The Festinger’s Lock क्रोधाचा सापळा
Whatsapp वर फिरत फिरत अनेक मेसेजेस येतात. तसाच फिरत फिरत हा एक मेसेज आला. अशा मेसेजेसवर हळू हळू लेखकाचे नांव गायब होत असते. तसेच या मेसेजच्या ही लेखकाचे नांव दिलेले नाही..
पण कधी कधी असे मेसेजेस आपल्याला विचार करायला लावणारे असतात. त्यामुळे खालील मेसेज इथे शेअर करत आहे.
यात थोडा स्वतःचा मीठ मसाला म्हणून एक ए. आय. ने तयार केलेला व्हिडिओ ही टाकला आहे!!
Festinger’s lock
क्रोधाचा सापळा
तुमची स्वतःची ताकदच तुमचा काळ कशी ठरू शकते?
जंगलातला शक्तिशाली प्राणी म्हणजे अस्वल. त्याच्या एका पंजाच्या फटक्यात समोरच्याचा जीव घेण्याची ताकद असते.पण तुम्हाला माहितीये का? याच अस्वलाचा जीव एका साध्या, निर्जीव लाकडाच्या ओंडक्याने घेतला. ज्या लाकडात ना जीव होता, ना हालचाल करण्याची शक्ती, त्याने अस्वलाची कवटी फोडली.
कसं शक्य आहे हे? चला, आज एका अशा मानसिक सापळ्याबद्दल बोलूया जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात दररोज ‘अस्वल’ बनून आपल्याला छळत असतो
**
एका शिकाऱ्याने जंगलात एका झाडाखाली एक जड लाकडाचा ओंडा दोरीने टांगून ठेवला होता. तिथून एक काळं अस्वल जात होतं. चालताना ते लाकूड त्याला आडवं आलं. अस्वलाला राग आला. त्याने त्या लाकडाला हलकासा धक्का दिला.
दोरीला टांगलेलं ते लाकूड झोपाळ्यासारखं मागे गेलं आणि परत येताना अस्वलाच्या खांद्यावर आदळलं. आता मात्र अस्वलाचा पारा चढला. त्याने पूर्ण ताकदीने त्या लाकडावर वार केला.अस्वलाने जितक्या जोरात वार केला, तितक्याच उंचीवर ते लाकूड गेलं आणि दुप्पट वेगाने परत येऊन अस्वलाच्या तोंडावर आदळलं. वेदनेने अस्वल वेडं झालं.त्याला वाटलं समोरचा शत्रू खूप शक्तिशाली आहे. त्याने आपली संपूर्ण शक्ती एकवटली आणि त्या लाकडावर शेवटचा, सर्वात भयानक प्रहार केला.
आणि मग काय झालं? ते लाकूड सुसाट वेगाने परत आलं आणि थेट अस्वलाच्या डोक्यावर आदळलं. एका फटक्यात अस्वलाची कवटी फुटली.ते जागीच मेलं. मरतानाही त्या अस्वलाला हे समजलं नाही की, त्याला मारणारा कोणताही शत्रू नव्हता. ते फक्त एक लाकूड होतं, ज्याला अस्वलाने स्वतःच ताकद देऊन आपल्यासाठी जीवघेणं बनवलं होतं
**
मानसशास्त्रात यालाच ‘फिस्टिंजर्स लॉक’ (Festinger’s Lock) असं म्हणतात.नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालांनुसार, फिस्टिंजर्सचे जुने शोधनिबंध पुन्हा उघडले गेले असून मानवी स्वभाव आणि प्रतिक्रिया यावर नव्याने संशोधन होत आहे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या १० टक्के गोष्टी आपल्या हातात नसतात, पण उरलेल्या ९० टक्के गोष्टी आपण त्या १० टक्क्यांना कशी ‘प्रतिक्रिया’ (Reaction) देतो, यावर अवलंबून असतात.
**
रस्त्यावर गाडी चालवताना कुणीतरी कट मारला (१० टक्के घटना), तर आपण त्याला शिवी देतो किंवा त्याच्या मागे गाडी धावतो (९० टक्के प्रतिक्रिया).ऑफिसमध्ये बॉसने काहीतरी बोललं, की आपण दिवसभर चिडून राहतो आणि घरच्यांवर राग काढतो. आपण अस्वलासारखे त्या परिस्थितीला जितक्या जोरात मारतो, तितक्याच जोरात ती परिस्थिती आपल्याला प्रतिप्रहार करते.
**
आपण अनेकदा अशा वादात अडकतो जिथे समोरची व्यक्ती शांत असते, पण आपला अहंकार आणि राग आपल्याला त्या निर्जीव लाकडासारख्या परिस्थितीवर तुटून पडायला लावतो. आपण जितकी ताकद लावतो, तितकाच तो वाद मोठा होत जातो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं.
मंडळी, विचार करा, तुमच्या आयुष्यात असं कोणतं ‘लाकूड’ आहे ज्याला तुम्ही स्वतःच ताकद देऊन स्वतःसाठी धोकादायक बनवत आहात?
**
एखाद्या गोष्टीवर ताकदीने तुटून पडण्यापेक्षा, कधीकधी फक्त बाजूला होणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू नसतो, कधीकधी आपली प्रतिक्रियाच आपला सर्वात मोठा शत्रू असते.
तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का, जिथे शांत राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला? की तुम्हीही त्या अस्वलासारखा प्रहार करत बसलात?
श्रीहनुमान – शक्ती आणि भक्तीचे आदर्श रूप Hanuman Jayanti
Hanuman Jayanti
श्रीहनुमान – शक्ती आणि भक्तीचे आदर्श रूप
यावर्षी हनुमान जयंती कधी आहे- हनुमान जयंती कशी साजरी करतात.
नुकतीच आपण सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने श्री रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानंतर लगेचच, म्हणजे ६ दिवसांनी, श्रीरामाचे अनन्य भक्त, सेवा आणि भक्तीचे आदर्श, महाबली, महाशक्तिमान, भगवान शिवाच्या रुद्र रूपाचा अवतार असलेल्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव चैत्री पौर्णिमेला येतो. या जन्मोत्सवाचा सोहळाही महाराष्ट्रात आणि भारताच्या विविध प्रदेशांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शक्ति आणि नम्रता यांचा अनोखा संगम श्री हनुमानामध्ये बघायला मिळतो. यावर्षी गुरूवार दि. २ एप्रिल रोजी, हा उत्सव येतो आहे. दि. १ एप्रिल रोजीच सकाळी ७.०७ च्या नंतर पौर्णिमा लागते. ती गुरूवारी २ एप्रिल ला सकाळी ७.४२ वाजता संपते. हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाला झाला. २ एप्रिल रोजी सूर्योदय सकाळी ६.३३ ला आहे, त्यामुळे हनुमान जयंती २ एप्रिल, गुरूवारी आहे.
आपल्याकडे प्रत्येक गावागावात, शहरा शहरात, हा जन्मोत्सव, मारूतीच्या मंदिरांमधून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हनुमान जन्मोत्सवानंतर, प्रसाद म्हणून सुंठवडा, गूळ, खोबरे, बुंदीचे लाडू, केळी इत्यादि गोड पदार्थ भक्त गणांना दिले जातात.
समर्थ रामदासांनी सुरू केलेली परंपरा.
महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी विशेष करून हनुमानाची उपासना, बलाची, पुरुषार्थाची देवता म्हणून गावा गावात सुरू करून त्या काळच्या समाजा चैतन्य जागृत केले.
समर्थ रामदास स्वामींनी श्रीहनुमानाचे वर्णन पराक्रम, बुद्धिमत्ता, नम्रता आणि रामभक्तीचे अद्वितीय उदाहरण म्हणून केले आहे. रामदास स्वामींच्या दृष्टीने हनुमान हा केवळ देवता नसून संपूर्ण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.
समर्थ रामदास यांनी शक्ती, पराक्रम आणि भक्ती यांचा अत्यंत सुंदर समन्वय आपल्या ग्रंथांमध्ये आणि उपदेशांमध्ये मांडला आहे. त्यांच्या मते शक्तीशिवाय धर्मरक्षण होऊ शकत नाही, आणि भक्तीशिवाय शक्तीला योग्य दिशा मिळत नाही. म्हणूनच त्यांनी श्रीहनुमानाला शक्ती, धैर्य आणि निस्सीम भक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले.
शक्तीचे महत्त्व
समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध या ग्रंथात अनेक ठिकाणी शक्तीचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते मनुष्याने तीन प्रकारच्या शक्ती जोपासल्या पाहिजेत :
- शारीरिक शक्ती – शरीर बलवान असले पाहिजे.
- मानसिक शक्ती – संकटांना तोंड देण्याचे धैर्य असले पाहिजे.
- आध्यात्मिक शक्ती – परमेश्वरावरील अढळ श्रद्धा असली पाहिजे.
ते म्हणतात की दुर्बळ समाजावर अन्याय सहज होतो, म्हणून समाज बलवान असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात हनुमान मंदिरांची स्थापना
समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हनुमान मंदिरांची स्थापना केली. यामागे त्यांचा एक सामाजिक हेतू होता.
त्या काळात देशावर परकीय सत्ता होती आणि समाज निरुत्साही झाला होता. त्यामुळे त्यांनी युवकांमध्ये :
- शौर्य आणि पराक्रम जागृत करणे
- व्यायाम आणि शरीरसाधना वाढवणे
- धर्म आणि राष्ट्ररक्षणाची प्रेरणा देणे
या उद्देशाने हनुमान उपासना रुजवली.
समर्थांनी स्थापन केलेले ११ मारुती
समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात महाराष्ट्रात बलोपासना आणि संघटनशक्ती वाढवण्यासाठी सातारा व कोल्हापूर परिसरात प्रामुख्याने कृष्णा नदीच्या काठी ११ जागृत मारुतींची (हनुमान) स्थापना केली. हे मारुती महाराष्ट्राच्या इतिहासात ‘समर्थस्थापित अकरा मारुती‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.
समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुतींची नावे व ठिकाणे:
१. शहापूरचा मारुती (चुण्याचा मारुती): कराडजवळ.
२. मस्कतचा मारुती (महारुद्र): मसूर (कराडजवळ).
३. चाफळचा मारुती (दास मारुती): चाफळ.
४. चाफळचा प्रताप मारुती: चाफळ (राम मंदिराच्या मागे).
५. शिंगणवाडीचा मारुती (बाल मारुती): चाफळजवळ, टेकडीवर.
६. उंब्रजचा मारुती (मठातील मारुती): उंब्रज
७. माजगावचा मारुती: सातारा-कोरेगाव मार्गावर
८. बहेचा मारुती (बोरगावचा मारुती): वाळवा तालुक्यात कृष्णा काठी.
९. मनपाडळेचा मारुती: कोल्हापूरजवळ.
१०. शिराळ्याचा मारुती: बात्ती शिराळा.
११. पारगावचा मारुती: वारणा नदीकाठी (पन्हाळा तालुक्याजवळ).
संयमित शक्तीचे प्रतीक
रामदास स्वामींच्या दृष्टीने हनुमानाची सर्वात मोठी महानता म्हणजे संयमित शक्ती.
हनुमानाकडे प्रचंड सामर्थ्य होते, पण त्यांनी ते कधीही अहंकारासाठी वापरले नाही. ते नेहमी भगवान रामाच्या सेवेसाठी आणि धर्मरक्षणासाठी वापरले.
यातून समाजाला असा संदेश दिला गेला की :
- शक्ती असावी पण अहंकार नसावा
- पराक्रम असावा पण धर्मनिष्ठाही असावी
शिवकालीन समाजावर प्रभाव
समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा प्रभाव छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळातील समाजावरही दिसून येतो.
रामदास स्वामींनी दिलेली शक्ती आणि भक्ती यांची शिकवण समाजाला प्रेरणा देणारी ठरली. त्यामुळे हनुमान हा वीरत्व, निष्ठा आणि धर्मरक्षणाचा आदर्श म्हणून जनमानसात रुजला.
हनुमान जन्माची कथा
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जितः॥
हनुमान सप्त चिरंजीवांमध्ये गणला गेलेला आहे. पण लौकिक अर्थाने हनुमानाच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत.
हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे.
हनुमान जन्माची मुख्य कथा खालीलप्रमाणे आहे:
- अंजनीचा शाप आणि तपस्या: हनुमान यांची माता अंजनी ही पूर्वजन्मी एक अप्सरा होती. एका ऋषींच्या शापामुळे तिचे रूप वानरीचे झाले होते. तिचे लग्न वानर राज केसरी यांच्यासोबत झालेले होते. आपल्याला मिळालेला शाप घालवण्यासाठी आणि पुत्र प्राप्ती साठी iतिने भगवान शंकराची कठोर तपस्या केली. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पुत्राचा वर दिला.
- पुत्रकामेष्टी यज्ञ आणि प्रसादाचा अंश: ज्यावेळी अयोध्येचे राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ करत होते, तेव्हा यज्ञातून निघालेली खीर (पायस) त्यांनी आपल्या तिन्ही राण्यांना वाटली. असे म्हटले जाते की, वायू देवाच्या साहाय्याने त्या खिरीचा काही अंश एका घारीने उचलला आणि तो तपस्या करणाऱ्या अंजनीच्या हातावर पडला.
- वायू देवाचा आशीर्वाद: अंजनीने तो शंकराचा प्रसाद समजून ग्रहण केला. वायू देवाने तो प्रसाद अंजनीपर्यंत पोहोचवण्यात मदत केली, म्हणून हनुमानाला ‘पवनपुत्र’ असेही म्हटले जाते.
- जन्म: या प्रसादाच्या प्रभावाने आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला. त्यांना भगवान शंकराचा अकरावा ‘रुद्र अवतार’ मानले जाते.
केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला, त्याचे नाव ठेवले मारुती. मरुत म्हणजे वारा किंवा वायू . वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे अंजनीच्या हाती यज्ञाचे पायस आले, म्हणून हनुमानाला मारुती किंवा वायुपुत्र असेही म्हणतात.
महाराष्ट्रात, समर्थांनी केलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्र घराघरात, अगदी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत अतिशय लोकप्रिय आहे.
श्री मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।। १।।
महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी दुखःहारी, धूर्त वैष्णव गायका ।।२।।
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवता हंता, भव्य सिंदूरलेपना ।। ३।।
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।। ४।।
ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।
ब्रम्हांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी त्राटील्या बळे।।६।।
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा।।७।।
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।। ८।।
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।
अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।। ११।।
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ करु शके ।
तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।। १३।।
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां।।१४।।
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।। १५।।
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।। १६।।
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।। १७।।
मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।
दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।
मारुतीचा पाळणा हनुमान जयंतीचा पाळणा
पहिल्या दिवशी झाला आनंद
माया अंजनी होती वनात
शिव शिव जप करी मनात,
पोटी जन्मले बाळ हनुमंत
जो बाळा जो जो रे जो ।।१।।
चैत्र महिन्यात पौर्णिमेला
बाळ मारुती आला जन्माला,
फळ समजला वरी सूर्याला
जो बाळा जो जो रे जो ।।२।।
रामाची भक्ती गाती गाणी
केशरी नंदन जो तो जाणी,
पवनपुत्र तो ज्ञानी ध्यानी
जो बाळा जो जो रे जो ।।३।।
हनुमान बाळ थोर जाहला
सुग्रीवाचा सोबती जाहला,
राम लक्ष्मणा सहाय्य केला
जो बाळा जो जो रे जो ।।४।।
अंजनीचा सुत धन्य झाला
शत्रुमर्दना बाळ आला,
दासावरी कृपा करिला
जो बाळा जो जो रे जो ।।५।
श्री हनुमान जन्माचे अभंग
देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥
आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥
आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥
विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥
पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला हे चरण म्हणून गुलाल फुले टाकावीत.
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥
Recommended Posts
हनुमान चालीसा
श्रीगुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि ।
बरनऊ रघुवर विमल जसु जो दायकु फल चारि ।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार ।
बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनि पुत्र पवनसुत नामा ॥२॥
महावीर विक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥३॥
कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुंडल कुँचित केसा ॥४॥
हाथ वज्र औ ध्वजा बिराजे ।
काँधे मूँज जनेऊ साजे ॥५॥
शंकर सुवन केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग वंदन ॥६॥
विद्यावान गुणी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मनबसिया ॥८॥
सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥९॥
भीम रूप धरि असुर संहारे ।
रामचंद्र के काज सवाँरे ॥१०॥
लाऐ संजीवन लखन जियाए ।
श्री रघुबीर हरषि उर लाए ॥११॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावै ।
अस कहि श्रीपति कंठ लगावै ॥१३॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कवि कोविद कहि सके कहाँ ते ॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥
तुम्हरो मंत्र विभीषण माना ।
लंकेश्वर भये सब जग जाना ॥१७॥
जुग सहस्त्र योजन पर भानू ।
लील्यो ताहि मधुर फ़ल जानू ॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही ।
जलधि लाँघि गए अचरज नाही ॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रक्षक काहू को डरना ॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनहूं लोक हाँक ते काँपै ॥२३॥
भूत पिशाच निकट नहि आवै ।
महावीर जब नाम सुनावै ॥२४॥
नासै रोग हरे सब पीरा ।
जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५॥
संकट तें हनुमान छुडावै ।
मन क्रम वचन ध्यान जो लावै ॥२६॥
सब पर राम राय सिर ताजा ।
तिनके काज सकल तुम साजा ॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै ।
सोइ अमित जीवन फल पावै ॥२८॥
चारों जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥
साधु संत के तुम रखवारे ।
असुर निकंदन राम दुलारे ॥३०॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा हो रघुपति के दासा ॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै ।
जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥
अंतकाल रघुवरपुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥
और देवता चित्त ना धरई ।
हनुमत सेई सर्व सुख करई ॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६॥
जै जै जै हनुमान गोसाई ।
कृपा करहु गुरु देव की नाई ॥३७॥
जो शत बार पाठ कर जोई ।
छूटहि बंदि महा सुख होई ॥३८॥
जो यह पढ़े हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥४०॥
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥॥
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4 ramraksha-stotra-4
ramraksha-stotra-4
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग ४
भाग ३ वरून -पुढे
काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे. आता त्यापुढील श्लोक:
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥26॥
वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.
श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे, विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे. अशा या श्रीरामाला मी शरण आहे.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥30॥
माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम् ॥31॥
ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.
यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.
मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो. हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली
मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा वेग)
अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा आहे
मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.
यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥34॥
वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.
कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.
महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’
हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.
त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.
यापुढील श्लोक:
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥35॥
आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥36॥
भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम
राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.
निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”
रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति
परायणं= आश्रयस्थान
परतर= इतर,
म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.
रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.
माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!
वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.
रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)
[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल
एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.
एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.
पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।
ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥
वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.
मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.
भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.
पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.
राम राम राम.
॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.
श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.
अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे.
माधव भोपे
या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1
Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids
30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1 ramraksha-stotra-1
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग १
ramraksha-stotra-1
भगवान श्रीराम हे आपल्या भारतीयांच्या रोमा रोमात वसलेले आहेत. आपल्या बोलण्यात, ठायी ठायी ‘राम’ येतो.
रामरक्षा स्तोत्र हे बहुसंख्य भारतीयांच्या घरात म्हटले जाणारे स्तोत्र आहे. आणि या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो.
आमच्या इथे अनेक पिढ्यांपासून हे स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हटले जाते, जसे की ते अनेक घरांमध्ये म्हटले जाते.
या स्तोत्राचा अर्थ अनेक विद्वानांनी लिहिलेला आहे. अलिकडच्या काळात पण बऱ्याच जणांनी या स्तोत्राचा अर्थ लिहिला आहे.
पण या स्तोत्राचा अर्थ मला जसा, उमगला, भावला, आणि समजला, तो ४ भागांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
रामरक्षा हे स्तोत्र कालातीत आहे. यापूर्वी हे फॅमिली ग्रुप वर प्रकाशित केले होते, पण आता ब्लॉग सुरू केलेला असल्यामुळे ते ब्लॉग वर प्रकाशित केले आहेत , जेणेकरून जास्तीत जास्त श्रीराम भक्तां पर्यन्त ते पोचतील.
रामरक्षा स्तोत्र हे मंत्र म्हणून तर प्रभावी आहेच, पण भक्तिरसामध्ये ओतप्रोत असे एक काव्य आहे. त्यामुळे याचा आस्वाद घेतांना, घाई करून चालणार नाही. तर जशी आपण आपली आवडती वस्तू , डोळे बंद करून, तिचा स्वाद घेत, चाखत चाखत खातो, त्याप्रमाणे, यातील एकेक काव्यपंक्तीचा, कल्पनांचा, उपमांचा आस्वाद घेत घेत या स्तोत्राचे पठण-स्मरण केले तर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. म्हणून आपण या स्तोत्राचा आस्वाद ४ भागांमध्ये घेणार आहोत.
आज त्या लेखमालेतील पहिला भाग प्रकाशित करीत आहे.
सर्वप्रथम, संदर्भासाठी, श्रीराम रक्षा स्तोत्र शुद्ध स्वरूपात खाली देत आहे.
श्रीरामरक्षास्तोत्रम्
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान् कीलकम् । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
अथ ध्यानम्
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालङ्कार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचन्द्रम् । ।
इति ध्यानम्
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥2॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥8॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥14॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥20॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥22॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥26॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु-
र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥30॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥31॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥34॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥35॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥36॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥
इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रम् सम्पूर्णम् ।
आता त्यावरील विवेचन:
श्री रामरक्षा स्तोत्र
श्री रामरक्षा स्तोत्र आपणा सर्वांनाच माहित आहे आणि त्याचे महत्त्वही आपणास माहित आहे.
रामरक्षा स्तोत्र हे ‘स्तोत्र मंत्र’ आहे. स्तोत्र हे सहसा एखाद्या देवतेचे गुणवर्णन करणारे काव्य असल्याचे दिसून येते. पण मंत्र म्हणजे शक्तिशाली अक्षर समूह. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य मन्त्र आहेत हे आपणास माहित आहे. आपण अशा स्तोत्र रूपी मंत्रांकडे कडे नीट लक्ष दिले तर आपणास असे दिसून येईल, की, प्रत्येक स्तोत्राचा एक ‘ऋषि’ असतो; म्हणजे, ते स्तोत्र रचणारा, किंवा, ज्याच्या द्वारे ते स्तोत्र प्रकट झाले, तो. तसेच प्रत्येक स्तोत्राची एक ‘देवता’ असते. तसेच, स्तोत्राच्या सुरुवातीला, ते स्तोत्र, कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, त्याचा उल्लेख असतो. तदनंतर, त्या स्तोत्राची ‘शक्ति’ कोण आहे याचा उल्लेख असतो. त्यानंतर, त्या स्तोत्राची , किंवा मंत्राची , ‘कीलक’ असलेली देवता कोणती आहे, याचा उल्लेख असतो. कीलक म्हणजे किल्ली. स्तोत्र किंवा मंत्ररूप हा खजिना जर उघडायचा असेल तर त्याची किल्ली लावणे आवश्यक आहे. या रामरक्षा स्तोत्राची, हनुमान ही देवता कीलक आहे. आणि सरते शेवटी, त्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग’ कुणा किंवा कशा प्रीत्यर्थ करण्याचे योजले आहे, याचा उल्लेख असतो.
आपणा ‘श्री सूक्तामध्ये’ ‘जपे विनियोग:’ किंवा ‘अभिषेके विनियोग:’ असा, प्रसंगानुसार उच्चार करतो. श्री सूक्ता’ ने अभिषेक करणार असू, तर ‘अभिषेके विनियोग:’, किंवा, श्री सूक्ताचा जप करणार असू तर, ‘जपे विनियोग:’.
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप् छंदः। सीता शक्तिः। श्रीमद् हनुमान् कीलकम् । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः
रामरक्षा स्तोत्राचे रचयिता, ‘बुधकौशिक’ ऋषि आहेत. बुधकौशिक ऋषि नक्की कोण होते, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, महर्षि वाल्मिकी म्हणजेच बुधकौशिक ऋषि होत. रामरक्षा स्तोत्राच्या १५ व्या श्लोकात,
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥ असे म्हटले आहे, अर्थात, हर म्हणजे महादेव यांनी स्वप्नात येऊन संगीतल्याप्रमाणे, सकाळी बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहिली, असा उल्लेख आहे. काहींच्या मते, बुधकौशिक ऋषि म्हणजे विश्वामित्र ऋषि होत. असो.
सध्या तो विषय बाजूला ठेवू.
या स्तोत्राचे ‘श्री सीता रामचंद्र’ हे देवता आहेत. आपल्याकडे सर्व मुख्य देवता या जोडीजोडीनेच येतात. आणि त्यातही, स्त्री देवतेचे स्थान प्रथम असते, हे लक्षणीय आहे. एखाद्या स्तोत्रात जी देवता मध्यवर्ती असते, किंवा ज्या देवतेचे गुणवर्ण त्या स्तोत्रात केले असते, ती त्या स्तोत्राची ‘देवता’.
त्याच्यानंतर, ते स्तोत्र हे मुख्यता: कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, याचा उल्लेख येतो.
अनुष्टुप् छंद हा संस्कृत काव्यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा छंद आहे. वेदांमध्ये याचा वापर झालेला आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता यांतील अधिकांश श्लोक हे अनुष्टुप् छंदामध्ये आहेत. या छंदात ८- ८ वर्णांचे चार पाद, असे एकूण ३२ वर्ण असतात.
प्रत्येक स्तोत्राची/ मंत्राची, एक ‘शक्ति’ असते. या स्तोत्राची, ‘सीता’ ही शक्ति आहे.
आता ‘कीलका’ विषयी: कीलक म्हणजे किल्ली. प्रत्येक मंत्राची, एक कीलक देवता असते. त्या देवतेचे स्मरण केल्याशिवाय ते स्तोत्र फलीभूत होत नाही. रामरक्षा स्तोत्राचे कीलक म्हणजे ‘हनुमान’ आहे. हनुमान हा रामाचा परम भक्त होता. हनुमानरूपी देवतेची ‘किल्ली’ लावल्याशिवाय, हे स्तोत्र ‘उघडणार’ नाही.
सरते शेवटी, ह्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग, कशा प्रीत्यर्थ, किंवा कुठल्या देवतेच्या प्रीत्यर्थ केला जात आहे, त्याचा उल्लेख.
बहुतेक स्तोत्रांमध्ये, सुरूवातीची ही प्राथमिक आणि आवश्यक माहिती देऊन झाल्यानंतर, पुढील श्लोकामध्ये, त्या देवतेच्या, रूपाचे ‘ध्यान’ असते. म्हणून यापुढील श्लोकात, या स्तोत्राच्या देवतेचे, म्हणजे श्री रामचंद्राचे, व सीतेचे ध्यान केले आहे.
अथ ध्यानम्:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥
वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥
श्रीरामाच्या आकृतीचे स्मरण करतांना, आपल्याला त्यातील सर्वात प्रभावशाली गोष्ट लगेच डोळ्यासमोर येणारी कुठली असेल, तर ती म्हणजे रामाचे दीर्घ आणि बलशाली बाहू!.‘जानु’ म्हणजे ‘गुडघा’ ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे बाहू त्याच्या गुडघ्यां पर्यंत लांब आहेत, तो श्रीराम. असे ‘आजानु बाहू’
पुरूष हे लाखो करोडोंमध्ये एखादेच असतात. आपण जेंव्हा रामरक्षा ‘कवच’ म्हणतो, तेंव्हा, रामाचे विशाल बाहू आपले संरक्षण करताहेत, ही भावना आपोआपच आपल्या मनात येते . रामाचे आजानुबाहू हे त्याच्या धनुर्विद्येसाठी वरदान होते.
‘धृतशरधनुषं’
अर्थात, हातात धनुष्य आणि बाण घेतलेला. ‘बद्धपद्मासनस्थं’ अर्थात, बद्धपद्मासन घातलेला. पीत वस्त्र नेसलेला,
ज्याचे नेत्र, नुकत्याच उमललेल्या कमला सोबत स्पर्धा करतात आणि ज्याच्या मुखावर ‘प्रसन्न’ भाव आहे.
ज्याच्या ‘वाम’ म्हणजे डाव्या अंकावर म्हणजे मांडीवर सीता विराजमान आहे.
(हातात धनुष्य बाण घेतलेला, आणि बद्ध पद्मासन घातलेला आणि डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, या तीन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हे अजून मला समजले नाही. बद्ध पद्मासनामध्ये, पद्मासन घालून, आपले हात पाठीच्या मागून नेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे हाताने पकडायचे असतात. अशा वेळी हात मोकळे नसतांना धनुष्य बाण कसे धरणार? तसेंच अशा अवस्थेमध्ये, सीतेला डाव्या मांडीवर कसे घेणार? या विषयी काही खुलासा कुठे मिळतो का याचा शोध घेत आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथे श्रीरामाची मूर्ती, डाव्या मांडीवर सीता बसलेली, अशी आहे. इतर कुठे अशी मूर्ति दिसत नाही.)
आणि डाव्या बाजूला बसलेल्या सीतेच्या मुख कमलाकडे कडे ‘मिलल्लोचनं’ म्हणजे ज्याचे डोळे खिळले आहेत. आणि डोळे कसे, तर ‘नीरदाभं’ म्हणजे पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांसारखे.
नाना+ अलंकार +दीप्तं म्हणजे विविध अलंकारांनी दीप्त झालेला; दधतम् म्हणजे धारण करीत असलेला, काय? तर ‘उरु जटा’ उरु म्हणजे मांड्या. ‘उरु जटामंडनं’ म्हणजे मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांनी मंडित झालेला असा तो रामचंद्र. या ठिकाणी ‘जटामंडलं’ असेही काही ठिकाणी पाहण्यात येते. ‘जटामंडलं’ असा शब्द घेतल्यास ज्याच्या भोवती मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांचे ‘मंडल’ आहे असा घेता येतो. मला व्यक्तिशः ‘जटामंडनं’ अधिक योग्य वाटते.
रामरक्षेला सुरुवात करतांना डोळे मिटून, अशा प्रकारे श्रीरामाचे रूप डोळ्यासमोर आणल्या नंतर, भाव समाधि लागणार नाही तर काय! या इथे ‘ध्यान’ समाप्ति होते. ‘इति ध्यानम्.’ …..
क्रमशः
पुढील येणारे भाग अवश्य वाचा, आणि सर्वात शेवटी येणाऱ्या भागात दिले जाणारे पीडीएफ डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा.
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2 ramraksha-stotra-2
ramraksha-stotra-2
श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग २
भाग १ वरून-पुढे
श्रीराम आणि सीतेच्या ध्यानानंतर, रामरक्षा स्तोत्र सुरू होते.
त्यापुढील पहिल्या श्लोकात रामाच्या चरित्राची आणि नामाची महती सांगितलेली आहे:-
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् ॥2॥
श्रीरामाचे चरित्र हे ‘शत कोटी’ श्लोकांमाध्येही वर्णन करून संपणार नाही, इतके मोठे आहे.
इथे श्रीरामाला ‘रघुनाथ’ म्हटले आहे. अर्थात, रघुवंशातील सर्वोत्तम पुरूष, किंवा रघु वंशाचा ‘नाथ’.
भगवंताने, रघुकुलामध्ये अवतार घेतल्यामुळे, त्या कुळाचा उध्दार झाला. श्री शंकर हे श्री रामाचे नि:सीम भक्त. एक कथा अशी आहे, की एकदा, तीन्ही लोक, म्हणजे देव, दानव आणि मानव हे शंकराकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. विषय होता, निरनिराळ्या मंत्रांचे योग्य वाटप. असे शंभर कोटी मंत्र होते. त्यावर, भगवान शंकरांनी तिघांनाही ३३ कोटी,३३ लाख ३३ हजार तीनशे तेहतीस मंत्र वाटून दिले. एक मंत्र राहिला, ज्यात ११ अक्षरे होती. शंकरांनी त्या मंत्रातील ३-३ अक्षरे तिघांना वाटून दिली. राहिली २ अक्षरे: “रा” आणि “म”. तेंव्हा शंकराने सांगितले, की ही दोन अक्षरे मात्र मी माझ्याच हृदयात ठेवणार.
रघुनाथाच्या चरित्रामधील एक- एक अक्षर हे मनुष्याच्या महान पापांचे नाश करणारे आहे.
‘नीलोत्पल’- उत्पल अर्थात कमळ. ‘नीलोत्पल’ म्हणजे नील कमल. श्री रामाचा वर्ण नील कमलाप्रमाणे ‘नील’ ‘श्याम’ आहे. नील + श्याम. श्याम वर्ण म्हणजे काळा नव्हे. श्याम रंगाचे तेजच वेगळे आहे. श्री कृष्णाचे वर्णन ‘घनश्याम’ असे ही केले जाते. पुढे रामाचे ‘राजीव लोचन’ असे वर्णन केले आहे. राजीव लोचन म्हणजे कमला प्रमाणे नेत्र असलेला. वरील दोन्ही वैशिष्टये डोळ्यासमोर आणून श्रीरामाचे ध्यान करून पाहावे.
‘जानकीलक्ष्मणोपेतं’ म्हणजे ज्याच्या आजू बाजूला जानकी आणि लक्ष्मण आहेत असा. आणि जटा रुपी मुकुटाने मंडित झालेला, असा तो श्रीराम. जणू काही सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात श्री रामाच्या रूपाचे वर्णन करून कवीचे मन भरले नसावे! म्हणून या श्लोकात ‘नीलोत्पल श्याम’, ‘राजीवलोचन’, ‘जटा मुकुट मंडित’ अशा प्रकारे श्रीरामाचे ध्यान करून कवीने श्रीरामाच्या रूपाचे अजून बहारदार वर्णन केले आहे.
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
संस्कृत मधील श्लोकांचा अर्थ समजावून घेतांना, संधि विच्छेद करून, शब्द सुटे सुटे करून घेतल्यानंतर त्यातील अर्थ लवकर लक्षात येतो. वरील श्लोकाचा संधि विच्छेद खालील प्रमाणे आहे:
स= सहित , असि= तलवार, किंवा खड्ग,
(आपण असिधारा व्रत हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ: असिधारा व्रत- तलवारीवर चालण्यासारखे कठीण व्रत)
तूण= बाण ठेवण्याचा भाता, धनु:= धनुष्य, बाण= बाण, पाणि=हात
नक्तम्+चर = नक्त म्हणजे रात्र. चर म्हणजे चालणे, हिंडणे(उदा. गोचर, वनचर, दिनचर, निशाचर) नक्तंचर- रात्री हिंडणारे अर्थात, राक्षस ; अन्तकम्= अंत करणारा.
नक्तंचरांतकम्= निशाचर असलेले म्हणजे राक्षस, यांचा अंत करणारा.
स्वलीलया= स्वतःच्या लीलांनी
जगत्+त्रातुम्+आविर्भूतम्+अजम्(जो अज आहे, अर्थात ज्याचा जन्म झालेला नाही असा तो श्रीराम )+विभुम् (सर्व व्यापक, महान)- अर्थात, जगाला तारण्यासाठी जो आविर्भूत झाला आहे, जो अजन्मा आहे, जो विभू, म्हणजे सर्वव्यापक आहे.
या श्लोकात श्रीरामाची आणखी ठळक वैशिष्टये वर्णन केली आहेत.
