्या पंचमी पासून म्हणजे नागपंचमी पासून जे सण सुरू होतात, ते शीतला सप्तमी, नारळी पोर्णिमा किंवा रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला, इत्यादि झाल्यावर श्रावण अमावास्येला साजरा केला जाणारा सण म्हणजे पोळा आणि त्याच दिवशी साजरा केला जाणार मातृदिन. पोळ्याच्या नंतर लगेच गणेश चतुर्थी, महालक्षुम्या, नंतर पितृपक्षानंतर येणारे नवरात्र, दसरा, आणि नंतर दिवाळी, यामुळे, “पोळा, अन सण झाले गोळा”. अशी जुन्याकाळी म्हण होती.

आजकाल शहरात राहतांना हे सण कुठे येतात आणि कुठे जातात यांचा पत्ता लागत नाही. तेंव्हा बालपणी हे सण किती उत्साहाने साजरे केले जायचे हे आठवते. आज पुण्या मुंबई सारख्या शहरात, कॉस्मोपोलिटन भागात राहतांना, मातीचे बैल सुद्धा सहज मिळत नाहीत, आणि मग घरीच बैलांचे चित्र ठेवून त्याचीच पूजा करून कसे तरी मनाचे समाधान करून घ्यावे लागते, तेंव्हा बालपणी ठिकठिकाणी दणक्यात साजरा होणारा पोळा आठवतो.

आधी मातृदिना बद्दल. पोळ्याच्या दिवशी, सकाळी घरी मातीच्या पाच  बैलांचे, आणि गाय गोर्‍याचे रीतसर पूजन करून आई त्यांना खिरीचा आणि पुरीचा नैवेद्य दाखवीत असे. आणि मग आम्हाला ‘वाण’ घ्यायला बोलावीत असे. ‘वाण’ म्हणजे काय, तर आई आम्हाला तिच्या मागे उभे राहायला सांगत असे. तिने सुताच्या धाग्याला चार पदरी करून, हळदीने रंगवून ठेवलेले असे. त्याला ‘पोवते’ म्हणत. आम्ही मागे येऊन उभे राहिल्यावर आई मागे न पाहता आम्हाला विचारीत असे,- “सर्वातीत कोण?” मग आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” मग पुन्हा आई विचारी, “सर्वातीत कोण?” मग पुन्हा आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” असे तीनदा कारायचे. मग आई आम्हाला आपला उजवा हात पुढे करायला सांगायची, आणि मागे न पाहता, हातावर ते बंधन (‘पोवते’) बांधायची. आधी साधी गाठ बांधून मग ती मागे वळून आमच्या हाताला ते ‘पोवते’ नीट बांधून द्यायची. मग आम्हाला खीर पुरीचा नैवेद्य द्यायची.

मला यात खूप अर्थ भरलेला वाटतो. आई ही आपली पहिली गुरू असते. त्या आईची शिकवण आपल्याला आयुष्यभर साथ करणारी असते. ही शिकवण ही तशीच उच्च दर्जाची असली पाहिजे. ‘सर्वातीत’ म्हणजे सगळ्याच्या अतीत, म्हणजे पलीकडला. आणि असा सर्वाच्या पलीकडला म्हणजे कोण असतो, तर ‘आत्मा’. म्हणजे आपल्या अपत्याला “तू सगळ्याच्या अतीत असणारा आत्मा आहेस” याची आठवण करून देणारा हा उपदेश आहे. आणि हा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, मुलाकडून तीनदा हे वदवून घेतले जाते, की मी सर्वातीत आहे. असा हा मूल आणि माता यांच्यामधील अनन्य संबंध अधोरेखित करणारा हा दिवस आहे, म्हणून, “मातृदिन”.

आमच्याकडे जरी शेती नव्हती, तरी त्याकाळी आम्ही राहत असलेली गावे छोटी छोटीच होती, आणि तिथे बहुसंख्य समाज हा शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असणारा होता. मला समजायला लागल्यावर आठवणारा पोळा म्हणजे हिंगोलीचा पोळा. मी त्यावेळी 9 ते 11 वर्षांचा असेल. हिंगोलीला सगळेच सण प्रचंड उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे होत. त्यानंतरची आठवण म्हणजे सिल्लोड या गावची. तिथे अजून वेगळ्या प्रकारे पोळा साजरा होई. पण ठिकठिकाणी साजरा केला जाणारा पोळा हा बर्‍याच बाबतीत सारखा असे. माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला, म्हणजे डोंगरावर असणार्‍या, सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावी (त्यांच्याकडे शेती होती अणि ते पूर्णवेळ शेतकरी होते) साजरा होणारा पोळा मला बहीणीकडून ऐकायला मिळत असे.

खेड्यापाड्यात पोळ्याच्या कितीतरी दिवस आधी पासून शेतकर्‍यांची पोळ्याची तयारी सुरू व्ह्यायची. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किती तरी बैल असत. त्यातल्या प्रत्येक बैलाचे आवडीने ठेवलेले नाव असे. तो कोणत्या कालवडी पासून झालेला आहे, कसा वाढला आहे, त्याच्या काय काय सवयी, किंवा ‘खोडी’ आहेत, त्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, याची त्याच्या मालकाला इत्थंभूत माहिती असे. कोणता बैल गाडीला जुंपल्यावर अगदी शहाण्यासारखा चालतो, आणि कोणता नखरे करतो, पण तो नखरे करणारा बैलच औत ओढायला कसा भारी आहे, हे त्याचा मालक कौतुकाने सांगत असे.

पोळ्याच्या आधी येणारा आठवडी बाजाराचा दिवस बैलांच्या साजशृंगाराची सामग्री खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांनी गजबजलेला असे. शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा ‘हिंगुळ’ (जो छोट्या छोट्या पत्र्याच्या डब्यांत मिळत असे), शिंगांना लावायसाठी रंगीबेरंगी बेगडी कागद, गळ्यात बांधायला घंटांच्या माळा, कवड्यांच्या माळा, तसेच नजर लागू नये म्हणून काळ्या रंगांच्या माळा,  रंगीबेरंगी गोंडे, पायात घालायला तोडे, बैलांच्या पाठीवर टाकायसाठी रंगीबेरंगी, वेगवेगळ्या रंगाच्या झुली, असे तऱ्हेतऱ्हेचे सामान बाजारात आलेले असे, आणि बैलांचे मालक आपल्या आवडत्या बैलांसाठी हे सर्व सामान मोठ्या आवडीने खरेदी करीत.pola bazar

पोळ्याच्या आदल्या दिवसापासून बैलांची स्पेशल ट्रीटमेंट सुरू होत असे. त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम घेत नसत. त्यांना नदीवर आंघोळीला घेऊन जात आणि चोळून चोळून आंघोळ घालीत. त्यानंतर बैलांची ‘खांदे मळणी’ होत असे. म्हणजे बैलांच्या खांद्यांना हळद आणि लोण्याने किंवा तुपाने मालिश करत. संध्याकाळी बैलांना चवळीच्या शेंगांची भाजी आणि पोळी किंवा पुरी खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बैलांना आंघोळीसाठी नदीवर घेऊन जात. तिथून आल्यानंतर त्यांना सजवायला सुरूवात करीत. तांदुळाच्या पिठापासून आणि अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या रंगाने बैलांना रंगवीत. त्यामध्ये बैलांच्या अंगावर बटाट्यापासून किंवा लाकडापासून बनवलेल्या छापयांनी छापे काढीत. तसेच हातांनीही छापे काढीत. बैलांची शिंगे खरबरीत झालेली असल्यास आधी त्यांना चाकूने नीट तासून घेत, जेणे करून शिंगांवरील डेड भाग निघून जाईल. नंतर शिंगांना हिंगुळ लावीत. हिंगुळ म्हणजे एक प्रकारचा रंगच असे. नंतर काही जण त्या हिंगुळावर, तो ओला असतांनाच बेगड चिकटवीत. बैलांच्या गळ्यात आदल्या दिवशी आणलेल्या घुंगरांच्या माळा(ज्यांना घागरमाळा सुद्धा म्हणतात) कवड्यांच्या माळा, आणि काळ्या रंगाच्या ‘केसरी’  माळा घालीत. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या नाकात घालणारी ‘नथ’ किंवा ‘नथणी’ सुद्धा बदलतात आणि नवीन घालतात.  शिंगांना दोन्ही बाजूंनी अडकवून गोंडे समोरच्या बाजूला कपाळावर येतील असे बांधीत. तसेच छान तयार केलेले बाशिंग बांधीत.

