आठवणीतील गणेश उत्सव
महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे पूर्वीचे स्वरूप
Memories of Ganesh Utsav in Maharashtra
आपल्या goodlifehub.in या वेबसाइट वर मागील वर्षी हा लेख प्रकाशित केला होता. या लेखाची प्रासंगिकता आजही कायम आहे. त्यामुळे या लेखात काही समयोचित बदल करून तो आता goodworld.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.
यावर्षी गणेश चतुर्थी बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणरायांचे आगमन धूम धडाक्यात झाले. यावर्षी पाऊस ही सगळीकडे छान झाला, पिकें चांगली आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, जनावरांना चारा आणि पाणी मुबलक झाले आहे, त्यामुळे सर्व आनंदात आहेत. 10 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आजकाल सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. अशा वेळी, आम्ही लहान असतांना गणेश उत्सवाचे स्वरूप कसे होते, हे जसे आठवेल तसे वर्णन करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
आठवणीतील गणेश उत्सव
आजपासून 50-55 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव हा खूपच साधा आणि सात्त्विक होता. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची, शहराची, आपली आपली एक वेगळी परंपरा असे. त्या त्या भागातील आजूबाजूची गावेही तीच परंपरा पाळत. गणेशोत्सव जवळ आला की हौशी गणेश मंडळे कामाला लागत. काही नवीन गणेश मंडळेही स्थापन होत. पण या सगळ्यात हौशी मंडळीच असत. गणेशोत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. वर्गणीची, counterfoil असलेली पावती पुस्तके छापून घेतली जात. मोठाली मंडळे अशी अनेक पावती बुकें छापीत, आणि कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या पावती पुस्तकांसह वर्गणी गोळा करण्याच्या कामाला लागत. वर्गणीच्या आकड्याबद्दल प्रेमळ आग्रह असे, पण कुठेही धाक दपटशा किंवा जबरदस्ती नसे. दुकानदार लोकांकडूनही वर्गणी गोळा केली जाई. छोटी छोटी बाल गणेश मंडळेही असत. त्यांच्या छोट्या कार्यकर्त्यांनाही कौतुकाने अल्पशी वर्गणी दिली जात असे. ते त्यातच खूष असत.
गणपती बसवण्यासाठी कोणाची तरी बैठक, किंवा ओसरी ही बऱ्याच वेळा पुरे होई. मोठाली मंडळे स्टेज उभारीत. पण ते स्टेज कधीच रहदारीला अडथळा करणारे नसे. शक्यतो एका बाजूला लावले जाई.
मला हिंगोलीचा गणेशउत्सव आठवतो. तेंव्हा मी सहावी सातवी इयत्तेत होतो. गल्लीतील गणेश मंडळा तर्फे कार्यकर्ता म्हणून इतरांबरोबर मीही वर्गणी गोळा करायला जायचो. लोकांकडून नगदी पैसे वर्गणी म्हणून घेतांना खूप थ्रिल वाटायचे.
हिंगोली बऱ्यापैकी मोठे शहर होते. तिथे बरीच गणेश मंडळे असत. गणेश उत्सवामधील मुख्य कार्यक्रम दोन प्रकारचे असत. एक म्हणजे निरनिराळी गणेश मंडळे गाण्यांच्या स्पर्धा आयोजित करत. त्यात सिने गीत, भावगीत, भक्तीगीत, सर्व प्रकारची गीते चालत असत. संध्याकाळी 8 च्या नंतर या स्पर्धा सुरू होत, त्या रात्री 11 किंवा 12 वाजेपर्यंत चालत.
या स्पर्धामध्ये मुख्य करून शिशु किंवा तरुण वर्गाचाच सहभाग असे. त्यातील काही काही गाणारे छान गात आणि मग ते खूप प्रसिद्ध होत. ते रोज किंवा दिवसा आड वेगवेगळ्या गणेश उत्सवां च्या स्पर्धांमध्ये भाग घेत आणि हमखास पाहिले किंवा दुसरे बक्षिस मिळवत. ही बक्षिसे शेवटच्या दिवशी जाहीर केली जात. तसेच रसिक प्रेक्षक त्यांना त्यांच्या गाण्यावर खूष होऊन 1 रुपया पासून 10 किंवा वीस रुपयांपर्यंत बक्षिसे ही देत. ही बक्षिसे लगेच स्टेजवर अँकर द्वारे जाहीर केली जात. काही काही मुले अशी प्रोत्साहनपर खूप रक्कम मिळवीत.
हिंगोली येथील स्टेशन मास्टर चा मुलगा, “ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी” हे गाणे खूप छान म्हणायचा. एक अकबर नावाचा मुसलमानाचा साधारण 18-20 वर्षांचा मुलगा होता.(त्या काळी असे स्पष्टपणे म्हणण्यात काही वावगे वाटत नसे. सर्व जण अत्यंत मिळून मिसळून राहत). तो पांढरी शुभ्र पॅन्ट आणि तसाच पांढरा शर्ट घालून येई. तो जास्त करून देशभक्तिपर गीते म्हणायचा. त्यातील एक गीत, ‘नौ जवानों भारत की तकदीर बना दो- फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो” हे गाणे, अॅक्शन सहित म्हणायचा. त्याला ही खूप बक्षिसें मिळत. .
ते गाणे साधारण मला आठवते तसे इथे देत आहे
नौजवानों भारत की तकदीर बना दो
नौजवानों भारत की तकदीर बना दो
फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो
फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो
छोड़के सारे भेदभावको समझो देश को अपना
समझो देश को अपना,
रह ना जाए देख अधूरा कोई सुंदर सपना
कोई सुंदर सपना
हम भारत के वासी क्यों हों दुनिया में शर्मिन्दा
देश के कारण मौत भी आए फिर भी रहेंगे ज़िन्दा
जय-जय हिन्द के नारों से धरती को हिला दो
फूलों के इस …
अपने साथ है कैसे-कैसे बलवानों की शक्ति
श्री जवाहर लाल की हिम्मत बापू जी की भक्ति
देश का झण्डा जग में ऊँचा करके दिखा दो
फूलों के इस ..
मला आत्ता गूगल करता करता कळाले की वरील गीत हे १९५५ साली रिलीज झालेल्या कुंदन नांवाच्या देशभक्तिपर चित्रपटातील आहे.
ते असे आदर्शवादाचे आणि स्वप्नाळू पणाचे दिवस होते. आजकालच्या भयानक वास्तवतेत तो आदर्शवाद पाल्या पाचोळया सारखा उडून गेला आहे, हे दारुण सत्य आहे.
असो. तर त्यांचे पाहून माझ्यासारख्यालाही कधी कधी स्पर्धेत भाग घ्यावासा वाटे. मग स्पर्धेत नाव नोंदवून आल्यावर, आपण ही तसेच गात आहोत, सगळे जण टाळ्या वाजवीत आहेत. आपला पाहिला नंबर आला आहे, इत्यादि स्वप्न रंगविण्यात 2-3 दिवस बरे जात. त्याकाळी लोकप्रिय सिनेमांच्या गाण्याची, घडी घातलेली छोटी छोटी 3-4 पानांची पुस्तके, 20-25 पैशांना मिळत. मग ती आणून त्यातून गाणे पाठ केले जाई. ते गाणे, अर्थातच, फ्लॉप होई, हे काही वेगळे सांगावयास नको.
देखावे
असो. तर अशा या गाण्याच्या स्पर्धा होत. दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निरनिराळे देखावे, ज्यांना ‘झाकी’ म्हणत. निरनिराळी मंडळे वेगवेगळ्या झाक्या (देखावे) बनवीत. हे देखावे बनवायला कोणीही व्यावसायिक मंडळी नसत, तर मंडळाचेच उत्साही कार्यकर्ते असत. कधी भारत पाक युद्धाचा देखावा केला जाई, तर कुठे पुराणातील एखाद्या कथेचा देखावा केला जाई.
काही सामाजिक उद्बोधनपर देखावे केले जात. यातील बहुतांश देखावे ‘स्थिर’ असत. पण काही काही मंडळे ‘हालते’ देखावे करत. असे देखावे बघायला तूफान गर्दी उसळे. काही काही देखाव्यात, कोणी तरी, गणपतीच्या पाया पडतो आहे आणि गणपती त्याला आशीर्वाद देतो आहे, असा देखावा- आणि त्यात गणपतीचा मेकअप करून एखादा मुलगा उभा असे. तो सारखा सारखा आशीर्वाद देण्यासाठी हात वर करी. मग मधून मधून त्याला विश्रांती देण्यासाठी पडदा पाडीत. तो थोडा वेळ आराम करे, आणि पुन्हा गणपतीच्या भूमिकेत जाई. रात्रीच्या वेळी, आपल्या मंडळातली गणपतीची आरती उरकली, की लोक झुंडी झुंडीने देखावे पाहायला बाहेर पडत. पूर्ण शहरभर अनेक देखावे असत. प्रत्येक ठिकाणी लाइट्स चा झगमगाट असे. पण तो खूप जास्त नसे. सगळे देखावे पाहता पाहता रात्रीचे बारा केंव्हा वाजून जात काही कळात नसे. या देखाव्यांची ही स्पर्धा असे आणि परीक्षक मंडळ शहरातील सर्व देखाव्यांची पाहणी करून त्यातून नंबर काढत. ही बक्षिसे ही शेवटच्या दिवशी दिली जात. एके वर्षी आमच्या गल्लीच्या ‘बाल गणेश मंडळाने’ कुठला तरी युद्धाचा देखावा केला होता, ते आठवते. त्यात गल्लीतीलच एक धष्टपुष्ट मुलगा सैनिकाचा वेष घालून, सैनिक झाला होता, आणि हातात बंदूक घेऊन शत्रूला मारीत होता, असा काहीसा देखावा होता. काही काही मोठी गणेश मंडळे खूप भव्य दिव्य असे देखावे करीत.
असो. रोज सकाळ संध्याकाळ आरती होई. गणपतीच्या मंडपात सिनेमाची अचकट विचकट गाणे लावण्याची प्रथा सुरू झालेली नव्हती. खरे तर साऊंड सिस्टम तेंव्हा कोणाकडे नसायची.
काही काही मातब्बर गणेश मंडळे मोठ्या शहरातील ऑर्केस्ट्रा बोलावीत. त्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळे. भरपूर वाद्य वृंदासहित आलेले ते कलाकार, सिनेमाची लोकप्रिय गाणी अगदी हुबेहूब वाजवत.
अशा प्रकारे पाहता पाहता दहा दिवस कसे निघून जात कळत नसे. आणि मग गणेश विसर्जनाचा दिवस येई-
गणेश विसर्जन
गणेश विसर्जन गावाबाहेरील एका मोठ्या तलावात करीत. गावातील मानाचा गणपती ठरलेला असे. संध्याकाळी लवकरच, म्हणजे 8-9 च्या सुमारास विसर्जनाची मिरवणूक निघे. शहरभरातील गणपती आपापल्या ठिकाणाहून निघून, त्या मिरवणुकीत रांगेने सामील होत. बहुसंख्य गणपती हे हातगाडी किंवा सजवलेली बैलगाडी यावर असत. या गाड्यांमध्ये गल्लीतील सगळ्या घरांतील छोटे छोटे गणपतीही दिलेले असत. बहुतेक मिरवणूकींच्या समोर भजनी मंडळे टाळ आणि मृदुंग घेऊन, भजने गात चाललेली असायची. कुठेही गणपतीच्या समोर अचकट विचकट नाच गाणे नसायचे. खूप सात्त्विक वातावरण असायचे. उजेडासाठी पेट्रोमॅक्स च्या ‘बत्त्या’ असायच्या. गर्दी भरपूर असायची, पण अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मिरवणूक चालायची. रात्री बाराच्या आसपास पहिला गणपती तलावावर पोंचायचा. त्याची रीतसर पूजा वगैरे होऊन विसर्जन व्हायचे. मग एकेक करीत सगळ्या गणपतींचे विसर्जन होत, शेवटच्या गणपतीचे विसर्जन व्हायला सकाळचे 3 ते 4 वाजायचे.
मेळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, व्याखानमाला
हिंगोलीनंतर आमची बदली सिल्लोड येथे झाली होती. सिल्लोड हे हिंगोली पेक्षा छोटे गाव होते. मी तोपर्यन्त थोडा मोठा झालो होतो, आणि आठव्या वर्गात गेलो होतो. मला हिंगोलीच्या गणेश उत्सवाचा अनुभव होता. गल्लीतल्या मुलांपुढे त्यामुळे माझी थोडी ‘वट’ होती. मग मी पुढाकार घेऊन आमच्या गल्लीत एक ‘बाल गणेश मंडळ’ सुरू केले. आम्ही राहत असलेल्या वाड्याच्या शेजारी नीलकंठ नावाच्या वकिलांचा मोठा वाडा होता. त्यावरील ओसरी त्यांनी आम्हाला मंडळाचा गणपती बसवायला दिली. आम्ही तिथे छोटेखानी गणपती बसवला.

सिल्लोड हे औरंगाबाद तालुक्यातील गाव, संगीत मेळयांसाठी खूप प्रसिद्ध होते. सिल्लोडला देखावे वगैरे करायची प्रथा नव्हती. पण मेळे मात्र खूप व्हायचे. कोणी तरी हौशी, संगीताचा जाणकार असलेला माणूस पुढाकार घेऊन मेळा सुरू करी. मग आजूबाजूच्या बऱ्यापैकी आवाज असणाऱ्या आणि बऱ्यापैकी दिसणाऱ्या मुलांना आणि काही प्रमाणात मुलींनासुद्धा, तो आपल्या मेळयात, त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने सामील करून घेई. मेळयाला छानदार नांव दिले जाई. तबला पेटी वगैरेची जुळवाजुळव केली जाई. आणि महिना महिना आधी त्या मुलांची गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली जाई. काही काही मेळे अनेक वर्षांपासून सुरू होते आणि खूप प्रसिद्ध होते. बहुतेक मेळयांना आपला ड्रेस कोड असे. पण सिल्लोड येथील ‘बापू टेलर’ चा मेळा मात्र खूप प्रसिद्ध होता. त्यांनी युनिफॉर्म ठेवला नव्हता, तर ते त्यांच्या कलाकारांना त्या त्या गाण्याला अनुरूप असा वेष करवीत. जसे की भाजीवाली म्हटले तर नऊवारी साडी, डोक्यावर टोपले, इत्यादि. त्यांच्या या वेगळेपणामुळे तो मेळा खूप तूफान चाले. लांबून लांबून त्यांना बोलावणी येत. औरंगाबादला सुद्धा ते जात. तो आमच्या गावचा मेळा म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटे. सिल्लोड येथील एस टी महामंडळाचा गणपती पण खूप मोठा आणि प्रसिद्ध होता. त्यांची वर्गणीही खूप जमायची. त्यामुळे ते पण मोठे मोठे कार्यक्रम ठेवायचे.
आणखी एक आठवणारी अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे गणपतीच्या काळात बरीच गणपती मंडळे, चांगल्या चांगल्या वक्त्यांची, विद्वानांची अभ्यासपूर्ण व्याख्याने असलेल्या व्याख्यान मालिका ठेवत. त्याला खूप गर्दी होत असे. मला आठवते मी प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत कुंभोजकर यांचे शिवरायांवरील व्याख्यान सिल्लोड येथेच ऐकले होते. त्याकाळी गणपती उत्सवाला दिलेली वर्गणी सार्थकी लागल्यासारखी वाटायची.
एखादे वर्षी औरंगाबादला जाण्याचा योग येई. औरंगाबादला मेळे आणि देखावे दोन्ही असत. आणि प्रचंड गर्दी असे. पण त्याकाळी खूप मोठ्या मोठ्या एकापेक्षा एक प्रचंड गणपतींची फॅशन निघाली नव्हती. आणि सगळे काही मर्यादा सांभाळून होत असल्याने त्या काळचे गणपती उत्सव म्हणजे एक आनंद पर्वणी होती हे निःसंशय.
नंतर हळू हळू व्हीडीओ कॅसेटचा जमाना सुरू झाला, आणि गणेश मंडळें 16 एमएम चा पडदा आणून त्यावर पिक्चर ची कॅसेट लावण्यात धन्यता मानू लागली.
आजची परिस्थिती-गेले ते दिवस!
आणखी काही वर्षांनी गणेश उत्सवाचा ताबा ‘समाजसेवक’ मंडळींनी घेतला. हळू हळू त्यात राजकारणी लोकांचा शिरकाव झाला, हे आपण डोळ्यासमोर पाहतोच आहोत. आजकाल गणेशोत्सव जवळ आलाय हे आता रस्त्यारस्त्यावर आणि कोपऱ्या कोपऱ्यावर उभारल्या जाणारे प्रचंड स्टेजेस आणि सेट अप, तिथे व्यावसायिक कामगारांकडून चालू असणारी ठोकाठोकी, काही ठिकाणी मंडप उभारण्यासाठी चांगल्या डांबरी रस्त्यांवर केलेले मोठे मोठे खड्डे, डीजे चे प्रचंड मोठे बॉक्स इत्यादि गोष्टी दिसायला लागल्यावर समजते. आजकाल लोकांचा देवावरचा भक्तिभाव खूप वाढला आहे हे पाहून भरून येते!!

असो. यावर्षी श्री गजाननाच्या कृपेने पाऊस खूप छान झाला आहे. धरणेंही सगळी भरली आहेत, आणि आनंदी आनंद आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूयात. या वर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!
माधव भोपे
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.