https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 8)

दबकत दबकत पावले टाकीत लांबलचक पोलीस व्हॅनच्या आडोशाने अत्यंत हुशारीने मी बँकेच्या आवारात प्रवेश केला. सुदैवाने माझ्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. सुटकेचा निःश्वास टाकीत माझ्या खुर्चीवर जाऊन बसलो. टेबलावरील जी कामं खूप अर्जंट होती ती ताबडतोब तासाभरात भराभर उरकून टाकली आणि मग स्वस्थ चित्ताने पोलिसांची वाट पहात बसलो.

बाहेरून बराच वेळ पर्यंत पोलिसांच्या शिट्यांचे व गाड्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकू येत होते. दोन्ही बाजूंचा ट्रॅफिक पोलिसांनी रोखून धरल्यामुळे गर्दीचा कोलाहलही कानावर पडत होता. मग अचानकच रस्त्यावरील गोंधळ कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली. मी उत्सुकतेने खिडकी बाहेर पाहिलं तर रस्त्यावरून पोलिसांच्या गाड्या गायब झाल्या होत्या. पोलिसही दिसत नव्हते.

इतक्यात नंदू माळी मेन गेट मधून आत येताना दिसला..

“सकाळी बाहेर कसली गडबड होती ?”

मी विचारलं.

“माहीत नाही साहेब, पण मी आत्ता पोलीस स्टेशन समोरूनच आलो. तिथे खूप गर्दी आहे. कसली तरी प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणतात..”

पत्रकारांना पैसे देऊन वर्तनमानपत्रात हव्या तशा बातम्या छापून आणणे हा सुखदेव बोडखेचा नेहमीचाच धंदा होता. त्यानेच तर ही पत्रकार परिषद आयोजित केली नसेल ?

सकाळचे दहा वाजले होते. रहीम चाचा आणि सुनील सैनी हे दोघेही बँकेत येतांच त्यांना केबिन मध्ये बोलावून घेतले. सकाळच्या बँकेसमोरील पोलिसांच्या उपस्थितीबद्दल त्यांना सांगितलं आणि पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी कधीही बँकेत येऊ शकतात याचीही कल्पना दिली. त्यावर जोरजोरात नकारार्थी मान हलवीत रहीम चाचा म्हणाले..

“बिलकुल नही.. ऐसा हो ही नही सकता साब..! अब हमे पुलिस से डरनेकी कोई जरूरत नही। उन्होंने जितने पैसे माँगे थे, वो हमने दे दिए है..।”

मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“क्या..? आपने उन्हे पैसे दे दिये, और मुझे पूछा या बताया तक नही..?”

मी अंतर्यामी दुखावलो गेलो होतो. आपण अगदी लहान सहान गोष्टींतही सर्वांना विचारून, त्यांचा सल्ला घेऊन निर्णय घेतो. आणि हे तर परस्पर पोलिसांना पैसेही देऊन बसले होते.

“तो क्या.. आपने पुलिस को पैसे दिये ही नही ?”

डोळे विस्फारीत रहीम चाचा उद्गारले..

“लेकिन.. हमे तो पुलिसने ही बताया कि उन्हें आपकी ओरसे पैसे मिल चुके है..! इसीलिए हमने भी उन्हें पैसे देना ठीक ही समझा..”

काही तरी समजुतीचा घोटाळा होत होता. मी पैसे न देताही “माझ्याकडून पैसे मिळाले” असं पोलीस ह्यांना कसं काय सांगू शकतात ?

“लेकिन, आखिर आप मुझसे मिले बिना ही पैसे देने पुलिस स्टेशन गए ही क्यों ? कमसे कम, पैसे देने से पहले मुझे एक फोन लगाकर पुलिसकी बात के सच झूठ का पता तो कर लिया होता ?”

माझा राग अनावर झाला होता..