अशा प्रकारे छान सजवलेले बैल घेऊन मग घराबाहेर पडत, घरी अनेक बैल असल्यानंतर (ते सहसा असतच.) घरातील माणसे एकेक बैल घेऊन बाहेर पडत. तसेच आणखी बैल असतील ते घेऊन सालदार बाहेर पडत.bail2

गावातील घरोघरचे सगळे बैल घेऊन मग सर्वजण एका मोठ्या मैदानात जमत. काही ठिकाणी हे ठिकाण नदीच्या पल्याड असे. काही जण तिकडे जाण्या आधी बैलांना मारूतीचे दर्शन करून आणीत.

पोळा ‘फुटायची’ वेळ सहसा आधीच गावकऱ्यांनी सर्व सहमतीने ठरवलेली असे. गावातील पोळ्याच्या मैदानावर सर्व मातब्बर मंडळी जमलेली असे. मैदानावर एका ठराविक ठिकाणी एक सजवलेली दोरी  तोरण म्हणून दोन्ही बाजूंनी ताणून धरलेली असे. जमलेले बैलही या वातावरणाने खूप उत्तेजित होऊन फुरफुरू लागत. आणि आपल्या मालकाच्या हातातील दाव्याला हिसडा देऊन पुढे जायचा प्रयत्न करीत. ठरलेल्या वेळेच्या खूप आधी वाजवणारी मंडळी जोरजोरात डफडे वाजवायला सुरूवात करीत. पोळा फुटल्यानंतर पहिल्यांदा पुढे जाणारा बैल कोणाचा हे आधीच ठरलेले असे. काही ठिकाणी गावातील प्रमुख व्यक्ति, पाटील इत्यादींना हा मान असे. काही ठिकाणी ज्यांनी नवीन जमीन घेतली आहे अशा मालकाला हा मान दिला जाई, तर काही ठिकाणी या मानाचा ‘लिलाव’ करून, जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याला हा मान दिला जाई आणि त्याच्या कडून मिळणारे पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जात.

आणि मग पोळा फुटायची वेळ येई, आणि एका क्षणी ते तोरण बाजूला घेतले जाई आणि सगळ्यात पहिल्यांदा मानाचा बैल ऐटीत पुढे निघे. आणि त्याच्या मागे लगेच इतर बैलांचे मालक आपापले बैल दामटीत. शेकडो बैल आणि त्यांचे मालक एकाच वेळी पळत सुटल्याने सगळीकडे त्यांच्या पायांनी उडणारी धूळ, बैलांच्या मालकांनी आपल्या बैलांना दिलेले आवाज, या सर्वांनी वातावरण भरून जात असे.pola festival

मग त्यातील बरेच जण आपल्या बैलांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जात आणि  मारूतीचे दर्शन करून आणीत. मग त्यातील बरेच जण आपल्या घराकडे जाण्याआधी गावातील सर्व घरांच्या समोर घेऊन जात. त्या ठिकाणी घरातील मंडळी सजून धजून बैलांच्या स्वागतासाठी उभेच असत. मग घरातील स्त्रिया त्या बैलांना ओवाळीत, हळदी कुंकू वाहीत, त्यांच्या पायावर पाणी घालीत, तसेच ज्याने बैल धरला आहे त्याच्या सुद्धा पायावर पाणी घालीत, आणि बैलाला पुरणपोळीचा घास भरवीत. बैलही मोठ्या आनंदाने हा पुरणपोळीचा नैवेद्य स्वीकारीत.pola14 pola15 pola16

एखाद्या एखाद्या घरी मात्र बैल काही केल्या पुरणपोळी घेत नसत. तोंडाजवळ पोळी नेली तरी आडवी मान हलवीत. मग अशा वेळी बैल रूसला आहे असे म्हणत. मग त्याचा मालक त्याच्या विनवण्या करी, तेंव्हा कुठे तो बैल तो नैवेद्य स्वीकारी. गावात त्यादिवशी पूर्ण उत्सवाचे आणि उत्साहाचेच वातावरण असे. सगळीकडे जाऊन आल्यानंतर मग बैलाचा मालक जेंव्हा त्याला घेऊन घरी येई, तेंव्हा त्या दोघांचे खूप उत्साहाने स्वागत होत असे. काही काही जण आधी घरी जाऊन मग सगळीकडे बैल फिरवीत. घरी बैलाला घरातील स्त्रिया ओवाळीत, त्याच्या पायांवर पाणी घालीत, हळदी कुंकू वाहून नमस्कार करीत, आणि त्याला पुरणपोळी खाऊ घालीत.

आपल्या घरी आपले सगळे बैल परत आल्यानंतर मग सगळ्यांना पुरणपोळीचे जेवण असे. त्यात सालदार, घरगडी, बैल धरणारे, शेजारी पाजारी, नातेवाईक, असे सर्व संमिलित असत आणि मोठी पंगत असे.

नाग हा विषारी प्राणी असूनही, शेतातील धान्य फस्त करणार्‍या उंदरांना मर्यादित ठेवतो, अणि जीवन साखळीचा तो एक आवश्यक भाग आहे,म्हणून आपली संस्कृती त्याच्याप्रतिही, नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते, त्याचे पूजन करते. त्यानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडत, सामूहिकरित्या गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत, वारुळावर जात, आणि नागाचे पूजन करत. यात निसर्गाच्या एका घटकाविषयी कृतज्ञतेचा भाव तर आहेच, पण अशा अनेक निमित्ताने  सगळ्यांचे एकत्र येणे, निसर्गाच्या जवळ जाणे, हे एक खूप मोठे मानसिक औषध ही आहे. तसेच बैल हा शेतीचा अविभाज्य घटक असून त्यावर शेतकर्‍यांचे अणि पर्यायाने इतर समाज घटकांचे जीवन अवलंबून असल्याने, नागपंचमी काय किंवा, बैलपोळा काय, हे आपले सण हे निसर्गाच्या अणि त्यातील घटकांच्या प्रति आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी अप्रतिम व्यवस्था आहे.

 ज्याच्यावर आपले पोट, आपली शेती अवलंबून आहे, ज्याच्या श्रमामुळे आपण शेती करू शंकतो, त्या मुक्या जनावराच्या प्रति,  नुसते जनावर म्हणून नाही तर घरातील एक सदस्य म्हणून बघण्याची आणि त्याच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही पर्वणी,  म्हणजे बैलपोळा.

अजून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बर्‍याच प्रमाणात पोळा हा वरील स्वरूपात साजरा केला जातो. पण शहरात राहणार्‍यांना मात्र बैल पोळा वरील स्वरूपात अनुभवायला मिळत नाही. आमच्या मुलांनी काही प्रमाणात हा अनुभव घेतला, पण नातवंडांना मात्र हा अनुभव देणे हे आता स्वप्नवतच झाले आहे.

असो. आज पोळ्याच्या अणि मातृदिनाच्या निमित्ताने जुन्या सगळ्या स्मृतींची उजळणी झाली. या पोळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!

हा लेख आवडला असल्यास हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मुलांनाही हा ब्लॉग वाचू द्या, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. 

माधव भोपे