रामाचे रूप लक्षात आणतांना, सर्वात ठळक बाब म्हणजे रामाचे आजानुबाहू; पण त्यानंतर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रामाचा बाण. राम म्हटला की त्याच्या पाठीवर बाणाचा भाता, त्यात असलेले बाण, आणि एका हातात खड्ग हे आपल्या नजरे समोर येते. आपल्या दीर्घ बाहूंनी वरील शस्त्रें समर्थपणे चालवून राक्षसांचा नायनाट करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा राम.
परब्रह्माचा ‘जन्म’ होत नसतो, तर ते आविर्भूत होत असते. ते विभु म्हणजे सर्वव्यापक जरी असले , तरी भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मनुष्य रूपात आविर्भूत होत असते.
आतापर्यंत आपण रामरक्षेतील सुरुवातीचे ३ श्लोक पाहिले. त्यात श्री रघुनाथाच्या चरित्राचा विस्तार, आणि जगाच्या उद्धारासाठी रामाचा झालेला ‘अविर्भाव’ यांचा उल्लेख आहे.
आता यापुढील श्लोक- या श्लोकापासून ‘राम कवच’ सुरू होते.
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
‘प्राज्ञ’ म्हणजे विद्वान लोक ‘पापघ्नीं’ म्हणजे पापांचा नाश करणारी, आणि ‘सर्व कामदां’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी अशी रामरक्षा पठण करतात.
इथून पुढच्या ओळीपासून रामरक्षा कवच सुरू होते. यात शरीरात सगळ्यात वर असणारे ‘शीर’ म्हणजे डोक्या पासून सुरुवात करून(‘शिरो मे राघवः पातु”) सर्वात खाली, म्हणजे आपल्या पायापर्यंत, (‘पादौ बिभीषण: श्रीद:”) आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचे श्रीराम रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.
आपण काळजीपूर्वक पाहिले, तर या सर्व श्लोकांमध्ये, श्रीरामाचे पूर्ण चरित्र, कालक्रमानुसार आलेले आहे, असे दिसून येते.
श्रीराम हे रघुवंशी, म्हणून सुरुवातीला त्यांचा, राघवः असा उल्लेख आला आहे. आणि त्यानंतर दशरथाचा पुत्र, म्हणून दशरथात्मज. रघुवंशी ‘राघव’ माझ्या डोक्याचे रक्षण करो, तर दशरथाचा पुत्र असलेला श्रीराम माझ्या ‘भालाचे’ म्हणजेच कपाळाचे रक्षण करो.
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
वडिलांनंतर आईचे अर्थात कौसल्येचे नाव येते. आणि आईच्या नंतर विश्वामित्रांचे नांव येते. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या ‘दृशौ’ म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो.
विश्वामित्रांना प्रिय असणारा श्रीराम माझ्या श्रुती म्हणजे कानाचे रक्षण करो.
इथे ‘नेत्र’ किंवा ‘कर्ण’ म्हटले नाही, हे लक्षात घ्यावे. ‘दृशौ’ म्हणजे दृष्टी म्हटले आहे. डोळे म्हणजे केवळ पाहण्याचा बाह्य अवयव आहे. दृष्टी मध्ये डोळे आणि आतील दृष्टीचे ज्ञानेंद्रिय दोहोंचा समावेश आहे. तसेच ‘श्रुती’ मध्ये कान आणि आतील कर्णेन्द्रिय दोन्हींचा समावेश आहे. तसेच ‘घ्राण’ म्हणजे नाक आणि आतील घ्राणेन्द्रिय दोन्हीचा समावेश आहे.
आपणास माहित आहे, की जेंव्हा राम आणि लक्ष्मण थोडे मोठे झाले, वसिष्ठ ऋषींकडे विद्या प्राप्त करून आले, तेंव्हा ऋषि विश्वामित्र दशरथाकडे आले, आणि दशरथाला म्हणाले, “हे राजा, सांप्रत राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवलेला असून, ते ऋषींना यज्ञ करू देत नाहीयेत. त्यामुळे राक्षसांचा निःपात करण्यासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी तुझे हे दोन राजकुमार माझ्यासोबत दे” श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना या कामात सहकार्य केले, आणि ते त्यांना प्रिय झाले, म्हणून “विश्वामित्रप्रियः”
‘मखत्राता’- ‘मख’ म्हणजे यज्ञ. (लग्नात किंवा कुठल्याही शुभकार्यात ‘ग्रहमख’ करतात- ते म्हणजे नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचा यज्ञ.) मखत्राता म्हणजे ‘यज्ञाचे रक्षण करणारा’
त्यानंतरचे नांव ‘सौमित्रिवत्सल’ असे आहे. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. सौमित्रिवत्सल म्हणजे लक्ष्मणावर वात्सल्य असलेला. श्रीरामाचे आपली कनिष्ठ भावावर, नुसते ‘प्रेम’ नव्हते तर ‘वात्सल्य’ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वात्सल्य म्हणजे जे आईचे किंवा वडिलांचे मुलाप्रत असते, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. तसेच वात्सल्य श्रीरामाचे आपल्या लहान भावाप्रति होते. रामायणात आदर्श नातेसंबंध कसे असावेत याचा वस्तुपाठ श्रीरामांनी घालून दिलेला आहे.
कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे रक्षण करो; विश्वामित्रांना प्रिय असणारा राम माझ्या श्रुतीचे रक्षण करो; यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या ‘घ्राणाचे’ रक्षण करो; आणि लक्ष्मणावर वात्सल्य असणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.
जिंव्हा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
त्यानंतर येणाऱ्या जिंव्हा या महत्वाच्या अवयवाचे रक्षण करण्यासाठी ‘विद्यानिधि’ श्रीरामाची प्रार्थना केली आहे.
त्यानंतर येणाऱ्या ‘कंठ’ या अवयवाचे रक्षण भरताने वंदन केलेल्या श्रीरामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.
कंठ हा अवयव भावनांचे स्थान आहे. मनुष्य भावनावश झाल्यानंतर त्याचा कंठ अवरुद्ध होतो, घशात आवंढा दाटून येतो. भरताची श्रीरामाप्रत भक्ती ही अशा प्रकारची होती. श्रीराम लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर भरताशी झालेली गळाभेट आठवा. म्हणून या ठिकाणी कंठा साठी ‘भरत वंदित’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.
स्कंध अर्थात खांद्यांसाठी ‘दिव्यायुध’ हे विशेषण तसेंच ‘भुजा’ अर्थात दण्ड किंवा बाहू यासाठी ‘भग्नेशकार्मुक’ हे विशेषण असेच चपखल बसते. रामाचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण होते. आणि बाणाचा भाता खांद्यावर असतो.
विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाकरवी आधी त्राटिकेचा वध करविला. तसेच इतर अनेक राक्षसांचा वध दोन्ही बंधूंनी केला. तदनंतर जनक राजाकडून आलेल्या आमंत्रणावरून विश्वामित्र ऋषी दोन्ही बंधूंना सीता स्वयंवराला घेऊन घेले. तिथे श्रीरामांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावतांना ते तुटले, म्हणून भग्नेशकार्मुक असे नाव आले. ‘भग्नेशकार्मुक’ भग्न+ ईश+ कार्मुक; ईश अर्थात ‘शंकर’, ‘कार्मुक’ अर्थात धनुष्य. अर्थात, ज्याने श्री शंकराचे धनुष्य भग्न केले- तोडले- तो श्रीराम.
या श्लोकात श्रीरामाचे शिवधनुष्य भंगापर्यन्तचे चरित्र आले आहे.
आता त्यापुढील श्लोक:
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
जनकाच्या दरबारातील स्वयंवरात श्रीरामाने सीतेचे वरण केले. तो सीतापति श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो. लग्न करणे- म्हणजे “हात हातात देणे” वधूवर एकमेकांना हाताने माला घालतात, म्हणजेच “वरतात”. या दृष्टीने इथे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो अशी प्रार्थना योग्य वाटते.
श्रीराम जानकीशी स्वयंवर करून परत निघाले असतांना वाटेत जमदग्नीचा पुत्र परशुराम ‘जामदग्न्य’ याने श्रीरामाला शिवधनुष्य तोडल्यामुळे रागावून आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या युद्धात परशुरामांना, श्रीराम हे श्रीविष्णूचे अवतार असल्याची खात्री झाल्यानंतर, त्यांच्या मुखातील अवतार ज्योती श्रीरामाच्या मुखात शिरली अशी कथा आहे. जामदग्न्याला म्हणजेच परशुरामांना जिंकणारा म्हणून जामदग्न्यजित्.
श्रीराम सीतेशी विवाह करून अयोध्येला परत आले, नंतर कैकेयीच्या दुराग्रहामुळे वनवासात गेले. वनवासात सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. श्रीराम पंचवटीला असतांना, रावणाची बहिण शूर्पणखा तेथे आली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. शूर्पणखेचा आक्रोश ऐकून त्रिशिर, खर आणि दूषण हे राक्षस (जे की रावणाचे दूरचे भाऊ होते) चौदा हजार सैन्यासह धावून आले. रामाने त्या सर्वांचा वध केला. म्हणून ‘खरध्वंसी’ हे विशेषण येथे आले आहे.
नंतर, सीता हरणाचा प्रसंग झाल्यानंतर, सीतेच्या शोधात असतांना, हनुमान, नळ, नीळ, सुग्रीव आणि जांबुवंत यांच्याशी श्रीरामाची भेट झाली. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा, म्हणून ‘जाम्बवदाश्रयः’ हे विशेषण आले आहे.
“ खर राक्षसाचा वध करणारा श्रीराम माझ्या मध्य भागाचे रक्षण करो. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या ‘नाभि’ चे रक्षण करो.”
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥8॥
यापुढील श्लोकात सुग्रीवाचा ईश श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. सुग्रीवाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे.
यापुढील शब्द आहे ‘सक्थिनी’. सक्थिनी हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही. मराठी मध्ये एकवचन आणि बहुवचन असते. पण संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे तीन प्रकार आहेत. ‘सक्थिन’ म्हणजे कंबर आणि जांघ यांच्या मधील भाग. जांघ हा शब्द मराठी आहे, तो संस्कृत मधील ‘जंघा’ पेक्षा वेगळा आहे. ‘सक्थिनी’ हे सक्थिन या शब्दाचे द्विवचन आहे. “हनुमंताचा प्रभु असलेला श्रीराम माझ्या सक्थिनी चे रक्षण करो.”
संस्कृत मधील ‘उरू’ म्हणजे मराठीतील ‘जांघ’ किंवा ‘मांडी’. “राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.”
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
मांडीच्या खालचा अवयव म्हणजे गुडघा. “जानु” म्हणजे गुडघा. जानुनी म्हणजे दोन्ही गुडघे. (जसे सक्थिन चे द्विवचन सक्थिनी होते, तसेच, जानु चे द्विवचन जानुनी झाले. ) त्यापुढील अवयव “जंघा”. संस्कृत मधील “जंघा” हे मराठीतील “जांघ” पेक्षा वेगळे आहे. संस्कृत मध्ये “जंघा” म्हणजे “पोटरी”
ज्याने सेतू बांधला, असा श्रीराम माझ्या “जानुनी” म्हणजे गुडघ्यांचे रक्षण करो; आणि दशमुख रावणाचा वध केला तो श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो.
ज्या रामाने बिभीषणाला “श्री” म्हणजे वैभव आणि राज्य दिले, तो श्रीराम, माझ्या पावलांचे रक्षण करो.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
एतां म्हणजे अशाप्रकारे. श्रीरामाचे बल युक्त असणारी अशी ही (एतां) रक्षा जो पुण्यवान मनुष्य पठण करेल, तो चिरायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.
याठिकाणी रामरक्षेतील मुख्य भाग म्हणजे ”कवच” संपले.
विशेष: – आपल्याला एखादे वेळी बाका प्रसंग असेल, संकटात सापडलो असू, जिवाची भीती असेल, आणि पूर्ण रामरक्षा म्हणण्याइतका वेळ नसेल, तर नुसते हे “कवच” म्हटले, तरी कार्यभाग होतो, संकटातून रक्षण होते हा अनुभव आहे.
माधव भोपे
क्रमशः
या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा





