https://goodworld.in A website by Madhav Bhope

G.K.Quiz-Political India

india map1

Take this interesting quiz about Indian States-just to brush up your information about current affairs. 

This quiz can also be useful to some extent for those who are preparing for competitive exams. 

Ustad Zakir Hussain

Zakir-Hussain

ज्येष्ठ तबलावादक आणि शास्त्रीय संगीतकार झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

झाकीर हुसेन यांना हृदयविकार होता. गेल्या आठवड्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १५ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला.

अभिनेतेही होते झाकीर हुसेन

शास्त्रीय संगीतकार, तबलावादक असलेले झाकीर हुसेन अभिनेतेही होते. तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकलेल्या झाकीर हुसेन यांनी १२ सिनेमात काम केलं होतं. त्यांनी १९८३ मध्ये आलेल्या हीट अँड डस्ट या ब्रिटिश सिनेमात शशि कपूर यांच्यासोबत काम केलं होतं. हा त्यांचा डेब्यू सिनेमा होता.

झाकीर हुसेन यांचे वडिलही होते तबलावादक

९ मार्च १९५१ मध्ये झाकीर यांचा जन्म झाला होता. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये तीन ग्रॅमी अवॉर्डसह पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यांचे वडील उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी हेदेखील तबलावादक होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत झाकीर यांनीही शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.

वयाच्या ११व्या केलेला पहिलं कॉन्सर्ट

झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट केला होता. त्यांच्या त्या परफॉर्मेन्सने सर्वांनाच हैराण केलं होतं. त्यांनी पुढे वयाच्या १२व्या वर्षापासून त्यांच्या वडिलांसोबत कॉन्सर्टला जाण्यास सुरुवात केली होती.

२०१६ मध्ये झाकीर यांना माजी राष्ट्रपदी बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय संगीतकार ठरले.

झाकीर हुसेन यांचं कुटुंब

उस्ताद झाकीर हुसेन यांनी Antonia Minnecola यांच्याशी 1978 साली लग्न केलं होतं. त्या कथ्थक डान्सर होत्या. तसंच कथ्थक शिक्षिकाही होत्या. तसंच त्या झाकीर यांच्या मॅनेजर म्हणूनही काम पाहत होत्या. झाकीर यांना दोन मुली आहेत.

 

दत्त जन्माची कथा Shri Guru Dattatreya

datta-2

Shri Guru Dattatreya दत्त जन्माची कथा

आज दि. 14 डिसेंबर- आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा- या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.

महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले.

दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9 व्या आणि 10 व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे.

दत्तात्रेय नांवाची कथा  

तसेंच श्रीमद्भागवतात आले आहे की पुत्र प्राप्तिच्या इच्छेने महर्षि अत्रींनी व्रत केले तेंव्हा ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’ मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला देऊन दिले आहे, असे म्हणून भगवान विष्णूच अत्रीच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले, आणि ‘दत्तो’ म्हणून दत्त आणि अत्रिपुत्र झाल्यामुळे आत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नांव प्रसिद्ध झाले.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

दत्तांच्या जन्माची कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई. पवन तिच्यापुढे नम्र होई. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.

पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तिमुळे तिचे नाव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री ‘ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारदमुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला.

त्रैमूर्ति म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी आप आपल्या पत्नीला समजविण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकेनात. त्यामुळे आपआपल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परिक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्त्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. आणि ते तिघे भर दुपारी अत्रिमुनींच्या आश्रमात आले.

अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले, आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेंव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली, की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे

अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे ओळखले. अत्रि मुनि नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून, त्यांचे पांदतीर्थ या ब्राह्मणांवर शिंपडले, त्यामुळे ती तिघे सहा महिन्यांची बालकें होऊन रांगू लागली.

datta-1

अनुसूयेने  त्यांच्या इच्छेप्रमाणे करून, त्यांना स्तनपान करविले. आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपविले. अत्रिमुनी परत आल्यानंतर तिने सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. अत्रीमुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली.  स्वर्गलोकात तीन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली.  तेव्हा अत्रिमुनींनीं पुन्हा गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा- विष्णु- महेश, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग!” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक ( ब्रह्मा – विष्णु- महेश ) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे  राहू देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तीन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले.

मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण।ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.

