लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
Mind blowing experiences of a Banker-16
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 16)
अविरत गतिमान काळ कधीही कुणासाठीही थांबत नसतो. जीवनाचं रहाटगाडं रडत खडत, ठेचकाळत, अवघड परिस्थितीतून मार्ग काढीत, कसंबसं मार्गक्रमण करीत पुढे पुढे जातच होतं. कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या होत्या. आम्हा सर्व पाचही आरोपींच्या नावाने समन्स जारी झालं होतं. प्रत्येक तारखेला बेबी सुमित्रा वगळता आम्ही चौघेही न चुकता कोर्टात हजर रहात होतो.
आम्ही चौघांनीही आमच्यावरील “संगनमताने सौ. रत्नमाला बोडखे यांची आर्थिक फसवणूक” केल्याचा आरोप अमान्य केल्यामुळे कोर्टाने आमच्यावर आरोप निश्चित करून सुनावणी साठी पुढील तारीख दिली. सुरवातीला दर पंधरा वीस दिवसांनी तारीख असायची. आणि आम्ही चौघेही सकाळी दहा वाजल्यापासून आमच्या केसचा पुकारा होण्याची वाट पहात कोर्टाच्या व्हरांड्यात ताटकळत बसलेलो असायचो. सुखदेव सुद्धा आपल्या कुटुंबासह त्या व्हरांड्यातच जाणून बुजून अगदी आमच्या समोरची जागा धरून बसायचा.
“आरोपी क्रमांक ए sss क ! श्री. xxxx हाजीर हो sss !” असा कोर्टातील पट्टेवाला माझ्या नावाने जेंव्हा पुकारा करायचा तेंव्हा माझ्याकडे बोट दाखवून “आरोपी.. आरोपी..” असे म्हणून डिवचत सुखदेव खदाखदा हसायचा. त्याच्या त्या कुत्सित विकट हास्यात पराकोटीचा द्वेष आणि सूडभावना भरलेली दिसायची. अत्यंत शांत, निर्विकार मुद्रेने मी सुखदेवच्या त्या बालिश वर्तनाकडे दुर्लक्ष करून मान झुकवून अदबीने न्यायमूर्तींसमोर हजर व्हायचो. आपण एवढं चिडवूनही हे साहेब अजिबात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत हे पाहून सुखदेव मनोमन अतिशय चरफडत असे.
सुखदेवच्या त्या दुष्ट वर्तनाचा कोर्टातील पट्टेवाल्या शिपायासही खूप राग येत असे. मला “आरोपी” असे म्हटल्यामुळे सुखदेवला विकृत आनंद होतो हे लक्षात आल्यावर त्या पट्टेवाल्याने मला आरोपी म्हणून माझ्या नावाचा पुकारा करणे कायमचेच सोडून दिले. उलट, आमच्या केसचा पुकारा केल्यावर मला पाहून कमरेत झुकून तो आदराने “या साहेब..” असे म्हणायचा. आणि हे पाहून तर सुखदेवचा अधिकच जळफळाट होत असे.
बेबी सुमित्राने वैजापूरला येण्यापूर्वी युनियन बँकेची प्रोबेशनरी ऑफिसर साठीची लेखी परीक्षा दिली होती. तिचा निकाल लागून बेबी त्यात उत्तीर्ण झाली आणि इंटरव्ह्यू नंतर तिला गावाच्या जवळच रायपूर येथे पोस्टिंगही मिळाली. अशारीतीनं वैजापूर सोडावं लागणं ही तिच्या दृष्टीने एकप्रकारे इष्टापत्तीच ठरली. बेबीने ताबडतोब आम्हा सर्वांना फोन करून ही गुड न्यूज कळवली.
नोकरी लागल्यानंतर आपले गाव कायमचे सोडून बेबी आपल्या आईवडिलांसह रायपूर इथे रहात होती. बेबीच्या नावावर कोर्टाने पाठविलेली सर्व समन्स योग्य पत्त्याअभावी परत येत होती. कोर्टाने तसेच पोलिसांनी देखील बेबीच्या नवीन पत्त्याची आमच्याकडे वारंवार मागणी केली. परंतु बँकेच्या रेकॉर्डवरील बेबीचा जुनाच पत्ता आम्ही त्यांना दिला आणि तिचा सध्याचा ठावठिकाणा ठाऊक नसल्याचे त्यांना कळवले. आधीच खूप काही सोसलेल्या बेबीला निदान या वैजापुरच्या कोर्ट केसच्या त्रासापासून तरी दूरच ठेवावं अशीच यामागे आमची प्रामाणिक सदिच्छा होती.
कोर्टाच्या दहा पंधरा तारखा झाल्या तरी केसच्या सुनावणीला काही सुरवात होत नव्हती. सर्व आरोपी व फिर्यादी हजर असल्याशिवाय केसची सुनावणी सुरू करता येत नाही असा कोर्टाचा नियम असल्याने बहुदा ह्या केसची सुनावणी दीर्घकाळ पर्यंत सुरूच होणार नाही अशी चिन्हे दिसत होती. एक रहीम चाचा वगळता आम्हा कुणालाही कोर्ट केस बद्दल घाई नव्हती. आज ना उद्या ग्राहक मंचा कडून आपल्याला नुकसान भरपाई मिळणारच आहे याची खात्री असल्याने सुखदेवही कोर्ट केस बाबत तसा उदासीनच होता. रुपेशला तर त्याच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल कोर्टाद्वारे शिक्षा होण्याची पुरेपूर शक्यता असल्याने तो ही कोर्टाच्या तारखांना क्वचितच हजर राहत असे.
रहीम चाचांची मानसिकता मात्र वेगळीच होती. कोर्ट केस मधून निर्दोष मुक्तता होऊन सन्मानाने नोकरीतून निवृत्त व्हावे ही त्यांची इच्छा दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नव्हती. कोर्ट केसचा निकाल काय लागेल या चिंतेने निवृत्ती नंतरही त्यांना शांत झोप लागत नसे. केस लवकर निकाली निघावी यासाठी त्यांनी स्वतःचा वेगळा वकिलही लावला होता. बेबी सुमित्राला समन्स बजावता येत नसल्याने तिला वगळून केसचे कामकाज चालवावे.. अशी त्यांनी वकीलातर्फे कोर्टाला विनंती केली. अर्थात या गोष्टीला आम्ही अन्य आरोपी व फिर्यादी यापैकी कुणाचाही आक्षेप नसल्याने बेबी सुमित्राला वगळून केसची सुनावणी करण्यास कोर्टाने मान्यता दिली.
राजू चहावाल्याने हळूहळू पुन्हा चहा घेऊन बँकेत यायला सुरुवात केली होती. साहेबांनी (म्हणजे मी) अशी काय जादू केली की जगन राठोड सारखा कर्दनकाळ ठाणेदारही त्यांच्या वाटेला जाण्यास घाबरतो आहे, याचंच त्याला कोडं पडलं होतं. हे साहेब दिसतात तेवढे साधे सरळ नाहीत, त्यांचे हात थेट वरपर्यंत पोहोचलेले आहेत असा त्याचा पक्का समज झाला आणि त्याच्या मनातील माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.
राजुने पोलिसांना जे वीस हजार रुपये माझ्या नावे परस्पर दिले होते ते त्याने वैजापुरातील एका दारू विक्रेत्या कडून उसने मागून आणले होते. मला ही गोष्ट समजताच मी ताबडतोब त्या दारू विक्रेत्याला बँकेत बोलावून त्याने दिलेले पैसे त्याला परत केले होते. कालांतराने राजूला ही गोष्ट समजली आणि हे साहेब अत्यंत निस्पृह, निरासक्त आहेत, कुणाचेही पाच पैशाचेही उपकार ते घेत नाहीत, ही गोष्ट तो कौतुकाने व अभिमानाने ज्याला त्याला सांगू लागला.
आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून जात असतांनाही कर्मचाऱ्यांची तसेच अधिकारी वर्गाची संघटना आमच्या मदतीला का धावून आली नाही ? असा प्रश्न कुणालाही पडणं हे अगदी साहजिकच आहे. एक तर आम्ही भोगत असलेल्या त्रासाची आमच्या संघटनेच्या नेत्यांना नीटशी यथार्थ कल्पनाच नव्हती. विनाकारण त्या प्रॉब्लेमॅटिक कस्टमरशी आणि पोलिसांशी पंगा घेण्यापेक्षा गुपचूप पणे त्यांच्याशी समझोता करावा, ते मागतील तेवढे पैसे त्यांच्या तोंडावर फेकावे आणि आपली कातडी वाचवावी हेच व्यावहारिक शहाणपणाचं आहे अशीच बहुतांश संघटनेच्या नेत्यांची प्रामाणिक समजूत होती. हे प्रकरण चिघळून वर्तमानपत्रांपर्यंत गेलं आणि पुढे पोलीस केस वगैरे झाली ती आम्ही कस्टमरशी तडजोड न केल्यामुळेच असंच त्यांचं मत होतं. मुळात बरीचशी चूक आमचीही होती. आम्ही आमच्या संघटनांकडे अधिकृतरित्या या प्रकरणात मदतीची याचना कधी केलीच नाही. आमचे नेते आपणहून शाखेला भेट देऊन खरीखुरी वस्तुस्थिती जाणून घेतील अशीच आमची सार्थ अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं तसं काहीच घडलं नाही.
याउलट रिजनल ऑफिस मधील आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच क्षेत्रीय प्रबंधक यांनी मात्र या प्रकरणी वारंवार शाखेत येऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली, स्टाफशी संवाद साधला, त्यांना धीर दिला तसंच तक्रारदार ग्राहकाचीही अनेकदा भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजमेंटचा आम्हाला कायमच पूर्ण सपोर्ट होता. तसंच स्टाफचा प्रामाणिकपणा व निर्दोषत्वा बद्दल देखील त्यांना पुरेपूर विश्वास व खात्री असल्यामुळे त्यांना आमच्या बद्दल सहानुभूतीही होती. दुर्दैवाने त्या काळात एक अत्यंत अनुचित घटना घडली, जिचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही.
आम्हाला अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी ॲड. जोगळेकर साहेबांनी आमच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार रुपये फी घेतली होती. त्यावेळी, म्हणजे आमच्या फरारी असण्याच्या काळात आमची राहण्याची (पोलिसांपासून लपण्याची) व्यवस्था रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्येच केली असल्याने रोजच संध्याकाळी आम्ही AGM व DGM साहेबांना भेटायला जात असू. या प्रकरणी स्टाफला करावा लागणारा सर्व प्रकारचा खर्च, वकिलांची फी इत्यादीची प्रतिपूर्ती (Reimbursement) बँकेने केली पाहिजे असेच AGM व DGM साहेबांचे मत होते. परंतु काही विघ्नसंतोषी झारीतील शुक्राचार्यांनी याला विरोध केला. ही केस बँकेविरुद्ध नाही तर वैयक्तिक स्टाफ विरुद्ध असल्याने त्यांना प्रतिपूर्ती (Reimb.) देता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आश्चर्य म्हणजे कर्मचारी व अधिकारी या दोन्ही संघटनांच्या काही दुय्यम नेत्यांचाही या शुक्राचार्यांना पाठिंबा होता. बँकेचे दैनंदिन कामकाज पार पाडताना (Routine course) उद्भवलेली ही घटना होती ही साधी गोष्ट देखील त्यांनी ध्यानात घेतली नाही. असो..!
आम्ही त्यावेळी आमच्याच परेशानीत होतो. पैसा आमच्या दृष्टीने अजिबात महत्वाचा नव्हता. तसाही तो खर्च झालाच होता आणि पुढे आणखीही खर्च होणारच होता. लवकरच संघटनेच्या नेत्यांच्या आमच्या प्रती उदासीन वागणुकीची (apathy) ही बाब आम्ही पार विसरूनही गेलो. रविशंकर आणि बेबी सुमित्रा हे दोघेजण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असल्याने त्यांचा बँकेच्या हेड ऑफीसमधील त्यांच्या संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी केस संदर्भात नेहमीच वार्तालाप होत असे. अशाच एका फोनवरील संवादात त्यांनी बँक वकिलाची फी reimburse करीत नसल्याची बाब त्यांच्या संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या कानावर घातली.
योगायोगाने पी. उग्रसिंह नावाचे ते हेड ऑफिस मधील संघटनेचे झुंजार नेते त्यावेळी बँकेचे वर्कमन डायरेक्टर सुद्धा होते. त्यांनी ताबडतोब औरंगाबादच्या DGM साहेबांना फोन लावून त्यांना अत्यंत कठोर शब्दांत खूप काही सुनावलं.
हा फोन सुरू असताना आम्ही DGM साहेबांच्या केबिन मध्येच होतो. हे पी. उग्रसिंह नावाप्रमाणेच अतिशय उग्र, तापट व शीघ्र कोपी होते. त्यांनी अतिशय जालीम, निर्दयी व जहाल भाषेत DGM साहेबांची खरडपट्टी काढली असावी हे DGM साहेबांच्या चेहऱ्यावरील भीती व झरझर बदलणाऱ्या भावांवरूनच समजत होतं. मूळचे काश्मीरचे असणारे श्री. बिजॉय सप्रू नावाचे त्यावेळचे ते DGM म्हणजे एक अत्यंत सहृदय व दिलखुलास व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एवढे कडक आणि निष्ठुर शब्द कधीच ऐकले नसावेत. पाच दहा मिनिटे ते यंत्रवत फोन धरून पलीकडून होणाऱ्या वाक्-बाणांच्या अग्निवर्षावात न्हाऊन निघत होते. त्यांनी फोन ठेवला तेंव्हा त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता, हातांना कंप सुटला होता आणि डोळे अश्रूंनी भरले होते. हताश, करुण स्वरात ते म्हणाले..
“अरे, मैं तो शुरुसेही आप लोगोंको हर तरह से मदत करने के पक्ष में हूँ.. फिर भी मुझे क्यों ये सब कुछ सुनना पड़ा.. आप के लीडर लोगो ने ही टांग अडाई है.. वरना हमे तो खुशी है आपको expenses reimburse करने में.. !”
मग माझ्याकडे पहात ते म्हणाले..
“इस केस के सिलसिले में आप लोगों को जो कुछ भी खर्च उठाना पड़ा है.. वकील की फीस, यहां आने जाने का रहनेका खर्च.. सभी बैंक reimburse करेंगा.. ! आप सब लोग टीए बिल भी क्लेम कर सकते हो.. मैं आप को सूचित करता हूं कि इस केस से संबंधित सभी स्टाफ expenses तथा TA Bill आदि का आप ब्रांच लेव्हल पर ही तुरंत भुगतान (payment) करो और परिपुष्टि (confirmation) के लिए हमे अवगत कराओ.. हमारी ओर से किसीका भी कोई भी खर्च अस्वीकृत (decline) नही होगा..”
DGM साहेबांसारख्या दयाळू माणसाला आपल्यामुळे विनाकारण बोलणी खावी लागली, पराकोटीची मानहानी, अपमान सहन करावा लागला याचं रविशंकरला खूप वाईट वाटलं. “सर.. आय ॲम व्हेरी सॉरी..” असं म्हणून तो उठून त्यांची माफी मागू लागला, इतक्यात त्या असह्य मानहानीमुळे गळ्याशी दाटून आलेला हुंदका कसाबसा रोखीत DGM साहेब उठले आणि आम्हाला हातानेच बाहेर जाण्याची खूण करीत केबिन मधील वॉशरूम कडे गेले.
आजही DGM साहेबांची त्या दिवशीची ती केविलवाणी, दयनीय अवस्था आठवली की काळजात चरर्र होतं. त्या वाईटातून चांगलं एवढंच निघालं की त्यानंतर नेहमीसाठीच आम्हा सर्वांचे या केस संबंधित सर्वच खर्च व TA Bills आदि विनासायास Reimburse होत गेले.
ॲड. जोगळेकर आणि त्यांचे असिस्टंट ॲड. पुराणिक यांचे अधून मधून मला तसेच रविशंकर, सैनी व रहीम चाचांनी फोन येतच असायचे. चार्जशीट मधून तुमचे नाव वगळून देतो.. इतके इतके पैसे द्या.. वगैरे वगैरे.. एके दिवशी ॲड. पुराणिक साहेबांनी आम्हा सर्वांना फोन करून सांगितलं की पैशांचा अपहार केल्यामुळे जोगळेकर साहेबांनी रश्मीला त्यांच्या ऑफिसातून काढून टाकले आहे. त्यामुळे तिच्याशी कोणताही पैशांचा अथवा अन्य कुठलाही व्यवहार करू नये..
कदाचित जोगळेकर साहेबांच्या मिसेसनी त्यांना रश्मी बरोबर अश्लील चाळे करताना रंगे हाथ पकडलं असावं, आणि म्हणूनच नाईलाजाने त्यांना तिला ऑफिसातून काढून टाकण्याचं नाटक करावं लागलं असेल.. असं समजून पुराणिक साहेबांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्षच केलं. बरेचदा जोगळेकर साहेब वैजापूरच्या कोर्टातही आलेले दिसायचे. मात्र त्यावेळी ते आमच्याशी साधी ओळखही दाखवीत नसत. नेमकी त्याच दिवशी आमच्या केसचीही तारीख असायची. हा योगायोग असायचा की आणखी काही.. हे शेवटपर्यंत आम्हाला समजलंच नाही.
काही दिवसांनंतर वर्तमानपत्रात एक खळबळ जनक बातमी वाचायला मिळाली. जोगळेकर वकिलांची कार रस्त्यात थांबवून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला आपली भूतपूर्व पर्सनल सेक्रेटरी ॲड. मिस रश्मी यांनीच सुपारी देऊन गुंडांकरवी करवला असल्याचा आरोप जोगळेकर साहेबांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून रश्मी आपल्याला ब्लॅकमेल करीत असून यावेळी तिची पन्नास लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळेच तिने हा हल्ला केल्याचा गौप्यस्फोटही वकील साहेबांनी केला. तसेच यापूर्वीही आपल्यातील अनैतिक संबंध जगजाहीर करण्याची धमकी देऊन तिने एक चार रूमचा लक्झरी फ्लॅट स्वतःच्या नावे करण्यास आपल्याला भाग पाडल्याचेही जोगळेकर साहेबांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी जरी रश्मीला ताबडतोब अटक केली असली तरी औरंगाबादच्या अनुभवी पोलीस अधिक्षकांना मात्र या हल्ल्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय होता. हा हल्ला म्हणजे एक लुटीपुटीचा फार्स असून ॲड. जोगळेकरांना या हल्ल्याची पूर्वकल्पना असावी असा त्यांचा कयास होता. अवघ्या एक फूट अंतरावरून चालविलेल्या गोळीचा नेम चुकून ती कानाला नुसती ओझरती चाटून जाते हे पोलिसांच्या पचनी पडत नव्हते. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांकरवी भराभर चौकशीची चक्रे फिरविली आणि अवघ्या दोनच दिवसात गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना नावाच्या हिस्ट्री शिटर सराईत गुंडाला पिस्तूलासह अटक केली. हा तोच मुन्ना होता जो, जोगळेकर वकिलांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेलो असता आम्हाला दिसला होता आणि त्याने आमच्या समोरच जोगळेकर साहेबांना एक देशी कट्टा (गावठी पिस्तुल) ही दिला होता.
पोलिसांनी मुन्नाला चौदावं रत्न दाखवून बोलतं केलं तेंव्हा आपण हा हल्ला जोगळेकर वकिलांच्या सांगण्यावरूनच केला असून रश्मीचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने कबूल केले.
या जोगळेकर हल्ला प्रकरणाचा आपल्या कथेशी तसा काहीही संबंध नाही, परंतु पोलीस आणि वकील हे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे वैधानिक व सामाजिक दायित्व असणारे दोन महत्वाचे समाज घटक आपल्या पदाचा व ज्ञानाचा दुरुपयोग करून कायद्याची व न्यायाची कशी सर्रास क्रूर थट्टा करतात याची कल्पना यावी म्हणून थोडक्यात तिचा येथे उल्लेख केला आहे.
मध्यंतरी ग्राहक मंचाच्या तारखांना सुखदेव हजर न राहिल्यामुळे सुमारे सहा महिने केवळ पुढच्या तारखाच मिळत गेल्या. त्यानंतरच्या तारखेला “चेकवरील सही बनावट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नियमानुसार चेकची संपूर्ण रक्कम बचत खात्याच्या व्याजासहित परत करण्यास बँक तयार असल्याचे” मी न्यायाधीशांना सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत पुढील तारखेला नुकसान भरपाईचा धनादेश वा ड्राफ्ट कोर्टासमक्ष फिर्यादीला सुपूर्द करावा असा न्यायाधीशांनी आदेश दिला.
दरम्यान वैजापूर कोर्टात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याचे कामकाजही संथ गतीने सुरू होते. गुन्ह्यातील आपल्या सहभागाचा पोलिसांना दिलेला कबुलीजबाब रुपेशने कोर्टात साफ नाकारला होता. पोलिसांनी आपल्या विरुद्ध बळाचा वापर केल्यामुळे शारीरिक त्रासाला भिऊनच तो खोटा कबुलीजबाब दिल्याचे त्याने कोर्टाला सांगितले.
ग्राहक मंचाच्या पुढील तारखेपूर्वीच रिजनल ऑफिसच्या सुचनेनुसार तात्पुरते सस्पेन्स खात्याला डेबिट टाकून पाच लाख ऐंशी हजार रुपये अधिक व्याज अशा रकमेचा सौ. रत्नमाला बोडखे यांच्या नावाचा ड्राफ्ट मी तयार करून ठेवला होता. ॲड. ऋतुराज यांनी आपले सारे वकिली कौशल्य व चातुर्य पणाला लावून खालील प्रमाणे एक परफेक्ट तडजोड पत्र तयार केले.
“मला चेकचे सगळे पैसे व्याजासह प्राप्त झाले असून माझे पूर्ण समाधान झाले आहे. माझी बँकेविरुद्ध किंवा बँक कर्मचाऱ्यां विरुद्ध कसलीही नाराजी अथवा तक्रार बाकी उरलेली नाही. तसेच केवळ बँक कर्मचाऱ्यां बद्दलच्या गैरसमजुतीमुळे मी त्यांच्याविरुद्ध जी पोलीस कंप्लेन्ट व कोर्ट कारवाई केली होती ती मी मागे घेईन असे कबूल करते. तसेच बँकिंग लोकपाल, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, मानवाधिकार आयोग, विविध सामाजिक संस्था व सरकारी विभाग यांच्याकडे बँक व बँक कर्मचारी यांच्याबद्दल याच गैरसमजातून मी ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सर्व मी मागे या पत्राद्वारे मागे घेत आहे.”
हे तडजोड पत्र ग्राहक मंचाच्या न्यायाधीशांना दाखविले असता त्यांनी त्या पत्रास मान्यता दिली व या पत्रावर सही केल्यावरच नुकसान भरपाईचा ड्राफ्ट देण्यात येईल असे सौ. बोडखे यांना सांगितले.
सुखदेवने जेंव्हा हे तडजोड पत्र वाचले तेंव्हा तो रागाने थरथरू लागला. आपली ब्लॅकमेलिंग करण्याची सर्व अस्त्रे, शस्त्रे कर्णाच्या कवच कुंडलां प्रमाणे लबाडीने हिसकावून घेतली जात आहेत असेच त्याला वाटले. त्याने या तडजोड पत्रावर सही करण्यास साफ नकार दिला. मात्र सुखदेवच्या लालची वकिलांना त्यांची भली मोठी फी मिळणे हे या नुकसान भरपाईच्या ड्राफ्टचे पैसे मिळण्यावरच अवलंबून असल्याने त्यांनी महात्प्रयासाने सुखदेवची समजूत घालून त्याला व सौ. बोडखेंना त्या तडजोड पत्रावर सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर न्यायाधीशां समक्ष सुखदेवला आम्ही तो ड्राफ्ट दिला. सुखदेवने लगबगीने बँकेत जाऊन त्याच दिवशी तो ड्राफ्ट वटवून पैसे ताब्यात देखील घेतले.
त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी झोनल ऑफिसमध्ये “मंथली प्रोग्रेस रिव्ह्यू” (P- Review) मीटिंग असल्याने त्यादिवशी मी औरंगाबादलाच थांबलो.
कशी काय कोण जाणे, पण सुखदेवला चेकच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाल्याची बातमी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. “नुकसान भरपाईतील आपला हिस्सा बुडाला..” हे कळताच ठाणेदार जगन राठोड चार पाच कॉन्स्टेबलना सोबत घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत आले. “पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय बँकेने बोडखेंना परस्पर नुकसान भरपाई दिलीच कशी ?” असा प्रश्न विचारून आरडा ओरडा करीत त्यांनी बँकेत प्रचंड गोंधळ घातला. खुर्च्या, टेबल व अन्य फर्निचरची उलथापालथ करून नासधूस केली.
बँकेचा स्टाफ या अकस्मात झालेल्या पोलिसी आक्रमणामुळे घाबरून गेला आणि सर्व काम थांबवून लंच रूम मध्ये जाऊन लपून बसला. अकाउंटंट साहेबांनी तांतडीने मला फोन लावून बँकेत चाललेल्या त्या प्रकाराची माहिती दिली. चालू मिटिंग मधून थोडा वेळ बाहेर जात मी लगेच DySP मॅडमला फोन करून हे वृत्त कळविले. DySP मॅडमचा फोन जाताच फौजदार साहेब घाईघाईतच ठाण्यात परतले. तसंच जाण्यापूर्वी दोन कॉन्स्टेबलना “तुम्ही इथे थांबून सर्व फर्निचर पुन्हा पूर्वी सारखं जागच्या जागी लावून ठेवा..” अशी सूचनाही देऊन गेले.
पोलिसांवर विश्वास ठेवणं, त्यांच्या कडून सभ्य, सुसंस्कृत, सद्-वर्तनाची अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आणि मुर्खपणाचं होतं हेच पोलिसांनी त्यांच्या त्या दिवशीच्या असभ्य, रानटी वागणुकीने सिद्ध केलं होतं..
असेच दिवस भराभर उलटत होते. मार्च संपताच मलाही बदलीचे वेध लागले. मुलांच्या शिक्षणासाठी फॅमिली औरंगाबादला रहात असल्यामुळे माझी पुढील पोस्टिंग शक्यतो औरंगाबादलाच देण्याचा प्रयत्न करू असे AGM व DGM यांनी मला आश्वासन दिले होते. त्यानुसारच औरंगाबाद सेवा शाखेच्या प्रबंधक पदी लवकरच माझी बदली झाली. येत्या शनिवारी रिलिव्ह होऊन सोमवारी नवीन जागी रुजू होण्याचे रिजनल ऑफिसचे आदेशही प्राप्त झाले.
त्या दिवशी शुक्रवार होता. सर्व काम आटोपून मेस वर जेवण करून मी रूमवर परतलो. रात्री, वैजापुरातल्या गेल्या साडेतीन वर्षातील सर्व कडू गोड क्षणांची उजळणी करीत मी आपल्या बिछान्यावर पहुडलो होतो. उद्या माझा निरोप समारंभ होता. जंग जंग पछाडूनही सुखदेवच्या केसशी निगडित काही काही प्रश्नांची खात्रीशीर, काँक्रीट उत्तरं मला अद्यापही मिळाली नव्हती.
बनावट सहीचा चेक वटवून पाच लाख ऐंशी हजार रुपये घेऊन पसार झालेला तो जयदेव खडके नावाचा अज्ञात इसम कुठे हवेत विरून गेला होता ? पोलिसांना तो खरोखरीच सापडला नाही की पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही ? रुपेशच्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलिसांनी रुपेशला बोलतं का केलं नाही ? सुखदेवचा सुद्धा या गुन्ह्यात नक्कीच सहभाग होता.. कारण दुसऱ्या चेकबुकची मागणी त्यानेच केली होती. मग पोलिसांनी सुखदेव वरच तपास का केंद्रीत केला नाही ? सुखदेव बोडखे, रुपेश जगधने आणि जयदेव खडके या तिघांनी मिळून गुन्ह्याचा कट आखला होता ही गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ, स्पष्ट होती. मग गुन्हे शोधण्यात तरबेज असलेल्या पोलीसांना एवढी साधी गोष्टही लक्षात कशी आली नाही ? कि.. पोलिसांनी जाणूनबुजून गुन्हेगारांना संरक्षण दिलं ?
असे असंख्य अनुत्तरित प्रश्न माझ्या मनात घोळ घालीत होते. उद्या माझी इथून बदली झाल्यावर तर या केस संबंधी पुन्हा कसलीही माहिती मिळणार नाही आणि या प्रश्नांचे गूढ बहुदा तसेच राहणार.. ! अशा विचारातच कधी तरी उशिरा मला झोप लागली.
(क्रमशः)
(काल्पनिक)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १५ भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.