भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ३० डिसेंबरचे महत्त्व
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले हे आपण सर्व जाणतो. पण त्याआधी, स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न, वेगवेगळ्या देशभक्तांनी आपआपल्या परीने सुरू ठेवले होते. आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहिती असेल, की आजपासून बरोबर ८१ वर्षांपूर्वी, ३० डिसेंबर १९४३ रोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने, म्हणजेच आझाद हिंद सरकारने, अंदमान आणि निकोबार बेटांवर, पोर्ट ब्लेअर येथे अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर भारतीय ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती.
Independence League आणि Indian National Army (INA) ची स्थापना
बंगालमधील क्रांतिकारक रास बिहारी बोस हे डिसेंबर १९१२ मध्ये तत्कालीन वाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्यावरील खुनी हल्ल्याचे सूत्रधार होते. ते ब्रिटिश सरकारकडून होणारी अटक टाळण्या साठी, जपानला गेले, आणि तिथून आपले प्रयत्न चालू ठेवले. नंतर ते जपानमध्येच स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी, तत्कालीन जपान सरकारला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्याविषयी तयार केले. त्यांनी तिथे मार्च १९४२ मध्ये Indian Independence League ची स्थापना केली. तसेच Indian National Army (INA) या नांवाने सशस्त्र सेना उभारायला सुरुवात केली. या लीगच्या जून १९४२ मध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत, सुभाषचंद्र बोस यांना तिचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी त्यानंतर Indian National Army (INA) म्हणजेच आझाद हिंद सेना या नांवाने त्या सेनेत अनेक लोकांना सामील केले. ब्रह्मदेश आणि मलेशिया येथील भारतीय युद्धकैद्यांना या सेनेत सैनिक म्हणून घेण्यात आले.
सुभाषचंद्र बोस यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा
सुभाषचंद्र बोस यांनी, टोकियो मध्ये, जून १९४३ मध्ये, ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकून लावण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, भारताच्या पूर्वेकडील भाग ताब्यात घेण्यासाठी सैनिक कृति करण्याची घोषणा केली. त्यानंतर ते जपानच्या ताब्यात असलेल्या सिंगापूरमध्ये आले आणि तिथे त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी आपल्या स्वतंत्र भारताच्या सरकारची घोषणा केली आणि काही मंत्र्यांची, आणि सैन्य अधिकाऱ्यांचीही ही नियुक्ती केली. विशेष म्हणजे या सरकारला, तत्कालीन ७ देशांनी मान्यता सुद्धा दिली होती- जर्मनी, जापान, इटली, क्रोएशिया, थायलंड, ब्रह्मदेश आणि फिलिपाईन्स. ही एक मोठी राजनीतीक उपलब्धि होती. त्यांच्या सरकारने चलनी नोटा, पोस्ट स्टॅम्पस, छापायला सुरुवात केली, कायदे बनवायला सुरुवात केली.
अंदमान येथे तिरंगा ध्वज फडकविला
दुसऱ्या महायुद्धाच्या त्या काळात, जपानने ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या अंदमान आणि निकोबार या बेटांवर ताबा मिळविला होता. जपानने, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वतंत्र भारताचे सरकार म्हणून मान्यता दिली असल्याने, अंदमान आणि निकोबार ही बेटें त्यांच्या ताब्यात देण्याचे ठरवले.
आणि त्याप्रमाणे, ३० डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने (आझाद हिंद सरकार) अंदमान आणि निकोबार बेटांवर, अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर भारतीय तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सार्वभौमत्वाची घोषणा केली. (याआधी सुभाषचंद्र बोस भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष होते, तेंव्हा, त्या पक्षाने, चरखा असलेला तिरंगा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच ध्वज येथे फडकविण्यात आला.)
अर्थात, नंतरच्या काळात घडलेल्या घटनांमुळे, दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची सरशी झाली. जर्मनी, जपान यांची पीछेहाट झाली. जपानला शरणागती पत्करावी लागली. त्या धामधुमीत एका छोट्या बॉम्बर विमानातून नेताजी आणि त्यांचे काही सहकारी जात असतांना, त्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला.
तर ३० डिसेंबर १९४३ ची ही कहाणी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणाकोणाचे आणि कसे योगदान होते हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणून हा माहिती प्रपंच.
वरील माहिती ही आंतरजालाच्या विविध स्रोतांतून एकत्र करून एका ठिकाणी गुंफली आहे.
माधव भोपे