अहो काय वैताग! गेले तीन दिवस संभाजीनगरच्या सो कॉल्ड कोथरूडमध्ये म्हणजेच उल्कनगरीमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने अक्षरशः थैमान घातले आहे.
वनविभागाचे कर्मचारी सोडून बाकी तमाम जनतेला त्या अजब प्राण्याने सीसीटीव्हीतून दर्शन दिले आहे. कदाचित त्या बिबट्याचा मागचा जन्म कॅमेरा समोर वावरणाऱ्या एखाद्या सराईत कलाकाराचा असावा. या बिबट्याच्या भीतीपोटी मात्र आधीचेच सहनशील संभाजीनगर कर अजूनच त्रस्त झाले आहेत पण महानगरपालिकेचे कर्मचारी मात्र पाण्याची चर्चा दुसरीकडे वळाली म्हणून खूप आनंदी झाले आहेत असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका मनपा कर्मचाऱ्याने सांगितले.
बऱ्याच ऑर्थोपेडिक सर्जन कडे-अचानक वर कुठे बिबट्या झाडावर बसलेला आहे का या चिंतेपोटी वर बघून चालण्यामुळे, धपकन रस्त्यात, खड्ड्यात ,पाण्यात पडल्यामुळे जखमी झालेले बिचारे संभाजीनगर कर चकरा मारत आहे असेही कळाले .
अचानक मफलर च्या विक्रीत वाढ झाल्याचे सुद्धा कळाले, कारण बिबट्याने आपल्या गळ्याला धरल्यावर, त्याचे दात लागू नये म्हणून काहीतरी आवरण हवे म्हणून बरेच जण मफलर घालून फिरत आहेत! दिवसभर बिबट्याच्या चर्चा ऐकून रात्री स्वप्नात सुद्धा बिबट्या आल्यामुळे झोपेत बेड वरून खाली पडणे, तसेच जोरात ओरडणे, व नवरा बायकोने एकमेकाला बिबट्या समजून हाणामारी करणे अशा अनेक घटना सुद्धा होत आहेत!
बायकोच्या बडबडीला कंटाळून संध्याकाळी, रात्री “जरा बाहेर चक्कर मारून येतो” असे म्हणून बाहेर पडणारे बिचारे पुरुष सध्या बिबट्या पेक्षा बायको बरी! म्हणून घरीच श्रवणीय आनंद घेत आहेत.
आता निवडणुका ,मॅचेस सगळं काही संपल्यामुळे तरुण वर्गाला सुद्धा बिबट्याची चर्चा करत अनेक जणांशी, जणींशी जवळीक साधता येत आहे. जनरल प्रॅक्टिशनर मात्र या बिबट्यामुळे जरा नाराज आहेत. कारण या बिबट्याच्या भीतीपोटी अनेक जणांचा कॉन्स्टिपेशन चा त्रास आपोआपच बरा झाला आहे त्यामुळे त्या औषधासाठी येणारे रुग्ण खूप कमी झाले आहेत.
आजोबा मंडळी जंगलातले प्राणी आता शहरात यायला लागले म्हणजे आता कलियुगाचा अंत आला ,काहीतरी भयंकर होणार अशा चिंता करत संध्याकाळी कट्ट्यावर भेटण्याचे ऐवजी एकमेकाना ज्येष्ठ नागरिकांच्या व्हाट्सअप ग्रुप वरून कॉल करून संपर्क करत आहेत.
या बिबट्याच्या निमित्ताने आमच्या काळात तर… असे म्हणत किती वाघ पाहिले किती जंगली प्राणी पाहिले अशी पण चर्चा करत मनाचे समाधान करताना दिसत आहेत. अचानक शाळेला सुट्टी मिळाल्यामुळे मुलं-मुली आनंदातच आहेत त्यांच्या घरातल्या दंग्यामुळे आयांना येणाऱ्या रागामुळे बहुदा बिबट्या शहरातून पळून गेल्याची पण शक्यता नाकारता येत नाही.
हा बिबट्या पण खूप हुशार दिसतोय सगळ्या सीसीटीव्ही कॅमेर्यात व्यवस्थित पोज देत आहे यामुळे अफवा पसरवणाऱ्यांना दहा-दहा वर्षाचे जुने बिबट्यांचे व्हिडिओ सुद्धा प्रसारमाध्यमात पसरवायला भरपूर वाव मिळत आहे. मला तर वाटते की या सगळ्या प्रकाराला कंटाळून वनविभागाच्या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या स्वतःहूनच येऊन बसेल आणि संभाजीनगर कर सुटकेचा श्वास घेऊन कुठे जलवाहिनी फुटली याची चर्चा करत बसतील.
मी सो…पा…
बिबट्या कुठे आढळून आल्यास टोल फ्री नंबर 1926
24*7 नंबर- 95792 71552
सदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक आणि समुपदेशक वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे.
30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.
For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link.
आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे जास्त महत्व दिले जाते. वरवर पाहिले तर कदाचित त्यांच्या विचारांमध्ये फरक वाटू शकतो, पण त्यांच्या पातळीवर जाऊन पाहिल्यावर दोन्हीमधील एकवाक्यता लक्षात येते.
असेच महाराष्ट्रातील दोन संत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि आणि समर्थ रामदास.
हे दोघेही संत साधारण एकाच कालखंडात झाले. (तुकाराम महाराज- इ.स. 1608 ते 1650, आणि समर्थ रामदास इ.स. 1608 ते 1682). दोघांचाही परमार्थात मोठा अधिकार होता, आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूति असेच दोघांचे वर्तन होते. तुकाराम महाराज जिवंतपणीच ब्राह्मी स्थितीला पोहोचलेले तर समर्थ हे त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रखर साधनेने ‘रामदास’ बनलेले. या दोघांना सहस्रदल अशा भारतीय तत्त्वज्ञानाच्या कमलपुष्पाच्या दोन पाकळ्यांची उपमा शोभून दिसेल.
सनातन भारतीय तत्त्वज्ञान हे आत्मोद्धार हेच आयुष्याचे ध्येय मानणारे आहे.
पण वित्तेषणा (धनाची इच्छा) दारेषणा (स्त्रीची इच्छा) आणि लोकेषणा (प्रसिद्धीची इच्छा) यांच्याबरोबर मोक्षेच्छा ही सुद्धा एक ईषणा म्हणजे इच्छा आहे असे मानून त्याही पलीकडे जाणा-या तुकोबांना मोक्षाचे महत्त्व वाटत नाही, तर मोक्ष प्राप्ती नंतरही त्यांना भगवद्भजनच करावे वाटते.
प्रेममय भक्तीचे ते पथिक होते आणि मुक्ती त्यांना दासीप्रमाणे होती. मुक्तीनंतर सर्व इच्छा नष्ट झाल्या तरी एक उरतेच ती म्हणजे भगवंताचे सुख उपभोगावे हीच. तुकोबा असेही म्हणतात की ख-या भक्तीचा आरंभच मुळी ब्रह्मानुभवापासून (मुक्ती लाभल्यावर) होतो.
सामान्यतः माणूस पुनर्जन्माला घाबरून असतो.पण तुकोबांना याची भीती वाटत नाही.देवाची साथ म्हणजेच स्मरण असेल तर कितीही जन्म घ्यावे लागले तरी ते दु:ख खोटे आहे यावर त्यांचा विश्वास आहे.म्हणून तर ते म्हणतात..
कारण..गर्भात दु:ख आहे हे त्यांना माहीत आहेच..पण हरी सखा जवळ असेल,स्मरणात असेल तर ते दु:खच राहणार नाही हे ते जाणत होते.साक्षात हरीच आपणाला पालखीतून जन्मांतराच्या वाटेवरून घेऊन जाणार असेल तर पायी चालणा-यांना होणारे वाटेवरचे त्रास जाणवणार नाहीत.
दु:ख त्याला भोगावे लागते ज्याची चित्तवृत्ती देहाला चिकटली आहे.पण ज्याची चित्तवृत्ती नामस्मरणात रंगते त्याचे देहात्म्यच सुटते.त्याला दु:ख कोठून असणार ? त्याची पालखी उचलायला देव तयारच आहे.
आता या पार्श्वभूमीवर, समर्थ रामदासांचे विचार पहिले, तर समर्थांना सामान्यजन गर्भवासाच्या दु:खातून याच जन्मात मुक्त व्हावेत याची तळमळ होती.कारण जन्मजन्मांतरीचे नित्यकल्याण करण्याचे साधन असणारा नरदेह हा दुर्लभ आहे
इतर पशु आदी जन्मात पापपुण्य नाही पण येरझाऱ्या आहेत.
आणि आम्हा सामान्यांना प्रपंचासक्ती व वित्तदारेषणा (वासना),इतक्या घट्टपणे चिकटलेल्या आहेत की सर्वांची पूर्ति करतांना आम्हाला प्रचंड दु:ख होते.. जन्म वाया जाऊनही मरणानंतरही हे सुटत नाही मग जन्ममरणाच्या येरझाऱ्या,गर्भवासाचे दु:ख सहन करणेही अटळ..त्याची अत्यंत भीतीही वाटते..
म्हणून मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात..
मना वासना चुकवी येरझारा I मना कामना सांडी रे द्रव्य दारा I
मना यातना थोर हे गर्भवासी ।मना सज्जना भेटवी राघवासी ॥
(येथे वासना ही षष्ठी विभक्ती) .वासनेच्या येरझाऱ्या असा अर्थ.
दोन्ही महापुरुषांना एकच गोष्ट सांगायची आहे..
हेचि दान देगा देवा..तुझा विसर न व्हावा
आणि
मना सज्जना भेटवी राघवासी
असे झाल्यास गर्भवास झाले तरी दु:ख होणार नाही किंबहुना ते होणारच नाहीत कारण राघवाची भेट त्याचा विसर न झाल्याने होणार आहे .वासना ,कामना,द्रव्य दारा लोकादी ईषणा नष्ट झाल्यामुळे,मन सज्जन झाल्यामुळे हे होणार आहे..तो भेटल्यावर पुन्हा जन्म कसचा..? नामस्मरणातच मुक्ती आहे..विस्मरणात मरण आणि पुन्हा जन्म आहे.
थोडेसे विषयांतर..
प्रत्येकाला कितीदा जन्म घ्यावा लागेल हे माहीत नाही.
विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे..
एका साधूला त्याचे मुक्ती साठी दोन जन्म बाकी सांगितल्यावर तो निराश झाला पण एका सहज फिरणा-या माणसाला मुक्तीसाठी झाडावरच्या पानांइतके जन्म घ्यावे लागतील म्हणाल्यावर तो आनंदाने नाचू लागला..तर त्याला तात्काळ मुक्ती मिळाली.. कारण तो मुक्तच होता..
तेव्हा बंधन आणि मुक्ती या पण संकल्पनाच आहेत,त्या देहबुद्धीमुळे निर्माण होतात स्वस्वरुप ज्ञान करवून घेऊन त्यांचे निरसन करुन घ्यावे असे समर्थ दासबोधात म्हणतात.(७-६-५०)
आता, राघवाची भेट कशासाठी हवीय किंवा तुकोबांना देवाच्या स्मरणाचेच दान का हवे.. ? तर..
भगवन्ताच्या प्रेमाला प्राप्त झाल्यावर भक्त फक्त त्याच्याचकडे पाहतो,त्याच्याबद्दलच ऐकतो,बोलतो,सदैव त्याचेच चिंतन करतो.
ही प्रेमभक्तीची उच्चतम अवस्था त्यांना निरंतर हवी आहे..(काही तत्त्वज्ञ मुक्तीचे १६ ते २० प्रकार मानतात..तरीही हीच सर्वोच्च अवस्था असे मी मानतो)
शेवटी..आणखी एक श्लोक घेऊन विवेचन संपवतो.
देह्यादिक प्रपंच हा चिंतियेला I
परी अंतरी लोभ निश्चित ठेला I
हरीचिंतने मुक्तीकांता वरावी I
सदा संगती सज्जनांची धरावी..II
सदैव प्रपंचाचेच चिंतन व त्याचा लोभ सोडून मनाने मुक्ती साधावी,का? तर हरिचिंतन करता यावे म्हणून.यासाठी सज्जनांची संगती धरावी.तुकोबा संतसंगत मागतात तर समर्थ सज्जनांची.दोन्ही एकच. समर्थ तर मनालाच सज्जन म्हणून हाक मारतात.समर्थांचे याविषयी मनाचे श्लोक किती म्हणून सांगावेत..?
एकूण काय, तर कोणतेही संत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर, एकाच गोष्ट, वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळे दृष्टान्त देऊन सांगतात. फक्त समजून घेणारा पाहिजे.
संत साहित्य वाचतांना सहज सुचलेले हे विचार, समविचारी लोकांबरोबर शेअर करावे असे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच!
पांडुरंग देशपांडे
लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.
pandurang deshpande
लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.
बऱ्याच लोकांना आपल्याला एखादी गोष्ट बिलकुल जमत नाही याबद्दल खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, आणि त्यामुळे आपण आपलेच किती नुकसान करून घेत आहोत, याबद्दल त्यांना माहिती नसते.
१)एका पेशंटला तिखट जरा कमी खा, हिरवी मिरची डायरेक्ट खाऊ नका असं सांगितल्यावर तो चक्क म्हणाला डॉक्टर तेवढं सोडून बोला, दोन गोळ्या वाढवून द्या… पण मला तिखट बंद करणे अजिबात जमणार नाही..
२)पती-पत्नीच्या वादाची केस होती. प्रकरण घटस्फोटात पर्यंत गेलं होतं.. त्या स्त्रीला म्हटलं तुम्ही त्यांना थोडं समजून घ्या . सारखं टोचून बोलू नका. त्यांनी चूक कबूल केली आहे, तुम्हाला संसार पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला बोलण्याची पद्धत थोडी बदलावी लागेल…
लगेच ती स्त्री म्हणाली .. ते मला शक्य होणार नाही कारण माझ्या माहेरी अशाच पद्धतीने बोलतात.त्यात काय एवढं! त्याने समजून घ्यावं..
stubborn woman
३)व्यसनाधीन युवक कावीळ, अपचन आजाराने त्रस्त होता.. औषधाने बरं वाटल्यावर समुपदेशन करताना व्यसन बंद करण्याबद्दल सांगितलं तेव्हा तो चक्क म्हणाला सर,मी खूपदा प्रयत्न केला ते शक्य नाही. त्याच्याशिवाय जगू शकत नाही… माझे मित्र तर माझ्यापेक्षा जास्त घेतात त्यांना काही झालं नाही..
आपल्याला अशा व्यक्ती बऱ्याचदा भेटतात किंवा आपण सुद्धा आपल्या साठी हितकर नसणाऱ्या पण आवडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या सवयी, आपल्यातील दुर्गुण, आपल्या स्वभावातील कमतरता याबाबत अशाच पद्धतीने दृष्टिकोन ठेवत असतो. आपण चूक करत आहोत किंवा आपल्या स्वभावात हा बदल करणे आवश्यक आहे हे आपल्याला जाणवते फक्त त्याच्याशी स्थिर भावना,(rigid thoughts ) अवस्तुनिष्ठ वैचारिकता,( irrational thought process) निगडित असल्यामुळे जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आपण अनेक कारणे देऊन त्यापासून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशनासाठी आलेली असंच नुकतीच शाळेत नोकरी लागलेली स्त्री मला स्टेज करेज येऊ च शकत नाही मी ते काम करणारच नाही. असं म्हणून नोकरी सोडायला निघाली होती.
खरंच”जमत नाही”
असं काही असतं का?आणि अत्यावश्यक आहे अशा वेळेस आपण भीती, अतार्किक आकलन (wrong perception),व्यसन, सवय याच्यावर विजय मिळू शकत नाही का? नक्कीच मिळवू शकतो . इतिहासात आणि आसपास आपल्याला असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. रवींद्र गुर्जर यांच्या ‘ *70 दिवस*’ भाषांतरित कादंबरीत नरमांस खाऊन जगलेला युवक भयंकर अपघात घडे पर्यंत अत्यंत लाजाळू, घाबरट होता पण त्याने विमान आल्पसच्या बर्फाळ पर्वतावर पडल्यावर जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या स्वभावात बदल केला. आणि 70 दिवसाचा इतिहास घडवला .
गाडी शिकताना आपल्याला भीती वाटते आपल्याला बॅलन्स करता येणे अशक्य आहे असं सुरुवातीला नक्कीच वाटतं. एक्सीलेटर,क्लच आणि ब्रेक चा गोंधळ चार चाकी शिकताना स्वप्नात सुद्धा होतो. पण हळूहळू आपण तो बदल आपल्यात घडवून घेतो आणि नंतर सराईत ड्रायव्हिंग करू लागतो. जमत नाही यामागे बऱ्याच वेळा भीती हे कारण असते भय निर्माण होण्यासाठी काही जणांच्या बाबतीत सुरुवातीला काही अयोग्य,भीतीदायक घटना घडलेली असते किंवा भूतकाळात त्यांच्या हातून एखादी चूक झाली असते किंवा आपली योग्य नोंद घेतली जात नाही,कोणीतरी आपली झालेली चूक सर्वांसमोर निर्देशानास आणली असेल इत्यादी कारणं घडलेली असतात.पण अयोग्य विचार बैठकीमुळे त्याबद्दल इतका विचार केला जातो की पुन्हा याच्यापुढे मी असं करणारच नाही अशा सूचना आपण आपल्या मनाला देतो. आणि मग त्या मागच्या भितीचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारण देण्याची आपल्याला सवय लागते आणि हळूहळू त्याबाबत लोकांनी सहानुभूती दाखवल्यावर त्याचे रूपांतर वृथा अभिमानात होते आणि त्याबद्दल आपल्याला वाईट पण वाटत नाही.फोबिया किंवा भयगंड ,एन्झायटी नावाचा आजार यातूनच निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये तर भयाची व्याख्या खूपच सुंदर केली आहे *अपकार अनुसंधानजं दैन्यम्* “| अर्थात पुढे काहीतरी वाईट होईल अशा विचारांमुळे येणारी मनाची दैन्यता.
म्हणजे सतत न जमणाऱ्या गोष्टीबद्दल नकारात्मक स्वसंवाद केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल भय निर्माण होते. पण अशा पद्धतीने आपण आपले व्यक्तिमत्व निर्माण केले तर न जमणाऱ्या गोष्टींची संख्या वाढत जाते. त्याच्या मुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्रासदायक परिणाम होतो.आपल्या क्षमता आपण पूर्ण वापरू शकत नाही. त्याची खंत नंतर सतत राहते .
*आत्मनेव मन्येत कर्तारं सुखदुःखयो:* |
स्वतःच्या सुखदुःखाला आपणच कारण आहोत ज्या अयोग्य गोष्टी आपल्या वर्तनात आहेत, ज्याबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होते,किंवा आपण बऱ्याच वेळा उपभोगतेच्या बाबतीत मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे आपल्यावर त्रासदायक परिणामच होतात. यात सुधारणा होण्यासाठी नक्कीच ठरवून प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी प्रसंगी समुपदेशक किंवा तज्ञ व्यक्ती किंवा योग्य सहकार्याची मदत घेतली पाहिजे.
भीतीला जिंकण्यासाठी आयुर्वेदामध्ये ‘धैर्य’ थेरपी सांगितली आहे एखादी वर्तवणूक आपल्यासाठी त्रासदायक आहे त्यावर निश्चित आपण योजना बद्ध पद्धतीने विजय मिळवू शकतो. कोणताही बदल अचानक होत नाही त्यासाठी रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर नक्की यश मिळते .
आपण शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्म करत असतो शारीरिक न जमणाऱ्या कर्मामध्ये व्यायाम, शिस्त, योजनाबद्ध पद्धतीने अवलंबूनत्व कमी करणे, असे सकारात्मक प्रयत्न उपयोगी ठरतात.उदाहरणार्थ सारखे नख खाण्याची सवय असेल तर बोटांना विशिष्ट चवीचे लेप लावले तर ही सवय बंद होण्यासाठी मदत होते. भार कमी करण्यासाठी व्यायाम आहार नियंत्रण हे जमवावे च लागते.
वाचिक कर्मामध्ये चुकीचे बोलणे,टोचून बोलणे,खोटे बोलणे,इत्यादी सवयी असू शकतात. याचा अत्यंत घातक परिणाम संसारिक,सामाजिक जीवनावर होतो. कदाचित बोलणाऱ्याच्या मनामध्ये असा उद्देश नसू शकेल पण चूक शब्दांची निवड,समोरच्याला लागेल असे बोलणे, सतत तुलना करणारे वाक्य , असमाधान व्यक्त करत रहाणे,अति क्रोध याचे उपद्रवमूल्य प्रचंड असू शकते. त्यामुळे जवळची माणसं दुरावतात.अशा व्यक्तींचा असा बोलण्याचा स्वभाव आहे हे माहीत असून सुद्धा बोललेले रुक्ष शब्द, मन दुखावणारा संवाद आयुष्यभर लक्षात ठेवला जातो.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला व तत्परिणामी स्वतःला मानसिक त्रास होऊ शकतो.त्यासाठी प्रयत्नपूर्वक आपली बोलण्याची पद्धत, शब्दांची निवड,भावना व्यक्तिकरण पद्धती सुधारावी लागते.मानसिक कर्मामध्ये भीती,रागिष्ट स्वभाव, लोभ, द्वेष,इर्षा,सतत नकारात्मक विचार अशी वर्तवणूक असू शकते.यात जर बदल करायचा असेल तर ध्यान,धारणा, धैर्य,समुपदेशन इत्यादी उपाय फायदेशीर ठरतात. केवळ भीतीमुळे,सवयी मुळे, त्रासदायक आवड जपण्यासाठी बदल न स्वीकारणे हे आपल्यासाठी अत्यंत नुकसान कारक असते. आपल्या चुकांचा अथवा चुकीच्या सवयींचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे?
अर्थात अशा मनोवृत्तीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो फक्त आपला कम्फर्ट झोन सोडण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक हवेत.
मी सो…पा..
वैद्य सोहन पाठक
तद्विद समुपदेशन केंद्र
9822303175
सदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक आणि समुपदेशक वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे.
मानसिक ताणतणावामुळे शुगर वाढलेला एक रुग्ण आमच्या मधुमेह तज्ञ मित्राने समुपदेशनासाठी पाठवला होता.
ऑफिसमधला कामाचा ताण,उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून सुरु केलेला छोटा व्यवसाय ,त्याची वाढती जबाबदारी ,कौटुबिक ताण ,वाढणारी रक्त शर्करा एकंदर बऱ्यापैकी वैतागलेला,पत्नीच्या भाषेत चिडचिडा स्वभाव अशी एकंदर रुग्णाची परिस्थिती होती.त्याचा मनात सतत आपण कुठे कमी पडणार तर नाही ,मला कुटुंबातले सदस्य समजावून घेत नाहीत असे विचार येत व त्या मुळे निद्रानाश , डोकेदुखी सारखे आणखी विकार मागे लागले होते.
सुरवातीला, तुम्ही डायनिंग टेबल वरचं खाण्याचं सामान नेहमी बेडरूम मध्ये ठेवता का ? किंवा रोज हॉलमधल्या चपला स्वयंपाक घरात आणता का ? असा प्रश्र्न मी विचारल्यावर
आता हा अजून काय नवीन प्रकार, अशा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहिले.
नंतर त्याच्यांशी संवाद साधताना मी कंपार्टमेंट विचार पद्धती ची मजा सांगितली .
आपण कोणत्याही घटनेचा विचार करताना त्याचा संबंध अनेक घटनांशी लावत असतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि घरी आल्यावर मुलांचा गोंधळ चालू असेल किंवा पत्नीशी मतमतांतर झाले असेल तर आपण ऑफिसमधला ताणतणाव डोक्यात ठेवून मुलांवर किंवा पत्नीवर रागवतो .त्यांच्याशी नीट बोलत नाही.
तसंच निर्णयाच्या बाबतीत कौटुंबिक मतभेद झाले तर आपण मतभेद झाले हाच विषय डोक्यात ठेवून इतर वेळी सामान्य पण वागत नाही .आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना मतभेद झालेला विषय डोक्यात ठेवून पूर्वग्रह दूषित संवाद करतो. त्यामुळे तो विसंवादच जास्त होतो .
आपण आपली भूमिका नेमकी ठेवत नाही.आपल्या सगळ्या भूमिकांची सरमिसळ आपण करत असतो. जेव्हा वडील म्हणून काही संवाद साधायचा असेल तेव्हा आपली ऑफिसरची भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे पण मुलांची बोलताना बऱ्याच वेळा ऑफिसर च्या भूमिकेतूनच आपण बोलतो कुटुंबियांशी संवाद साधताना किंवा पत्नीशी संवाद साधताना अगोदर झालेल्या घटना, मतभेद डोक्यात ठेवून आपला संवाद होतो प्रत्येक वेळी मागे झालेल्या चुका संदर्भासाठी ठेवूनच आपण त्यांच्याशी बोलतो.
हा भूमिकांची सरमिसळ असलेला संवाद खूप त्रासदायक होतो. साधं “पाणी दे” हे वाक्य बोलताना सुद्धा मागच्या वेळेस पाणी थोडं सांडलं होतं हा रेफरन्स डोक्यात ठेवून पाणी न सांडता आण , असं बोलल्यास समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या चुका आठवून बोलण्याची तयारी करते . त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहून वादविवादाची ठिणगी पडते.
एखाद्या सुनेला स्वयंपाक जमत नाही म्हणून ती वाईट किंवा सासूंचे कामात सहकार्य नाही म्हणून बेबनाव अशा विचारांच्या गोंधळामुळे त्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्या लक्षात येत नाही. जरी सुनेला स्वयंपाक येत नसेल, तरी ती नोकरी करते घर टापटीप ठेवते ,चांगलं लिहिते ,मुलांचा अभ्यास घेते सामाजिक संपर्क चांगला आहे ,कुटुंबियांची काळजी घेते घरातील महत्त्वाच्या गोष्टी मध्ये लक्ष घालते असे चांगले गुण तिच्यामध्ये असू शकतात पण आपण कंपार्टमेंटचा गोंधळ घातल्यामुळे आपल्या दृष्टीने ती वाईटच असं दृष्टिकोन होऊ शकतो.
तसेच सासूबाईंना नातवांच्या जबाबदारी मधे , आज्ञार्थक बोलण्यामुळे, मतमतांतर असले तरी पण त्यांचे अनुभव ,त्यांचं घरातल्या अस्तित्व त्यांनी घराला घरपण देण्यासाठी आजवर केलेली मेहनत इतर कामात केलेली मदत या बाबींकडे पण लक्ष देणे आवश्यक असते दोघांनीही पूर्वग्रह दूषित ठेवला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतच आपल्याला चूक वाटू शकते .
अशाच प्रकारे एखाद्याशी वाद-विवाद झाले तर त्याचा राग इतर व्यक्तीशी बोलताना सुद्धा आपल्या मनात असतो आणि त्याच्याशी नीट बोलत नाही.त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होऊ असाच गोंधळ ऑफिस मधील कामात सामाजिक कामामध्ये सुद्धा होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी पूर्वी वाद घातलेला असेल तर आपल्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याच्या कौतुकासाठी अडचणी येते आणि नंतर आपण सुख संवाद न ठेवल्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता असते.
यासाठी आपल्याला कंपार्टमेंट विचार पद्धती आवश्यक असते म्हणजेच आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या विचारांना काल्पनिक कंपार्टमेंटमध्ये ठेवणे आवश्यक म्हणजेच समजा ऑफिसमधला ताण तणाव हा एका वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवावा. त्यामुळे आपल्या मुलांशी ,पत्नीशी वागताना त्याचा परिणाम होणार नाही. आपलं कौटुंबिक जीवन हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्याचा परिणाम आपल्या ऑफिसवर, कामावर, व्यवसायावर झाला नाही पाहिजे .Free-pik image
एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करू शकत नसेल तर आपले मतभेद त्या कामापुरतेच असावेत इतर वेळी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा कौतुक निश्चित केलं पाहिजे सतत त्याच्या चुकाबद्दल बोलणं हे त्या व्यक्ती सोबतच्या व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते माझा आनंद, माझे छंद, माझी मित्र मंडळी, माझे कुटुंब, माझा व्यवसाय हे आपले वेगवेगळे काल्पनिक कंपार्टमेंट आहेत.
जसं आपण एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत शक्यतो ठेवत नाही तसंच या कंपार्टमेंट मधल्या विषयांची सरमिसळ आपण एकमेकांशी करू नये. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या काल्पनिक चाव्या सुद्धा आपल्याच हातात पाहिजे ज्यामुळे कितीही ताण तणाव असला तरी आपण कुटुंबासाठी, आपल्या छंदासाठी वेळ देऊ शकू .
एखादी घटना दुर्दैवी असेल, त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या घटने शिवाय आपली काही वेगळी जबाबदारी, जीवन, आनंद असू शकतो. त्या दुर्दैवी घटनेचाच विचार सतत आपण करत राहिलो म्हणजेच त्या कंपार्टमेंट मधले विचार इतर कंपार्टमेंट मध्ये जाऊ लागले तर आपल्या जीवनातले जबाबदारी, कर्तव्य, आनंद आपण व्यवस्थित उपभोगू शकणार नाही.पण जर आपली कंपार्टमेंटची भूमिका स्पष्ट असेल तर आपण या सगळ्यांमध्ये सरमिसळ होऊ देणार नाही आणि प्रत्येक भूमिका, जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकू आणि समजा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल समोरची व्यक्ती अगदीच असमजुतदार असेल तर त्या ताणतणावामुळे आपल्या जीवनातील उत्साह, आपल्या छंद, आपला आनंद ,आपली आवड याच्यावर अश्या कंपार्टमेंट विचार पद्धतीमुळे निश्चितच कमी परिणाम होईल आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकु.
मी सो…पा…
वैद्य सोहन पाठक
9822303175
sohanpathak@gmail.com
सदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक आणि समुपदेशक वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे.
30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.
For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link.
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*रानभूल…* (४ )
एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं की आम्हाला अद्याप एकही माणूस अथवा सजीव प्राणी दिसला नव्हता. आजपर्यंत चकव्याच्या जितक्या कथा ऐकल्या होत्या त्या सर्व कथांत चकव्याने कुत्रा, मांजर, ससा किंवा बकरी यांचेच रूप घेऊन फसवणूक केली होती.
माझा एक मित्र कारने पंढरपूरला जात असताना तुळजापूरच्या पुढे एक वळण घेतल्यावर चुकीच्या रस्त्याला लागला. जेंव्हा खूप वेळ पासून एकही वाहन क्रॉस झाले नाही आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारे अंतर दर्शविणारे माईल स्टोन्स ही दिसेनात तेंव्हा त्याला रस्ता चुकला असे वाटले व त्याने मागे झोपलेल्या मित्राला उठवून सांगितले की दिवसाची वेळ असूनही रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. मात्र सशांचे थवेच्या थवे कारच्या पुढून रस्ता ओलांडून जात आहेत, हे मला जरा विचित्र वाटते आहे.
त्या अनुभवी मित्राने हे ऐकताच ओळखले की त्यांना चकवा लागला आहे. संध्याकाळ होईपर्यंत थांबून गाडीतच बसून वाट पाहण्याचे त्यांनी ठरवले. संध्याकाळ होताच चकव्याचा प्रभाव संपला आणि त्यांना समोरच पंढरपूरचा वाहता रस्ता दिसू लागला.
असाच चकव्याचा आणखी एक अनुभव माझ्या मित्राच्या वडिलांनाही आला होता.
तालुक्याच्या आठवडी बाजारातून खेड्यातील घरी परतताना एक छोटेसे बकरीचे पिल्लू त्यांच्या मागे मागे चालत येऊ लागले. ते पिल्लू एवढे गोंडस होते की त्याला उचलून घेण्याचा त्यांना अनिवार मोह झाला. पिल्लाला उचलून घरी नेताना वाटेतील नदी ओलांडताना त्या पिल्लाचे पाय लांब लांब होऊ लागले. जेंव्हा ते पाय लांब होऊन नदीच्या पाण्याला लागले तेंव्हा त्यांनी ते पिल्लू दूर भिरकावून दिले आणि मागे न पाहता भराभर गावाकडे निघाले. तोच मागून आवाज आला..
“आज वाचलास… !”
रानातील, जंगलातील चकव्याप्रमाणेच उजाड माळरानावरही चकवा लागल्याचे अनेक किस्से आहेत.
अकोल्यात आमच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांना उमरीच्या माळावर एका माणसाने कसलातरी पत्ता विचारला. त्यानंतर काय झाले माहीत नाही, पण हे काका त्या माणसाच्या मागे मागे चालू लागले. रस्त्याने एक दोन ओळखीच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला पण त्यांच्याकडे अजिबात न पाहता जादूने भारल्यासारखे ते त्या माणसाच्या मागून चालत राहिले.
एका कोरड्या विहिरीपाशी आल्यावर तो माणूस एकाएकी अदृश्य झाला आणि मग काका किंचित भानावर आहे. पण आपण इथवर का व कसे आलो आणि आता आपल्याला कुठे जायचे आहे हेच त्यांना आठवेना. त्यांची अशी संभ्रमित अवस्था पाहून एक दोघा परिचितांनी त्यांना घरापर्यंत पोहोचविले.
चकव्याच्या अशा एका मागून एक थरारक कहाण्या आठवत असतानाच बाजूलाच बसून काहीतरी विचार करीत असलेला रमेश म्हणाला..
“साब, ये प्राणहिता नदी इस जंगलमे सांप जैसी मोड़ लेते हुए (नागमोड़ी वळणे घेत) बहती है.. और शायद हम नदी के ऐसे ही एक मोड़ के बीच घूम रहे है ! बाहर निकलनेका रास्ता पास ही है, लेकिन हमे कुछ न सूझने के कारण दिखाई नहीं दे रहा..”
रमेश जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. नदीच्या दोन गोलाकार वळणांमध्ये आम्ही अडकलो असण्याचीही शक्यता होती. रानभुलीमुळे आम्हाला बाहेर निघण्याची वाट जवळ असूनही दिसत नव्हती.
आम्ही सरळ सरळ पुढेच जात असल्याने एकाच पद्धतीने विचार करीत आहोत आणि पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर येत आहोत. पुढे जाण्याऐवजी मागे फिरून पाहिलं तर..? कदाचित उलट दिशेने गेल्यास एखादी नवी वाट सापडूही शकेल..!
रमेशलाही ही कल्पना पटली आणि मग पुन्हा पुन्हा नदी ओलांडण्याऐवजी आलेल्या रस्त्याने मागे फिरून आसपास एखादी नवीन वाट दिसते का ते शोधण्याचं ठरवलं.
हा उपाय खूपच परिणामकारक ठरला. त्याच रस्त्याने मागे फिरलो असताना आता रस्ता अजिबात ओळखीचा वाटत नव्हता. सर्व परिसर नवीन, वेगळा व अनोळखी वाटत होता. एखादी नवीन वाट आता आम्हाला नक्कीच सापडेल असा मनोमन विश्वास वाटत असतानाच दूर टोकावर एक मानवी आकृती उभी असलेली दिसली.
कमरेला फक्त वीतभर लांबीचा पंचा गुंडाळलेला एक उघडाबंब आदिवासी टोकाला घुंगरू लावलेली लांब काठी हातात घेऊन पुतळ्यासारखा स्थिर नजरेने आमच्याकडेच पहात होता. झुबकेदार मिशा, डोक्यावर मळकट मुंडासं, गळ्यात काळा गोफ, कानात कसल्यातरी धातूची भिकबाळी, खांद्यावर आखुडसं घोंगडं असलेला तो वनवासी जणू आमचीच वाट पहात रस्त्याच्या मधोमध उभा होता.
त्या माणसाजवळ जाताच रमेश म्हणाला..
“अरे..! ये तो अपना भिमन्ना है !”
भिमन्ना बिरसाईपेट जवळच्या एका आदिवासी तांड्यात राहणारा गुराखी होता. गुरांना चरण्यासाठी तो जवळपासच्या जंगलात घेऊन जात असे. रमेश त्याला चांगलाच ओळखत होता.
“भिमन्ना, हम रास्ता भटक गए है ! हमे बालमपुर जाना था.. लेकिन अब बहुत देर हो चुकी है, इसलिए अब उतनुर वापस जाने के लिए रास्ता बताओ..!”
रमेशचं हे बोलणं ऐकताच भिमन्ना किंचित हसला आणि जवळच्या झाडाची पाने बाजूला केली. तो काय..?
त्या झाडामागे एक पाऊलवाट होती. एकावर एक असे तीन कळस असलेलं एक मंदिर ही तिथून दिसत होतं. लाकडी ओंडके व दगडी शिळांनी आदिवासी शैलीत बांधलेल्या त्या अनोख्या आकाराच्या मंदिराच्या शिखरावर लालभडक रंगाची त्रिकोणी पताका होती. बालमपुर गावातील काही झोपड्याही तिथून दिसत होत्या.
आम्ही एकदाचे बालमपुर गावात येऊन पोहोचलो होतो. आता आधी तिथल्या कर्जदारांना भेटून मग एखाद्या गावकऱ्यालाच सोबत घेऊया. म्हणजे परत जाताना त्रास होणार नाही.
तहानेनं जीव कासावीस झाला होता. कधी एकदा गावात जाऊन पोटभर पाणी पितोय असं झालं होतं. मी बालमपुरच्या दिशेनं मोटर सायकल वळवली.
भिमन्नाशी बोलण्यासाठी रमेश मात्र मागेच थांबला होता.
“कहो भिमन्ना..! बहुत दिन हुए, दिखाई नही दिए गांवमे..! कहां गए थे..?”
खिशातून तंबाखू काढून तळहातावर चोळत रमेश शेजारी उभा असलेल्या भिमन्नाला म्हणाला.
मात्र भिमन्नाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे रमेशने त्याच्याकडे वळून पाहिले तर त्याला तिथे कुणीच दिसले नाही. भिमन्ना कुठेतरी अंतर्धान पावला होता.
“साब.. रुक जाओ ! आगे मत जाना !”
रमेश जीवाच्या आकांताने ओरडला..
मी तसाच मागे आलो.
“क्या हुआ रमेश ? तुम इतने क्यों घबराए हुए हो ? और.. भिमन्ना कहां गया ?”
“वो.. वो.. वो भिमन्ना नही था !!”
थरथर कापत रमेश म्हणाला..
क्षणार्धात सारा प्रकार माझ्या ध्यानात आला. त्या झाडाची पाने बाजूला सारत मी बालमपुरच्या रस्त्याकडे पुन्हा बघितलं.. मघाशी दिसलेली पायवाट, ते आगळं वेगळं मंदिर, त्या झोपड्या.. सारं काही अदृश्य झालं होतं. गर्द झाडीशिवाय तिथे काहीच नव्हतं.
“घबराओ मत रमेश ! वो छलावा हमारा कुछ नही बिगाड़ सकता !”
वरकरणी रमेशला धीर देत असलो तरी आतून मी सुद्धा चांगलाच टरकलो होतो. चकवा आमच्या चिकाटीला कंटाळून आता आमनेसामने लढायला आला होता.
खिन्न मनाने आम्ही पूर्वीच्याच उलट दिशेने प्रवास पुन्हा सुरू केला. थोडं पुढे जातो न जातो, एवढ्यात अचानक मोटर सायकल बंद पडली. कदाचित गाडीतील पेट्रोल संपलं असावं. पेट्रोल टँकला कान लावत गाडी हलवून पाहिलं. काहीच आवाज ऐकू आला नाही. म्हणजे नक्कीच पेट्रोल संपलं होतं.
निमुटपणे गाडी हातात घेऊन पायवाटेने चालत पुढे निघालो. या चकव्याचा प्रभाव नक्की कधी संपणार ? मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शुक्राची चांदणी दिसेपर्यंत तर नाही ना ?
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, लेखक अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली हे विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने रानोमाळ भटकत असताना तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले “चकवाचांदण”. घुबडासारख्या अशुभ समजल्या जाणार्या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसेच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात “चकवाचांदण” या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
त्यांनी त्या पारध्याला विचारले, “चकवाचांदण” म्हणजे काय ? तो म्हणाला “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.”
चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. “चकवाचांदण” हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव “चकवाचांदण” असे ठेवले.
उतनुरच्या त्या जंगलात अस्वल, तरस, बिबट्या, चित्ता, अजगर अशा हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार होता. संध्याकाळनंतर तिथे थांबणं खूपच थोक्याचं होतं.
काहीही करून लवकरात लवकर जंगलाबाहेर पडणं अत्यंत जरुरीचं होतं.
गाडी बंद पडल्यामुळे आमचा प्रवासाचा वेग मंदावला होता. अशात एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला तर वेगाने पळ काढणेही शक्य नव्हते.
रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंतच आपल्या मेंदूचा कब्जा घेते. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो.
जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढ्या, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.
नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती.
काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठ्यावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात.
त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठ्यावरही शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली.
तेवढ्यात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोट्या मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या.
एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या.
पुढे “आकाशवाणी” वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’
याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.
मी व रमेश, आम्ही दोघेही अशाच कुठल्या झाडाच्या, वेलीच्या गंधजालात अडकलो होतो का ? तो रमेशच्या तोंडावर बसणारा वेलीचा फटका स्वसंरक्षणासाठीच होता काय ?
काही जाणकारांच्या मते अशा भूल पडणाऱ्या तीन प्रकारच्या वनस्पती आहेत. आदिवासी जिला “भुलनीदेवी” म्हणतात ती एक प्रकारची वनस्पती किनवट तालुक्यात आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडला किंवा फुलाचा सुगंध घेतल्यास भूल पडते ती “भूलनजडी” नावाची वनस्पती कोरपना ते राजुरा महामार्गावरील नदी शेजारील पायवाटेवर आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडल्यास ती त्या व्यक्तीला खाली पाडते अशी “भूतनी” नावाची वनस्पती पेटलावदच्या जंगलात तसेच निमाड भागात आढळते.
जंगलात भटकण्याची, गड किल्ले चढण्याची, ट्रेकिंग व अन्य साहसी प्रकारांची मनापासून आवड असल्याने माझं मनोधैर्य अद्याप तसं फारसं खचलं नव्हतं. उलट मला त्यात एक वेगळंच ॲडव्हेंचर दिसून येत होतं.
आम्ही खाली मान घालून चालतच होतो. इतक्यात..जंगलातील वातावरण हलके हलके बदलतं आहे असं जाणवू लागलं. पक्ष्यांचे कूजन पुन्हा कानावर पडू लागले. फळा फुलांचे सुगंधी वास पुन्हा दरवळू लागले. मघापासून प्रेतासारखे निर्जीव व भेसूर भासणारे जंगल आता पूर्वीसारखंच उल्हसित व चैतन्यपूर्ण वाटू लागले.
पुन्हा दूरवर एक मानवी आकृती दिसली. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. या आधीचा अनुभव आठवून आता पूर्ण सावधगिरी बाळगायचं मनोमन ठरवलं.
हुबेहूब यापूर्वी भेटलेल्या माणसा सारखाच दिसणारा तो आदिवासी आमच्याकडे हसत हसत पहात उभा होता. फक्त त्याच्या खांद्यावर घोंगडी व हातात काठी नव्हती. त्याऐवजी खांद्यावर एक कुऱ्हाड लटकत होती. किंचित वयस्कर वाटणाऱ्या त्या आदिवासीला रमेशने तेलगू मिश्रित गोंड भाषेत अभिवादन करून रस्ता चुकल्याचे सांगितले व उतनुरचा रस्ता विचारला.
त्या माणसाने सांगितले की पुढे जाऊन तुम्हाला दोन रस्ते दिसतील. त्यातील डाव्या रस्त्याने न जाता उजव्या रस्त्याने जा. डावा रस्ता “जुन्या बालमपुर” गावाकडे जातो तर उजवा रस्ता दंतनपल्ली गावाजवळ निघेल.
रमेशने त्या आदिवासीचा हात धरून ठेवला. आणि मला खरोखरीच पुढे दोन रस्ते आहेत का.. हे पाहण्यासाठी पुढे पाठविले.
पुढे खरोखरीच दोन पायवाटा होत्या. त्या आदिवासीचे आभार मानून त्याचे नाव विचारले तेंव्हा तो नमस्कार करत हसून म्हणाला.. “देवू.. देवन्ना !”
आम्ही पायीच पुढे चालू लागलो तेंव्हा तो म्हणाला.. “गाडी पर बैठो, साब..!”
गाडीतील पेट्रोल संपल्याचं सांगितल्यावर त्याने गाडी धरून जोरात हलवली तेंव्हा टाकीतील पेट्रोलचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू आला.
आश्चर्य वाटून गाडीला किक मारली आणि पहिल्याच किक मध्ये गाडी सुरू झाली. आमचे चेहरे आनंदाने फुलले. त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानीत आम्ही उजव्या रस्त्याने निघालो. थोडं दूर आल्यावर मागे वळून पाहिलं तर “देवू” अजूनही आम्हाला हात हलवून निरोप देत उभा होता.
जाताना सहज डाव्या बाजूच्या पायवाटेकडे नजर गेली. ती पायवाट एक प्रचंड मोठ्या तलावाला जाऊन मिळाली होती. त्या विस्तीर्ण जलाशयात एक मंदिर पूर्णपणे बुडालेले दिसत होते. फक्त त्या मंदिराचे एकावर एक तीन कळस असलेले शिखर तेवढे पाण्याच्या वर होते. मंदिराच्या शिखरावर लालभडक त्रिकोणी पताका फडकत होती.
सुमारे चार किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही दंतनपल्ली गावाजवळ पोहोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. तिथून मग अर्ध्या तासात ऊतनुरला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी बिरसाईपेटचे गावकरी बँकेत आले असता त्यांना आदल्या दिवशीचा अनुभव कथन केला तेंव्हा त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून तर आम्ही आश्चर्याने फुटभर उंच उडालोच.
सुमारे दोन वर्षांपूर्वी बालमपुर गावाजवळ छोटेसे धरण बांधण्यात आले. त्यामुळे बालमपुर गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मात्र काही आदिवासी गावकऱ्यांनी गाव सोडण्यास नकार दिला. संपूर्ण गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार असल्याने धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पाणी सोडण्यापूर्वी वन खात्याने व पाटबंधारे खात्याने संयुक्त मोहीम राबवून या हट्टी गावकऱ्यांना बळजबरीने पकडून दहा किलोमीटर दूर अंतरावर उभारलेल्या निर्वासितांच्या छावणीत स्थलांतरित केले.
मात्र काही जिद्दी आदिवासी गावकरी संध्याकाळ होताच तेथून निसटले आणि पायी चालत बालमपुरला येऊन आपापल्या झोपड्यांमध्ये जाऊन झोपले. रात्री बारा नंतर धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. या पाण्यात बालमपुर गाव पूर्णपणे बुडाले. आदल्या रात्री झोपड्यांमध्ये येऊन झोपलेले तेवीस आदिवासी झोपेतच बुडून मरण पावले.
दुसऱ्या दिवशी ही बातमी समजताच प्रशासनात एकच हडकंप माजला. पत्रकारांवर व अन्य प्रसिद्धी माध्यमांवर वरून दबाव आणून बातमी दडपण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना भरपूर नुकसान भरपाई देऊन त्यांची तोंडे बंद करण्यात आली.
मात्र त्या दिवसापासून बालमपुर गावाच्या आसपासच्या परिसरात, जंगलात लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले. तलावात मृत झालेल्या व्यक्ती लोकांना दिसायच्या. काही दुष्ट मृतात्मे त्या जंगलात शिरणाऱ्या लोकांना तलावाजवळ नेऊन त्यांना बुडवून त्यांचा जीव घेऊ लागले. तर काही सत्प्रवृत्त मृतात्मे या दुष्ट मृतात्म्यांपासून लोकांचे रक्षण करून त्यांना मदतही करीत असत.
आम्हाला देवासारखा भेटलेला “देवन्ना” हा असाच एक सत्प्रवृत्त मृतात्मा असावा. भिमन्ना हा बिरसाईपेट जवळ राहणारा गुराखी सहा महिन्यांपूर्वी बालमपुरच्या तलावात बुडून मरण पावला होता. कदाचित तोच दुष्ट मृतात्मा बनून आम्हाला भेटला असावा.
माझ्या काही मित्रांच्या मते मला त्या दिवशी जे जे अनुभव आले त्या सर्वांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येते. उदा. आम्हाला जंगलात जे कुजबुजण्याचे, हसण्याचे, विकट हास्याचे आवाज ऐकू आले ते दाट जंगलात जोरदार वाहणारा वारा कोंडला गेला की येऊ शकतात. याशिवाय मनाचे खेळ, भास, आजूबाजूला असलेल्या एखाद्या विषारी वनस्पतीने उत्सर्जित केलेल्या वायूचा परिणाम (हॅल्युसिनॅशन) असं सुद्धा असू शकतं.
हवेच्या दाबामुळे, वातावरणातील, हवेतील अतिउष्णता वा अतिशीतलता यामुळे, प्रकाशाच्या परावर्तन व अपवर्तन (reflection & refraction) हयामुळे सुद्धा अनेक प्रकारचे भास होतात. आकाशातील ताऱ्यांचे लुकलुकणे, पाण्याने भरलेल्या ग्लासात ठेवलेला चमचा तुटलेला दिसणे, पाण्याची खोली आहे त्यापेक्षा खूप कमी भासणे, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य हे सारे एकप्रकारचे दृष्टीभ्रम किंवा आभासच असून प्रकाशाच्या अपवर्तनाचे (refraction) परिणाम आहेत. वाळवंटातील मृगजळ (Mirage), हे ही याचेच उदाहरण.
वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तींना बरेचदा दूर अंतरावर हिरवळीचा प्रदेश (oasis) असल्याचा भ्रम होतो. कारण त्यांचा मेंदू तशी कल्पना करून तसा आभास निर्माण करतो. हिमालय, अंटार्क्टिका या सारख्या अतिथंड बर्फाळ प्रदेशात सैनिकांना, संशोधकांना अत्याधिक थंडीमुळे विविध प्रकारचे आभास होतात.
आणि दिशाभूल ही तर कुठेही होऊ शकते. वाळवंटात, महासागरात, पर्वतराजीत, उजाड माळरानात किंवा दाट जंगलात दिशा भरकटल्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण गजबजलेल्या शहरातही आपण अनोळखी गल्लीबोळातून जाताना अनेकदा रस्ता, दिशा चुकतो. भलत्याच दिशेने बाहेर निघतो. ही देखील एक प्रकारची दिशाभूलच असते. अनेकदा दुपारच्या झोपेतून उठल्यावर आपल्याला सकाळ झाल्याचा भास होतो हा ही एक प्रकारचा कालभ्रम असतो.
ज्याला आपण “चकवा” म्हणतो तो कदाचित एखादा स्थलकालाचा अपघात असू शकेल. वेळ आणि काल यांच्यातला परस्पर संबंध अजूनही आजच्या विज्ञानाला नीटसा उमजलेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कागदावर काही अंतरावर दोन ठिपके काढले तर त्यांना जोडणारी सरळ रेषा हाच सर्वात जवळचा मार्ग असू शकतो. पण त्याच कागदाची घडी घातली तर त्या दोन बिंदूमध्ये अजूनही जवळचा मार्ग निर्माण होऊ शकतो.
किंवा एखाद्या रबरी फुग्यावर दोन्ही बाजूंना दोन बिंदू रेखाटले तर फुग्याच्या बाहेरून वळसा घालत जाणारी रेषा हा जवळचा ज्ञात मार्ग असू शकतो, पण फुग्याच्या आतमधून दोन बिंदू जोडणारा मार्ग सर्वात जवळचा असेल. फक्त त्याची कल्पना यायला हवी. मानव त्रिमिती मध्ये जगतो म्हणून त्याला कदाचित याचं आकलन होऊ शकेल, पण मुंगीसारखा प्राणी जो द्विमिती मध्ये जगतो त्याला याची कल्पनाच येऊ शकणार नाही.
*विश्वात अजूनही असे काही मार्ग असतील ज्यांची आपल्याला जाणीव होत नाही किंवा आपल्याकडे त्याची जाणीव करून देणारी सक्षम ज्ञानेंद्रिये नाहीत.* किंवा हे अनुभव इतके प्रखर असतील कि ज्याची जाणीव मेंदू आपल्याला होऊ देत नाही. मग हे अनुभव एखाद्या फिल्टर झालेल्या गोष्टींसारखे निरुपद्रवी रूपात आपल्याला सामोरे येत असतील.
कारण समोरच्या गोष्टीचं नीट आकलन होत नसेल तर मेंदू त्याला सर्वात जवळचं रूप देतो आणि त्याच स्वरूपात ती आपल्याला दिसते किंवा दाखवली जाते. पण दरवेळी ती तशीच असेल असं नाही. एखाद्या स्थलकालाच्या क्वचित घडणाऱ्या आणि क्षणिक टिकणाऱ्या अपघाताचा कोणीतरी साक्षीदार होत असेल आणि तो त्याला “चकवा” या निरुपद्रवी रूपात जाणवत असेल किंवा जाणवून दिला जात असेल.
बालमपुरच्या जंगलातील त्या दिवशीच्या दुपारी आम्हाला आलेला अनुभव एवढेच सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे कोणतेही शास्त्रीय, वैज्ञानिक वा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण दिलेच जाऊ शकत नाही.
अजूनही दैनंदिन जीवनात जेंव्हा जेंव्हा सुष्ट व दुष्ट प्रवृत्तीची माणसे एकाच वेळी भेटतात तेंव्हा तेंव्हा बालमपुरच्या जंगलात भेटलेल्या देवन्ना व भिमन्ना यांची आठवण आल्याखेरीज रहात नाही.
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.
Online Shopping on Amazon
smartphone summer sale
Wall Clocks
Nilkamal cupboard
wooden sofa set
Order any items above by clicking on respective images
Or click on the link shown here to see all items in furniture
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
रानभूल…* (३ )
अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action), हालचाल होते.
… हा वेलीचा रमेशवरील हल्ला म्हणजे अशीच प्रतिक्षिप्त क्रिया तर नाही ना ?
काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग!
…आम्हालाही असाच स्मृतिभ्रंश तर झालेला नाही ना ? कारण योग्य दिशा न सापडल्यामुळे आम्हीही फिरून फिरून त्याच जागी येत होतो.
पण नाही..! ज्याअर्थी मला सारं काही व्यवस्थित आठवत होतं त्याअर्थी माझी स्मरणशक्ती जागृत होती. माझी तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विनोदबुद्धी ही अद्याप शाबूत होती. वास्तवाचं पुरेपूर भानही मला होतं. पण.. पण या व्यतिरिक्त इथे असं काहीतरी होतं की जे माझ्या बुद्धीच्या आकलन कक्षेबाहेरचं होतं.
हा निसर्गाचा भोवरा, हे मायावी अरण्याचं दुष्टचक्र कधी संपणार..? असा सचिंत मनाने विचार करीत असतानाच जंगलातील वातावरण ढवळल्यासारखं होऊन जोरदार वारे वाहू लागले. जवळच्या झाडीतून कुणाच्या तरी दबक्या आवाजातील हसण्याचा व कुजबुज करण्याचा आवाजही कानी पडला. बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा जरी समजत नसली तरी ऐकू येणाऱ्या विविध प्रकारच्या आवाजांवरून तो किमान सहा सात माणसांचा घोळका असावा.
आतापर्यंत अतिशय शांत, स्तब्ध, नीरव असलेल्या त्या जंगलात कोणतीही चाहूल न लागू देता अचानक एवढी सारी माणसे कुठून आली..? असा प्रश्न पडून भीती वाटण्याऐवजी उलट या जंगलात आम्हाला कुणीतरी सोबतीला आलं आहे याचा आनंदच झाला. या व्यक्तींना जंगलातील सर्व रस्त्यांची खडानखडा माहिती असेल आणि त्यांच्या मदतीने या जंतरमंतर मधून आता नक्कीच बाहेर पडू या विचाराने आम्ही सुखावलो.
बराच वेळ झाला तरी त्या हसत गप्पा करणाऱ्या व्यक्ती जंगलातून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हत्या. शेवटी कंटाळून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मोठ्याने ओरडून आवाज देत टाळ्याही वाजवल्या. थोडा वेळ तो आवाज एकदम शांत झाला. त्यापाठोपाठ वाहता वाराही लगेच थांबला. पण मग आमच्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत पुन्हा त्यांचं हसणं खिदळणं पूर्ववत सुरू झालं. वाराही पूर्वीसारखा अनिर्बंध वाहू लागला.
ती माणसं जंगलातून परस्पर निघून गेली तर या चकव्यातून बाहेर पडण्याची आलेली संधी आपण गमावून बसू या धास्तीने उतावीळ होऊन मी त्यांना गाठण्यासाठी झाडीत शिरण्यासाठी पुढे सरसावलो.. तोच.. रमेशने माझा हात धरून “थांबा..!” अशी खूण केली. मी भिवया उंचावत चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याच्याकडे पाहिलं, तेंव्हा तो हलकेच पुटपुटला..
“साब.. यहीं *छलावा* है !”
रमेशचे हे शब्द ऐकताच मी विंचू चावल्यागत झटकन झाडीत घातलेला पाय मागे घेतला.
रमेशने इतक्या हळू आवाजात बोललेलं त्या दूर झाडीतील चकव्याला कसं काय ऐकू गेलं कोण जाणे..! पण त्या नंतर तो आवाज एकाएकी एकदम लुप्त झाला. वाहता वाराही अचानक थंड झाल्यामुळे जंगलात स्मशान शांतता पसरली. आम्ही बराच वेळ त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत उभे होतो. पण पुन्हा काही तो आवाज ऐकू आला नाही.
कदाचित तो चकवाही.. आता आम्ही काय करतो..? याची गंमत पहात आमच्या अगदी जवळच उभा असावा. कारण थोडा वेळ कानोसा घेऊन जेंव्हा आम्ही तिथून आपल्या वाटेने पुढे जायला निघालो तेंव्हा त्या झाडीतून विकट हास्याचा एक कल्लोळ उठला. जणू काय..”कसं फसवलं..!” असंच चिडवित तो आम्हाला हसत असावा. पुन्हा सुरू झालेल्या बेभान वाऱ्यासंगे तो गडगडाटी अट्टाहास ध्वनी जंगलभर घुमत असतानाच मी गाडीचा वेग वाढवला.
थोडं पुढे आल्यावर रमेश म्हणाला..
“जब तक हम इस रास्ते पर है, तब तक सेफ है ! उस छलावेका इरादा हमे किसी तरह जंगल के अंदर बुलाकर, दूर खींच के ले जाने का है ! अगर हम गलती से भी रास्ता छोड़कर जंगल के अंदर गए तो बहुत बुरे फंस जाएंगे !”
रमेशचे हे बोलणे ऐकतांच कॉलेजातील मित्राने एकदा सांगितलेला चकव्या संबंधीचा असाच एक किस्सा आठवला.
या मित्राच्या गावाकडील शेतात काम करणारा एक तरणाबांड मजूर दुपारी रानाजवळील वाटेने शेतात जात असताना बाजूच्या झुडुपात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला काहीच दिसले नाही. तो थोडा पुढे आल्यावर पुन्हा त्याला तसाच आवाज ऐकू आला. यावेळीही त्याला त्या झुडुपात काहीच दिसलं नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा जेंव्हा तसा आवाज आला तेंव्हा त्याने चिडून त्या दिशेने एक मोठा दगड भिरकावला, तेंव्हा एक गलेलठ्ठ रानकोंबडी पंख फडफडवित रानाच्या दिशेने पळाली.
रान कोंबडी पाहून मजुराला तिला पकडण्याचा मोह झाला आणि तिच्या मागे धावत तो खूप खोल रानात गेला. रानकोंबडी तर त्याला गुंगारा देऊन कुठेतरी गडप झाली पण तो मजूर मात्र त्या रानात अडकला. फिर फिर फिरला, पण रानातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला सापडेना. असा चार पाच तास भटकल्यानंतर संध्याकाळी तो गावापासून दहा किलोमीटर दूर तालुक्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली होती. आपल्याला कुठे जायचे आहे याची त्याला शुद्धच नव्हती. गावकऱ्यांनी त्याला कसेबसे घरी आणल्यानंतर बरेच दिवस तो संभ्रमित, अस्थिर मानसिक अवस्थेत होता.
…आम्हीही मघाशी उताविळपणे त्या हसण्याच्या आवाजाच्या दिशेने खोल जंगलात शिरलो असतो तर आमची अवस्था काय झाली असती या नुसत्या कल्पनेनेच मला कापरं भरलं.
जंगलातील ओबड धोबड पायवाटेवरून खडखड असा आवाज करीत हळूहळू पुढे जाणाऱ्या मोटर सायकल वरून आमचा अर्थहीन व अंतहीन प्रवास सुरूच होता.
एवढ्यात.. तोच चिरपरिचित नदीच्या पाण्याचा खळखळाट पुन्हा ऐकू आला. समोर पाहिलं तर तोच नदीकाठचा मोठा दगड, तीच मोडून नदीत आडवी पडलेली झाडे, फुटभर खोल स्वच्छ पाण्यात चमकणारे तेच दगड वाळू गोटे आणि एखाद्या भयनाट्यातील मायावी चेटकिणी प्रमाणे भासणारी तीच तीस चाळीस फुटाच्या उथळ पात्राची खळखळ वाहणारी गूढ रहस्यमय नदी..
“रमेश, क्या नाम है इस नदी का..?”
या नदीचं नक्कीच निर्दया, भीषणा, भेसूरा, कर्कशा, कठोरा, निष्ठूरा, आक्रोशा, रुद्रा, डाकिणी, पिशाचीणी असं काहीतरी भीतीदायक नाव असलं पाहिजे, असा मनाशी विचार करीत रमेशला विचारलं..
“ये नदी आगे जा कर “प्राणहिता नदी” को मिल जाती है इस लिये इस नदी को भी सब लोग *प्राणहिता* ही कहते है..!”
रमेशचं हे उत्तर ऐकून हसू आलं. एखाद्या निर्दयी कसायाचं नाव दीनदयाळ असावं.. तसंच होतं हे ! खरं तर “प्राणहिता” ऐवजी या नदीचं नाव “प्राणहरा” किंवा “प्राणहंता” असंच असायला हवं होतं..!
हतबुद्ध होऊन नाईलाजाने नदीकाठच्या त्या मोठ्या दगडावर बसून क्षणभराची विश्रांती घेताना आणखी किती वेळा ही नदी आपल्याला पुन्हा पुन्हा आडवी येणार आहे असाच विचार राहून राहून मनात येत होता.
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.
Online Shopping on Amazon
smartphone summer sale
Wall Clocks
Nilkamal cupboard
wooden sofa set
Order any items above by clicking on respective images
Or click on the link shown here to see all items in furniture