लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 15)
विवादित चेकवरील सही बनावट असल्या बद्दलचा CFSL संस्थेचा अहवाल मी क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिला तसेच ॲड. ऋतुराज यांनाही त्याची माहिती दिली. ते म्हणाले..
“या बद्दल सध्या कुठेही वाच्यता करू नका.. हा बँकेचा अंतर्गत चौकशी संबंधी अहवाल आहे आणि बँकेलाच तिच्या नियमावली व कार्यपद्धती नुसार त्यावर यथावकाश निर्णय घेऊ द्यात. चुकून जर सुखदेवला या अहवाला बद्दल समजलं तर तो क्षणभरही थांबायला तयार होणार नाही आणि पुन्हा पेपरबाजी वगैरे करून बँकेवर दडपण आणून बँकेला तडकाफडकी नुकसान भरपाई देण्यास भाग पाडेल.”
सुदैवाने ग्राहक मंचाची पुढची तारीख दोन महिने नंतरची होती. पोलिसांनी पुण्यास पाठविलेल्या चेक वरील सहीचा हस्ताक्षर तपासणी अहवाल जर त्यांना या दरम्यान प्राप्त झाला असता तर मात्र सुखदेव पासून ही बातमी जास्त काळ लपून राहिली नसती. त्यामुळे हाती पडलेल्या हस्ताक्षर तपासणी अहवालावर बँकेने शीघ्रतेने निर्णय घ्यावा अशी मी क्षेत्रीय कार्यालयाला विनंती केली.
याच दरम्यान दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वैजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख इन्स्पेक्टर माळी यांची बदली पैठण इथे झाली. तसेच सब. इंस्पे. हिवाळे यांची देखील स्थानिक गुन्हे शाखा (LCB) औरंगाबाद इथे बदली झाली. या दोन्ही बदल्या Complaint Basis वरच झाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे रविशंकरची बदली बीड जिल्ह्यातील “मादळमोही” इथे झाली होती. त्या आडमार्गावरील गावातून आईच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी मुंबईला जाणे अवघड असल्यामुळे ही बदली रद्द करून महामार्गा जवळील ठिकाणी व्हावी यासाठी त्याची धडपड सुरू झाली.
वैजापूर पोलीस ठाण्याचे नवीन फौजदार जगन राठोड हे एक अत्यंत उग्र, रासवट आणि उर्मट असं व्यक्तिमत्व होतं. आल्या आल्या त्यांनी सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाया करून सामान्य नागरिक व गुंड या दोघांवरही ही भीतीयुक्त जरब बसवून एक प्रकारची दहशतच निर्माण केली होती. रस्त्यावर बाचाबाची, किरकोळ भांडणे करणारे नागरिक, जादा पॅसेंजर बसवणारे रिक्षा चालक, मटका खेळणारे जुगारी तसेच नशेत तर्र असणारे दारुडे यांना निर्दयीपणे भर रस्त्यात अमानुष मारहाण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.
बरेच दिवसांत सुखदेव बँकेकडे फिरकला नव्हता. मुंबईत लोकपाल कार्यालयात झालेली मानहानी व अपमान तो अद्याप विसरलेला नव्हता. “पैसे देऊन न्याय विकत घेऊन ज्याप्रमाणे मला रिझर्व्ह बँकेच्या शिपायांच्या हातून बखोटं धरून बाहेर काढलं होतं, अगदी त्याचप्रमाणे.. वाट्टेल तितका खर्च करीन पण एकदा तरी ह्या साहेबांची वैजापुरातून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही..” अशा वल्गना करीत संतापाने धुमसत तो बँकेसमोरून चकरा मारीत असतो असे कस्टमर्स कडून समजत असे.
अशातच एके दिवशी राजू चहावाला घाईघाईने बँकेत शिरला. माझ्या केबिनपाशी येताच दारातच थबकून तो उभा राहिला. काकुळत्या नजरेने माझ्याकडे पहात तो म्हणाला..
“आत येण्याची मला मनाई केली आहे तुम्ही.. ठाऊक आहे मला..! पण राहवलं नाही, जीवाला चैनच पडेना म्हणून आलो साहेब तुमच्याकडे.. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा.. फक्त पाचच मिनिटं माझं बोलणं ऐकून घ्या..”
त्याच्या डोळ्यातील करुण भाव आणि अजिजीचा स्वर यामुळे मी विरघळलो.. हातानेच त्याला आत येण्याची खूण केली. तो आत येऊन बोलणं सुरू करणार, एवढ्यात त्याला थांबवून मी म्हणालो..
“पण हे बघ.. ! पोलीस स्टेशनची कोणतीही बातमी किंवा निरोप तू मला सांगायचा नाहीस..”
यावर काही न बोलता माझ्याकडे पहात दोन क्षण तो तसाच गप्प उभा राहिला. मग खाली मान घालून म्हणाला..
“आता साहेब.. दिवसभर मी पोलीस स्टेशन मधेच असतो, तेंव्हा बातमीही तिथलीच असणार.. पण मी फक्त तुम्हाला सावध करायला आलोय.. मी तिथे जे ऐकलं, जे पाहिलं तेच मी तुम्हाला सांगतोय.. तुम्ही नीट ऐकून घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा..”
“ठीक आहे.. सांग पटकन..!”
त्याला लवकर कटवण्यासाठी मी म्हणालो.
“तो सुखदेव गेले चार दिवस रोज ठाण्यात येतोय. बँकेच्या स्टाफला काहीही करून त्रास देऊन परेशान करा अशी नवीन फौजदार साहेबांना तो सतत विनंती करतोय. त्यांना गळंच घालतोय म्हणा ना ? फौजदार साहेब आधी त्याचं काही ऐकायलाच तयार नव्हते. पण ते खूप लोभी असल्यामुळे सुखदेवने जेंव्हा त्यांना पैशांची लालूच दाखवली तेंव्हा कुठे ते तयार झाले. एक दोन दिवसांत साऱ्या आरोपींना ठाण्यात बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतो असा त्यांनी शब्द दिलाय त्या सुखदेवला..”
इतकं बोलून क्षणभर थांबून राजू पुढे म्हणाला..
“साहेब, हे नवीन फौजदार खूप लालची आहेत. मारहाण करून दहशत पसरवून सर्वच अवैध धंदेवाल्यांचे हप्ते त्यांनी भरपूर वाढवून घेतले आहेत. शिवाय हप्ते घेऊनही वर पुन्हा कोणत्या धंदेवाल्यावर कधी धाड टाकतील याचाही काही नेम नाही. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा हा माणूस आहे. त्यामुळे त्याच्यापासून खूप सावध राहा.. बस ! एवढंच सांगायला आलो होतो मी..”
एवढं बोलून मागे वळून कुठेही न बघता वाऱ्याच्या वेगाने राजू निघून गेला.
पोलिसांनी केसचा तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) सुद्धा दाखल केलं असल्यामुळे त्यांचा आता आमच्या केसशी काहीही संबंध उरला नसल्याची वस्तुस्थिती मला माहित होती. शिवाय आम्ही पाचही जणांनी तसा अटकपूर्व जामीनही मिळवलाच होता. भित्र्या स्वभावाच्या राजूला असं इतरांना घाबरवून टाकण्याची सवयच आहे असं समजून मी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केलं. अशातच दोन चार दिवस निघून गेले आणि मी ही गोष्ट पार विसरून गेलो.
त्या दिवशी शनिवार होता. अर्धा दिवसच बँक असल्याने सर्वांना लवकर काम आटोपून घरी जाण्याची गडबड होती. चार साडेचार वाजेपर्यंत आपापलं काम संपवून अर्धा अधिक स्टाफ बँके बाहेरही पडला होता. येवल्याहून जाणं येणं करणारे रहीम चाचा घराकडे निघण्यापूर्वी मला “गुड बाय” करण्यासाठी केबिनमध्ये आले असतांनाच एक महिला पोलीस अधिकारी “आत येऊ का सर ?” असं अदबीने विचारून आत शिरली.
“मी, सब. इंस्पे. वर्षा महाले..! हिवाळे साहेबांच्या जागेवर आले आहे. एका अर्जंट कामाच्या संदर्भात फौजदार राठोड साहेबांनी चेक फ्रॉड केसच्या पाचही आरोपींना ताबडतोब ठाण्यात बोलावले असून तुम्हाला सोबत घेऊन येण्यासाठी मला इथे पाठविले आहे. तेंव्हा तुम्ही तुमची सर्व जण आपापली कामं लवकर आटोपून घ्या, आणि माझ्या सोबत चला. पाहिजे तर तोवर थांबते मी इथेच..”
आम्हाला ठाण्यात नेण्यासाठी नवीन लेडी सब. इंस्पे. स्वतःच बँकेत आल्यामुळे आता अन्य काही उपायच उरला नव्हता. “मुळीच घाबरू नका. पाहू या तरी हे नवीन आलेले फौजदार साहेब काय म्हणतात ते..” असा धीर देत सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी ठाण्यात गेलो.
आम्ही ठाणे प्रमुखांच्या दालनात शिरताच आम्हाला आपाद मस्तक न्याहाळीत आणि आपल्या टोकदार मिशांवर हात फिरवीत ते जगन राठोड नावाचे दणकट शरीरयष्टी, दमदार आवाज व रापलेला राकट चेहरा असलेले फौजदार म्हणाले..
“या ssss ! कैद्यांची हजेरी घेतोय सध्या मी.. तोपर्यंत तुम्ही या भिंतीला टेकून निमूटपणे एका रांगेत उभे रहा.. तुमच्याकडे मग नीट फुरसतीने बघतोच..!”
आम्हाला असं कोपऱ्यात उभं रहायला सांगून त्यांनी एकेका कैद्याला बोलावणं सुरू केलं. भीतीने गर्भगळीत झालेल्या एका मध्यम वयाच्या फाटक्या इसमाला धरून आणून त्याला फौजदार साहेबांच्या पुढ्यात उभं करीत तेथील हवालदार म्हणाले..
“साहेब, हा बद्रुद्दीन.. चार फटके खाल्ल्यावर, आतापर्यंत गावातून तीन सायकली चोरल्याचं कबूल केलंय ह्याने..”
“ठीक आहे, उद्या कोर्टात हजर करा ह्याला.. चल..! हात पुढे कर ..!”
फौजदार साहेबांनी असं दरडावताच त्या फाटक्या इसमाने थरथरतच आपला उजवा हात पुढे केला. टेबलावर ठेवलेला विशिष्ट आकाराचा, जेमतेम एक फूट लांबीचा चामड्याचा जाडजूड पट्टा हातात घेऊन फौजदार साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी सपकन तो त्याच्या तळहातावर मारला. प्रचंड वेदनेने त्या भुरट्या चोराचा चेहरा कसनुसा झाला. त्याच्या कळवळण्याकडे लक्ष न देता निष्ठुरपणे फौजदार म्हणाले..
“चल.. आता दुसरा हात पुढे कर !”
त्या चोराने घाबरून दुसरा हात पुढे करण्यास किंचित आढेवेढे घेतले तेंव्हा त्यांनी त्याच्या पायावरच त्या आखूड पट्ट्याने सपासप वार केले. शेवटी नाईलाजाने तो अघोरी मार चुकवण्यासाठी त्याने आपला दुसरा हात पुढे केला. फौजदार साहेबांनी यावेळी दात ओठ खाऊन त्या तळहातावर पट्ट्याने पहिल्यापेक्षाही जोरदार प्रहार केला. अतीव वेदनेपायी मारामुळे लालबुंद झालेला तो तळहात त्या सायकल चोराने आपल्या दोन्ही मांड्यांत घट्ट दाबून ठेवला. त्याला धक्का मारून बाजूला सारत फौजदार साहेबांनी पुढच्या कैद्यास बोलावले आणि त्यालाही तशीच अमानुष मारहाण केली. सलग अर्धा तास चाललेली ती कैद्यांची क्रूर, निर्दयी, माणुसकीशून्य मारझोड आम्ही धडधडत्या छातीने बघत होतो.
पोलीस कोठडीतील सर्व कैद्यांची ही यातना परेड आम्हाला घाबरवण्यासाठीच जाणून बुजून आमच्या समोर घेतली जात होती. तसंच आम्हाला बसायलाही न देता दीर्घकाळ तसंच उभं ठेवून आमचा हेतुपुरस्सर अपमानही केला जात होता. तरुण रविशंकर आणि सतरा वर्षे आर्मीत घालवलेला सैनी, हे दोघेही पोलिसांची ही थर्ड डिग्रीची पद्धत पाहून आतून हादरून गेले होते. हळव्या मनाचे रहीम चाचा आणि अल्लड, निरागस बेबी सुमित्रा हे दोघे तर भीतीने थरथरायलाच लागले होते. फौजदार साहेब मधूनच तिरप्या नजरेने आमच्याकडे पहात होते आणि आम्हा सर्वांचे भयचकित चेहरे पाहून हलकेच मिशीतल्या मिशीत हसत होते.
कैद्यांचे यातना सत्र संपल्यावर आमच्याकडे वळून ते म्हणाले..
“आमच्या असं कानावर आलं आहे की पोलिसांनी आमच्या कडून पैसे खाल्ले असं सांगून तुम्ही जनतेत पोलिसांची बदनामी करत आहात.. चार्जशीट दाखल झालं म्हणजे पोलिसांचा संबंध संपला, असं समजू नका. आम्ही चार्जशीट मध्ये कधीही आणि कितीही नवीन, खरी वा खोटी कलमं ॲड करू शकतो. त्याच्या तपासासाठी तुम्हाला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडीतही ठेवू शकतो. आणि.. आमचा तपास कसा असतो त्याची कल्पना यावी म्हणून आत्ताच एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला..”
हातातील लाकडी रूळ आमच्या दिशेने रोखत ते पुढे म्हणाले..
“आपण निर्दोष आहोत असं तुम्हाला कितीही वाटत असलं तरी आमच्या दृष्टीने तुम्हीच दोषी आणि आरोपी आहात. तसं नसतं तर आधीच्या फौजदार साहेबांना तुम्ही प्रत्येकी वीस वीस हजार रुपये दिलेच नसते. काय..? खरी आहे ना आमची माहिती ?”
फौजदार साहेबांनी दरडावून विचारलेल्या या प्रश्नावर रहीम चाचांनी घाबरून होकारार्थी मान डोलावली.
“आज आपली पहिलीच भेट होती म्हणून वॉर्निंग देऊन एवढ्यावरच सोडतोय. यापुढे जेंव्हा जेंव्हा पोलीस स्टेशनचं बोलावणं येईल तेंव्हा तेंव्हा वेळ न घालवता ताबडतोब इथे हजर व्हायचं. तसंच जसे पूर्वीचे फौजदार गेले तसेच त्यांना तुम्ही दिलेले पैसेही त्यांच्या बरोबरच गेले. आता तुम्हाला आम्हा नवीन आलेल्यांची सोय सुद्धा पहावी लागेल. तुम्ही तसे समजदार आहात.. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं असेलच.. जाऊ शकता तुम्ही आता.. !!”
काही न बोलता खाली मान घालून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर पडलो. आमच्या मागे लागलेली ही पोलिसांची साडेसाती काही केल्या संपत नव्हती.
फौजदार साहेबांनी केलेल्या दमदाटीमुळे धसका घेऊन हळव्या, कोवळ्या मनाची बेबी सुमित्रा आजारीच पडली. तर रहीम चाचांचा रक्तदाब वाढल्याने त्यांनाही येवल्यातील दवाखान्यात भरती करावे लागले. इथल्या रोजच्या टेन्शनला वैतागून सैनी पंधरा दिवसांची सुटी टाकून दिल्ली येथील आपल्या बायका पोरांना भेटायला निघून गेला.
पोलिसांच्या या त्रासापासून कायमची मुक्तता कशी करून घ्यावी याबद्दल अहोरात्र विचार करीत असतानाच एके दिवशी आपल्या गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी DySP संगीता मॅडम बँकेत आल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना फौजदार राठोड साहेबांनी स्टाफला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये बोलावून केलेल्या दमदाटी बद्दल सांगितलं. परिणामतः स्टाफच्या बिघडलेल्या मनःस्थिती बद्दलही त्यांना अवगत केलं. आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्याने आता थेट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) यांच्याकडेच दाद मागणार असल्याचे मी त्यांना सिरियसली सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तसेच देशाचे व राज्याचे गृहमंत्री यांच्याकडेही पोलिसांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल फिर्याद करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.
माझी ही तयारी, हा कृतनिश्चय पाहून DySP मॅडम अंतर्यामी किंचित भयभीत झाल्या. मी बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना मनोमन खात्री पटली. मी वर पर्यंत तक्रार केल्यास कदाचित चौकशीतून पोलिसांच्या आणखीही काही भानगडी बाहेर येतील याची त्यांना बहुदा भीती वाटली असावी. (खुद्द DySP मॅडमनी सुद्धा पुण्यातील दोन कोटींच्या फ्लॅटची किंमत फक्त 80 लाख रूपये इतकी दाखवून आमच्या बँकेकडून साठ लाख रुपयांचे दिखाऊ कर्ज घेतले होते..) माझी समजूत घालून मला शांत करून आश्वस्त करीत त्या म्हणाल्या..
“पोलिसांच्या या कृत्याबद्दल मी खेद व्यक्त करते. फौजदार साहेबांची त्यांच्या या कृत्याबद्दल चांगलीच कानउघाडणी करेन मी. यापुढे तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही स्टाफला पोलिसांकडून कसलाही त्रास होणार नाही असाही मी शब्द देते. तुम्ही आतापर्यंत दिलंत तसंच सहकार्य यापुढेही द्या आणि कृपा करून सध्या तरी पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार करू नका.. मी विनंती करते तुम्हाला..”
DySP मॅडमनी खरोखरीच आपला शब्द राखला. त्यानंतर कधीही पोलिसांकडून आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. उलट सुखदेवलाच पोलिसांनी अपमान करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले असेही आम्हाला खात्रीलायकरित्या समजले.
बेबी सुमित्राने, कसेही करून वैजापूरहुन बदली करून घ्यायचीच असा आता चंगच बांधला. औरंगाबाद येथील त्यांच्या संघटनेच्या लिडर्सनी देखील यासाठी अनुकूलता दर्शविल्याने ती उत्साहित होऊन कामाला लागली. Request transfer application तसेच स्थानिक नेत्यांमार्फत हैदराबाद येथील संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे यासाठी ती वारंवार औरंगाबादला जाऊ लागली.
रविशंकरची ट्रान्सफर ऑर्डर रिव्हाईज होऊन आता त्याची बदली बीड जिल्ह्यातीलच “शिरसाळा” या गावी झाली. हे गावही तसं आडमार्गालाच असलं तरी वैजापूर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने शिरसाळ्याला जाणेच इष्ट समजले. रविशंकर गेल्यानंतर लगेच पुढच्याच महिन्यात रहीम चाचांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ झाला. त्यापाठोपाठ सैनीची बदली परभणी जिल्ह्यातील आष्टी इथे झाल्यामुळे त्यालाही ताबडतोब रिलिव्ह करावे लागले. अशाप्रकारे मी व बेबी सुमित्रा असे बनावट चेकच्या केस मधील दोनच आरोपी वैजापूर शाखेत उरलो.
बेबी सुमित्रा औरंगाबाद मधील ज्या नेत्यांना भेटायला जायची त्यापैकी एका नेत्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नसे. मी बेबी सुमित्राला त्याबद्दल अनेकदा सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र, एकदा गावाकडे बदली झाली की मग या फालतू लिडर्सना भेटण्याची गरजच पडणार नाही.. असा विचार करून तिने त्या इशाऱ्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
एका शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणेच संघटनेच्या नेत्याला भेटायला औरंगाबादला गेलेली बेबी त्याच रात्री खूप उशिरा परत आली ती अत्यंत उद्विग्न, संतप्त, उध्वस्त मनःस्थितीतच.. वैजापूर शाखेतच काम करणाऱ्या शांतिप्रिया नावाच्या आपल्या बिहारी मैत्रिणी सोबतच एका खोलीत ती रहायची. शांतिप्रियाच्या म्हणण्यानुसार, औरंगाबादहुन आल्यापासून ती उशीत तोंड खुपसून सतत हमसून हमसून रडत होती. कितीही खोदून खोदून विचारलं तरीही नेमकं काय झालं आहे, ते ती कुणालाही सांगत नव्हती.
रविवार आणि सोमवार हे दोन्ही दिवस बेबी उदासपणे खोलीतच बसून होती. सोमवारी दुपारी शांतिप्रियाला सोबत घेऊन तिला भेटायला तिच्या रूमवर गेलो तेंव्हाही ती तशीच शून्यात पहात बसली होती. अल्लड, मिश्किल, चुलबुल्या खोडकर स्वभावाच्या बेबीची ती अवस्था पाहून माझ्या काळजात कालवाकालव झाली. तिला बोलतं करण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हताश होऊन मी बँकेत परतलो. माधुरी आणि मीनाक्षी या शाखेत काम करणाऱ्या अन्य दोघींना बेबीची काळजी घ्या, सतत तिच्या सोबत राहून तिला धीर द्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रभर बेबीच्या काळजीमुळे मला झोप आली नाही. सारखा तिचा तो उदास, भकास चेहरा नजरेसमोर येत होता. काय झालं असावं बेबी सोबत औरंगाबादला ? कुणी अतिप्रसंग तर केला नसेल तिच्यावर ? असे विचार सारखे डोक्यात घुमत होते.
मंगळवारी सकाळी बेबी सुमित्रा बँकेत आली तेंव्हा ती बरीच सावरलेली दिसत होती. आल्या आल्या तिने माझ्या टेबलावर आपला राजीनामा ठेवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असून पुरेशा अवधीची नोटीस न दिल्यामुळे नियमानुसार एक महिन्याचा पगार माझ्या खात्यातून कापून घ्यावा असे त्यात नमूद केले होते. आजच दुपारी मनमाडला जाऊन तेथूनच पुढे छत्तीसगडला जाणारी गाडी पकडणार असल्याचे ती म्हणाली. ठाम निश्चय करून आलेल्या बेबीने कुणाचेही काहीही ऐकून घेण्यास नम्रपणे नकार दिला. सर्वांना भेटून नमस्कार करून साधा सेंड ऑफ ही न घेता बेबी निघाली.
योगायोगाने वैजापूर शाखेची कॅश व्हॅन त्याचदिवशी दुपारी मनमाड शाखेतील अतिरिक्त कॅश आणण्यासाठी मनमाडला जाणार होती. त्याच व्हॅनमध्ये बेबीला तिच्या सामाना सहित बसवलं. शाखेतील बेबीचे दोन समवयस्क कर्मचारी मित्र देखील तिला मदत करण्यासाठी व्हॅन सोबत गेले. बेबीला हात हलवून निरोप देऊन परत शाखेत आलो तेंव्हा तिची ती रिकामी खुर्ची पाहून तिचा तो सदोदित प्रफुल्लित आनंदी चेहरा, त्या मिश्किल कॉमेंट्स, ते निरागस निर्मळ हास्य हे सारं सारं आठवलं..
भूल जा अब वो मस्त हवा,
वो उड़ना डाली डाली..
जग की आंख का कांटा बन गई,
चाल तेरी मतवाली..
तेरी किस्मत में लिखा है,
जीते जी मर जाना..
क्या जाने अब इस नगरी में,
कब हो तेरा आना..
चल उड़ जा रे पंछी,
कि अब ये देस हुआ बेगाना..
या ओळी आठवल्या आणि डोळे नकळत भरून आले..
(क्रमशः)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १४ भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.