श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
बॅंकस्य कथा रम्या..
स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव
(भाग : 10)
शनिवारचा दिवस उजाडला. आज बँक अर्धा दिवसच होती. आपापली कामं आटोपून सारा स्टाफ दुपारी चार वाजताच घरी गेला होता. माझी औरंगाबादला जायची ट्रेन संध्याकाळी सहा वाजताची असल्यामुळे ऑफिसचं सर्व काम लवकर आटोपून निवांत बसलो असतानाच रविशंकर बँकेत आला.
“सर, आपसे कुछ बात करनी है.. “
असं म्हणून त्याने आपली कैफियत मांडायला सुरवात केली.
रविशंकर आणि बेबी सुमित्रा या दोघांनाही औरंगाबादच्या सेशन कोर्टाने अद्यापही अटकपूर्व जामीन मंजूर केलेला नव्हता. जोगळेकर वकिलांच्या प्रयत्नांना अजून यश येत नव्हतं. आतापर्यंत आम्ही आमच्या कर्मचारी संघटनांकडे या प्रकरणात मदतीसाठी धाव घेतलेली नव्हती. खरं म्हणजे आमच्या बँकेत अधिकारी वर्गासाठी एक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी एक, अशा दोन वेगळ्या, स्वतंत्र कामगार संघटना अस्तित्वात होत्या. सुदैवाने या दोन्ही संघटना सशक्त, प्रभावी आणि झुंजार वृत्तीच्या होत्या.
या व्यतिरिक्त बँकेत जातीनिहाय देखील काही कर्मचारी संघटना होत्या. यात अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील कर्मचारी व अन्य मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील कर्मचारी यांच्या देखील स्वतंत्र संघटना होत्या. रविशंकर हा बिहारमधील “कहार” नामक अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील होता तर बेबी सुमित्रा ही छत्तीसगडच्या आदिवासी समाजातील म्हणजेच अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील होती.
काही संकुचित वृत्तीच्या अप्रगल्भ कर्मचारी नेते मंडळींना प्रत्येकच घटनेकडे कायम जातीयवादी चष्म्यातूनच पाहण्याची सवय असते. दुर्दैवाने औरंगाबाद मधील एका अशाच कलुषित दृष्टीच्या दुय्यम स्तराच्या नेत्याने “रविशंकर व बेबी सुमित्रा ह्यांना ताबडतोब अटकपूर्व जामीन न मिळणे” या घटनेला जातीय भेदभावाचा रंग दिला आणि या अन्यायाविरुद्ध रविशंकर व बेबी सुमित्रा यांनी आवाज उठवावा व बँक मॅनेजमेंट तसेच न्यायपालिकेत याची दाद मागावी याकरिता त्या दोघांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
अर्थात रविशंकर व बेबी सुमित्रा हे दोघेही मुळातच सुसंस्कृत, शालीन व सुस्वभावी असल्यामुळे त्यांनी सुरवातीला या नेत्याच्या आग्रहाला अजिबातच भीक घातली नाही. मात्र जेंव्हा या नेत्याने हेड ऑफिस मधील वरीष्ठ नेत्यांमार्फत त्या दोघांवर दबाव आणण्यास सुरवात केली तेंव्हा मात्र ते वैतागून गेले. रविशंकरचं म्हणणं होतं की मी ताबडतोब जोगळेकर वकिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शीघ्रातीशीघ्र जामीन मिळवून देण्यास सांगावे म्हणजे या नेत्यांच्या प्रेशर मधून त्याची मुक्तता होईल.
“ठीक आहे ! उद्या दुपारीच मी जोगळेकर वकिलांची या संदर्भात भेट घेईन.”
माझ्या ह्या आश्वासनाने रविशंकर निश्चिन्त झाला. खुश होऊन तो म्हणाला..
“सर, मैं भी कल दोपहर को आपके साथ वकील साब के ऑफिस में आना चाहता हूँ.. आप के सामने मुझे उन से कुछ सवाल पूछने है.. !!”
“फिर तो बहुत अच्छा..! आप ठीक बारह बजे वकिल साब के दफ़्तर पहुँचो.. संडे के दिन उनका ऑफिस सिर्फ दोपहर एक बजे तक ही खुला रहता है..”
ठरल्याप्रमाणे दुपारी बारा वाजता जोगळेकर वकिलांच्या ऑफिस वर पोहोचलो. रविशंकर सोबत बेबी, सैनी व रहीम चाचा या तिघांनाही तिथे आलेलं पाहून मला थोडं आश्चर्यच वाटलं. आम्ही वकील साहेबांना भेटलो तेंव्हा त्यांची स्वीय सहाय्यक रश्मी नेहमी सारखीच त्यांना अगदी खेटून बसली होती. अचानक मला तिथे आलेलं बघून ती किंचित चपापली. जोगळेकर साहेबांना अगोदर मी रुपेशच्या अटकेबद्दल माहिती दिली आणि मग रविशंकर व बेबी यांना अटकपूर्व जामीन कधी मिळणार याबद्दल पृच्छा केली तेंव्हा ते म्हणाले..
“उद्याच..! रुपेशच्या अटकेबद्दल किंवा त्यापूर्वी त्याच्याकडून घेतलेल्या कबुली जबाबाबद्दल मला तेंव्हाच कळवलं असतंत तर या दोघांनाही फार पूर्वीच जामीन मिळून गेला असता. असो.. ! खरं म्हणजे आता तर तशी जामीन घेण्याचीही आवश्यकताच राहिलेली नाही. पण अनायासे या संदर्भात उद्या सकाळीच माझं कोर्टापुढे ऑर्ग्युमेंट आहे, तेव्हा रुपेशच्या कन्फेशनच्या ग्राउंडवर उद्या अकरा वाजेपर्यंत या दोघांच्याही बेल ची कोर्ट ऑर्डर मिळून जाईल.”
“आपका बहुत बहुत धन्यवाद, वकील साब..!”
दोन्ही हात जोडून वकील साहेबांचे आभार मानून रविशंकरने त्यांना विचारलं..
“सर, आपकी फीस कितनी देनी होगी ?”
“वोही, जो पहले तय हुई थी..! चालीस हजार रुपये.. !!”
“सर, मुझे पूछना यह था कि हमारी बेल के लिये आपको अबतक कुल कितना रुपया खर्च करना पड़ा ?”
रविशंकरने विचारलेला हा प्रश्न ऐकून मी गोंधळात पडलो. असा विचित्र प्रश्न त्याने का बरे विचारला असावा ? जोगळेकर साहेब ही त्या प्रश्नामुळे बुचकळ्यात पडलेले दिसत होते. ते म्हणाले..
“किस खर्च की बात कर रहे हो आप ? मैने तो बेल के लिए अबतक कोई खर्च नही किया..!”
त्यावर अतिशय नम्रपणे खुलासा करीत रविशंकर त्यांना म्हणाला..
“पब्लिक प्रॉसिक्युटर, पुलीस, कोर्ट के कर्मचारी तथा जज साब को मॅनेज करने के लिये अब तक मैने और बेबीने पच्चीस पच्चीस हजार रुपये आपके असिस्टंट पुराणिक साब को दिये है.. इस से पूर्व, हमारे साथी शेख रहीम और सुनील सैनी से भी इसी तरह दस दस हजार रुपये उन्ही के द्वारा अलग से लिये गए थे..”
जोगळेकर साहेबांप्रमाणेच माझ्यासाठीही मी माहिती नवीन आणि धक्कादायक होती. पुराणिक वकिलांनी खोटं बोलून त्यांच्या बॉसच्या नकळत अशिला कडून पैसे उकळले होते हे उघड होतं. तरी देखील स्वतःला व मॅटरला सावरून घेत जोगळेकर साहेब म्हणाले..
“तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी चौकशी करतो. जर तुम्ही आधीच काही रक्कम पुराणिक वकिलांकडे जमा केली असेल तर उद्या काम झाल्यावर फक्त उरलेले पैसे द्या. तसंच ज्यांच्या ज्यांच्याकडून चुकून जास्तीचे पैसे घेण्यात आले असतील त्यांना ते परत केले जातील..”
जोगळेकर साहेबांचा निरोप घेऊन आम्ही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पडलो. भेटीचा उद्देश सफल झाल्यामुळे माझे सहकारी खुशीत होते. त्या आनंदातच जवळच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेलो असतांनाच तिथे रश्मीचा फोन आला. ती म्हणाली..
“मी ऑफिस मधून घरी निघाले आहे. इथून अगदी जवळच आहे माझं घर..! तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर घरी येऊन मला भेटूनच जा. तुमच्याच फायद्याचं काम आहे. वाट पाहते मी तुमची.. !!”
“ठीक आहे, आलोच मी..!”
असं बोलून फोन कट केला. माझ्या सहकाऱ्यांकडे पाहून मला एक विचार सुचला. तसंही एकट्याने रश्मीच्या घरी जाणं मला सेफ वाटत नव्हतं. मी त्यांना म्हणालो..
“आपण सारे जण आता रश्मी मॅडमच्या घरी जाणार आहोत. सुरवातीला मी एकटाच आत जाईन. नंतर मी रविशंकरला मिस कॉल करतांच तुम्ही सगळे जण तिच्या घरी या. म्हणजे आत माझ्यावर तसाच काही अवघड प्रसंग आला असला तर त्यातून माझी सुटका होईल..”
रश्मीचं घर म्हणजे एक ऐसपैस फोर बीएचके आलिशान फ्लॅट होता. बेल वाजवताच रश्मीने दार उघडत हसतमुखाने स्वागत केलं. भुरभुरणारे मोकळे केस, आकर्षक उघडे दंड दाखविणारा बिनबाह्यांचा ब्लाऊझ, बेंबीच्या खाली नेसलेली झुळझुळीत सिल्की साडी अशा सिंपल घरगुती पेहरावातही रश्मी खासच दिसत होती. हॉलमधील गुबगुबीत सोफ्यावर बसल्यावर रश्मीने फ्रिजमधून थंडगार पाणी आणून दिलं.
“छान आहे फ्लॅट तुमचा..”
काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो. माझ्या जवळ येऊन बसत रश्मी म्हणाली..
“जोगळेकर साहेबांनीच वाढदिवसाची गिफ्ट म्हणून घेऊन दिलाय मला हा फ्लॅट.. यू नो, माझे आणि बॉसचे खूपच जवळचे संबंध आहेत.. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच समजतात मला ते..”
हॉलमध्ये हलक्या, मंद पाश्चात्य संगीताचे हळुवार सूर दरवळत होते. अतिनिकट बसलेल्या रश्मीने लावलेल्या उंची सेंटचा उबदार, उत्तेजक सुगंध मला अस्वस्थ करीत होता..
“अरे..! एवढी काय घाई आहे ? आत्ताच तर आलात तुम्ही.. थोडा वेळ बसा, आराम करा.. मी आलेच चेंज करून..”
कपडे तर आधीच चेंज केले आहेत हिने, आता आणखी काय चेंज करणार आहे ही बया ? असा विचार करीत तेथील टी-पॉय वरील Star & Style, Cine Blitz, Debonair, Vogue, Women’s Era अशा मासिकांतील गुळगुळीत चित्रे पहात बसलो.
थोड्याच वेळात फिकट लाल गुलाबी रंगाचा अत्यंत झिरझिरीत स्लीव्हलेस गाऊन घालून डौलदार पदन्यास करीत रश्मी हॉलमध्ये आली. ओठांना डार्क रेड लिपस्टिक लावून आलेल्या रश्मीचा उंच, भरदार, गोरापान लुसलुशीत देह त्या पारदर्शक पोशाखात अधिकच देखणा, उठावदार दिसत असल्याने ती जाम डेंजरस सेक्सी दिसत होती. कपाटातून काचेचे दोन ग्लास आणि व्हिस्कीची बाटली काढून ग्लास भरताना तिनं विचारलं..
“सोडा की आईस ?”
आळसावलेल्या मदमस्त स्वरात बोलणाऱ्या रश्मीचे इरादे खतरनाक दिसत होते.
चेहऱ्यावर आश्चर्य दाखवीत आपल्या ग्लासात बर्फाचे तुकडे टाकून तो ग्लास नाचवीत रश्मी माझ्या शेजारी येऊन बसली. अंग चोरून घेत कोपऱ्यात सरकत मी म्हणालो..
“नाही.. खरंच, मी कधीच ड्रिंक्स घेत नाही..”
“ठीक आहे बाबा.., तुम्ही ड्रिंक घेत नाही, मान्य..! पण मग आजपासून सुरू करा नं घ्यायला.. या रश्मीच्या आग्रहास्तव.. अं.. ?”
व्हिस्कीचा घोट घेत माझ्या अंगावर रेलून माझ्या डोळ्यात डोळे घालीत तो उष्टा ग्लास माझ्या ओठांजवळ आणीत रश्मी म्हणाली.
आता हे अति होत होतं. मी ताडकन उभा राहिलो..
“हे पहा मॅडम, अशा गोष्टींत मला अजिबात इंटरेस्ट नाही. अगोदर तुम्ही मला इथे कशाला बोलवलंत ते अगदी थोडक्यात सांगा..! आधीच मी खूप घाईत आहे, आणखीही खूप महत्वाची कामं आहेत मला.. माझे सहकारी माझी वाट पहात बाहेर थांबले आहेत. मी इथून लवकर निघालो नाही तर माझ्यासाठी कदाचित ते इथं तुमच्या घरी सुद्धा येतील..”
हे बोलत असतानाच रश्मीच्या नकळत मी मोबाईल वरून रविशंकरला मिस कॉलही करून टाकला.
“मॅनेजर साहेब, तुमच्या हाताखालच्या स्टाफची इतकी काय काळजी करता ? घाबरता का त्यांना ? अहो, बॉस आहात तुम्ही त्यांचे..! त्यांनीच घाबरायला पाहिजे तुम्हाला.. थांबतील ते तुमच्यासाठी कितीही वेळ.. बरं चला, आपण तुमच्या फायद्याच्या कामाबद्दल बोलू..”
रश्मीचं बोलणं चालू असतानाच दारावरची बेल वाजली. त्रासिक मुद्रेने “आता यावेळी कोण तडफडलंय..?” असं पुटपुटत हातातील ग्लास टी-पॉय वर ठेवून रश्मीने दार उघडलं. दारातील चौघा बँक कर्मचाऱ्यांना पाहून ती क्षणभर चकित झाली. पण मग लगेच सुहास्य वदनाने “ओहो, अरे वा.. !! आइये.. आइये..” असं म्हणत त्यांचं स्वागत केलं. आमचा स्टाफ आत येऊन सोफ्यावर स्थानापन्न झाल्यावर त्यांना आणि विशेषतः त्यांच्यातील बेबीला पाहून रश्मीला आपल्या अंगावरील पारदर्शी पेहरावाची लाज वाटली असावी. “एक्स्क्यूज मी.. तुम्ही बसा, मी आलेच चेंज करून..” असं म्हणून टी-पॉय वरील व्हिस्कीचा ग्लास शिताफीने उचलून घेत ती आतल्या खोलीत गेली.
थोड्याच वेळात ओठांची लिपस्टिक पुसून, बंद गळ्याचा फुल स्लीव्ह ब्लाउज आणि एक साधी सुती साडी नेसून सोज्वळ रुपात हातात सरबताचे ग्लास घेऊन रश्मी हॉलमध्ये आली. ती आल्यावर मुद्दाम तिच्या देखत रविशंकर मला म्हणाला..
“सॉरी सर, हमे वैजापूर वापस जाने की जल्दी थी और कितनी देर से आप हमारा फोन भी नही उठा रहे थे इसीलिए आपसे मिलने के लिए हमे बिना बुलाये ही मॅडम के घर आना पड़ा..! वैसे, अबतक आपका यहाँ का काम तो हो ही गया होगा..”
“अरे नही..! दरअसल, जिस काम के सिलसिलेमें मैं यहाँ आया था, वो बात तो मॅडम ने अबतक कही ही नही..”
असं म्हणून मग रश्मीकडे पहात मी म्हणालो..
“मॅडम, हे सर्व माझे विश्वासू सहकारी आहेत. तुम्हाला माझ्याशी ज्या महत्वाच्या गोष्टी बाबत चर्चा करायची आहे, ती तुम्ही नि:संकोच यांच्यासमोरही करू शकता..”
रश्मीची अवस्था पेचात पडल्या सारखी झाली पण मग पटकन निर्णय घेत ती म्हणाली..
“ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही.. खरं म्हणजे जी ऑफर देण्यासाठी मॅनेजर साहेबांना मी इथे बोलावलं होतं, ती ऑफर तुम्हा सर्वांसाठीही आहे. पण सुरवात मॅनेजर साहेबांपासून होईल. कारण त्यांच्याबाबतीत हे सहज शक्य आहे.
तर… ऑफर अशी आहे की जोगळेकर साहेब पोलिसांच्या चार्जशीट मधून तुमचे नाव वगळून देतील. त्या बदल्यात तुम्हाला त्यांना पन्नास हजार रुपये फी द्यावी लागेल. आणि हे काम करण्यासाठी वकील साहेबांना तयार करण्याची माझी फी फक्त चाळीस हजार रुपये.. अशा प्रकारे फक्त नव्वद हजार रुपये खर्च करून तुम्ही किमान 15-20 वर्षं चालणाऱ्या कोर्टाच्या खटल्यातून आत्ताच कायमचे मुक्त होऊ शकता.”
रश्मीची ऑफर आकर्षक होती. ही कोर्ट केस किमान 10 वर्षं तरी चालेल असं बँकेचे वकील श्री मनोहर यांनी सांगितलंच होतं. कोर्टाच्या तारखा, पोलिसांच्या नवनवीन धमक्या, पैशांच्या मागण्या या साऱ्या त्रासातून फक्त नव्वद हजार रुपये देऊन मुक्तता होणार होती.
“पण.. असं करता येणं शक्य आहे ?”
मी माझी मूलभूत शंका रश्मीला विचारली.
“अर्थात ! ज्याप्रमाणे पोलीस चार्जशीट मध्ये एखाद्याचे नाव नव्याने जोडू शकतात त्याचप्रमाणे ते एखादे नाव गाळू ही शकतात. ही खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि त्यासाठी पोलिसांचे ही सहकार्य घ्यावे लागते. पण तुम्ही त्याची काळजी करू नका. ते आमचं काम आहे. यापूर्वी ही अनेकदा आम्ही आमच्या क्लायंट्सची नावे चार्जशीट मधून वगळून दिलेली आहेत.”
रश्मी ज्या आत्मविश्वासानं बोलत होती त्यावरून तिच्या बोलण्यावर काही शंका घेण्याचं कारणच नव्हतं. पण शेवटी जर जोगळेकर साहेबच हे काम करणार असतील तर थेट त्यांनाच विनंती का करू नये ? मधल्यामधे ह्या रश्मीला विनाकारण का पैसे द्यायचे ?
माझ्या मनात घोळत असलेले विचार मनकवड्या रश्मीने अचूक ओळखले असावेत. कारण, माझ्याकडे पाहून दिलखुलासपणे हसत ती म्हणाली..
“माझे बॉस फक्त मर्डरच्याच केसेस घेतात हे तर तुम्हाला ऐकून माहितंच असेल. बाकीच्या केसेसमध्ये ते फक्त कोणते महत्त्वाचे मुद्दे जज साहेबांपुढे मांडायचे हे रेफरन्स सहित आमच्या सारख्या ज्युनियर्सना सांगतात आणि त्या केसेस त्यांच्या तर्फे आम्हीच कोर्टात प्लीड करतो. तुमच्या अटकपूर्व जामिनाच्या केसेस ही बॉसने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही ज्युनिअर वकिलांनीच कोर्टात प्लीड केल्या होत्या. मात्र चार्जशीट मधून नाव वगळणे या सारखी अवघड केस लढणे आम्हा ज्युनिअर वकिलांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. त्यासाठी जोगळेकर साहेबच हवेत. आणि ते तर कोणत्याही परिस्थितीत मर्डर व्यतिरिक्त अन्य कुठलीही केस स्वतः लढत नाहीत. इथेच तुम्हाला माझी गरज आहे. ही केस लढण्यासाठी त्यांना केवळ आणि केवळ मीच तयार करू शकते. हवं तर तुम्ही डायरेक्ट त्यांना विनंती करून पहा, ते स्पष्ट नकार देतील..”
रश्मीच्या या खुलाशानंतर अन्य स्पष्टीकरणाची आवश्यकताच नव्हती. तरीदेखील मी मनातली शंका विचारूनच टाकली..
“पुराणिक वकिलांप्रमाणेच तुम्हीही तुमच्या बॉसच्या नकळत आमच्याकडून पैसे उकळत आहात असे आम्ही का समजू नये ?”
माझ्या या प्रश्नावर पोट धरून खो खो हसत ती कुटील मेनका म्हणाली..
“फसलात ना ? अहो, मुळात पुराणिक वकिलांनी आमच्या बॉसच्या नकळत तुमच्या कडून पैसे जादा पैसे घेतलेच नाहीत. त्यांची तसं करण्याची कधी हिंमतही होणार नाही. उलट बॉसच्या सांगण्यावरूनच त्यांनी तुमच्याकडून जादा पैसे उकळले होते. ही आमच्या बॉसची नेहमीचीच प्री-प्लॅनड बिझिनेस टॅक्टीज् आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप असा प्रकार असल्याने जादा पैसे देणारा सहसा याची कुणाजवळ वाच्यता करीत नाही. मात्र ह्या रविशंकर यांनी हिंमत दाखवून बॉस समोरच जादा घेतलेल्या पैशांबद्दल जाब विचारला तेंव्हा नाईलाजाने बॉसला आपलं रेप्युटेशन वाचविण्यासाठी अज्ञानाचं सोंग पांघरून तुमचे जादा घेतलेले पैसे परत करावे लागले.”
रश्मीच्या ह्या गौप्यस्फोटाने आम्ही सारे अवाकच झालो. रश्मी पुढे म्हणाली..
“मी मात्र सरळ सरळ बॉसला फसवून त्यांच्या नकळतच तुमच्याकडून पैसे घेणार आहे आणि तेही advance मध्ये. बॉस माझ्या शब्दाबाहेर नाहीत. मी त्यांना गळ टाकल्यावर केवळ माझ्या आग्रहाखातर ते तुमची केस घेतील. आणि त्या माझ्या आग्रहाचीच किंमत मला तुमच्याकडून वसूल करायची आहे, असं समजा..”
बापरे ! ही तर सगळी “चोरों की बारात”च दिसत होती. “तुमच्या ऑफर बद्दल एक दोन दिवसांत विचार करून सांगतो..” असं रश्मीला सांगून आम्ही तिचा तो मायावी रंगमहाल सोडला.
सोमवारचा दिवस उजाडला.. सकाळ पासूनच आपल्यासोबत आज काहीतरी आकस्मिक, अनुचित व भयंकर अशुभ असं घडणार आहे अशी अंतर्मनात अनामिक हुरहूर लागून राहिली होती. दहा वाजता बँकेत पोहोचून केबिनमध्ये प्रवेश करतो न करतो तोच माझ्या मागोमाग चहावाला राजू घाईघाईत आत शिरला. आज नेहमी सारखी त्याच्या हातात चहाची किटली सुद्धा नव्हती. चेहऱ्यावर भीतीचे भाव असलेला आणि बोलताना थरथर कापणारा राजू आपले डोळे मोठ्याने विस्फारून सांगू लागला..
“साहेब घात झाला.. तुम्हाला फसविण्यासाठी पोलिसांनी भयंकर कट आखला आहे. रुपेश आत्ता पोलीस स्टेशनमध्ये बसला आहे, आणि पोलिसांनी पढविल्याप्रमाणे नवीन, सुधारित कबुलीजबाब देतो आहे.
“मॅनेजर साहेब व अन्य स्टाफच्या सांगण्या वरूनच मी या गुन्ह्यात सामील झालो होतो व या फसवणुकीचा संपूर्ण प्लॅन मॅनेजर साहेब व स्टाफ यांनीच तयार केला होता..”
असा त्याचा सुधारित कबुलीजबाब आहे..”
(क्रमश: 11)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे