https://goodworld.in A website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-2 Sant Tukaram abhang-2

vithal rukmini

Sant Tukaram abhang-2

संत तुकारामांचे अभंग-2

संत तुकारामांचे अभंग आपण बघत आहोत. लौकिक अर्थाने संत तुकारामांचे जीवन हे कष्टाने भरलेले होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय जो सावकारीचा होता, तो त्यांनी आपली ऋणकोंची कर्जें माफ करून संपवून टाकला होता. संसारात त्यांचे चित्त लागत नव्हते. त्यात दुष्काळ पडला. बायको मुलांना खायला घालायची पण पंचाईत. संसारात मन लागत नव्हते आणि ईश्वरप्राप्ती अजून झाली नव्हती, अशा विमनस्क अवस्थेत, आपल्या आराध्य दैवताला- पंढरीच्या पांडुरंगाला आळवणे एवढेच त्यांना सुचत होते

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ

मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ

तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ

भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ।

आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा

शरण मी आलों तुज निवारूनियां पापा

अंजन लेववूनी करीं मारग सोपा

जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ।

होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार

जात होतों जनामागें तो हि सांडिला आधार

हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार

फिरली माझीं मज कोणी न देती आधार ।

जोंबरी चळण गा तोंवरी म्हणती माझा

मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा

इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा

कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ।

गुंतलो या संवसारें केसा झालोंसें अंध

मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध

स्वहित न दिसेचि केला आपुला वध

लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ।

लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेंसा

सांडिली वाट मग झालों निराळा कैसा

पाहातों वास तुझी थोर करूनी आशा

तुका म्हणे वैद्यरजा पंढरीच्या निवासा ।

यातील इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा या ओळी विशेषतः ज्यांचे वय झाले आहे, एक एक अवयव साथ सोडत आहेत, त्यांच्या मनाला भिडतील अशा आहेत- “इंद्रियें मावळली” ही शब्दरचना किती प्रभावी आहे! आणि “आला बागुल आजा”- लहानपणी आई ज्या बागुलबुवाची भीती दाखवायची तो आता वृद्धपणी दिसू लागला- आणि कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा तरुणपणी निरोगी आणि देखणा असणारा देह म्हातारपणी किती वेगळा आणि कुरूप दिसू लागला! तरुणपणी संसारात गुंतल्याने, मी आणि माझे या माया, तृष्णेच्या जाळ्यात गुंतल्याने देवाकडे चित्त लागले नाही- स्वहित साधण्याची आठवण राहिली नाही- म्हणून आता पंढरीच्या  वैद्याचा धावा करीत आहे.

वरील अभंगातील वर्णन हे आपल्यासारख्या संसारी माणसाचे वर्णन करण्यासाठी केले असावे. कारण तुकाराम महाराज तर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.


जेंव्हा पांडुरंगाची कृपा झाली, त्याने आपली भक्ति दिली, तेंव्हा भक्तिरसात न्हाऊन त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

विठोबाचीं वेडी आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवूं गोविंदा

सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचें कवतुक


आहा आहा रे भाई ।

खालील काही अभंग -आहा आहा रे भाई । असे म्हणून खूप मोलाचा उपदेश केला आहे-

आहा आहा रे भाई ।

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ।

पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ।

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ।

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर

पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ।

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ।

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी

पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी

केशवदास नटतसे ।

वरील अभंगात विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी पंथाची तत्वें सांगितली आहेत- अभिमान जिंका, देवाच्या भक्तिमध्ये लज्जा आणि मान ठेवू नका, पर नारीला माऊलीसमान माना, परधनाची आशा धरू नका ( ह्या दोन तत्वांची आज समाजाला किती आवश्यकता आहे!), सोमवार आणि एकादशी व्रत करा, (वारकऱ्यांची ही ओळख आहे).


यापुढील एक रचना अगदी रोखठोकपणे समजातील अप प्रवृत्तींवर प्रहार करणारी आहे-

आहा आहा रे भाई ।

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वायां बाहेरी

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा

विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां

गांवींचिया देवा नाही दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना

सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना

खाचेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं

तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावे

 बाईलेचा दास- पितरांस उदास- जन्मदात्या आई वडिलांच्या उपकारांची जाणीव न ठेवणे- हे प्रत्येक पिढीत वाढत चालले आहे. ‘दान’ देण्याची दानत कोणामध्ये राहिली नाही- प्रत्येकजण फक्त घेण्याचेच बघतो..

 ________________

या उलट यापुढील रचनेत, जे लोक देवाला आळवतात, माता पित्यांची सेवा करतात, इतरांचे सुख दुःख जाणतात अशा परोपकारी जनांना मनापासून नमन करतात-

आहा आहा रे भाई ।

नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे

नमो तयां जाणे आणिकांचें सुखदु:ख । राखे तहान भूक तया नमो

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी

तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे


यापुढील रचनेत गंगा, पिंपळ, तुळशी, रुद्राक्ष इत्यादि पवित्र वस्तूंचे महत्व सांगतात.

आहा आहा रे भाई ।

 गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ

तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ।

गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्‍वरू

झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न म्हणावी ।

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी

तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ।

तुकाराम महाराज, आपले चरित्र काही अभंगांमधून अगदी वास्तव रीतीने वर्णन करतात, असे काही अभंग आपण पुढील भागात पाहणार आहोत.

 

माधव भोपे

 

संत तुकारामांचे अभंग-1 Sant Tukaram abhang-1

tukaram-3

Sant Tukaram abhang-1

संत तुकारामांचे अभंग-1

महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांबद्दल माहिती करून घेतांना, सुरुवातीच्या १० भागांमध्ये आपण १३ व्या शतकातील संत नामदेव यांच्या अभंग संपदेतील काही अभंगांची माहिती घेतली.

येत्या काही भागांमध्ये आपण १६ व्या आणि १७ व्या शतकातील, थोर संत कवि तुकाराम महाराज यांच्या रसाळ अभंगांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि रचना इथल्या प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर यांच्या रक्तातच भिनले आहेत असे म्हटले तरी चालेल, इतके ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहेत. वारकऱ्यांच्या तोंडात तर संत तुकारामांचे अभंग सतत असतात, कीर्तनकारांच्या कीर्तनातही संत तुकारामांच्या अभंगांशिवाय पान हलत नाही. आणि घरोघरी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकाराम यांचे हरिपाठाचे अभंग हे नित्य म्हटल्या जाणाऱ्यापैकी आहेत.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची

संत तुकारामांच्या अभंगांची शब्दरचना अत्यंत प्रभावकारी आणि प्रत्ययकारी आहे. त्यांचे अभंग हे त्यांच्या अनुभवातून आपोआप उमटलेले शब्द आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक रचना ही सरळ मनाला भिडते.

संत नामदेवांचे राहिलेले कार्य त्यांनी आपल्याकडून करून घेतले आहे, अशी तुकाराम महाराजांची धारणा होती.

