https://goodworld.in A website by Madhav Bhope

चष्मे बुलबुल Chashme Bulbul

chasme bulbul

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

आठव्या वर्गात खूप नवीन मुलं वर्गात आली. विशेषतः ज्या लहान गावात सातवी पर्यंतच शाळा असते तिथल्या मुलांना पुढील शिक्षणाकरता नाईलाजानं शहरात यावंच लागायचं. विलास लोहोटे हा असाच अकोल्याजवळच्या म्हैसांग गावातून आलेला एक विद्यार्थी. डोळ्यांना जाड भिंगाचा जुनाट पद्धतीचा चष्मा, अंगात खेड्यातील शिंप्याकडून शिवून घेतलेला चुरगळलेला ढगळ शर्ट,  प्रथमच शहरात आल्यानं चेहऱ्यावर नवखेपणाचे, बावरल्याचे भाव आणि वर्गात इकडे तिकडे नवलाईने पाहणारे भिरभिरते डोळे. वर्गातील जुन्या, खोडकर  मुलांच्या सराईत, कावेबाज नजरा साहजिकच या खेडवळ मुलाचं बारकाईने धूर्त निरीक्षण करू लागल्या. लवकरच हा भोळा भाबडा जीव वर्गातील मुलांच्या चेष्टेचा विषय झाला. आपल्या अगदी लहान सहान… प्रसंगी पोरकट वाटणाऱ्या सर्व शंका कुशंका तो निःसंकोचपणे, मुलांच्या कुत्सित हसण्याकडे लक्ष न देता आपल्या खणखणीत आवाजात शिक्षकांना विचारायचा. त्याचा निरागस बावळटपणा पाहून शिक्षकांनाही हसू आवरत नसे. आणि त्याची चेष्टा करण्याचा मोह कधी कधी त्यांनाही होत असे.

 

पीजी जोशी सर त्यावेळी आम्हाला विज्ञान विषय शिकवीत. आपल्या विनोदी वृत्तीला अनुसरून वर्गातील प्रत्येकच विद्यार्थ्याला ते विविध मजेशीर टोपण नावाने हाक मारायचे. लोहोटेला चष्मा असल्याने त्याला कधी “ढापण”, कधी “कंदील”, तर कधी “बुलबुल” या नावाने बोलवायचे.DIikHPKV4AAbjF0 696x522 1

 

एके दिवशी पीजी सरांचा पिरियड असताना सरांचं शिकवून संपल्यावर थोडा मोकळा वेळ होता. डोळ्यांवर ताण आल्याने चष्मा काढून बाकावर ठेवून लोहोटे डोळ्यांची उघडझाप करीत शांत बसला होता. त्याला पाहून पीजी सरांना त्याची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी त्याच्याकडे पहात मोठ्या आवाजात हाक मारली..”अहो, चष्मे बुलबुल “…. सरांनी आपल्यालाच हाक मारली आहे हे लक्षात येताच लोहोटे गडबडीनेच  जागेवर उभा राहिला. उभं राहता राहता घाईघाईने टेबलावरचा चष्मा हातात घेतला आणि घालण्यापूर्वी  तो नीट पुसून घ्यावा म्हणून शर्टाच्या टोकाने चष्मा स्वच्छ करू लागला. त्याचवेळी पीजी सरांनी पुन्हा हाक मारली “कंदील राव…काय करताय ? ” …… हातातला चष्मा उंच करून सरांना दाखवित लोहोटे म्हणाला “कंदिलाची काच साफ करतोय, सर ! “….main qimg 1571a1f160a57d06b526843c007831c2 lq हे ऐकताच वर्गातील सर्व मुलांनी मनमुराद हसत लोहोटेच्या निर्भय विनोदबुद्धीला प्रचंड प्रतिसाद दिला.  पीजी सर ही क्षणभर चपापले. मनातल्या मनात त्यांनीही लोहोटेच्या हजरजबाबीपणाला निश्चितच दाद दिली असेल.

 

…..त्या प्रसंगानंतर पीजी सरांनी लोहोटेची चष्म्यावरून कधीच चेष्टा केली नाही….

 

😃😃😃😃😃

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

चुन्याची डब्बी

chuna dabbi 500x500 1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*चुन्याची डबी*

 

1985 साली मी स्टेट बँकेच्या जुना जालना शाखेत काम करत असतानाची गोष्ट. मी कर्ज विभागात काम करीत होतो आणि त्याच बरोबर कर्मचारी संघटनेचा स्थानिक पदाधिकारी सुद्धा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतीला पूरक जोडधंदा करता यावा म्हणून शेळ्या खरेदी करण्यासाठी बँकेतर्फे सरकारी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जायचं. सर्व सरकारी योजनांप्रमाणेच याही योजनेत स्थानिक नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असायचा. राज्य सरकारच्या संबंधित खात्यातील अधिकारी भरपूर लाच घेऊनच कर्जाचे अर्ज बँकेकडे पाठवीत असत. विविध संघटना, सेना, मोर्चा यांचे स्वघोषित पदाधिकारी उर्फ दलाल बँकेत येऊन अयोग्य मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत. परिणामी योजनेचा प्रचंड गैरफायदा अपात्र, कर्जबुडव्या, धूर्त ग्रामीण जनतेकडून घेतला जात होता.

 

एकदा जालन्यापासून 25-30 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बेरडगाव नावाच्या एका अतिशय दुर्गम खेड्यातील काही शेतमजुरांना शेळ्या खरेदीसाठीचे कर्ज आमच्या शाखेतर्फे मंजूर करण्यात आले होते. दर मंगळवारी जालन्यास गुरांचा बाजार भरत असे. तेथून लाभार्थीच्या पसंतीने शेळ्या खरेदी करून त्यांची व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर विमा कंपनीचे बिल्ले (इअर टॅग) त्या शेळ्यांच्या कानाला टोचून घ्यावे लागत. त्यानंतर नगरपालिकेची जनावर खरेदीची पावती बनवून झाल्यावर शेळ्या व विक्रेता यांना घेऊन लाभार्थी बँकेत येत असे. बँकेच्या फिल्ड ऑफिसरने शेळ्यांचे इन्सपेक्शन व योग्य शहानिशा केल्यावरच विक्रेत्याला शेळ्यांची किंमत अदा केली जात असे.goats

 

त्या दिवशी बेरडगावच्या दहा लाभार्थींना कर्जवाटप करायचे होते. त्यापैकी नऊ जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये तर राहीलेल्या एकाला दहा हजार रुपये इतकी कर्ज रक्कम प्रदान करायची होती. संध्याकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर एकदाचे सर्व लाभार्थी शेळी विक्रेत्यांना घेऊन बँकेत आले. फिल्ड ऑफिसरने ताबडतोब शेळ्यांचे इंस्पेक्शन केले. उशीर झाल्याने कॅशियरने घाईघाईतच सर्वांना फिल्ड ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे रक्कम अदा केली व कॅश क्लोज करण्याच्या मागे लागला. पण कॅशियर व अकाऊंटंटच्या स्क्रोलमध्ये दहा हजारांचा फरक येत होता. लवकरच उलगडा झाला की ज्या एकमेव शेळी विक्रेत्याला दहा हजार रुपये द्यायचे होते त्यालाही घाईगडबडीत वीस हजार रुपये दिले गेले होते.

 

त्याकाळी दहा हजार रुपये फार मोठी रक्कम होती. रक्कम जमा केल्याशिवाय कॅशियरला तिजोरी बंद करता येणार नव्हती. फिल्ड ऑफिसर, संबंधित क्लर्क, कॅशियर, …सारे या चुकीसाठी एकदुसऱ्याकडे बोट दाखवीत होते. शेवटी मॅनेजर श्री. टी. के. सोमैय्याजी यांना झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला. ते अतिशय शांत, संयमी, सहृदय आणि दिलदार स्वभावाचे होते. त्यांनी शाखाप्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या ह्या चुकीची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ताबडतोब स्वतःच्या खात्यातून दहा हजार रुपये देऊन कॅश बंद करण्यास सांगितले.

 

हा सर्व गोंधळ निस्तरेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. जादा गेलेली दहा हजाराची रक्कम वसूल करण्याची नैतिक जबाबदारी कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी या नात्याने माझी देखील होती. मी लगेच ज्या लीडरने ही  कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी शाखेवर दबाव आणला होता त्याच्याकडे म्हणजे साहेबराव दांडगे ह्याच्याकडे गेलो. साहेबरावने सर्व प्रकरण नीट समजावून घेतले. ज्याला दहा हजार रुपये जास्त गेले होते तो शेळीविक्रेता, लालसिंग त्याचं नाव, तोही योगायोगाने बेरडगावचाच निघाला.

 

साहेबराव म्हणाला ” सर, मी ह्या लालसिंगला चांगलाच ओळखतो. अतिशय प्रामाणिक माणूस आहे. जादा आलेले बँकेचे पैसे तो नक्कीच परत करील. मात्र पैसे आणण्यासाठी बेरडगावला जावे लागेल आणि तिकडे आत्ता रात्रीचे जाणे फारच अवघड आणि धोकादायक आहे. एकतर रात्रीचा अंधार आणि त्यातून संपूर्ण रस्ता कच्चा, चिखल-दलदलीचा, खाचखळग्याचा आणि काटाकुट्याचा आहे. गाडी पंक्चर होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीची साप, रानडुकरं, लांडगे यांची तसेच वाटमारीचीही भीती आहे. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळीच बेरडगावला जा. हवं तर मीही तुमच्या सोबत येतो. काळजी करू नका. पैसे नक्की परत मिळतील.” साहेबरावच्या ह्या आश्वासक बोलण्यानं बराच धीर आला आणि खूप हायसंही वाटलं.

 

चर्चेअंती दुसरे दिवशी पहाटे सहा वाजता साहेबरावला सोबत घेऊन निघायचे ठरले. मी पाच वाजताच उठून तयार होऊन स्कुटर घेऊन साहेबरावच्या घरी गेलो. तो गाढ झोपला होता. मला आलेला पाहून डोळे चोळत उठून तो लगेच तयार झाला आणि स्वतःची मोटारसायकल घेऊन माझ्याबरोबर निघाला. सुमारे तासभराच्या खडतर प्रवासानंतर आम्ही बेरडगावला पोहोचलो. लालसिंग गावाबाहेर बेरडवस्तीत रहात होता. तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे आमच्या गाड्या गावालगत रस्त्यावरच उभ्या करून आम्ही दोघे दोन तीन फर्लांगाचं अंतर चिखल तुडवीत जवळच्या बेरडवस्तीत गेलो.OIG2.b yTUR

 

लालसिंगने आमचे आदराने स्वागत केले. मी त्याला आम्ही इथपर्यंत येण्याचे कारण सांगितले. त्यावर लालसिंग म्हणाला “साहेब, मी बँकेने दिलेले पैसे न मोजता तिथेच रुमालात बांधले आणि लगेच घराकडे आलो. अजूनही ते पैसे तसेच रुमालात ठेवले आहेत. तुम्ही ती रुमालाची पुरचुंडी घ्या आणि त्यातून जास्तीचे आलेले पैसे काढून घ्या.”currency notes

 

मला लालसिंगच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. मी त्यानं आणून दिलेल्या रुमालाची गाठ उघडली आणि  जास्तीचे गेलेले दहा हजार काढून घेण्यासाठी पैसे मोजू लागलो. पण हे काय…? दहा हजार मोजताच सारे पैसे संपले. रुमालात एकूण फक्त दहा हजार रुपयेच होते. म्हणजे..? लालसिंगला दहाच हजार दिले गेले ? मग पैसे गेले कुठे ? कॅशियर खोटं तर बोलत नाही ना ?….असे नानाविध विचार माझ्या मनात येऊन गेले.

 

मी लालसिंगकडे पाहिलं. “काय झालं साहेब ?” माझा गोंधळलेला चेहरा पाहून त्यानं भाबडेपणानं विचारलं. “काही नाही. बहुदा आमच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी.” असं म्हणून लालसिंगची माफी मागून आम्ही निघालो.

 

जाता जाता लालसिंगच्या आग्रहास्तव वस्तीच्या कोपऱ्यावरील चहाच्या खोपटात चहा पिण्यासाठी गेलो. चहा पिताना साहेबराव म्हणाला “पहा साहेब !… मी म्हणत नव्हतो, लालसिंग खूप इमानदार आहे म्हणून ! बिचाऱ्याने अजूनपर्यंत पैसे मोजलेही नव्हते. जर खरोखरच त्याच्याकडे जास्तीचे पैसे आले असते तर ते तुम्हाला नक्की परत मिळाले असते.” मी देखील मान डोलावून त्याच्या बोलण्याला संमती दर्शवली.

 

माझी वसुली मोहीम पार फसली होती. मोठया आशेनं माझी वाट पाहत बसलेल्या कॅशियर, क्लर्क व फिल्ड ऑफीसरचे चेहरे माझ्या डोळ्यापुढे तरळू लागले. उदास मनानं लालसिंगचा निरोप घेऊन परत जाण्यासाठी आम्ही उठतो न उठतो, तोच….

 

“अहो काकाsssss थांबाsssss” असा आवाज देत लालसिंगचं आठ दहा वर्षांचं पोरगं धापा टाकत आमच्यापर्यंत आलं.images 17

 

“अहो काका, काल रात्री बँकेचे जास्तीचे आलेले पैसे घेण्यासाठी तुम्ही चिखलकाट्यात बरबटून आमच्या घरी आला होता ना, त्यावेळी जादा आलेले पैसे तर तुम्ही नेले पण तुमची एक गोष्ट मात्र आमच्या घरीच विसरला होता…ती ही घ्या तुमची विसरलेली चुन्याची डबी.”chuna dabbi

 

असं म्हणत त्या मुलानं चुन्याची डबी साहेबरावच्या हातावर ठेवली.

 

काल घडलेला सारा घटनाक्रम माझ्या डोळ्यापुढे विजेसारखा झर्रकन चमकून गेला. साहेबरावच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला. घाबरून त्यानं मोठ्ठा आवंढा गिळला. शरमेनं अवघडून त्याचा चेहरा कसनुसा होऊन अक्षरशः शतशः विदीर्ण झाला. खजील होऊन खाली गेलेली मान वर न करता, कुणाला काही कळायच्या आत, पायात चप्पलही न घालता, काट्याकुट्याची पर्वा न करता, चिखल तुडवीत त्यानं तडक रस्त्याकडे धाव घेतली.

 

……बघता बघता रस्त्यावरील कडेला लावलेल्या मोटारसायकलवर तो स्वार झाला आणि धुरळा उडवीत दिसेनासा झाला.

 

                     🤣😜🤣

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

फिरते साहित्य Moving Literature

firte sahitya

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*फिरते  “साहित्य”* …

प्राथमिक शाळेत अक्षर ओळख होऊन सलग वाक्य वाचता येऊ लागलं तेव्हा जणू ज्ञानाचा खजिना असलेली अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं. वाचनाचा आनंद, नाविन्याचं औसुक्य आणि वैविध्याची भूक एवढी जास्त होती की शाळेत येता जाताना जे जे काही लिहिलेलं दिसायचं, मग त्या भिंतींवरील जाहिराती असोत वा घरांवरील नावाच्या पाट्या असोत, ते ते सर्व अधाशासारखं भराभरा वाचून काढायचा नादच लागला.

त्यावेळी वाहनांच्या विशेष करून ट्रकच्या पाठीमागे काही ठराविक शब्द लिहिले असत. “हॉर्न प्लिज”, “हॉर्न दिजीए”, “हॉर्न ओके प्लिज”, “ओके टाटा”, “फिर मिलेंगे” असे थोडक्यात लिहिले असायचे. त्यानंतर सुप्रसिद्ध “बुरी नजरवाले तेरा मुँह काला” चा जमाना आला. माझ्या लहानपणापासून ते आजतागायत गेली साठ सत्तर वर्षे भारतातील समस्त ट्रक चालकांचे हे अत्यंत आवडते वाक्य राहिले आहे. या जगात “नजर” टाकण्याजोग्या इतर अनेक “आकर्षक सजीव” गोष्टी असताना त्या सोडून सर्वजण आपली नजर ट्रक सारख्या निर्जिव अनाकर्षक वाहनाकडेच आणि तीही वाकडी म्हणजे “बुरी”च का टाकत असावेत हे मला अजून न सुटलेलं एक कोडंच आहे.

नंतरच्या काळात काही रसिक ट्रक चालक मनोरंजक शेर शायरी ट्रकमागे लिहू लागले. हळूहळू ट्रॅक्टर, बस, जीप आणि सर्वच खाजगी वाहनांमागे अशा चित्तवेधक ओळी दिसू लागल्या. मला तर सुरवातीपासूनच ट्रक, बस मागे लिहिलेलं हे फिरतं साहित्य वाचण्याचा छंद होता. पुढे कॉलेजात गेल्यावर तर हा छंद वाढत जाऊन त्याचं तात्पुरत्या वेडात रूपांतर झालं. ट्रक, बस मागे लिहिलेलं प्रांतोप्रांतीचं, विविधतेनं नटलेलं आणि अतिशय सवंग पण मनोरंजक असं भरपूर साहित्य मला मुखोद्गत होतं. दररोज वाहनांच्या मागे सायकलवर फिरून असं नवनवीन साहित्य मिळवून आम्ही सारी मित्रमंडळी त्यावर चर्चा करत मस्तपैकी टाईमपास करायचो.main qimg beb03676b796c4586df600b0c149e2c4

एकदा मी कॉलेजातून घरी जात असताना लहान मुलांना शाळेत घेऊन जाणारी एक खाजगी स्कुलबस माझ्या सायकल जवळून पुढे गेली. नेहमीच्या सवयीने मी बसच्या मागे लिहिलेलं काही नवीन साहित्य मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसमागे काही अपरिचित ओळी लिहिलेल्या मला अस्पष्ट दिसल्या. पण बस वेगात असल्याने मी त्या ओळी नीट वाचण्यापूर्वीच बस माझ्या दृष्टीआड झाली. त्या अपरिचित ओळींनी माझी उत्सुकता चाळवली गेली. काहीतरी नवीन साहित्याचा लाभ आज आपल्याला होणार या आशेने मी बसच्या मागे वेगात सायकल दामटली.4

दोन तीन किलोमीटर पर्यंत वेगात पाठलाग केल्यावर मला दूरवर ती बस दिसू लागली. मोठया कष्टाने सायकलला टांगा मारत कसाबसा बसपर्यंत पोहोचतो न पोहोचतो, तेवढ्यात बस पुन्हा सुरू झाली. मात्र त्या गडबडीतही मी बसच्या मागे लिहिलेली पहिली ओळ वाचून काढली. ती ओळ अशी होती….

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”

मी एवढी ओळ वाचतो न वाचतो तोच सायलेंसरमधून धूर सोडत आणि धुळीचे लोट उडवीत बस पुन्हा नजरेआड झाली. मी पाहिलं की पायाखालचा रस्ता आता खूप खडबडीत, कच्चा आणि धुळीने भरलेला होता. डोळ्यात व नाकातोंडात सारखी धूळ जात होती. त्यातून सायकल पंक्चर होण्याचीही भीती होती. रस्ता नीट दिसत नसल्याने मी काळजीपूर्वक, धिम्या गतीने पण नेटाने बसचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याचवेळी मनातल्या मनात नुकतीच वाचलेली बस मागील पहिली ओळ आठवीत, पुढील ओळ काय असू शकेल याबद्दल कल्पनेला ताण देत विचार करीत होतो.

आतापर्यंत मी गावाच्या बाहेर पडून शहरापासून बराच दूर आलो होतो. घराकडे जाण्याचा रस्ता तर केव्हाच मागे पडला होता. मात्र मला त्याची फिकीर नव्हती. आज कसंही करून ती दुसरी ओळ वाचूनच मग मागे फिरायचं अशी मनात जिद्द पेटली होती. थोड्यावेळाने तो खराब रस्ता एकदाचा संपला. डोळ्यासमोरील धूळ ही कमी झाली. रस्ता स्वच्छ दिसू लागला तसा मी सायकलचा वेग पुन्हा वाढवला.  वाटेवरील गावांत थांबत थांबत, तेथील लहान मुलांना त्यांच्या  घरी पोहोचवणारी ती स्कुलबस मला पुन्हा दिसू लागली. एव्हाना मी सहा सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. माझा स्टॅमिना आता संपत चालला होता. शेवटचा नेटाचा प्रयत्न म्हणून मी जोरात पायडल मारत धपापत्या उराने त्या थांबलेल्या बसपर्यंत पोहोचलो.cyclist

सायकल बसच्या अगदी जवळ नेत मी घाईघाईने ती दुसरी ओळ वाचली.

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”  नंतरची ती दुसरी ओळ होती….

“अब तो पिछा छोडो, मैं हूं बाल बच्चों वाली”

या ओळी वाचता वाचताच मला जोराचं हसू फुटलं. माझ्या आजच्या अवस्थेला अगदी समर्पक अशा त्या ओळी होत्या. स्वतःची कींव करत हसतानांच अशा निरर्थक गोष्टींच्या मागे एवढी धावाधाव करण्याच्या माझ्या पोरकट स्वभावाचा मला रागही आला.

……त्या दिवसापासून अशी फिरत्या साहित्यामागे फिरण्याची माझी सवय कायमची सुटली आणि मी नियमितपणे लायब्ररीत जाऊन सकस, अभिजात आणि उत्कृष्ट साहित्य वाचू लागलो.

main qimg d5986d7323955bdbc5d35e8381f76650

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

गल्लीतील यमदूत Demon in a dark lane

demon in dark lane

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*गल्लीतील यमदूत*

मी बँकेत नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. जालना येथील स्टेट बँकेत कॅशियर-कम्-क्लर्क म्हणून 1981 साली मी जॉईन झालो. लवकरच माझ्यावर बँकेचा रोजचा ताळेबंद म्हणजेच कॅश बुक (क्लीन कॅश) लिहिण्याचं अतिशय क्लिष्ट परंतु त्याचबरोबर प्रतिष्ठेचं काम सोपविण्यात आलं.

हे कॅश बुक टॅली करणं फारच जिकिरीचं काम होतं. बँकेत भरपूर काम असल्याने स्टाफही भरपूर होता. रोज एक हजारापेक्षाही जास्त व्हाऊचर्स असायची. ही व्हाऊचर्स योग्यरित्या सॉर्ट करून संबंधित दैनिक पुस्तकात (डे बुक) ठेवण्याचे काम प्यून मंडळी दुपारपासूनच सुरू करत. संध्याकाळी सर्वांची डे बुकं लिहून झाल्यावर मगच कॅश बुक लिहिण्याचे माझे काम सुरू होत असे. त्यामुळे संध्याकाळी चार तास व सकाळी दोन तास अशा दोन भागात माझे कामाचे तास विभागले होते.

शक्यतो त्याच दिवशी हे कॅश बुक टॅली करण्याचा माझा प्रयत्न असे. मात्र कधी व्हाऊचर्स गहाळ झाल्याने तर कधी डे बुक लिहिण्यातील विविध चुकांमुळे क्लीन कॅश टॅली होण्यास नेहमीच खूप उशीर व्हायचा. साहजिकच सर्व काम आटोपून घरी जाण्यास मला रात्रीचे दहा अकरा वाजत. बँकेपासून जराशा दूर अंतरावर असलेल्या एका विडी कामगारांच्या वस्तीत तेंव्हा मी रहात असे. स्टाफला मिळणारं सायकल लोन उचलून मी नुकतीच नवीन सायकल घेतली होती. त्यावरूनच मी बँकेत जाणे येणे करीत असे.

एक दिवस असाच रात्री साडे दहा वाजता काम आटोपून घरी जात असताना वाटेतील एका गल्लीच्या तोंडाशीच एक भला मोठा, हिंस्त्र चेहऱ्याचा कुत्रा, आपले अणकुचीदार दात विचकवीत, माझी वाट अडवून उभा राहिला. कुत्र्याला पाहून मी थोडा घाबरलो आणि त्याला टाळून बाजूने सायकल काढून वेगाने पुढे जाऊ लागलो. त्या धिप्पाड कुत्र्यानेही सायकलमागे वेगाने पळत माझा गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पाठलाग केला.  त्यानंतर बहुदा त्याची हद्द संपल्यामुळे तो तिथेच थांबला. मी मात्र तोपर्यंत भीतीने अर्धमेला झालो होतो. जोरजोरात पायडल मारल्याने मला मोठी धाप लागली होती आणि भीतीने सर्वांगाला चांगलाच घाम फुटला होता.

त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. सारखा तो भयंकर चेहऱ्याचा खुनशी, खूंखार कुत्रा नजरेसमोर येत होता.ferocious dog

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही गोष्ट पार विसरून गेलो. त्या दिवशीही काम आटोपण्यास नेहमीसारखाच उशोर झाला. सायकलवर टांग मारत मी घराकडे निघालो. त्या गल्लीच्या तोंडाशी येताच अचानक कालच्या प्रसंगाची आठवण झाली आणि छातीचे ठोके वाढले. घशाला कोरड पडली. मी घाबरून आसपास पाहिलं. रस्ता सुनसान होता हे पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि निर्धास्तपणे हलकेच शीळ घालीत आरामात हळू हळू पायडल मारण्यास सुरवात केली. इतक्यात अचानक कुणीतरी बाजूच्या झुडुपमागून निघून माझ्या सायकलवर झेप घेतली. मी ब्रेक मारून नीट बघितलं तर तो कालचाच भयंकर कुत्रा होता. बहुदा माझीच वाट पहात झुडुपामागे दबा धरून बसला असावा. मी कालच्यासारखीच वेगात सायकल दामटली. गल्लीच्या टोकापर्यंत माझा पाठलाग करून कालसारखाच तो दुष्ट कुत्रा आपली सीमा येताच थांबला.bike and dog

त्यानंतर हे रोजचंच झालं. मला रात्री घराकडे जायचं म्हंटलं की त्या कुत्र्याच्या दहशतीमुळे अंगावर काटा येत असे. घराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गही नव्हता. मी मॅनेजरसाहेबांकडे कॅश बुक सोडून दुसरं कोणतंही काम देण्याची विनंती केली. मॅनेजर साहेबांनी कारण विचारलं तेंव्हा मी त्यांना त्या कुत्र्याच्या मागे लागण्याबद्दल सांगितलं. ते ऐकून मॅनेजर साहेब खो खो करून हसत म्हणाले की “तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच म्हणून  समज !”

जालना नगर परिषदेची सर्व बँक खाती आमच्याकडेच होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग  विविध प्रकारच्या कामांसाठी बँकेत नियमित येत असे. मॅनेजर साहेबांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या खात्याच्या  कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची माझ्याशी गाठ घालून दिली. मी त्यांना कुत्र्याचे वर्णन करून तो कुठल्या गल्लीत असतो हे सांगितले. त्यावर “आपण अजिबात काळजी करू नका. उद्याच त्या कुत्र्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल,” असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

त्याही दिवशी रात्री कुत्र्याने माझा नेहमीसारखाच पाठलाग केला. एकदोनदा आपल्या दातांनी माझी पॅन्टही पकडली. पण ह्या क्रूर, पापी कुत्र्याला नगर पालिकेचे कर्मचारी उद्या पकडून नेणार आहेत, हे माहीत असल्याने मी तो त्रास फारसा मनावर घेतला नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅनेजर साहेबांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. नगर पालिकेचे ते कर्मचारी त्यांच्यासमोरच बसले होते. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गल्लीत व आसपास भरपूर शोधाशोध करूनही असा कोणताही भटका कुत्रा आढळला नाही” असं ते म्हणत होते. “बहुदा मला त्या कुत्र्याचा भास होत असावा” असं ते ठासून सांगत होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पहात ते निघून गेले. मॅनेजर साहेबांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता “आजपासून रात्री तुम्हाला घरी सोडण्यासाठी बँकेचा वॉचमन तुमच्यासोबत घरापर्यंत येईल” असे सांगून मला धीर दिला.

पुढचे सलग दोन दिवस बँकेचा वॉचमन मला सोडण्यासाठी घरापर्यंत आला. आश्चर्य म्हणजे तो भयंकर कुत्रा त्या दोन दिवसात गल्लीत फिरकलाच नाही. साहजिकच “नगर पालिकेचे लोक खरंच बोलत होते…असा कुणी कुत्रा त्या भागात नाहीच आहे…सारे या साहेबांच्या मनाचे खेळ आहेत….मी आजपासून त्यांना सोडायला जाणार नाही.” असं वॉचमनने मॅनेजर साहेबांना माझ्यासमोरच ठणकावून सांगितले. शिवाय वरतून ” साहेब, दर शनिवारी मारुतीला नारळ फोडत जा…सारं काही ठीक होईल.” असा मला आगाऊपणाचा सल्लाही दिला

त्या दिवशी रात्री काम आटोपल्यावर मी हताशपणे घराकडे निघालो. मी “त्या” गल्लीत प्रवेश करताच तो  भयंकर कुत्रा माझ्यावर त्वेषाने चाल करून आला. मी अजिबात न डगमगता… “घाबरू नकोस, हा केवळ भास आहे”..असं मनाला बजावीत होतो. मात्र जेंव्हा त्याने माझी पॅन्ट दातात धरून टरकावली तेंव्हा मात्र माझे अवसान गळाले आणि मी जीव मुठीत धरून, कुत्र्यापासून पाय वाचवीत, कशीबशी ती गल्ली पार केली.

आता हा आतंक, हा उपद्रव म्हणजे माझं जागेपणीचं रोजचं दु:स्वप्नच होऊन बसलं. तो भयंकर कुत्रा मी त्या गल्लीत शिरताच माझ्या मागे लागायचा. कधी पॅन्ट धरायचा तर कधी सायकलच्या हँडलवर झेप घ्यायचा. मी या रोजच्या त्रासाने अगदी कंटाळून गेलो होतो. आता तर बँकेतही याबद्दल कुणाला काही सांगायची सोय राहीली नव्हती.

एकदा माझ्या मित्राला त्याच्या घरातील उंदीर मारण्यासाठी औषध घ्यायचे होते, म्हणून त्याच्यासोबत औषधाच्या दुकानात गेलो होतो. “या उंदरांच्या औषधाने कुत्री मरतात का हो ?” असं जेंव्हा मी दुकानदाराला विचारलं, तेंव्हा त्याने “कुत्री मारण्याचे वेगळे विष असते व ते आमच्याकडे उपलब्ध आहे” अशी माहिती पुरवली. त्याचवेळी त्या भयंकर कुत्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी हा जालीम उपाय करण्याचा मी मनाशी निश्चय केला.

त्या दिवशी रात्री घरी जाताना न विसरता दुकानातून कुत्र्याचे विष विकत घेतले. गल्लीतून जाताना रोजच्याप्रमाणेच त्या कुत्र्याने अंगावर धावून येत घाबरवून टाकले, तेंव्हा “ह्या कुत्र्याचा त्रास सहन करण्याचा हा शेवटचाच दिवस !” असं मनात येऊन गेलं. घरी पोहोचताच एका वाटीत पाणी घेऊन त्यात ते कुत्र्याचे विष मिसळून ठेवले. उद्या दुपारी बिस्किटे आणून ती या विषाच्या पाण्यात भिजवून सोबत न्यायची आणि रात्री घरी येताना त्या भयंकर कुत्र्यास खाऊ घालायची असं ठरवून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी दुपारी बँकेत जाण्यापूर्वी, पहिल्यांदा जवळच्या रस्त्यावरील दुकानातून बिस्किटे आणावीत म्हणून बाहेर पडलो. वाटेतच कानावर मृदुंग, वीणा, चिपळ्यांचा आवाज पडला म्हणून तिकडे पाहिलं तर पंढरपूरला जाणारी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी चालली होती. आज पालखीचा मुक्काम जालन्यातच होता. मी मनोभावे पालखीला नमस्कार केला. परमप्रिय दैवताच्या पालखीचं दर्शन झाल्याने माझं मन भक्तिभावानं भरून गेलं. निदान आजच्या दिवशी तरी कुत्र्याला विष घालण्याचं दुष्ट कृत्य करू नये असा विचार करून विकत घेतलेला बिस्किटाच्या पुडा घरी न नेता तसाच बँकेत नेला.

रात्री काम आटोपल्यावर बिस्किटाच्या पुड्याची थैली सायकलच्या हॅंडलला लावली आणि घराकडे निघालो. आज गल्लीत तो खतरनाक कुत्रा दिसला नाही. तरी सावधगिरी म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला पहात मी हळूहळू  सायकल चालवीत होतो. गल्ली संपत आली तरी कुत्रा दिसला नाही पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो.. तोंच अचानक त्या गल्लीतील यमदूताने समोरून येत माझ्या सायकलवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्याने मी पुरता गांगरलो. माझा तोल गेला आणि मी सायकलवरून धाडकन खाली आदळलो. कसाबसा उठून कपड्यांवरील धूळही न झटकता, तशीच सायकल हातात धरली आणि धूम पळत सुटलो. गल्ली पार झाल्यानंतर, तो भयंकर यमदूत मागे फिरल्यावर मगच पुन्हा सायकलवर बसून घरी पोहोचलो.

आता मात्र मी सूडानं पुरता पेटलो होतो. सायकलवरून पडल्यामुळे थोडं खरचटून मुका मारही लागला होता. आत्ताच बिस्किटं विषात भिजवून ठेवावीत म्हणून मी हँडलची थैली काढली तर आत बिस्किटाचा पुडाच नव्हता. कदाचित मघाशी सायकल पडली तेंव्हा थैलीतून पुडा कुठेतरी खाली पडला असावा.

आता उद्या दुपारी बँकेत जाताना हे कुत्र्याचे विष बाटलीत भरून बँकेत न्यावे व रात्री येताना बिस्किटाचा पुडा सोबत आणून, त्या गल्लीत थांबून बिस्किटावर विष शिंपडून कुत्र्याला खाऊ घालावे असा पक्का निर्धार केला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी रात्री घरी परतताना बिस्किटाचा पुडा विकत घेतला. विषाची बाटली तर दुपारी येतानाच खिशात ठेवली होती. एखाद्या योध्याप्रमाणे सर्व तयारीनिशी मी कामगिरीवर निघालो होतो. आज तो माझा जानी दुश्मन भयंकर कुत्रा गल्लीच्या सुरवातीलाच स्वागतासाठी हजर होता. जणू काही तो माझीच आतुरतेनं वाट पहात होता. मी देखील एकदाची ही ब्याद टळावी म्हणून आसुसलो होतो.

शांतपणे सायकल उभी करून मी खाली उतरलो. कुत्राही आता माझ्या अगदी जवळ आला होता. माझा हात खिशातील विषाच्या बाटलीकडे गेला. अचानक माझी नजर कुत्र्याच्या डोळ्यांकडे गेली. त्या डोळ्यात केवळ प्रेम आणि आपुलकीच भरलेली दिसत होती. तो आनंदाने जोरजोरात शेपटी हलवीत होता. मला पाहून त्याला खूप आनंद झालेला दिसत होता. तो जवळ येऊन प्रेमाने चक्क माझे पाय चाटु लागला. इतक्या दिवसांचा माझा वैरी आज माझा दोस्त झाला होता. ही किमया कशी घडली याचा मला तर काहीच उलगडा होत नव्हता. त्याचं ते प्रेम बघून माझ्या मनातही त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली. त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं. थैलीतून बिस्किटाचा पुडा काढून मी त्याला सर्व बिस्किटं प्रेमाने खाऊ घातली. थोडावेळ त्याच्याशी खेळून, त्याला जवळ घेत कुरवाळून, त्याच्या पाठीवर तोंडावर हात फिरवून मी घरी निघालो. शेपूट हलवीत तो कुत्राही माझ्या मागोमाग गल्लीच्या टोकापर्यंत आला.pexels photo 7269591

a dog eating a treat

……घरी जाण्यापूर्वी खिशातून विषाची बाटली काढून मी दूर भिरकावून दिली. क्रोधाने आंधळा होऊन मी एक मुक्या प्राण्याच्या जीवावर उठलो होतो हे आठवून मला माझीच लाज वाटत होती.

