https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-17

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 17)

सकाळी नेहमी सारखाच पहाटे पाच वाजता उठून रोजच्या सवयी प्रमाणे सारंगी डॅमच्या काठाने फिरायला गेलो. तिथे नित्य नेमाने येणारी दैनंदिन परिचयाची तरुण व आबालवृद्ध मंडळी भेटून अभिवादन करीत होती. त्यांच्या नमस्काराला हसून प्रत्युत्तर देताना “आता उद्यापासून आपल्याला हे चेहरे पुन्हा कधीही दिसणार नाहीत..” असे विचार मनात येऊन नकळत हात उंचावून तो हलवत मी त्यांचा निरोप घेत होतो.

बँकेत सकाळ पासूनच मला प्रत्यक्ष भेटून निरोप द्यायला येणाऱ्यांची रीघच लागली होती. राजू चहावाल्याच्या डोळ्यांतील अश्रू तर थांबता थांबत नव्हते. चारी बाजूंनी काच असलेली कृष्णाची एक सुंदर मूर्ती आपली आठवण म्हणून त्याने मला भेट दिली. बँकेच्या कॅश व्हॅनचा अतिशय अबोल, संयमी आणि निर्व्यसनी ड्रायव्हर अंगद तसंच प्रामाणिक, कष्टाळू सेवक नंदू माळी या दोघांची अवस्थाही तशीच बेचैन, सैरभैर झालेली दिसत होती. गावातील दाट परिचयाची डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकर, शेतकरी व व्यावसायिक मंडळी मला आवर्जून भेटायला येऊन शुभेच्छा देऊन जात होती.

विशेष म्हणजे Addl. DSP व DySP मॅडम ही जोडी तसेच ठाणेदार जगन राठोड आणि सब. इंस्पे. वर्षा महाले हे देखील पुष्पगुच्छ घेऊन सदिच्छा व निरोप द्यायला आले होते. दुपारी अडीच वाजता बँकेचे कामकाज संपल्यावर गावातीलच एका हॉटेलमध्ये माझ्यातर्फे स्टाफला जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. तिथेच हसत खेळत माझा अनौपचारिक निरोप समारंभ पार पडला. संध्याकाळी पाच वाजता केबिन मध्ये एकटाच बसून शेवटची आवरा सावर करत असतानाच बाहेरून..

“आत येऊ का साहेब..?”

असा आवाज ऐकू येताच मी मान वर करून पाहिलं, तो एक अंदाजे साठ पासष्ट वयाचा पॅन्ट शर्ट या साध्या वेशातील गृहस्थ हातात एक छोटासा पुष्प गुच्छ घेऊन उभा होता..

“या.. या..! बसा..!”

असं म्हणून मी त्याला आत बोलावलं..

“साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही ? मी अप्पा.. कॉन्स्टेबल अप्पा वाघमारे..”

त्या गृहस्थाने असं म्हणताच मी त्याच्याकडे निरखून पाहिलं..

“अरे अप्पा.. तुम्ही ? खरंच मी ओळखलंच नाही तुम्हाला या वेशात.. नेहमी तुम्हाला युनिफॉर्म मध्येच पहायची सवय आहे ना, म्हणून.. ! कसे आहात ?”

वैजापूर ठाण्यात ड्युटीला असणारे अप्पा वाघमारे पोलिसांच्या पगाराची बिलं तसंच पोलीस ठाण्यातील बँके संबंधीची अन्य सर्व प्रकारची कामं करण्यासाठी नेहमीच बँकेत यायचे. शांत, मनमिळावू स्वभावाचे अप्पा सर्वांशी हसतमुखाने, प्रेमाने व आपुलकीने बोलायचे. पोलिस ठाण्यातील सर्वात सिनियर कर्मचारी असलेल्या हेड कॉन्स्टेबल अप्पांकडे, आताशा वयोमाना नुसार धावपळीची कामे झेपत नसल्याने ठाण्यातील बैठी, कारकुनी कामे तसेच बँकेतील कामे सोपवली जायची.

आत येऊन अप्पांनी आपल्या हातातील पुष्पगुच्छ मला दिला आणि म्हणाले..

“अभिनंदन साहेब, तुमची बदली औरंगाबादला झाल्याबद्दल.. ! तुम्ही एकदाचे टेन्शन मुक्त झालात.. आता तुम्हाला छान तुमच्या पत्नी, पोराबाळां सोबत शांतपणे राहता येईल. तुमचा इथला कार्यकाळ कसा गेला हे आम्हा पोलिस कर्मचाऱ्यांशिवाय कुणाला जास्त चांगलं ठाऊक असणार ? पण तुम्ही जराही न डगमगता, ज्या धीरानं परिस्थितीला तोंड दिलंत त्याबद्दल तुमचं कौतुक केलंच पाहिजे.”

बहुदा अप्पांना आणखीही काही बोलायचं होतं.. ते क्षणभर घुटमळले. इतक्यात त्यांच्या साध्या सिव्हिल पेहरावाकडे माझं लक्ष गेलं आणि मी विचारलं….

“आज तुम्ही साध्या वेषात कसे ? तुमची ड्युटी तर रात्री उशिरा पर्यंत असते ना ? की.. सुट्टीवर आहात आज ?”

माझ्या या प्रश्नावर आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने ते म्हणाले..

“आज मी सेवानिवृत्त झालो. तुमच्या प्रमाणेच मी ही आजपासून टेन्शन मुक्त झालो. आता नाशिक जिल्ह्यातल्या माझ्या खेडेगावी राहून मस्तपैकी शेती करीत उर्वरीत आयुष्य शांतपणे घालवणार..”

“अरे वा ! अप्पा, खूप खूप अभिनंदन तुमचं.. आणि तुमच्या निवृत्ती नंतरच्या सुखी, निरोगी जीवनासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा..! आता मी तुम्हाला चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही..”

बेल वाजवून वॉचमनला बोलावलं आणि सगळ्यांसाठी चहा आणायला सांगितलं. चहा पित असताना अप्पा एकटक माझ्याकडेच पहात होते. मग अचानक गंभीर होऊन ते म्हणाले..

“तुम्हाला आम्हा सर्वच पोलिसांचा खूप राग येत असेल, नाही ? आमचं खातं खूप भ्रष्ट आहे, लाच घेतल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करीत नाही असाच तुमचा समज झाला असेल. आमच्या खात्यातील सर्वच अधिकारी व शिपाई कामचोर, लाचखोर नसले तरी दुर्दैवाने बहुसंख्य कर्मचारी मात्र लोभी, लालची आहेत, ही गोष्ट सुद्धा खरीच आहे..”

त्यावर मी म्हणालो..

“अहो अप्पा, लाचखोरी आणि भ्रष्टाचार तर सर्वच क्षेत्रांत बोकाळला आहे. मात्र या देशातील सर्वात जास्त तल्लख, बुद्धिमान, तत्पर आणि कार्यक्षम समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांपैकीच एक असून देखील तुम्हाला आमच्या केसचा तपास लावण्यात मात्र थोडं सुद्धा यश मिळू शकलं नाही याबद्दलच जरा आश्चर्य आणि दुःख वाटतंय..”

मी असं म्हणताच अविश्वासाने डोळे विस्फारून अप्पा म्हणाले..

“म्हणजे ? तुम्हाला खरंच काहीच माहिती नाही ? त्या तुमच्या हॉटेल वाल्या राजुनेही काहीच सांगितलं नाही का तुम्हाला ? निदान गावातल्या लोकांकडून तरी थोडी फार माहिती समजायलाच पाहिजे होती..”

अप्पांच्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवीत मी ठामपणे म्हणालो..

“नाही, राजूनं काहीच सांगितलं नाही मला. म्हणजे.. मीच त्याला पोलीस स्टेशन मधली कुठलीही बातमी सांगण्यास मनाई केली होती. आणि, गावकऱ्यांचं म्हणाल तर.. जितकी माणसं तितक्या अफवा.. म्हणून कुठल्याही इकडच्या तिकडच्या गावगप्पांवर मी कधीच विश्वास ठेवला नाही..”

त्यावर एक खोल निःश्वास सोडून अप्पा म्हणाले..

“ठीक आहे तर मग आता तुम्ही माझ्याकडूनच ऐका.. तुमच्या केसच्या तपासाची खरीखुरी कहाणी..”

खिशातून तपकिरीची डबी काढून त्यातील तपकीर बोटांच्या चिमटीत धरून ती नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेऊन अप्पा म्हणाले..

