श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
रानभूल…* (२)नदीच्या बाहेर पडल्यावर पुढे जाताना थोड्या थोड्या वेळाने सारखा मागे वळून पहात होतो. आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कसे जाऊन पोहोचतो आहोत..? हा चकवा तर नाही ना ?चकव्याचा विचार मनात येताच भीतीने अंग शहारलं. लहानपणापासून ऐकलेल्या चकव्याबद्दलच्या अनेक गूढ कथा, कहाण्या आठवल्या. चकवा हा कोणत्याही वस्तूचे, माणसाचे, पक्ष्याचे, प्राण्याचे रूप घेऊ शकतो, हे ही ऐकल्याचं आठवलं. पण.. आम्हाला तर अजूनपर्यंत एकही माणूस, पक्षी किंवा प्राणी भेटला नव्हता..!चकवा कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूचे रूप घेऊ शकतो.. म्हणजे मग आम्हाला पुन्हा पुन्हा दिसणारे ते वृक्ष.. तो कोवळा पाच फुटी साग.. ते तिरपे हिरड्याचे झाड.. ही सारी चकव्याने घेतलेली रूपे तर नाहीत..? अगदी ती पुन्हा पुन्हा दिसणारी गूढ, भयावह नदी म्हणजे सुद्धा चकव्याचे छद्मरूप असू शकते.किंवा.. मी मघापासून ज्याच्याशी बोलतो आहे तो बँकेचा प्यून.. रमेश.. तो सुद्धा खरा आहे की चकव्याने घेतलेले रूप आहे..?मी मोटर सायकल थांबवून रमेशकडे निरखून बघितले.“..तुम.. रमेश ही हो नं.. ?”
गोंधळलेल्या रमेशकडे अविश्वासपूर्ण नजरेने पहात थरथरत्या घोगऱ्या आवाजात मी विचारलं..
” ऐसा क्यूँ पूछ रहे हो साब..! और.. ऐसा घूर घूर के मत देखो साब मेरी तरफ.. डर लगता है..!”अगोदरच भीतीने गारठून गेलेला रमेश खाली नजर वळवित म्हणाला. त्याला माझ्या संशयी नजरेची भीती वाटत असावी.. की.. त्यालाही माझ्यासारखीच भीती वाटते आहे.. म्हणजे उलट तो मलाच तर चकवा समजत नाहीय ना..?
…तसं असेल तर आधी रमेशची भीती घालवणं अत्यंत जरुरीचं होतं. कारण या भयावह, एकाकी जंगलात आता आम्हाला एकमेकांचाच आधार होता.
रमेशचा हात धरून आश्वासक शब्दात त्याला म्हणालो..“देखो रमेश.. हम इस जंगल की भूलभुलैया में अटक गए है.. यहां से कैसे बाहर निकला जाएं.. तुम्हे कुछ सूझ रहा है..?”“साब.. मुझे पूरा यकीन है, ये *छलावा* ही है..!”अत्याधिक अनामिक भयाने स्तब्ध होऊन थिजलेल्या आवाजात एक एक शब्द संथपणे उच्चारीत रमेश म्हणाला.“छलावा..?.. वो क्या होता है..?”मी हा शब्द नव्यानेच ऐकत होतो..“यहां के गोंड आदिवासी उसे *साडतीन* कहते है.. कुछ आदिवासी उसे *भूलनी* भी कहते है.. इसे लोगों को सताने में, भटका कर परेशान करने में मजा आता है..”मी ओळखलं.. रमेश चकव्याबद्दलच बोलत होता.चकव्याला मराठीत “रानभूल” ही म्हणतात. ग्रामीण भाषेत त्याला “बाहेरची बाधा” म्हणतात तर काही ठिकाणी त्याला “झोटिंग” असे ही म्हणतात.पूर्वी माणसं फारसा प्रवास करीत नसत. आतासारखी दळणवळणाची साधनं तेव्हा नव्हती. बिकट वाटा आणि अनवट वळणांवरून प्रवास करावा लागायचा. म्हणून माणसं फारसा प्रवास करीतच नसत. काही माणसं तर आयुष्यभर बाहेर गेलेली नसत. अशाकाळी कुणी प्रवासाला निघाला तर त्याच्यावर बरंच दडपण येत असे. दऱ्या, डोंगर, झाडी, वाटमारी याला माणसं सतत घाबरत. मनावर ताण घेऊन केलेल्या प्रवासात माणसं बऱ्याचदा वाट चुकत. आडरानात फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत. दिशांचे ज्ञान विस्मृत झाल्यामुळे दिशाभूल होत असे. याला रानभूल म्हणत. त्यालाच आपण चकवाही म्हणतो.जे लोक चकव्याला एक प्रकारचे “भूत” मानतात त्यांचा असा समज आहे की हे भूत माणसाला *ऐन मध्यान्ही* चकविते.आम्ही देखील ऐन मध्यान्हीच या चकव्याच्या तावडीत सापडलो होतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही होती की, चकवा हा तसा निरुपद्रवी असतो.. थोडा वेळ भटकवून मग सोडून देतो.. हे वाचून, ऐकून माहिती होतं त्यामुळे जीवावर बेतण्यासारखा काही धोका नव्हता.चकव्याच्या नादी लागून व्यर्थ जंगलात गोल गोल फिरण्याऐवजी एका ठिकाणी शांत बसून डबे खाऊन घ्यावेत असा विचार करून जवळच एका झाडाखाली बसलो. त्या दाट घनघोर जंगलात डब्यातील अन्नाचा एकेक घास खाताना चारी दिशांना मान वळवून भोवतालच्या वृक्ष वेलींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो. मधेच मान वर करून उंच उंच झाडांच्या शेंड्यांची न दिसणारी टोकं बघण्याचा प्रयत्न करीत होतो. मघाशी सुंदर, रमणीय वाटणारं हे जंगल आता दुष्ट, क्रूर आणि अक्राळविक्राळ भासत होतं.खूप भूक लागली असूनही भीतीमुळे घास घशाखाली उतरत नव्हता. आता पुढे काय होणार..? आपण ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडणार..? जर आपल्याला वाट सापडलीच नाही आणि रात्र जंगलातच काढावी लागली तर..? आपण ज्याला निरुपद्रवी चकवा समजतो आहोत, तो चकवा नसून दुसरा काहीतरी भयंकर प्रकार असेल तर..?एका मागोमाग एक असे अनेक विपरीत, अनिष्ट, अशुभ विचार मनात येत होते.. विविध शंका कुशंका मनात दाटून येत होत्या. भीतीमुळे घशाला कोरड पडली होती. डबे खाऊन झाले होते. आता तहान लागली होती. आम्ही प्यायचं पाणी सोबत आणलं नव्हतं.रमेश मध्येच उठून दोन तीन वेळा लघवी करून आला. तसेच पायात चप्पल घालताना त्याचा उजवा की डावा असा गोंधळ होत होता.“क्या बात है रमेश..? बार बार चप्पल का पांव बदल रहे हो..! और.. हमने कितनी देर से एक घूंट भी पानी नहीं पिया, फिर भी तुम्हे बार बार पेशाब कैसे आ रही है..?”शेवटी न राहवून विचारलंच…“सुना है, इस छलावेसे बाहर निकलना हो तो तुरंत पेशाब के लिए बैठ जाना चाहिए ! साथ ही में जूता चप्पल का पांव भी अदला बदली करना चाहिए ! ऐसा करने से छलावे का जादू खत्म हो जाता है !”रमेशच्या उत्तरामुळे त्याच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला.“चलो फिर.. निकल पडते है..! और एक बार ट्राय कर के देखेंगे..! हो सकता है के तुम्हारा नुस्खा काम कर गया हो और शायद अब की बार हमे रास्ता मिल भी जाये..”असं म्हणत आम्ही उठलो आणि उसनं अवसान आणून एकमेकांकडे पाहून केविलवाणं हसत मोटर सायकलवर बसून जंगलातल्या पायवाटेने पुढे निघालो.जाताना वाटेतली सारी झाडं झुडुपं, वृक्ष वेली, खाच खळगे, शिळा, वारुळं ओळखीची वाटत होती. तेच ते स्वप्न आपण वारंवार पहात आहोत असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्याचा उबग येऊन आजूबाजूला पाहणं सोडून दिलं आणि नाकासमोर पहात गाडी चालवू लागलो.*”रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव असतो..”*असं काहीसं एका लेखात वाचल्याचं मला स्मरत होतं. त्या लेखात पुढे असं ही म्हटलं होतं की..“जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते. ठरावीक परिसरातच ती आढळते.रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे.जंगलातल्या काही जागा पवित्र, मंगलमय वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात.”….हे सारं आठवत गाडी चालवता चालवता किती वेळ गेला ते कळलंही नाही.अचानक मागे बसलेल्या रमेशच्या तोंडावर पूर्वी दोनदा बसला होता अगदी तस्साच एका रानवेलीचा जोरदार फटका बसला आणि तो वेदनेनं कळवळला.मी गाडी थांबवली. तीच जागा.. तीच वेल.. आणि तेच त्या झाडाखाली रचलेले मोहाच्या फळाफुलांचे ढीग..मोटर सायकल वर पुढे बसलेल्या मला टाळून दरवेळी नेमका मागे बसलेल्या रमेशच्या चेहऱ्यावरच या वेलीचा आघात कसा काय होतो ? हा नेम धरून हल्ला करण्याचा प्रकार तर नाही ना ?(क्रमशः)
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*रानभूल..*..(१)
अधिकारी पदावरील पदोन्नती नंतर पहिलीच पोस्टिंग तेलंगणा (पूर्वीचा आंध्र प्रदेश) राज्यातील आदिलाबाद ह्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या उतनूर नावाच्या अतिदुर्गम गावात झाली, तेंव्हाची ही गोष्ट..
फिल्ड ऑफिसर पदाचा कार्यभार दिला असल्यामुळे कर्जवसुलीसाठी नेहमीच आसपासच्या छोट्या छोट्या गावांत, गावाबाहेरील वस्त्यांत, शेतातील वाड्यांमध्ये जावं लागायचं. सर्वत्र साग, अर्जुन, हिरडा, बेहडा, चिंच, आवळा व मोह वृक्षांची दाट झाडी असलेला उंच सखल डोंगर पर्वतांच्या रांगांचा हा अवघड वाटा वळणांचा प्रदेश होता.
विशाल आकाराची पाने असलेल्या अती उंच साग वृक्षांच्या सावल्यांमुळे दुपारी चार पासूनच जंगलातील अरुंद पायवाटांच्या रस्त्यावर अंधार पडायला सुरवात व्हायची. त्यामुळे कर्जवसुली व अन्य कामांसाठी निघताना सकाळी लवकर निघून शक्यतो दुपारी तीन पर्यंत उतनुरला परत यायचो.
उतनुरच्या चोहिकडील सुमारे पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील सुदूर जंगलात वसलेली प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेली छोटी छोटी गावे हे आमच्या बँकेच्या शाखेचे कार्यक्षेत्र होते.
त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच सकाळी आठ वाजता नाश्ता करून घरातून निघालो. रमेश नावाच्या बँकेच्या तरुण चपराशालाही सोबत घेतले होते. स्थानिक तेलगू भाषेसोबतच मोडकी तोडकी हिंदी व अर्धवट मराठीही त्याला बोलता येत असे.
उतनुरच्या दक्षिणेकडील जन्नारम रस्त्यावरील बिरसाई-पेट व भू-पेट या दोन गावांना आज भेट द्यायची होती. वाटेतील आठ किलोमीटर अंतरावरील दंतनपल्ली गावाजवळील झोपडीवजा टपरीवर थांबून चहा घेतला, रस्त्याच्या कडेला असलेल्या एक दोन कर्जदार दुकानदारांकडून कर्जाचे हप्ते वसूल केले आणि चार किलोमीटर पुढे असलेल्या बिरसाईपेटकडे निघालो.
रस्त्याला लागूनच असलेल्या बिरसाईपेट गावात भरपूर कर्जवसुली झाली. गावात लवकर पोहोचल्यामुळे बहुतेक सर्व कर्जदार घरीच भेटले. सर्वांच्या घरी जाऊन पीक कर्ज नविनीकरण व अन्य कर्जाबद्दल हिंदी व मराठीतून माहिती दिली. तेथील बऱ्याच गावकऱ्यांना हिंदी प्रमाणेच थोडी थोडी मराठीही समजत असे. ज्यांना फक्त तेलगू भाषा समजायची त्यांच्यासाठी रमेश दुभाषी म्हणून काम करीत असे.
अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळेत बिरसाईपेट मधील सर्व कामं आटोपल्यामुळे त्या उत्साहातच तेथून डावीकडे चार किलोमीटर आत जंगलात असलेल्या भूपेट गावाकडे निघालो. या गावात फक्त पंधरा वीसच जुने थकीत कर्जदार रहात होते. त्या सर्वांची घरे रमेशला ठाऊक होती.
तो दिवस आमच्या दृष्टीने खूपच चांगला होता, कारण भूपेट गावातही बरीच वसुली झाली. नुकतेच तेथील शेतकऱ्यांकडे पीक विक्रीचे पैसे आले होते. आम्ही त्यांच्याकडे वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अगदी सहजपणे कर्ज हप्त्याची रक्कम आमच्या हातात ठेवली. एक दोन खूप जुन्या थकीत कर्जदारांनी सुद्धा कर्जाची बाकी चुकविल्यामुळे आम्ही खूपच आनंदात होतो.
दाट जंगलातील भूपेट गावच्या अवघड पायवाटेच्या रस्त्याने अतिशय काळजीपूर्वक मोटसायकल चालवीत आम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा बिरससाईपेट गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो. आमचं आजचं नियोजित सर्व काम खूप लवकर आटोपलं होतं. बँकेतही परत जाऊनही आज काही विशेष करण्याजोगं काम नव्हतं. मग आता एवढ्या लवकर उतनुरला परत जाऊन काय करायचं ? असा मनाशी विचार करीतच होतो, तेवढ्यात रमेश म्हणाला..
“साब, रस्ते के दाहिनी ओर के जंगलमें चार किलोमीटर अंदर बालमपुर गांव है.. वहां हमारे दो बहुत पुराने बडी रकम के डिफॉल्टर बॉरोअर रहते है.. मैं कुछ साल पहले वहां गया था.. बहुतही सुंदर जंगल का रास्ता है.. रास्ते में कई झरने, तालाब है.. एक नदी भी क्रॉस करनी पड़ती है.. अगर आप चाहो तो हम अभी वहां जाकर चार बजे के पहले वापस आ सकते है..!”
रमेशची ही सूचना मला लगेच पटली. बालमपुर गावातील त्या दोन जुन्या मोठ्या थकीत कर्जदारांबद्दल मला माहिती होती. आजचा दिवस शुभ होता. योगायोगाने जर त्या दोन जुन्या कर्जदारांकडूनही कर्ज वसुली झाली असती तर ती आमच्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट ठरली असती.
आम्ही दुपारच्या जेवणाचे डबे सोबत आणले होते. ते भूपेट गावात खाऊन मग ऊतनुरला परतायचे, असे पूर्वी ठरले होते. पण आता बालमपुरला जाऊनच जेवण करायचे असे ठरवले आणि मोटर सायकल उजव्या बाजूच्या जंगलातील उतारावरील पायवाटेकडे वळवली.
रमेशने म्हटल्याप्रमाणे हे जंगल खरोखरीच खूप रमणीय होते. खूप वेगळ्या जातीची सुंदर रानफुले पायवाटेच्या दोन्हीकडे फुललेली होती. जंगलातील वृक्षही जरा वेगळे, मंद, मोहक, सुवासिक असे भासत होते.
जवळच कुठेतरी एखादा लहानसा ओढा किंवा झरा वाहत असावा. त्याचा हलकासा मंद खळखळाट पैंजण घातलेल्या नर्तिकेच्या पदरवासारखा मधुर, मंजुळ भासत होता. मधूनच एखाद्या पक्ष्याने सुरेल शीळ वाजवत घातलेली साद व त्याला अन्य पक्ष्यांनी नाजूक चिवचिवाट करीत दिलेला तितकाच गोड प्रतिसाद एक वेगळीच अनुभूती देऊन जात होता.
आवळा, चिंचा, बोरं तसेच अन्य जंगली फळझाडांच्या पिकलेल्या फळांचा सुवास सर्वत्र दरवळत होता. जागोजागी मोहाच्या फुला व फळांचा सडा पडलेला दिसत होता. त्यांचा मादक गंधही वातावरणात भरून राहिलेला होता. बाहेरचे कडक ऊन जंगलातील हिरव्यागार वनश्रीेत सुखद, उबदार भासत होते.
ही जंगलातील बालमपुरच्या दिशेने जाणारी पायवाट पालापाचोळ्याने झाकून गेली होती. बहुदा ह्या रस्त्यावर फारशी वहिवाट नसावी. जंगलातील आसपासचा परिसर कुतूहलाने न्याहाळीत अतिशय संथ गतीने व निःशब्दपणे आमचा प्रवास सुरु होता.
वाटेत अनेक मोठे खड्डे, खाच खळगे लागले. अशावेळी गाडीवरून खाली उतरून गाडी ढकलत पुढे न्यावी लागायची. काही छोटे मोठे स्वच्छ पाण्याचे उथळ नालेही लागले. ते मात्र मोटर सायकलवर बसूनच ओलांडले.
आम्ही जसे जसे जंगलाच्या आत आत खोल जात होतो तसे तसे ते जंगल अधिकाधिक निबीड, दाट होत चालले होते. मोठ्या आकाराच्या दाट पानांमुळे फार कमी सूर्यप्रकाश आत पोहोचू शकत होता. झाडांना लटकुन खालपर्यंत आलेल्या जंगली रानवेली चेहऱ्याला चाटून जात होत्या. कमी, अंधुक प्रकाश व झाडांच्या लांब लांब सावल्यांमुळे संध्याकाळ झाल्याचा भास होत होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चार पाच फूट उंचीची मोठी मोठी वारुळे होती. कोणत्याही क्षणी त्यातून फणा काढलेला नाग बाहेर येईल अशी भीती वाटत होती. एवढंच नव्हे तर पायवाटेवरील पालापाचोळ्याच्या खालीही एखादं जनावर असू शकेल असं वाटत होतं.
असा बराच वेळ त्या अनोळखी रस्त्याने प्रवास झाल्यावर पाठीमागे बसलेल्या रमेशला विचारलं..
“क्या टाईम हुआ होगा..?”
“एक बज कर बीस मिनट..!”
मनगटावरील घड्याळाकडे पहात रमेश उत्तरला.
“ठहरो साब.. ठहरो !”
अचानक काहीतरी आठवल्यासारखं करीत रमेश म्हणाला..
“कुछ तो गड़बड़ है..! पिछली बार जब हम बालमपुर गए थे तो सिर्फ आधे घंटेमे गाँव के अंदर पहुंचे थे.. रास्ते में एक नदी भी लगी थी.. लगता है हम गलत रास्ते से जा रहे है..!”
रस्ता चुकल्याची थोडी थोडी शंका मला देखील येत होती. पण आतापर्यंत आम्ही अगदी सरळ सरळ पायवाटेनेच येत होतो. ही वाट कुठेही दुभागली नव्हती किंवा तिला कोणताही दुसरा फाटाही फुटला नव्हता.
आम्ही बिरसाईपेटहुन उजवीकडील जंगलात शिरताना तिथे गावाचे नाव लिहिलेली वन खात्याची एक तेलगू भाषेतील पाटी देखील होती, हे आठवलं.
“रमेश, तुमने वो बोर्ड ठीकसे पढ़ा था नं.. ?”
“हां साब..! बोर्ड पर बालमपुर ही लिखा था.. पास ही में वेलफेयर डिपार्टमेंट और इरिगेशन डिपार्टमेंट का बोर्ड भी था.. उस पर भी बालमपुर ही लिखा था..!”
रमेश छातीठोकपणे म्हणाला.
.. मग कसला तरी कानोसा घेत तो म्हणाला..
“लगता है वो नदी पास ही में है.. !”
खरोखरीच थोडं पुढे जाताच सुमारे तीस चाळीस फुटाचे खूपच उथळ पात्र असलेली एक नदी वाहताना दिसली. मोटर सायकल उभी करून नदीच्या काठावरील एका मोठ्या दगडावर आम्ही दोघेही बसलो. नदीला जेमतेम फुटभर खोल पाणी होतं. नदीच्या पात्रात अनेक उंच झाडे मोडून आडवी पडली होती. त्यांच्यामुळे नदीवर लाकडी पूल असल्यासारखे वाटत होते. स्वच्छ पाण्यात नदीतील वाळू, गोटे अगदी स्पष्टपणे दिसत होते.
“हम शायद दूर के रास्ते से आए, लेकिन गांव तक तो पहुंच गए..! बस, अब नदी के उस पार.. बहुत ही नजदीक बालमपुर गांव है !”
सुटकेचा निःश्वास टाकीत रमेश म्हणाला.
मोटर सायकलवर बसून उत्साहातच नदी पार केली. आता आम्हा दोघांनाही कडाडून भूक लागली होती. बालमपुरला गेल्यागेल्याच आधी डबा खाऊन घ्यायचा आणि मगच त्या दोघा कर्जदारांबद्दल चौकशी करायची असं ठरवलं.
नदी पार करून बरेच पुढे आलो तरी बालमपुर गावाचा काहीच थांगपत्ता नव्हता. उलट पायवाट जंगलात आणखी खोल खोल जात चालली होती. जंगलही अधिकाधिक दाट झाल्यासारखं वाटत होतं. आम्ही जात होतो ती पायवाट, ते जंगल ओळखी ओळखीचं वाटत होतं. या वाटेवरून आपण पूर्वीही कधीतरी गेल्याचं पुसटसं आठवत होतं.
असाच आणखी अर्धा एक तास गेला असावा.
“रमेश, क्या टाईम हुआ..?”
काहीतरी विचारायचं म्हणून म्हणालो.
“एक बज कर बीस मिनट.. अरे..! बंद पड़ गई शायद मेरी घड़ी..!”
मनगटावरील घड्याळ कानाजवळ नेत टिकटिक ऐकण्याचा निष्फळ प्रयत्न करीत रमेश म्हणाला.
तितक्यात.. मोहाच्या झाडावरून खाली लटकणाऱ्या एका लांबलचक वेलीने रमेशच्या चेहऱ्याला तडाखा दिला आणि रमेश किंचाळत ओरडला..
“रुको.. रूको.. साब !”
मी गाडी थांबवली.
“यहीं पर.. यहीं बेल..घंटा भर पहले मेरे चेहरे से टकराई थी.. वो देखो.. ईप्पु पुव्वा, ईप्पु पंडु..!!”
उत्तेजित होऊन रमेश ते मोहाच्या झाडाखाली असलेले फुलांचे व फळांचे ढीग दाखवीत होता. मोहाच्या झाडाला तेलगू भाषेत “ईप्पु” असे म्हणतात. फळाला “पंडु” तर फुलाला “पुव्वा” असे म्हणतात.
तासाभरापूर्वी हेच मोहाच्या फुलांचे व फळांचे ढीग रमेशने मला दाखविले होते. त्यावेळीही त्याला असाच लटकणाऱ्या वेलीने तडाखा दिला होता.
आम्ही नीट निरखून सभोवताली पाहिलं. नक्कीच… इथूनच गेलो होतो आम्ही तासाभरापूर्वी.. हीच अशीच झाडं होती तेंव्हा.. अगदी याच क्रमाने.. ते कोवळ्या सागाचं पाच फूट उंचीचं झाड.. त्याच्या बाजूचं ते आवळ्याचं झाड.. ते तिरपं उगवलेलं हिरड्याचं झाड.. अगदी तसंच..
पण.. हे कसं शक्य आहे..? आम्ही तर कुठेच वळलो नाही.. सरळ सरळ पुढे पुढेच जात आहोत. मग असे गोलाकार..मागे वळून पुन्हा त्याच रस्त्यावर कसे आलो..?
पूर्वी जेंव्हा याच वेलीने रमेशच्या तोंडावर तडाखा दिला होता तेंव्हा चेहऱ्याला लागलेला वेलीचा चीक, गाडी साफ करायच्या कपड्याने पुसून तो कपडा रमेशने तिथेच फेकून दिल्याचं आठवलं. म्हणून थोडं पुढे जात तो कपडा शोधून पाहिला. आणि काय आश्चर्य..? तो फेकलेला कपडाही अगदी तिथेच होता.
हा काय प्रकार आहे ? आम्ही तिथल्या तिथेच गोल गोल तर फिरत नाही आहोत ना ?
तो खाली पडलेला कपडा उचलून घेतला आणि खूण म्हणून तिथल्याच पाच फूट उंचीच्या कोवळ्या सागाच्या झाडाला बांधला.
आता आम्ही सतर्क, सावध झालो होतो. काळजीपूर्वक, आजूबाजूचे चौफेर, चिकित्सक निरीक्षण करीत सजग राहून अगदी हळू हळू पुढे जात होतो. कुठेही कुणा माणसाची, प्राण्याची किंवा पक्ष्याची जराशीही चाहूल लागत नव्हती. फक्त शांत स्तब्ध असलेल्या.. खाली वर.. चोहीकडे पसरलेल्या वृक्ष वेली..
पूर्वी ऐकला होता तसा नदीच्या वाहण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. आम्ही गाडी थोडी पुढे नेली.. तो काय..?
आमची गाडी त्याच नदीकाठच्या त्याच मोठ्या दगडाजवळ उभी होती, ज्यावर बसून आम्ही मघाशी विश्रांती घेतली होती. नदीत मोडून आडवी पडलेली तीच उंच झाडे आणि स्वच्छ पाण्यात चमकणारे तसेच वाळू, गोटे..
किंकर्तव्यमुढ होणं म्हणजे काय ? याचा प्रत्यक्ष अनुभव घेत नदीकाठी बराच वेळ उभे होतो. पुढे जावे की मागे फिरावे ? पण.. मागच्या रस्त्याने तर आम्ही सावधपणे येतच आहोत.. मग..पुन्हा नदी ओलांडून पहावी काय..?
त्या नदीकाठच्या मोठ्या दगडाजवळ बराच वेळ उभे असूनही पुन्हा त्या दगडावर बसण्याची यावेळी आमची हिंमतच झाली नाही. अन्य दुसरा कोणता मार्गच नसल्यामुळे पुढे जाण्यासाठी पुन्हा नदीत मोटर सायकल घातली. तत्पूर्वी खूण म्हणून आसपासचे दगड गोळा करून नदीकाठी त्याचे छोटे छोटे ढीग करून ठेवले. तसेच काही वेली तोडून एक दोन झाडांभोवती त्यांच्या गाठी बांधून ठेवल्या.
काही तरी चमत्कार होईल आणि नदी पार करताच बालमपुर गाव आमच्या दृष्टिपथात येईल अशी भाबडी आशाही कुठेतरी मनात होतीच.
🙏🌹🙏
(क्रमशः)
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra and practising advocate in District Court of Aurangabad
मित्रांनो, मी विष्णू भोपे, निवृत्त कार्यकारी अभियंता, आणि निवृत्तींनंतर, औरंगाबाद(संभाजीनगर) येथील कोर्टात वकिली करणारा हौशी वकील!
मी अधून मधून माझे कांही अनुभव, कांही किस्से, थोडेसे रंजक आणि विनोदी पध्दतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
पण आज मी दि. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या सेशन्स कोर्टात कोपर्डीच्या गाजलेल्या खटल्याच्या निकालाबद्दल सांगणार आहे. वरील खटल्याचा निकाल २९ नोवेंबर २०१७ रोजी लागणार होता, आणि एक practising advocate म्हणून मला या खटल्याच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. (मी सेवेत असतांनाच, माझ्या आवडीचा विषय म्हणून LL.B केले, आणि सेवा निवृत्तीनंतर औरंगाबाद येथील कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली)
त्या दिवशी कोर्टात खूप गर्दी होणार होती, म्हणून २९ नोव्हेंबरला सकाळीच सातची बस पकडून मी साडेनऊ वाजता मा. न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या कोर्ट रूममध्ये जाऊन बसलो. हा खटला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजला होता व तिन्ही आरोपींना फाशीच व्हावी या मागणी साठी राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते व आंदोलनही झाले होती. प्रसार माध्यमांनीही हे प्रकरण खूप लावून धरले होते.
दहा वाजेपर्यंत कोर्ट हॉल खचाखच भरला .सुमारे १५ पोलिस व ४ कमांडोज हॉललध्ये बंदोबस्तासाठी तैनात होते.चौघे पिस्तुलधारी होते. तिन्ही आरोपींना सकाळी ९ वाजताच सशस्त्र पोलिसांनी कोर्ट हॉलमध्ये आणून सगळ्यात मागच्या बेंचवर आणून बसवले होते .कोर्टाच्या इमारतीच्या आवारात सुमारे २०० पोलिस तैनात केले होते. TV चे पंधरा चॅनल्सचे कॅमेरामेन व रिपोर्टर्स बातम्यांचे बाईट्स घेण्यासाठी सज्ज होऊन ताटकळत बसले होते. कोर्टाच्या प्रांगणात सुमारे एक हजार लोक असावेत . येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात होती.कोर्टाच्या परिसराला एखाद्या सैन्याच्या छावणीचे स्वरुप आले होते.
कोर्टात निर्भयाचे( पीडित मुलीचे नांव प्रसिद्ध करण्यास कायद्यानुसार मनाई आहे) आई वडील , बहीण भाऊ इतर नातेवाईक निकाल ऐकण्यासाठी हजर होते. त्यांच्या गावातील लोक पण होते. तिन्ही आरोपींचे वकील गैरहजर होते तसेच त्यांचे नातेवाईकही गैरहजर होते. कोर्ट हाॅलमध्ये माझ्यासह सुमारे १५ वकील हजर होते. हॉलच्या बाहेर व कॉरिडॉरमध्ये प्रचंड गर्दी होती.कोर्टहॉलमध्ये शिक्षेबद्दल कुजबुज सुरू होती.बहुतेकांचा सूर असा होता की आरोपी नंबर एकला फाशी होईल व बाकीच्या दोघांना जन्मठेप होईल.
सुमारे ११:०० वाजता ॲड. उज्वल निकम दोन पोलिस व दोन कमांडोज यांच्या संरक्षणात कोर्टात दाखल झाले.नंतर ११:२३ ला शिपायाने ‘ होशियार’ असा पुकारा केला.सगळे जण उभे राहिले. नंतर लगेच न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले आल्या. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. उपस्थितांनी व मी ही त्यांना प्रथेप्रमाणेवाकून नमस्कार केला. हॉलमध्ये कुजबुज वाढली.तशा जज्ज मॅडम रागावल्या . त्यांनी लगेच तंबी दिली ,सगळे जण एकदम शांत रहा. कुणाचाही आवाज ऐकू आला तर मी contempt ची नोटीस देईन .यानंतर सगळे एकदम चिडीचूप झाले. कोर्टात एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता झाली. मग न्यायाधिशांनी तिन्ही आरोपींना त्यांच्या शिक्षा त्यांना स्पष्टपणे ऐकू याव्यात म्हणून समोर आणण्याचे फर्मावले . तसे पोलिसांनी तिन्ही आरोपींना समोर आणून उभे केले.तिन्ही आरोपी कोर्टासमोर हात जोडून उभे होते.अवघ्या सहा मिनिटांमध्ये कोर्टाने तिन्ही आरोपींना त्यांचे नाव व पत्ता वाचून वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली. तिघांनाही ३ वर्षांची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा व फाशीची शिक्षा व दंड रू २००००/- अशी शिक्षा वेगवेगळ्या कलमांखाली सुनावली. यापैकी फाशीची शिक्षा मात्र हायकोर्टाकडून कन्फर्मेशन आल्यानंतरच अमलात आणता येते. ( CRPC Section 366 )
शिक्षेचे वाचन ( operative part ) करून न्यायाधीश त्यांच्या ॲंटीचेंबर मध्ये गेल्या. हॉलमध्ये दाटीवाटीने बसलेल्या सर्वांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होतं .निकाल ऐकताच इतका वेळ नि:शब्द बसलेल्या निर्भयाच्या आईला रडू कोसळले.तिचे नातेवाईक तिचे सांत्वन करता करता स्वत:पण रडत होते.
हळूहळू कोर्टहॉल मध्ये असलेले पन्नास साठ लोक बाहेर निघू लागले. ॲड. उज्वल निकमही त्यांच्या कमांडोजच्या संरक्षणात बाहेर पडले. मी चपळाईने त्यांच्या पुढे गेलो व त्यांच्याशी शेक हॅंड करून त्यांना म्हटले , Congratulations Sir , very well done ‘
एका क्षणात फाशीच्या शिक्षेची बातमी आसमंतात पसरली.
नंतर मी कोर्टाच्या प्रांगणात आलो. तिथे गर्दी केलेल्या हजारएक स्त्री पुरूषांच्या चेहेऱ्यावर फाशीच्या शिक्षेचा निकाल ऐकून समाधान पसरले होते. जमलेले लोक खूपच उत्तेजित झाले होते.
दहा पंधरा चॅनलवाल्यांनी अॅड .उज्वल निकम यांना गराडा घातला.त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कोर्टाचा निकाल सांगितला. त्यावेळी सर्व लोक जे दूरदर्शनवर पाहत होते, ते मी प्रत्यक्ष तिथे हजर राहून पाहत आणि अनुभवत होतो.
कांही चॅनलवाल्यांनी निर्भयाच्या कुटुंबियांची मुलाखत घेतली .
हा संपूर्ण निकल १४५ पानांचा आहे.ततो जवळपास पूर्ण माझ्या वाचनात आला .त्यातला निर्भयाचा पोस्ट मोर्टेम रिपोर्ट वाचून अंगावर शहारे आले आणि या तिन्ही माणसांच्या रूपात वावरणाऱ्या क्रूर नराधम राक्षसांना फाशीची शिक्षाच होणे आवश्यक होते असे वाटले. १५ वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून , तिच्या शरीराचे लचके तोडून तिच्या शरीराची विटंबना करून तिचे नरड्यात बोळे कोंबून तिची मान १८० अंशात पिरगाळून या नराधमांनी तिचा खून केला.
कोर्टाने हा गुन्हा Rarest of the rare असे मत नोंदवून तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. ही बातमी बाहेर पसरताच कोर्टाच्या आवारात जमलेल्या हजारएक लोकांनी प्रचंड जल्लोष सुरू केला व नारेबाजी सुरू केली..
कोर्टहॉल मध्ये ज्यावेळी न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी माझ्या मनात क्षणभर विचार आला की महिषासूर मर्दिनी देवीने न्यायाधीश सुवर्णा केवले यांचे रूप धारण केले आहे व आरोपींच्या रूपात वावरणाऱ्या तिन्ही राक्षसांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.
एक संवेदनशील माणूस म्हणून मी न्यायदेवते समोर नतमस्तक होतो.
न्यायदेवतेला शतश: प्रणाम
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
यापूर्वी आपण श्री अजय कोटणीस यांचे अनेक लेख वाचले आहेत. पण खालील आठवण ही त्यांची अर्धांगिनी सौ. निरुपमा कोटणीस यांची एक अत्यंत हृद्य आठवण असून, यापूर्वी ती जेंव्हा फेसबुकवर प्रकाशित केली होती, त्यावेळी आणि त्यानंतर खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, त्यात नुसतीच एक आठवण नाही, तर समाजातील एक मोठी गरज असलेल्या गोष्टीबद्दल त्यांनी सर्व समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
*दुधाचं कर्ज*
लेखिका- सौ. निरुपमा कोटणीस
त्यावेळी आमची बदली बुलढाण्या जवळील पारध या गावी झाली होती, म्हणून आम्ही बुलढाण्यालाच घर केले होते. माझा मोठा मुलगा अनिश पहील्या वर्गात होता अन् छोटा अथर्व दोन महिन्यांचा होता.
माझे माहेर ही बुलढाणाच असून तेंव्हा माझी आई व माझा मोठा भाऊ तिथे सहकुटुंब राहायचे.
1998…जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा होता. माझ्या आईची तब्येत बरी नसल्याने दादाने ..माझ्या भावाने बुलढाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक लध्दड यांची अपॉईंटमेंट घेतली होती. सकाळी दहा वाजता आईला घेऊन दवाखान्यात जायचे होते.
ठरल्याप्रमाणे दादा आईला घेऊन सकाळी माझ्या घरी आला आणि “मी तुझ्या बाळा जवळ थांबतो. तू आईला घेऊन डॉक्टर कडे जा” म्हणाला.
मी सर्व आवरून लगेच आईला घेऊन दवाखान्यात गेले. सिस्टरने “डॉक्टर अर्ध्या तासात येतील, तोपर्यंत बसा !” म्हणून सांगितलं. आम्ही दोघी तिथल्या बाकड्यावर बोलत बसलो होतो. कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आर्त आवाज येत होता…कोण आणि कां रडतंय हा प्रश्न पडताच उत्तर मिळालं.
…समोरून एक माणूस एका बाळाला घेऊन येताना दिसला. धोतराच्या दुहेरी कापडात उघडेबंब बाळ जिवाच्या आकांताने जोरजोरात रडत होते. आमच्या दोघींचे हृदय त्याच्या रडण्याने पिळवटून निघत होते. त्यावेळी सकाळचे दहा वाजले होते तरी थंडीचे दिवस असल्याने हवेत गारठा होता.आणि त्यातून हे बाळ असं उघडं…
तो माणूस बाळाला घेऊन आमच्या जवळून जायला लागला. बाळाचे रडणे न ऐकवून मी त्या माणसाला थांबवून म्हणाले…
“अहो भाऊ (विदर्भात अनोळखी व्यक्तीला भाऊ,ताई, बाई, दादा असे बोलतात) त्या बाळाला नीट कपड्यात गुंडाळून घ्या ना….थंडी वाजतेय त्याला.”
तो माणूस कुठल्या तरी खेड्यातला होता. तो बोलला..
“बाई, हे कपडाच ठेवत नाहीये अंगावर.”
मी म्हणाले…
“द्या इकडे… मी व्यवस्थित गुंडाळून देते…”
असे म्हणून मी हात पुढे केला…आणि त्या चिमुकल्या बाळाला जवळ घेऊन कपड्यात गुंडाळायला लागले…..तर ते बाळ रडता रडता माझ्या छातीशी तोंड करून दुधाची वाट बघू लागले. मी त्या माणसाला म्हणाले..
“भाऊ, याला खूप भूक लागलीय… त्याच्या आईकडे न्या आधी. बाळ भुकेने कळवळतंय…”
त्यावर हताशपणे तो माणूस म्हणाला
“बाई, त्याची आई टीबी हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट आहे. तिला टीबी असल्याने बाळाला वरचे दूध सुरू आहे आणि आम्ही रस्त्यावरच चूल पेटवून दूध गरम करून पाजतो त्याला. त्यामुळे त्यालाही ते इन्फेक्शन का काय म्हणतात, ..ते झाले आहे…म्हणून त्याच्या टेस्ट करायला बोलावले होते..”
बाळाचे रडून रडून बारीक झालेले लुकलुकणारे डोळे मला काहीतरी मागत होते…थरथरणारे सुकलेले गुलाबी ओठ काहीतरी शोधत होते. त्याची व्याकुळता मला हतबल करत होती. माझ्यातलं मातृत्व जागं होतंच. लहानपणापासूनची परोपकाराची शिकवण मला स्वस्थ बसू देईना.
शेवटी न राहवून आईला हळूच विचारलं..
“आई, ह्याला दूध पाजू का गं ? मला या बाळाची भूक बघवत नाही…”
आई म्हणाली… “एक मिनिट थांब !
आणि आईने थोडे बाजूला जाऊन त्या माणसाला विचारलं..
“ही माझी मुलगी आहे. तिचे दोन महिन्यांचे बाळ घरी आहे. …तुमच्या बाळाची भूक तिला बघवत नाही. तुम्ही हो म्हणत असाल तर ती आपलं दूध पाजेल बाळाला….”
त्या गृहस्थाने अक्षरशः माझ्या आईचे पाय धरले.
“बाई, कोण म्हणतं हो देव नाही. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. तुम्ही देवासारखे भेटले.”
असं म्हणत त्यांनं आनंदानं होकार दिला. डॉक्टर दिपक लद्धड शालेय जीवनात आमचे शेजारी असल्याने मी व आई हक्काने सिस्टरला सांगून बाळाला घेऊन डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो. इतका वेळ बाळाच्या रडण्याने हॉस्पिटलमध्ये होत असलेला आक्रोश, गडबड गोंधळ आता थांबला होता. अत्यंत शांतपणे बाळाला स्तनपानाचा कार्यक्रम झाला. बाळाचे पोट यथेच्छ भरले होते. आणि ते शांतपणे माझ्या कुशीत झोपले होते. तशा अवस्थेतच मी त्याला व्यवस्थित गुंडाळून त्या व्यक्तीच्या हवाली केले.
आमचे खूप खूप आभार मानून तो माणूस निघून गेला. नंतर पाच दहा मिनिटातच डॉक्टर आले. आईचे चेक अप झाले. डॉक्टरांनी औषधी लिहून दिली आणि आम्ही घरी परत आलो.
घरी यायला आम्हाला जरा उशीरच झाला होता. दादाने कारण विचारल्यावर आईने त्याला झालेला प्रकार सांगितला. त्यावर त्याने माझ्याकडे पाहून हात जोडले.
“खरंच निरु, यापुढे तू देवाला हात जोडले नाहीस तरी चालेल गं…! देव तुझ्यावर जाम खुश झाला असणार. त्याची कृपा कायम तुझ्यावर राहील.”
असं म्हणून मला तोंड भरून आशिर्वाद देऊन, चहा घेऊन दादा ऑफिसला निघून गेला.
त्या बाळाचे इन्फेक्शन माझ्या बाळाला लागू नये म्हणून मी डेटॉलने वॉश घेऊन माझ्या बाळा जवळ गेले. माझे बाळ शांतपणे झोपले होते. मी मनाशी विचार केला… “बरं झालं ! बाळ झोपलंय तोवर आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ.”
स्वयंपाक झाला. अनिश शाळेतून आला होता, त्याचे आवरणे झाले. आमची जेवणेही झाली. .. तरी बाळ उठेना. शेवटी चार वाजता, न राहवून मी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची झोप उघडत नव्हती. तो परत तासभर झोपला. आणि नंतर खेळू लागला. आज माझ्या बाळाला भूक पण लागली नव्हती.
आई म्हणाली…
“बघ निरू, आज दवाखान्यात तू त्या बाळाचे पोट भरलेस, तर इकडे देवाने तुझ्या बाळाचेही पोट भरले. पाहिलंस, आज अथर्व प्यायला देखील उठला नाही.”
आमचं दुपार नंतरचं चहापाणी झाल्यावर आणि घरातली कामं आवरल्यावर माझ्या डोळ्यापुढे दवाखान्यातलं ते बाळ दिसायला लागलं. आता संध्याकाळी त्याच कसं होईल ही चिंता वाटत होती. सकाळचा प्रसंग असा झटकन घडून गेला की त्या माणसाचे नाव, गाव, पत्ता काहीच विचारलं गेलं नाही. मनाला त्या बाळाच्या भुकेची काळजी वाटून सारखी चुटपुट लागून राहिली.
दुसऱ्या दिवशी मी दादाला त्या बाळाबद्दल चौकशी करण्यासाठी दवाखान्यात पाठवलं. पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. टीबी हॉस्पिटल मध्येही ते कुटुंब नव्हतं.
एक खंत उगीच लागून राहिली होती की त्याच वेळी त्यांची नीट चौकशी करून त्या बाळाची आई बरी होई पर्यंत काही दिवस तरी मी त्याला सांभाळायला हवं होतं.
आजही मला त्या अश्राप, दुर्दैवी बाळाचे नाव, गाव, जात, पत्ता काहीच माहित नाही. एक रुख रूख मात्र मनात सदैव घर करून राहिली आहे. त्याचवेळी त्याची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती म्हणून.
….बहुदा त्या बाळाचं गेल्याजन्मीचं दुधाचं कर्ज फिटलं असेल एवढंच म्हणेन…!!
माझ्या कौतुकासाठी मी ही पोस्ट लिहिली नाही. पण समाजात ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे अमृतदान दिल्यास भुकेल्या गरजू बाळाची गरज भागवली जाते. आणि स्वतःला खूप समाधान मिळते. याचा प्रत्यय घ्यावा. यात काहीही वावगे नाही. हे दान आपण इच्छा असूनही *नेहमी* करू शकत नाही. त्यामुळे जेंव्हा शक्य असेल तेंव्हा हे अमृतपान नक्की करा…त्यातच आपलं खरं सौंदर्य (ब्युटी) आहे. स्त्री असल्याचा मला *अभिमान* आहे आणि सर्व स्त्रियांनी तो बाळगावा !!
लेखिका परिचय- सौ. निरुपमा अजय कोटणीस या श्री अजय कोटणीस( निवृत्त मॅनेजर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद ) यांच्या सुविद्य पत्नी होत. तसेच त्यांनी बुलडाणा अर्बन मध्ये व्यवस्थापक या पदावर नोकरी केलेली आहे.
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
आठव्या वर्गात खूप नवीन मुलं वर्गात आली. विशेषतः ज्या लहान गावात सातवी पर्यंतच शाळा असते तिथल्या मुलांना पुढील शिक्षणाकरता नाईलाजानं शहरात यावंच लागायचं. विलास लोहोटे हा असाच अकोल्याजवळच्या म्हैसांग गावातून आलेला एक विद्यार्थी. डोळ्यांना जाड भिंगाचा जुनाट पद्धतीचा चष्मा, अंगात खेड्यातील शिंप्याकडून शिवून घेतलेला चुरगळलेला ढगळ शर्ट, प्रथमच शहरात आल्यानं चेहऱ्यावर नवखेपणाचे, बावरल्याचे भाव आणि वर्गात इकडे तिकडे नवलाईने पाहणारे भिरभिरते डोळे. वर्गातील जुन्या, खोडकर मुलांच्या सराईत, कावेबाज नजरा साहजिकच या खेडवळ मुलाचं बारकाईने धूर्त निरीक्षण करू लागल्या. लवकरच हा भोळा भाबडा जीव वर्गातील मुलांच्या चेष्टेचा विषय झाला. आपल्या अगदी लहान सहान… प्रसंगी पोरकट वाटणाऱ्या सर्व शंका कुशंका तो निःसंकोचपणे, मुलांच्या कुत्सित हसण्याकडे लक्ष न देता आपल्या खणखणीत आवाजात शिक्षकांना विचारायचा. त्याचा निरागस बावळटपणा पाहून शिक्षकांनाही हसू आवरत नसे. आणि त्याची चेष्टा करण्याचा मोह कधी कधी त्यांनाही होत असे.
पीजी जोशी सर त्यावेळी आम्हाला विज्ञान विषय शिकवीत. आपल्या विनोदी वृत्तीला अनुसरून वर्गातील प्रत्येकच विद्यार्थ्याला ते विविध मजेशीर टोपण नावाने हाक मारायचे. लोहोटेला चष्मा असल्याने त्याला कधी “ढापण”, कधी “कंदील”, तर कधी “बुलबुल” या नावाने बोलवायचे.
एके दिवशी पीजी सरांचा पिरियड असताना सरांचं शिकवून संपल्यावर थोडा मोकळा वेळ होता. डोळ्यांवर ताण आल्याने चष्मा काढून बाकावर ठेवून लोहोटे डोळ्यांची उघडझाप करीत शांत बसला होता. त्याला पाहून पीजी सरांना त्याची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी त्याच्याकडे पहात मोठ्या आवाजात हाक मारली..”अहो, चष्मे बुलबुल “…. सरांनी आपल्यालाच हाक मारली आहे हे लक्षात येताच लोहोटे गडबडीनेच जागेवर उभा राहिला. उभं राहता राहता घाईघाईने टेबलावरचा चष्मा हातात घेतला आणि घालण्यापूर्वी तो नीट पुसून घ्यावा म्हणून शर्टाच्या टोकाने चष्मा स्वच्छ करू लागला. त्याचवेळी पीजी सरांनी पुन्हा हाक मारली “कंदील राव…काय करताय ? ” …… हातातला चष्मा उंच करून सरांना दाखवित लोहोटे म्हणाला “कंदिलाची काच साफ करतोय, सर ! “…. हे ऐकताच वर्गातील सर्व मुलांनी मनमुराद हसत लोहोटेच्या निर्भय विनोदबुद्धीला प्रचंड प्रतिसाद दिला. पीजी सर ही क्षणभर चपापले. मनातल्या मनात त्यांनीही लोहोटेच्या हजरजबाबीपणाला निश्चितच दाद दिली असेल.
…..त्या प्रसंगानंतर पीजी सरांनी लोहोटेची चष्म्यावरून कधीच चेष्टा केली नाही….
😃😃😃😃😃
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.
ते फेसबुकवर नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.
असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने प्रकाशित करीत आहोत.
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*चुन्याची डबी*
1985 साली मी स्टेट बँकेच्या जुना जालना शाखेत काम करत असतानाची गोष्ट. मी कर्ज विभागात काम करीत होतो आणि त्याच बरोबर कर्मचारी संघटनेचा स्थानिक पदाधिकारी सुद्धा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतीला पूरक जोडधंदा करता यावा म्हणून शेळ्या खरेदी करण्यासाठी बँकेतर्फे सरकारी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जायचं. सर्व सरकारी योजनांप्रमाणेच याही योजनेत स्थानिक नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असायचा. राज्य सरकारच्या संबंधित खात्यातील अधिकारी भरपूर लाच घेऊनच कर्जाचे अर्ज बँकेकडे पाठवीत असत. विविध संघटना, सेना, मोर्चा यांचे स्वघोषित पदाधिकारी उर्फ दलाल बँकेत येऊन अयोग्य मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत. परिणामी योजनेचा प्रचंड गैरफायदा अपात्र, कर्जबुडव्या, धूर्त ग्रामीण जनतेकडून घेतला जात होता.
एकदा जालन्यापासून 25-30 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बेरडगाव नावाच्या एका अतिशय दुर्गम खेड्यातील काही शेतमजुरांना शेळ्या खरेदीसाठीचे कर्ज आमच्या शाखेतर्फे मंजूर करण्यात आले होते. दर मंगळवारी जालन्यास गुरांचा बाजार भरत असे. तेथून लाभार्थीच्या पसंतीने शेळ्या खरेदी करून त्यांची व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर विमा कंपनीचे बिल्ले (इअर टॅग) त्या शेळ्यांच्या कानाला टोचून घ्यावे लागत. त्यानंतर नगरपालिकेची जनावर खरेदीची पावती बनवून झाल्यावर शेळ्या व विक्रेता यांना घेऊन लाभार्थी बँकेत येत असे. बँकेच्या फिल्ड ऑफिसरने शेळ्यांचे इन्सपेक्शन व योग्य शहानिशा केल्यावरच विक्रेत्याला शेळ्यांची किंमत अदा केली जात असे.
त्या दिवशी बेरडगावच्या दहा लाभार्थींना कर्जवाटप करायचे होते. त्यापैकी नऊ जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये तर राहीलेल्या एकाला दहा हजार रुपये इतकी कर्ज रक्कम प्रदान करायची होती. संध्याकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर एकदाचे सर्व लाभार्थी शेळी विक्रेत्यांना घेऊन बँकेत आले. फिल्ड ऑफिसरने ताबडतोब शेळ्यांचे इंस्पेक्शन केले. उशीर झाल्याने कॅशियरने घाईघाईतच सर्वांना फिल्ड ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे रक्कम अदा केली व कॅश क्लोज करण्याच्या मागे लागला. पण कॅशियर व अकाऊंटंटच्या स्क्रोलमध्ये दहा हजारांचा फरक येत होता. लवकरच उलगडा झाला की ज्या एकमेव शेळी विक्रेत्याला दहा हजार रुपये द्यायचे होते त्यालाही घाईगडबडीत वीस हजार रुपये दिले गेले होते.
त्याकाळी दहा हजार रुपये फार मोठी रक्कम होती. रक्कम जमा केल्याशिवाय कॅशियरला तिजोरी बंद करता येणार नव्हती. फिल्ड ऑफिसर, संबंधित क्लर्क, कॅशियर, …सारे या चुकीसाठी एकदुसऱ्याकडे बोट दाखवीत होते. शेवटी मॅनेजर श्री. टी. के. सोमैय्याजी यांना झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला. ते अतिशय शांत, संयमी, सहृदय आणि दिलदार स्वभावाचे होते. त्यांनी शाखाप्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या ह्या चुकीची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ताबडतोब स्वतःच्या खात्यातून दहा हजार रुपये देऊन कॅश बंद करण्यास सांगितले.
हा सर्व गोंधळ निस्तरेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. जादा गेलेली दहा हजाराची रक्कम वसूल करण्याची नैतिक जबाबदारी कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी या नात्याने माझी देखील होती. मी लगेच ज्या लीडरने ही कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी शाखेवर दबाव आणला होता त्याच्याकडे म्हणजे साहेबराव दांडगे ह्याच्याकडे गेलो. साहेबरावने सर्व प्रकरण नीट समजावून घेतले. ज्याला दहा हजार रुपये जास्त गेले होते तो शेळीविक्रेता, लालसिंग त्याचं नाव, तोही योगायोगाने बेरडगावचाच निघाला.
साहेबराव म्हणाला ” सर, मी ह्या लालसिंगला चांगलाच ओळखतो. अतिशय प्रामाणिक माणूस आहे. जादा आलेले बँकेचे पैसे तो नक्कीच परत करील. मात्र पैसे आणण्यासाठी बेरडगावला जावे लागेल आणि तिकडे आत्ता रात्रीचे जाणे फारच अवघड आणि धोकादायक आहे. एकतर रात्रीचा अंधार आणि त्यातून संपूर्ण रस्ता कच्चा, चिखल-दलदलीचा, खाचखळग्याचा आणि काटाकुट्याचा आहे. गाडी पंक्चर होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीची साप, रानडुकरं, लांडगे यांची तसेच वाटमारीचीही भीती आहे. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळीच बेरडगावला जा. हवं तर मीही तुमच्या सोबत येतो. काळजी करू नका. पैसे नक्की परत मिळतील.” साहेबरावच्या ह्या आश्वासक बोलण्यानं बराच धीर आला आणि खूप हायसंही वाटलं.
चर्चेअंती दुसरे दिवशी पहाटे सहा वाजता साहेबरावला सोबत घेऊन निघायचे ठरले. मी पाच वाजताच उठून तयार होऊन स्कुटर घेऊन साहेबरावच्या घरी गेलो. तो गाढ झोपला होता. मला आलेला पाहून डोळे चोळत उठून तो लगेच तयार झाला आणि स्वतःची मोटारसायकल घेऊन माझ्याबरोबर निघाला. सुमारे तासभराच्या खडतर प्रवासानंतर आम्ही बेरडगावला पोहोचलो. लालसिंग गावाबाहेर बेरडवस्तीत रहात होता. तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे आमच्या गाड्या गावालगत रस्त्यावरच उभ्या करून आम्ही दोघे दोन तीन फर्लांगाचं अंतर चिखल तुडवीत जवळच्या बेरडवस्तीत गेलो.
लालसिंगने आमचे आदराने स्वागत केले. मी त्याला आम्ही इथपर्यंत येण्याचे कारण सांगितले. त्यावर लालसिंग म्हणाला “साहेब, मी बँकेने दिलेले पैसे न मोजता तिथेच रुमालात बांधले आणि लगेच घराकडे आलो. अजूनही ते पैसे तसेच रुमालात ठेवले आहेत. तुम्ही ती रुमालाची पुरचुंडी घ्या आणि त्यातून जास्तीचे आलेले पैसे काढून घ्या.”
मला लालसिंगच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. मी त्यानं आणून दिलेल्या रुमालाची गाठ उघडली आणि जास्तीचे गेलेले दहा हजार काढून घेण्यासाठी पैसे मोजू लागलो. पण हे काय…? दहा हजार मोजताच सारे पैसे संपले. रुमालात एकूण फक्त दहा हजार रुपयेच होते. म्हणजे..? लालसिंगला दहाच हजार दिले गेले ? मग पैसे गेले कुठे ? कॅशियर खोटं तर बोलत नाही ना ?….असे नानाविध विचार माझ्या मनात येऊन गेले.
मी लालसिंगकडे पाहिलं. “काय झालं साहेब ?” माझा गोंधळलेला चेहरा पाहून त्यानं भाबडेपणानं विचारलं. “काही नाही. बहुदा आमच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी.” असं म्हणून लालसिंगची माफी मागून आम्ही निघालो.
जाता जाता लालसिंगच्या आग्रहास्तव वस्तीच्या कोपऱ्यावरील चहाच्या खोपटात चहा पिण्यासाठी गेलो. चहा पिताना साहेबराव म्हणाला “पहा साहेब !… मी म्हणत नव्हतो, लालसिंग खूप इमानदार आहे म्हणून ! बिचाऱ्याने अजूनपर्यंत पैसे मोजलेही नव्हते. जर खरोखरच त्याच्याकडे जास्तीचे पैसे आले असते तर ते तुम्हाला नक्की परत मिळाले असते.” मी देखील मान डोलावून त्याच्या बोलण्याला संमती दर्शवली.
माझी वसुली मोहीम पार फसली होती. मोठया आशेनं माझी वाट पाहत बसलेल्या कॅशियर, क्लर्क व फिल्ड ऑफीसरचे चेहरे माझ्या डोळ्यापुढे तरळू लागले. उदास मनानं लालसिंगचा निरोप घेऊन परत जाण्यासाठी आम्ही उठतो न उठतो, तोच….
“अहो काकाsssss थांबाsssss” असा आवाज देत लालसिंगचं आठ दहा वर्षांचं पोरगं धापा टाकत आमच्यापर्यंत आलं.
“अहो काका, काल रात्री बँकेचे जास्तीचे आलेले पैसे घेण्यासाठी तुम्ही चिखलकाट्यात बरबटून आमच्या घरी आला होता ना, त्यावेळी जादा आलेले पैसे तर तुम्ही नेले पण तुमची एक गोष्ट मात्र आमच्या घरीच विसरला होता…ती ही घ्या तुमची विसरलेली चुन्याची डबी.”
असं म्हणत त्या मुलानं चुन्याची डबी साहेबरावच्या हातावर ठेवली.
काल घडलेला सारा घटनाक्रम माझ्या डोळ्यापुढे विजेसारखा झर्रकन चमकून गेला. साहेबरावच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला. घाबरून त्यानं मोठ्ठा आवंढा गिळला. शरमेनं अवघडून त्याचा चेहरा कसनुसा होऊन अक्षरशः शतशः विदीर्ण झाला. खजील होऊन खाली गेलेली मान वर न करता, कुणाला काही कळायच्या आत, पायात चप्पलही न घालता, काट्याकुट्याची पर्वा न करता, चिखल तुडवीत त्यानं तडक रस्त्याकडे धाव घेतली.
……बघता बघता रस्त्यावरील कडेला लावलेल्या मोटारसायकलवर तो स्वार झाला आणि धुरळा उडवीत दिसेनासा झाला.
🤣😜🤣
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
लेखक परिचय-
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.
ते फेसबुकवर नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.
असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने प्रकाशित करीत आहोत.