“साब, जैसे ही हम औरंगाबाद से वैजापूर लौटे तो बैंक आते वक्त रास्तेमें ही अपने चायवाले संजूसे मुलाकात हुई.. वह ही हमे पुलिस स्टेशन ले कर गया.. अगर पुलिस को तुरंत पैसा नही पहुँचाया तो अरेस्ट होने की बात भी उसीने बताई और आपके द्वारा पुलिस को रकम पहुंचाने की बात भी संजूने रास्तेमें ही हमे बताई थी.. इसीलिए पुलिस की बात पर हमने तुरंत यकीन कर लिया…”

अच्छा…! म्हणजे पोलिसांच्या या “दक्षिणा वसूली” चा कर्ता करविता आमचा संजू चहावाला हाच होता तर.. !!

“लेकिन.., इतनी बडी रकम तो आप दोनों के पास भी नही होगी.. फिर भी, बिना बैंक आए.. आपने इतनी जल्दी पैसोंका इंतजाम कैसे किया ?”

माझे प्रश्न संपत नव्हते..

“हम बहुत घबरा गए थे.. हमे लगा कि बेल मिलने के बाद भी उसका कोई फायदा नही हुआ.. पुलिस पैसों के लिए कुछ भी कर सकती है ! पुलिस स्टेशन के पास ही बैंक के एक बड़े और पुराने कस्टमर सेठ हुक़ूमचंदजी की “अग्रवाल प्रोव्हिजन” के नामसे होलसेल किराना की दुकान है.. मेरे पास उनका नंबर था.. मेरे रिक्वेस्ट करने पर चालीस हजार रुपये लेकर वह खुद ही पुलिस स्टेशन आ पहुंचे..”

आमचं असं बोलणं सुरू असतानाच इंस्पे. हिवाळेंनी अतिशय घाईघाईतच केबिन मध्ये प्रवेश केला..

“आमची मागणी मान्य करून तुम्ही आमच्या शब्दाचा मान ठेवलात याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन ! थोड्याच वेळापूर्वी औरंगाबादचे नवीन पोलीस अधीक्षक श्री रघुवीर अवस्थी यांनी वैजापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये वैजापूर, गंगापूर व कन्नड या तीन तालुक्यांसाठी एक अतिरिक्त जिल्हा अधीक्षक (Additional Dist. Supdt. of Police) नेमल्याचे त्यांनी सांगितले.24 oct 3

हे नवीन अ‍ॅडिशनल एस पी साहेब, श्री मोतीराम राठोड हे आजच कामावर रुजू झाले असून तुमच्या केस संदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी इकडेच येण्यास निघाले आहेत. वैजापूरच्या पोलीस उप-अधिक्षिका श्रीमती संगीता लहाने ह्या सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत..”

हिवाळे साहेबांचं असं बोलणं सुरु असतानांच Addl.S.P. साहेबांनी Dy.S.P. मॅडम सोबत केबिन मध्ये प्रवेश केला. आल्या आल्या माझ्याशी हस्तांदोलन करून त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. संगीता मॅडमनी आमच्या बँकेतूनच गृहकर्ज घेतलं असल्यामुळे त्यांच्याशी आधीचाच परिचय होता. ॲडिशनल एसपी साहेबांची वर्तणूक प्रथमदर्शनी तरी खूपच नम्र व आदबशीर वाटली. त्यांचं वैजापूर शहरात स्वागत केलं आणि नवीन कारकिर्दीसाठी त्यांना सुयश चिंतिलं. तेवढ्यात चतुर नंदूने माझ्या कपाटातून शाल व श्रीफळ आणून टेबल वर ठेवलं. ते अर्पण करून नवीन साहेबांचा छोटेखानी सत्कारही केला. चहा घेता घेता राठोड साहेब म्हणाले..

“तुम्ही पोलिसांना केसच्या तपासात योग्य ते सहकार्य करीत नाही, असं ठाणेदार साहेब म्हणत होते..”

मी सावध झालो. केसच्या तपासास सुरवातही न करता ठाणेदार साहेब अकारणच वरिष्ठांचा गैरसमज करून देत होते. आता जास्त मऊ राहून चालणार नव्हतं. यापुढे आक्रमक वृत्ती धारण करूनच स्वसंरक्षण करावं लागेल याची मनाशी खूणगाठ बांधली.

“आणखी कोणत्या प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे सर, पोलिसांना ? बँकेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब पोलिसांनी घेतले आहेत. केसशी संबंधित आवश्यक ती सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केलेली आहेत. घटनेच्या संपूर्ण दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आम्हीच सीडी तयार करून पोलिसांना सुपूर्द केलं आहे. पैसे काढून नेणाऱ्या तथाकथित जयदेव नावाच्या व्यक्तीचे मोठ्या आकारातील रंगीत फोटो काढून ते ही आम्हीच सगळीकडे सर्क्युलेट केले आहेत. एवढंच नाही तर आमच्या शाखेत काम करणाऱ्या एका टेंपररी कर्मचाऱ्याचा या घटनेत सहभाग असावा असा आम्हाला दाट संशय आहे, त्याबद्दलही गेल्याच आठवड्यात मी पोलिसांना पुरेपूर कल्पना दिली होती.. पण पोलिसांनी अद्याप त्या कर्मचाऱ्याला हातही लावलेला दिसत नाही..”

माझ्या या अनपेक्षित भडीमारामुळे राठोड साहेब पुरते गोंधळून गेले. संगीता मॅडमकडे पहात ते म्हणाले..

“काय मॅडम ? काय म्हणताहेत हे मॅनेजर साहेब ? तुम्ही तर मला केसचं ब्रिफिंग करतांना अशा कुणा संशयिता बद्दल साधा ओझरता उल्लेखही केला नाहीत ?”lady police inspector

..आता गडबडून जाण्याची पाळी संगीता मॅडमची होती. नेमकं थोडा वेळ आधीच सब. इन्स्पे. हिवाळे काही अर्जंट काम निघाल्याने मॅडमची परवानगी घेऊन बँकेतून निघून गेले होते. त्यामुळे वरिष्ठांसमोर मॅडमची अवस्था आणखीनच अवघडल्यासारखी झाली.

“सॉरी सर, पण खरं म्हणजे मी सुद्धा अशा संशयिताबद्दल ह्या साहेबांच्या तोंडून आत्ताच ऐकते आहे. मी आजच इंस्पे. माळींकडून याबाबत अपडेट घेते आणि तुम्हाला कळविते..”

” हं..! ही केस किती सेन्सिटिव्ह आहे, याची कल्पना आहे ना तुम्हाला मॅडम ? अशा महत्त्वाच्या धागेदोऱ्यांचा तपास करण्याच्या बाबतीत जरासाही विलंब किंवा हलगर्जीपणा करता कामा नये, हे नीट समजावून सांगा त्या ठाणेदार साहेबांना..”

संगीता मॅडमना असं कडक शब्दात बजावून राठोड साहेब परत जाण्यास निघाले.

“बरंय मग.. ! येतो आम्ही.. केसच्या तपासात तुमचं असंच सहकार्य असू द्या. यापुढे, केस संबंधी कितीही क्षुल्लक पण उल्लेखनीय बाब ध्यानात आल्यास तसंच आणखी कुणाबद्दल किंचितही संशय असल्यास थेट या मॅडमना तसं कळवा.. हॅव अ गुड डे.. !”

ॲडिशनल एसपी साहेब व डेप्युटी सुपरिंटेंडंट मॅडम गेल्यानंतर मी सुटकेचा खोल निःश्वास टाकला. पोलिसांची सकाळची ती धावपळ नवीन डीएसपी साहेबांच्या स्वागताची होती तर.. आपण उगाचंच घाबरलो.. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती.. तसंच झालं.. पण या साऱ्या गडबडीत “मी पोलिसांना त्यांची दक्षिणा पोचती केली” असं खोटं सांगितल्या बद्दल हिवाळे साहेबांना जाब विचारायचं राहूनच गेलं. तो संजू चहावालाही गेल्या दोन दिवसांपासून जाणूनबुजून माझ्या पुढ्यात येणं टाळीत होता..

औरंगाबादला ट्रेनिंग सेंटर वर स्टाफशी झालेल्या चर्चेत रुपेश वर आम्हा सर्वांचा संशय पक्का झाला तेंव्हाच मी इंस्पे. माळी व सब इंस्पे. हिवाळेंना व्हाट्सअ‍ॅप वर सविस्तर मेसेज पाठवून रुपेशची सखोल चौकशी करण्याबद्दल त्यांना विनंती केली होती. सुदैवाने दोघांनीही तो मेसेज पाहिला होता. हिवाळेंनी तर मेसेज वाचून “Ok” असा रिप्लाय ही दिला होता.

पोलीस अधिकारी निघून गेल्यावर त्यांच्याशी काय चर्चा झाली हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी रहीम चाचा व सुनील सैनी हे दोघेही केबिन मध्ये येऊन बसले. मी नंदूला बोलावलं आणि विचारलं..

“अरे, तो संजू का बरं माझ्यापासून

तोंड लपवत फिरतोय..? मघाशी चहा सुद्धा त्यानं नोकराच्या हातूनच पाठवला .. जा बरं, हात धरून बोलावून आण त्याला..!”

माझं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच केबिनच्या दारामागे उभा असलेला संजू खाली मान घालून दबकत दबकत माझ्या खुर्चीजवळ आला आणि चट्कन वाकून त्याने माझे पायच धरले.

“माफी करा सायेब..! ‘तुम्ही दिले..’ असं सांगून मीच पोलिसांना वीस हजार रुपये दिले.. काय करू सायेब..? तुमी या पोलिसांना नीट वळकीत नाही, त्येनला कुनाबद्दल ही दया माया नसते.. फकस्त पैशाचीच भाषा त्येनला समजती.. पैसं दिलं नसतं तर त्येंनी तुमा लोकांना निस्ती अटकच केली नसती तर लै बेक्कार हाल बी केलं असतं.. आन मला ते होऊ द्यायचं नव्हतं.. मला पाहवलं नसतं सायेब ते..”24 oct 10

बोलता बोलता संजू हुंदके देत रडू लागला..

“सायेब, तुमचं माज्यावर लई मोठ्ठं, डोंगरायवढं उपकार हायेत.. दोन वेळा तडीपार झालेला गुंड, मवाली होतो मी.. माझं आतापर्यंतचं सारं आयुष्य जेल मंदीच गेलं हाय.. तुमी आसरा दिला, मोठया मनानं हॉटेलसाठी बँकेसमोर जागा दिली.. तुमच्या आशीर्वादानं हॉटेलचा धंदा बी खूप जोरात चालतो हाय.. एकेकाळी शिवी देऊन संज्या xx, अशी हाक मारणारे लोक संजू शेठ म्हणून ओळखतात सायेब आता मला.. ! ही इज्जत, ही प्रतिष्ठा फकस्त तुमच्यामुळे लाभली मला.. त्या उपकारांची थोडीफार परतफेड करण्यासाठी म्हणूनच मी तुमच्या नावाचे पैसे पोलिसांना दिले..”

माझे घट्ट धरलेले पाय संजूने अजून सोडले नव्हते. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात थरथरत्या करुण स्वरात तो म्हणाला..

“मला काय वाट्टेल ती सजा द्या साहेब माझ्या या चुकीबद्दल.. पाहिजे तर आजपासून मला बँकेत पायही ठेऊ देऊ नका.. पण कृपा करून माझ्या हेतूबद्दल मनात शंका आणू नका.. तुमच्याबद्दल लई आपुलकी वाटते, खूप श्रद्धा आणि आदर आहे तुमच्याबद्दल म्हणूनच पोलिसांच्या त्रासापासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी धावपळ करून, कसेबसे इकडून तिकडून थोडे थोडे पैसे गोळा करून ते पोलिसांच्या तोंडावर फेकले..”

संजुच्या प्रामाणिक हेतुबद्दल कसलीच शंका नव्हती. त्याची कळकळ ही खरीच होती. त्याचे खांदे धरून त्याला उठवीत म्हणालो..

“उठ संजू.. असा रडू नकोस! जा.. सगळ्यांसाठी फक्कडसा चहा करून आण..”

डोळे पुशीत संजू उठला. बाहेर जाताना केबिनच्या दरवाजापाशी थांबून म्हणाला..

“सायेब, आणखी एक शेवटचीच विनंती..! कृपा करून मला पैसे परत करण्याचं मनातही आणू नका. मी ते घेणार नाही. भक्तीभावानं अर्पण केलेत ते पैसे मी असं समजा आणि माझ्या भावनेची कदर करा..”

संजू बँकेबाहेर गेल्यावर अवघ्या पाचच मिनिटांत इंस्पे. माळी व सब इंस्पे. हिवाळे ही जोडगोळी बँकेत हजर झाली. बहुदा राठोड साहेब आणि संगीता मॅडम या वरिष्ठांनी त्या दोघांचीही चांगलीच हजेरी घेतली असावी. कारण त्या दोघांचाही सूर आता बराच नरमाईचा भासत होता. आल्या आल्याच त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.Capture

“तुमचा टेम्पररी कर्मचारी आणि आमचा होमगार्ड रुपेश जगधने याच्याबद्दल तुम्ही संशय व्यक्त केला आहे. तुमच्याकडे त्याच्याविरुद्ध काही ठोस पुरावे आहेत का ?”

“पुरावे शोधणं हे पोलिसांचं काम आहे. रुपेश जगधने दुसऱ्यांची सही गिरवण्यात एक्सपर्ट आहे तसेच सिग्नेचर स्कॅनिंगचे काम करीत असल्याने कोणत्याही कस्टमरची सही माहीत करून घेणे त्याला सहज शक्य आहे. शिवाय चपराशाची कामेही करीत असल्याने सही न घेता कस्टमरला चेकबुक डिलिव्हर करणे, चेकबुकसाठीचा अर्ज गायब करणे अशी कामेही तोच बेमालूमपणे करू शकतो. शिवाय घटनेच्या दिवसापासून तो कामावरही आलेला नाही. या साऱ्या गोष्टी रुपेश बद्दल संशय व्यक्त करण्यास पुरेशा आहेत असे मला वाटते..”

माझ्या या बोलण्यावर नकारार्थी मान हलवीत इंस्पे. माळी म्हणाले..

“नाही..! फक्त एवढयाच गोष्टींवरून रुपेशला संशयित मानता येणार नाही. टेम्पररी कर्मचाऱ्यावर सिग्नेचर स्कॅनिंग सारखे महत्वाचे व गोपनीय काम सोपविणे यातून तुमचाच हलगर्जीपणा सिद्ध होतो. आणि.. गेले काही दिवस रुपेश आमच्यातर्फे पोलीस बंदोबस्ताचे काम करीत आहे म्हणूनच तुमच्याकडे कामावर आलेला नाही..”

इंस्पे. माळी रुपेशला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असं मला उगीचंच वाटून गेलं.

“ठीक आहे, तर मग मी तुम्हाला घटनेच्या दिवशी रुपेशची सीसीटीव्हीत दिसणारी हालचालच दाखवतो म्हणजे तुम्हालाही माझ्या संशयाबद्दल खात्री पटेल..”

असं म्हणून घटनेच्या दिवसाचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग प्ले करून मी कॉमेंटरी करू लागलो.

“हे पहा सकाळचे साडे दहा वाजले आहेत. कॅमेरा नं 1, बँकेचे ग्रील गेट. मुख्य संशयित जयदेव खडके बँकेत प्रवेश करतो आहे. आणि त्याच्या अगदी बरोबरीनेच हा कोण बरे आत प्रवेश करतो आहे..? अरे, हा तर आपला रुपेश ! जणू ते दोघेही सोबतच बँकेत आलेले असावेत.

कॅमेरा नं 2. सकाळचे अकरा वाजले आहेत. रुपेश आपली नेहमीची जागा सोडून कॅशियरच्या केबिनजवळ खुर्ची टाकून बसला आहे. जयदेव टोकन घेऊन कॅश घेण्यासाठी कॅशियर केबिन समोर उभा आहे. आता रुपेशकडे नीट लक्ष द्या. तो एकटक जयदेव कडेच पाहतो आहे. मधूनच त्याला डोळ्याने खुणावतोही आहे. कॅशियर कडे पुरेशी कॅश नाही. तो पेट्रोल पंपाची कॅश येण्याची वाट पाहतो आहे. त्यामुळेच त्याने जयदेवला थोडावेळ थांबण्यास सांगितले आहे.

आता रुपेशकडे पहा. तो कॅशियर सुनील सैनीशी बोलतो आहे. पेट्रोल पंपाची कॅश कधी येणार हेच तो विचारीत असावा. आज पंपाची कॅश उशिरा येणार असल्याचे कॅशियरने रुपेशला सांगितले असावे. ती पहा रुपेशने डोळे व मान हलवून जयदेवला बँकेतून निघून जाण्याची खूण केली. जयदेव आता बँकेबाहेर जातो आहे. अरे..! हे काय ? रुपेश सुद्धा त्याच्या मागोमागच बँकेच्या बाहेर पडला आहे. आता बँकेच्या कंपाउंड मधील पार्किंग चा कॅमेरा नं. 8 पहा.. रुपेश मोटार सायकल वरून बँकेबाहेर जाताना दिसतो आहे.

दुपारचे तीन वाजले आहेत. कॅमेरा नं 1.. जयदेव बँकेत पुन्हा प्रवेश करतो आहे. सकाळ प्रमाणेच रुपेशही त्याच्या अगदी पाठोपाठच बँकेच्या आत येतो आहे.24 oct 5

दुपारचे साडेतीन झाले आहेत. कॅमेरा नं. 2.. जयदेवने पाच लाख ऐंशी हजार रुपये कॅश घेतली आहे. कॅशियर केबिन शेजारीच बसलेल्या रुपेशचे सतत त्याच्याकडेच लक्ष आहे. जयदेवने पैसे थैलीत टाकल्यावर रुपेशच्या चेहऱ्यावरील काम फत्ते झाल्याच्या समाधानाचे ते हास्य पहा.

पुन्हा कॅमेरा नं. 1. जयदेव बँकेबाहेर निघाला आहे. रुपेश ही त्याच्या अगदी पाठोपाठच बँकेबाहेर पडला आहे. पुन्हा पार्किंगचा कॅमेरा नं. 8.. रुपेश मोटारसायकल वरून बाहेर जातो आहे. नक्कीच तो जयदेव बरोबरच बाहेर गेला असावा.

त्यानंतर म्हणजे दुपारी साडेतीन नंतर रुपेश बँकेत परत आलाच नाही. तसंच त्या दिवसानंतर आजपर्यंत तो एकदाही बँकेत आलेला नाही.”

सीसीटीव्ही स्क्रीन ऑफ करून त्या इन्स्पेक्टर द्वयीकडे पहात मी म्हणालो..

“आता बोला..! हे रेकॉर्डिंग पाहिल्यावर कुणाचीही खात्री पटेल की रुपेश आणि जयदेवचा एकमेकांशी संबंध असलाच पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता अधिक वेळ न घालविता तुम्ही ताबडतोब रुपेशला ताब्यात घ्या आणि त्याला बोलतं करा..”

“व्वा..! साहेब, कमाल केलीत तुम्ही..”

टाळ्या वाजवून कौतुक करीत सब इंस्पे. हिवाळे म्हणाले.

इंस्पे. माळींनी सुद्धा उभं राहून “थँक यू” म्हणत माझ्याशी अभिनंदनपर हस्तांदोलन केलं. नंतर माझा निरोप घेत ते म्हणाले..

“तुम्ही काळजी करू नका. आम्ही आजच त्या रुपेशला ताब्यात घेतो..”

ठाणेदार आणि नायब ठाणेदारांची ती दुक्कल बँकेतून निघून गेल्यावर मी समाधानाचा सुस्कारा सोडला. अखेर पोलिसांनी या केस मध्ये काहीतरी हालचाल करण्याचं निदान मान्य तरी केलं होतं..

(क्रमशः 9)

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Posts by all authors

Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Blissful Life

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading