https://goodworld.in A website by Madhav Bhope

ही अनेक वळणांनी जाणारी, उत्कंठावर्धक कथा आता जवळ जवळ अंतिम  टप्प्या पर्यंत आली असून पुढील भाग हा या कथेचा क्लायमॅक्स असणार आहे.. तरी हे दोन्ही भाग वाचण्यास चुकू नका……………..

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ही अनेक वळणांनी जाणारी, उत्कंठावर्धक कथा आता जवळ जवळ अंतिम  टप्प्या पर्यंत आली असून पुढील भाग हा या कथेचा क्लायमॅक्स असणार आहे.. तरी हे दोन्ही भाग वाचण्यास चुकू नका……………..

Mind blowing experiences of a Banker-18

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 18)

औरंगाबादला आल्यावर ताबडतोब सेवा शाखा (Service Branch) इथे शाखाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. शाखांच्या Inward आणि Outward क्लिअरिंग चेक्सचे Centralised Processing करणे हेच इथले मुख्य काम होते. ग्राहकांशी कोणताही डायरेक्ट संबंध नसल्याने इथे तसा खूपच आराम होता. नवीन प्रकारच्या कामाची ओळख करून घेण्यातच सुरवातीचे काही दिवस गेले आणि दैनंदिन कामकाज नियंत्रणात आल्यावर लवकरच तिथल्या वातावरणाशी समरस होऊन गेलो.

वैजापूर कोर्टाच्या सर्व तारखांना आम्ही चौघेही आरोपी अगदी नियमितपणे हजर रहात होतो. औरंगाबादहून वैजापूरचे अंतर जेमतेम तास दीड तासाचे असल्याने मला तारखेला हजर राहणे फारसे अवघड नव्हते. शाखेत दोन तडफदार, कार्यक्षम अधिकारी तसेच दोन ट्रेनी ऑफिसर मुली मदतीला असल्याने कोर्टाच्या तारखा अटेंड करण्यासाठी रिजनल ऑफिसकडे रिलिव्हर मागण्याचीही मला कधीच गरज भासली नाही. वैजापूरहून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या येवला इथं राहणाऱ्या रहीम चाचांनाही वैजापूर कोर्टात येणे जाणे तसे सोयीस्करच होते. बीड व परभणी जिल्ह्यातील सुदूर, दुर्गम भागात असणाऱ्या रविशंकर आणि सैनी यांना मात्र तिथून आदल्या दिवशी संध्याकाळीच निघून रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे वैजापूरला पोहोचून लॉजमध्ये उतरावे लागत असे.

सतत बदलून येणारे नवनवीन न्यायाधीश सोडले तर वैजापूर कोर्टातील सर्वच कर्मचाऱ्यांना आमच्या केस मागील सत्य परिस्थितीची यथार्थ कल्पना असल्याने ते आमच्याशी अतिशय आदराने, नम्रतेने व सहकार्याने वागत. नवीन आलेल्या न्यायाधीशांची वागणूक देखील सुरवातीला थोडीशी कठोर, रुक्ष असली तरी लवकरच कोर्टातील कर्मचारी व वकील आमच्या केसची वास्तविक हकीकत त्यांना समजावून सांगत आणि मग तेही आमच्याकडे करुणायुक्त सहानुभूतीने, दयाळू दृष्टीने पहात असत. याउलट रुपेश जगधने व सुखदेव बोडखेचे कुटुंबीय यांना मात्र कायमच कोर्टातील कर्मचारी तसेच वकिलांच्या तिरस्कारपूर्ण नजरांचा सामना करावा लागत असे. सत्य परिस्थिती समजल्यावर न्यायाधीशही वारंवार उपरोधपूर्ण टोमणे मारून त्यांना अपमानास्पदरित्या संबोधित करीत असत.

कधी कधी रिलिव्हिंग अरेंजमेंट न झाल्यामुळे रविशंकर व सैनी यांना तारखेला हजर राहणे शक्य होत नसे. अशावेळी त्यांच्या वतीने कोर्टात अर्ज सादर करून ॲड. मनोहर त्यांची बाजू सांभाळून घेत असत. यथावकाश सरकारी वकिलांनी आमच्या विरुद्धचा एकमेव पुरावा म्हणजे “कस्टमरची सही न घेतलेले चेक बुक इश्यू रजिस्टर” तसेच “एनकॅश केलेल्या चेकवरील सही बनावट असल्याचा फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट” कोर्टापुढे सादर करून तत्कालीन ठाणेदार श्री. माळी व सब. इंस्पे. हिवाळे यांना तपास अधिकारी व मुख्य साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी कोर्टात पाचारण केले.

वारंवार समन्स बजावूनही इंस्पे. माळी साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे सब. इंस्पे. हिवाळे यांनीच सहाय्यक तपास अधिकारी म्हणून कोर्टापुढे साक्ष दिली. “बनावट सहीचा चेक वटवून पाच लाख ऐंशी हजार रुपये एवढी मोठी रक्कम घेऊन पसार झालेल्या तथाकथित जयदेव खडके नामक महत्वाच्या आरोपीला त्याचा फोटो व cvtv फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही ?” या न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नावर सब. इंस्पे. हिवाळेंकडे समाधानकारक उत्तर नव्हते. “जयदेवचा cctv मधील फोटो तितकासा स्पष्ट नव्हता तसेच कदाचित तो राज्याबाहेर पळून गेला असावा त्यामुळे सापडू शकला नाही..” अशी न पटणारी तकलादू कारणे देऊन त्यांनी कशीबशी वेळ मारून नेली.police in witness box

“चोरी गेलेला मुद्देमाल म्हणजेच रोख रक्कम पोलीस जप्त करू शकले नाहीत तसेच चेक वरील खोटी सही देखील आरोपींपैकी कुणीही केल्याचे सिद्ध झाले नाही. मग केवळ बोडखे कुटुंबाने केलेली तक्रार व दुसऱ्या चेक बुकच्या मागणीचा अर्ज गहाळ असणे एवढ्याच गोष्टींवरून बँक कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गुन्हा घडवून आणला असे म्हणता येईल काय ?” न्यायाधीशांनी विचारलेल्या या प्रश्नावर सब. इंस्पे. हिवाळे व सरकारी वकील या दोघांनीही निरुत्तर होत खाली मान घातली. “पोलिसांनी एवढ्या मोठ्या व गंभीर गुन्ह्याचा तपास करतांना अत्यंत casual approach दाखवल्याचे दिसून येते..” असे मत न्यायाधीशांनी नोंदवले.

“गुन्ह्यात सहभागी असलेल्या रुपेश जगधने ह्या महत्त्वाच्या आरोपीची पोलिसांनी हवी तशी कसून चौकशी केली नसल्याचेही स्पष्ट दिसते..” असे परखड निरीक्षण व्यक्त करून त्याबद्दल पोलिसांनी सब. इंस्पे. हिवाळेंना चांगलेच फटकारले. “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे ही गोष्ट तुम्ही विसरलात की काय ? तुमचे एकंदरीत वर्तन तर “खल रक्षणाय सद् निग्रहणाय” असेच विपरीत व अत्यंत निंदनीय आहे..” असे जळजळीत उद्गारही न्यायाधीशांनी काढले. खजील होऊन खाली मान घालून सब. इंस्पे. हिवाळे न्यायाधीशांचे फटके निमूटपणे सहन करत होते. वारंवार समन्स बजावूनही ठाणेदार इंस्पे. माळींनी धुर्तपणे कोर्टात येण्याचे का टाळले ? हे त्यांना आता चांगलेच उमगले होते.

न्यायाधीश सब. इंस्पे. हिवाळेंची अशी खरडपट्टी काढत असतांना तिकडे सुखदेवचा जीव अकारणच खालीवर होत होता. रागाने लालबुंद होत त्वेषाने तो न्यायमूर्तींना उद्देशून म्हणाला.. “हे काय चालवलंय तुम्ही ? आरोपींना प्रश्न विचारण्याचं सोडून तुम्ही उलट पोलिसांचीच हजेरी घेत आहात..!” सुखदेवच्या या मूर्खतापूर्ण आततायी अविर्भावामुळे त्याचे वकील एकदम गडबडून गेले. घाबरून जाऊन कसंबसं त्यांनी सुखदेवला शांत केलं आणि न्यायाधीशांच्या रोषापासून वाचविण्यासाठी जवळजवळ ओढतच त्याला कोर्टरूम बाहेर नेलं.angry man

कोर्टाचं कामकाज अतिशय संथ गतीनं चाललं होतं. कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या, न्यायाधीशांच्या बदल्या व अन्य अनेक कारणांमुळे कोणतेही कामकाज न होता सतत फक्त पुढच्या तारखाच मिळत होत्या. वर्षातून साधारणतः आठ ते दहा वेळा कोर्टाची तारीख असायची. याच दरम्यान माझी बदली औरंगाबादहून लातूर इथे झाली. मुलांच्या शिक्षणासाठी फॅमिली पुणे येथे शिफ्ट करून मी लातूर रिजनल ऑफिसला रुजू झालो. अर्थात तेथूनही मी नियमितपणे प्रत्येक तारखेला वैजापूर कोर्टात हजर रहात असे.

फिर्यादी व आरोपींपैकी एक जण जरी तारखेस गैरहजर राहिला तरी न्यायाधीश कोणतेही कामकाज न करता लगेच पुढची तारीख देत असत. असा बराच काळ गेला. जुने न्यायाधीश बदली होऊन गेले की त्यांच्या जागी नवीन न्यायाधीश यायचे. पदोन्नती, प्रलंबित बदली, तात्पुरता कार्यभार, प्रतिनियुक्ती (deputation) अशा अनेक कारणांमुळे काही न्यायाधीशांची नियुक्ती अल्पकाळासाठी असे. असे न्यायाधीश आमच्या केसला हातही लावीत नसत. फक्त खूप पुढच्या तारखा देऊन केसचे कामकाज लांबवित असत.

दिवसांमागून दिवस जात होते. माझी बदली लातूरहून आता उस्मानाबादला झाली होती. रविशंकरचीही बदली परभणी जिल्ह्यातीळ पालम या गावी झाली, तर सैनीने प्रमोशन घेतल्यामुळे त्याचीही बदली लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे झाली. सुखदेव आणि रुपेश या दोघांचाही या केसमधील इंटरेस्ट आता बराच कमी झाला होता. आजकाल ते दोघेही कोर्टाच्या तारखांना सतत गैरहजर राहू लागले. अर्थात त्यामुळे सलग लागोपाठ पुढच्या तारखा मिळून केसचे आधीच रखडलेले काम आणखीनच रेंगाळले.

अशातच एक सहृदय न्यायाधीश वैजापूरला बदलून आले. न्याय खात्यात नोकरी करण्यापूर्वी काही काळ त्यांनी बँकेतही जॉब केला असल्यामुळे त्यांना बँक कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी व सहानुभूती होती. एकदा त्यांनी सहज केसच्या हजेरीचे रेकॉर्ड बघितले तेंव्हा आम्ही बँकवाले नियमितपणे सर्व तारखांना हजर राहतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी “या केससाठी तुम्ही कुठून कुठून वैजापूरला येता ?” असं विचारलं तेंव्हा “उस्मानाबाद, पालम, निलंगा” अशी दूरदूरच्या गावांची नावे ऐकून केवळ “पुढची तारीख अमुक अमुक..” हे चार शब्द ऐकण्यासाठी आम्हा सर्वांना मजल दरमजल करीत वैजापूर सारख्या गावी यावे लागते हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. त्या दिवशी ते डायस वरूनच आम्हाला म्हणाले..

“एवढ्या दूर अंतरावरून येऊन प्रत्येक तारखेला हजर राहण्याची काहीही गरज नाही. तुम्ही बिनधास्त तुमच्या वकिलांना आधी फोन करून आपल्या अनुपस्थितीची कल्पना देऊ शकता आणि मग तुम्ही तारखेला नाही आलात तरी चालेल. ज्या दिवशी तुमची उपस्थिती अनिवार्य असेल त्यावेळी त्याची पूर्वसूचना तुमच्या वकिलांना अगोदर पासूनच देऊन ठेवण्याची व्यवस्था मी करीत जाईन..”judge

अर्थात न्यायाधीशांनी आम्हाला अशी सवलत दिली असली तरी आम्ही कोर्टाच्या तारखांना अगदी क्वचितच अनुपस्थित राहिलो. मात्र न्यायाधीश, कर्मचारी, वकील वृंद तसेच कोर्टात येणारे अन्य प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून आम्हाला मिळत असलेली आदर व सद्भावपूर्ण वागणूक पाहून सुखदेवचा प्रचंड जळफळाट होत असे. त्याचा तो तीव्र द्वेषाग्नि, सुडाग्नी अद्याप शमला नव्हता. कोर्टात आम्हाला पाहिल्यावर तो संतापाने धुमसत चेहऱ्यावर क्रुद्ध भाव आणून तोंडातल्या तोंडात अस्पष्टपणे सतत काहीतरी पुटपुटत रहायचा. बहुदा शिव्याशापच देत असावा. आम्ही मात्र त्याच्याकडे अनोळखी माणसासारखं पाहून दुर्लक्षच करायचो.

सुखदेव आणि रुपेश आंतून एक असले तरी कोर्टात समोरासमोर आल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून एकमेकांना अजिबात ओळख देत नसत. त्या दोघांचेही वकील मात्र एकत्रच बसून केसच्या मुद्द्यांवर चर्चा करीत असत.

बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून आपण नेमकं काय साध्य केलं हेच सुखदेवला समजत नसावं. अटक होण्याची तसंच नोकरी गमावण्याची भीती, बदनामी, पोलिसांचा त्रास, वकिलाचा खर्च व कोर्टाच्या न संपणाऱ्या तारखांना कंटाळून आम्ही जेरीस येऊन दाती तृण धरून त्याला शरण जाऊ व तो मागेल तितके पैसे देऊन केस मागे घेण्याची त्याला विनंती करू असा सुखदेवचा प्रारंभी गोड गैरसमज होता. पण आम्ही जराही न डगमगता हा सारा त्रास हसतमुखाने सहन केला आणि सर्वांना पुरून उरलो. माझ्या या स्थितप्रज्ञतेमुळे चिडून जाऊन एकदा कोर्टातून बाहेर पडताना सुखदेव मला म्हणाला..

“साहेब, तुम्ही वरून शांत असल्याचं कितीही नाटक करीत असलात तरी आंतून या कोर्टाच्या तारखांमुळे तुम्ही चांगलेच बेजार झाला आहात हे मला पक्कं ठाऊक आहे. इथे येण्याजाण्यात तुमचा बराच वेळ, पैसा आणि सुट्ट्या खर्च होत असतील हे तर अगदी उघडच आहे. शिवाय सुट्ट्या मंजूर होण्यातील अडचणी, दर तारखेमागे वकिलांना द्यावी लागणारी फी, सततचं टेन्शन आणि मानसिक त्रास यामुळे तुम्ही पार वैतागून गेले असाल याचीही मला कल्पना आहे. खरं म्हणजे, त्यावेळी घाईगडबडीत माझं थोडंसं चुकलंच..! तुमच्या त्या उर्मट AGM राणे साहेबांनी माझा अपमान करून मला बँकेतून हाकलून दिलं होतं. तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करताना त्या राणे साहेबांचंही नाव मी तक्रारीत टाकायला पाहिजे होतं. म्हणजे आज त्यांनाही तुमच्या सारखेच कोर्टात सारखे हेलपाटे मारावे लागले असते.”angry man-2

सुखदेवची ती विखारी जळजळ मी शांतपणे ऐकून घेतली. आणि मग हसत हसत समजावणीच्या सुरात त्याला म्हणालो..

“तुमचा काहीतरी फार मोठा गैरसमज झालेला दिसतोय. या कोर्टाच्या तारखांमुळे आम्हाला अजिबात त्रास होत नाही. उलट कोर्टाच्या तारखा लवकर लवकर मिळाव्यात याचीच आम्ही वाट पहात असतो. एकतर, आमचा इथे येण्याजाण्याचा सर्व खर्च बँकच देते. वकिलाची फी तसेच केस संबंधी जो काही खर्च होईल त्याचीही बँक आम्हाला पुरेपूर भरपाई देते. तसंच इथे येण्याचा एक दिवस, जाण्याचा एक दिवस व कोर्टाच्या तारखेचा एक दिवस असे किमान तीन दिवस सुटी मिळून बँकेच्या रोजच्या कामाच्या टेन्शनमधूनही आमची मुक्तता होते. त्यातून मधे जर एखाद दुसरी सुट्टी आली तर सलग चार ते पाच दिवस बँकेच्या कामातून आम्हाला आराम मिळतो.”calm man

माझं बोलणं ऐकून तीव्र अपेक्षाभंग झाल्याचं दुःख सुखदेवच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर उघडपणे झळकत होतं. तो माझ्याकडे अविश्वासाच्या नजरेने पहात असतानाच मी पुढे म्हणालो..

“माझा दैनिक भत्ता प्रतिदिन एक हजार रुपये इतका आहे. त्यामुळे प्रवास खर्चा (TA) व्यतिरिक्त प्रत्येक तारखेला किमान तीन ते पाच हजार रुपये मला दैनिक भत्ता (DA) मिळतो. पुढची तारीख मिळाल्यावर लगेच आम्ही आमच्या फॅमिलीला भेटायला इथूनच आपापल्या गावी जातो. आणि दोन दिवस फॅमिली सोबत राहून मगच पुन्हा नोकरीच्या जागी रुजू होतो. अशाप्रकारे या कोर्टाच्या तारखेच्या निमित्ताने आम्हाला बँकेच्या कामातून सुट्टी मिळते, प्रवास खर्च मिळतो, दैनिक भत्ता मिळतो आणि फॅमिली सोबत राहताही येतं.”

सुखदेव ‘आ वासून’ माझं हे बोलणं ऐकत होता. माझ्या बोलण्यावर विश्वास न बसून त्याने शेजारी उभ्या असलेल्या रहीम चाचांना विचारलं..

“तुम्हाला कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यासाठी बँकेकडून टीए डीए (TA DA) मिळतो हे खरं आहे का ?”

उत्तरादाखल रहीम चाचांनी गेल्याच महिन्यातील त्यांच्या TA Bill ची मंजुरी सुचनाच (Sanction advice) खिशातून काढून त्याला दाखविली आणि म्हणाले..

“मी रिटायर होऊन तीन वर्षे झाली आहेत. तरीही कोर्टाची तारीख अटेंड करण्याचा मला अजूनही पूर्ण TA DA मिळतो. आणि ही केस संपेपर्यंत आम्हा सर्वांना तो तसा मिळतच राहणार आहे.”

“म्हणजे.. मागे तुम्ही मुंबईला RBI लोकपाल कार्यालयात आला होतात तेही बँकेच्याच खर्चाने का ?”

आवंढा गिळत सुखदेवने विचारलं..

“अर्थातच..!” मी म्हणालो.

“बँकेच्याच खर्चाने तेंव्हा मी मरीन ड्राईव्ह वरील आलिशान हॉटेल मध्ये उतरलो होतो आणि फर्स्ट क्लास AC ने प्रवासही केला होता.”

त्याला आणखी जळवण्यासाठी मी पुढे म्हणालो..

“एवढंच नाही, तर ग्राहक मंचाच्या औरंगाबादला झालेल्या सर्व तारखांना हजर राहण्यासाठी मला full TA DA तर मिळालाच पण अन्य किरकोळ खर्च, सुटी आणि फॅमिली सोबत राहण्याचा लाभही मिळाला..”

“म्हणजे.. तुम्हाला कोर्टाच्या तारखांना हजर राहण्याचा कधीच काहीच त्रास झाला नाही ?”

पडलेल्या चेहऱ्याने सुखदेवनं विचारलं..

“कधीच नाही. म्हणूनच तर आम्ही सगळे प्रत्येक तारखेला न चुकता कोर्टात हजर राहतो. पुढची तारीख नजीकच्या डेट ची मिळावी अशीच आमची इच्छा असते.”

माझं हे उत्तर ऐकून सुखदेवच्या मनाची झालेली तगमग, तडफड, चिडचिड त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. त्याचा डाव सपशेल फसला होता. आम्हाला त्रास देणं तर दूरच, उलट आम्ही कोर्टाच्या तारखा एन्जॉय करतो आहोत हे पाहून त्याला आपली प्रचंड फसगत झाल्यागत वाटत होतं. नेहमी यशस्वी होणारा आपला डाव यावेळी आपल्यावरच उलटल्याचं पाहून हताश होऊन स्वतःवरच चरफडत, खांदे पाडून निराश, दुःखी अंतःकरणाने खाल मानेनं तो तिथून निघून गेला.

त्या दिवसानंतर सुखदेवचा या केसमधील सारा इंटरेस्टच जणू संपून गेला. तो सतत तारखांना गैरहजर राहू लागला. कधी कधी त्याची बायको रत्नमाला ही एकटीच कोर्टात हजर रहात असे. रुपेश जगधनेची साक्ष सुरू असल्याने तो मात्र प्रत्येक तारखेला न चुकता हजर रहायचा. कोर्टात रुपेशने आपला आधीच कबुलीजबाब साफ फिरवला. आपण गुन्ह्यातील सहभागाचा पूर्वीचा खोटा कबुलीजबाब पोलिसांच्या मारहाणीच्या भयाने दडपणाखाली दिला होता.. असे त्याने सांगितले. अर्थात कोर्टाचा त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी रुपेशला “उलटलेला साक्षीदार” घोषित केले. रूपेशचे वर्तन संशयास्पद असून पोलीसांनी या महत्त्वाच्या दुव्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसते, असेही न्यायाधीश म्हणाले.

त्याच दरम्यान नेहमीचे न्यायाधीश दीर्घकालीन सुटीवर गेल्याने त्यांच्या जागी आलेल्या नवीन जज साहेबांच्या कोर्टात आमची केस ट्रान्सफर झाली. रुपेशची साक्ष आणि उलटतपासणी संपली होती. “आरोपींपैकी कुणाला रुपेश बद्दल आणखी काही सांगायचे आहे का ?” असे जज साहेबांनी विचारले. आमचे वकील ॲड. मनोहर नेमके त्या दिवशी दुसऱ्या एका केसच्या ऑर्ग्युमेंटमध्ये बिझी होते. त्यामुळे मी शाळेतील वर्गातल्या विद्यार्थ्यासारखा हात उंचावून बोलण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी “तुमचे वकील कुठे आहेत ?” असं विचारलं आणि ते दुसऱ्या केसमध्ये युक्तिवाद करीत आहेत हे समजल्यावर मला बोलण्याची परवानगी दिली.

साक्षीदाराच्या पिंजऱ्यात (Witness box)

उभं राहून मी बोलायला सुरवात केली.. witness

प्रारंभी, रुपेशवर विश्वासाने सिग्नेचर स्कँनिंगचे काम सोपविल्यामुळे त्याला कोणत्याही खातेदाराची नमुना सही (specimen signature) पाहणे सहज शक्य होते हे सांगून त्याच्या अंगी “कुणाचीही सही हुबेहूब गिरवण्याची कला” असल्याचेही न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. गुन्ह्याच्या घटनेच्या दिवशी रुपेशची संशयास्पद हालचाल cctv त रेकॉर्ड झाली असून चेक बुक मागणी अर्ज गहाळ करणे, चेक बुक इश्यू रजिस्टर मध्ये खातेदाराची सही न घेताच त्याला चेक बुक देणे यात आपला सहभाग असल्याचे रुपेशने बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समक्ष कबूल केल्याचेही न्यायाधीशांना सांगितले. अज्ञात संशयित जयदेव खडके याला भेटल्याचे व त्याने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्याला दुसरे चेक बुक सुपूर्द केल्याचेही रुपेशने यापूर्वीच मान्य केले आहे याची सुद्धा मी न्यायाधीशांना आठवण करून दिली.

“वटवलेल्या चेक वरील बनावट सही रुपेशने केलेली नाही..” असा फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट असला तरी या रिपोर्टवर आमचा विश्वास नसून एकतर हा रिपोर्ट “मॅनेज” केलेला असावा किंवा रुपेश ऐवजी कुण्या “भलत्याच” व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना पडताळणीसाठी पाठविण्यात आला असावा असा आम्हाला संशय आहे. त्यामुळे “प्रतिष्ठित तटस्थ पंचांच्या उपस्थितीत रुपेशच्या हस्ताक्षराचा नवीन नमुना प्राप्त करण्यात यावा आणि तो नमुना अन्य मान्यताप्राप्त फोरेन्सिक लॅब कडे पडताळणीसाठी पाठविण्यात यावा..” अशी आमची मागणी असल्याचे मी न्यायाधीशांना अत्यंत नम्रपणे सांगितले.

जज साहेबांपुढे माझे म्हणणे मांडत असतांना अधून मधून मी रुपेशकडेही पहात होतो. त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. आपलं भांडं फुटलं, आपली चोरी पकडली गेली, आपला बुरखा फाटला, आपल्या पापांचा घडा भरला.. असे भाव त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नंतर लज्जेने, भीतीने, शरमेने त्याने जी मान खाली घातली ती बराच वेळ वरतीच केली नाही.

जज साहेब माझ्या बोलण्याने प्रभावित होऊन रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची मागणी मान्य करतील आणि मग “दूध का दूध, पानी का पानी” होऊन सत्य परिस्थिती पुढे येईल आणि आम्हाला खरा न्याय मिळेल अशी मला खात्री होती.

पण झालं उलटंच..! त्या नवीन न्यायाधीशांना केसच्या वास्तवाची काहीच पूर्वकल्पना नसल्याने माझी मागणी ऐकताच ते भडकले. मी उगाच काहीतरी नवीन मुद्दा उपस्थित करून संपत चाललेल्या केसच्या सुनावणीला अनावश्यक फाटे फोडून केस लांबवण्याचा प्रयत्न करतो आहे असेच त्यांना वाटले. रागाने ते म्हणाले..angry judge

“असा पोलिसांच्या तपासावरच संशय घेणं अत्यंत चुकीचं आहे. कशाच्या आधारे तुम्ही हा अंदाज व्यक्त करीत आहात ? पोलिसांवर रुपेशला मदत केल्याचा जो आरोप तुम्ही करीत आहात त्याचा काही ठोस पुरावा आहे का तुमच्याकडे ?”

त्यांच्या या प्रश्नावर मी मूकपणे नकारार्थी मान हलवली.

“रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची तुमची मागणी अमान्य करण्यात येत असून तुम्हाला कडक ताकीद देण्यात येते की यापुढे कोणत्याही पुराव्याशिवाय पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.”

कोर्टाचा हा निर्णय ऐकून माझी घोर निराशा झाली तर रुपेशने सुटकेचा खोल निःश्वास टाकला. कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याची माझी उरली सुरली आशाही अशारितीने संपुष्टात आली.sad man

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १७    भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading