https://goodworld.in A website by Madhav Bhope

तुम तो ठहरे परदेसी

tum to thahare pardesi

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

सुबह पहली गाडी से

तुम तो चले जाओगे

 ………………………….

 

मित्रांनो

असाच एक किस्सा तुमच्या बरोबर शेअर करतोय …

 

साधारणपणे १९९७ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी उमरग्याला कार्यरत होतो .१९९३ साली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जो प्रलयंकारी भूकंप झाला त्या भूकंपात एकूण ५२ गावे फार मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे जवळपास बेचिराख झाली होती. व मनुष्यहानीही कांही हजारांमध्ये झाली होती .

माझ्याकडे एकूण ५ गावांच्या पुनर्वसनाचे काम होते.सरकारनेही भूकंप पुनर्वसनाचे काम वेळेत व्हावे म्हणून सुमारे ८०० इंजिनीअर्स या प्रकल्पावर नेमले होते .

ज्या गावाच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले तेथील सर्व नवीन घरे , शाळा , दवाखाना, ग्रामपंचायत, कम्युनिटी हाॅल ,इत्यादिंचा लोकार्पण सोहळा केला जायचा.त्यासाठी अर्थातच पालकमंत्री यायचे . बॅंडवालेही यायचे . भाषणे व्हायची. मंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते, चेलेचपाटे, खुशमस्करेही आवर्जून यायचे .कुणी सांगायचं मी साहेबांचा उजवा हात आहे बरं का !

अशाच एका नवीन वसलेल्या गावाचा उद्घाटनसोहळा होता.

 मंत्र्यांच्या स्तुतीपर भाषणे झाली. आमचा रोल म्हणजे या सोहळ्यास हजर राहणे तेही अनिच्छेने एवढाच होता. मंत्री महोदय भाषणास उभे राहिले …. शासन तुमच्या पाठीशी आहे  . तुमचं गाव आम्ही आता पूर्णपणे नवीन बांधून दिलं आहे .भूकंपग्रस्त लोकांना काहीही अडचण आली तर मी अर्ध्यारात्री धावून येईन. तुमची साथ मी कधीही सोडणार नाही असं साॅलिड आश्वासन मंत्र्यांनी  देऊ  न टाकलं…

त्यांच्या कार्यकर्त्यांनी व जमलेल्या लोकांनी  टाळ्या वाजवल्या . नंतर मंत्र्यांच्याच   एका उत्साही कार्यकर्त्यांने त्यांची  गावातून मिरवणूक काढण्याची टूम काढली.तो साहेबांचा उजवा हात म्हणवून घ्यायचा..

साहेबांची मिरवणूक गावातून निघाली…एका कार्यकर्त्याने बॅंडवाल्यांना इशारा केला चांगलं गाणं वाजवा रे…

बॅंडवाल्यांना काय , त्यांनी लगेच त्या काळातलं अल्ताफ राजाचं गाणं   सुरु केलं….

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

सुबह पहली गाडीसे

तुम तो चले जाओगे

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे….

 

कार्यकर्ता माझ्या चांगल्या ओळखीतला होता.बैठकीतलाही होता.मी त्याचा शर्ट ओढून त्याला म्हटलं ,  हे काय गाणं  लावलं राव. मंत्र्यांनी आत्ताच भाषणात लोकांना  साथ देण्याचं आश्वासन दिलंय अन् तुम्ही हे गाणं लावलं …

त्यावर  तो म्हणाला ,…

जाऊ द्या हो साहेब . मंत्र्यांना काय त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पायजे,बॅंड पायजे अन् स्वत:ची मिरवणूक पायजे…हे सगळं  आहे ना, बस तर मग…बॅंडवर कोणतं का गाणं वाजेना.कोण लक्ष देतोय .तुम्ही त्यांच्या चेहेऱ्याकडे पहा बरं , किती खुश दिसताहेत ते..’

मी हळूच मंत्र्यांच्या चेहेऱ्याकडे पाहिलं . मिरवणुकीचा एवढा लवाजमा पाहून स्वारी जाम खुश दिसत होती…

मी कार्यकर्त्याला म्हटलं , तुमच बरोबर आहे रावं . आम्हाला नाही कळत तुमच्या एवढं. खुशाल  चालू द्या गाणं

 

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

 

😁😃😜🤑🤑😄

v.d.bhope
v.d.bhope

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.

संभाषणाची कला

The art of talking
Guest Article by Vd. Sohan Pathak.
 
हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*
अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|
यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:
स्यात विषमेव तद्वच:||*
 

पञ्चतन्त्र

अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे.
 
आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल किंवा समोरच्याचे विचार पटले नाहीत तर हे शस्त्र चुकीच्या पद्धतीने चालवल्या जाते.
 
असं म्हणतात की आपल्या वाणीला भूतकाळाचा शाप आहे. 
म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिक्रिया देताना भूतकाळातल्या कटू आठवणी जागृत होतात आणि आपल्या बोलण्यातून नको त्या वेळी व्यक्त होतात.  खरतर त्यावेळेस ते बोलणे योग्य नसतं त्यामुळे जो विषय आपल्याला पटत नाही त्या विषयावर साधक बाधक चर्चा होण्याच्या ऐवजी चर्चेचा विषय दुसरी कडे जातो आणि विनाकारण वाक्युद्ध होण्याची शक्यता असते.
 
काहीजणांना अजून एक गैरसमज असतो की आपलं दुःख, आपल्या वेदना, आपलं असमाधान केवळ बोलल्या मुळेच व्यक्त होऊ शकतेआणि ते वारंवार त्याबाबत बोलत राहतात त्यामुळे कदाचित यामुळे समोरच्या मनातली त्यांच्या दुःखा बद्दलची सहानभूती सुद्धा कमी होऊ शकते. पण बोलणाऱ्या व्यक्तीला हे कळत नाही त्या भूतकाळातल्या भुतांना ते धरून बसलेले असतात.
 
त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट बोलताना निश्चितच विचार करून बोलावे.
 
आयुर्वेदामध्ये शरीर कर्म, मानस कर्म आणि वाक् कर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत सांगितले आहेत की बाकीचे कर्म करताना जसे आपण काही नियम पाळणं आवश्यक असतं तसे बोलताना सुद्धा नियम पाळणे आवश्यक आहे. शब्दांची फेक त्यांच्या उच्चाराची पद्धत, शब्दांची निवड त्यावेळेस व्यक्त झालेले हावभाव याची खूप काळजी घेऊन बोलावं कारण तुम्हाला बोलताना या गोष्टी जाणवत नसतात पण थेट समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला भिडण्याची त्याची तीव्रता असते. 
 
यातूनच व्यक्तीसंबंधातले अडथळे, गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता जास्त असते. बोलतांना भविष्यातली चिंता शब्दांनी वारंवार व्यक्त केली तर बऱ्याच वेळा आपल्या मनात त्याच गोष्टी राहतात व पुढे घटनाही त्याच पद्धतीने होतात. नकारात्मक बोलण्याचा समोरच्याच्या वर जितका वाईट परिणाम होतो त्यापेक्षा कैक पटीने त्याचा स्वतःवर वाईट परिणाम होतो.
 
पण याचा अर्थ मौन पाळणे किंवा शब्दात व्यक्त न होणे असा कदापि नाही. निश्चित बोलणं हे महत्त्वाचं आहे फक्त आपण व्यक्त होताना समोरचा अवाक् (अव्यक्त) होऊ नये. आपण काय, कुठे, कसं बोलतो आहोत हे मात्र खूप महत्त्वाचं.
 
पूर्वाभिभाषी, सुमुखः सुशीलः करुणामृदुः॥
 
आयुर्वेदात वाक् कर्म किंवा बोलणे याबाबत खूप छान नियम सांगितले आहेत. 
 
कोणी व्यक्ती भेटली तर आपण स्वतःहून बोलावे शक्यतो आपण सुमुख म्हणजेच आनंदी चेहऱ्याने व्यक्त व्हावे सुशीलता व मृदूता आपल्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा.
आपले वचन पैशुन्य व परुष नसावे. 
 
पैशून्य म्हणजे कोणाची तरी तक्रार त्याच्या परोक्ष करणे, एका व्यक्तीबद्दल वाईट दुसऱ्या व्यक्तीकडे बोलणे. आणि परुष म्हणजे कठोर बोलणे.
 
समाजात काही व्यक्ती या शिस्तप्रिय, काटेकोर असतात त्यांची जीवनाची काही मूल्य असतात परंतु त्यांचा अट्टाहास असतो की त्यांचे जीवनमूल्ये त्यांच्यासोबतच्या व्यक्तीं ने सुद्धा अंगीकारावी.  त्यांचा उद्देश योग्य असू शकतो परंतु त्यासाठी कठोर बोलणे समोरच्याचा अपमान करणे, दुसऱ्यांची जीवन मूल्य चुकीचे ठरवणे हा मार्ग योग्य नाही.  त्यामुळे त्यांच्या, सामाजिक जीवनात, नातेसंबंधात अनेक अडथळे येतात.
 
केवळ चुकीच्या बोलण्यामुळे ते त्यांचे आदर्शत्व घालवून बसतात. दुसर्यांच्या चुका काढणे, स्वतः बद्दलच बोलत राहणे, भिन्न मताचा अनादर, आपल्या देहबोलीत आणि वाणीतून चुकीच्या पद्धतीने अस्वीकार्यता दाखवणे, स्वार्थासाठी खोटे बोलणे, उपायापेक्षा प्रश्न अधिष्ठित जास्त बोलणे, आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना, आर्थिक, सामाजिक स्तर कमी असणाऱ्यांना नेहमी आज्ञार्थ बोलणे हे गैरसमज वाद पसरवणारे घटक आहेत.
 
त्यातूनच जीवनात अनुत्तरीत कठीण व दुःखद प्रसंग निर्माण होऊ शकतात. समोरच्याच्या उत्साह वाढवणारे, आधार देणारे ,कौतुक करणारे, उपाय सूचक, अभिनंदन करणारे, योग्य शब्दात मार्गदर्शन करणारे शब्द आपल्या व समोरच्याचे मानसिक आरोग्य, क्षमता वाढवणारे असतात. म्हणून आपल्या बोलण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
 
वरील  लेख हा, संभाजीनगर येथील प्रथितयश वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुकवरून साभार घेतला आहे.  सदरील लेख त्यांच्या फेसबुकवर दि. 14-10.2021 रोजी पोस्ट झालेला होता.
वैद्य सोहन पाठक
श्रद्धा आयुर्वेद चिकित्सालय
तद्विद समुपदेशन केंद्र
व अमृत नाद ध्यानकेंद्र
9822303175
sohanpathak@gmail.com
 
 
 

Go to  Amazon to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

Who caught whom?- चोरीचा मामला

people-cinema-watching-movie_23-2151005467.png

Guest Article by Shri V.D.Bhope.

इंग्रजी सिनेमा पाहतांना पकडले …..

( पण कुणी कुणाला ? )

———————

मित्रांनो
साधारणपणे १९६८ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला(आताचे संभाजीनगर) इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.दोन मित्रांसोबत किरायाची खोली घेऊन उस्मानपुऱ्यात रहात होतो.महिन्यातून एक दोन वेळा सिनेमा पहायला जायचो. त्या काळात विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा पाहणे एकदम वर्ज्य समजले जायचे.एकदम शांतम् पापम् ! पापभिरू मंडळींनी इंग्रजी सिनेमा पहायचा नसतो अशी समजूत सर्वसाधारणपणे दृढ होती .
आमच्या घरचे वातावरण तर फारच बाळबोध होते.आम्हा सर्व बहीण भावंडांना आमच्या वडिलांचा फार धाक वाटत होता .त्यांच्या समोर बोलण्याची आमची हिम्मत नसे.   त्यांच्याशी सगळं महत्वाचं communication सहसा आईच्या मार्फतच व्हायचं .
आमच्या काळात आपण कांहीही चूक केली नसली तरी वडीलांना भिण्याची पध्दत होती. 


तर एका रविवारी आम्ही कांही मित्रांनी गुलजार टाॅकीजमध्ये चालू असलेला एक इंग्रजी सिनेमा पहायला जायचे ठरवले.सगळ्यांचे आई वडील परगावी रहात होते. त्यामुळे ही गोष्ट तशी कुणाच्याही घरी कळण्याची काहीच  शक्यता नव्हती.
तर आम्ही कांही मित्र ठरल्या प्रमाणे गुलजार टाॅकीज मध्ये मॅटिनी शो ला जाऊन बसलो. सिनेमा सुरू झाला .त्यातील नट माहित नाहीत, नट्या माहित नाहीत ,त्यांची भाषा कळत नाही, उच्चार नीट समजत नाहीत , पडद्यावर नक्की काय चाललंय हे ही कुणाला समजत नाही तरी पण आसपासचे कुणी हसले तर कांही तरी विनोद  झाला असावा असा अंदाज बांधून उरलेले हसतात .आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक काॅमन भाव दिसतो.आपल्याला सिनेमातलं कांही कळत नाही हे कुणी ओळखलं तर नाही ना ? अशा अर्थाचा तो ओशाळवाणा भाव असतो. पण अळीमिळी गुपचिळी हेच धोरण सगळे जण अवलंबतात .म्हणजे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप .असो.

सिनेमा सुरू झाल्या नंतर कांही वेळाने माझ्या एका मित्राने मोठ्ठ्याने ओरडून हाक मारली..ए भोपे , इकडे ये न बे , जागा रिकामी आहे. ‘ मी त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो.टाॅकीज मध्ये अंधारात थोडावेळ बसल्यांनतर कांही वेळाने आसपासचे बऱ्यापैकी दिसू लागते.कांही वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्या शेजारचे गृहस्थ आमच्या कुटुंबाशी चांगलेच परिचित असलेले एक गृहस्थ होते. आम्ही त्यांना काका म्हणत असू. माझ्या मित्राने मोठ्ठयाने माझ्या नावाने जेव्हां  मला हाक मारली तेंव्हाच त्या काकांना समजले होते की मी सिनेमाला आलो म्हणून !


आणि आता तर काय मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. ते म्हणाले, अरे विष्णू बैस बैस .आता मात्र मी बेचैन झालो. हे काका पुढे मागे  आमच्या गावी आमच्या घरी गेले तर नक्कीच माझी चुगली  करतील आणि मग वडिलांनी  जाब विचारला तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल याची मला काळजी वाटू लागली .
मला ओरडून नावाने हाक मारणाऱ्या मित्राला इंटरव्हल मध्ये चांगलंच झापावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या शेजारच्या काकांना कांहीतरी गयावया करून पुढेमागे गावी  गेलात तर प्लीज ही गोष्ट घरी सांगू नका,अशी गळ घालावी असं मी मनात ठरवलं आणि त्यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो .
इंटरव्हल झाली . माझ्या त्या मित्राला मी गाठलं आणि म्हणालो ” माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्ठयाने ओरडायची  काय गरज होती रे ? त्या माझ्या शेजारी बसलेल्या काकांना  आता कळालंना ! त्यांनी घरी चुगली केली म्हणजे ?”

तेवढ्यात त्या काकांनी मला गाठलं. माझ्या अभ्यासाविषयी जुजबी चौकशी केली. माझ्यासाठी व स्वत:साठी खारे दाणे  घेतले. व आर्जवाच्या स्वरात मला म्हणाले,

” माझं एक काम करशील का ?’

मी काम न जाणून न घेताच म्हटले ,

“हो करीन की . त्यात काय एवढं !”


त्यावर काका म्हणाले , “हे बघ तू जर कधी आमच्या घरी आलास ना तर इतर कुठल्याही विषयावर बोल पण हिला म्हणजे तुझ्या काकूला मी इंग्लिश सिनेमा पाहतांना भेटलो होतो हे तिला कधीही सांगू नकोस बाबा. तुझी काकू कशी आहे हे तुला माहीत आहे ना. सगळं घर डोक्यावर घेईल ती हे कळालं तर.’

आता माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणजे जो प्राॅब्लेम मला होता तोच प्राॅब्लेम या काकांनाही होता तर ! मी उगचंच घाबरलो होतो.
म्हणजे या काकांना इंग्लिश पिक्चर पाहतांना मी पाहिलं हे ही तितकंच खरं होतं की !
अन् त्यांनाच चिंता वाटत होती की मी कुठे ही गोष्ट त्यांच्या घरी सांगतो .

मी म्हणालो , “अहो काका!!
आज आपण भेटलोच नाही आणि इंग्लिश पिक्चर तर पाहिलाच नाही! तेंव्हा कुणी कुणाला कांही सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे , सांगा बरं !!…”

काका म्हणाले, … शाब्बास . व्हेरी गुड .हुशार आहेस . अळिमिळी गुप चिळी. चल चहा घेऊ यात .

😄😎🤑

amazon logo
Go to shopping

तेथे कर माझे जुळती

indian woman

तेथे कर माझे जुळती

कर्तव्यदक्ष आणि मायाळू परदेशी मावशी

आपल्या सर्वांच्या घरी बहुधा भांडी घासणे, कपडे धुणे व स्वयंपाक या कामांसाठी मोलकरणी लावलेल्या असतात.बहुतेक वेळा  गृहिणी आपल्या मोलकरणीच्या कामाबाबत खूष नसते .  अर्थात त्याला कारणही तसंच आहे.आजकालच्या मोलकरणी पाट्या टाकल्या सारखं कसंतरी काम करतात . अर्थात सर्वजणी तशा नसतात, त्यात खूप जणी खूप चांगल्या पण असतात. पण बऱ्याच जणी  पूर्व कल्पना न देता सर्रास गैरहजर राहतात.दोन दिवस येणार नाही असं सांगून प्रत्यक्षात आणखी कांही दिवस गैरहजर राहतात.मोबाईल फोन लवकर घेत नाहीत किंवा घेतच नाहीत आणि असे का केले म्हणून विचारले तर बॅटरी संपली होती , हे किंवा असेच कांहीतरी थातुरमातुर कारण सांगतात .त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार कित्येक वर्षापासून रूढ झाला आहे .म्हणजेच जेवढा एका महिन्याचा पगार तेवढाच दिवाळीचा बोनस.तसेच आपण  कांही दिवस गावी गेलो किंवा मोलकरीण गावी गेली तर त्या कालावधीचा पगार कापायचा नाही.पुन्हा दोन तीन वर्ष झाली की हमखास पगारवाढ द्यावीच लागते.

बरं , मोलकरीण बदलावी म्हटलं तर लवकर दुसरी मोलकरीण मिळत नाही . आणि समजा यदाकदाचित मिळालीच तर ती आहे तिच्यापेक्षा कामचुकार निघाली तर काय घ्या. त्यामुळे आहे त्या मोलकरणी कडून काम करून घेणेच ठीक आहे अशी भूमिका बहुतेक वेळी घेतली जाते…असो ….

मी ज्यावेळी औरंगाबादला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो त्यावेळी  किरायाची खोली घेऊन रहात होतो. आमच्या त्या वाड्यात बरेच विद्यार्थी रहात होते.मी स्वयंपाकासाठी ज्या मावशी लावल्या त्या परदेशी मावशी म्हणून ओळखल्या जात होत्या. परदेशी मावशींचं  खरं नांव  कुणालाच माहित नव्हतं . रोज दोन वेळ स्वयंपाकासाठी एका विद्यार्थ्यासाठी महिन्याचा पगार वीस रूपये होता.यामध्ये भांडी घासणे समाविष्ट होते .

मावशीच्या हाताला खरंच चव होती.

मी रूमची एक किल्ली मावशींकडे देऊन ठेवली होती.मी बाहेर असलो तर मावशी परस्पर रूमवर येऊन स्वयंपाक करून जायच्या.

रूममधल्या सुतळीच्या तुकड्याला सुध्दा मावशींनी कधी हात लावला नाही..

मावशी अजब नगर मधे कुठेतरी रहात होत्या.माझ्या खोलीपासून सुमारे एक किलो मिटर अंतर होते.

मावशीला मूलबाळ नव्हते असे मला समजले. वाड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्या मुलासारखी माया करायच्या.

एकदा माझ्याकडे पीठ संपले होते. गहू दळून आणायला मला जमले नाही . कॉलेजला   गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संध्याकाळी रूम वर आलो तर मावशी छान पोळ्या करीत होत्या. मी विचारले , मावशी कणीक तर संपली होती ना ? मग ह्या पोळ्या कशा ? मावशी म्हणाल्या , सदाफुले (माझा मित्र आणि शेजारी) कडून पीठ आणलं .तुम्हाला उपाशी कसं ठेऊ ? नाही जमत कधी कधी पोरांना दळण आणायला . तेंव्हा मी असंच दुसऱ्या मुलाकडून पीठ आणून पोळ्या करते. तुमचं गिरणीतून पीठ आलं की सदाफुलेला त्यांचं उसनं घेतलेलं पीठ परत करील.

माझा भाचा, शंकर, याला त्याच्या परिक्षेच्या काळात मी माझ्या रूमवर एक महिना ठेऊन घ्यायचो. एकदा संध्याकाळचा स्वयंपाक करून मावशी निघून गेल्या. थोड्या वेळाने शंकर आला. माझ्याकडे राहण्यासाठी. त्याच्यापाठोपाठ मावशीही आल्या. मी म्हटले , आत्ताच तर तुम्ही स्वयंपाक करून गेलात ना. मग पुन्हा कशाला आल्या ? त्यावर मावशी म्हणाल्या शंकरसाठी स्वयंपाक करायचा म्हणून आले .

आणि त्यांनी कांही मिनिटात शंकरसाठी जास्तीचा स्वयंपाक केला ..

मावशींमध्ये किती माणुसकी, सहृदयता,  extreme devotion towards duty  हे दुर्मिळ गुण होते याचं आणखी एक उदाहरण देतो ..

एकदा  शहरात कुठेतरी दंगल झाली होती त्यामुळे शहरात कर्फ्यू लागला होता. त्यामुळे जेवणाची अडचण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.कर्फ्यूमुळे मावशी येणार नाहीत असं मी समजत होतो. पण माझा अंदाज सपशेल खोटा ठरला. मावशी त्यांच्या नेहमीच्या वेळेत रुमवर हजर झाल्या. मी म्हटलं , अहो मावशी , गावात संचारबंदी लागलीय. तुम्ही कशा आल्या आणि कशाकरता आल्या ?

मावशी म्हणाल्या मी मेन रोड चुकवून गल्लीबोळातून आले. पोरांना उपाशी कसं ठेवू? स्वयंपाक करून मग अशीच गल्लीबोळातून घरी परत जाईन .येतांना नाही का आले ? कुठे काय झालं ?’

मी अवाक् झालो !!!

आणि निरूत्तरही झालो.मनात म्हटले केवढ्या मोठ्या मनाची, कर्तव्यदक्ष आणि हिकमतीची आहे ही माय माऊली.

आमच्या वाड्यातल्या मुलांचा स्वयंपाक करूनच मग मावशी गल्लीबोळातून अजबनगरला आपल्या घरी गेल्या .

मित्रांनो , जगात चांगली  माणसे कमी प्रमाणात आहेत आणि अतिशय चांगली माणसे तर त्यापेक्षा कमी प्रमाणात आहेत .पण आहेत जरूर. अशा माणसांमुळेच जग चालले आहे.

 

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र सरकार 

मराठी आडनावांचा इतिहास

village-man-300x169

Marathi Surnames-मराठी आडनावांचा इतिहास

Milind Abhyankar- मिलिंद अभ्यंकर

 
village man 1
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी 
 
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे प्रख्यात कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
 
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी संस्कृतीत रुजलेल्या “आडनाव” या वैशिष्ट्यपूर्ण शब्दाविषयी मला नेहमीच कुतुहुल वाटत आलेले आहे. कारण अशी पद्धत अन्य भाषेत अभावानेच आढळते.
आद्यनाव या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश म्हणजे आडनाव. त्याचे झाले पद नावं आणि त्याचा अपभ्रंश पड नाव हे पड नाव किंवा पदनाम त्या त्या कुळांना कोणत्या प्रकारची शेती करतो किंवा पशुपालन करतो किंवा कोणत्या फुला फळाच्या बागा लावतो किंवा व्यापार करतो किंवा कोणती प्रशासकीय कामे करतो किंवा संरक्षण सेवेत कोणते पद घेऊन काम करतो यावरून पडली.आडनाव हे जरी शेवटी लिहले जात असले तरी ते आद्य नाव आहे आद्य म्हणजे पूर्वीचे कुळाचे नाव ते आद्य नाम आणि याचा अपभ्रंश होऊन झाले आडनाव.मराठी नामोल्लेखाच्या/ नामलेखनाच्या प्रचलित पद्धतीत
• व्यक्तीचे स्वतःचे नाव/ पहिले नाव
• व्यक्तीच्या वडिलांचे/ (काही वेळा) आईचे/ (व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास) पतीचे नाव आणि
• व्यक्तीच्या वडिलांचे आडनाव/ व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास तिच्या पतीचे आडनाव
अशी नावांची त्रयी सांगण्याची/ लिहिण्याची प्रथा आहे. ह्या तिहेरी नावाला संपूर्ण नाव असेही म्हणतात. मात्र नामोल्लेखाची वा नामलेखनाची ही पद्धत सार्वत्रिक आहे असे नाही. तसेच आडनाव ह्या संज्ञेने व्यक्त होणारा संकेतही सार्वत्रिकरीत्या आढळेल असे नाही.
(आधार विकिपिडिया)
 
देशपांडे, जोशी, कुलकर्णीं, देशमुख, पाटील,पवार, गायकवाड, कांबळे, इनामदार, जहागीरदार, कोतवाल, अशी आडनावे तर सरार्स आढळतात. गावाच्या नावावरुन तर असंख्य आडनावे आहेत. गावाला कर असे संबोधन चिटकवायचे जसे गाव+कर= गावकर. पण आडनाव नाही असा मराठी माणूस औषधाला देखिल सापडणार नाही.आमच्या कोब्रा जातीतली आडनावे खूपच वेगळी आहेत असे माझे निरीक्षण आहे. आता बघा माझेच आडनाव अभ्यंकर आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही अभ्यं गावचे आहात का? मलाही अनेक दिवस या आडनावाचा खुलासा होत नव्हता. एका देऋबाने (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण)त्याचा अर्थ मला सांगीतला. अभयं करोती अभया, म्हणजे अभय मागणाऱ्याला जो अभय देतो त्याला अभ्यंकर म्हणतात. म्हणजे पाहा आम्ही किती महान आहोत. नाहीतर अनेकजण मला भयंकर म्हणूनच हाक मारत असतात. शाहीर साबळेंच्या भारुडात तुम्ही ऐकलेच असेल …इंगळी म्हणजे मोठा विंचू, मोठा म्हणजे भयंकर मोठा, म्हणजे तो अभ्यंकर नाही का… त्याच्यासारखा” 😅
 
असो. आता अन्य चित्तपावनी आडनावे पाहू
लेले यांच्यावरुन आम्ही वा.क.लेले, थ.क.लेले अशी नावे तयार केली होती. नुकताच ओले आले हा सिनेमा पाहीला त्यात आदित्य लेले, ओंकार लेले अशी बाप लेकाची जोडी आहे.
रानडे, बरेच जण याचा उच्चार रांडे असा करतात.
दातीर, दातार, दाते,दात्ये या लोकांचे दात पुढे आलेले असावेत.😁
पोंक्षे या आडनावाचा उच्चार केला की डोळ्यासमोर पोंगा दृष्यमान होतो.
गोखले आडनावाचा भरपूर खोकणारा असावा.
ढमढेरे ढम व ढेरे मग काय बघायलाच नको.
टकले आडनाव पण डोईवर दाट केस.
आडनाव डोंगरे पण शरीरयष्टी खड्यासारखी.
केळकर आणि चोळकर या आडनावांचे माझे नातेवाईक आहेत. आता यांचा विवाह झाला आहे. सुज्ञास सांगणे नलगे…..🤪
काळे गोरे तर उडदामाजी आहेतच मग चित्तपावन त्याला अपवाद असू शकत नाहीत.
हगवणे आडनावाच्या मुलाला कुणी मुलगी देत असेल का?
नातू आडनाव म्हणजे जन्मभर हे नातवंडच राहणार.
आपटे काय आपटत होते कुणास ठावूक.
ह.ना. आपटे या लेखकाचे नाव माझा एक देशस्थ मित्र हणा आपटे असा करतो.
(बऱ्याच देशस्थ ब्राह्मणांना ‘न’ आणि ‘ण’ याचा उपयोग कसा करावा हे कळत नाही असे माझे निरीक्षण आहे. कान व मान याचा उच्चार काण व माण असे करताना मी पाहात आलो आहे.)
बापट – हे पण काही तरी आपटत असणार. आमच्या बापट नावाच्या मित्राला आम्ही “बापट कुल्ले आपट” असे चिडवत असू. तो देखिल भारी, काॕलेजच्या बेंचवर कुल्ले आपटून दाखवत असे. 🤣
रास्ते हे असेच एक चित्तपावनी नाव. रस्ते बनवत असावेत.
खांबेटे – खांब व बेट काय सबंध असावा?
रिसबुड – मुळात बुड हा शब्दच अनेक अर्थ उत्पन्न करतो. यांचे बुड ठिकाणावर राहात असावे, रीसभरही इकडेतिकडे होत नसावे.😊
गाडगीळ – एकतर गाड किंवा गीळ
दामले – जया दामले (माझ्या परिचित) याचा अर्थ सांगतील कदाचित दाम मागतील !
पेंडसे – (प्राची पेंडसे, माझ्या एक परिचित) याचा अर्थ सांगतील, पेंडखजुराचा काही संबंध असावा !
साने – हे बहुतेक लहानसहान काम करत असावेत.
परांजपे – परांशी जपून वागत असावेत.
गोडसे – गोड असे पण नावापुरता.
मराठे – पण जातीने चित्तपावन. आमच्या एका मामाला मराठे कुटुंबातील मुलगी मिळाली आणि गावात त्याकाळात चर्चा सुरु झाली जोशाच्या पोरान मराठ्याची पोरगी केली म्हणे !
विद्वांस – या आडनावाची माझी मावशी होती. अनेकजण त्याचा उच्चार विध्वंस असा करतात.
उकिडवे – माझे आतेकाका. यांचा असा कोणता व्यवसाय होता कुणास ठावूक?
आठवले – सतत नको त्या गोष्टीं आठवत असावेत.
आठल्ये – कपाळावर कायम आठ्या असणार
पटवर्धन – पटावर धन करणारे
सोमण – मणाचे ओझे सहज वागवत असावेत
फडके – सारखे कपडे गुंडाळत असणार
दांडेकर – अर्थात दांडगई करणारे किंवा थांबवणारे.
तुळपुळे – कायम तुळतुळ करणारे.
हसबनीस किंवा हसमनीस म्हणजे जे मनातल्या मनात हसतात ते
असो. 😊
 
काही आडनावे मराठीतील डुकरे, गाढवे, मुंगळे, मुंगी, वाघ, वाघमारे, बकरे, कोंबडे, बदके, चिमणे, कावळे, ढवळे, पवळे, ढेकणे, पिंगळे, मोरे, ढोरमारे, कोळसे, लाकडे, कुऱ्हाडे, भामटे, गुंड, पुंड, बडवे का पडली असावीत? याचा मी नेहमी विचार करतो.
सखारामपंत खापरखुंटीकर हे आमच्या मराठवाड्यातील एका कलाकाराचे नाव वाचले की नकळत मला हसायला येते. तसेच आमच्या एका मित्राचे आडनाव दिवटे आहे. तो दिसला की माझ्या मनात नकळत आले दिवटे चिरंजीव असे शब्द येतात. पांडव नावाचा माझा एक मित्र आहे. काॕलेजमधे आम्ही नुकतेच गेलो होतो. प्रत्येकजण नाव आडनाव सांगत होता. पांडवने नाव सांगीतले, काहीवेळाने एकाने आपले आडनाव तोरो असे सांगीतले, आम्हाला ते कौरव असे ऐकू आले. वर्गात हशा पिकला, चला पांडव व कौरव वर्गात आहेत म्हणजे महाभारत अर्थात वस्त्रहरण कार्यक्रम होणार असे मुले विनोदाने बोलू लागली.
 
कुंभार, सोनार, चांभार, फुले, काटे, वारीक, माळी, कोळी, कोष्टी, गोसावी, ही बलुतेदारी करणारी आडनावे आहेत.
असा आहे हा मराठी आडनावांचा महिमा. बाहेरच्या राज्यात गेल्यावर अनेक अमराठी लोकांना आपले नेमके नाव काय आहे हे कळत नाही. असा माझा अनुभव आहे. माझे मिलिंद हे नाव अनेकांना कळतच नाही. मिलिंद गणेश अभ्यंकर असे नाव असताना अनेक जण मला गणेश असे पुकारत. तर दिल्लीत माझे मिलिंद हे नाव मिलन असे झाले होते.
शेवटी आडनावात काय आहे, असे म्हणावेसे वाटते, पण नाही, आडनावात बरेच काही आहे ते मराठी माणसाला चांगले कळते.
ही आहे माझ्या प्रिय मायमराठीची आडनावांची गंम्मत, खासीयत.
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना मराठीभाषा गौरव दिनानिमित्त शब्दांजली.
मिलिंद गणेश अभ्यंकर
छत्रपति संभाजीनगरकर

वरील लेख श्री मिलिंद गणेश अभ्यंकर यांच्या फेसबुक  वरून  साभार- श्री अभ्यंकर यांचा मूळ लेख वाचण्यासाठी  फेसबुक लेखाची खालील  लिंक क्लिक करा.

लेखक हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि फेसबुक आणि अन्य माध्यमांवर वेळोवेळी प्रसंगोचित लिखाण करीत असतात.