लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.
यापूर्वीचे कथानक-
बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 11)
राजू चहावाल्याने आणलेली ती भयंकर बातमी माझ्यासाठी खरं तर एखाद्या बॉम्बगोळ्याच्या स्फोटा सारखीच सुन्न करून टाकणारी होती. परंतु हे प्रकरण सुरू झाल्यापासून एकामागून एक एवढी संकटे अनपेक्षितपणे येऊन आमच्यावर कोसळत होती की आता त्या संकटांची मनाला जणू सवयच झाली होती. काळीज घट्ट झालं होतं.. रोज दिवस उजाडला की आज कोणत्या नवीन आपत्तीचं ताट आपल्यापुढे वाढून ठेवलं आहे याचीच आम्ही वाट पहात असू..
या नेहमीच वाईट बातमी आणणाऱ्या राजूचाही अलीकडे मला रागच यायला लागला होता. शेवटी काही झालं तरी हा देखील एकप्रकारे पोलिसांचा वसुली एजंटच. कशावरून तो हेतुपुरस्सर आणि पोलिसांच्या सांगण्यावरूनच अशा घाबरवून टाकणाऱ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवित नसेल ? तसंही एका क्षुल्लक चहाविक्या माणसाला.., भलेही तो कितीही हितचिंतक असला तरी, सतत इतकं महत्व देणं बुद्धिसंगत नव्हतंच. मनाशी काहीतरी निश्चय करून राजूला म्हणालो..
“हे बघ, आतापर्यंत या प्रकरणात तू आम्हाला वेळोवेळी जी मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.. पण.. ! यापुढे त्या पोलीस स्टेशन मधील कोणतीही बातमी.. मग आमच्या दृष्टीने ती कितीही महत्वाची असो, तू आम्हाला सांगायची नाहीस. पोलीस काहीही करू देत, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कोणतीही चूक, कोणताही अपराध केलेला नाही. उलट पोलिसच त्यांच्या कर्तव्यात कसूर करीत आहेत. गुन्हेगारांचा शोध लावून अपराध्यांना शासन करणं हेच खरं तर त्यांचं मुख्य काम. पण ते करायचं सोडून ते आमच्या सारख्या निरपराधांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देत आहेत.
जा..! जाऊन सांग त्यांना की आम्ही त्यांना अजिबात भीत नाही. आणि..! यापुढे आम्हाला त्रास देण्याचा पोलिसांनी जराही प्रयत्न केला तर आम्ही थेट पोलीस कमिशनर पर्यंत हे प्रकरण नेऊ.”
माझा तो करारी बाणा पाहून राजू गडबडूनच गेला. दोन्ही कानांना हात लावीत तो म्हणाला..
“अहो, साहेब..! तुम्ही तर नाराज झालात.. तुम्हाला वाटतंय तसं पोलिसांनी मला इथे पाठवलं नाही. तिथे प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं, ऐकलं तेच सांगून तुम्हाला सावध केलं इतकंच. याउप्पर तुमची मर्जी ! तुम्ही तुमच्या मनाला पटेल ते करा.. येतो मी..!”
एवढं बोलून राजू परत जाण्यासाठी वळला तेंव्हा त्याला मी म्हणालो..
“थांब ! आणखी एक लक्षात ठेव.. !! बाहेर हॉल मध्ये कोणत्याही स्टाफला किंवा अगदी कस्टमरला देखील तू यापुढे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी पुरवायची नाहीस. जर मला असं आढळून आलं तर बँकेबाहेरील तुझी चहाची टपरी मी तात्काळ उखडून फेकून देईन..”
माझे शब्द ऐकून राजूने अविश्वासाने मागे वळून पाहिलं.. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्या चेहऱ्यावरील क्रुद्ध भाव पाहून खाली मान घालून निमूटपणे तो निघून गेला.
मी त्या त्रस्त, विमनस्क पण तरीही ठाम निश्चयी मूड मध्ये असतानाच माझा मोबाईल खणाणला. पलीकडून ॲडव्होकेट जोगळेकर बोलत होते. “फक्त प्रत्येकी पन्नास हजार रुपये आगाऊ जमा केल्यास चार्जशीट मधून तुम्हा साऱ्यांची नावे एक एक करून वगळून देतो..” असं ते म्हणत होते. बहुधा रश्मीनेच त्यांना आम्हाला तसा फोन करण्याची गळ घातली असावी. मला सर्वांच्याच या लुटारू वृत्तीचा मनस्वी उबग आला होता. त्या तिरिमिरीतच मी वकील साहेबांना म्हणालो..
“चार्जशीट मधून नाव गाळण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यापेक्षा त्या सुखदेवच्या तोंडावर जर दोन लाख रुपये फेकले तर तो आमच्या विरुद्धची तक्रारच मागे घेईल आणि संपूर्ण चार्जशीटच रद्द होईल. In fact, आम्ही दोन लाख रूपये न दिल्यामुळेच त्याने आम्हाला या बनावट खटल्यात गोवलं आहे. तेंव्हा आता सुखदेवला त्याचं काम करू देत, पोलिसांना पोलिसांचं काम करू देत आणि तुम्हीही तुमचं अटकपूर्व जामीन मिळवून देण्यापुरतंच काम करा. चालू दे खटला जितकी वर्षं चालायचा तो..
तसंही हस्ताक्षर तपासणी अहवालात जर चेक वरील सही बनावट असल्याचं आढळून आलं तर नियमानुसार सुखदेवला त्याच्या खात्यातून त्या चेकद्वारे काढली गेलेली संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी लागणारच आहे. आणि त्यानंतर केस आपोआपच संपुष्टात येईल. त्यामुळे सॉरी ! तुमच्या या ऑफर मध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही.. “
एवढं बोलून मी फोन कट केला.
अशाप्रकारे कोर्ट केसचं, सुखदेवचं, पोलिसांचं, रश्मीचं, वकील साहेबांचं असं सगळं टेन्शन एका झटक्यात झुगारून दूर फेकून दिल्यामुळे मला आता एकदम मोकळं मोकळं वाटत होतं.
त्यानंतरचे दोन दिवस खूप शांततेत गेले. या काळात सुखदेव, संजू किंवा पोलीस यापैकी कुणीही बँकेकडे फिरकलं सुद्धा नाही. संजूने तर त्याचं हॉटेलही बंदच ठेवलं होतं. मध्यंतरीच्या काळात बँकेच्या दैनंदिन कामाकडे खूपच दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे महत्वाची पेंडिंग राहिलेली कामे उरकण्यात मी गुंगून गेलो.
दरम्यान रविशंकर आणि बेबी सुमित्रा ह्या दोघांनाही औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयातून रीतसर अटकपूर्व जामीन मिळाला. अर्थात त्याबद्दल आता फारसं कौतुक, नावीन्य, अप्रूप किंवा आनंद उरला नव्हता. निर्बुद्ध आणि संवेदनाहीन पोलिसांच्या हडेलहप्पी वर्तणुकीपासून बचाव करण्याची सावधगिरीची एक कायदेशीर प्रक्रिया संपली होती इतकंच. संध्याकाळी रहीमचाचा, रविशंकर, सैनी आणि बेबी हे चौघेही मला भेटण्यासाठी केबिन मध्ये आले तेंव्हा ही जामीन मिळाल्याची बातमी सांगण्यासाठीच ते आले असावेत असंच मला वाटलं.
“सर, हम सब आपसे एक रिक्वेस्ट करने आए है..”
खाली मान घालून अतिशय नम्रपणे रहीमचाचांनी बोलायला सुरुवात केली.
“बात ये है कि हमे कहींसे मालूम पड़ा के आपने रश्मी मॅडम की ऑफर स्वीकार कर ली है और जल्द ही आप का नाम पुलिस की चार्जशीट से हटाया जाएगा..”
“किसने बताया आपको ? ये सरासर झूठ है…” मी गडबडून उत्तरलो. पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रहीम चाचांनी आपलं बोलणं तसंच सुरू ठेवलं.
“सर, हम जानते है कि इस पूरे मामले में आपका दूर दूर तक कोई ताल्लुक नही है और आपके खिलाफ कोई भी गुनाह पुलिस या फिर्यादी के वकील साबित नही कर सकते। लेकिन हमारे हालात आपसे बिलकुल विपरीत है। सभी सबूत हमारे खिलाफ है। अगर सावधानी और होशियारी से काम न लिया गया तो कोर्ट हमे दोषी करार दे सकता है। सिर्फ और सिर्फ आप के भरोसे ही हम ये केस लड़ने की हिम्मत जुटा पा रहे है। अगर आपनेही खुद को इस मामले से अलग कर लिया तो फिर हम तो पूरी तरह बर्बाद हो जाएंगे..”
बोलता बोलता रहीम चाचांचे डोळे भरून आले.
“हे पहा, अशी कोणतीही शंका तुम्ही आपल्या मनात आणू नका. ही केस आपण सगळे मिळून एकत्रच लढणार आहोत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्याला या खोट्या केस मधून कोर्टाद्वारे निर्दोष मुक्तता करून घ्यायची आहे..”
मी त्या चौघांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावरील भय अजूनही तसेच दिसत होते. थरथरत्या आवाजात रहीम चाचा म्हणाले..
“सर, ये बेचारा रविशंकर.. दूर बिहार से आया है.. अभी अभी प्रमोशन मिला और इस संकट में फंस गया.. इसकी पत्नी और माँ, दोनों चिंता के मारे बेहाल है.. ये सैनी.. इसके बिबीबच्चे दिल्ली में रहते है और मिलने के लिए यहां आना चाहते है, लेकिन इस केस के कारण इसने उन्हें रोक रखा है.. सुमित्रा बेबी तो ये नौकरीही छोड़ने का मन बना चुकी है.. मेरे भी नौकरी के सिर्फ दो साल ही बचे है.. मेरा क्या होगा ? मुझे पेन्शन मिलेगा के नहीं ? ये चिंता मुझे रात दिन सताती है.. मै हाथ जोड़कर आपसे बिनती करता हूँ, प्लीज प्लीज.. आप खुद को इस केस से अलग मत कीजिए..”
आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी हाथ जोडून उभे असलेल्या माझ्या त्या चारही सहकारी कर्मचाऱ्यांना पाहून मला गलबलून आलं. खुर्चीवरून उठून मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना खांद्यावर थोपटलं आणि म्हणालो..
“तुम्ही असे घाबरून जाऊ नका. आपण प्रामाणिक आहोत आणि आपल्या कुणाच्याही हातून कोणतीही चूक किंवा गुन्हा घडलेला नाही, हे तर आपल्याला पक्कं ठाऊक आहे ना ? मग झालं तर ! हा पोलिसांचा आणि बदनामीचा त्रास.. हा तात्पुरता आणि अल्पकाळासाठी आहे. तो तर आपल्याला सहन करावाच लागेल. मात्र या दुर्दैवी घटनेत आपण पूर्णपणे निर्दोष आहोत याबद्दल या वैजापुरातील प्रत्येकाला खात्री आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या वरिष्ठांचाही या प्रकरणात आपल्याला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य आहे. तेंव्हा थोडा धीर धरा आणि निश्चिन्त रहा. तुम्हाला पोलिसांकडून किंवा अन्य कुणाकडून ही यापुढे कसलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन..”
त्या चौघांनाही बसायला सांगून त्यांच्यासाठी चहा मागवला. वरवर जरी ते सारे शांत झाल्यासारखे दिसत असले तरी मधूनच त्यांच्या डोळ्यात अविश्वासाचे भाव उमटून जात होते. चहा पिऊन निमूटपणे केबिन बाहेर जाताना ते सारखे मागे वळून माझ्याकडेच पहात होते.
तत्पूर्वी, खोदून खोदून विचारलं तरीही “रश्मी मॅडमची ऑफर मी स्वीकारली आहे.. ही बातमी कोठून समजली ?” या माझ्या प्रश्नावर त्या चौघांनीही “माफ करा, आम्ही ते सांगू शकत नाही..” असं म्हणत मौनच स्वीकारणं पसंत केलं होतं..
सुखदेवने ज्या विविध न्याय यंत्रणांकडे बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यातीलच एक न्याय व्यवस्था होती “डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम” अर्थात जिल्हा ग्राहक मंच. ग्राहकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असून सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत सिव्हिल जजला असणारे सर्व अधिकार या संस्थेतील जजला असतात. बँकेकडून 30 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण न झाल्यास एक साधं ॲफिडेव्हीट दाखल करून कोणताही ग्राहक या मंचाकडे तक्रार दाखल करू शकतो. सुखदेवची तक्रार दाखल करून घेतल्यावर औरंगाबादच्या ग्राहक मंचाने नियमानुसार कोर्टापुढे हजर राहण्यासाठी बँकेविरुद्ध समन्स जारी केलं. बँकेचा प्रतिनिधी म्हणून ही केस सुद्धा अर्थात मलाच लढावी लागणार होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टात हजर झालो तेंव्हा तिथे अगोदरपासूनच सुखदेव आपल्या तीन वकिलांच्या ताफ्यासह जय्यत तयारी करून आलेला दिसला. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर “आता कशी जिरली..!” चे भाव उमटले. माझ्या जवळ येऊन तो म्हणाला..
“तरी चांगलं सांगत होतो तुम्हाला की मला हवे तेवढे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाका म्हणून.. पण तुम्ही पडले तत्ववादी.. अती इमानदार..! आता भोगा आपल्या इमानदारीची फळं.. अहो, ही तर फक्त सुरवात आहे. वेगवेगळ्या कोर्टांच्या, सरकारी कार्यालयांच्या एवढ्या फेऱ्या मारायला लावीन तुम्हाला की त्या येरझारांनीच तुमचा अर्धा जीव जाईल.. मग केस परत घ्यायची विनंती करत याल तुम्ही माझ्याकडे.. हात जोडून माफी मागत.. “
सुखदेवची अशी उपरोधिक, उर्मट बडबड सुरू असतानाच माझ्या नावाचा पुकारा झाला.
“चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही का घेतली नाही ?”
“कस्टमरचा चेक बुक मागणी अर्ज कुठे आहे ?”
“बँकेने अद्याप कस्टमरला नुकसान भरपाई का दिली नाही ?”
सुखदेवच्या वकिलांनी तसेच कन्झ्युमर कोर्टाच्या जजने विचारलेल्या वरील पैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माझ्याजवळ नव्हते.
“विवादित चेक वरील सहीचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी बँकेने हैदराबाद येथील फोरेन्सिक डिपार्टमेंट कडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसान भरपाई देण्याबद्दल बँक आपल्या नियमानुसार योग्य तो निर्णय घेईल..”
कसेबसे एवढेच उत्तर मी त्यांना देऊ शकलो. माझ्या उत्तराने कोर्टाचे अजिबात समाधान झाले नाही. या प्रकरणी होत असलेल्या बिलंबा बद्दल व ग्राहकांप्रतीच्या असहानुभतीपूर्ण वागणुकीबद्दल बँकेला दोषी मानून, लवकरात लवकर ग्राहकाला न्याय न मिळाल्यास नुकसान भरपाईचा एकतर्फी आदेश देण्यात येईल अशी कोर्टाने तंबी दिली.
ग्राहक मंचाचा निकाल सहसा ग्राहकाविरुद्ध जात नाही. त्यामुळे या कोर्टाचा निकाल नक्कीच आमच्या विरुद्धच जाणार याची मनोमन जाणीव असल्यामुळे रिजनल ऑफिसला कोर्टाने दिलेल्या तंबीबद्दल कळवून या प्रकरणी बँकेतर्फे ताबडतोब सक्षम वकील नेमण्याची विनंती केली. त्यानुसार प्रसिद्ध ॲडव्होकेट ऋतुराज यांची बँकेने या प्रकरणी वकील म्हणून नेमणूक केली.
चेकवरील सहीचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी पोलिसांनी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे विवादित चेक व बँकेकडील ग्राहकाच्या सहीचा नमुना पूर्वीच पाठविला होता. मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यास खूप उशीर लागेल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आमच्या बँकेच्या सूचनेनुसार हैदराबाद स्थित सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) या नामांकित संस्थेकडे मी चेकची कलर झेरॉक्स व सहीचा नमुना (Speciman Signature) पडताळणीसाठी पाठवून दिला होता. त्यांचाही अहवाल अजून प्राप्त झाला नव्हता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टातून बाहेर पडताना विजयी हास्य करीत सुखदेव म्हणाला होता,
“आता महिन्याभरातच तुमच्या बँकेकडून चेकची रक्कम 11 टक्के व्याजासहित वसूल करेन आणि मग तुम्ही दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल भली मोठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी वेगळा दावा याच ग्राहक मंचात ठोकेन. त्यानंतर फौजदारी खटल्यातून तुम्हा पाचही जणांना कठोर शिक्षा होईल याचीही पुरेपूर काळजी घेईन.. या सुखदेवशी पंगा घेतल्याचे काय परिणाम होतात ते समजेल तुम्हाला आता.. उद्याचा पेपर बघाच.. कशी चविष्ट बातमी छापून आणतो तुमच्या आजच्या कोर्टातील फजितीची..”
बोलल्याप्रमाणे खरोखरीच सुखदेवने दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत कन्झ्युमर कोर्टाने केलेल्या कानउघाडणीची बातमी छापून आणली होती. मात्र ती बातमी वाचून पोलिसांचे कान मात्र उगीच ताठ झाले. ह्या सुखदेवने जर बँकेकडून परस्परच रक्कम वसूल केली तर मग आपल्या हिश्श्याचं काय ? तो कसा वसूल करणार ? असा प्रश्न बहुदा त्यांना पडला असावा. त्यामुळेच फौजदार साहेबांनी ताबडतोब मला फोन करून “कुठल्याही परिस्थितीत पोलिसांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बोडखे कुटुंबाला चेकची रक्कम देण्यात येऊ नये..” असे निक्षून बजावले.
केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग तसेच अन्य अनेक सामाजिक संस्थांकडे तक्रार अर्ज करून सुखदेवने या प्रकरणी त्याच्या कुटुंबाला त्वरित न्याय देण्याची मागणी केली होती. त्या सर्व सामाजिक संस्था व सरकारी कार्यालयांनी पाठविलेल्या नोटिसींना उत्तरे देण्यात तसेच बोगस अर्जाद्वारे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागविलेली अर्थहीन माहिती पुरविण्यातच माझा दिवसातील बराच वेळ खर्च होत होता. निरुपद्रवी दिसणाऱ्या या सुखदेवने आणखी कुठे कुठे दाद मागितली असावी ? याबद्दल विचार करत बसलो असतांनाच टेबला शेजारील फॅक्स मशीनवरून रिजनल ऑफिसचा अर्जंट मेसेज आला..
“उद्या सकाळी ठीक अकरा वाजता रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल (Banking Ombundsman) कार्यालयात सौ. रत्नमाला बोडखे यांनी वैजापूर शाखेविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची सुनावणी असून बँकेचा प्रतिनिधी म्हणून तिथे हजर राहण्यासाठी ताबडतोब मुंबईला निघावे..”
(क्रमशः)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.