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन करणारे  कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले,  व तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”

भागवत धर्माचा, वारकरी पंथाच्या इमारतीचा पाया ज्ञानदेवांनी रचला, आणि संत तुकाराम हे त्या इमारतीचे कळस झाले, असे संत बहिणाबाई म्हणून गेली आहे.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

 

संत तुकारामांच्या काळी, महाराष्ट्रात मोगल आणि इतर आक्रमकांचा धुमाकूळ सुरू होता. प्रजेला कोणी वाली उरले नव्हते. लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. अशा वेळी, जनजागृती करण्याचे आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे कामही संत तुकारामांनी केले. त्याच वेळी छत्रपति शिवाजी महाराजांचा उदय झाला. संत तुकारामांची आणि शिवाजी महाराजांची भेट प्रसिद्ध आहे.

 

संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहतांना आपण सुरूवातीला त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले काही अत्यंत प्रसिद्ध अभंग पाहणार आहोत.

 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

 

 

अत्यंत कमी शब्दात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणणारा हा अभंग हा वारकऱ्यांच्या, कीर्तनकारांच्या अत्यंत आवडीचा आहे.


 

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळही

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं

आपल्या विठ्ठलाचे सौंदर्य वर्णन करतांना तुकाराम महाराज त्याला ‘राजस सुकुमार- मदनाचा पुतळा-‘ अशी उपमा देतात. त्याच्यासमोर चंद्र आणि सूर्य यांचे तेज लोप पावते. ‘कासे सोनसळा- कंबरेला सोनेरी पितांबर आणि- पांघरे पाटोळा (पाटोळा म्हणजे पांघरायचे वस्त्र) असा हा घननीळ- मेघासारखा निळा रंग असलेला माझा विठ्ठल पाहण्यासाठी मला धीर निघत नाही.- याठिकाणी तुकाराम महाराज स्वतःला गोपीच्या स्वरूपात पाहतात- आणि म्हणतात- सकळही तुम्ही व्हा गे एकसवा- तुम्ही सगळ्या एका बाजूला व्हा- आणि मला माझ्या घन नीळाला पाहू द्या.

 

खेळिया

 

मागे संत नामदेवांचे अभंग पाहतांना आपण नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव-शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

या अभंगात संत नामदेवांनी संसार हा खेळ समजून कसा खेळायचा ते सांगितले आहे ते पाहिले होते आणि त्यात त्यांनी सहजरित्या अद्वैत सिद्धांत सांगितला होता.

संत तुकाराम सुद्धा त्यांच्या पर्यन्त होऊन गेलेल्या संतांची महति सांगतांना, हा खेळ त्याच्या नियमानुसार जो खेळेल तोच ‘उतरेल’ असे सांगतात. सगळीकडे एकत्व पाहिल्यास तुझ्यावर ‘डाव’ येणार नाही. द्वैतबुद्धि ठेवली, तर फसगत होईल. त्रिगुणांच्या फेऱ्यात सापडला तर दुःखी होशील, पण ‘या चौघांची’ म्हणजे चार वेदांची आज्ञा पाळशील तर दुःखी होणार नाहीस असे सांगतात.

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोघांची तरी धरीं सोई रे

 

खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयांची घाई रे ।

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे

 

या खेळात गुंतायचे नाही- निराळेच राहायचे- खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा- नामदेव या शिंप्याच्या पोराने विठ्ठल ‘बसवंत’ केला- तो खेळात नाही अडकला.

 

आपुल्या संवगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे

एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ।

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे

कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे

सकळिकां मिळोनी एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे ।

रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे

पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे

ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी । तो ही खेळिया निवडिला रे ।

ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे

जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे

एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ।

 

ब्राह्मणाचा पोर- म्हणजे एकनाथ- याने आपले गुरू -जनार्दन यांना ‘बसवंत’ केले- आदर्श मानले आणि गुरूंच्या उपदेशामुळे, ते स्वतःच ‘बसवंत’ झाले.

आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे

तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे

एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ।

 


 

आणि खालील अभंगात- भीमातीरि विठ्ठलाच्या आनंदात नाचणाऱ्या वैष्णवांच्या आनंद सोहळ्याचे अप्रतिम वर्णन केले आहे. हा अभंग स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतानी अजूनच विलोभनीय केला आहे-

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे

क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे

कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।

लुब्धली नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां रे

पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।

वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती रे

निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

वरील ओळी ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो- मातले हे वैष्णव वीर रे! काय शब्दरचना आहे!

संत तुकारामांचे ‘तुकाराम गाथा’ या स्वरूपात जवळ जवळ ४५८३ अभंग आहेत. सगळ्या अभंगांचा अभ्यास करायचा म्हटले तर अक्खा जन्म सुद्धा कमी पडेल. आपण येत्या काही लेखांत, आचार्य विनोबा भावे यांनी निवडलेले काही अभंग आणि इतर काही अभंग पाहणार आहोत.

 

 

माधव भोपे 

Mind blowing experiences of a Banker-15 एका बँकरचे थरारक अनुभव-15

police official

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 15)

विवादित चेकवरील सही बनावट असल्या बद्दलचा CFSL संस्थेचा अहवाल मी क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिला तसेच ॲड. ऋतुराज यांनाही त्याची माहिती दिली. ते म्हणाले..

cfsl-1

cheque

“या बद्दल सध्या कुठेही वाच्यता करू नका.. हा बँकेचा अंतर्गत चौकशी संबंधी अहवाल आहे आणि बँकेलाच तिच्या नियमावली व कार्यपद्धती नुसार त्यावर यथावकाश निर्णय घेऊ द्यात. चुकून जर सुखदेवला या अहवाला बद्दल समजलं तर तो क्षणभरही थांबायला तयार होणार नाही आणि पुन्हा पेपरबाजी वगैरे करून बँकेवर दडपण आणून बँकेला तडकाफडकी नुकसान भरपाई देण्यास भाग पाडेल.”

सुदैवाने ग्राहक मंचाची पुढची तारीख दोन महिने नंतरची होती. पोलिसांनी पुण्यास पाठविलेल्या चेक वरील सहीचा हस्ताक्षर तपासणी अहवाल जर त्यांना या दरम्यान प्राप्त झाला असता तर मात्र सुखदेव पासून ही बातमी जास्त काळ लपून राहिली नसती. त्यामुळे हाती पडलेल्या हस्ताक्षर तपासणी अहवालावर बँकेने शीघ्रतेने निर्णय घ्यावा अशी मी क्षेत्रीय कार्यालयाला विनंती केली.

याच दरम्यान दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वैजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख इन्स्पेक्टर माळी यांची बदली पैठण इथे झाली. तसेच सब. इंस्पे. हिवाळे यांची देखील स्थानिक गुन्हे शाखा (LCB) औरंगाबाद इथे बदली झाली. या दोन्ही बदल्या Complaint Basis वरच झाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे रविशंकरची बदली बीड जिल्ह्यातील “मादळमोही” इथे झाली होती. त्या आडमार्गावरील गावातून आईच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी मुंबईला जाणे अवघड असल्यामुळे ही बदली रद्द करून महामार्गा जवळील ठिकाणी व्हावी यासाठी त्याची धडपड सुरू झाली.

वैजापूर पोलीस ठाण्याचे नवीन फौजदार जगन राठोड हे एक अत्यंत उग्र, रासवट आणि उर्मट असं व्यक्तिमत्व होतं. आल्या आल्या त्यांनी सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाया करून सामान्य नागरिक व गुंड या दोघांवरही ही भीतीयुक्त जरब बसवून एक प्रकारची दहशतच निर्माण केली होती. रस्त्यावर बाचाबाची, किरकोळ भांडणे करणारे नागरिक, जादा पॅसेंजर बसवणारे रिक्षा चालक, मटका खेळणारे जुगारी तसेच नशेत तर्र असणारे दारुडे यांना निर्दयीपणे भर रस्त्यात अमानुष मारहाण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

बरेच दिवसांत सुखदेव बँकेकडे फिरकला नव्हता. मुंबईत लोकपाल कार्यालयात झालेली मानहानी व अपमान तो अद्याप विसरलेला नव्हता. “पैसे देऊन न्याय विकत घेऊन ज्याप्रमाणे मला रिझर्व्ह बँकेच्या शिपायांच्या हातून बखोटं धरून बाहेर काढलं होतं, अगदी त्याचप्रमाणे.. वाट्टेल तितका खर्च करीन पण एकदा तरी ह्या साहेबांची वैजापुरातून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही..” अशा वल्गना करीत संतापाने धुमसत तो बँकेसमोरून चकरा मारीत असतो असे कस्टमर्स कडून समजत असे.

अशातच एके दिवशी राजू चहावाला घाईघाईने बँकेत शिरला. माझ्या केबिनपाशी येताच दारातच थबकून तो उभा राहिला. काकुळत्या नजरेने माझ्याकडे पहात तो म्हणाला..

sanju chaywala

“आत येण्याची मला मनाई केली आहे तुम्ही.. ठाऊक आहे मला..! पण राहवलं नाही, जीवाला चैनच पडेना म्हणून आलो साहेब तुमच्याकडे.. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा.. फक्त पाचच मिनिटं माझं बोलणं ऐकून घ्या..”

त्याच्या डोळ्यातील करुण भाव आणि अजिजीचा स्वर यामुळे मी विरघळलो.. हातानेच त्याला आत येण्याची खूण केली. तो आत येऊन बोलणं सुरू करणार, एवढ्यात त्याला थांबवून मी म्हणालो..

“पण हे बघ.. ! पोलीस स्टेशनची कोणतीही बातमी किंवा निरोप तू मला सांगायचा नाहीस..”

यावर काही न बोलता माझ्याकडे पहात दोन क्षण तो तसाच गप्प उभा राहिला. मग खाली मान घालून म्हणाला..

“आता साहेब.. दिवसभर मी पोलीस स्टेशन मधेच असतो, तेंव्हा बातमीही तिथलीच असणार.. पण मी फक्त तुम्हाला सावध करायला आलोय.. मी तिथे जे ऐकलं, जे पाहिलं तेच मी तुम्हाला सांगतोय.. तुम्ही नीट ऐकून घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा..”

“ठीक आहे.. सांग पटकन..!”

त्याला लवकर कटवण्यासाठी मी म्हणालो.

“तो सुखदेव गेले चार दिवस रोज ठाण्यात येतोय. बँकेच्या स्टाफला काहीही करून त्रास देऊन परेशान करा अशी नवीन फौजदार साहेबांना तो सतत विनंती करतोय. त्यांना गळंच घालतोय म्हणा ना ? फौजदार साहेब आधी त्याचं काही ऐकायलाच तयार नव्हते. पण ते खूप लोभी असल्यामुळे सुखदेवने जेंव्हा त्यांना पैशांची लालूच दाखवली तेंव्हा कुठे ते तयार झाले. एक दोन दिवसांत साऱ्या आरोपींना ठाण्यात बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतो असा त्यांनी शब्द दिलाय त्या सुखदेवला..”

इतकं बोलून क्षणभर थांबून राजू पुढे म्हणाला..

“साहेब, हे नवीन फौजदार खूप लालची आहेत. मारहाण करून दहशत पसरवून सर्वच अवैध धंदेवाल्यांचे हप्ते त्यांनी भरपूर वाढवून घेतले आहेत. शिवाय हप्ते घेऊनही वर पुन्हा कोणत्या धंदेवाल्यावर कधी धाड टाकतील याचाही काही नेम नाही. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा हा माणूस आहे. त्यामुळे त्याच्यापासून खूप सावध राहा.. बस ! एवढंच सांगायला आलो होतो मी..”

एवढं बोलून मागे वळून कुठेही न बघता वाऱ्याच्या वेगाने राजू निघून गेला.

पोलिसांनी केसचा तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) सुद्धा दाखल केलं असल्यामुळे त्यांचा आता आमच्या केसशी काहीही संबंध उरला नसल्याची वस्तुस्थिती मला माहित होती. शिवाय आम्ही पाचही जणांनी तसा अटकपूर्व जामीनही मिळवलाच होता. भित्र्या स्वभावाच्या राजूला असं इतरांना घाबरवून टाकण्याची सवयच आहे असं समजून मी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केलं. अशातच दोन चार दिवस निघून गेले आणि मी ही गोष्ट पार विसरून गेलो.

त्या दिवशी शनिवार होता. अर्धा दिवसच बँक असल्याने सर्वांना लवकर काम आटोपून घरी जाण्याची गडबड होती. चार साडेचार वाजेपर्यंत आपापलं काम संपवून अर्धा अधिक स्टाफ बँके बाहेरही पडला होता. येवल्याहून जाणं येणं करणारे रहीम चाचा घराकडे निघण्यापूर्वी मला “गुड बाय” करण्यासाठी केबिनमध्ये आले असतांनाच एक महिला पोलीस अधिकारी “आत येऊ का सर ?” असं अदबीने विचारून आत शिरली.

lady police officer

“मी, सब. इंस्पे. वर्षा महाले..! हिवाळे साहेबांच्या जागेवर आले आहे. एका अर्जंट कामाच्या संदर्भात फौजदार राठोड साहेबांनी चेक फ्रॉड केसच्या पाचही आरोपींना ताबडतोब ठाण्यात बोलावले असून तुम्हाला सोबत घेऊन येण्यासाठी मला इथे पाठविले आहे. तेंव्हा तुम्ही तुमची सर्व जण आपापली कामं लवकर आटोपून घ्या, आणि माझ्या सोबत चला. पाहिजे तर तोवर थांबते मी इथेच..”

आम्हाला ठाण्यात नेण्यासाठी नवीन लेडी सब. इंस्पे. स्वतःच बँकेत आल्यामुळे आता अन्य काही उपायच उरला नव्हता. “मुळीच घाबरू नका. पाहू या तरी हे नवीन आलेले फौजदार साहेब काय म्हणतात ते..” असा धीर देत सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी ठाण्यात गेलो.

आम्ही ठाणे प्रमुखांच्या दालनात शिरताच आम्हाला आपाद मस्तक न्याहाळीत आणि आपल्या टोकदार मिशांवर हात फिरवीत ते जगन राठोड नावाचे दणकट शरीरयष्टी, दमदार आवाज व रापलेला राकट चेहरा असलेले फौजदार म्हणाले..

“या ssss ! कैद्यांची हजेरी घेतोय सध्या मी.. तोपर्यंत तुम्ही या भिंतीला टेकून निमूटपणे एका रांगेत उभे रहा.. तुमच्याकडे मग नीट फुरसतीने बघतोच..!”

police-3

आम्हाला असं कोपऱ्यात उभं रहायला सांगून त्यांनी एकेका कैद्याला बोलावणं सुरू केलं. भीतीने गर्भगळीत झालेल्या एका मध्यम वयाच्या फाटक्या इसमाला धरून आणून त्याला फौजदार साहेबांच्या पुढ्यात उभं करीत तेथील हवालदार म्हणाले..

“साहेब, हा बद्रुद्दीन.. चार फटके खाल्ल्यावर, आतापर्यंत गावातून तीन सायकली चोरल्याचं कबूल केलंय ह्याने..”

“ठीक आहे, उद्या कोर्टात हजर करा ह्याला.. चल..! हात पुढे कर ..!”

फौजदार साहेबांनी असं दरडावताच त्या फाटक्या इसमाने थरथरतच आपला उजवा हात पुढे केला. टेबलावर ठेवलेला विशिष्ट आकाराचा, जेमतेम एक फूट लांबीचा चामड्याचा जाडजूड पट्टा हातात घेऊन फौजदार साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी सपकन तो त्याच्या तळहातावर मारला. प्रचंड वेदनेने त्या भुरट्या चोराचा चेहरा कसनुसा झाला. त्याच्या कळवळण्याकडे लक्ष न देता निष्ठुरपणे फौजदार म्हणाले..

“चल.. आता दुसरा हात पुढे कर !”

police beating

त्या चोराने घाबरून दुसरा हात पुढे करण्यास किंचित आढेवेढे घेतले तेंव्हा त्यांनी त्याच्या पायावरच त्या आखूड पट्ट्याने सपासप वार केले. शेवटी नाईलाजाने तो अघोरी मार चुकवण्यासाठी त्याने आपला दुसरा हात पुढे केला. फौजदार साहेबांनी यावेळी दात ओठ खाऊन त्या तळहातावर पट्ट्याने पहिल्यापेक्षाही जोरदार प्रहार केला. अतीव वेदनेपायी मारामुळे लालबुंद झालेला तो तळहात त्या सायकल चोराने आपल्या दोन्ही मांड्यांत घट्ट दाबून ठेवला. त्याला धक्का मारून बाजूला सारत फौजदार साहेबांनी पुढच्या कैद्यास बोलावले आणि त्यालाही तशीच अमानुष मारहाण केली. सलग अर्धा तास चाललेली ती कैद्यांची क्रूर, निर्दयी, माणुसकीशून्य मारझोड आम्ही धडधडत्या छातीने बघत होतो.

पोलीस कोठडीतील सर्व कैद्यांची ही यातना परेड आम्हाला घाबरवण्यासाठीच जाणून बुजून आमच्या समोर घेतली जात होती. तसंच आम्हाला बसायलाही न देता दीर्घकाळ तसंच उभं ठेवून आमचा हेतुपुरस्सर अपमानही केला जात होता. तरुण रविशंकर आणि सतरा वर्षे आर्मीत घालवलेला सैनी, हे दोघेही पोलिसांची ही थर्ड डिग्रीची पद्धत पाहून आतून हादरून गेले होते. हळव्या मनाचे रहीम चाचा आणि अल्लड, निरागस बेबी सुमित्रा हे दोघे तर भीतीने थरथरायलाच लागले होते. फौजदार साहेब मधूनच तिरप्या नजरेने आमच्याकडे पहात होते आणि आम्हा सर्वांचे भयचकित चेहरे पाहून हलकेच मिशीतल्या मिशीत हसत होते.

कैद्यांचे यातना सत्र संपल्यावर आमच्याकडे वळून ते म्हणाले..

“आमच्या असं कानावर आलं आहे की पोलिसांनी आमच्या कडून पैसे खाल्ले असं सांगून तुम्ही जनतेत पोलिसांची बदनामी करत आहात.. चार्जशीट दाखल झालं म्हणजे पोलिसांचा संबंध संपला, असं समजू नका. आम्ही चार्जशीट मध्ये कधीही आणि कितीही नवीन, खरी वा खोटी कलमं ॲड करू शकतो. त्याच्या तपासासाठी तुम्हाला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडीतही ठेवू शकतो. आणि.. आमचा तपास कसा असतो त्याची कल्पना यावी म्हणून आत्ताच एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला..”

हातातील लाकडी रूळ आमच्या दिशेने रोखत ते पुढे म्हणाले..

“आपण निर्दोष आहोत असं तुम्हाला कितीही वाटत असलं तरी आमच्या दृष्टीने तुम्हीच दोषी आणि आरोपी आहात. तसं नसतं तर आधीच्या फौजदार साहेबांना तुम्ही प्रत्येकी वीस वीस हजार रुपये दिलेच नसते. काय..? खरी आहे ना आमची माहिती ?”

फौजदार साहेबांनी दरडावून विचारलेल्या या प्रश्नावर रहीम चाचांनी घाबरून होकारार्थी मान डोलावली.

“आज आपली पहिलीच भेट होती म्हणून वॉर्निंग देऊन एवढ्यावरच सोडतोय. यापुढे जेंव्हा जेंव्हा पोलीस स्टेशनचं बोलावणं येईल तेंव्हा तेंव्हा वेळ न घालवता ताबडतोब इथे हजर व्हायचं. तसंच जसे पूर्वीचे फौजदार गेले तसेच त्यांना तुम्ही दिलेले पैसेही त्यांच्या बरोबरच गेले. आता तुम्हाला आम्हा नवीन आलेल्यांची सोय सुद्धा पहावी लागेल. तुम्ही तसे समजदार आहात.. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं असेलच.. जाऊ शकता तुम्ही आता.. !!”

काही न बोलता खाली मान घालून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर पडलो. आमच्या मागे लागलेली ही पोलिसांची साडेसाती काही केल्या संपत नव्हती.

फौजदार साहेबांनी केलेल्या दमदाटीमुळे धसका घेऊन हळव्या, कोवळ्या मनाची बेबी सुमित्रा आजारीच पडली. तर रहीम चाचांचा रक्तदाब वाढल्याने त्यांनाही येवल्यातील दवाखान्यात भरती करावे लागले. इथल्या रोजच्या टेन्शनला वैतागून सैनी पंधरा दिवसांची सुटी टाकून दिल्ली येथील आपल्या बायका पोरांना भेटायला निघून गेला.

पोलिसांच्या या त्रासापासून कायमची मुक्तता कशी करून घ्यावी याबद्दल अहोरात्र विचार करीत असतानाच एके दिवशी आपल्या गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी DySP संगीता मॅडम बँकेत आल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना फौजदार राठोड साहेबांनी स्टाफला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये बोलावून केलेल्या दमदाटी बद्दल सांगितलं. परिणामतः स्टाफच्या बिघडलेल्या मनःस्थिती बद्दलही त्यांना अवगत केलं. आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्याने आता थेट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) यांच्याकडेच दाद मागणार असल्याचे मी त्यांना सिरियसली सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तसेच देशाचे व राज्याचे गृहमंत्री यांच्याकडेही पोलिसांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल फिर्याद करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.

माझी ही तयारी, हा कृतनिश्चय पाहून DySP मॅडम अंतर्यामी किंचित भयभीत झाल्या. मी बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना मनोमन खात्री पटली. मी वर पर्यंत तक्रार केल्यास कदाचित चौकशीतून पोलिसांच्या आणखीही काही भानगडी बाहेर येतील याची त्यांना बहुदा भीती वाटली असावी. (खुद्द DySP मॅडमनी सुद्धा पुण्यातील दोन कोटींच्या फ्लॅटची किंमत फक्त 80 लाख रूपये इतकी दाखवून आमच्या बँकेकडून साठ लाख रुपयांचे दिखाऊ कर्ज घेतले होते..) माझी समजूत घालून मला शांत करून आश्वस्त करीत त्या म्हणाल्या..

“पोलिसांच्या या कृत्याबद्दल मी खेद व्यक्त करते. फौजदार साहेबांची त्यांच्या या कृत्याबद्दल चांगलीच कानउघाडणी करेन मी. यापुढे तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही स्टाफला पोलिसांकडून कसलाही त्रास होणार नाही असाही मी शब्द देते. तुम्ही आतापर्यंत दिलंत तसंच सहकार्य यापुढेही द्या आणि कृपा करून सध्या तरी पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार करू नका.. मी विनंती करते तुम्हाला..”

DySP मॅडमनी खरोखरीच आपला शब्द राखला. त्यानंतर कधीही पोलिसांकडून आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. उलट सुखदेवलाच पोलिसांनी अपमान करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले असेही आम्हाला खात्रीलायकरित्या समजले.

बेबी सुमित्राने, कसेही करून वैजापूरहुन बदली करून घ्यायचीच असा आता चंगच बांधला. औरंगाबाद येथील त्यांच्या संघटनेच्या लिडर्सनी देखील यासाठी अनुकूलता दर्शविल्याने ती उत्साहित होऊन कामाला लागली. Request transfer application तसेच स्थानिक नेत्यांमार्फत हैदराबाद येथील संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे यासाठी ती वारंवार औरंगाबादला जाऊ लागली.

रविशंकरची ट्रान्सफर ऑर्डर रिव्हाईज होऊन आता त्याची बदली बीड जिल्ह्यातीलच “शिरसाळा” या गावी झाली. हे गावही तसं आडमार्गालाच असलं तरी वैजापूर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने शिरसाळ्याला जाणेच इष्ट समजले. रविशंकर गेल्यानंतर लगेच पुढच्याच महिन्यात रहीम चाचांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ झाला. त्यापाठोपाठ सैनीची बदली परभणी जिल्ह्यातील आष्टी इथे झाल्यामुळे त्यालाही ताबडतोब रिलिव्ह करावे लागले. अशाप्रकारे मी व बेबी सुमित्रा असे बनावट चेकच्या केस मधील दोनच आरोपी वैजापूर शाखेत उरलो.farewell

बेबी सुमित्रा औरंगाबाद मधील ज्या नेत्यांना भेटायला जायची त्यापैकी एका नेत्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नसे. मी बेबी सुमित्राला त्याबद्दल अनेकदा सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र, एकदा गावाकडे बदली झाली की मग या फालतू लिडर्सना भेटण्याची गरजच पडणार नाही.. असा विचार करून तिने त्या इशाऱ्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.

एका शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणेच संघटनेच्या नेत्याला भेटायला औरंगाबादला गेलेली बेबी त्याच रात्री खूप उशिरा परत आली ती अत्यंत उद्विग्न, संतप्त, उध्वस्त मनःस्थितीतच.. वैजापूर शाखेतच काम करणाऱ्या शांतिप्रिया नावाच्या आपल्या बिहारी मैत्रिणी सोबतच एका खोलीत ती रहायची. शांतिप्रियाच्या म्हणण्यानुसार, औरंगाबादहुन आल्यापासून ती उशीत तोंड खुपसून सतत हमसून हमसून रडत होती. कितीही खोदून खोदून विचारलं तरीही नेमकं काय झालं आहे, ते ती कुणालाही सांगत नव्हती.sad woman-1

रविवार आणि सोमवार हे दोन्ही दिवस बेबी उदासपणे खोलीतच बसून होती. सोमवारी दुपारी शांतिप्रियाला सोबत घेऊन तिला भेटायला तिच्या रूमवर गेलो तेंव्हाही ती तशीच शून्यात पहात बसली होती. अल्लड, मिश्किल, चुलबुल्या खोडकर स्वभावाच्या बेबीची ती अवस्था पाहून माझ्या काळजात कालवाकालव झाली. तिला बोलतं करण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हताश होऊन मी बँकेत परतलो. माधुरी आणि मीनाक्षी या शाखेत काम करणाऱ्या अन्य दोघींना बेबीची काळजी घ्या, सतत तिच्या सोबत राहून तिला धीर द्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रभर बेबीच्या काळजीमुळे मला झोप आली नाही. सारखा तिचा तो उदास, भकास चेहरा नजरेसमोर येत होता. काय झालं असावं बेबी सोबत औरंगाबादला ? कुणी अतिप्रसंग तर केला नसेल तिच्यावर ? असे विचार सारखे डोक्यात घुमत होते.

मंगळवारी सकाळी बेबी सुमित्रा बँकेत आली तेंव्हा ती बरीच सावरलेली दिसत होती. आल्या आल्या तिने माझ्या टेबलावर आपला राजीनामा ठेवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असून पुरेशा अवधीची नोटीस न दिल्यामुळे नियमानुसार एक महिन्याचा पगार माझ्या खात्यातून कापून घ्यावा असे त्यात नमूद केले होते. आजच दुपारी मनमाडला जाऊन तेथूनच पुढे छत्तीसगडला जाणारी गाडी पकडणार असल्याचे ती म्हणाली. ठाम निश्चय करून आलेल्या बेबीने कुणाचेही काहीही ऐकून घेण्यास नम्रपणे नकार दिला. सर्वांना भेटून नमस्कार करून साधा सेंड ऑफ ही न घेता बेबी निघाली.sad woman-2

योगायोगाने वैजापूर शाखेची कॅश व्हॅन त्याचदिवशी दुपारी मनमाड शाखेतील अतिरिक्त कॅश आणण्यासाठी मनमाडला जाणार होती. त्याच व्हॅनमध्ये बेबीला तिच्या सामाना सहित बसवलं. शाखेतील बेबीचे दोन समवयस्क कर्मचारी मित्र देखील तिला मदत करण्यासाठी व्हॅन सोबत गेले. बेबीला हात हलवून निरोप देऊन परत शाखेत आलो तेंव्हा तिची ती रिकामी खुर्ची पाहून chairतिचा तो सदोदित प्रफुल्लित आनंदी चेहरा, त्या मिश्किल कॉमेंट्स, ते निरागस निर्मळ हास्य हे सारं सारं आठवलं..giggling woman

भूल जा अब वो मस्त हवा,

वो उड़ना डाली डाली..

जग की आंख का कांटा बन गई,

चाल तेरी मतवाली..

तेरी किस्मत में लिखा है,

जीते जी मर जाना..

क्या जाने अब इस नगरी में,

कब हो तेरा आना..

चल उड़ जा रे पंछी,

कि अब ये देस हुआ बेगाना..

lonely bird

या ओळी आठवल्या आणि डोळे नकळत भरून आले..

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १४   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

संत नामदेवांचे अभंग-10 Sant Namdev Abhang-10

namdev

Sant Namdev Abhang-10

संत नामदेवांचे अभंग-10

रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला आणि खूप दिवस झाले, मी साधना करीत आहे पण अजून मला ईश्वर प्राप्ती होत नाही असे सांगू लागला. रामकृष्ण त्याला जवळच्या नदीत घेऊन गेले. त्यांनी त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. तो साधक श्वास घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रामकृष्णांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि बाहेर येऊन म्हणू लागला, “हे काय? माझा जीव घेणार होतात की काय आज? मी तुमच्याकडे ईश्वर प्राप्ती करून घ्यायसाठी आलो आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघलात! रामकृष्ण म्हणाले, “मी जेंव्हा तुला पाण्याखाली दाबून धरले होते, तेंव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची वाटली?”

“कशाची म्हणून काय विचारता? श्वास घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता! मला सगळ्यात जास्त आवश्यकता तेंव्हा श्वास घेण्याची वाटत होती!”

तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “इतकी तीव्रतेने जेंव्हा तुला ईश्वरप्राप्तीची आवश्यकता वाटेल, ईश्वरा शिवाय एक क्षण ही राहणे जेंव्हा तुला अशक्य होईल, तेंव्हा, तत्क्षणीच तुला ईश्वर प्राप्ती होईल!”

सर्व संतांची आपल्याला हीच अवस्था दिसते. म्हणूनच त्यांना ईश्वरप्राप्ती झालेली असते. “चुकलिया माये, बाळ हुरूहुरू पाहे”.. “जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी” अशा अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपली तळमळ व्यक्त करतात.

संत नामदेवही आपली साधक अवस्थेतील तळमळ खालील अभंगांतून व्यक्त करतात-

जननिये जिवलगे ये वो पांडुरंगे शिणलों भेटी दे गे एक वेळां

त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे | येऊनियां राहें हृदयामाजीं

वासनेच्या संगें शिणले माझें चित्त विषयाचे आघात पडती वरी

नाहीं तुझी सेवा केली मनोधर्मे   संसारसंभ्रमें भ्रांत सदा

नाहीं तुझें नाम गाइले आवडी | वाळली कुर्वंडी त्रिविध तापें

नामा म्हणे आई धांवें लवलाहीं बुडतों चिंताडोहीं काढीं मज

साधकाला जेंव्हा आपले अपराध कळून येतात, अनेक प्रयत्नांनीही विषय, वासना आटोक्यात येत नाही हे जेंव्हा कळते, तेंव्हा अनन्य भावाने आपल्या जननीचा धावा करणे हेच त्याला सुचते.

तुमची आमची अशी अवस्था असते की आपल्यासारखे चांगले आपणच अशी आपली पक्की धारणा असते. आपले दोष आपल्याला कधीच दिसून येत नाहीत. मग त्यांच्याबद्दल वाईट वाटणे तर दूरच. पण संतांची अवस्था अशी नसते. त्यांना आपण म्हणजे अपराधांची राशी आहो असे वाटत असते-

काय गुणदोष माझे विचारिसी | आहें मी तों राशी अपराधांची

अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत | अखंड दुश्‍चित आचरलों

स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति| पुससी विरक्ति कोठोनियां

तूं चि माझा गुरु तूं चि तारी स्वामी | सकळअंतर्यामी गाऊं तुज

नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण | नको करूं शीण पांडुरंगा

देवाच्या नांवाचा महिमा तर कळला आहे, पण मुखी नांव मात्र येत नाही. अमृत साक्षात समोर दिसत असूनही ते घेण्याची इच्छा होत नाही.

पण संतांनी या अभंगांतून, स्वतःच्या मिषाने खरे तर तुमच्या आमच्यासारख्या संसारी जीवांची अवस्था वर्णन केली आहे, असे जाणवते.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा | मन माझें केशवा कां बा नेघे

सांग पंढरीराया काय करूं यासी | कां रूप ध्यानासी ये तुझें

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविले | मन माझें गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामकीर्ति | ये माझ्या चित्तीं नामा म्हणे

___________________________________

बालकामध्ये कोणती विशेषता असते? कोणतेही संकट आले, की त्याला फक्त आईचा धावा करणे, आईच्या कुशीत लपणे, हेच माहिती असते.

अग्नीमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु

तैसा धांवें माझिया काजा | अंकिला मी दास तुझा

वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरिणी

नामा म्हणे मेघा जैसा | विनवितो चातक तैसा

तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजीं प्रेम पान्हा पांडुरंगे

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं | नको पान्हा चोरूं पांडुरंगे

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस | तोडी भवपाश पांडुरंगे

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज | चारा घालीं मज पांडुरंगे

नामा म्हणे होसी भक्‍तीचा वल्लभ | मागें पुढें उभा सांभाळिसी

वरील अभंगात ‘माऊली-तान्हा’, ‘गाऊली-वासरू’, ‘हरिणी-पाडस’, ‘पक्षिणी-अंडज’ अशा कितीतरी उपमा देऊन नामदेव महाराज आपले आणि पांडुरंगाचे बालक आणि मातेचे नाते वर्णन करतात.  

 ___________________________________

तसेच खालील अभंगातील शब्दरचना किती गोड आहे- ‘भुकाळु, कृपाळु, सांभाळु’ अशा शब्दांनी त्यातील कोमल भाव नेमका व्यक्त होतो.

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारीं भवव्यथे पांडुरंगे

मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु करी माझा सांभाळु पांडुरंगे

मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्त तूं अन्न | मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगे

मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर मी याचक तूं दातार पांडुरंगे

मी धनलोभी शुद्ध तूं पूर्ण कनककुंभ | मी मगर तूं अंभ पांडुरंगे

मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तू बोध मी शुष्क नदी तूं ओघ पांडुरंगे

मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक | मी प्रजा तूं पाळक पांडुरंगे

मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी मी अपत्य तूं जननी पांडुरंगे

मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय | मी आडळ तूं साह्य पांडुरंगे

शीघ्र येई वो श्रीरंगे भक्‍तमानसरंगे | प्रेमपान्हा दे गे नामदेवा

_____________________________________

 खालील गीत तर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण बऱ्याचदा ऐकतो.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Pakshini_Prabhati_Chariyasi

पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये | पिलू वाट पाहे उपवासी

तैसें माझें मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चिंतीतसे

तान्हें वत्स घरीं बांधलेसें देवा तया हृदयीं धांवा माउलीचा

नामा म्हणे केशवा तूं माझा सोइरा | झणीं मज अव्हेरा अनाथनाथा

 

_____________________________________

जे काही मागायचे ते केशवा जवळच मागायचे- आणि मागायचे ते काय- विषय भोग नाही, तर त्याचीच अनन्य भक्ति- खालील अभंगसुद्धा ‘मंगला नाथ’ यांच्या आवाजात आपण भक्ति गीतांच्या कार्यक्रमात बऱ्याचदा ऐकतो.

click here to listen the song

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

साधनेच्या उत्तरावस्थे मध्ये साधकाची देवाशी एवढी जवळीक होते, की मग तो म्हणतो, “आम्ही भक्तांनीच तुझा महिमा वाढविला आहे- नाही तर तुला कोण विचारतो!”

देवा आम्हीं तुज दिलें थोरपण | मानीं हें वचन सत्य माझें

पतित अमंगळ तुज झालों साह्य | विचारू पाहें खरेंखोटें

रोग व्याधि पीडा जनांसी नसतां | कोण पाचारितां वैद्यालागीं

कल्पनेचें भूत झडपी या संसारीं | माने पंचाक्षरी पाचारितां

 _____________________________

आम्हीं शरणागतीं केलासी सरता | येऱ्हवीं अनंता कोण जाणे

वेदशास्त्रपुराणीं उबगोनि सांडिलासी | तो आम्हीं धरिलासी हृदयकमळीं

चतुरां शिरोमणि अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्हीं

सहस्र नामीं झालासी संपन्न तरी हें हि भूषण आमुचें चि

येऱ्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा पाहें मेघश्‍यामा विचारोनि

होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी लक्ष्मी तेथें करी चरणसेवा

ते हि तंव जाण आमुची जननी तूं तियेवांचोनि शोभसी कैसा

तुज नाहीं नाम रूप जाति कुळ | अनादिचें मूळ म्हणती तूज

आम्ही भक्‍त तरी तूं भक्‍तवत्सल | ऐसा प्रगट बोठ जगामाजीं

ऐसे आमुचेनि भोगिसी थोरीव | आमुचा जीवभाव तुझे ठायीं

नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता | तरी या बोला उचिता प्रेम देई

 मी तुझा दास म्हणवतो आणि तरी जर माझ्यात प्रेमभाव नसेल तर त्यात तुलाच कमीपणा आहे असे देवाला बजावायला संत कमी करीत नाहीत!

तुझा विष्णुदास म्हणताती जगीं | नाहीं माझे अंगीं प्रेमभावो

तेणें थोर लाज वाटे पंढरीराया | ये माझ्या हृदया एक वेळां

द्वैताद्वैतभाव आहे माझे ठायीं | अनुभव नाहीं स्वरूपाचा

नामा म्हणे माझा उजळ करीं माथा | भेटी देउनी संतां निरवीं मज

आणि मग नामदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात-

घे रे घे रे नाम्या दिलें माझें प्रेम | घोकी माझें नाम सर्वकाळ

शिरावरी हात ठेवीतसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनी

भक्तिसुख देवें दिले नामयातें | नामा परमामृतें तृप्त झाला

नामा म्हणे देवा झालों मी पावन | माझें तुजविण कोण आहे

 आणि मग समर्थाच्या दासाला साक्षात काळाचीही भीती नाही-

आम्ही विठोबाचे दूत | यमा आणूं शरणागत

मुखीं नाम हातीं टाळी महापाप करूं होळी

एवढा प्रताप नामाचा | रीघ नव्हे कळिकाळाचा

ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत

आणि मग देहाची आठवण सुद्धा राहत नाही- फक्त मुखात केशवाचे मंगल नाम राहावे हीच इच्छा राहते.

देह जावो अथवा राहो- येथे ऐका

 देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो

चरण सोडीं सर्वथा आण तुझी पंढरीनाथा

वदनीं तुझें मंगळ नाम | हृदयीं अखंडित प्रेम

नामा म्हणे केशिराजा | केला नेम चालवी माझा

_____________________________________

साधनेच्या उच्च अवस्थेत, उन्मनी अवस्थेत आपल्या आराध्य दैवताचे चिंतन करता करता द्वैत मावळते- योग्यांना ध्यानाच्या अवस्थेत येणारा अनुभव- तो अनाहत ध्वनि- भक्तांना भक्तीच्या उच्च अवस्थेत अनायासेच अनुभवायला येतो. हे केवळ कवित्व नाही- हा साक्षात अनुभव शब्दरूपांनी प्रकटला आहे.

देहमंदिराभीतरीं शेजे सूतले श्रीहरि

निद्राउन्मनीचे भरीं तें म्यां स्वप्न देखिले

ध्यानीं पहुडला सांवळा | जवळीं नारी बारा सोळा

विंजणें वारिती सकळा | सोहंशब्द जागरणीं

धिं धिं तुरे वाजती | अनुहातध्वनि गर्जती

तेथें निद्रा ना सुषुप्ति | चंद्र सूर्य मावळले

मना पवना नाहीं भेद तया ठायीं हा गोविंद

तेथें खुंटला अनुवाद | वेदश्रुति आटल्या

म्हणे विष्णुदास नामा | जन्ममरण नाहीं आम्हां

कृपा केली मेघश्यामा | संतसंगें तारिलों

 खालील अभंगही अद्वैताच्या उच्च अनुभवाचे वर्णन करणारा आहे- “आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे”, “पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे| प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |”

चेईला म्हणजे ‘जागा झाला, भानावर आला’

चेइला तो जाण रे सद्गुरुवचनीं निर्धारे

विपरीत मानवा विसर पडला कंठीं जया परिहार रे |

आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे

चंद्रसूर्य जेणें प्रकाशे तो मी कैसा पाहूं रे |

अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे

चेइला तेणें ओळखिला येरांसी अगम्य भाई रे |

पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे

प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |

काष्ठी पावक उपजला तो हि तया सम रे

नामा म्हणे केशिराजा चेइल्या आम्हां तुम्ही रे |

संत नामदेव यांच्या विपुल अभंग भांडारातील काही मोजके अभंग आपण या १० भागांत पाहिले. संत मंडळी ही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रभूमी मध्ये जन्म मिळाला हे खरोखर आपले भाग्य आहे.

यापुढे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांच्या अभंगांबद्दल लिहिण्याचा विचार आहे.

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-9 Sant Namdev Abhang-9

namdev

Sant Namdev Abhang-9

संत नामदेवांचे अभंग-9

 

तेराव्या शतकातील थोर संत नामदेव यांची भजनें आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या 8 भागांमध्ये आपण वैराग्य, विषयासक्ति, देहअभिमान, नामाचे महत्त्व, संतांचे थोरपण, भक्तिरस इत्यादि अनेक विषयांवर नामदेवांचे अभंग पाहिले.

विठू माऊली हे सर्व भक्तांचे विश्रांतिस्थान आहे, तर पंढरी नगरी ही विठोबाच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी, म्हणून सर्व संतांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या संतांनी पंढरीचा महिमा अनेक प्रकारे वर्णन केला आहे.

पंढरीचा महिमा वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात-

अवघी हे पंढरी सुखाची मांदुस | माझा स्वप्रकाश रत्न हरि

धन्य संतजन तेथींचे पारखी | ज्यां झाली ओळखी विठ्ठलनामीं

अनुभवूनि चित्तीं पाहिलें विवेकें | धरिले पुंडलीकें हृदयकमळीं

त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण | करूनि भूषण भोगितसे

युगें गेलीं परी पालट चि नाहीं| नित्य शुद्ध पाहीं तेज:पुंज

पाहतां नित्यनवें ध्यातां चित्त निवे | म्हणोनि नामा जीवें विसंबेना

 

मांदुस म्हणजे किमती ऐवज ठेवण्याचे संदूक किंवा पेटी. पंढरी हे सुखाचे मांदुस आहे, कारण तिथे स्वयं प्रकाश रत्न ‘हरि’ आहे.

____________________________________

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें | भावें अनुसरले विठ्ठलपायीं

काया वाचा मनें रंगले चरणीं धरियेला मनीं पांडुरंग

नामाचेनि बळें उडविलीं साधनें तोडिली बंधनें संसाराची

मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं | हिंडे वाळवंटीं दीनरूप

योगियांचे घरीं रिघे काकुळती अव्हेरिले संतीं म्हणोनियां

ऐसे भक्तराज देवा वंद्य झाले | तें एक राज्य केलें पुंडलीकें

हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारी | कीर्ति चराचरी वर्णितसे

 पंढरीच्या सुखाचे वर्णन करतांना नामदेव महाराज म्हणतात- पंढरीचे सुख ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी मुक्तिपद म्हणजे काहीच नाही. पंढरीचे सुख मिळालेले भक्त मुक्तिपद फुकटही घेत नाहीत. ते मुक्तिपद बिचारे पंढरीच्या वाळवंटात, संतांनी अव्हेरले म्हणून दीनवाणे फिरते आणि मग योगीजनांकडे जाते!

____________________________________

अवघी हे पंढरी सुखाची वोवरी | अवघा घरोघरीं ब्रह्मानंद

अवघा हा विठ्ठल सुखाचा चि आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख

पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं | अवघा ध्यावा ध्यानीं अवघ्या मनें

अवघिये आवडी अवघा गावा गीतीं | अवघा सर्वांभूती तो चि आहे

अवघा हा जाणावा अवघा हा मानावा अवघा वाखाणावा अवघी वाचा

अवघा वोळखोनि अवघा गिळिजे मनें अवघा हा चि होणें म्हणे नामा

____________________________________

नामदेव महाराज म्हणतात, पंढरीस जाऊन जीवन्मुक्त व्हावे- आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण करावे आणि विठ्ठलाचे प्रेमसुख घ्यावे.

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावें विठ्ठला भेटावे जिवलगा

काया वाचा मन चरणीं ठेवावें | प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ

सुखाचें साजिरे श्रीमुख पहावें जीवें उतरावें निंबलो

बाहेरी भीतरी कैवल्य आघवें वाचे बोलवे ब्रह्मानंदु

चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण | करी तुझें ध्यान रात्रंदिवस

 

___________________________________

आणि पंढरीच्या पांडुरंगाची नामदेव महाराजांनी रचलेली खालील आरती ही तर जगप्रसिद्ध आहे आणि घरोघरी आणि सगळ्या मंदिरांत विठ्ठलाची म्हटली जाणारी सगळ्यात लोकप्रिय आरती आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा

तुळसीमाळा गळां कर ठेवून कटीं | कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती | चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णू मी किती

आषाढी कार्तिकी भक्‍त जन येती | चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती

____________________________________

मागील एका अभंगात “वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव न होसी अरे जना” असे म्हणून नामदेव महराजांनी “नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना” असे सांगून, वेगवेगळ्या ज्ञानशाखा, किंवा व्यवसाय या वैष्णव होण्याला उपयोगी नाहीत, पण केशवाचे नाम घेतले तर मात्र केशवरूप होशील असे सांगितले आहे, त्याच धर्तीवर, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचे ध्यान केले तर तद्रूप होशील पण केशवास ध्यायले तर केशवरूप होशील असे आपल्या मनाला बजावले आहे.

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वी चि होसी | परी केशव होसी अरे मना

आप ध्यासी तरी आप चि होसी | परी केशव होसी अरे मना

तेज ध्यासी तरी तेज चि होसी | परी केशव होसी अरे मना

वायु ध्यासी तरी वायु चि होसी | परी केशव होसी अरे मना

आकाश ध्यासी तरी आकाश चि होसी | परी केशव होसी अरे मना

नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी | तरी चि केशव होसी अरे मना

____________________________________

संसारात असतांना केशवाचे ध्यान कसे करायचे असा जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर दोन उदाहरणें देऊन नामदेव महाराजांनी खाली सांगितले आहे-

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं हातीं असे दोरी परी लक्ष तेथें

वावडी म्हणजे पतंग. पतंग आकाशात दूर उडतो, कुठे कुठे जातो, पण त्याचा दोर उडवणाऱ्याच्या हाती असतो. त्यामुळे अशी कल्पना केली आहे की  पतंगाचे लक्ष तो कितीही उंच गेला तरी आपल्याला धरणाऱ्या हाताकडे असते. तसे आपले लक्ष आपण संसारात कुठल्याही भलत्या कामात असले तरी लक्ष मात्र आपले आपण ज्याचे अंश आहोत, त्या देवाकडे असले पाहिजे.

वरील अर्थ हा मला ज्याप्रमाणे लावता आला तसा इथे सांगितला आहे. जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें तियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

वरील पतंगाच्या उपमेलाच अजून स्पष्ट करणारा हा अभंग अगदी नितांतसुंदर आहे. जुन्या काळातील लोकांना हे चित्र सहज डोळ्यांसमोर येऊ शकेल. पूर्वीच्या काळी नदीवरून किंवा पाणवठ्यावरून लांबून पाणी आणावे लागायचे. तेंव्हा ते आणणाऱ्या स्त्रीचे कसब बघण्यासारखे असायाचे. एकावर एक अनेक हंडे घेऊन ती पाणी आणायला जायची. येतांना ते पाण्याचे सगळे हंडे एकावर एक ठेवून, दोन्ही हात मोकळे ठेवून, आपल्या सख्यांबरोबर ती गुजरी (खेड्यातील स्त्री) मस्त गप्पा मारीत येत असते. एकीकडे रस्त्यावरचे खड्डेही चुकवीत असते. पण तिचे मुख्य लक्ष हे आपल्या डोक्यांवरील हंड्यांकडे असते. आणि त्यांचा तोल सांभाळीत ती चालते आणि भांड्यातील पाणी अजिबात सांडू देत नाही. किंवा दुसरी उपमा एखादा धनलोभी असतो, तो बाहेरून त्याची सर्व कामें करीत असला तरी त्याचे लक्ष किती धन येते आहे याकडे असते.  तसेच संसारात, आपली रोजची कर्तव्यें तर चोख बजावायची पण चित्त मात्र श्रीहरीकडे ठेवायचे हे कसब सवयीने जमते.  

_____________________________________

खालील अभंग हा आमच्या शालेय शिक्षणात कुठल्या तरी वर्षाला मराठी विषयात होता असे आठवते. हृदयात श्री हरि असेल तर संसाराची अग्निबाधा होणार नाही, अशा अर्थाचा हा अभंग आहे.

अग्नि जाळी तरी जळती पांडव | हृदयी माधव म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळती गोपाळ | हृदयी देवकीबाळ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे हनुमंत | हृदयीं सीताकांत म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे पैं सीता | हृदयी रघुनाथ म्हणोनियां

अग्नि जाळी तरी जळे प्रल्हाद  | हृदयी गोविंद म्हणोनियां

नामा म्हणे स्वामी स्मरावें गोविंदा | चुके अग्निबाधा संसाराची

पुढील भागात आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधकाची होणारी तळमळ व्यक्त करणारे नामदेवांचे अभंग आहेत, ते पाहणार आहोत.

माधव भोपे