लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 13)
लोकपाल मॅडमनी दिलेला तो प्रतिकूल निकाल ऐकल्यापासून माझ्या हातपायातील त्राणच जणू नाहीसं झालं होतं. निकालाचा लिफाफा यंत्रवत हातात धरून मी तसाच रिसेप्शन काउंटर जवळ निर्जीवपणे उभा होतो. स्नेहलता मॅडमनी आधी दुरून, हातानेच खुणावून “काय झालं ?” असं विचारलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना निकालाचा अंदाज आला असावा. बहुदा म्हणूनच आपुलकीने, सहानुभूती व्यक्त करून माझं सांत्वन करण्यासाठीच त्या मला त्यांच्याजवळ बोलावीत होत्या.
मी तसाच खिन्न, सुन्न, बधिर होऊन उभा असतांनाच लोपामुद्रा सेनगुप्ता मॅडम त्यांच्या चेंबर मधून बाहेर आल्या. स्नेहलता मॅडम जवळ जाऊन त्या म्हणाल्या..
“स्नेहा, खूप खुश आहे मी आज..! एकतर, न्यायासाठी झगडणाऱ्या एका सामान्य, गरीब कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देऊन त्यांच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळवले.. आणि दुसरं म्हणजे माझी ही शेवटची केस खूपच लवकर, अगदी एकाच हिअरिंग मध्ये निकाली निघाली. त्यातही, मनासारखा निर्णय देता आल्यामुळे खूप आनंद आणि समाधान सुद्धा प्राप्त झालंय आज मला..”
सेनगुप्ता मॅडम अस्खलित मराठी भाषेत बोलत होत्या. मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना छान मराठी बोलता येतं, हे स्नेहलता मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं. उत्साहाच्या भरात लोकपाल मॅडम आपलं पद विसरून मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारीत होत्या..
“अगं, मी त्या बँक मॅनेजरला असं काही खडसावलं की बिचारा काही न बोलता गप्पच बसला. आणि मग मी चट्कन निकाल देऊन टाकला. बरं ते जाऊ दे.. ! मी आता रिक्रिएशन रूम मध्ये जाऊन जरा आराम करणार आहे. मला जरा शांतता हवी आहे. थोडा वेळ मला कुणीही डिस्टर्ब करू नका.. मग.., दुपारी चार वाजता तुमचं ते फेअरवेल फंक्शनही आहे.. हो ना ? काय..! देणार आहात ना सेंड ऑफ मला ?”
एवढं बोलून लोपामुद्रा मॅडम रिक्रिएशन रूम कडे जाण्यासाठी वळल्या तोच त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्याबद्दल त्यांनी काढलेले हेटाळणीचे अनुदार बोल मी नक्कीच ऐकले असावेत याची जाणीव झाल्याने क्षणभर त्या ओशाळल्या. पण मग लगेच स्वतःला सावरून घेत, चेहऱ्यावर कठोर भाव आणीत रिसेप्शनिस्ट मॅडमला त्या म्हणाल्या..
“साधना sss ! ज्यांचं काम झालं असेल त्यांना इथून जायला सांग. कामाशिवाय कुणीही इथे बसता कामा नये..”
लोकपाल मॅडमची ही सूचना माझ्यासाठीच होती हे न समजण्या इतका मी खुळा नव्हतो. त्यामुळेच आता स्नेहलता मॅडम कडे जावं की न जावं या संभ्रमात असतानाच जागीच उभं राहून आग्रही स्वरात सुपरिन्टेंडेंट मॅडम म्हणाल्या..
“अहो, या नं तुम्ही..! मला बोलायचंय तुमच्याशी..”
निमूटपणे मी स्नेहलता मॅडमच्या टेबला समोरील खुर्चीत जाऊन बसलो.
“बघू, काय निकाल दिलाय लोकपाल मॅडमनी..?”
माझ्या हातातील लिफाफ्याकडे पहात त्या म्हणाल्या. मी चुपचाप तो लिफाफा त्यांच्या पुढ्यात ठेवला. लिफाफ्यातील निकालाचा कागद बाहेर काढून त्यांनी तो लक्षपूर्वक वाचला. मग माझ्याकडे रोखून पहात त्या म्हणाल्या..
“हं..! मग आता पुढे काय करायचं ठरवलंत..?”
“मी याबद्दल काहीच विचार केलेला नाही. खरं म्हणजे खूप तयारी करून आलो होतो मी. माझ्याजवळची कागदपत्रं आणि तर्कसंगत युक्तिवाद यांच्या जोरावर मी लोकयुक्तांना सत्य परिस्थिती समजावू शकेन, फिर्यादीचा खरा चेहरा त्यांच्यापुढे उघड करू शकेन असा पूर्ण आत्मविश्वास होता मला.. ! पण.. मॅडम काही ऐकून घ्यायच्या मूड मध्येच नव्हत्या. त्यामुळे नाईलाजानं मी गप्प बसलो..”
“ओके, ओके.., होतं असं कधी कधी.. !” स्नेहलता मॅडम मला धीर देत म्हणाल्या..
“मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं ना की दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी आलीय मॅडम पुढे म्हणून.. ! बरं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंत तुम्ही..? आता पुढे काय करणार आहात ?”
या मॅडम मला वारंवार हा एकच प्रश्न का विचारत आहेत हेच मला कळत नव्हतं.
“मॅडम, हे सगळं एवढं तडकाफडकी झालंय की मला काहीच सुचत नाहीय. आता, ह्या निकालाबद्दल वरिष्ठांना कळवायचं आणि पुढे ते सांगतील तसं करायचं बहुदा एवढंच आहे माझ्या हातात..”
हताश स्वरात मी उत्तरलो..
“मॅडम, अपील करता येतं का हो या निकालाविरुद्ध ?”
खोल गेलेल्या स्वरात, उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं..
“अर्थातच ! रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे 30 दिवसांच्या आत तुम्ही या निकालाविरुद्ध अपील करू शकता. पण त्यासाठी तुमच्या बँकेच्या CMD, ED किंवा CEO यांची आधी मंजुरी घ्यावी लागते. डेप्यु. गव्हर्नर एकतर निकाल तसाच कायम ठेवतात किंवा निकाल रद्द करतात अथवा पुन्हा बँकिंग लोकपालाकडे केस फेरविचारासाठी पाठवतात..”
एवढं सांगितल्यावर स्नेहलता मॅडम म्हणाल्या..
“पण.. मी विचारतेय की तुम्ही आज, आत्ता.. या क्षणी काही प्रयत्न करणार आहात की नाही हा निकाल रोखण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी ? अजूनही तुम्ही लोकपाल मॅडमला भेटून त्यांना आपली बाजू पटवून देऊ शकता. हवं तर मी तुम्हाला या कामी मदत करू शकते. तुम्ही प्रयत्न तर करा.. “
स्नेहलता मॅडमच्या शब्दांतून त्यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी, कळकळ जाणवत होती..
“तुमच्या मॅडमनी तर क्विक जजमेंट देऊन केसच गुंडाळून टाकलीय.. तो सुखदेव तर निकाल घेऊन एव्हाना वैजापूरच्या रस्त्यालाही लागला असेल. आणि.. मला नाही वाटत, तुमची मैत्रीण आता माझी बाजू ऐकून घ्यायला तयार होईल.. छे छे.. अशक्यच आहे ते..! जाऊ द्या मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल जी आपुलकी व सदभावना दाखवलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. येतो मी.. !”
एवढं बोलून उदास मनाने, दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि खुर्चीवरून उठून परत जाण्यासाठी निघालो. अचानक स्नेहलता मॅडमनी ताडकन खुर्चीवरून उठून माझा हात धरला आणि म्हणाल्या..
“कम ऑन.. चिअर अप ! मी मॅडमची आणि तुमची भेट घालून देते. तुम्ही मला जशी तुमची केस नीट समजावून दिली होतीत अगदी तशीच ती मॅडमलाही समजावून सांगा. माझी खात्री आहे, काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. तुम्ही प्लिज इथेच थांबा.. मी आलेच..!”
असं बोलून माझ्याकडे पहात पहातच स्नेहलता मॅडम रिक्रिएशन रूम मध्ये गेल्या. अवघ्या दोनच मिनिटांत आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने त्या बाहेर आल्या.
“जा..! लोपा.. आय मीन, माझी जवळची मैत्रीण आणि तुमची लोकपाल मॅडम.. ती तयार झालीय.. आय मिन, तयार झाल्यात त्या.. तुमची वस्तुस्थिती जाणून घ्यायला.. जा लवकर..! न घाबरता, शांतपणे बोला त्यांच्याशी.. रिमेम्बर, शी इज व्हेरी हेल्पफुल, कोऑपरेटिव्ह अँड काईंड हार्टेड वूमन.. ऑल द बेस्ट.. !!”
जीव मुठीत धरून भीतभीतच मी रिक्रिएशन रूम मध्ये प्रवेश केला. सेनगुप्ता मॅडम तेथील एका झुलत्या आराम खुर्चीवर बसल्या होत्या. मला पाहून त्यांनी हलकंसं स्मित केलं. त्यांना नमस्कार करून बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्यांनी हातानेच मला थांबायची खूण केली आणि म्हणाल्या..
“माझ्या मैत्रिणीशी बोलतांना मघाशी उत्साहाच्या भरात तुमच्याबद्दल जे अपरिपक्व, अनुचित शब्द माझ्याकडून उच्चारले गेले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते. खरं म्हणजे मलाच ही केस लवकर संपवायची घाई झाली होती. चुकलंच माझं..!”
अत्यंत विनम्रतेने आणि मनापासून उच्चारलेले मॅडमचे ते शब्द ऐकून माझ्या छातीवरचं दडपण एकदम कमी झालं आणि त्यांच्याबद्दलचा मनातील आदरही दुणावला.
“मी समजू शकतो मॅडम..! एकतर आज तुमचा ऑफिसातील शेवटचा दिवस असल्याने लवकर सर्व कामं आटपायची घाई आणि त्यातून माझी केस सुद्धा तांत्रिक व कायदेशीर दृष्ट्या खूपच कमजोर होती..”
माझ्या या बोलण्यावर पुन्हा स्वच्छ, निर्मळ, मनमोकळं स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या..
“बसा निवांतपणे.. आणि सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते..!”
सुखदेवने त्याच्या बायकोचं बँकेत खातं उघडलं त्या दिवसापासूनचा घटनाक्रम सांगायला मी सुरुवात केली. बँकेचा अस्थायी कर्मचारी रुपेशच्या सहभागामुळे आमची केस कशी कमजोर बनली, पैसे नेणाऱ्या व्यक्तीचा फोटो व घटनेच्या दिवसभराचं CCTV फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची तपासकामातील हेतुपुरस्सर दिरंगाई, सुखदेवच्या धमक्या, पेपरबाजी, पैशाच्या मागण्या, त्याने बँकेच्या स्टाफविरुद्ध केलेली खोटी पोलीस केस, रुपेशची अटक व त्याचा अर्धवट कबुलीजबाब.. हे सर्व माझ्या तोंडून ऐकत असतांना क्षणोक्षणी मॅडमच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. माझं बोलणं संपलं तेंव्हा त्या उठून माझ्याजवळ आल्या. माझ्या पाठीवर कौतुकमिश्रित सहानुभूतीने हलकंसं थोपटून त्या म्हणाल्या..
“आय ॲम रिअली व्हेरी सॉरी..! खरंच घाईघाईत खूप मोठी चूक घडली माझ्या हातून.. ! पण.. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे व मुद्दे पाहता माझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याने देखील हाच किंवा असाच निकाल दिला असता. किंवा फार फार तर निकाल थोडा लांबवला असता..”
त्यावर मी म्हणालो..
“नाही मॅडम, तसाही हा निकाल लांबवून फारसा उपयोग झाला नसता.. कारण कन्झ्युमर कोर्टाने ग्राहकाला एका महिन्याच्या आत न्याय देण्याची म्हणजेच नुकसान भरपाई देण्याची बँकेला तंबी दिली आहे..”
माझ्या तोंडून कन्झ्युमर कोर्टाचा उल्लेख ऐकताच सेनगुप्ता मॅडमचे डोळे आनंदानं चकाकले..
“काय म्हणालात..? कन्झ्युमर कोर्ट ? म्हणजे हे प्रकरण तिथेही नेलंय का या गृहस्थाने..?”
“होय मॅडम ! पोलिस केस, फौजदारी न्यायालय, ग्राहक मंच, अँटी करप्शन ब्युरो, केंद्र व राज्य सरकारचे विविध ग्रीव्हन्स सेल, बँकेच्या हेड ऑफिस मधील फ्रॉड व तक्रार विभाग.. अशा अनेक मंचांकडे या सुखदेवने बँकेविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत..”
हे ऐकतांच मॅडम आनंदाने जवळजवळ ओरडल्याच..
“बस..बस..! झालं तुमचं काम..! जर ही केस आधीच ग्राहक मंचात सुरू असेल तर आज झालेली येथील संपूर्ण सुनावणीच Null & Void म्हणजेच व्यर्थ आहे. ताबडतोब मला हा निकाल बदलायला हवा.. तुम्ही इथेच थांबा.. आणि Revised निकाल घेऊन जा..!”
स्नेहलता मॅडमला सांगून त्यांनी ताबडतोब पीए ला बोलावून घेतलं आणि त्याला Revised Verdict डिक्टेट करायला सुरुवात केली. पीए ने सुधारित निकाल त्वरित टाईप करून मॅडमपुढे ठेवला. त्यावर सही करून मॅडमनी स्वतः तो निकाल माझ्या हातात दिला.
याच दरम्यान स्नेहलता मॅडमनी कार्यालयाच्या साऱ्याच मजल्यावरील सिक्युरिटी गार्ड व शिपायांना बोलावून सुखदेवला शोधून आणण्यासाठी त्यांना खाली रस्त्यावर पिटाळलं होतं. सुदैवाने सुखदेव RBI बिल्डिंग जवळच्या हॉटेलमध्येच कुटुंब व वकील मित्रांसह शांतपणे जेवण करीत बसला होता. लोकपाल मॅडमनी बोलावलंय म्हटल्यावर तो कुटुंबमित्रांसह धावतपळतंच लोकपाल कक्षात आला. धापा टाकीतच तो म्हणाला..
“मॅडम, जेवण झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांसाठी पेढे घेऊन येणारच होतो मी.. पण तेवढ्यात तुम्ही अर्जंट बोलावल्याचा निरोप मिळाला म्हणून मुलाला पेढे आणण्यासाठी पाठवलं आणि मी लगबगीनं इकडे आलो.. असं काय अर्जंट काम होतं मॅडम ?”
सुखदेवकडे रोखून पहात लोकपाल मॅडम म्हणाल्या..
“असं आहे की, तुमच्या केसच्या निकालात किंचित दुरुस्ती करून आता पहिल्यापेक्षा अधिक योग्य असा निकाल देण्यात आला आहे..”
सुखदेवकडून पूर्वी दिलेला निकाल आधी परत घेऊन लोकपाल मॅडमनी त्याच्या हातात नवीन निकालाचा लिफाफा ठेवला.
पूर्वीसारखाच लिफाफा उघडून सुखदेवनं अधाशा सारखा तो निकाल भराभरा वाचला.
“हे प्रकरण कन्झ्युमर कोर्टात आधीच न्यायप्रविष्ट असल्याने नियमानुसार लोकपाल कार्यालयाला या तक्रारीची दखल घेता येत नाही.. याप्रकरणी आधी दिलेला निकाल रद्द करण्यात येत आहे..”
हे शब्द वाचतांच सुखदेवने अविश्वासयुक्त क्रोधाने मॅडम कडे पाहिलं..
“हा तर सरळ सरळ दगा आहे. तुम्ही असा कसा निकाल बदलू शकता ? मला हे अजिबात मान्य नाही. मला न्याय मिळेपर्यंत मी इथेच तुमच्यापुढे बसून उपोषण करीन. मला पक्की खात्री आहे की त्या मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याकडून लाच घेऊनच तुम्ही हा निकाल बदललेला आहे. पण मी असा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही..”
सुखदेवचं आरडाओरडा करून आकांडतांडव करीत गोंधळ घालणं सुरूच होतं. मला पाहिल्यावर तो आणखीनच चेकाळला असता, म्हणून हेतुपुरस्सरच त्याच्या नजरेसमोर येण्याचं आतापर्यंत मी टाळलं होतं. लोकपाल मॅडमनी कडक शब्दात ताकीद देऊनही सुखदेवचं त्यांना शिव्या-शाप देऊन थयथयाट करीत कक्षात थैमान घालणं तसंच चालू होतं.
हा प्रकार पाहून RBI कार्यालयातील तीन चार सिक्युरिटी गार्ड धावतच लोकपाल कक्षात आले आणि त्यांनी सुखदेवची गचांडी धरून त्याला कक्षा बाहेर काढलं. तरीही सुखदेवची बेताल बडबड अव्याहतपणे सुरूच होती. त्यातच बाहेर एका कोपऱ्यात बसून वाट पहात बसलेलो मी त्याच्या दृष्टीस पडलो. मग काय विचारता..!
क्रोधाने धुमसणाऱ्या सुखदेवच्या संतापाचा जणू स्फोटच झाला. त्वेषाने दातओठ खात तो म्हणाला..
“तरीच..! मला वाटलंच होतं की ही नक्कीच मॅनेजर साहेबांचीच करतूत असावी. आणि आता तुम्हाला इथे पाहून तर माझी त्याबद्दल खात्रीच झाली आहे.. साहेब, तुम्ही मॅडमला लाच देऊन न्याय विकत घेतला आहे.. पण मी तुम्हाला असा सोडणार नाही.. तुम्ही आणि ती आत बसलेली भ्रष्ट, पक्षपाती लोकपाल मॅडम, या दोघांनाही मी जबरदस्त धडा शिकविन.. त्या मॅडमची तर थेट RBI गव्हर्नर कडेच तक्रार करीन. शिवाय त्यांना कोर्टात खेचेन ते वेगळंच..”
सुखदेवनं माजवलेला हा तमाशा पाहून त्याचं मानगूट धरलेला सिक्युरिटी गार्ड म्हणाला..
“हे पहा, लोकपाल कक्षात गोंधळ घालणं आणि मॅडम बद्दल अपशब्द उच्चारणं हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला जर इथल्या मार्शलच्या ताब्यात दिलं तर तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल. तेंव्हा मुकाट्याने इथून ताबडतोब निघून जा..”
सुखदेवच्या सोबत आलेल्या वकिलांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि सुखदेवला शांत करून कशीबशी त्याची समजूत घालत त्याला लोकपाल कार्यालया बाहेर नेलं. आदळआपट करून शिव्याशाप देत, पाय आपटीत सुखदेव तिथून निघून गेला.
मला तर अजूनही आज दुपारनंतरचा सारा घटनाक्रम स्वप्नवतच वाटत होता. इतक्या लवकर असं निकालाचं पारडं माझ्याकडे झुकेल याची कल्पनाही मी केली नव्हती. स्नेहलता मॅडम आणि सेनगुप्ता मॅडमचे आभार मानून त्यांचा निरोप घेतांना माझे डोळे नकळत भरून आले. त्या दोघीही खूप भारावून गेलेल्या दिसत होत्या.
परतीची बस रात्री साडे दहाची होती. रात्रीचं जेवण झाल्यावर सरळ गेट वे ऑफ इंडिया वर गेलो. खूप वर्षांपूर्वी जेंव्हा जेंव्हा परीक्षा, इंटरव्ह्यू व अन्य निमित्ताने मुंबईला येणं व्हायचं तेंव्हा रात्रीच्या वेळी ताजमहाल हॉटेल समोरील समुद्राच्या तटरक्षक भिंतीवर बसून लाटांचं संगीत ऐकत बसायचो. आज ही तसाच समुद्राच्या सान्निध्यात बसलो होतो. वाटलं की, सागरातील भरती ओहोटीच्या लाटां प्रमाणेच जीवनातही आशा निराशेच्या लाटांचा खेळ असाच निरंतर सुरू असतो. आजच्या अकल्पित यशाबद्दल ईश्वराचे मनोमन आभार मानले.
एक छोटीशी लढाई संपली होती. भविष्यात अजून अशा अनेक लढाया आम्हाला जिंकायच्या होत्या.
(क्रमशः)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.




