digital arrest-1
*बँकस्य कथा रम्या..*
त्यावेळी मी औरंगाबाद जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद च्या वैजापूर शाखेत शाखाधिकारी म्हणून नुकताच कार्यभार सांभाळला होता.
एके दिवशी सकाळी, अगदी बँक उघडल्या उघडल्याच, चष्मा लावलेल्या, सोज्वळ, मृदु, सात्विक चेहऱ्याच्या एका मध्यम वयाच्या सडपातळ बाईंनी घाईघाईत माझ्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत होते. जोरजोरात श्वास घेत आणि कपाळावरील घाम पुसत त्या म्हणाल्या..
“साहेब, ताबडतोब माझं खातं बंद करा. नुकतेच कुणीतरी माझ्या खात्यातून तीस हजार रुपये काढून घेतले आहेत. हा पहा, माझ्या मोबाईलवर तसा मेसेजही आला आहे..”
हे बोलतांना त्या बाईंना चांगलीच धाप लागली होती. भीतीनं त्यांचा घसाही कोरडा पडल्याचं जाणवत होतं.
“हे पहा, तुम्ही अशा घाबरून जाऊ नका. शांत व्हा, आणि आधी इथे खुर्चीवर शांतपणे बसा पाहू..”
मी त्या बाईंना धीर देत म्हटलं. हातातली पर्स टेबलावर ठेऊन एक दीर्घ सुस्कारा सोडत त्या बाई खुर्चीवर बसल्या.
मी त्यांच्यासाठी मागवलेलं पाणी त्यांनी आधाशासारखं घटाघटा पिऊन टाकलं. मग डोळ्यावरील चष्मा काढून पदराच्या टोकानं त्याची काच पुसण्याच्या निमित्तानं त्यांनी हळूच आपल्या डोळ्यातील अश्रूही टिपून घेतले. थोडावेळ काही न बोलता त्या स्वस्थ बसल्या. आता त्यांना बरं वाटत असावं असं समजून मी म्हणालो..
“हं.. सांगा आता ! काय घडलंय नेमकं..?”
खाली मान घालून रडवेल्या स्वरात त्या बाई म्हणाल्या..
“साहेब, माझं नाव ललिता वाघमारे. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मी मुख्याध्यापिका आहे.
शाळेच्या कामासाठी काल मी औरंगाबादला गेले असता दुपारी तीन वाजता एका व्यक्तीचा मला फोन आला. “मी बँकेतून बचत खात्याचा अधिकारी बोलतो आहे..” असं तो माणूस म्हणाला.
त्यानंतर माझं नाव आणि माझा अकाउंट नंबर सांगून तो माणूस म्हणाला की “तुमच्या खात्याचं kyc expire झाल्याने ते खातं ब्लॉक करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या खात्यातून आता कोणताही व्यवहार करू शकणार नाही. तुमचं एटीएम कार्ड देखील ब्लॉक करण्यात आल्याने तुम्हाला एटीएम मधून सुद्धा पैसे काढता येणार नाहीत.”
एवढं बोलून थोडा दम घेऊन झाल्यावर त्या बाई पुढे म्हणाल्या..
“साहेब, योगायोगाने कालच माझे पगाराचे पैसे खात्यात जमा होणार होते. मी नेहमी एटीएम नेच खात्यातील पैसे काढते. त्या माणसाने एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगताच धास्तावून “मग आता मला काय करावं लागेल ?” असं मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला..
“जर तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड घेऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बँकेत आलात तर तुमचं खातं आजच पुन्हा सुरू करता येईल. अन्यथा उद्या शुक्रवार आहे. आणि शुक्रवार-शनिवार या दोन्हीं दिवशी ही कामे करता येत नसल्याने खाते पुन्हा सुरू होण्यासाठी तुम्हाला पुढील सोमवार पर्यंत वाट पहावी लागेल.”
मला आता त्या बाईंच्या कथेत इंटरेस्ट यायला लागला होता.
“ज्यावेळी मी त्याला सांगितलं की सध्या मी औरंगाबादला असून आज साडेपाच पर्यंत बँकेत येणे शक्य नाही, तेंव्हा तो माणूस म्हणाला की “तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर व एटीएम कार्डचे डिटेल्स सांगा. तसेच एटीएम कार्ड मागील CVV नंबर सुद्धा सांगा. आम्ही इथून खात्याचा ब्लॉक काढल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो आम्हाला कळवा. आम्ही तो ओटीपी कॉम्प्युटर मध्ये फीड केल्यावर तुमचं खातं पुन्हा सुरू होईल.”
एवढं बोलून त्या बाई थांबल्या. सायबर फ्रॉड करणाऱ्यांची ही नेहमीचीच मोडस ऑपरेंडी असल्याने पुढे काय घडलं असावं याचा एव्हाना मला पुरेपूर अंदाज आला होता.
“मग..? काय केलंत तुम्ही ? दिली त्या माणसाला सगळी माहिती..?”
खाली मान घालून माझ्या नजरेला नजर न देता हळूच त्या बाई पुटपुटल्या..
आणि मग एकदम बळंच अवसान आणीत माझ्याकडे पहात किंचित तक्रारीच्या सुरात त्या म्हणाल्या..
“मग काय करणार साहेब ? एटीएम वापरण्याची आता एवढी सवय झाली आहे की एटीएम बंद होणार हे ऐकल्याबरोबर मी घाबरून गेले. शिवाय कालच आमचा पगारही होणार होता. तो ही काढायचा होता. बंद झालेलं एटीएम पुन्हा लगेच चालू झालं नसतं तर पैसे काढण्यासाठी बँकेत येऊन इथल्या गर्दीत तासभर रांगेत उभं रहावं लागलं असतं. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे ताबडतोब बँकेत येणं मला शक्य नव्हतं आणि एटीएम साठी सोमवार पर्यंत थांबण्या इतका मला धीर नव्हता.
सुदैवाने माझं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड माझ्या पर्समध्येच होतं. तो माणूस फसवत असेल अशी मला जराही शंका आली नाही. ताबडतोब मी त्याला त्यानं विचारलेली सर्व माहिती दिली आणि थोड्या वेळानं माझ्या मोबाईल वर आलेला ओटीपी नंबरही त्याला सांगितला. एटीएम पुन्हा चालू झाल्याचं त्या माणसाने सांगितलं तेंव्हा त्याला “थॅन्क्स” म्हणून मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. खरं म्हणजे त्याचवेळी मोबाईल वर कोणता तरी मेसेज आल्याचा “नोटिफिकेशन ॲलर्ट साउंड” सुद्धा मी ऐकला, पण मी कामाच्या घाईत होते आणि एटीएम चालू झाल्या बद्दलचाच तो मेसेज असावा असं समजून तेंव्हा तो मेसेज मी पाहिला नाही.”
सलग एका दमात एवढं सारं बोलल्यामुळे वाघमारे बाईंचा श्वास फुलून आला होता. क्षणभर थांबून एक दीर्घ उसासा सोडत त्या पुढे म्हणाल्या..
“त्या दिवशी औरंगाबादचं काम संपवून वैजापूरला परतायला रात्र झाली, त्यामुळे आता उद्या सकाळीच एटीएम मधून पगाराची रक्कम काढू असा विचार केला. त्याप्रमाणे आत्ता सकाळी दहा वाजता जेव्हा तुमच्या बँकेशेजारील एटीएम मधून पैसे काढायला गेले तेव्हा “Insufficient balance” असा मेसेज आला म्हणून लगेच “मिनी स्टेटमेंट” काढलं, तर त्यात माझ्या खात्यातून काल तीस हजार रुपये काढल्याचं दिसत होतं. मला एकदम काल बँकेतून आलेला फोन आठवला आणि फसवणुकीची शंका आली. लगेच काल मोबाईलवर आलेला मेसेज काढून पाहिला, तर तो खात्यातून तीस हजार रुपये काढल्याचाच मेसेज होता..”
बोलता बोलताच वाघमारे बाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण मघासारखा ते पुसण्याचा अट्टाहास न करता तशाच डबडबलेल्या डोळ्यानं आणि दोन्ही हात जोडून थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या..
“साहेब, माझा नवरा दारूडा आहे. काहीच कामकाज करत नाही तो. माझ्या पगारावरच सारं घर चालतं. पीएफ वगैरे कटून कसाबसा जेमतेम तीस हजार रुपये पगार खात्यात जमा होतो. तो साराच्या सारा गेला. कसा काढायचा आता महिना ? देणेकरी तर पैशाकरता जीव नकोसा करतील. बँकांच्या कर्जाचे हप्तेही भरायचे आहेत. दया करा साहेब, हात जोडून विनंती करते, कसंही करून माझे पैसे मला परत मिळवून द्या..”