दत्तात्रेयांचे रूप आणि त्याचा अर्थ

datta-3

दत्तात्रेय जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम फिरत असले, तरी त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे उंबराचा वृक्ष होय. त्यांचे रूप म्हणजे केसांवर जटाभार, सर्व अंगावर विभूति, व्याघ्रांबर वस्त्र म्हणून नेसलेले, तसेंच त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि 4 कुत्रे, काखेला झोळी, असे ‘अवधूत’ दत्त विश्वाच्या कल्याणासाठी फिरत असतात. त्यांच्या सोबत असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे स्वरूप समजले जाते. किंवा लोकांच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू. तसेंच त्यांच्या सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तसेंच त्यांच्या हातात असणारे त्रिशूल म्हणजे तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि एका हातात असलेले सुदर्शन चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे, म्हणजे ते कालातीत आहेत. तसेंच एका हातात असलेला शंख म्हणजे ॐ ध्वनिचे प्रतीक आहे. तसेंच त्यांनी अंगावर फासलेले भस्म म्हणजे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेले भिक्षापात्र म्हणजे ‘दान’ करण्याचे प्रतीक आहे. मनुष्यमात्राला, आपल्याजवळील वस्तू इतरां सोबत वाटून खाण्याचा संदेश आहे. एका हातात असलेली जपमाळ ही नामस्मरणाचे महत्त्व सांगते.

सर्व संप्रदायांमध्ये दत्तात्रेय

दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहेत. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

 

संकलन- goodworld.in

 

डी. गुकेश: जगातील सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता – भारताचा अभिमान

109495961 1

डी. गुकेश: जगातील सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता आणि भारतीय बुद्धिबळासाठी महत्त्वाचा टप्पा

केवळ 18 व्या वर्षी, डी. गुकेश यांनी 2024 च्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदावर विजय मिळवत जागतिक बुद्धिबळातील आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाची नोंद केली आहे. त्यांनी चीनच्या विद्यमान विश्वविजेते डिंग लिरेन यांना 14 सामन्यांच्या मालिकेत 7.5–6.5 ने पराभूत केले. यामुळे गुकेशने 1985 साली 22 व्या वर्षी गॅरी कास्पारोवने प्रस्थापित केलेला सर्वात तरुण चॅम्पियन होण्याचा विक्रम मोडला.

गुकेश यांचा यशाचा प्रवास

डी. गुकेश यांचा जन्म 29 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्यात बुद्धिबळाची आवड होती. त्यांच्या आई-वडिलांनी, डॉ. रजनीकांत आणि डॉ. पद्मा, त्यांची बुद्धिबळाच्या खेळात आवड विकसित होण्यासाठी आधार दिला. केवळ 7 व्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली.

गुकेश यांनी वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर पदवी मिळवून इतिहास घडवला. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत वडिलांच्या वैद्यकीय क्षेत्रातील मेहनतीबरोबर त्यांचा स्वतःचा परिश्रमही मोलाचा ठरला.

प्रेरणा आणि प्रशिक्षण

भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी गुकेश यांना मोठ्या प्रमाणावर प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे त्यांचे प्रशिक्षक यांनी त्यांच्या खेळातील महत्त्वाचे पैलू बळकट केले. त्यांच्या यशस्वीतेमध्ये तांत्रिक सल्ला, कुटुंबीयांचा पाठिंबा, आणि विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनुभवाचा मोठा वाटा होता.

जागतिक विजेतेपदाची गाथा

2024 च्या सामन्यात डिंग लिरेन यांच्याविरुद्ध गुकेश यांनी कठोर संघर्ष केला. सामन्याच्या 3 व्या आणि 11 व्या खेळांमध्ये गुकेश यांनी विजय मिळवला. अंतिम निर्णायक 14 व्या सामन्यात गुकेश यांनी आपली तंत्रसिद्धता दाखवत ऐतिहासिक विजय मिळवला.

भारतीय बुद्धिबळासाठी महत्त्वाचा टप्पा

गुकेश यांच्या विजयामुळे भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. भारतात बुद्धिबळाची नवी पिढी, ज्यात आर. प्रज्ञानानंद, निहाल सरीन यांचा समावेश आहे, जागतिक स्तरावर ठसा उमटवत आहे.

प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व

गुकेश यांचा प्रवास भारतीय तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. मेहनत, चिकाटी, आणि योग्य मार्गदर्शनाच्या साहाय्याने मोठमोठे लक्ष्य गाठणे शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

निष्कर्ष

डी. गुकेश यांचे जागतिक विजेतेपद हा केवळ वैयक्तिक विजय नसून भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर गौरवले असून अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

Gita Quiz-2 -Simple quiz on Gita 12th Chapter

12 chapter

 

।। अथ द्वादशोऽध्यायः ।।
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

भगवंताने गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या 33 आणि 34 व्या श्लोकांमध्ये ज्ञानयोगाचे महत्त्व सांगितले, नंतर पाचव्या अध्यायाच्या 16, 17 व्या आणि 24 ते 26 या श्लोकांमध्ये, सहाव्या अध्यायाच्या 24 ते 28 या श्लोकांमध्ये आणि आठव्या अध्यायाच्या 11 ते 13 व्या श्लोकांमध्ये निर्गुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व विषद केले.

 

सहाव्या अध्यायाच्या 47 व्या श्लोकात साधक भक्ताचा महिमा सांगितला, आणि सातव्या अध्यायापासून ते 11 व्या अध्यायापर्यंत जागोजागी ‘अहम्, माम्’ आदि पदांद्वारे विशेष रूपाने सगुण साकार आणि सगुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व सांगितले. शेवटी 11 व्या अध्यायाच्या 54 आणि 55 व्या श्लोकात अनन्य भक्तीचा महिमा आणि फळाचे वर्णन केले.

 

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥ मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ११-५५ ॥

 

वरील सर्व वर्णन ऐकून अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की सगुण परमेश्वराची उपासना करणारे आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे? या जिज्ञासेतूनच अर्जुनानाने भगवंताला प्रश्न विचारला-

 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? ॥ १२-१ ॥

 

इथे  एवं या शब्दाने 11 व्या अध्यायातील 55 व्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा भक्तांबद्दल अर्जुन विचारत आहेत.

 

श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।2।।

 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥

 

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ।।3।।

संनियम्येन्द्रिग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ।।4।।

 

परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥ १२-३, १२-४ ॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहविद्भिरवाप्यते ।।5।।

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ॥ १२-५

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।6।।

परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।7।।

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ।।8।।

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥

अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।।9।।

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।10।।

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ।।11।।

जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ॥ १२-११ ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।12।।

मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ॥ १२-१२ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।13।।

जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; ॥ १२-१३ ॥

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद् भक्तः स मे प्रियः ।।14।।

तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे., ॥१२-१४ ॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ।।15।।

ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१५ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद् भक्तः स मे प्रियः ।।16।।

ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१६ ॥

यो न ह्यष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।।17।।

जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥ १२-१७ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ।।18।।

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते ॥ १२-१८ ॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।19।।

ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥ १२-१९ ॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तिं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।।20।।

परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥ १२-२० ॥

ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः

Gita Quiz- गीतेवर आधारित प्रश्नोत्तरें

bhagavad-gita-quiz

भगवद्‌गीता हा प्राचीन भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील असलेला हा ग्रंथ ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.


सुमारे ५००० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.


महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५ व्या अध्याया पासून ते ४२ व्या अध्यायापर्यन्त संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.


गीतेतील असलेले ७०० श्लोक खालीलप्रमाणे १८ अध्यायांत सांगितले आहेत:


अध्याय शीर्षक श्लोक
अर्जुनविषादयोग ४७
सांख्ययोग(गीतेचे सार) ७२
कर्मयोग ४३
ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) ४२
कर्मसंन्यासयोग २९
आत्मसंयमयोग ४७
ज्ञानविज्ञानयोग ३०
अक्षरब्रह्मयोग २८
राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) ३४
१० विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) ४२
११ विश्वरूपदर्शनयोग ५५
१२ भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) २०
१३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३४
१४ गुणत्रयविभागयोग २७
१५ पुरुषोत्तमयोग २०
१६ दैवासुरसंपद्विभागयोग २४
१७ श्रद्धात्रयविभागयोग २८
१८ मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) ७८
  एकूण श्लोक ७००

गीतेची सुरुवात

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥“ या श्लोकापासून होते, आणि शेवट

‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम

या श्लोकाने होते. अशा पासून सुरू होऊन र्म ने संपणाऱ्या ७०० श्लोकांमध्ये पूर्ण धर्माचे सार आले आहे असे म्हटले तरी हरकत नाही.

जीवनविषयक तत्वज्ञान गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे काही काहीजण खालीलप्रमाणेही वर्गीकरण करतात-

कर्मयोग (अध्याय १-६)

भक्ती योग (अध्याय ७-१२)

ज्ञान योग (अध्याय १३-१८)


गीतेची अठरा नावे

गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी।।
अर्धमात्रा चिदानन्दा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी पराऽनन्ता तत्त्वार्थज्ञानमंजरी।।
इत्येतानि जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः।
ज्ञानसिद्धिं लभेच्छीघ्रं तथान्ते परमं पदम्।।

 


गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानन्दा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनन्ता और तत्त्वार्थज्ञानमंजरी (तत्त्वरूपी अर्थाच्या ज्ञानाचे  भंडार) या प्रकारे  (गीतेच्या) अठरा नावांना जो मनुष्य स्थिर मनाने नित्य जप करताो, तो शीघ्र ज्ञानसिद्धि आणि अंती परम पदाला प्राप्त होतो.


आज गीताजयंतीच्या शुभमुहूर्तापासून आपण श्रीमद् भगवद् गीतेवर आधारित क्विझ सुरू करीत आहोत.

आपला वेळ सत्कारणी लागण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन व्हावे या हेतूने हे क्विझ सुरू करीत आहोत.

आपण सर्वांनी वरील लेख पूर्ण वाचला असेल तर मग चला, आपण वरील लेखावर आधारित असलेल्या खालील प्रश्नांची उत्तरें देऊ यात.