त्या दिवसापासून तो कुत्रा माझा जिवलग मित्र झाला. माझी वाट पहात गल्लीच्या तोंडाशी बसून राहायचा. मी दुरून दिसताच शेपटी हलवत माझ्या जवळ यायचा, मला चाटायचा, माझ्या कडून लाड करून घ्यायचा. मीही त्याच्यासाठी आठवणीने काहीतरी खाऊ घेऊन जायचो. आता संध्याकाळ झाली की मलाही त्याच्या भेटीची ओढ आणि उत्सुकता लागून रहायची.

हा भयंकर कुत्रा अचानक माझा मित्र कसा बनला यावर विचार केल्यावर मला आठवलं की… त्या दिवशी सायकल खाली पडली तेंव्हा हँडलला लावलेल्या थैलीतील बिस्किटाचा पुडा तिथे पडला असावा आणि त्या कुत्र्याला असं वाटलं की मी तो त्याच्यासाठी आणला होता. साहजिकच त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मी त्याला दयाळू, सहृदय वाटू लागलो. त्याने प्रेमाच्या आशेने माझ्याशी मैत्रीपूर्ण सलगी केली आणि माझ्या सकारात्मक प्रतिसादाने आमची दोस्ती पक्की झाली.

खरंच… किती सोप्पं होतं त्याच्याशी दोस्ती करणं ! मी विनाकारण त्याला घाबरून इतके दिवस व्यर्थ तणावात घालवले. सुरवातीलाच त्याला चुचकारून, काहीतरी खायला देऊन, त्याच्यावर प्रेम करून, त्याला आपलंसं करून घेतलं असतं तर त्याचा जीव घेण्याइतका टोकाचा विचार करण्याची काहीच गरज नव्हती.

आपल्या आयुष्यात ही आपण खोट्या मान सन्मान, प्रतिष्ठा व अहंकारापायी कधी कधी अतिशय क्षुल्लक कारणावरून एकमेकांविषयी वैरभाव मनात बाळगून आपसातील संबंध बिघडवितो. गैरसमज न बाळगता, मोकळ्या मनाने जर आपण आपल्या तथाकथित शत्रु पुढे मैत्रीचा हात पुढे केला तर कोणताही वाद, मतभेद कधीच विकोपास जाणार नाहीत व एक सुदृढ समाज निर्माण होईल.

….”काय साहेब, औषध जालीम होतं ना ? कुत्र्याचा बंदोबस्त झाला की नाही ?”

जिथून कुत्र्याचे विष आणले होते तो औषध विक्रेता मला पाहून विचारत होता..

*”अगदी सहज ! आणि अतिशय उत्तमरीत्या….”*

……हात उंचावून अंगठा दाखवून मी हसत म्हणालो…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

पाठांतर स्पर्धेची गोष्ट

images 13

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

पाठांतर स्पर्धेची गोष्ट

——————–

मित्रांनो

आपण लहानपणी अभावितपणे अशा काही गोष्टी करतो, की त्यावेळी त्या किती हास्यास्पद आहेत याचा आपल्याला तेंव्हा पत्ता ही नसतो. पण नंतर कधी त्या गोष्टी आठवल्यानंतर आपल्याला त्या आठवून आपलेच आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही.

ही साधारण १९६१-६२ सालची गोष्ट आहे.

त्यावेळी आम्ही जाफ्राबादला होतो.

त्या काळात तिथे लाईट नव्हते . कंदील चिमण्यांचा वापर करावा लागायचा.

 तसेच नळाचे पाणी नव्हते. विहीरीचे पाणीच प्यायला व धुण्याभांड्याला उपलब्ध होते . मी सरकारी शाळेत त्यावेळी आठवीत शिकत होतो.

आमच्या शाळेत दरवर्षी मी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची आतुरतेने वाट पहायचो कारण या दोन दिवशी खूप धमाल करायला मिळायची.

वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या . उदा. चमचा लिंबू रेस, तीनटांगी दौड,  पोत्यात  दोन्ही पाय घालून उड्या मारीत जाणे, हात बांधून उड्या मारून उंच दोरीला बांधलेली जिलबी खाणे, निबंध स्पर्धा , कविता पाठांतर स्पर्धा .

या सगळ्यांमध्ये मी हिरिरी ने भाग घ्यायचो . निबंध स्पर्धा आणि कविता पाठांतर स्पर्धांमध्ये मला हमखास पहिले बक्षीस मिळायचे .  मी फार हुशार होतो अशातला अजिबात भाग नाही . फक्त इतर विद्यार्थ्यांचे पालक बहुधा अशिक्षित होते, त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नव्हते त्यामुळे ते अभ्यासात मागे असत .म्हणून मी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता…

तर मी पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होता .एकूण वीसएक स्पर्धक होते .आमच्या हेडमास्तरांना ( वाघमारे ) सरांना मी बाळबोधपणे विचारले,

” सर किती कविता म्हणून दाखवायच्या ?”

सर म्हणाले , तांदुळजे सर परिक्षक आहेत .जेवढ्या कविता तुला पाठ आहेत तेवढ्या त्यांना म्हणून दाखव.”

…झालं… मला तर पडत्या फळाची आज्ञा मिळाली होती .

स्पर्धा सुरु झाली . तांदुळजे सरांनी माझा नंबर सगळ्यात  शेवटी ठेवला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कविता म्हणून दाखवल्या . कुणी २ कुणी ३ कुणी चार अशा ..माझ्या आधीच्या मुलांपैकी चारच्या वर कुणी गेले नाही. याचा अर्थ सरळ होता की मी पाच कविता म्हटल्या तरी पुरेसे होते .पहिला नंबर पक्का होता.माझा शेवटचा नंबर होता. 

तो आल्यानंतर मी कविता म्हणायला सुरुवात केली …. सहा कविता म्हणून झाल्या .

शाळा संपल्याची घंटा झाली.

तांदुळजे सर म्हणाले. चल आता . तुझ्या सहा कविता झाल्या . शिपायाला शाळा बंद करायची आहे.’

पण माझी मुख्याध्यापकांवर फार दृढ श्रध्दा होती. मी तांदुळजे सरांना म्हटले . ‘सर शिपायाला खुशाल शाळा बंद करू द्या . मला हेडसरांनी सांगितले की तुला जितक्या कविता येतात तेवढ्या म्हण. तेंव्हा आता माघार नाही. मी तुमच्या घरी येतो व तिथे उरलेल्या कविता म्हणून दाखवतो!!’

सर फार भिडस्त होते. मी सगळ्याच सरांचा लाडका विद्यार्थी होतो. तसाच या सरांचाही लाडका विद्यार्थी होतो. सर म्हणाले ,ठीक आहे बाबा..माझ्या घरी चल . तिथे उरलेल्या कविता म्हण. ‘

आम्ही सरांच्या घरी आलो की मी लगेच उरलेल्या कविता सुरु केल्या.   सरांचं लग्न झालं  नव्हतं. म्हणून ते स्वत:च घरी स्वयंपाक करायचे. सर मला म्हणाले मी स्वयंपाक करतो.   तू तुझं चालू दे. इकडे माझ्या कविता चालूच होत्या.

सरांनी कमालीचा संयम राखीत शांतपणे खिचडी टाकली.khichdi

सुमारे वीस मिनिटांनी माझ्या मराठी कविता संपल्या. मी म्हटले सर आता हिंदीच्या आणि इंग्रजीच्या कविता राहिल्यात , त्या म्हणू का ?talking boy   सरांनी समयसूचकपणा दाखवत म्हटले , नको नको.ही स्पर्धा फक्त मराठी कवितांचीच आहे…

सरांना इतका वेळ पीडा देऊन मी घरी परतलो….

मित्रांनो आपल्या मराठी  विनोदी साहित्यात कवी  आणि कविता हे दोन्ही सातत्याने चेष्टेचा विषय राहिले आहेत .पण मी हेडमास्तरांनी  दिलेल्या सूचना पाळतांना तारतम्य न बाळगल्यामुळे तांदुळजे सरांना आपण खूप पीडा देत आहोत हा विचार त्यावेळी माझ्या मनाला शिवला पण  नाही.

तांदुळजे सरांच्या पेशन्सला मात्र माझा त्रिवार सलाम….त्या काळच्या शिक्षकांचे आणि मुलांचे असे वेगळेच नाते होते…

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

Windfall gains!भगवान देता है तो छप्पर फाड़के!

chhappar fadke

एका वेळची गोष्ट आहे.

एकदा अकबर बादशहा जंगलात शिकारीला गेला. बरोबर पुष्कळ लोक होते. पण दैवयोगाने, अकबर जंगलात कुठे तरी भटकला आणि त्याच्या सोबतचे लोक खूप लांब राहिले. akbar

अकबर  बराच पुढे गेल्यावर त्याला एक शेत दिसले. एंव्हाना त्याला खूप भूक आणि तहान लागली होती आणि तो दमला होता. अकबर त्या शेतात पोंचला, आणि त्या शेताचा मालक जो एक अत्यंत गरीब शेतकरी होता, त्याला म्हणाला, “बाबा रे, मी तहानेने आणि भुकेने अगदी व्याकुळ झालो आहे. काही खायला मिळाले, आणि प्यायला थंडगार पाणी मिळाले तर खूप उपकार होतील.” अकबराने त्याला आपण बादशहा आहोत असे काही संगितले नाही. फक्त म्हणाला, “मी राज्याचा माणूस आहे.” garib kisan aur patni

 

शेतकरी जरी अगदी गरीब होता, पण माणुसकी त्याची जिवंत होती. तो म्हणाला, “ ठीक आहे. आमच्यासाठी तर तुम्ही आमचे मालकच आहात. काही काळजी करू नका.” असे म्हणून शेतकर्‍याने राजाला थंड पाणी दिले, शेतात असलेल्या ऊसाचा थंडगार रस दिला, आणि आपल्याजवळच्या गाठोड्यातील भाकरीही दिली. नंतर त्याने झाडाखाली खाटेवर चादर अंथरुन राजाला थोडा आराम करायची विनंती केली. राजा अगदी खुष झाला. त्याला शेतकर्‍याने दिलेल्या वस्तू अमृतासमान वाटल्या.

 

बादशहा जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा शेतकर्‍याला म्हणाला, “तुला जर काही काम पडले तर दिल्लीला जरूर ये, आणि मला भेट. माझे नांव अकबर आहे. दिल्लीला आल्यावर कोणालाही विचार.”

“नाही तर थांब, तुझ्याजवळ कागद आणि कलम असेल तर आण. मी तुला लिहून देतो.”

आता शेतात कुठला कागद आणि कुठली कलम! तो शेतकरी बिचारा अनपढ होता. त्याच्या शेतात एक फुटलेला मातीचा घडा होता. तो त्याने बादशहासमोर ठेवला, आणि कुठून तरी एक पांढरा चुनखडीचा तुकडा घेऊन आला, आणि बादशहासमोर ठेवला. बादशहाने त्या घड्याच्या तुकड्यावर आपले नाव लिहिले आणि सही केली. “मला भेतायला येशील तेंव्हा हे घेऊन ये” म्हणून संगितले. शेतकरी हो म्हणाला, आणि तो लिहिलेला तुकडा आपल्या झोपडीत ठेवून दिला.

तो तुकडा तिथे बरेच वर्ष पडून राहिला. मग एके वर्षी खूप दुष्काळ पडला, शेती अजिबात पिकली नाही, गुरढोरांना प्यायला पाणीही मिळेना. त्यावेळी त्या शेतकर्‍याच्या बायकोला ही घटना आठवली, आणि ती शेतकर्‍याला म्हणली, “तो दिल्लीचा कोणी माणूस आला होता ना? त्याच्याकडे एकदा जाऊन तरी पहा. काही मदत मिळते का ते?”

पत्नीने वारंवार म्हटल्यावर शेतकरी तो घड्याचा तुकडा घेऊन दिल्लीला पोंचला.

दिल्लीला गेल्यावर रस्त्याने त्याने लोकांना विचारले, “अकबरीये का घर कौन-सा है?” बादशहा अकबराचे नांव ऐकून, काही लोकांनी त्याला राजवाड्याचा रस्ता दाखविला. तिथे गेल्यावर तो शेतकरी म्हणतो,

“अकबरीये का घर यही है कया?”

द्वारपालांनी रागावून म्हटले, “कोण आहेस तू? बोलायची काही अक्कल आहे का नाही?”

तो शेतकरी तर आपल्या गावरान भाषेत बोलला होता. त्याने आपल्या जवळील तो घड्याचा तुकडा दाखविला, आणि संगितले, “जाऊन त्याला सांगा, एक जण तुला भेटायला आला आहे.”

बादशहाची सही बघून द्वारपाल चक्रावून गेला. त्याने बादशहाला जाऊन संगितले, “महाराज, एक ग्रामीण आपणास भेटायला आला आहे. बोलण्याची अजिबात अक्कल नाही. पण त्याने हा घड्याचा तुकडा दिला आहे.”

तो तुकडा पाहिल्यावर अकबराला तो सर्व प्रसंग आठवला,आणि तो म्हणाला, “जा, घेऊन या त्याला.”

खेडूत आत आला. बादशहाला उंच सिंहासनावर बसलेला पाहून तो म्हणाला, “ओ अकबरीये! तू तो बहुत ऊंचा बैठा है!”

बादशहा त्याला म्हणाला, “आओ भाई! बैठो!”

असे म्हणून बादशहाने  त्याला बसवले, आणि म्हणाला, “तू थोडा वेळ बैस. माझ्या नमाजचा समय झाला आहे. मी नमाज पढून घेतो.”

 

आता शेतकरी पाहतो तो बादशहाने एक कापड अंथरले, त्यावर बसतो आहे, उठतो आहे, अजून काय काय करतो आहे. अकबराचे नमाज पढून झाल्यावर शेतकऱ्याने  विचारले, “हे तू काय करीत होतास?”

बादशहा म्हणाला, “परवरदिगार परमेश्वराची बंदगी करत होतो.”

शेतकरी म्हणाला, “मला समजले नाही”

त्यावर बादशहा म्हणाला, “तो ईश्वर आहे ना? सर्वशक्तिमान? त्याची हाजरी भरत होतो.”

“किती वेळा करतो?”

“दिवसातून पाच वेळा”

“पाच वेळा, उठतो, बसतो, हे सर्व करतो?   का?”

“ज्याने हे सर्व वैभव दिले आहे, त्याची हाजरी भरतो.”

शेतकरी म्हणाला, “ मी तर एकदाही हाजरी भरत नाही, तरीही त्याने मला सर्व काही दिले आहे आणि देतो आहे. तुला पाच वेळा हाजरी भरावी लागते?  अच्छा, जय  रामजी की! मी चाललो.”

तेंव्हा बादशहाने विचारले, “का आला होतास?”

“माझ्या पत्नीने सांगितले, की दिल्लीला जाऊन भेटून ये, इथे आल्यावर दिसले, तुला स्वतःला पाच वेळा नमाज पढावा लागतो. जेंव्हा तुलाच तो परमात्मा देतो, तर मी तुझ्याजवळ काय मागू?”

“अरे बाबा, तुला पाहिजे असेल ते माग!”

“नाही, तुला एवढ्या मुश्किलीने जे मिळते, ते मी मोफतमध्ये कसे घेऊ?”

असे म्हणून शेतकरी तिथून तडक निघाला, आणि घरी आला.

 

घरी आल्यावर बायकोने विचारले, “काय झाले? त्या दिल्लीच्या माणसाने काही मदत केली का?”

शेतकरी म्हणाला, “आपल्या देवाची आठवण करूयात, तोच सगळ्यांना सगळे देतो. आता त्या राज्याच्या माणसाला काय  मागायचे, जो की स्वतःच मागून खातो? म्हणून देवावर भरवसा ठेवूयात, त्याचे नांव घेऊयात, बस्स!”

इकडे काही चोर चोरी करायला निघाले होते. ते चोर त्या शेतकऱ्याच्या घराबाहेर लपून हे सर्व संभाषण ऐकत होते.

बायको म्हणत होती, “दिल्लीला गेले आणि काही आणले नाही.” शेतकरी तिला समजावत होता. त्यावर ती वैतागून म्हणत होती, काही कमवून तरी आणायचे. त्यावर शेतकरी म्हणाला, “आता तर तो सर्व शक्तिमान भगवान देईल  तेंव्हाच घेऊ. मी तर सर्व त्याच्यावर सोडले आहे.”

“अहो देवावर सोडले आहे ते ठीक आहे, पण काही कामधंदा तर करा!”

“कामधंदा न करता ही धन मिळते, पण मी ते घेत नाही. आता तर ठाकूरजीची मर्जी असेल तर ते घरबसल्या देतील. काही चिंता करू नकोस, पाऊस येईल, शेती पिकेल, सर्व काही ठीक होईल. मी आता देवावर पूर्ण भरोसा ठेवला आहे. देवाचे देण्याचे खूप मार्ग आहेत. आणि त्याने मनात आणले तर तो छप्पर फाडून ही देतो!”

“ऐक. आजचीच गोष्ट तुला सांगतो. मी नदीवर गेलो होतो. नदीला पूर आला होता. किनारा दिसत नव्हता. मी तिथे हात धुवायला गेलो, तेंव्हा तिथे मला एक भांडे दिसले. ते आधी वाळूत गाडलेले असावे, पण पावसामुळे उघडे पडले असावे. मी जवळ जाऊन पाहिले तर एक झाकण लावलेला एक गडू होता. मी झाकण उघडून पाहिले, तर आत खूप सोने, नाणे भरलेले दिसले. पण मी विचार केला, की हे आपले नाही, आपल्याला नको. परमेश्वर स्वतः देईल तेंव्हा घेऊ!. मी त्याचे झाकण लाऊन ठेवले आणि वापस आलो.

बायकोने त्याला विचारले, “कुठे? कोणत्या जागी?”

तर शेतकऱ्याने तिला सांगितले, अशा अशा एका जागी, एक असे असे झाड आहे, त्याच्या बाजूला.

 

इकडे चोर त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होते. चोरांनी विचार केला, “हा शेतकरी तर पागल आहे! असे सहजासहजी मिळालेले धन कोणी सोडते का? आपण तर तिकडेच जाऊ! इतर कुठे चोरी करायला गेलो तर पकडले जाण्याची भीती! त्यापेक्षा हा फुकटचा माल घेऊ!”

 

असा विचार करून चोर त्या ठिकाणी गेले. पत्ता त्यांनी ऐकला होताच. आता त्या शेतकऱ्याकडून त्या गडूचे झाकण लावतांना चूक झाली होती, आणि झाकण काही पक्के लागले नव्हते. थोडेसे उघडे राहिले होते. त्या उघड्या राहिलेल्या जागेतून एक साप त्याच्या आत जाऊन बसला होता. चोरांनी ते झाकण उघडताच, सापाने  जोरात फूत्कार मारला. तेंव्हा घाबरून चोरांनी झाकण जोरात बंद करून टाकले.

चोरांनी आता असा विचार केला, की नक्कीच त्या शेतकऱ्याने आपल्याला पाहिले असेल, आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने ही खोटी कहाणी बनवून आपल्या बायकोला सांगितली असेल. या गडूच्या आत न जाणो  कितीतरी विषारी साप आणि विंचू भरलेले असतील.  आता एक काम करू. त्या शेतकऱ्याला अद्दल घडवण्यासाठी हा गडू त्याच्याच घरात जाऊन उपडा करून देऊ, म्हणजे ते सर्व साप विंचू त्यालाच चावतील!

असा विचार करून, त्या गडूच्या तोंडाला एक फडके बांधून, ते शेतकऱ्याच्या घराकडे गेले. शेतकरी आणि त्याची बायको झोपले होते. चोरांनी घराचे छप्पर फाडून, त्यातून तो गडू उपडा केला आणि पळून गेले. इकडे तो गडू पडल्यानंतर पहिल्यांदा तो साप खाली पडला, आणि त्याच्यावर ते सर्व दागिने, मोहरा, वगैरे आणि नंतर तो जड असलेला गडू त्या सापावर जोरात पडला आणि साप त्याखाली दाबून मरून गेला.

त्या सर्व आवाजाने शेतकरी नवरा बायको जागे होऊन पाहतात, तर साप मरून पडलेला, आणि सर्व घरात सोने नाणे आणि दागिने विखुरलेले!

भगवान देता है तो छप्पर फाडके! ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ झाली.!

 

वरील गोष्ट अर्थात, काल्पनिक आहे, आणि देवावर श्रद्धा ठेवली तर देव कश्याही प्रकारे पालन पोषण करतोच, हे दाखवण्यासाठी फक्त तेवढे उदाहरण दिले आहे. यात, अकर्मण्यतेची भलावण करण्याचा, गोष्ट सांगणाऱ्याचा अजिबात हेतू नाही. त्यामुळे गोष्टीतील उदाहरण फक्त तेवढ्यापुरतेच आहे हे लक्षात घ्यावे. वरील गोष्ट ही स्वामी रामसुखदासजी यांनी, आपल्या प्रवचनात, एक उदाहरण म्हणून सांगितली आहे.