वाघमारे बाईंची ती दयनीय अवस्था बघवत नव्हती. त्यांना धीर देत म्हटलं..
“मॅडम, अशा घाबरून जाऊ नका. आधी तुमचं खातं चेक करतो आणि मग बघतो काय करता येईल ते..”
मॅडमचं खातं चेक केलं तेव्हा खरोखरीच खात्यातून काल तीस हजार रुपये काढलेले दिसत होते. लगेच औरंगाबादच्या झोनल ऑफिसमधील एटीएम चॅनेल मॅनेजरशी बोलून त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले..
“कस्टमरने ओटीपी स्वतःच्या मर्जीने (Willingly share) कळविला असल्याने बँक refund साठी जबाबदार नाही. तसंच असे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही खूपच कमी असते. मात्र कस्टमरचे खाते तसेच एटीएम कार्ड ब्लॉक करून त्याच्याकडून लेखी तक्रार घेऊन ती आमच्याकडे पाठविल्यास फ्रॉडस्टरच्या खात्यातील पेमेंट रोखण्याचा काहीतरी प्रयत्न करता येईल.”
वाघमारे मॅडमना हे सर्व सांगितल्यावर त्या म्हणाल्या..
“एकदा फसवून, खात्यातून पैसे काढून घेतल्यावर आता कसले परत मिळणार आहेत ते पैसे ? मी काही लेखी तक्रार वगैरे करणार नाही. तुम्ही फक्त एवढं करा की माझं हे सेव्हिंग खातं बंद करून टाका आणि दुसरं नवीन खातं उघडा. तसंच जुनं एटीएम कार्ड रद्द करून नवीन कार्ड इश्यु करा..”
खूप समजावून सांगून ही वाघमारे बाई ऐकेनात. शेवटी त्याचं खातं बंद करून ताबडतोब नवीन खातं उघडून दिलं आणि नवीन खात्याची एटीएम कार्ड रिक्वेस्टही टाकली. नवीन खात्याचं पासबुक त्यांच्या हातात ठेवत म्हणालो..
“हे घ्या मॅडम तुमच्या नवीन खात्याचं पासबुक. हा नवीन खाते नंबर तुमच्या वरिष्ठांना कळवा म्हणजे तुमचा पगार ह्या खात्यात जमा होत जाईल. तसंच आठ दहा दिवसांत तुमचं नवीन एटीएम कार्डही तुमच्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. तुम्हाला पैशांची अर्जंट गरज असेल तर आमच्या बँकेकडून तुम्हाला ताबडतोब पन्नास हजार रुपयांपर्यंतचं पर्सनल लोन मिळू शकेल.”
पासबुक घेऊन वाघमारे मॅडम खाली मान घालून स्वतःशीच काहीतरी विचार करीत केबिनमध्ये शांत बसल्या असताना मी त्यांना म्हणालो..
“मॅडम, आम्ही लेखी मेसेज व ऑडिओ मेसेज द्वारे वारंवार खातेदारांना सावध करत असतो की.. “बँक कधीही फोन द्वारे कस्टमरला पिन किंवा ओटीपी नंबर मागत नाही. कधीही, कुणाही अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी किंवा पिन सांगू नका.” हा संदेश वारंवार तुमच्या मोबाईल वर दिसत असतो, ऐकू येत असतो. तरीदेखील तुमची अशी कशी फसगत झाली ? तुम्ही तर उच्च शिक्षित आहात, मुख्याध्यापिका आहात. तुम्हीच जर अशा घाबरून जाऊन कुणाही अनोळखी व्यक्तीला अशी महत्त्वाची माहिती फोनवर सांगितलीत तर कसं होईल ? तुमच्या सारख्या सुशिक्षित, जबाबदार व्यक्तीकडून अशा उतावीळ, धांदरट, बेजबाबदार व निष्काळजी वर्तनाची तर अजिबातच अपेक्षा नव्हती..”
मान वर करून माझ्याकडे एकटक पाहत वाघमारे बाई म्हणाल्या..
“पटतंय मला. केवळ फोन वरून कुणीही काहीतरी बोललं म्हणून मी एकदम असं घाबरून जायला नको होतं. यात जसा माझा मूर्खपणा आहे तशीच ही गोष्ट जर बाहेर कुणाला समजली तर त्यात माझी बदनामी सुद्धा आहे. सगळेजण मला अक्कलशून्य, बावळट समजतील. म्हणूनच मी लेखी तक्रार देण्याचं टाळलंय.
आता आणखी एकच विनंती आहे की कृपया ह्या झालेल्या प्रकाराची तुम्ही कुठेही वाच्यता करू नका. हे छोटंसं गाव आहे. गावभर बातमी पसरायला वेळ लागणार नाही. आणि मग.. आत्ता तुम्ही मला जसा उपदेश केलात तसाच उपदेश गावातील जो तो माणूस मला ऐकवू लागेल..”
“तुम्ही अगदी निश्चिंत रहा. सुदैवाने माझ्याखेरीज बँकेतील अन्य कुणालाही या घटनेबद्दल किंचितही कल्पना नाही. आणि माझ्याकडून ही गोष्ट कायम गुप्तच ठेवली जाईल..”
टेबलावरची पर्स उचलून निमूटपणे, जड पावलांनी वाघमारे बाई बँकेबाहेर निघून गेल्या. त्यानंतर कितीतरी वेळ मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिलो.
मला राहून राहून वाटत होतं की आधीच निराश, खचलेल्या आणि दुःखात असलेल्या वाघमारे बाईंना मी असं टोचून बोलायला नको होतं. “एक वाईट अनुभव समजून, झालं गेलं विसरून जा, आणि यापुढे सावधगिरी बाळगा..” असं म्हणून त्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शिक्षिका असण्यावर बोट ठेवून त्यांना मी अप्रत्यक्षपणे मूर्ख, बावळट आणि घाबरटच म्हटलं होतं. जेव्हा फसगत व्हायची असते तेव्हा सारासार विचार न करता मनुष्य समोरच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. त्या थोड्या वेळाकरता त्याची जणू बुद्धीच काम करेनाशी होते. हे कुणाबाबतही घडू शकतं. न जाणो उद्या माझ्यावर सुद्धा असा प्रसंग आला तर..?
मी घड्याळात पाहिलं. बारा वाजून गेले होते. आज बँकेत अजिबातच गर्दी नव्हती. बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाल्याने टेबलावरची कामं भराभरा उरकून पेंडिंग ऑडिट रिप्लाइज देण्याच्या कामात मी गढून गेलो. थोड्या वेळानं मान वर करून पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते. “बापरे ! वेळ कसा चट्कन निघून गेला ते कळलंही नाही..” स्वतःशीच मी पुटपुटलो. ऑडिट रिप्लाईजचं रेंगाळलेलं पण महत्त्वाचं असं काम एकदाचं पूर्ण झाल्यामुळे समाधानानं खुर्चीवर बसल्या बसल्या मागे रेलून कुठलं तरी आवडतं गाणं गुणगुणू लागलो तोच टेबलावरील लॅन्ड लाईन फोन खणखणला..
या मोबाईलच्या जमान्यात लॅन्ड लाईन कॉल म्हणजे नक्कीच रिजनल ऑफिस किंवा झोनल ऑफिसचा फोन असावा असा विचार करीतच रिसिव्हर उचलला. माझा अंदाज खरा ठरला. पलीकडून खुद्द डिजीएम साहेबच बोलत होते..
“हॅलो..! कोटनीस जी sss! कैसे हो ? मैं डीजीएम बात कर रहा हूँ..”
“हॅलो सर..! कोटनीस बात कर रहा हूँ सर..! मैं ठीक हूँ सर..!”
तत्परतेने मी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
डीजीएम साहेबांचा फोन आहे हे समजताच नकळत लगबगीनं स्वतःला सावरून घेत, खुर्चीवर ताठ होऊन बसत जीवाचा कान करून ते काय सांगत आहेत ते मी ऐकू लागलो..
“सुनो, कोटनीस जी sss ! मै शिर्डी ब्रँच व्हिजिट के लिए औरंगाबाद से घंटाभर पहलेही निकल चुका हूँ । आधे घंटे में वैजापुर पहुँचूंगा । वहाँ दो मिनट रुक कर फिर आगे निकल जाऊंगा । मेरा एक पर्सनल काम है.. करोगें ?”
“क्यों नहीं सर ! इट्स माय प्लेझर..! आप बस हुकुम कीजिए सर, प्ली sss ज.. !!”
आवाजात शक्य तितकी अदब, तत्परता व आज्ञाधारकपणा आणीत म्हणालो.