https://goodworld.in A website by Madhav Bhope

आमची आंगणवाडी रद्द करू नका

anganwadi

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका

———————

( वादळामुळे झाली उपरती )

मित्रांनो

लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ३० सप्टेंबर १९९३ साली प्रलयंकारी भूकंप झाला होता याची तुम्हा सर्वांनाच माहिती असेल.

दोन्ही जिल्ह्यांमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. तसेच प्राणहानी सुध्दा झाली होती.दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ५२ गावे जवळपास बेचिराख झाली होती .  ६.२ रिश्टरचा भूकंप झाला होता.

शासनाने युद्ध पातळीवर पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्यासाठी एकूण १० डिव्हिजन ऑफिसेस  तातडीने सुरु केले होते. या दहा ऑफिसेस पैकी  उमरग्याच्या एका ऑफिसला Executive Engineer म्हणून माझी पोस्टिंग शासनाने केली . तिथे मी पाच वर्षे काम केले.

 या पाच वर्षांमध्ये बेचिराख झालेल्या एकूण ५ गावांचे संपूर्ण पुनर्वसन केले. १८ हजार घरांचे Retrofitting म्हणजे क्षतिग्रस्त झालेल्या घरांची तंत्रशुध्द पध्दतीने दुरुस्ती आणि १५० नविन अंगणवाड्या आणि १०० शाळेच्या इमारतींची दुरूस्ती

एवढी सगळी कामे माझ्या ऑफिसने केली.पाच वर्षात शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले.

यासर्व कामांपैकी एका छोट्या कामाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

शासनातर्फे प्रत्येक खेड्यामध्ये नवीन अंगणवाडी बांधण्याचा कार्यक्रम होता. तुळजापूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या बांधण्याचे काम माझ्या ऑफिसकडे होते.

योजना अशी होती की ज्या गावाला नवीन अंगणवाडी मंजूर झाली आहे त्या गावच्या  ग्रामपंचायतीने  बाराशे चौरस फूट जमिनीचे  संमतिपत्र आम्हाला ठराव पास करून करून द्यावे व मग आमच्या ऑफिसतर्फे तिथे अंगणवाडी बांधली जाईल.जे गाव संमतिपत्र देणार नाही त्या गावात अर्थातच अंगणवाडी बांधली जाणार नाही.

आम्हाला बहुतेक कोणत्याही गावी असे संमतिपत्र मिळण्यास कांहीही अडचण आली.

पण एका गावी मात्र मला वेगळाच अनुभव आला. ग्रामपंचायत मेंबर्स मधील अंतर्गत कलह, हेवेदावे, दुफळी या कारणांमुळे माझ्या स्टाफला त्या गावाकडून संमतिपत्र मिळेच ना.माझ्या डेप्युटी इंजिनिअरने तसा रिपोर्टही मला सादर केला .मी म्हटले एकदा मी स्वत: त्या गावाला व्हिजिट देऊन प्रयत्न करून पहातो.

मी त्या गावी ग्रामपंचायत बोलावली. पण तिथली मंडळी आपल्या आडमुठे पणावर कायमच होती.ते लोक त्यांच्या अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे मला संमतिपत्र द्यायला तयारच नव्हते.

मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो,” मंडळी शासनाकडे बहुतेक पैशांची चणचण असते म्हणून विकासाची कामे वर्षोनवर्षे  रखडतात पण भूकंपग्रस्त गावांसाठी शासनाने भरपूर निधी दिला आहे . त्याचा तुमच्या गावासाठी फायदा करून घ्या. आम्हाला संमतिचा ठराव करून द्या. आम्ही तंत्रशुद्ध पध्दतीने अंगणवाडीचे बांधकाम करून देऊ . तुमच्यामधील  मतभेदामुळे लहान मुलांचे नुकसान करू नका…”

माझ्या या शिष्टाईचा कांहीही उपयोग झाला नाही.

मंडळी मला म्हणाली ,” साहेब , आम्ही कांही जमिनीचा ठराव देणार नाही. आम्हाला आहे एक जुनी अंगणवाडी ! तुम्ही जावा आपलं परत. आमचं आम्ही बघून घेऊ. “

स्वत:च नाक कापलं तरी हरकत नाही पण समोरच्याला अपशकुन झाला पाहिजे.या म्हणीचा प्रत्यय मला  तिथे आला.

मी म्हटले, ठीक आहे मंडळी. तुम्ही जमिनीचा ठराव करून द्यायचाच नाही असं म्हणताहात तर मी परत जातो. तुमची अंगणवाडी मात्र मला आता कॅन्सल करावी लागेल. ती मी आता दुसऱ्या होतकरू गावाला बांधीन…पण मला तुमची सध्याची अंगणवाडी कशी आहे ते तरी बघू द्या…”

गावच्या लोकांनी मला जुनी अंगणवाडी दाखवली. ती एक मोडकळीस आलेली दोन खोल्यांची जागा होती.छताच्या पत्र्यांचे fixtures निघून गेले होते .इमारत धोकादायक झाली होती.

मला रहावले नाही . मी म्हटले, ” मंडळी ही इमारत धोकादायक आहे . कांहीही होऊ शकते “

तरी सुध्दा लोक मला म्हणाले, ” आमचं आम्ही बघून घेऊ..”

मी परत जायला निघणार….

एवढ्यात सोसाट्याचे वादळ आले आणि पाच मिनिटांमध्ये त्या अंगणवाडीवरील दोन पत्रे आकाशात उंच उडाले  व मग खाली पडले . या पत्र्यांमुळे बालवाडीतली दोन छोटी मुले जखमी  झाली होती. मी त्या मुलांच्या पालकांना कारमध्ये बसायला सांगितले व ते मुलांना घेऊन निमुटपणे गाडीत बसले. ड्रायव्हरला सांगितले, कार अणदूरच्या दवाखान्यात घेऊन चला. एकदम फास्ट .कांही वेळातच आम्ही दवाखान्यात पोहोंचले . तेथील डाॅक्टर्सनी तातडीने मुलांवर उपचार केले. सुदैवानी एकाही मुलाला गंभीर इजा झाली नव्हती .

मुलांना घेऊन मी परत त्या गावात आलो. लोक माझी वाट पहात थांबले होते .मी गावकऱ्यांच्या स्वाधीन मुलं केली .आणि त्या लोकांना म्हणालो,  ” मंडळी सुदैवांने मुलांना  गंभीर झाली नाही. डाॅक्टरांनी औषधोपचार केला आहे. आता काळजीचं कांही विशेष कारण नाही..लेकरांना सांभाळा येतो मी…”

मी निघालो. पण लोकांनी माझी कार अडवली.

मी खाली उतरलो.

त्यांचा म्होरक्या मला म्हणाला..” साहेब आम्हाला माफ करा. आम्ही माती खाल्ली.आमच्या हेव्यादाव्यात लेकरांचं नुकसान करायला निघालो होतो.पण आता असं होणार नाही. तुम्हाला आम्ही आत्ताच्या आत्ता संमतिपत्र अन् ग्रामपंचायतीचा ठराव करून देतो. तो घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका अन् मेहेरबानी करून आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका..”

मला काय  ? मला तर हेच हवे होते…

एका तासामध्ये त्या गावकऱ्यांकडून जमिनीचे संमतिपत्र,  काॅफीचा पाहुणचार व भरपूर  सदिच्छा व आदर एवढा सगळा ऐवज घेऊन मी आनंदाने उमरग्याला परत आलो .

माझ्या साडेछत्तीस वर्षांच्या सर्व्हीस मध्ये माझे प्रकल्प यशस्वी करण्यात मला खूप लोकांचे सहकार्य मिळाले.

पण या प्रकरणी मात्र चक्क निसर्गच  माझ्या मदतीला धावून आला…..

कदाचित त्याला वाटले असावे..” चला.. हा बिचारा एवढ्या तळमळीने. प्रयत्न करतोय तर आपण त्याला मदत करू या ..”

v.d.bhope
v.d.bhope

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

तुम तो ठहरे परदेसी

tum to thahare pardesi

Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra

 

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

सुबह पहली गाडी से

तुम तो चले जाओगे

 ………………………….

 

मित्रांनो

असाच एक किस्सा तुमच्या बरोबर शेअर करतोय …

 

साधारणपणे १९९७ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी उमरग्याला कार्यरत होतो .१९९३ साली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जो प्रलयंकारी भूकंप झाला त्या भूकंपात एकूण ५२ गावे फार मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे जवळपास बेचिराख झाली होती. व मनुष्यहानीही कांही हजारांमध्ये झाली होती .

माझ्याकडे एकूण ५ गावांच्या पुनर्वसनाचे काम होते.सरकारनेही भूकंप पुनर्वसनाचे काम वेळेत व्हावे म्हणून सुमारे ८०० इंजिनीअर्स या प्रकल्पावर नेमले होते .

ज्या गावाच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले तेथील सर्व नवीन घरे , शाळा , दवाखाना, ग्रामपंचायत, कम्युनिटी हाॅल ,इत्यादिंचा लोकार्पण सोहळा केला जायचा.त्यासाठी अर्थातच पालकमंत्री यायचे . बॅंडवालेही यायचे . भाषणे व्हायची. मंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते, चेलेचपाटे, खुशमस्करेही आवर्जून यायचे .कुणी सांगायचं मी साहेबांचा उजवा हात आहे बरं का !

अशाच एका नवीन वसलेल्या गावाचा उद्घाटनसोहळा होता.

 मंत्र्यांच्या स्तुतीपर भाषणे झाली. आमचा रोल म्हणजे या सोहळ्यास हजर राहणे तेही अनिच्छेने एवढाच होता. मंत्री महोदय भाषणास उभे राहिले …. शासन तुमच्या पाठीशी आहे  . तुमचं गाव आम्ही आता पूर्णपणे नवीन बांधून दिलं आहे .भूकंपग्रस्त लोकांना काहीही अडचण आली तर मी अर्ध्यारात्री धावून येईन. तुमची साथ मी कधीही सोडणार नाही असं साॅलिड आश्वासन मंत्र्यांनी  देऊ  न टाकलं…

त्यांच्या कार्यकर्त्यांनी व जमलेल्या लोकांनी  टाळ्या वाजवल्या . नंतर मंत्र्यांच्याच   एका उत्साही कार्यकर्त्यांने त्यांची  गावातून मिरवणूक काढण्याची टूम काढली.तो साहेबांचा उजवा हात म्हणवून घ्यायचा..

साहेबांची मिरवणूक गावातून निघाली…एका कार्यकर्त्याने बॅंडवाल्यांना इशारा केला चांगलं गाणं वाजवा रे…

बॅंडवाल्यांना काय , त्यांनी लगेच त्या काळातलं अल्ताफ राजाचं गाणं   सुरु केलं….

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

सुबह पहली गाडीसे

तुम तो चले जाओगे

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे….

 

कार्यकर्ता माझ्या चांगल्या ओळखीतला होता.बैठकीतलाही होता.मी त्याचा शर्ट ओढून त्याला म्हटलं ,  हे काय गाणं  लावलं राव. मंत्र्यांनी आत्ताच भाषणात लोकांना  साथ देण्याचं आश्वासन दिलंय अन् तुम्ही हे गाणं लावलं …

त्यावर  तो म्हणाला ,…

जाऊ द्या हो साहेब . मंत्र्यांना काय त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पायजे,बॅंड पायजे अन् स्वत:ची मिरवणूक पायजे…हे सगळं  आहे ना, बस तर मग…बॅंडवर कोणतं का गाणं वाजेना.कोण लक्ष देतोय .तुम्ही त्यांच्या चेहेऱ्याकडे पहा बरं , किती खुश दिसताहेत ते..’

मी हळूच मंत्र्यांच्या चेहेऱ्याकडे पाहिलं . मिरवणुकीचा एवढा लवाजमा पाहून स्वारी जाम खुश दिसत होती…

मी कार्यकर्त्याला म्हटलं , तुमच बरोबर आहे रावं . आम्हाला नाही कळत तुमच्या एवढं. खुशाल  चालू द्या गाणं

 

तुम तो ठहरे परदेसी

साथ क्या निभाओगे

 

😁😃😜🤑🤑😄

v.d.bhope
v.d.bhope

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन  विभाग, महाराष्ट्र सरकार 

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.

संभाषणाची कला

The art of talking
Guest Article by Vd. Sohan Pathak.
 
हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*
अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|
यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:
स्यात विषमेव तद्वच:||*
 

पञ्चतन्त्र

अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे.
 
आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल किंवा समोरच्याचे विचार पटले नाहीत तर हे शस्त्र चुकीच्या पद्धतीने चालवल्या जाते.
 
असं म्हणतात की आपल्या वाणीला भूतकाळाचा शाप आहे. 
म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिक्रिया देताना भूतकाळातल्या कटू आठवणी जागृत होतात आणि आपल्या बोलण्यातून नको त्या वेळी व्यक्त होतात.  खरतर त्यावेळेस ते बोलणे योग्य नसतं त्यामुळे जो विषय आपल्याला पटत नाही त्या विषयावर साधक बाधक चर्चा होण्याच्या ऐवजी चर्चेचा विषय दुसरी कडे जातो आणि विनाकारण वाक्युद्ध होण्याची शक्यता असते.
 
काहीजणांना अजून एक गैरसमज असतो की आपलं दुःख, आपल्या वेदना, आपलं असमाधान केवळ बोलल्या मुळेच व्यक्त होऊ शकतेआणि ते वारंवार त्याबाबत बोलत राहतात त्यामुळे कदाचित यामुळे समोरच्या मनातली त्यांच्या दुःखा बद्दलची सहानभूती सुद्धा कमी होऊ शकते. पण बोलणाऱ्या व्यक्तीला हे कळत नाही त्या भूतकाळातल्या भुतांना ते धरून बसलेले असतात.
 
त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट बोलताना निश्चितच विचार करून बोलावे.
 
आयुर्वेदामध्ये शरीर कर्म, मानस कर्म आणि वाक् कर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत सांगितले आहेत की बाकीचे कर्म करताना जसे आपण काही नियम पाळणं आवश्यक असतं तसे बोलताना सुद्धा नियम पाळणे आवश्यक आहे. शब्दांची फेक त्यांच्या उच्चाराची पद्धत, शब्दांची निवड त्यावेळेस व्यक्त झालेले हावभाव याची खूप काळजी घेऊन बोलावं कारण तुम्हाला बोलताना या गोष्टी जाणवत नसतात पण थेट समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला भिडण्याची त्याची तीव्रता असते. 
 
यातूनच व्यक्तीसंबंधातले अडथळे, गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता जास्त असते. बोलतांना भविष्यातली चिंता शब्दांनी वारंवार व्यक्त केली तर बऱ्याच वेळा आपल्या मनात त्याच गोष्टी राहतात व पुढे घटनाही त्याच पद्धतीने होतात. नकारात्मक बोलण्याचा समोरच्याच्या वर जितका वाईट परिणाम होतो त्यापेक्षा कैक पटीने त्याचा स्वतःवर वाईट परिणाम होतो.
 
पण याचा अर्थ मौन पाळणे किंवा शब्दात व्यक्त न होणे असा कदापि नाही. निश्चित बोलणं हे महत्त्वाचं आहे फक्त आपण व्यक्त होताना समोरचा अवाक् (अव्यक्त) होऊ नये. आपण काय, कुठे, कसं बोलतो आहोत हे मात्र खूप महत्त्वाचं.
 
पूर्वाभिभाषी, सुमुखः सुशीलः करुणामृदुः॥
 
आयुर्वेदात वाक् कर्म किंवा बोलणे याबाबत खूप छान नियम सांगितले आहेत. 
 
कोणी व्यक्ती भेटली तर आपण स्वतःहून बोलावे शक्यतो आपण सुमुख म्हणजेच आनंदी चेहऱ्याने व्यक्त व्हावे सुशीलता व मृदूता आपल्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा.
आपले वचन पैशुन्य व परुष नसावे. 
 
पैशून्य म्हणजे कोणाची तरी तक्रार त्याच्या परोक्ष करणे, एका व्यक्तीबद्दल वाईट दुसऱ्या व्यक्तीकडे बोलणे. आणि परुष म्हणजे कठोर बोलणे.
 
समाजात काही व्यक्ती या शिस्तप्रिय, काटेकोर असतात त्यांची जीवनाची काही मूल्य असतात परंतु त्यांचा अट्टाहास असतो की त्यांचे जीवनमूल्ये त्यांच्यासोबतच्या व्यक्तीं ने सुद्धा अंगीकारावी.  त्यांचा उद्देश योग्य असू शकतो परंतु त्यासाठी कठोर बोलणे समोरच्याचा अपमान करणे, दुसऱ्यांची जीवन मूल्य चुकीचे ठरवणे हा मार्ग योग्य नाही.  त्यामुळे त्यांच्या, सामाजिक जीवनात, नातेसंबंधात अनेक अडथळे येतात.
 
केवळ चुकीच्या बोलण्यामुळे ते त्यांचे आदर्शत्व घालवून बसतात. दुसर्यांच्या चुका काढणे, स्वतः बद्दलच बोलत राहणे, भिन्न मताचा अनादर, आपल्या देहबोलीत आणि वाणीतून चुकीच्या पद्धतीने अस्वीकार्यता दाखवणे, स्वार्थासाठी खोटे बोलणे, उपायापेक्षा प्रश्न अधिष्ठित जास्त बोलणे, आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना, आर्थिक, सामाजिक स्तर कमी असणाऱ्यांना नेहमी आज्ञार्थ बोलणे हे गैरसमज वाद पसरवणारे घटक आहेत.
 
त्यातूनच जीवनात अनुत्तरीत कठीण व दुःखद प्रसंग निर्माण होऊ शकतात. समोरच्याच्या उत्साह वाढवणारे, आधार देणारे ,कौतुक करणारे, उपाय सूचक, अभिनंदन करणारे, योग्य शब्दात मार्गदर्शन करणारे शब्द आपल्या व समोरच्याचे मानसिक आरोग्य, क्षमता वाढवणारे असतात. म्हणून आपल्या बोलण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
 
वरील  लेख हा, संभाजीनगर येथील प्रथितयश वैद्य सोहन पाठक यांच्या फेसबुकवरून साभार घेतला आहे.  सदरील लेख त्यांच्या फेसबुकवर दि. 14-10.2021 रोजी पोस्ट झालेला होता.
वैद्य सोहन पाठक
श्रद्धा आयुर्वेद चिकित्सालय
तद्विद समुपदेशन केंद्र
व अमृत नाद ध्यानकेंद्र
9822303175
sohanpathak@gmail.com
 
 
 

Go to  Amazon to shop and order for yoga mat or any amazon product, by clicking on the icon.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान -5

loka sange brahmadnyan

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (५)

मार्च एंड झाल्यानंतर महिन्याभरातच माझी बदली पुन्हा महाराष्ट्रात झाली. रीतसर निरोप समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिनी ट्रक मध्ये सामान भरून निघायचे ठरले. मात्र दुसऱ्या दिवशी मिनी ट्रक सकाळ ऐवजी संध्याकाळी आला आणि सामान भरून निघायला रात्र झाली.

अंधाऱ्या रात्री निबीड अरण्यातून सुनसान, निर्मनुष्य रस्त्याने आमचा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. ट्रकच्या केबिन मध्ये ड्रायव्हर शेजारील दुहेरी सीटवर मी पत्नी व मुलांसह बसलो होतो. भोवतालच्या गडद काळोखातून मार्ग काढीत ट्रक धीम्या गतीने पुढे चालला होता. त्याच्या हेड लाईटच्या प्रकाशात रस्ता ओलांडणारे साप, ससे, मोर, हरीण, कोल्हे असे वनचर प्राणी पाहून आपण थिएटर मध्ये बसून “जंगल बुक”, “लॉयन किंग” किंवा “नार्निया” सारखा चित्रपट “थ्री-डी” मध्ये पाहतो आहोत, असा भास होत होता.

एका जीवघेण्या वळणावर अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबल्यामुळे कर्कश आवाज करीत ट्रक थांबला. झाडाच्या फांद्या आडव्या टाकून कुणीतरी जाणून बुजून रस्ता बंद केलेला होता. हा वाटमारीचा तर प्रकार नाही ना, अशी शंका येऊन सावधपणे कानोसा घेत आम्ही गाडीतच स्तब्ध बसून राहिलो.

थोडा वेळ असाच भयाण, रहस्यमय शांततेत गेला. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावरील गर्द झाडीत जराशी कुजबुज व हालचाल जाणवली. मध्येच एखादा टॉर्च क्षणभर चमकून लगेच विझायचा. एखाद्या दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघाच्या चमकणाऱ्या डोळ्यां सारखाच तो लुकलुकणारा प्रकाश भासायचा.

झाडीतून कुणीतरी खुणेची कर्णकटू शिटी वाजविली आणि गलका करीत हातात लाठी आणि टॉर्च घेतलेल्या पंधरावीस जणांनी खालचा उतार चढून रस्त्यावर येत आमच्या ट्रकला वेढा घातला. त्यातील एक जणाने टॉर्चच्या प्रकाशात ट्रकची नंबर प्लेट पाहिली आणि “हाच तो ट्रक आहे !” असे तेलगू भाषेत कुणालातरी ओरडून सांगितले. लगेच रस्त्यावरील झाडाचा अडथळा बाजूला करून दोन मोठ्या व्हॅन आमच्या ट्रक समोर येऊन थांबल्या. एखाद्या कुख्यात डाकूच्या टोळीला पोलिसांनी चारी बाजूंनी घेरावं तसं चित्रपटातल्या सारखं ते दृश्य होतं.

ते टॉर्चधारी, फॉरेस्ट खात्याच्या फ्लाईंग स्क्वाडचे लोक होते. सागवानाने भरलेला एक ट्रक उतनुरहून महाराष्ट्राकडे निघाला आहे अशी गुप्त खबर त्यांना मिळाली होती. मागच्या बाजूने आत चढून त्यांनी ट्रकची तपासणी सुरू केली. आतील घरगुती फर्निचर पाहून त्यांचा प्रचंड विरस झाला. “त्या” दहा सागफळ्या पाहून त्यांचे डोळे आनंदाने चकाकले. पण त्यावरील फॉरेस्ट विभागाचा शिक्का पाहताच पुन्हा एकदा ते निराश झाले. एव्हाना माझी ट्रान्स्फर ऑर्डर व रीलिव्हिंग लेटर मी त्यांच्या ऑफिसरला दाखविले होते.

मग अखेरचा प्रयत्न म्हणून,

“कशावरून हे फर्निचर व या साग फळ्या चोरीच्या नाहीत ? तुमच्या जवळ हे लाकूड खरेदी केल्याची सरकारी पावती आहे काय ?” असा बिनतोड कायदेशीर प्रश्न विचारून मला कोंडीत पकडण्याचा त्यांच्या ऑफिसरने प्रयत्न केला.

सर्व फर्निचर तसेच साग फळ्यांचा उल्लेख असलेली सूर्यकुमार साहेबांनी दिलेली फॉरेस्ट विभागाची दंडाची पावती आठवणीने खिशात ठेवली होतीच. ती त्या ऑफिसरला दाखवताच..

“कशावरून ही पावती खरी आहे ? आजकाल अशा बनावट पावत्यांचा सुळसुळाट झाला आहे ? या पावती वरील सही कुणाची आहे ?”

असा निष्फळ युक्तिवाद करीत मला चाचपण्याचा त्याने शेवटचा प्रयत्न केला.

“फॉरेस्ट रेंजर श्री.सूर्यकुमार साहेबांची ही सही आहे. तुमच्या जवळ असलेल्या वायरलेस सेट वरून त्यांच्याशी संपर्क साधून पावतीच्या खरेपणाबद्दल खात्री करून घेऊ शकता..!”

माझ्या ह्या उत्तराने देखील त्या ऑफिसरचे पुरेपूर समाधान झालेले दिसत नव्हते.

“सूर्यकुमार साहेब आज इथेच आहेत. बाजूच्या जंगलातील टेन्ट मध्ये बसले आहेत. त्यांना ही पावती दाखवून येतो..”

असे म्हणून ती पावती घेऊन तो ऑफिसर बाजूच्या जंगलात उतरत काळोखात दिसेनासा झाला.

आज आपलं काही खरं नाही, हे फॉरेस्ट वाले आपल्याला लवकर सोडणार नाहीत असा विचार करून आमच्या ड्रायव्हरने आपला सामानाचा ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला आणि खाली उतरून एका फॉरेस्ट गार्डशी तेलगू भाषेत गप्पा मारत निवांतपणे बिडी ओढू लागला.

माझा लहान मुलगा या साऱ्या प्रकाराने खूप घाबरला होता. सुनसान दाट जंगल, सर्वत्र असलेला गर्द भीषण काळोख, भुतासारखे भासणारे उंचच उंच स्तब्ध साग वृक्ष.. अशा वातावरणात आमच्या ट्रकचे तसेच फॉरेस्टच्या दोन्ही व्हॅनचे हेड लाइट्स अजूनही ऑनच होते. भरीस भर म्हणून ट्रकला वेढा घातलेल्या पंधरा वीस गार्ड्सच्या हातातील प्रखर झोताचे टॉर्चही सुरूच होते. एखाद्या चोराकडे किंवा पिंजऱ्यातील हिंस्त्र जनावराकडे पहावे तसे ते खाली उभे राहून आमच्याकडे बघत होते.

“पप्पा, हे आपल्याला मारून तर टाकणार नाही ना ?”

माझा पाच वर्षाचा लहान मुलगा मला भीतीने बिलगत विचारत होता. कदाचित टीव्हीवर पाहिलेल्या सिनेमातील अशाच प्रकारची डाकुंची दृश्ये त्याला आठवत असावीत. खरं तर त्याला खूप जोराची लघवी लागली होती. पण अशा धोकादायक जागी लघवीसाठी खाली उतरण्यास तो तयार नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्हा तिघांनाही खूप झोप येत होती. जांभया देत अवती भवतीच्या मिट्ट अंधाराकडे पहात आम्ही जागे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. रातकिड्यांची किरकिर, टिटवी सारख्या पक्ष्यांचे ओरडणे आणि अधून मधून ऐकू येणारी झाडांच्या पानांची सळसळ व फॉरेस्ट गार्ड्सची हलक्या आवाजातील कुजबुज..! सारंच खूप भयाण, कंटाळवाणं वाटत होतं. वेळ जाता जात नव्हता..

सूर्यकुमार साहेब जंगलातील त्यांच्या टेन्टच्या बाहेर येणार नाहीत याबद्दल मला पक्की खात्री होती. तशीही पुन्हा त्यांचे तोंड पाहण्याची मलाही अजिबातच इच्छा नव्हती.

बऱ्याच वेळाने जंगलात गेलेला तो अधिकारी परत येताना दिसला.

“रेंजर साब आपसे खुद ही मिलना चाहते है ! प्लीज, आप नीचे आईये.. !!”

जवळ येऊन नम्र भाषेत तो विनंती करता झाला.

“पप्पा, खाली उतरू नका..” असं ओरडून माझा शर्ट घट्ट पकडीत मुलगा विनवित असताना त्याचाकडे लक्ष न देता मी खाली उतरलो. ऑफिसरने माझ्यासाठी खुर्ची मागवली. त्यावर बसून मी रेंजर साहेबांची वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने अचानक माझ्या खुर्चीमागून येऊन समोर प्रगट होत आपल्या चिरपरिचित हसऱ्या मुद्रेने “जय हिंद, सर !” म्हणत सूर्यकुमार साहेबांनी मला आदराने कडक सल्युट ठोकला. त्यानंतर लगेच माझा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला आणि बळजबरीने मला जवळ खेचत घट्ट मिठी मारून म्हणाले..

“ओहो.. व्हॉट अ सरप्राइज ! सर, कितने दिनों के बाद मिल रहे है हम.. ! रिअली अनबिलिव्हेबल.. !!”

ट्रक मध्ये बसलेल्या माझ्या पत्नीकडे लक्ष जाताच ट्रकच्या दरवाजा जवळ जात हात हलवित म्हणाले..

“हॅलो भाभीजी, कैसे है आप ? फायनली, अपने गाँव वापस जा रहे हो ? आपका बनाया टेस्टी मसाला डोसा अभी भी याद है.. फिरसे खाने के लिए एक दिन जरूर महाराष्ट्रा में आपके घर आऊंगा.. !! विश यू हॅपी जर्नी, मॅडम..!”

त्यानंतर आईला बिलगून त्यांच्याकडे संशय मिश्रित कुतूहलाने पाहणाऱ्या लहानग्या अनिश कडे पाहून म्हणाले..

“हाय प्रिन्स ! डरो मत.. हम तुम्हारे पापा के दोस्त है..”

त्यानंतर खिशातून मूठभर चॉकलेट्स काढून ती अनिशच्या हातात ठेवत म्हणाले..

“हॅव धिस..! इस जंगल में तुम्हे बस इतना ही दे सकता हूं मैं..!”

रेंजर साहेबांच्या मैत्रीच्या या खोट्या प्रदर्शनाला मी आता भुलणार नव्हतो. माझ्या डोळ्यांतील तिरस्कृत भाव आणि कोरड्या प्रतिसादा वरून त्यांच्या ही ते सहज लक्षात आलं असावं. त्याकडे दुर्लक्ष करीत..

“दिन में निकलने की बजाए, आप इतनी रात में क्यों निकले ? वो भी फॅमिली के साथ.. और ऐसे ट्रक मे बैठ कर..! आपका बँक, कार का पैसा नही देता क्या ? अरे भाई, ये खतरनाक जंगल है.. चिता, शेर, भालू कभी भी अटॅक कर सकते है..! और हमारे डिपार्टमेंट को टीक स्मगलिंग का डाउट भी आता है ऐसे रात में चलने वाले व्हेईकल्स पर.. !!”

असं म्हणून त्यांनी हाताखालच्या अधिकाऱ्यांशी कसली तरी महत्त्वाची गंभीर चर्चा केली. त्यानंतर आमच्या ट्रकच्या ड्रायव्हरला बोलावून घेत त्याला तेलगू भाषेत काही तरी समजावून सांगितलं. मग माझ्याकडे वळून ते म्हणाले..

“आज हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट के सेंट्रल अँटी टीक स्मगलिंग फोर्स का annual इन्स्पेक्शन है.. यहाँ से “निर्मल-भैंसा” रास्ते तक जगह जगह पर डिटेल चेकिंग हो रही है.. बेवजह इस रास्ते पर आपको बहुत तकलीफ होगी.. रुकना भी पडेगा हर जगह.. यहाँ से महाराष्ट्र बॉर्डर तक जाने वाला एक कच्चा शॉर्ट कट है, जहाँ पर आज की चेकिंग नही है.. वहां से ये मिनी ट्रक आसानीसे निकल सकता है.. आप लोग हमारी सफारी जीप में पक्के रास्ते से स्टेट बॉर्डर तक जाइए.. ट्रक के साथ हमारा एक ऑफिसर रहेगा.. प्लीज, इन्कार मत करना..! आप को सच्चे दिल से मदत करना चाहता हूं.. !!”

दोन्ही हात जोडत सूर्यकुमार विनवणी करीत होते.

थोड्याशा अनिच्छेनेच आम्ही फॉरेस्टच्या जीप मध्ये बसलो. मी अद्याप रेंजर साहेबांशी एक शब्दही बोललो नव्हतो. आम्ही निघतानाही त्यांच्याकडे पहाणं मी हेतुपुरस्सरपणे टाळलं. टेन्ट मधून काही ब्रेड व बिस्कीटांचे पुडे मागवून ते आम्हाला देण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरकडे दिले. जीप बरीच पुढे गेल्यावर मी सहज मागे वळून पाहिलं.. रेंजर साहेब अजूनही रस्त्यावर उभे राहून आमच्याकडेच पहात हात हलवून निरोप देत होते.

फॉरेस्टच्या जीपमधून म्हैसा (Bhainsa) जवळील महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून नांदेड जिल्ह्यातील भोकर पर्यंत पोहोचलो. थोड्याच वेळात आमचा मिनी ट्रक ही तिथे येऊन पोहोचला. ट्रक सोबत आलेल्या आंध्र प्रदेशच्या फॉरेस्ट ऑफिसर सोबत तिथल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता घेतला. आमचा निरोप घेताना त्या ऑफिसरने वायरलेस सेट वरून सूर्यकुमार साहेबांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

आत्ता नुकत्याच केलेल्या मदतीबद्दल “थॅन्क्स!” असं म्हणून त्यांचे आभार मानले तेंव्हा उत्तरा दाखल बोलताना ते म्हणाले..

“सर, आय नो, मुझ पर बहुत नाराज हो आप.. ! न जाने हमारे मुल्क से कैसी कैसी भली बुरी यादें साथ ले कर जा रहे हो…

आप मेरे बंगले पर आकर गए.. आपको मेरे प्रायव्हेट हॉल मे जाते हुए मैने देख लिया था, ईसलिये उस दिन मै बाहर से ही वापस लौट गया था..

आपने मेरी ऐशो-आराम भरी, शौकिया पसंद, सुखभोगी, विलासितापूर्ण जिंदगी तो देख ली.. मेरी कथनी और करनी में अंतर भी देख लिया.. मै ऐसा ही हूं, मुझे लक्झरी लाईफ जीने की आदत सी पड़ गई है..

आपको अभी दुनिया का ठीक से तजुर्बा नही है.. दुनिया ऐसी ही है.. जो दिखती है वैसी कभी नही होती..

फिर भी, आपसे कहना चाहूंगा की जहां तक हो सके ईमानदारीसे ही जिंदगी बिताओ.. बेईमानी की कमाई से इकठ्ठा की हुई इन चीजों से सुख और आराम तो अवश्य मिलता है, लेकिन शांती और समाधान कभी नही मिल सकता..

मैने आपको अपरिग्रह का जो रास्ता बताया था, वो अपनाना बहुत कठिन तो है, लेकिन सच्चा सुख उसी रास्ते पर चलनेसे मिलता है.. मुझे अफसोस है के मै खुद इस रास्ते पर चल न सका..

आप की फॅमिली बहुत खुबसुरत है, आप हमेशा खुश रहे, सुखी और समाधानी रहे, यहीं कामना करता हूं.. भाभीजी को प्रणाम !”

एवढं बोलून सूर्यकुमार साहेबांनी वायरलेस कट केला. आज त्यांच्याशी एवढं कडवट, त्रयस्थपणे वागल्याबद्दल मला चुटपुट लागून राहिली होती.

महाराष्ट्रातील रुक्ष रस्त्यांवरून भोकर, वसमत, औंढा, जिंतूर, मंठा मार्गे आणखी आठ तासांचा कंटाळवाणा प्रवास करून दुपारी उशिरा जालन्याला पोहोचलो. उतनुरचे ते हिरव्यागार जंगलाचे, भोळ्या आदिवासींचे, निर्दयी पोलिसांचे, क्रूर नक्षलवाद्यांचे, नवनवीन साहसी, रोमांचक अनुभवांचे दिवस आता सरले होते. निरर्थक इर्षा, द्वेष, स्पर्धा, चढाओढ, लाचारी, चमचेगिरी यांनी भरलेल्या स्वार्थी शहरी दुनियेत आपण पुन्हा प्रवेश करीत आहोत असेच प्रवास करताना जाणवत होते.

… आज इतक्या वर्षांनंतरही उतनुरच्या सागवानी रॉकिंग चेअर बसून झुलत झुलत कधी जैन तत्वे, गीतेची वचने, गांधींचे विचार, बुद्धांची प्रवचने वाचतो आणि त्यात “अपरिग्रह” शब्दाचा उल्लेख येतो तेंव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार साहेबांचा रुबाबदार हसरा चेहरा, त्यांनी माझ्या घरी दिलेलं मोटिव्हेशनल स्पीच आणि त्यांचा तो आलिशान दिवाणखाना आठवतो.

(समाप्त)

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

4..लोकां सांगे ब्रह्मज्ञान-4

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या या  कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, 5 भागांची ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.

amazon logo
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-4

rich home

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (४)

जीपने नुकताच वेग घेतला होता. माझे ओरडणे ऐकू जाताच करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज होऊन जीप थांबली. तशीच तिला घाईघाईत रिव्हर्स घेऊन दारासमोर थांबवून माझ्याकडे आश्चर्याने पाहत सूर्यकुमार खाली उतरले.

मी त्यांना घेऊन घरात गेलो आणि बैठकीतील दिवाणाकडे बोट दाखवून त्या खालच्या खळग्यात सागाच्या फळ्या आहेत असं सांगितलं. सूर्यकुमार साहेबांनी हवालदार साईनाथला दिवाणा खालून फळ्या बाहेर काढायला सांगितलं. तसंच रीतसर नोंद व पंचनामा होईपर्यंत मी आतील दुसऱ्या खोलीत थांबावं अशी त्यांनी मला विनंती केली. त्यानुसार बेडरूममध्ये जाऊन पंचनामा पूर्ण होण्याची मी वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने रेंजर साहेबांनी मला बाहेर बोलावलं. आठशे रूपयांच्या दंडाची पावती हातात ठेवून पैसे उद्या दिलेत तरी चालेल, असे ते म्हणाले. परंतु सुदैवाने घरात, बायको जवळ तेवढे पैसे होते, ते आणून ताबडतोब त्यांच्या हातात ठेवले.

त्यानंतर वन विभागाचा खुणेचा शिक्का त्या लाकडी फळ्यांवर मारण्यास त्यांनी साईनाथला सांगितलं. शिक्का मारण्याचे काम चालू असताना दहापैकी केवळ सहा फळ्याच साईनाथने बाहेर काढल्याचे माझ्या लक्षात आले.

“खाली आणखी चार फळ्या आहेत !” असे साईनाथला सांगताच डोळा मारत त्याने “गप्प रहा..!” अशी मला खूण केली.

नुकतेच आम्ही रामेश्वरम्, कन्याकुमारीला जाऊन आली होतो. तेथून आणलेले वेगवेगळ्या आकारांचे व विविध रंगांचे मोठमोठे आकर्षक समुद्री शंख शिंपले प्लास्टिकच्या कव्हर मध्ये घालून ते माळेसारखे बैठकीच्या खोलीत लटकवले होते. साईनाथ महाशयांना हे शंख शिंपले फारच आवडलेले दिसत होते. सकाळी घरात आल्यापासून वारंवार ते शंख शिंपले हातात घेऊन तो त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता.

“खूप मौल्यवान असतील ना हे शंख शिंपले ?” असा प्रश्न ही त्याने दोन तीनदा विचारला होता. तसे ते शंख शिंपले अगदीच स्वस्त किमतीचे होते. परंतु साईनाथच्या चेहऱ्यावरील सौंदर्यचकित भाव पाहून शिंपल्यांची खरी किंमत ऐकून त्याचा अपेक्षाभंग होऊन विरस होऊ नये म्हणून मी त्याच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली होती.

साईनाथ पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात आला आणि मला एका बाजूला घेत,

“मी मुद्दामच चार फळ्या खाली ठेवल्या आहेत. त्या बदल्यात तुम्ही मला ते शंख शिंपले द्या..!”

असे म्हणाला.

मी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत गेलो आणि ती भिंतीवर टांगलेली शंख शिंपल्यांची माळ काढून त्याच्या हातात ठेवत म्हणालो..

“ही माझ्याकडून तुला सप्रेम भेट ! याच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीही नको..”

त्यानंतर “आणखी चार फळ्या बाहेर काढायच्या राहिल्या असल्याचे” मी सूर्यकुमार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. हलगर्जीपणाबद्दल साईनाथला चार शिव्या हासडीत रेंजर साहेबांनी त्या चार फळ्या बाहेर काढून त्याची पंचनाम्यात नोंद घेतली. या चार फळ्यांचा जादा दंड न लावता लगेच फॉरेस्ट विभागाचा शिक्काही त्या फळ्यांवर मारून दिला.

मी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल व केलेल्या सहकार्या बद्दल त्यांनी माझे आभार मानले. त्यावर मी हात जोडून त्यांना म्हणालो की.. “माझ्या घरात जे सागवानी फर्निचर आहे त्या सर्वांवरही मी योग्य तो सरकारी दंड भरू इच्छितो. तसेच एक सोफा सेट मी बेकायदेशीररित्या बस द्वारे महाराष्ट्रात पाठविला आहे. त्या कृत्याबद्दल कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगण्यास मी तयार आहे तसेच त्याचा दंडही माझ्या कडून वसूल करावा.”

सर्व गुन्हे कबूल करून चटकन पापमुक्त होण्याची जणू मला घाईच झाली होती.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रेंजर साहेबांनी घरातील साऱ्या फर्निचर वर दंड आकारला. महाराष्ट्रात पाठविलेल्या सोफा सेटवरही दुप्पट दराने दंड लावून एकूण अडीच हजार रुपये एवढ्या रकमेची पावती दिली. शेजारी राहणाऱ्या घरमालका कडून तात्पुरते पैसे उसने घेऊन मी वन विभागाचा दंड लगेच भरून टाकला.

एका शिक्का मारलेल्या पावतीवर घरातील सर्व फर्निचरचा उल्लेख करून ती माझ्या हातात ठेवीत सूर्यकुमार म्हणाले की.. “ही पावती दाखविलीत तर फॉरेस्ट विभागाच्या कोणत्याही चेक पोस्टवर कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही.”

“रेड” यशस्वी करून परत जाताना अत्यानंदाने मला प्रेमभरी मिठी मारून रेंजर साहेब म्हणाले..

“मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी मी व्याख्यानं देतो. परंतु माझ्या उपदेशामुळे एखाद्याचे इतक्या अल्प अवधीत हृदयपरिवर्तन झाल्याचा हा पहिलाच अनुभव !

ड्युटीवर नसताना मी नेहमी हा असा पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट व पँट असे साधे कपडे घालतो, हे तुम्हाला माहीतच आहे. जीनची पँट, महागडे शूज, गॉगल्स, रिस्ट वॉच, बेल्टस्, परफ्युम्स, ब्रँडेड कपडे अशा गोष्टी मी कधीच वापरत नाही. गरिबीतून वर आल्यामुळे मी बराचसा साम्यवादी विचारसरणीचा आहे.

सरकारी अधिकारी असूनही सशस्त्र नक्षलवादी अतिरेक्यांचा सुळसुळाट असलेल्या येथील जंगलात मी निर्भयपणे एकटा फिरतो. अनेक खतरनाक नक्षलवाद्यांशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. माझी साधी राहणी आणि स्वच्छ चारित्र्य यांचा सर्वांवरच आपोआपच चांगला प्रभाव पडतो.

तुम्ही देखील साधी राहणी, अपरिग्रह, स्वाध्याय, आत्मसंयम व योग साधना यांचा अवलंब करून चिंतामुक्त सुखी जीवन जगावे, हीच मनोमन सदिच्छा.. !!”

एवढं बोलून रेंजर साहेबांनी माझा निरोप घेतला. त्यांच्या साधेपणाला, उच्च विचारसरणीला, आदर्श, निर्मोही वृत्ती आणि निस्पृह कर्तव्यनिष्ठेला मी मनोमन सॅल्युट केला.

एका मोठ्या संकटातून माझी सहीसलामत सुटका झाली होती. दंड भरून मी कायमचा निश्चिंत झालो होतो. अंतर्मनाला लागलेली सद्सद विवेकबुद्धीची टोचणी देखील कमी झाली होती. मेंदू वरील अपराधाचं, काळजीचं मानसिक ओझं उतरल्यामुळे कसं हलकं हलकं वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो तेंव्हा हेड कॅशियर, मॅनेजर व अन्य दोघा सागफळ्या खरेदी पार्टनर्स कडे विशेष निरखून बघितलं. पण ते नेहमी सारखेच आपल्या रोजच्या कामात मग्न होते. त्यांचे माझ्याकडे लक्षही नव्हते.

म्हणजे ? काल ह्या चौघांवर फॉरेस्ट डिपार्टमेंटची रेड पडलीच नाही की काय ? रेंजर साहेब तर ह्या चौघांच्या घरी धाड टाकून लाकूड जप्त करून आल्याचं म्हणाले होते ? मग हे चौघे, असं काहीच न झाल्याचा खोटा आव तर आणत नाही आहेत ? “झाकली मूठ सव्वा लाखाची” असा विचार करून मी ही मग कालच्या फॉरेस्ट रेड बद्दल कुणाकडेही विषय काढला नाही.

बँकेत रेग्युलर ऑडिट आलं होतं. सर्वजण त्या संबंधीच्या कामात गर्क झाले होते. पंधरा दिवसांनी ऑडिट संपलं. शाखेला ऑडिटमध्ये उत्तम रेटिंग मिळाल्यामुळे सर्वजण खुष होते. त्या आनंदात मॅनेजर साहेबांनी सर्व स्टाफसाठी बँकेतच छोटीशी पार्टी अरेंज केली होती.

पार्टीत गप्पा मारत असताना अचानक काहीतरी आठवल्या सारखं करून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आपको बताना भूल ही गया इस ऑडिटकी गडबडमे.. वो, फॉरेस्ट रेंजर सूर्यकुमार आपके घर आ सकता है कभी भी.. आपके घर में इल्लीगल लकडी का स्टॉक है ऐसा बोल के, डरा धमका कर आप से फाईन भरने को कहेंगा.. उस को बिलकुल भाव मत देना.. ‘मॅनेजर साब से बात करो’, ऐसा कहना..

जब भी कोई बाहर के स्टेट का नया स्टाफ आता है तो ये लोग ऐसी ही चाल चलते है.. दरअसल उनके डिपार्टमेंट की सॅलरी, टीए बिल और अन्य सभी बिल का पेमेंट हम ही करते है.. उनके सारे स्टाफ को हम ने पर्सनल लोन भी दे रक्खा है.. हमेशा, बँक का समय समाप्त होने के बाद आने पर भी हम उन्हे पेमेंट देकर को-ऑपरेशन करते है इसलीये वो हमारे शुक्रगुजार रहते है और हमसे दब कर, थोडा डर कर भी रहते है..

.. और एक बात ! उस रेंजर सूर्यकुमार की बड़ी बड़ी बातों में मत आना.. वो जैसे दिखता है और दिखाता है, वैसा बिलकुल नहीं है !”

मॅनेजर साहेबांचे बोलणे ऐकून माझा पार्टीचा मूडच गेला. आपली फार मोठी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. कसेबसे दोन घास खाऊन मी घरी परतलो.

त्या दिवसानंतर सूर्यकुमार साहेब मला कधीच भेटले नाहीत. फॉरेस्ट विभागाच्या कर्ज योजने संबंधी मीटिंग्ज मध्ये तसेच कर्ज मंजुरीच्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये ही ते गैरहजर असायचे.

रेंजर साहेबांच्या भ्रष्ट कारभाराचे, लाचखाऊ वृत्तीचे काही किस्सेही उडत उडत माझ्या कानावर आले. नक्षलवादी लोकांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा लोकांना संशय होता. भरभक्कम मोठी लाच घेऊन ट्रकचे ट्रक सागवान चोरून स्मगल करणाऱ्या गुन्हेगारी रॅकेटचा ते हिस्सा असल्याबद्दल लोकांत कुजबुज होती.

अशातच आमच्या शाखेचा पंचविसावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरले. रेंजर साहेबांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते. निमंत्रण पत्रिका घेऊन सकाळी नऊ वाजता रेंजर साहेबांच्या बंगल्यावर गेलो तेंव्हा ते बाहेर कुठेतरी जवळपासच गेले आहेत, असे गेट वरील रखवालदार म्हणाला. साहेब येईपर्यंत बंगल्याच्या दिवाणखान्यात थांबू शकता, असेही तो म्हणाला. मलाही त्यांचे घर पाहण्याची उत्सुकता होतीच, म्हणून मी दिवाणखान्यात प्रवेश केला.

त्या हॉलमध्ये बसण्यासाठी एक सतरंजी अंथरली होती. सतरंजीवर काही पुस्तके, ऑफिस फाईल्स, डायऱ्या व एक पेन होता. कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवलेला होता. अगदी रेंजर साहेबांनी वर्णन केल्याप्रमाणेच त्यांच्या घरातील दृश्य दिसत होते. माझ्या मनात पुन्हा त्यांच्याबद्दल कौतुकाचा भाव जागायला लागला.

थोड्या वेळाने त्यांचा खाजगी नोकर-कम्-खानसामा तिथे आला. “आपण साहेबांचे नातेवाईक आहात का ? रेंजर साहेब तुमचे कोण लागतात ?” असे त्याने विचारले. “ते माझे दोस्त आहेत..” असे त्याला सांगताच,

“अरे साब, फिर आप इधर निचे जमीनपर क्यों बैठे हो ? साब देखेंगे तो मुझ पर बहुत गुस्सा करेंगे.. चलो, आपको साब का प्रायव्हेट रुम दिखाता हुं.. वहां आराम से बैठ कर वेट करो, साब आते ही होंगे, तब तक मैं आप के लिए चाय बनाकर लाता हूं..”

असे म्हणत तो मला बंगल्याच्या मागे घेऊन गेला. तिथे आणखी एक छोटीशी टुमदार बंगली होती. त्याच्या व्हरांड्यात दोन उत्कृष्ट कलाकुसरीच्या सागवानी झुलत्या (रॉकिंग) चेअर्स ठेवलेल्या होत्या. काळ्या शिसवी लाकडाचे उत्तमोत्तम मुखवटे व नाजूक कोरीव नक्षीकामाच्या सुंदर लाकडी वस्तूंनी व्हरांडा कलात्मकपणे सजविला होता.

या प्रायव्हेट बंगल्यातील दिवाणखान्याच्या फरशीवर जाडजूड गुबगुबीत उंची गालिचा अंथरला होता. चंदनी शिसमच्या भव्य शाही सोफ्यामुळे त्या हॉलला जणू राजवाड्याचाच लुक आला होता. छताला काचेची चमकणारी हंड्या झुंबरे टांगलेली होती. हॉलमधील सर्व दारे व खिडक्यांना आलिशान राजेशाही किनखापी पडदे लावलेले होते. हॉलभर फ्रेंच परफ्युमचा मंद सुगंध दरवळत होता.

हॉलच्या एका भिंतीवर पंचावन्न इंची रंगीत टीव्ही होता, तर बाजूलाच काचेच्या शो केस मध्ये काही फॅमिली फोटो फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. त्या फ्रेम्स मध्ये सूर्यकुमार साहेबांचे पत्नी सोबत काढलेले लंडन, पॅरिस, रोम, न्यूयॉर्क येथील फोटो होते. सोफ्या समोरील कॉफी टेबलवर फिल्म फेअर, स्टारडस्ट, फेमिना, डेबोनेर, इव्हज विकली अशी रंगीत, गुळगुळीत पानांची मासिके होती. टेबलच्या काचेखालील शेल्फवर “प्ले बॉय”, “लेग शो”, “मेन्स वर्ल्ड”, “प्रायव्हेट”, “सेलेब्रिटी स्किन”, “चिक” अशी उघड्या नागड्या चित्रांनी भरलेली विदेशी पोर्न मॅगझिन्स होती.

हॉलमध्ये एका बाजूला छोटासा मिनी बार होता. तेथील एका शेल्फ वर काचेची नाजूक निमुळती मदिरा पात्रे होती तर बाकी साऱ्या शेल्फ मध्ये विविध ब्रँड्सची व्हिस्की, रम, वाईन, ब्रँडी, बियर होती. शिवास रिगल, जॉनी वॉकर, ओल्ड माँक, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल नं.1, हवाना क्लब, स्मर्नऑफ, अब्सोल्युट व्होडका अशा प्रसिद्ध ब्रँडच्या बाटल्यांची लेबले बसल्या जागेवरून वाचता येत होती. याशिवाय एका शेल्फ मध्ये डनहिल, मार्लबरो, चेस्टरफिल्ड, कॅवेंदर्स, न्यूपोर्ट, बेन्सन अँड हेजेस अशा विदेशी ब्रँडच्या सिगारेटची पाकिटे ठेवली होती.

मिनी बारच्या भिंतीवर अर्धनग्न ओलेत्या मादक सौंदर्यवतीचे उभ्या आकारातील उत्तान छायाचित्र लावलेले होते. सोफ्यामागे मुख्य भिंतीवर सहा बाय चार फूट अशा मोठ्या आकाराचे शिकार करणाऱ्या आदिवासींचे हुबेहूब जिवंत दृश्य रेखाटलेले महागडे तैलचित्र पाहता क्षणीच लक्ष वेधून घेत होते. विलक्षण सुंदर लाकडाची कलाकुसर असलेले, सिनेमात श्रीमंतांच्या बंगल्यात दाखवितात तसे जाळीदार चेंजिंग पार्टिशन एका कोपऱ्यात ठेवले होते. अनेक उंची नाईट ड्रेस, जीन्स, टी शर्टस, कमरेचे बेल्टस पार्टिशन मागील लाकडी खुंटीवर मिरवत होते. खुंटीखाली आठ दहा प्रकारचे ब्रँडेड चपला बुटांचे जोड ओळीने लावून ठेवलेले होते.

एका भिंतीवर एअर कंडीशनर लावला होता. त्या एसी खाली काचेचा मोठा फिश पाँड होता. त्यातील रंग बदलणारे लाईट्स, खालून वर येणारे पाण्यातील बुडबुडे, आत फिरणारे रंगीबेरंगी मासे यामुळे खोलीतील वातावरण स्वप्नमय वाटत होते. फिश पाँड शेजारीच Sony ची स्टिरिओफोनिक म्युझिक सिस्टीम होती.

स्टडी टेबलवर छोट्याशा शेल्फ मध्ये रॉबर्ट लुडलम, सिडने शेल्डन, हॅरॉल्ड रॉबिन्स, अर्ल स्टॅन्ले गार्डनर या सारख्या तत्कालीन बेस्ट सेलर लेखकांची नॉव्हेल्स होती. आधुनिक डिझाईनचा टेबल लॅम्प, शुभ्र संगमरवरी व्हीनसचा अर्धपुतळा, ताज्या फुलांचा फ्लॉवरपॉट, कंबर, मान डुलवणारी जपानी बाहुली यांनी स्टडी टेबल सजला होता.

टेनिसच्या दोन रॅकेट्स आणि एक गिटार भिंतीची शोभा वाढवीत होते. श्रीमंती, लक्झरी लुक असलेला, लव्हली आर्ट मास्टरपीस भासणारा Boca Do Lobo या जगप्रसिद्ध ब्रँडचा बेल्जियम काचेचा ओव्हल शेपचा आरसा पाहूनच त्याच्या किमतीचा अंदाज येत होता. आरशा शेजारील ओपन पेंड्युलम असलेले स्विझरलँडचे अँटिक व्हिंटेज ककु क्लॉक घर मालकाच्या उच्च चोखंदळ कलासक्त वृत्तीची साक्ष देत होते.

एखाद्या गर्भश्रीमंत रसिक संस्थानिकाच्या रंग महालात बसल्यासारखं मला वाटत होतं. बाजूलाच रेंजर साहेबांचा खराखुरा रंगमहाल म्हणजेच शयनगृह (बेडरूम) होते. परंतु हॉल मधील श्रीमंतीचे हे ओंगळवाणे, बटबटीत प्रदर्शन पाहून त्या रंगमहालात साधं डोकावून पाहण्याची देखील इच्छा आता उरली नव्हती.

एवढ्यात साहेबांचा खानसामा एका ट्रे मध्ये चहा घेऊन आला. ट्रे मध्ये नेबिस्को, पिल्सबरी या सारख्या प्रसिद्ध विदेशी ब्रँडची सँडविच बिस्किटे व कुकीज तसेच जर्मनी, इटलीची मिल्क, व्हाईट आणि डार्क चॉकलेट्स होती. घट्ट दुधाचा अद्रक, लवंग, विलायची, दालचिनी घातलेला मसाला चहा पिताना मला सूर्यकुमार यांच्या अपरिग्रह, साधी राहणी व साम्यवादाच्या दांभिक गप्पा आठवत होत्या.

“हा माणूस दिसतो आणि दाखवतो तसा अजिबात नाही..” हे मॅनेजर साहेबांचे शब्द मला राहून राहून आठवत होते.

कसाबसा चहा संपवून मी उठलो. रेंजर साहेबांचे विलासी जीवन तसेच त्यांचा दुतोंडीपणा व ढोंगी मिथ्याचरण पाहून एकूणच साऱ्या प्रकाराचा उबग येऊन माझा जीव तिथे घुसमटू लागला होता. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व माझे व्हिजिटिंग कार्ड खानसाम्याच्या हातात देऊन खिन्न मनाने मी तेथून बाहेर पडलो.

एकीकडे दुनियेतील समस्त माणुसकीवरचा माझा विश्र्वासच उडाला होता तर दुसरीकडे स्वत:च्या बावळट, मूर्ख, भाबडेपणाचा मला प्रचंड राग येत होता..

(क्रमशः)

 

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3

forest officer

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (३)

सूर्यकुमार यांनी त्यांचा असिस्टंट हवालदार साईनाथला घराची झडती घेण्यास सांगितले. ढेरपोट्या, लालची नजरेचा साईनाथ आपली खाली घसरणारी पँट सावरीत शिकारी कुत्र्याच्या शोधक नजरेने घराचा कानाकोपरा धुंडाळू लागला.

बैठकीच्या खोलीत एक मोठा लाकडी दिवाण ठेवलेला होता. त्या दिवाणाखाली कोपऱ्यात भिंतीला लागून एक खळगा होता. त्या खळग्यातच सागफळ्या लपवून ठेवल्या होत्या. तिथपर्यंत बाहेरील प्रकाश पोहोचत नसल्याने दिवाणाखाली डोकावून पाहिले तरी खाली ठेवलेले सामान अजिबात दिसत नसे.

बेडरूम, स्वयंपाक घर, मागील बाजूचे संडास बाथरूम हे सारं पाहून रिकाम्या हाताने, मान हलवित साईनाथ परतला. स्टूल वर चढून घराच्या तिन्ही खोल्यांचे माळे बघितल्यावर बाहेरील जिन्याने तो गच्चीवर पोहोचला. टेरेस अगदी स्वच्छ आणि मोकळा होता.

“साब, या तो हमारी खबर गलत है, या फिर माल को यहाँ से कहीं दूसरी जगह शिफ्ट कर दिया है..!”

गच्चीवरून खाली येतांच साईनाथने सूर्यकुमार साहेबांना रिपोर्ट दिला.

“खबर तो गलत हो ही नहीं सकती..” असं स्वतःशी पुटपुटत सूर्यकुमार उठून घराबाहेर आले. घराच्या कंपाऊंड मध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर होती. विहिरीला लागून एक कुलूप लावून बंद केलेली काटक्यांची झोपडी होती. घरमालकाने त्यात निरुपयोगी, अडगळीचे सामान ठेवले होते.

घरमालकाकडून झोपडीची किल्ली मागवून रेंजर साहेबांनी झोपडी उघडली. आत साचलेली प्रचंड धूळ, लटकणारी मोठमोठी कोळीष्टके आणि दार उघडताच घाबरून लगबगीने अडगळीत लपलेले दोन चार सरपटणारे जीव बघतांच आंत पाऊलही न ठेवता त्यांनी झोपडीचा दरवाजा लगेच बंद केला आणि निराश होऊन पुन्हा घरात येऊन बसले.

अपराधी चेहऱ्याने, धडधडत्या छातीने आणि जीव मुठीत धरून बाजूला उभा रहात, निमुटपणे फॉरेस्ट विभागाची ही कारवाई पाहणारा मी, माझे गैरकृत्य अद्याप उघडकीस न आल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानीत होतो.

मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नीने सूर्यकुमार साहेबांना चहा, नाश्ता घेण्याचा अनेकदा आग्रह केला होता. परंतु “रेड” होत असताना संशयित व्यक्तीचे कोणतेही आदरातिथ्य स्वीकारत नसल्याचे सांगत त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. मात्र आता, माझ्या घरी सागवानाचा कोणताही अवैध साठा नसल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावरचेही दडपण नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावरील पूर्वीचा ताण पूर्णपणे निवळून त्याजागी नेहमीसारखे निर्मळ, आश्वासक, मनमोकळे हास्य उमलले होते.

स्वयंपाकघरात बायको लहान्या मुलासाठी मसाला डोसा तयार करीत होती. त्याच्या खमंग खरपूस वासाने सूर्यकुमार साहेबांची भूक चाळवली गेली असावी. माझ्या पाठीवर थाप मारीत ते म्हणाले..

“चलो भाई..! ड्युटी तो खतम हुई.. अब दोस्ती की बाते करेंगे..!”

नंतर किचनमध्ये डोकावत बायकोला ऐकू जाईल अशा बेताने मोठ्या आवाजात ते म्हणाले..

“भाभीजी शायद कुछ कह रही थी, चाय-नाश्ते के बारे में..! मै तो अपनी फॅमिली से दूर यहां अकेला ही रहता हूं, रोज बाहर का खाना खाता हूं.. आज मौका है, मौसम है, साथ में दोस्त भी है.. भाभीजी से कह दो, हमारा भी मन करता है कभी कभी घर का बना मसाला डोसा खाने को..!

रेंजर साहेबांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच तत्परतेने ताज्या गरम मसाला डोशाची प्लेट भरून बायकोने त्यांच्या हातात ठेवली.

मनसोक्त, भरपेट नाश्ता करून सूर्यकुमार आणि साईनाथ दोघेही तृप्त झाले. मग चहा घेता घेता अचानक गंभीर होत ते म्हणाले..

“आप दोनों से कुछ जरूरी और थोड़ी सीरियस बात करनी है.. जरा मॅडम को बाहर आनेको कहो..”

मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघेही आज्ञाधारक शिष्यांसारखे रेंजर साहेबां समोर येऊन बसलो. माझ्या डोळ्यात डोळे घालून एकटक रोखून पहात सूर्यकुमार म्हणाले..

“अपरिग्रह के बारेमे कुछ जानकारी है ? कभी कुछ पढ़ा है ?”

मी होकारार्थी मान हलवली.

आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे यालाच अपरिग्रह असे म्हणतात, हे मला ठाऊक होते. रेंजर साहेबांना तसे सांगताच खुश होऊन मान डोलावित ते म्हणाले..

“अगदी बरोबर ! अहिंसा व अपरिग्रह ही जैन धर्माची मुख्य तत्वे आहेत.

महर्षी पतंजलींनी साधनपादात अष्टांग योगाची साधना सांगितली आहे. त्यातील दोन अंगे म्हणजे यम आणि नियम. पतंजलींनी अपरिग्रह हा पाचवा यम मानला आहे. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा: !

महात्मा गांधी यांनी सुद्धा अपरिग्रह व्रताचा पुरस्कार केला. मग सांगा बरं, जीवनात अपरिग्रह अवलंबिल्यामुळे काय फायदा होतो ?”

सूर्यकुमार साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला.

“यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.”

फावल्या वेळातील अतिरिक्त वाचनामुळे मला माहिती असलेली उत्तरे मी पटापट देत होतो.

“अगदी अचूक ! पण फक्त साधे जीवन नाही, तर साधे आणि सुखी जीवन ! अर्थात कसलीही काळजी नसलेले, दुःखमुक्त जीवन..!”

सूर्यकुमार म्हणाले..

यानंतर, गुरुकुलातील एखाद्या तपस्वी ऋषी सारखे धीरगंभीर, अखंड, ओघवत्या प्रासादिक वाणीत त्यांनी चक्क अध्यात्मिक प्रवचन द्यायला सुरवात केली.

“मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो. हा संग्रह म्हणजेच ‘परिग्रह’. तर आपल्या देहधारणेस अत्यावश्यक नसणाऱ्या अशा साधनांचा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे ‘अपरिग्रह’ होय.

आपल्याला आनंद व सुख देणारी साधने मिळविण्यासाठी, ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्यांचा वियोग झाला असता होणारे दु:ख सहन करण्यासाठी मनुष्याला बरेच प्रयास, कष्ट करावे लागतात. शिवाय या साधनांचा उपभोग घेत असताना ती नित्य जवळ असावीत अशी इच्छा चित्तात निर्माण होत राहते. या इच्छेने चित्तात दु:ख निर्माण होते.

हे उपभोग्य विषय नित्य उपलब्ध राहावेत यासाठी मनुष्य प्रयत्नशील राहातो आणि भविष्यात त्यांचा वियोग होण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याला दु:ख होते. भौतिक, उपभोग्य वस्तूंचा परिग्रह हा मनुष्याच्या जीवन योगसाधनेतील अडथळा ठरू शकतो. यासाठी मनुष्याने, साधकाने केवळ देहधारणेस अत्यावश्यक वस्तूंचा संग्रह करावा.

अपरिग्रह साधल्याने हळूहळू उपभोगाच्या साधनांविषयी वैराग्य निर्माण होते. उपभोगाची साधने व शरीर ह्याविषयी साधकाच्या चित्तात वैराग्य निर्माण होते तेव्हा तो स्वत:कडे साक्षीभावाने पाहू लागतो. ‘मी’ आणि ‘माझा देह’ यातील संबंध नश्वर आहे अशी जाणीव त्याच्या मनात निर्माण होते, त्याचा देहाभिमान क्षीण होतो आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतात व त्याला भविष्याचेही ज्ञान होते.

अपरिग्रह ही एक प्रकारची साधना आहे. विषयांचा वारंवार भोग घेतल्याने इंद्रियाची त्याविषयी आसक्ती वाढते. आसक्तीमुळे पुण्य किवा पापरूपी कर्म घडते.

श्रीमद्भगवद्गीतेतही योग्याचे वर्णन करताना त्याने एकांतात राहून अपरिग्रहाचे पालन करीत मन स्थिर ठेवावे व साधना करावी असे म्हटले आहे. असा योगी मातीचे ढेकूळ, पाषाण किंवा सोने यांना सारखेच लेखतो.”

किंचित थांबून मंद हास्य करीत माझ्या पत्नीकडे पहात ते पुढे म्हणाले..

“भाभीजी, मी पाहतो आहे की तुमच्या घरात फ्रिज पासून टिव्ही पर्यंत सर्व आधुनिक सुखसोयींची साधने आहेत. डबल बेड, दिवाण, सोफा, रॉकिंग चेअर, टीपॉय, स्टडी टेबल, स्टूल असे भरगच्च सागवानी फर्निचर तुम्ही गोळा केले आहे. तुमच्या बेडवर फोमच्या महागड्या गाद्या आहेत. कपाटात किंवा बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे भरपूर दागिनेही असतील..

खरं सांगा, या साऱ्या वस्तू तुमच्या जवळ नसताना तुम्ही दुःखी होता का ?

तुम्ही एकदा माझ्या येथील बंगल्यावर येऊन बघा. माझ्या घरी साधी खुर्ची सुद्धा नाही. व्यायाम, लेखन, वाचन व अन्य सर्व कामं मी सतरंजीवर बसूनच करतो. रात्री झोपताना खाली जमिनीवर चटई अंथरून त्यावर झोपतो. कामानिमित्त मला भेटायला बंगल्यावर येणाऱ्याला एक तर उभे राहूनच बोलावे लागते किंवा माझ्यासारखे खाली सतरंजीवर बसावे लागते. माझ्या गरजा मी अत्यंत कमी ठेवल्या आहेत. त्यामुळेच मला कसलाही मोह स्पर्श करू शकत नाही आणि मी सदैव निर्भय, चिंतामुक्त व आनंदी राहतो.”

शेवटी आम्हा दोघांना हात जोडत नम्रपणे ते म्हणाले..

“माफ करा, तुम्हाला उपदेश करण्या इतकी माझी योग्यता नाही. तुम्ही सुज्ञ, सुसंस्कृत, सुजाण आहात. आपण सारे या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आपल्या निस्पृह, साध्या राहणीतून आपण समाजाला आदर्श घालून दिला पाहिजे असे मला वाटते.

आपण नोकरी निमित्त ज्या भागात आलो आहोत तो भाग नक्षलपीडित आहे. साधन संपत्तीच्या असमान वितरणामुळे ही नक्षलवादाची समस्या निर्माण झाली आहे. आपण सर्वांनी अपरिग्रहाचे पालन केल्यास वर्तमान आणि भविष्य काळातील साधन संपत्ती विषयक असमतोलाच्या समस्येचे निराकरण होण्यास निश्चितच काही अंशी मदत होऊ शकते.”

एवढं बोलून सूर्यकुमार साहेब परत जाण्यास निघाले. मी आणि माझी पत्नी, दोघेही अद्याप भारावलेल्या स्थितीतच होतो. सूर्यकुमार साहेबांचे सच्चे, तळमळीचे शब्द आमच्या काळजाला भिडले होते. सागवानाचा अनावश्यक मोह धरल्या बद्दल आता आम्हाला स्वतःचीच लाज वाटत होती.

योगायोगाने त्यासुमारासच म. गांधींचे “My experiments with truth” हे इंग्रजी पुस्तक मी वाचीत होतो. कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता आपल्या चुकांची जी कबुली त्या पुस्तकात म. गांधींनी दिली आहे ती वाचून माझ्या मनातील गांधींबद्दलचा पूर्वग्रह बऱ्याच अंशी दूर होऊन त्यांच्या बद्दलचा आदरही वाढला होता.

विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अशिलांनी केलेली कर चुकवेगिरी त्यांना सरकार दरबारी कबूल करायला लावून, योग्य तो दंड भरून भीतीतून व अपराधीपणाच्या जाणिवेतून त्यांची मुक्तता गांधीजींनी केली, हे वाचून मला सत्याची महत्ता चांगलीच पटली होती.

आताही सूर्य कुमार साहेबांसमोर आपली चूक कबूल करावी अशी वारंवार उर्मी दाटून येत होती. परंतु तसे करण्याचे धाडस मात्र होत नव्हते.

घराबाहेर पडून रेंजर साहेब जीप मध्ये बसले. आणि मला जवळ बोलावून माझा हात हातात धरून हलक्या आवाजात म्हणाले..

“हमारी खबर पक्की थी, इसपर मुझे पुरा यकिन है ! दोस्त होने के नाते, छुट्टी के दिन, सिव्हिल ड्रेस पहन कर मैंने रेड कंडक्ट की, ताकि किसी को पता न चले, आपकी बदनामी न हो और आपकी नौकरी भी सलामत रहे ! लेकिन आप बहुत चालाक निकले.. पहले ही लकड़ी कहीं और छुपा दी..! ठीक है, लेकिन मैने जो कुछ कहा है उसपर संजीदगीसे विचार करना !”

रेंजर साहेबांनी हात उंचावून दारात उभ्या असलेल्या माझ्या पत्नी व मुलाला बाय बाय केला आणि जीप सुरू झाली.

जीप थोडी पुढे गेली न गेली तोंच..

दाबून ठेवलेला पश्चातापाचा ज्वालामुखी उफाळून एकाएकी माझा आतापर्यंत महत्प्रयासाने रोखून धरलेला संयमाचा बांध अचानक फुटला आणि सारं धैर्य एकवटून मी जोरात ओरडलो..

“ठहरो साब..! वो लकडी इधर, मेरे घर में ही है..!!”

(क्रमशः)

 

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.