“त्या सुखदेव बोडखेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर दोनच दिवसांत खबऱ्यां मार्फत त्या जयदेव खडकेच्या ठावठिकाण्या बद्दल फौजदार साहेबांना पक्की खबर मिळाली असावी. कारण फौजदार साहेब सब. इंस्पे. हिवाळे आणि दोन कॉन्स्टेबलना सोबत घेऊन तडका फडकी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेले होते. जयदेव खडके हे नाव धारण करणाऱ्या त्या व्यक्तीचं खरं नाव भाऊसाहेब सुरकांडे असल्याचं समजतं.. आणि हा भाऊसाहेब सुखदेवच्या मावसभावाचा जवळचा मित्र आहे असंही म्हणतात. सुरगाणा तालुक्यातील एक छोट्याशा गावांतील भाऊसाहेबाच्या घरी जेंव्हा पोलीस गेले तेंव्हा तो जवळच्या गुजराथ राज्यात पळून गेला होता. मात्र त्याच्या घरून फौजदार साहेबांनी साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असं त्यांच्या बरोबर गेलेले कॉन्स्टेबल सांगतात..”

एवढं बोलून या गौप्यस्फोटा नंतर माझ्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहण्यासाठी अप्पा जरा वेळ थांबले. खरं म्हणजे, पोलिसांनी तोतया जयदेवला पकडून त्याच्याकडून पाच लाख ऐंशी हजार रुपये तर वसूल केलेच पण त्याच्या भाऊ व आई वडिलांना तसेच त्याच्या सासू सासऱ्यांनाही भीती दाखवून त्यांच्याकडून बरीच मोठी रक्कम उकळल्याचे वैजापुरातील लोकांकडून अनेकदा उडत उडत समजले होते. पण त्या बातम्यांची पुष्टी आत्ता अप्पांकडून होत होती. चेहऱ्यावर ओढून ताणून खोटी उत्सुकता दाखवीत म्हणालो..

“मग ? पुढे काय झालं ? तो भाऊसाहेब सुरकांडे चांगला हाती सापडला असतानाही त्याला अटक का नाही केली पोलिसांनी ?”

“अहो साहेब, भाऊसाहेबला जर अटक केली असती तर जप्त केलेले पैसे सरकार दरबारी जमा करावे लागले असते. परस्पर तसेच गिळंकृत करता आले नसते. तसंच फिर्यादी सुखदेव व आरोपी.. म्हणजे तुम्ही आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडून पैसेही उकळता आले नसते.”

“बापरे ! म्हणजे पोलिसांनी फिर्यादी सुखदेव बोडखे कडूनही पैसे उकळले ?”

“अर्थात ! एक तर.. खात्यातून पैसे काढले गेल्याची गोष्ट ताबडतोब त्याच दिवशी कशी समजली ? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सुखदेव जवळ नव्हतं. तसंच दुसरं चेक बुक मिळण्यास किंचित विलंब झाल्यावरून सुखदेवच्या मुलाने बँकेत आरडाओरड करून गोंधळ घातला होता, असं तुमच्या त्या बँक सोडून गेलेल्या मुलीचं, बेबीचं स्टेटमेंट होतं. सुखदेवचा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी अनेकदा किरकोळ गुन्ह्यांसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा गुन्ह्यातील सहभाग पोलिसांना सहज सिद्ध करता आला असता.”

“पण मग फौजदार साहेबांनी सुखदेव आणि त्याच्या मुलावर तेंव्हाच action का घेतली नाही ?”

“तसं पाहिलं तर सुरवातीला फौजदार साहेबांनी न मागताच सुखदेव त्यांना भरपूर पैसे देत होता. पोलिसांनी लवकर FIR नोंदवून बँकेच्या स्टाफला अटक करावी यासाठीच ही लाच होती. फौजदार साहेबांना तेंव्हाच सुखदेव बद्दल संशय निर्माण झाला होता. आणि पुढे त्या भाऊसाहेब सुरकांडेचं सुखदेवशी असलेलं कनेक्शन उघड झाल्यावर तर सुखदेवलाच पोलिसांच्या कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नाईलाजाने फौजदार साहेबांना आणखी भरपूर पैसे द्यावे लागले.”

“अप्पा, मघाशी तुम्ही गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडूनही पोलिसांनी पैसे घेतले असा उल्लेख केलात.. या अन्य व्यक्ती कोण ? रुपेश तर नाही ?”

“बरोब्बर ओळखलंत तुम्ही, साहेब ! खरं म्हणजे त्या भाऊसाहेब सुरकांडे बद्दल पोलिसांना पहिली खबर या रुपेशनंच दिली. रुपेश हा होमगार्ड असल्याने त्याचे पोलीस स्टेशन मधील सर्वांशीच अतिशय जवळचे संबंध आहेत. आम्ही त्याला आमच्या पैकीच समजतो. आयत्या मिळणाऱ्या पैशाच्या मोहाला बळी पडून रुपेशने आधी या गुन्ह्यात भाग घेतला खरा, पण नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. पोलीस या गुन्ह्याचा छडा लावतील आणि आपल्याला खूप मोठी शिक्षा होईल ही भीती त्याला सतावू लागली. गुन्ह्यात आपलं नाव येऊ न देण्याच्या अटीवर त्याने या कटाची संपूर्ण माहिती फौजदार साहेबांना दिली.”

“मला आणखी एक शंका आहे. त्या दिवशी रुपेशने आम्हाला अर्धवट लेखी कबुली जबाब दिल्यावर जेवायला घरी जाऊन येतो असे म्हणून तो बँकेतून घराकडे गेला. मात्र घरून आल्यावर त्याने आणखी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला. तो त्या दिवशी घरी न जाता पोलीस स्टेशन मध्ये तर आला नव्हता ना ?”

“नाही साहेब.. ! त्या दिवशी तो घरीच गेला होता. खरं म्हणजे त्याला पोलीस ठाण्यातच यायचं होतं, पण चलाख रहीम चाचांनी त्याचा पोलीस स्टेशन पर्यंत पाठलाग केला. त्यामुळे नाईलाजाने त्याला घरीच जावं लागलं. मात्र घरून त्याने मोबाईल वरून फौजदारांशी संपर्क साधला आणि बँकेच्या स्टाफला लेखी कबुली जबाब दिल्याचं सांगितलं. त्यावर फौजदार साहेबांनी “आता यापेक्षा जास्त काहीही कबूल करू नकोस, नाहीतर तुला वाचवता येणं कठीण आहे” असं त्याला बजावून सांगितलं. म्हणूनच त्याने बँकेत परत आल्यावर आणखी काहीही सांगण्यास नकार दिला.”

अप्पांकडून एकेका रहस्यावरचा पडदा अलगद दूर होत होता.

“आणखी एक शंका आहे अप्पा..! पोलिसांनी केलेल्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलीसांनी त्याबद्दल आम्हाला आतापर्यंत काहीच कसं कळवलं नाही ?”

माझ्या हा प्रश्न ऐकून हेड कॉन्स्टेबल वाघमारे अप्पा, सांगावं की सांगू नये.. अशा चिंतेत पडले. पण मग आता आपण सेवामुक्त झालो आहोत याची त्यांना जाणीव झाली असावी. मनमोकळं हसत ते म्हणाले..

“महत्वाचा, कळीचा प्रश्न विचारलात साहेब..! चेक वरील सही खातेदार सौ. रत्नमाला बोडखे यांनी केलेली नाही तसेच बँकेचा स्टाफ किंवा रुपेश जगधने यापैकीही कुणीही केलेली नाही असा पुण्याच्या फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून तो रिपोर्ट कोर्टाला सादर करण्यात आला आहे. तुम्ही आरोपी असल्याने तुम्हाला या रिपोर्ट बद्दल माहिती देण्याचा काही संबंधच येत नाही..”

“हे कसं शक्य आहे ? ती हुबेहूब बनावट सही रुपेशनेच केलेली आहे याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे. त्या फोरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट मध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.”

“नाही साहेब ! फोरेन्सिक लॅबचं काम अगदी चोख आहे. त्यांचा रिपोर्टही एकदम अचूक आहे. मात्र रुपेशच्या हस्ताक्षराचा जो नमुना लॅब कडे पाठवण्यासाठी घेण्यात आला होता तोच बदलून जर त्या जागी भलत्याच व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना लॅब कडे पाठविण्यात आला असेल तर ? शेवटी, रुपेश हा आमचाच माणूस असल्याने त्याला वाचविण्याचा हर प्रकारे प्रयत्न करणं हे ही आमचं कर्तव्यच होतं, नाही का ?”

“पण तुम्ही तर रुपेशला अटक करून कोर्टासमोर हजरही केलं होतंत. काही काळ तो हरसूल कारागृहातही होता..”

“रुपेशचा मूर्खपणा त्याला नडला. त्याचं असं झालं की आपल्या मुलाचा बँकेतील घटनेत सहभाग असावा अशी रुपेशच्या पापभिरू आई वडीलांना आधीपासूनच शंका होती. कारण तो भाऊसाहेब सुरकांडे एक दोन वेळा रुपेशच्या घरी गेला होता तेंव्हा रुपेशच्या पत्नीने व आई वडिलांनी त्याला पाहिले होते. बँकेचे कर्मचारी भाऊसाहेबाचा फोटो सर्वांना दाखवत फिरत होते, त्यावेळी रुपेशच्या वडिलांनी फोटोतील भाऊसाहेबला पाहून हाच तो रुपेशला भेटायला आपल्या घरी येणारा म्हणून ओळखले होते. रुपेशला पोलीस पकडतील म्हणून त्यावेळी ते गप्प बसले. त्यातच रुपेशचा दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा त्याच सुमारास खूप आजारी पडला. आधीच, हातून घडलेल्या विश्वासघाताच्या कृत्यामुळे रुपेशचं मन त्याला खात होतंच.. त्यातून त्याची पत्नी आणि आई वडील सुद्धा त्याला देवाची, पापाच्या परिणामांची भीती दाखवून सतत टोचून बोलत होते. मुलाच्या बिघडत्या तब्येतीच्या काळजीने तो हळवा झालेला असतांनाच तुम्ही त्याला केबिनमध्ये बसवून ठेवलंत.. आत्मग्लानीने तो कोलमडून गेला आणि त्या पश्चातापाच्या भरात त्याने तो कबुलीजबाब दिला. अर्थात तो लवकरच सावरला, सावध झाला आणि अर्धवट दिलेला कबुलीजबाब त्याने तसाच राहू दिला, पूर्ण केला नाही.”

एवढं बोलून किंचित डोळे बारीक करून माझ्याकडे पहात अप्पा म्हणाले..

“तुम्ही रुपेशकडून घेतलेल्या लेखी कबुलीजबाबाला आम्ही थेट केराची टोपली दाखवली. त्याला आम्ही अटकही करणारच नव्हतो. पण तुम्ही त्या कबुलीजबाबाची एक प्रत स्वतः कडे ठेवून घेतली आहे, हे आम्हाला ठाऊक नव्हते. तुम्ही ती प्रत Addl. DSP साहेबांना दाखवली आणि मग त्यांच्या आदेशावरून आम्हाला रुपेशला अटक करून तुरुंगात पाठवावे लागले..”

हेड कॉन्स्टेबल अप्पा वाघामारेंना जे काही सांगायचं होतं ते सारं सांगून झालं होतं. डोक्यावरून जणू काही खूप मोठं ओझं उतरल्या सारखा चेहरा करून ते खुर्चीत निवांतपणे रेलून बसले. मी त्यांना विचारलं..

“मग आता पुढे काय होणार पोलीस तपासाचं..?”

मोठ्याने खो खो हसत अप्पा म्हणाले..

“अहो साहेब, झाला की तपास पूर्ण.. ! आरोपींवर चार्जशीट दाखल करून कोर्टात खटला दाखल केला आहे. आता आमचा रोल संपला. यापुढील कारवाई आता कोर्टच करेल..”

“पण.. तो मुख्य आरोपी जयदेव खडके उर्फ भाऊसाहेब सुरकांडे.. ह्याला तर तुम्ही अटकच केली नाहीत ? तुमच्या रेकॉर्ड मध्ये ही केस “न सुटलेली (unsolved)” म्हणूनच नाही का राहणार ?”

मी माझी भाबडी शंका व्यक्त केली.

“नाही ! आमच्या लेखी तुम्ही बँकवालेच मुख्य आरोपी आहात. रुपेश आणि जयदेव तुमचे सहाय्यक आहेत. बहुतांश आरोपींना आम्ही तांत्रिक दृष्ट्या अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे. आता कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही सारे जामीना वरतीच मोकळे राहणार आहात. जयदेवचा तपास लागू शकला नाही आणि त्यामुळे मुद्देमालही (रोख रक्कम) जप्त करता आला नाही असे नमूद करून आम्ही केसचा तपास केंव्हाच थांबवला आहे..”

या अप्पा वाघमारेंकडे माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे होती. अर्थात या केस संबंधित आणखीही काही बाबतीत थोड्याशा अंधुक शंका-कुशंका, कुतूहल म्हणा वा उत्सुकता, बाकी होतीच. त्यांचंही निरसन या अप्पांकडूनच करून घ्यावं म्हणून विचारलं..

“रुपेश जगधनेनं गेल्या काही दिवसात दोनदा आपली थोडी थोडी शेती विकल्याचं ऐकलं आहे.. ते खरं आहे का ? आणि खरं असल्यास ती त्याने कशासाठी विकली ?”

“रुपेशचा या गुन्ह्यात थेट सहभाग आहे. Cctv फुटेज, लेखी कबुलीजबाब असे सर्व पुरावे त्याच्याविरुद्ध आहेत. त्याला वाचविणं, शिक्षा होऊ न देणं हे फौजदारांच्या दृष्टीनं तसं खूपच जोखमीचं काम होतं. अर्थात त्याची पुरेपूर किंमत फौजदार साहेबांनी रुपेश कडून वसूल केली. सुरवातीला त्यासाठीच त्याला आपली दोन एकर शेती विकावी लागली. त्यानंतर पूर्वीच्या फौजदारांची इथून बदली झाल्यावर जेंव्हा नवीन फौजदार साहेब इथे रुजू झाले तेंव्हा त्यांनीही रुपेश कडून तशीच मोठी रक्कम वसूल केली. त्यावेळी पुन्हा त्याला आपल्या हिश्श्याची आणखी एक एकर जमीन विकावी लागली.”

“व्वा ! शाब्बास !! एकंदरीत ‘वसुली’ हेच तुम्हा पोलिसांचं प्रथम कर्तव्य असतं असं दिसतंय.. ते गुन्ह्याचा तपास वगैरे सगळं दुय्यम, गौण.. असंच ना ?”

मी उपरोधानं म्हणालो. त्याकडे दुर्लक्ष करून अप्पा म्हणाले..

“या सगळ्यांतून त्या सुखदेवला काय मिळालं, हे तर तुम्ही विचारलंच नाहीत ? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, या प्रकरणात सर्वात जास्त आर्थिक नुकसान सुखदेवचंच झालं. एकतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना बदनामीची व पोलीस केसची भीती दाखवून पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन सपशेल फसला. तुम्ही बदनामी, मानसिक त्रास सहन केलात पण त्याच्या धमक्यांना भीक घातली नाहीत. पोलीस, पत्रकार, नेते मंडळी यांच्यावर आधी सुखदेवने स्वतःहूनच खूप पैसे खर्च केले. ग्राहक मंच व फौजदारी न्यायालयातील त्याच्या वकिलांनीही त्याला भरपूर लुबाडून घेतलं. खरं म्हणजे तुम्हा बँकवाल्यांना फक्त घाबरवण्यासाठीच त्याने पोलीसात तक्रार दाखल केली होती. तुम्ही पोलिसांच्या अटकेला घाबराल आणि आपली नोकरी वाचविण्यासाठी ताबडतोब त्याला हवे तेवढे पैसे द्याल आणि मग पोलिसात दिलेली तक्रार सोयीस्करपणे मागे घेता येईल, असा त्याचा साधा सरळ प्लॅन होता.”

अप्पा चांगलेच रंगात येऊन बोलत होते. मधेच त्यांना तपकिरीची आठवण झाली. चिमूटभर तपकीर मनसोक्त हुंगून झाल्यावर ते पुढे म्हणाले..

“पोलिसांत तक्रार देऊन सुखदेव फसला. जस जसे सुखदेव विरुद्ध पोलीसांकडे पुरावे गोळा होऊ लागले तशी तशी त्यांची पैशाची मागणी वाढत गेली. पोलिस आपल्या भोवती फास आवळू नयेत म्हणून सुखदेव त्यांना ते मागतील तेवढे पैसे देत राहिला. जयदेव उर्फ भाऊसाहेब सुरकांडे कडून पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम आधीच वसूल केली होती. ग्राहक न्यायालया मार्फत सुखदेवने बँके कडून पुन्हा पाच लाख ऐंशी हजार रुपये व्याजासहित उकळले खरे, पण पोलिसांनी जोर जबरदस्ती करून त्यातूनही आपला हिस्सा दमदाटीने वसूल केलाच.”

अप्पांच्या तोंडून पोलिसांचं हे “अर्थपुराण” ऐकताना मनात प्रचंड चीड दाटून येत होती. तरीही संयम राखीत म्हणालो..

“अशारितीने तुमची मनसोक्त वसुली तर झाली ना..? मग आता तरी आम्हाला न्याय मिळणार की नाही? तुम्ही सुखदेवला अटक का करत नाही ? तसंच जयदेव उर्फ भाऊसाहेब आणि रुपेश यांनाही तुम्ही बेड्या ठोकल्या पाहिजेत.”

यावर किंचित गंभीर होत अप्पा म्हणाले..

“सुखदेव या केस मध्ये फिर्यादी आहे. त्यामुळे त्यालाच जर आरोपी केलं तर संपूर्ण केसच उलटपलट होऊन जाईल. सुखदेव मुळेच आम्हाला एवढ्या मोठया ‘वसुली’ ची संधी मिळाली. तसंच त्याने पोलिसांना त्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी दिलेल्या पैशांचा मानही ठेवलाच पाहिजे. भाऊसाहेब सुरकांडेला अटक केली तर त्याच्याकडून जप्त केलेली रक्कम सरकारजमा करावी लागणार. तसंच तो कोर्टापुढे सुखदेवचं आणि रुपेशचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या जयदेव उर्फ भाऊसाहेबचा शोध कधीच लागणार नाही. तो कायम अज्ञातच राहणार.. रुपेशने आधीच पुरेसा तुरुंगवास भोगला आहे. त्याच्याविरुद्ध कुठलेही पुरावे कोर्टापुढे सादर न करण्याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यामुळे कोर्ट त्याला कोणतीही शिक्षा सुनावू शकणार नाही. आता राहिला प्रश्न तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा..!”

एखादा न्यायाधीश अंतिम निकालाचं वाचन करताना बोलतो तसं अप्पा अत्यंत मुद्देसूद बोलत होते.

“तर साहेब.., तुमच्या विरुद्धही आम्ही कोणताच ठोस पुरावा कोर्टापुढे सादर केलेला नाही. दुसऱ्या चेक बुकच्या मागणीचा अर्ज गहाळ असणे आणि चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही नसणे.. ह्या दोनच गोष्टी तुमच्या विरुद्ध आहेत. अर्थात त्यावरून फार तर बँकेने आपल्या दैनंदिन कामात थोडा निष्काळजीपणा केला एवढाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पैशांचा अपहार कदापिही सिद्ध होऊ शकत नाही. सबब, तुम्हालाही कोर्टात शिक्षा होणं शक्य नाही. आणि.. तुम्हाला शिक्षा न होणं, तुमच्यावर अन्याय न होणं हा ही एक प्रकारे न्यायच आहे, नाही का ?”

अप्पांचं अजब तर्कशास्त्र ऐकून मान डोलावल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.

“बरं.. निघतो मी ! खूप वेळ घेतला तुमचा.. !!”

असं बोलून अप्पा वाघमारे परत जायला निघाले.

“थांबा अप्पा ! आणखी एक दोन शंका आहेत.. तुम्हाला ठाऊक असल्यास कृपया त्यांचीही उत्तरं देऊन जा..”

माझी ही विनंती ऐकताच अप्पा थबकले. मी त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकतोय, त्यांना महत्व देतोय हे पाहून ते अंतर्यामी सुखावले. पुन्हा खुर्चीवर बसत ते म्हणाले..

“विचारा नं साहेब ! काय वाट्टेल ते विचारा.. मी सगळ्यांची खबर ठेवतो. या अप्पाच्या नजरेतून बारीक सारीक गोष्टही सुटत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देईन मी..”

“आमचे जोगळेकर नावाचे एक वकील आहेत, औरंगाबादचे..! ते कधी कधी वैजापूर कोर्टात आलेले दिसायचे. ते इथे का येत असावेत याबाबत काही कल्पना आहे का ? म्हणजे, आमच्या केसच्या संदर्भात तर नव्हते ना येत ? ..असं विचारायचंय..”

“वा साहेब ! मानलं तुम्हाला..! तुमची शंका अगदी बरोबर आहे. औरंगाबादचे एक वकील मध्यंतरी फौजदार साहेबांना भेटायला येत होते. चार्ज शीट मधून तुमचं नाव वगळण्यासाठी त्यांचं सहकार्य मागण्यासाठी.. पण फौजदार साहेबांनी त्यांना त्यासाठी खूप मोठी किंमत सांगितली. त्यांनी कमी किंमतीत काम करण्यास तयार व्हावं यासाठी ते वकील साहेब काही दिवस फौजदार साहेबांकडे चकरा मारत होते. पण मग काही दिवसांनी त्या वकिलांनी फौजदार साहेबांचा नाद सोडला.. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते वकील साहेब आपली कार कोर्टाच्या आवारात उभी करत आणि फौजदार साहेबांनाच तिकडे बोलावून घेत असत. त्यांच्यासोबत कार मधे बसूनच ते ही सौदेबाजीची बोलणी करत..”

माझ्या डोक्यातील साऱ्याच शंकांचा गुंता हळूहळू सुटत चालला होता. आता एकच मुख्य शंका बाकी होती. तीही या अप्पांना विचारून टाकावी म्हणून म्हटलं..

“रूपेश व्यतिरिक्त आमच्या स्टाफ पैकी अथवा निकट परिचय असलेल्यांपैकी आणखीही कुणीतरी पोलिसांचा मदतनीस किंवा खबऱ्या असावा असा मला पूर्वीपासून संशय आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ?”

“नुसता संशयच आहे अजून ? खरंच साहेब, खूप भोळे आहात तुम्ही..!”

तोंडाने ‘चुक चुक’ असा आवाज काढीत माझ्याबद्दल एकाच वेळी कीव आणि सहानुभूती.. दोन्ही व्यक्त करीत अप्पा उद्गारले..

“तुमच्या सर्व हालचालींची खडानखडा माहिती पोलिसांना वेळोवेळी अगदी ताबडतोब मिळत होती. FIR दाखल झाल्यावर अटकेच्या भीतीने तुम्ही सारे वैजापूरहून औरंगाबादला निघालात त्यावेळी केवळ दोनच मिनिटांच्या आतच आम्हाला त्याची खबर मिळाली. तुम्ही औरंगाबादला पोहोचण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला अटक करू शकलो असतो, पण आम्ही जाणीवपूर्वक तसं केलं नाही. तुम्ही बँकेच्या ट्रेनिंग सेंटरच्या होस्टेल मध्ये रहात असल्याची खबर मिळाल्यानेच सब. इंस्पे. हिवाळे साहेब तिथे तुम्हाला भेटायला आले होते.”

अप्पांचं म्हणणं खरंच होतं. हिवाळे साहेब हॉस्टेल वर भेटायला आले तेंव्हाच स्टाफपैकीच कुणीतरी “आस्तीन का सांप” असला पाहिजे असा संशय आला होता. पण तो “दगाबाज खबऱ्या” कोण असावा ? याबद्दल खूप विचार करूनही त्याबद्दल तेंव्हा उलगडा झाला नव्हता.

“चहावाला राजू, नंदू माळी, जीप ड्रायव्हर अंगद, बँकेसमोरील अंडाभुर्जी-वडापाव वाले, चार दोन तुमचे अगदी जवळचे, विश्वासू व हितचिंतक कस्टमर ही बाहेरची मंडळी.. तसेच बँकेचे पर्मनंट चपराशी, सिक्युरिटी गार्डस् आणि काही लेडीज व जेंट कर्मचारी.. एवढ्या साऱ्या जणांनी पोलिसांना वेळोवेळी जाणता अजाणता बरीच महत्वाची माहिती पुरवली आहे. कुणा एकाचं नाव मी घेणार नाही. तुम्ही सुज्ञ आहात. शिवाय आज ना उद्या तुम्हाला या सर्वांची नावं कळणारच आहेत.”

धुर्तपणे असं गोल मोल उत्तर देऊन माझा निरोप घेत अप्पा निघाले. त्यांना जास्त आग्रह करण्यात अर्थ नव्हता. माझीही निघायची वेळ झालीच होती. नंदू माळी व ड्रायव्हर अंगद, बाहेर जीप मध्ये माझं सामान ठेवून मी बाहेर येण्याची वाट पहात थांबले होते. केबिन लॉक करून मी हॉल मध्ये येताच ड्युटीवरील दोन्ही सिक्युरिटी गार्ड्सनी मला निरोपाचा कडक सॅल्युट ठोकला. बँकेच्या इमारती बाहेरील आवारात येताच बगीच्या जवळील अंधाऱ्या आडोशातून अचानक राजू चहावाला पुढे आला. माझ्या जवळ येऊन हलक्या आवाजात तो म्हणाला..

“साहेब, तो हलकट अप्पा इतका वेळ इथे काय करत होता ? खूप मोठा चुगलखोर आहे तो.. आपल्या मनानेच खोट्या नाट्या कहाण्या रचून लोकांत भांडणं लावून देणं हा त्याचा आवडता उद्योग आहे. खुद्द फौजदार साहेब तसंच ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल खऱ्या वाटतील अशा असंख्य मनगढ़ंत, काल्पनिक गोष्टी, किस्से तयार करून तशा अफवा पसरवणे व त्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार करणे यासाठी तो बदनाम आहे. यामुळेच पोलीस त्याला कोणत्याही तपास कामात सहभागी करून घेत नसत आणि फक्त बँकेची व कारकुनी स्वरूपाची कामेच त्याच्याकडून करवून घेत असत. त्याचं बोलणं म्हणजे शुद्ध थापा असतात..”

राजुचं बोलणं मला कुठेतरी थोडं थोडं पटत होतं. अर्थात आता वैजापुरातल्या कुठल्याही खऱ्या खोट्या व्यक्तींशी अथवा गोष्टींशी मला काहीही देणं घेणं नव्हतं. औरंगाबादला जाणारी शिर्डी एक्सप्रेस तारुर स्टेशन वरून सुटली असून दहा मिनिटांत रोटेगावला येत असल्याचा स्टेशन मास्तरांचा निरोप मिळाला आणि सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन घाईघाईतच मी स्टेशनकडे निघालो.

kotnis katha

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १६   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading