https://goodworld.in A website by Madhav Bhope

Devichi-Ashtake-5 आम्ही चुकलो जरी तरी काही

devichi ashtake amhi chuklo (1)

आम्ही चुकलो जरी तरी काही

आम्ही चुकलो जरी तरी कांही । तू नको चुकू अंबाबाई ! ।।धृ।।

 

तुझे नाव ‘आनंदी’ साजे

तुझा महिमा त्रिभुवनी गाजे

तुझे सगुणरूप विराजे

तुला वंदिति सन्मुनि, राजे

गुण गाति वेदशास्त्रेही ।।तू नको।।१।।

 

आम्ही अनाथ, दीन, भिकारी

तू समर्थ, प्रभु, अधिकारी

आम्ही पतित पातकी भारी

तू पावन भवसंभारी

तू पर्वत, आम्ही रज-राई ।।तू नको।।२।।

 

आम्ही कुपुत्र म्हणउन घेऊ

तू नको कुमाता होऊ

आम्ही विषय-ढेकळे खाऊ

तू प्रेमामृत दे खाऊ

आम्ही रांगू, तू उभि राही ।।तू नको।।३।।

 

आम्ही केवळ जडमूढप्राणी

चैतन्यस्वरूप तू शाहाणी

फट् बोबडी आमुची वाणी

तू वंदु नको आमुच्या वाणी

आम्ही रडू, तू गाणे गाई ।।तू नको।।४।।

 

आम्ही चातक तुजविण कष्टी

तू करी कृपामृतवृष्टी

म्हणे विष्णुदास धरी पोटी

अपराध आमुचे कोटी

अशी आठवण असु दे हृदयी ।।तू नको।।५।।

—–00000—–

 

Devichi-Ashtake-4 नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

devi

  नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

श्रीमुळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई

नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।धृ।।

 

जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी सगुणरुपखाणी

जय मंगल वरदायिनी, सर्वकल्याणी

जय महिषासुरमर्दिनी, राजनांदिंनी, पंकजपाणी

हे भार्गवजननी मला पाव निर्वाणी

जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तू होई ।।१।।नको।।

 

कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची

ही दुर्लभ नरतनु आता जाति वायाचि

शिर झाले पांढरे फटक, लागली चटक, अधिक विषयाचि

कशि होइल मजला भेट तुझ्या पायाची

ये धावत तरी तातडी, घालि तू उडी, पाहसी काई ।।२।।नको।।

 

तुजवाचुन मज दूसरा, नसे आसरा, जगी जगदंबे

तू भवानी, मजवर कृपा करी अविलंबे

सोन्याचा ऊगवी दिवस, करितो नवस, सकळारंभे

मी भरिन ओटी नारळी, केळि, डाळिंबे

मी अनाथ दीन केवळ, माझी कळकळ, येउ दे काही ।।३।।नको।।

 

मी थोर पतित पातकी, माझी इतुकि, अर्जी ऐकावी

एकदा कसेही करून भेट मज द्यावी

तू देणार नाहीस हाणुन, आलो मी म्हणुन, तुझ्या या गावी

म्हणे विष्णुदास ही किर्ति जगामध्ये गावी

धिर नाही आता पळघडी, म्हणुन येवढी, सुटली घाई

नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।४।।

 

—–00000—–

 

devichi-ashtake-3 देवीची अष्टके-3-आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?

goddess and devotee

 

आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?

 

आई, तुझ्या मी दर्शनासि योग्य नाही का ? । रेणुके, तू दींनांची नससी माय का ? ।।धृ।।

जवळ आलियासि म्हणसि हो पलीकडे

लागलि ही सवय तुला का अलीकडे

कोणाची आस धरून मी जाउ कुणीकडे

श्रुतिपदास लवितीस व्यर्थ शाई कां ? ।।१।।

 

हा भवानी म्यां तुलाचि देह अर्पिला

त्यजुनि अन्नपाणि रानि निंब वर्पिला

अपमान, मान, राग, लोभ सर्व निर्पिला

अजुनि कां न भेट देसी लपसि बाई कां? ।।२।।

 

कां अजून सुप्रसन्न चित्त होई ना

कां अजून या दीनचि कीव येई ना

कां अजून ऊर उलूनि जीव जाई ना

शिर फुटोनि होईनाचि राइ राइ कां? ।।३।।

 

काय म्हणावे अवतार कृत्य संपले

काय म्हणावे शितळ चंद्रबिंब तापले

काय म्हणावे दुष्ट नष्ट दैव आपुले

काय म्हणावे जगविताचि वांझ गाई कां? ।।४।।

 

पापिष्ट दुष्ट मरतो त्यासि काय मारणे

पुण्यश्लोक तरतो त्यासि काय तारणे

त्रिदोष दोषीयांसि जहर काय चारणे

यांत आहे तरी सुजाण, भलि भलाई का ? ।।५।।

 

माझे अपराध काही आठवू नको

आपुले तु सदय ह्रदय बाटवू नको

व्याघ्रमंदिरासि वत्स पाठवू नको

विष्णुदास म्हणे न येच ऐकु काही कां ? ।।६।।

—–00000—– 

Devichi ashtake Nijlis Ka renuke देवीची अष्टके-2 .निजलीस का रेणुके!

renuka

निजलीस का रेणुके!

निजलीस कां रेणुके ! ।।धृ।।

माझ्या आयुष्याची लूट । काळे केली सांगू कुठ ।

नको जाऊ झोपी उठ । मुळपीठ नायके ।।निज।।१।।

मनाजी हा आत्मद्रोही । घर भेदील कां डोही ।

याचे कर्म तुज बाई । का नाही ठाऊके ।।निज।।२।।

कामक्रोधादिक सहा । शत्रू चंड मुंड महा ।

सिंहारूढ होउनि पहा । जय महाकालिके ।।निज।।३।।

अनाथांचा प्रतीपक्ष । धरूनिया मज रक्ष ।

नीज ब्रिदाकडे लक्ष । दे मोक्षदायके ।।निज।।४।।

अपराधी मी वरिष्ठ । कृपा करणे तुज इष्ट ।

विष्णुदास एकनिष्ठ । म्हणे गोष्ट आयके ।।निज।।५।।

—–00000—–

Navratri Devi Ashtake नवरात्रीतील देवीची अष्टके

devi-1

ekvira devi

नित्याची प्रार्थना 

अंबे एक करी उदास न करी भक्तास हाती धरी ।

विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ॥

चित्ती मोद करी भुजा वर करी ध्यातो तुला अंतरी ।

वाचा शुद्ध करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ॥ १ ॥

माते एकविरे मला वर दे दे तू दयासगरे ।

माझा हेतु पुरे मनात न उरे संदेह माझा हरे ।।

जेणे पाप सरे कुबुद्धि विसरे ब्रम्ही कधी संचरे ।

देई पूर्णपणे भवाम्बुधि तरे ऐसे करावे त्वरे ।। २ ।।

अनाथासी अंबे नको विसरू वो ।

भव: सागरी सांग कैचा तरू वो ।

अन्यायी जरी मी तुझे लेकरू वो ।

नको रेणुके दैन्य माझी करू वो ।। ३ ।।

मुक्ताफलै: कुंकुमपाटलांगी ।

संधेव तारा निकरेर्विभाती ।

श्रीमूलपीठाचलचूडिकाया ।

तामेकवीरा शरणं प्रपद्ये ।। ४ ।।

सखे दु:खिताला नको दूखवू वो ।

दीना बालकाला नको मोकलू वो ।

ब्रीदा रक्षि तू आपुल्या श्रीभवानी ।

ही प्रार्थना ऐकुनी कैवल्यदायिनी ।। ५ ।।

।। बोल भवानी की जय ।।

—–00000—–

Marathwada Mukti Sangram din मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

marathwada mukti

Marathwada Mukti Sangram मराठवाडा मुक्ति संग्रामाची देदीप्यमान गाथा

Marathwada Mukti sangram din मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

पूर्ण भारत जरी १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत असला, तरी हैदराबादच्या निजामाच्या राजवटीतील लोकांना मात्र, भारतीय स्वातंत्र्याच्या तब्बल १३ महिन्यांनंतर म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. हैदराबाद संस्थान  ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळेपर्यंत टिकून असलेले भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. हैद्राबाद संस्थान ची त्यावेळची लोकसंख्या एक कोटी साठ लाख (1कोटी 60 लाख) इतकी होती. सध्याच्या तेलंगणामराठवाडाउत्तर कर्नाटकविदर्भाचा काही भाग या भारताच्या दक्षिणमध्य भागात या संस्थानाची व्याप्ती होती.  

दर वर्षी १७ सप्टेंबरला मराठवाड्यातील लोक आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करतो. पण यामागचा इतिहास ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी या खास लेखाचा प्रपंच. आणि या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाड्यातील इतर असंख्य स्वातंत्र्य सैनिक, आणि या विजयाचे खंबीर शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा एक प्रयत्न.sardar patelramanand tirth

१९४७ मध्ये बिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याgovindbhai shroffचा कायदा पास केला. या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त झाला. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले .वरील कायद्यानुसार देशी राज्ये आणि संस्थानिकांनाही त्यांनी आपले राज्य भारतात की पाकिस्तानात विलीन करावयाचे की, स्वतंत्र राहावयाचे या बाबतीत स्वातंत्र्य दिलेले होते. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली. मात्र हैदराबाद संस्थानजम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली नव्हती. हैदराबाद राज्याचा सत्ताधीश निजाम मीर उस्मान अली खान याने ११जून १९४७ रोजी आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशी राज्ये व संस्थाने भारतीय संघराज्यात कशी विलीन करून घ्यावयाची हा मोठा प्रश्‍न भारत सरकारपुढे निमाण झाला.mir usman ali khan

निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेच व प्रश्‍न निर्माण झाला. हैदराबाद राज्याचा सत्ताधीश मुसलमान होता. परंतु राज्यात ८८ टक्के हिंदू, ११ टक्के मुसलमान आणि १ टक्का इतर लोक होते. याशिवाय देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचे तसेच हैदराबाद राज्याच्या भारतातील विलीनीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण प्राप्त होणार नव्हते. त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले. शेवटी १३ सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले. हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात ‘हैदराबादचा स्वातंत्र्य -संग्राम ‘ या नावाने ओळखले जाते.

निजामशाहीचा इतिहास

दिल्लीचा मुघल सम्राट औरंगजेब इ. स. १६५८ ते १७०७ पर्यन्त होता. १७०७ ला औरंगजेब याचा मृत्यू झाला. त्याकाळी, दिल्लीचे मुघल सम्राट, हिंदुस्थानच्या विविध भागात आपले सुभेदार  नेमीत. त्यात निजाम उल मुल्क याला  दख्खनचा सुभेदार  म्हणून नेमले होते.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर,दिल्लीचे तख्त कमजोर झाले, त्याचा फायदा घेऊन, निजाम उल मुल्क याने आपले स्वतंत्र राज्य (हैद्राबाद संस्थान) उभारले.  निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वत:ला निजाम अशी पदवी धारण केली.म्हणून नंतरच्या सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात येते. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटाकडून ‘आसफ जहा’ असा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याचा उल्लेख आसफ जाह घराणे असाही करण्यात येतो.

निजामशाहीने सुरुवातीपासूनच बलदंड सत्ते बरोबर दोस्ती करून वा नमते घेऊन आपले राज्य केल्याचे दिसून येते. 18 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात ब्रिटिशांचा दबदबा वाढायला लागला होता. हे हेरूनच निजाम अली यांनी ईस्ट इंडिया कंपनी यांच्या बरोबर 12 आक्टोबर 1800 मध्ये तैनाती फौजेचा करार केला.या कराराद्वारे संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबादला कायम झाली. या कारणामुळे निजामाने हिंदुस्तानातील कोणत्याही राजाबरोबर कसलाही संबध ठेवणार नाही, हे मान्य केले.

इंग्रजांना फौजेच्या खर्चासाठी कडाप्पा, कर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने ईस्ट इंडिया कंपनीला दिले. या करारामुळे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत बंडखोरापासून पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीने स्वत:वर घेतली.या करारापासुन हैद्राबादच्या निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. निजामअली नंतर (सन 1763 ते 1803) निजाम सिकंदरशहा (सन 1803 ते 1829), नासिरदौला (सन 1829 ते 1857), अफजूदौला (सन 1857 ते 1869), महेबुब अली खान (सन 1869 ते 1911) यांनी राज्य केले. सातवा व शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान 29 ऑगस्ट 1911 रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुध्दात निजामाने इंग्रजांना पैसा, सैन्य, वस्तू यांची भरपूर मदत केली. युध्दातील मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज ह्याने निजामाला ‘हिज एक्झाल्टेड हायनेसस’ असा किताब दिला.. हैद्राबाद राज्यात राजभाषा फारशी होती.

मराठवाडा हे नाव कसे पडले

सम्राट अशोकाच्या 16 महाजनपदा पैकी दोन महाजनपदे एक अश्मक आणि दुसरे मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारी.. या दोन्ही महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत बोलणारी.. पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैद्राबाद मध्ये निजामशाही स्थापन केली. यात तीन भाषा बोलणारे प्रदेश होते.. एक तेलगू ( आंध्र ), कन्नड ( कर्नाटक ) आणि मराठी ( मराठवाडा ).. यात लातूर म्हणजे पूर्वाश्रमीचा उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग.. म्हणजे निजामाच्या काळात भाषे प्रमाणे प्रदेशाची नावे झाली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम झाले.marathwada mukti- nizam state map

maharashtra-region-mapया काळात संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल होता मात्र मराठी भाषिक प्रदेश असलेल्या मराठवाड्यात निजामशाही होती.

निजाम मीर उस्मान अली खूप महत्वाकांक्षी होता. स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न होते.  

*सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीचा  उदय*

स्वातंत्र्याच्या चळवळी इतर भागात आकार घेत होत्या. त्यामुळे मराठवाड्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकं जागृती मूळ धरत होती. लातूर मध्ये पुण्यावरून येऊन लोकमान्य टिळकांनी इ.स.1891 पहिली जिनिंग प्रेस काढली.त्यातून राजकीय जागृतीचं पाऊल मराठवाड्यात पडलं.. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांनी हिंगोली, परभणीस भेट दिली होती.

1901 परभणीत गणेश वाचनालय सुरु झाले ते मराठवाड्यातील सर्वात पहिले वाचनालय होते. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा येथेही वाचनालय सुरु झाली. 1 ऑगस्ट 1920 रोजी औरंगाबाद येथे बलवंत वाचनालय स्थापन झाले. आ.कृ.वाघमारे हे या वाचनालयाचे प्रवर्तक होते.

 खाजगी शाळा या राष्ट्रीय भूमिकेतून कार्य करु लागल्या. सरकारचे धोरण खाजगी शाळांबाबत फारसे अनुकूल नव्हते तरीही इ.स. 1935 च्या सुमारास 20 खाजगी शाळा राष्ट्रीय भावनेतून सुरु झाल्या. त्यात परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, शारदा मंदिर हिप्परगा येथील राष्ट्रीय विद्यालय, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, योगेश्वरी विद्यालय, अंबाजोगाई, श्यामलाल विद्यालय,उदगीर, ज्युबिली विद्यालय, लातूर, नूतन विद्यालय, सेलू, राजस्थान विद्यालय, लातूर, भारत विद्यालय,उमरगा, चंपावती विद्यालय, बीड, नुतन विद्यालय, उमरी, प्रतिभा निकेतन, नांदेड, मराठा हायस्कूल,औरंगाबाद असा क्रम लागतो.

यामागे स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा होती. वरील शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जागृतीचे कार्य केले. शारदा मंदिर शाळेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली. तर मराठा शिक्षण संस्थेने बहुजनांसाठी शिक्षणाची व्दारे खुली केली.

साहित्य विषयक चळवळी सुरु झाल्या.  उर्दू भाषा शैक्षणिक व्यवस्थेतून राजभाषा बनली. त्यामुळे संस्थांनातील अन्य भाषा साहित्य व संस्कृतीची गळचेपी होत गेली. या सांस्कृतिक संघर्षामुळेच साहित्य संस्थांचा जन्म झाला.

साहित्य संस्थांनी राष्ट्रीय वृती जोपासली. इ.स. 1914 -15 मध्ये हैद्राबादेत दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. या कामात केशवराव कोरटकर व वामनराव नाईक यांनी पुढाकार घेतला. या साहित्य संघात अनेक मराठी तरुणांनी सहभाग घेतला. प्रारंभीच्या काळात विदर्भ साहित्य संघांशी ही शाखा संलग्न करण्यात आली. इ.स. 1931 मध्ये हैद्राबादेत महाराष्ट्र साहित्य संमेलन घेण्यात आले. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे अध्यक्ष होते. आ.कृ. वाघमारे यांनी संजीवनी साप्ताहिकात मराठी भाषेच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. लक्ष्मणराव फाटक यांनी इ.स. 1920 मध्ये ‘निजाम विजय’ हैद्राबादहून सुरु केले. आ.कृ. वाघमारे यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 1937 रोजी मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना केली. इ.स. 1937 मध्ये निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. तिचे पहिले अधिवेशन 1, 2 व 3 ऑक्टोबर, 1937 रोजी दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबाद येथे झाले. दुसरे अधिवेशन नांदेड येथे दिनांक 28 ते 30 सप्टेंबर, 1943 मध्ये दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. इ.स. 1944 मध्ये तिसरे अधिवेशन औरंगाबाद येथे ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यामुळे मराठवाड्यात सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळी मूळ धरू लागल्या त्यातून अप्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या चळवळीचे बीजे पेरली जाऊ लागली.

 निजाम मीर उस्मान अली याने हिंदू धर्मियांवर अनन्वित अत्याचार सुरू केले होते. निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरूप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्त्याचार चालू केले. अशा या  निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला.

मुक्ति संग्राम सुरू झाल्यावर मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात  जिवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास इकडे येण्यापासून रोकण्यासाठी  पूल उडवून देणारे काशीनाथराव कुलकर्णी, मुक्ति संग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून पुरवणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम चे गणपतराव क्षीरसागर सुतार ,मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून विख्यात झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव,लातूर येथेल बोरी या ठिकाणाहून निजामाचा बराच कारभार चालायचा. भारतीय सैनिकांनी मराठवाड्यावर धावा बोलताच धोंडिबा शंकर सिरसाट यांनी आजूबाजूच्या  निजामांच्या ठाण्यावर हल्ला चढवला व निजामी सैन्याना हद्दपार केले. उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, पालम तालुक्यातील गुळखंड गावचे सुपुत्र मारोतराव पौळ , पाथरी येथील देवरावजी नामदेवराव कांबळे, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.

या मुक्ति संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदिंसारख्यांनी आपल्या जिवाची पर्वा न बाळगता काम केले. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याच्या नेतृत्वाखालील  निजामाच्या सैन्याला औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील जातेगाव माळावर पुढे सरकु दिले नाही.  यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार यांना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने हुतात्मा झाले त्यावेळी गोदावरी  दुथडी भरून वाहत होती. रामचंद्र यांना क्षीरसागर नावाच्या मर्दाने आपल्या पाठीवरून पैलतीरी आणून भर पावसात खड्डा केला आणि त्यांचा अंत्यविधी केला.

*वंदे-मातरम् विद्यार्थी चळवळ :*

हैद्राबाद संस्थांनात शिक्षण संस्थांमध्ये वंदे्मातरम् गीत म्हणण्यास बंदी होती. मुक्ती लढ्याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या मनावर उमटू नयेत, म्हणून निजाम सरकार प्रयत्नशील होते. इ.स. 1938 हे वर्ष प्रतिकाराचे वर्ष होते. विद्यार्थी वर्गाच्या मनात असंतोष खदखदत होता. उस्मानिया विद्यापीठात वरंगल, गुलबर्गा व औरंगाबाद येथे इंटरमिजिएट कॉलेजेस होती. औरंगाबाद कॉलेजमध्ये विद्यार्थी बैचेन होते. गोविंदभाई श्रॉफ विद्यार्थ्यांना चिथावणी देतात म्हणून त्यांना नोकरीतून काढण्यात आले. 14 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये ‘वंदेमातरम्’ म्हणण्यास प्रारंभ केला. त्यावर सरकारने बंदी आणली. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी ऐकायला तयार नव्हते. 16 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला. 18 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांची या प्रश्नावर रितसर बैठक झाली आणि 30 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी संप पुकारला. या घटनेचे पडसाद हैदराबादमध्येही उमटले. विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करण्यात आली. त्यास देखील विद्यार्थ्यांनी प्रखर विरोध केला. शेवटी वंदे्मातरम् प्रश्नावर बेमुदत संप पुकारला. एकूण 1 हजार 200 विद्यार्थी संपावर गेले. केवळ औरंगाबाद शहरात 300 विद्यार्थी वंदेमातरम् चळवळीत उतरले होते. वंदे्मातरम् आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत झाले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी. जे. केदार यांनी उदार अंत:करणाने उस्मानिया विद्यापीठातील काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांची येवला, खामगाव व अहमदनगर येथे सोय करण्यात आली. त्रिपुरा कांग्रेस अधिवेशनात वंदेमातरम् चळवळीस पाठिंबा देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस व पं. जवाहरलाल नेहरू यांनी तरुणांच्या या उठावाला पाठिंबा दिला होता.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या या अभूतपूर्व लढ्यामुळे हैदराबाद संस्थांनात पुढे जी आंदोलने झाली, त्यासाठी राजकीय कार्यकर्ते व नेते वंदेमातरम् चळवळीतून मोठ्या प्रमाणात मिळाले. वंदेमातरम् चळवळीने विद्यार्थी विश्वात फार मोठी जागृती घडवून आणली. 1938 ते 1948 पर्यंतचा काळ हा मुक्ती संग्रामाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात सर्व आघाड्यांवर बहुतेक वंदेमातरम् चळवळीतील तरुण कार्यकर्ते होते. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात विद्यार्थी व युवाशक्तीने वंदेमातरम् चळवळीच्या माध्यमातून जे अभूतपूर्व चैतन्य दाखवले , ते प्रशंसनीयच मानले पाहिजे…!!

*आर्य समाजाचे कार्य*

arya samajसंस्थानात आर्य समाजाने अखिल भारतीय स्वरूपाचा लढा दिला. हैदराबाद संस्थांनातील हिंदू प्रजेवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात आर्य समाज सफल ठरला. आर्य समाजाने 24 ऑक्टोबर, 1938 पासून पुढे जवळपास दहा महिने सत्याग्रहाचा लढा चालवला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता. त्यामुळे संस्थांनात व मराठवाड्यात आर्य समाजाच्या शाखा वाढल्या. आर्य समाजाला जात, पात भेद व स्त्री – पुरुष भेद मान्य नव्हता, म्हणून त्यांनी अनेक अस्पृश्यांना वैदिक धर्मात समाविष्ट करून घेतले. संस्थानात 1941 पर्यंत आर्य समाजाच्या 241 शाखा कार्यरत होत्या. आर्य समाजाचे 12 हजार पेक्षा अधिक सत्याग्रही तुरुंगात गेले. संस्थानात एकूण 40 हजार एवढे आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे दिसून येते. तेलंगण, कर्नाटक विभागाच्या तुलनेत मराठवाडा विभागात आर्य समाज अधिक प्रभावी होता. आर्य समाजाने सक्तीच्या धर्मांतरास विरोध केला. आर्य प्रतिनिधी सभेने शिष्टमंडळ पाठवून संस्थांनातील परिस्थितीची पाहणी करण्यात यश मिळवले. मराठवाड्यात धारूर, गुंजोटी, निलंगा, उमरगा, उदगीर येथील आर्य समाजी लोकांवर अधिक अन्याय झाले. गुंजोटी येथील तरुण कार्यकर्ता वेदप्रकाश याची क्रुर हत्या झाली. हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा वेदप्रकाशकडे झाले, आणि मराठवाडा मुक्ती चळवळीने सशस्त्र लढा हाती घेतला. उदगीरला शामलाल यांनी आर्य समाजाच्या चळवळीचे प्रभावीरीत्या संघटन केले. भाई शामलाल यांची बिदर तुरुंगात हत्या करण्यात आली. निझाम शासनाच्या अन्याय व अत्याचारामुळे संस्थानात आर्य समाजाची लोकप्रियता वाढत गेली व त्यातूनच चळवळीत नव-नवीन कार्यकर्ते व नेते उदयाला आले. आर्य समाजाने निजामाकडे केलेल्या 14 मागण्या केल्या होत्या. संस्थानात आर्य समाजाच्या वतीने पहिला सत्याग्रह दि. 31 जानेवारी, 1939 ला झाला. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आर्य समाजाच्या वतीने सत्याग्रह झाले. नारायण स्वामी, नरदेव शास्त्री, नरेंद्र देव, बन्सीलाल, शेषराव वाघमारे, आनंद स्वामी, दिगंबरराव लाटकर, दिगंबरराव शिवणगीकर, निवृत्ती रेड्डी, गणपतराव कथले, शंकरराव पाटील अंधारीकर यांनी आर्य समाजाच्या चळवळीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ….

निझाम शासनाने  त्याच्या राज्यातील हिंदू प्रजेवर खूप अनन्वित अत्याचार चालविले होते.

 इतके की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.

शेवटी भारताचे तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली. ११  सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे.एन चौधरींच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई चालू झाली. याला “पोलिस अॅक्शन” म्हटले जाते.

निजामाची शरणागती 

kasim razvi
कासिम रझवी

भारताचे मुख्य सैन्य सोलापूरकडून शिरले. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वारंगळ, बीदर विमानतळावर भारतीय सैनिकांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून भारतीय  सैन्य पुढे निघाले. भारतीय सैन्यापुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले,  आणि कासीम रझवीला अटक झाली.

शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन. अल इदरीस यांनी शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन होऊन हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.patel_nizam_sardar_hyderabad (1)Op_Polo_Surrender

म्हणून १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ति संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

त्यावेळी जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्वरित निर्णय घेऊन भारतीय सैन्य पाठविले नसते, तर भारतात या संस्थानच्या रूपाने दुसरे जम्मू काश्मीर तयार झाले असते, आणि तेही अगदी भारताच्या अंतरंग भागात. मग काय काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

१९८० च्या सुमारास बॅ. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ गावोगावी शहीद स्मारके उभारली.आज त्यातील काही स्मारके सुस्थितीत आहेत तर काही तितक्या चांगल्या स्थितीत नाहीत.hutatma-smarak

तर अशी ही मराठवाडा मुक्ति संग्रामाची चित्तथरारक आणि प्रेरक गाथा, आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिना निमित्त आमच्या वाचकांसमोर ठेवतांना आनंद होत आहे. 

माधव भोपे