लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 12)
फॅक्स मेसेज पाठोपाठ लगेच औरंगाबादच्या क्षेत्रीय कार्यालयातून फोन आला. स्वतः रिजनल मॅनेजर बोलत होते..
“उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही नरिमन पॉईंट, मुंबई येथील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचा. तिथे बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत व मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतील. तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल कार्यालयातही तेच घेऊन जातील.”
मी लक्ष देऊन ऐकत होतो. RM साहेब पुढे म्हणाले..
“या प्रकरणाची इत्यंभूत माहिती केवळ तुम्हालाच असल्याने बँकेतर्फे ही केस तुम्हालाच प्लीड करायची आहे. लक्षात ठेवा, हे बँकिंग लोकपाल बँकांच्या कार्यपद्धती व नियमावली बद्दल सखोल ज्ञान असणाऱ्या उच्चपदस्थ व अनुभवी व्यक्ती असतात. त्यांच्याशी बोलतांना सावधगिरी बाळगा व अतिशय आदराने आणि मुद्देसूद तेवढंच बोला.”
“आणि.. लक्षात ठेवा, 20 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांत ग्राहकाला त्वरित नुकसान भरपाई देण्याचे ते संबंधित बँकेला आदेश देऊ शकतात. तसेच विलंब व मानसिक त्रासापोटी एक लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ते बँकेला करू शकतात. तेंव्हा त्यांच्यापुढे अत्यंत नम्रपणे, अदबीने व सांभाळून सादर व्हा.. आणि केसचा निकाल बँकेविरुद्ध लागू नये यासाठी योग्य ते आटोकाट प्रयत्न करा.. ऑल द बेस्ट !!”
RM साहेबांचा फोन आल्यानंतर भराभर टेबलावरील कामे आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. मग डेप्यु. मॅनेजरला केबिनमध्ये बोलावून आज मुंबईला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. केस संबंधी सर्व कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी सामग्री घाईघाईत बॅगमध्ये भरली. शांत चित्ताने संपूर्ण घटनाक्रम व महत्वाचे मुद्दे थोडक्यात लिहून काढले. औरंगाबादला घरी जाण्यात उशीर झाला असता म्हणून रात्रीच्या बसने वैजापूरहूनच मुंबईला जाण्याचे ठरवले. रुमवरील एक बऱ्यापैकी ड्रेस बॅगेत टाकला आणि बस स्टँडवर निघालो.
छ. शिवाजी महाराज टर्मिनस जवळ उतरलो तेंव्हा पहाटेचे पाच वाजले होते. जवळच्याच एका हॉटेलात जाऊन सिंगल रूम बुक केली. माझ्या रूमच्या खिडकीतून व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनची सुंदर देखणी इमारत दिसत होती. तिच्याकडे पहात चहाचे घोट घेता घेता.. “आजच्या केसचा निकाल काय लागणार.. ?” याबद्दलचेच विचार मनात घोळत होते.
नरिमन पॉईंट वरील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचलो तेंव्हा किंचित स्थूल, ठेंगणे आणि जाड भिंगाचा चष्मा असलेले, दुभाषी नावाचे एक सिनियर चीफ मॅनेजर तिथे माझी वाटच पहात थांबले होते. माझं स्वागत केल्यावर “चला.. आपण आधी RBI च्या ऑफिसजवळ पोहोचू आणि मग तिथेच नाश्ता करू” असं ते म्हणाले. टॅक्सीतून आम्ही भायखळ्याच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करता करता दुभाषी साहेब म्हणाले.. “मी तुमच्या केसचा नीट अभ्यास केला आहे. सर्व मुद्दे आपल्या विरुद्ध आहेत. ही केस आपण जिंकण्याची एक टक्काही शक्यता नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो, जास्तीतजास्त पंधरा मिनिटांत लोकपाल Adverse Verdict देतील..”
हे ऐकतांच माझा चेहरा एकदम पडला. बँकेने या गृहस्थांना मला मदत करण्यासाठी पाठविलं आहे की माझं धैर्य खच्ची करून मला नाउमेद करण्यासाठी ? अशी शंकाही माझ्या मनात तरळून गेली.
माझ्या चेहऱ्यावरील खिन्न भाव दुभाषी साहेबांच्या धूर्त डोळ्यांनी अचूक टिपले. काटे चमच्याचा सफाईदार उपयोग करून समोरच्या प्लेटमधील मसाला डोशाचा तुकडा तोंडात टाकीत अत्यंत निर्विकारपणे ते म्हणाले..
“मी खरं तेच सांगतोय.. पण तुम्ही असे निराश होऊ नका. या लोकायुक्त कार्यालयातील एकही केस आपण आजपर्यंत जिंकलेलो नाही. अहो, हे लोकपाल खूपच स्ट्रिक्ट असतात. राष्ट्रीयकृत बँकांचे चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर अशा उच्च पदावरील या व्यक्ती असतात. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असा ह्यांचा सडेतोड खाक्या असतो. त्यामुळे ते तडकाफडकी निर्णय देतात आणि अर्थातच तो निर्णय बहुतांशी बँकेच्या विरुद्धच जातो. असो..! तुम्ही याबाबत जास्त विचार करू नका. ही केस हरलात तरी तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही.”
मी घड्याळात पाहिलं.. अकरा वाजायला आले होते. घाईघाईत खाणं संपवून नॅपकिनने तोंड पुशीत दुभाषी साहेब म्हणाले..
“चला चला.. ! It’s time now !आयुक्तांपुढे वेळेत हजर व्हायला हवं. तुम्ही या माझ्या मागे भराभर..”
तुरु तुरु चालत दुभाषी साहेब रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या लिफ्ट जवळ पोहोचले. लोकायुक्त कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होते. तेथील रिसेप्शनिस्टने आम्ही हजर झाल्याबद्दल नोंद करून तेथील रजिस्टरवर आमच्या सह्या घेतल्या व थोड्याच वेळात तुम्हाला आत बोलावले जाईल असे सांगितले. दुभाषी साहेब तेथील सोफ्यावर बसून वर्तमानपत्रे चाळू लागले. जवळच एका टेबलवर तेथील ऑफिस सुपरिन्टेंडेंट मॅडम बसल्या होत्या. माझ्याकडे पाहून त्यांनी जुनी ओळख असल्यागत सुहास्य केले, त्यामुळे मी सरळ त्याच्या टेबलासमोरील खुर्चीवरच जाऊन बसलो.
त्या मॅडमचं नाव स्नेहलता होतं. त्यांनी सहज माझी चौकशी केली.. कुठून आलात ? कसली केस आहे ? वगैरे.. वगैरे. मीही त्यांना थोडक्यात केसची माहिती दिली. तसंच लिहून आणलेला घटनाक्रम व वर्तमानपत्रातील कात्रणेही त्यांना दाखविली. सुखदेवचा काळाकुट्ट पूर्वेतिहास, रुपेशने दिलेला घटनेतील सहभागाचा कबुलीजबाब, पोलीसांचा पक्षपातीपणा व तपासातील जाणूनबुजून केलेली दिरंगाई याबद्दलही त्यांना सांगितलं. माझी कहाणी ऐकून त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल सहानुभूती दाटून आली.
“अरेरे..! खरं म्हणजे सध्या ज्या लोकपाल मॅडम आहेत ना, त्या माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रीण सुद्धा आहेत. एरव्ही त्यांना तुमची केस समजावून तुम्हाला मदत करणं मला नक्कीच आवडलं असतं. पण.. काय करू ? दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी इथे आली आहे..!”
“म्हणजे ? मी समजलो नाही, चुकीची वेळ म्हणजे ? आणि.. लोकपाल ह्या महिला असून तुमची मैत्रीण आहेत ?”
जरासं असमंजस होऊनच मी विचारलं..
“होय.. सध्या असलेल्या Ombundsman मॅडम.. लोपामुद्रा सेनगुप्ता त्यांचं नाव.. ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे.. आम्ही इथे मुंबईतच एकत्रच शिकलो आहोत.. कार्यकाल संपल्यामुळे आज त्यांचा ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच तुमची ही एकमेव केस आज त्यांनी हिअरिंग साठी ठेवली आहे. उद्या नंतर कदाचित एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची चेअर(वू)मन किंवा RBI च्या डेप्यु. गव्हर्नर म्हणूनही त्यांची नेमणूक होऊ शकते.”
आमचं असं बोलणं सुरू असतांनाच सुखदेव बोडखेने आपली पत्नी, मुलगा व एक दोन वकिलांना घेऊन ऑफिसात प्रवेश केला. मला पाहतांच त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद प्रकटला. मोठ्याने ओरडून तो म्हणाला..
“अरे वा ! आले का साहेब रडत, बोंबलत, फरफटत.. वैजापूर टू मुंबई..! पाहिला नं, कसा आहे माझा इंगा..?”
मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आमच्या नावाचा पुकारा झाला आणि आम्ही सगळे लोकपालांच्या न्यायकक्षात गेलो.
अंदाजे चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान वय, मानेपर्यंतच केस असलेला आकर्षक प्लश बॉब कट, स्लीव्हलेस ब्लाऊझ, टपोरे सुंदर पाणीदार डोळे, धारदार नाक, गोरापान रंग, उंच कमनीय सडपातळ बांधा, चापून चोपून नेसलेली साधी पण सुंदरशी साडी अशा मोहक व्यक्तिमत्वाच्या लोपामुद्रा मॅडमनी सुहास्य वदनाने आमचं स्वागत केलं. आमच्या केसचा मॅडमनी सखोल अभ्यास केलेला असावा. रत्नमालाबाईंकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या..
“तुम्ही.. तक्रारदार मिसेस बोडखे ना ? तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा..”
लोकपाल मॅडमनी एवढं म्हणायचाच अवकाश की दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर अत्यंत दीन, असहाय भाव आणीत सुखदेव उभा राहिला आणि म्हणाला..
“तिला काय विचारता मॅडम ? दुःखाने तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही. आमची अशी काय चूक झाली की बँकेने एका रात्रीत आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब करून आम्हाला कफल्लक केलं.. बँक म्हणते की कोणीतरी आम्हाला दिलेल्या चेकबुक मधील चेकवर खोटी सही करून पैसे काढले आहेत. पण माझं चेकबुक तर माझ्याजवळच आहे. दुसरं जे चेकबुक आम्हाला दिलं होतं असं बँक म्हणते, त्या चेकबुक इश्यू रजिस्टरवर आम्हा कुणाचीही सही नाही. तसंच आमचा चेकबुक मागणी अर्ज देखील बँक दाखवू शकत नाही. मग बॅंकेच्या या निष्काळजीपणाची आम्हाला का सजा देता ?
मॅडम, मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून सरकारी खात्यातील एक जबाबदार कर्मचारी आहे. हे पैसे शेती घेण्यासाठी बायकोचे दागिने मोडून मी बँकेत जमा केले होते. मला पेन्शन नाही, त्यामुळे रिटायरमेंट नंतर शेती करून उदरनिर्वाह करण्याचा माझा विचार आहे. या प्रकरणी आधीच खूप उशीर झालेला आहे. बँकेची चौकशी व तपास जेंव्हा पूर्ण व्हायचा तेंव्हा होवो. पण आम्हाला मात्र आमचे कष्टाचे पैसे ताबडतोब व्याजासहित आपण मिळवून द्यावेत हीच हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती..!”
हुंदके देत, दुःखी, केविलवाण्या, बापुड्या अभिनयाची पराकाष्ठा करीत अवघ्या शरीराची थरथरती हालचाल करीत डोळ्यातील अश्रू पुसत सुखदेव खाली बसला. त्याच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या.. तद्दन नाटकी पण तरीही दमदार व भावपूर्ण वक्तृत्वाचा लोपामुद्रा मॅडमवर अपेक्षित परिणाम झालेला दिसला. माझ्याकडे रागाने पहात त्या कडाडल्या..
“तुम्हीच रिप्रेझेंट करताय ना बँकेला ? काही वेगळं सांगायचंय का तुम्हाला ? तक्रारदाराने आत्ता जे सांगितलं ते खोटं आहे असं तुम्ही सिद्ध करू शकता काय ? तसा काही नवीन, कागदोपत्री पुरावा आहे का तुमच्याकडे ? आणला असेल सोबत तर वेळ न घालवता ताबडतोब सादर करा..!”
“पण.. मॅडम, फोरेन्सिक डिपार्टमेंटचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. त्यामुळे चेकवरील सही खरी (जेन्यूईन) आहे की बनावट (फोर्ज) आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही..”
मी कसंबसं चाचरतच म्हणालो..
“अहो, पण जर तो चेकच तक्रारदाराला दिलेल्या चेकबुक मधील नाही तर मग सहीच्या खरे खोटेपणाचा प्रश्नच कुठे येतो ? आणि.. आणखी किती वेळ घ्याल तुम्ही सहीचा खरेपणा तपासण्यासाठी ? तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही ? हे जे समोर बसले आहेत, ते तुमचेच कस्टमर आहेत ना ? त्यांची अवस्था बघा..! तुम्हाला त्यांची काहीच काळजी नाही कां ?”
मॅडमच्या त्या उग्रावतारापुढे गप्प बसणंच मी शहाणपणाचं आणि इष्ट समजलं. उद्वेगपूर्ण निराशेनं मान हलवीत माझ्याकडे पहात लोपामुद्रा मॅडम म्हणाल्या..
“ते काही नाही.. Enough is enough..! बँकेने तक्रारदाराला सात दिवसांच्या आत चेकची संपूर्ण रक्कम यथायोग्य व्याजासहित परत करावी असा मी आदेश देते. या आदेशाचं तंतोतंत पालन न झाल्यास संबंधित बँकेविरुद्ध या कार्यालयातर्फे उचित ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..”
लोकपाल मॅडमचा “फैसला” ऐकताच माझ्या शेजारी बसलेले दुभाषी साहेब आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर जाण्यापूर्वी हलक्या आवाजात मला म्हणाले..
“अगदी अपेक्षितच निकाल होता. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.. पण एक बरं झालं, उगीच ताटकळत न ठेवता लवकर निकाल दिला मॅडमनी.. आता थोड्याच वेळात मॅडम निकालाची एक प्रत तक्रारदाराला व दुसरी बँकेला.. म्हणजे तुम्हाला देतील. तुम्ही ती निकालाची प्रत तुमच्या रिजनल ऑफिसला व झोनल ऑफिसला पाठवून द्या. मीही आमच्या कार्यालया मार्फत हेड ऑफिसला निकालाची माहिती देतो. येतो मी..”
असं म्हणून दुभाषी साहेब त्या लोकपाल कक्षाच्या दारापर्यंत गेले आणि मग काहीतरी आठवल्या सारखं करून मागे फिरून माझ्याजवळ येत म्हणाले..
“मी आता परत ऑफिसात न जाता माझ्या घरी जातोय. तेवढाच फॅमिली बरोबर वेळ घालवता येईल. आता थेट उद्याच ऑफिसला जाईन. संध्याकाळी उशिरापर्यंत लोकपाल कार्यालयातच होतो, असं सांगणार आहे DGM साहेबांना.. आमच्या ऑफिसातून कुणाचा फोन आला तर तुम्हीही तसंच सांगा.. आणि हो, निकाल विरुद्ध केला म्हणून मूड खराब करून घेऊ नका. एवीतेवी इथपर्यंत आलाच आहात तर थोडीशी मुंबई फिरून घ्या. बा ssss य..!”
माझ्या खांद्यावर हलकंसं थोपटून हात हलवीत निरोप घेत दुभाषी साहेब निघून गेले. मी घड्याळात पाहिलं.. आता कुठे फक्त साडेबारा वाजले होते. सेनगुप्ता मॅडम त्यांच्या पी. ए. ला निकालाच्या आदेश व अटींबाबत डिक्टेशन देत होत्या आणि त्यानुसार तो पीए भराभर टायपिंग करत होता. डिक्टेशन संपताच टाईप केलेले कागद सहीसाठी त्याने मॅडम समोर ठेवले व त्यांनी सही करतांच ते कागद दोन लिफाफ्यात टाकून माझ्या व सुखदेवच्या हातात दिले.
सुखदेवने लिफाफा उघडून आदेशाची प्रत वाचली. त्यातील “व्याजासहित चेकची संपूर्ण रक्कम सात दिवसांच्या आत द्यावी..” हे शब्द वाचून आनंद व अतीव समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले. तिथूनच अदबपूर्ण कृतज्ञतेने मान झुकवून, कमरेत वाकून त्याने मॅडमना नमस्कार केला आणि म्हणाला..
“तुमचे खूप खूप आभार, मॅडम ! हा निकाल देऊन एका गरीब असहाय्य कुटुंबाला न्याय मिळवून दिलात तुम्ही.. तुमची सदैव प्रगती होवो, तुमचं कल्याण होवो अशाच मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो मॅडम तुम्हाला माझ्या कुटुंबातर्फे..”
लोकपाल मॅडम डायसच्या मागील दाराने त्यांच्या चेंबर मध्ये निघून गेल्यावर माझ्याजवळ येऊन माझ्याकडे कीव मिश्रित दयेच्या भावाने पहात सुखदेव म्हणाला..
“अरेरे.. साहेब..! अहो, हे काय झालं..? तुमची तर आत्ताच हवा गुल झाली. मग उद्या जेंव्हा मी वैजापुरात विजयी मिरवणूक काढून बँकेसमोर पब्लिक जमवून धांगडधिंगा करत तुमच्याविरुद्ध घोषणा देईन तेंव्हा तुमची काय हालत होईल ? आणि.. उद्याच्या पेपर मधील तुमच्या बदनामीच्या ठळक अक्षरातील बातम्या वाचून तर तुम्ही बहुदा आत्महत्याच करून घ्याल.. खूप मजा येणार आहे आता..! उद्या वैजापुरात भेटूच.. !!”
निकालाचा लिफाफा उंचावून जणू नाचतच आपल्या लवाजम्यासह सुखदेव निघून गेला. खिन्न मनानं जड पावलांनी मी रिसेप्शन रूम मध्ये आलो. ऑफिस सुपरिन्टेंडेंट स्नेहलता मॅडमनी ईशाऱ्यानेच मला जवळ बोलावलं.
(क्रमश:)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.