https://goodworld.in A website by Madhav Bhope

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू:

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥१७॥

दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी॥१८॥

उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी।

ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥१९॥

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

जया में चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः॥२०॥

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता।

शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता॥२१॥

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी।

त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके॥२२॥

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी।

कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी॥२३॥

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती॥२४॥

दन्तान्‌ रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका।

घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके॥२५॥

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥

नीलग्रीवा बहिःकण्ठे नलिकां नलकूबरी।

स्कन्धयोः खड्गिनी रक्षेद् बाहू में व्रजधारिणी॥२७॥

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीषु च।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत्कुक्षौ रक्षेत्कुलेश्वरी॥२८॥

स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी।

हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी॥२९॥

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा।

पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी॥३०॥

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी।

जंघे महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी॥३१॥

गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी।

पादांगुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी॥३२॥

नखान्‌ दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी।

रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा॥३३॥

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती।

अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी॥३४॥

पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा।

ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु॥३५॥

शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा।

अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी॥३६॥

प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकम्‌।

वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना॥३७॥

रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी।

सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा॥३८॥

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।

यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी॥३९॥

गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके।

पुत्रान्‌ रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी॥४०॥

पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा।

राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता॥४१॥

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु।

तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी॥४२॥

यात प्रथम सर्व दिशांचा उल्लेख असून दाही दिशांना देवी माझे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. तसेच, मागून पुढून, डाव्या, उजव्या बाजूकडून रक्षण करो. तद्नंतर, शेंडी पासून सर्व अवयवांचे रक्षण करण्याविषयी तपशीलवार आले आहे. शेंडी, मस्तक, ललाट (कपाळ), भुवया, भ्रुवोर्मध्य, दोन्ही डोळ्यांचा मध्य, नाकपुड्या, कान, कपोल(म्हणजे गाल), कानाचे मूळ (कर्णमूळ), नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दात, कन्ठ, गळ्याची घाटी, तालु, चिबुक म्हणजे हनुवटी, बोलण्याची शक्ति म्हणजे वाणी, कण्ठाचा बाहेरील भाग, कण्ठनळी, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात, त्यांची बोटें,  आणि नखें, पोट, दोन्ही स्तन, हृदय, उदार, नाभी, गुह्यभाग, (मेढ्र)लिङ्ग, गुदा, कटिभाग, गुडघे(जानुनी विन्ध्यवासिनी), दोन्ही जंघा (म्हणजे मराठीत पोटऱ्या), गुल्फ म्हणजे पायाचे घोटे ज्याला इंग्लिश मध्ये ankle म्हणतात. पायांचा पृष्ठ भाग, पायांची बोटें, पायांचे तळवे,  नखें, केश, रोमकूप म्हणजे शरीरावरील रोमावली. त्वचा,

रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे, मेद; आंत (आंतडे), 

एवढेच नव्हे, तर, शरीरातील पित्त, कफ, नखांचे तेज, शरीरातील समस्त संधि,

वीर्य, छाया (सावली), प्राण अपान इत्यादि पंचप्राण, अहंकार, मन बुद्धि

एवढेच नाही, तर रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण,

आयु,

धर्म, यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

वरील सर्व गोष्टी स्वतः च्या संदर्भातील झाल्या,

आता त्यानंतर, गोत्र, पशु, पुत्र, पत्नी यांचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे

राजाच्या दरबारात तसेच सर्व भयापासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे.

एवढे कमी आहे की काय, म्हणून शेवटी असे म्हटले आहे, की वरील वर्णनात जर एखादे स्थान राहून गेले असेल तर त्याचे ही रक्षण कर.

इतका comprehensive विचार केला आहे, हे बघून मन थक्क होते.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण अहंकार हा शब्द आपल्याकडे सहसा तो मनुष्य फार अहंकारी आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2

मागील लेखावरून पुढे चालू 

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते मध्येही ७०० श्लोक आहेत.) हे ७०० श्लोक म्हणजे मार्कंडेय पुराणामधील अध्याय ८१ ते ९३ आहेत. आपल्याकडे १८ पुराणे आहेत. भागवत पुराण, विष्णू पुराण, नारदीय पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, भविष्य पुराण, अग्नि पुराण, ब्रम्ह्वैवर्त पुराण, ब्रम्हानंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण आणि स्कंद पुराण या १८ पुराणांपैकी १६ वे हे  मार्कंडेय पुराण आहे.

देवी कवच ही मार्कंडेय पुराणाचाच भाग आहे. आणि ग्रंथ वाचकाच्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करण्याचे काम करते.

श्री दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमध्ये खालील प्रमाणे वर्णन आहे.

अध्याय

श्लोक

वर्णन

१०४

मधुकैटभ वध

६९

महिषासुर सेना वध

४४

महिषासुर वध

४२

देवतांकडून देवीची स्तुती

१२९

देवतांकडून देवीची स्तुती आणि चण्ड मुण्ड देवीला शुम्भ निशुम्भा चा निरोप

२४

धूम्रलोचन वध

२७

चण्ड मुण्ड वध

8

६३

रक्तबीज वध

४१

निशुम्भ वध

१०

३२

शुम्भ वध

११

५५

देवी स्तुति- वरदान

१२

४१

पाठ माहात्म्य

१३

२९

सुरथ आणि वैश्याला इच्छित वर प्राप्ति

एकूण

७००

 

आता आपण देवी कवचा च्या पुढील काही श्लोकांचा अर्थ पाहू.

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।

विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः॥6॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।

नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि॥7॥

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥8॥

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना॥9॥

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया॥10॥

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता॥11॥

श्लोक ६-७:  जो मनुष्य अग्नीत जळत असेल, रणभूमी मध्ये शत्रूंनी घेरला गेला असेल, विषम संकटामध्ये सापडला असेल, आणि अशा प्रकारे भयाने आतुर होऊन देवीला शरण आला असेल, त्याचे काहीही अशुभ (अमंगल) होत नाही; युद्धाच्या संकटामध्येही त्याच्यावर कोणतीही विपत्ति येत नाही, त्याला शोक, दुःख आणि भय प्राप्त होत नाही.

वरील विपत्तींना वाच्यार्थाने न घेता, लक्ष्यार्थाने घ्यावे. कारण वरील प्रकारच्या विपत्ति आजकालच्या कालात येणे दुर्मिळ असले, तरी, तत्सम प्रसंग मात्र मनुष्याच्या आयुष्यात नित्यच येत असतात.

श्लोक ८: ज्यांनी भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केले आहे, त्यांचा नक्कीच अभ्युदय (वृद्धिः) होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिन्तन करतात, त्यांचे तू निःसंदेह रक्षण करतेस.

 आता खालील ९ ते ११ या श्लोकांमध्ये योगशक्तीने संपन्न देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे.

प्रेतसंस्था तु चामुण्डा:  सप्तशतीच्या ७व्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे.

 सहाव्या अध्यायात शुम्भ निशुम्भाने पाठविलेल्या धूम्रलोचन राक्षसाचा देवीने वध केल्यानंतर, शुम्भ निशुम्भ यांनी, चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांना देवीचे केस धरून ओढत आणण्याची आज्ञा केली.

 सातव्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड देवीला ओढत न्यायला आले असतांना, क्रोधाने देवीचे तोंड काळे ठिक्कर पडले, आणि तिच्या शरीरातून विक्राळ असे कालीरूप प्रकट झाले. त्या कालीने इतर राक्षसांसोबत, चण्ड आणि मुण्ड यांचा वध केला.

 त्यावर कल्याणमयी देवीने, चण्ड आणि मुण्ड यांना मारणारी, म्हणून तिचे नांव चामुण्डा असे ठेवले. प्रेत हे तिचे आसन समजले जाते.

वाराही, ही सप्त मातृकांमधील असून, विष्णूच्या वराह अवताराची शक्ति समजली जाते. तिचे वाहन महिष आहे. सप्त मातृका म्हणजे; चामुण्डा, वाराही, इंद्राणी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ब्राम्ही.

सप्तशतीच्या ८ व्या अध्यायात, रक्तबीज वधाच्या समयी, निरनिराळ्या मातृकांनी, म्हणजेच देवांच्या शक्तिरुपांनी राक्षसांचा वध केला, त्यातही वाराहीचा उल्लेख आहे. वाराही ही देवता वाम मार्गाच्या (तंत्र मार्गाच्या) साधकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

 कार्तिकेयाची  (ज्यांचे दुसरे नांव ‘कुमार’ आहे) शक्ति कौमारी , जी की शिखिवाहना, म्हणजे मोरावर आरूढ आहे. कार्तिकेयाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. कार्तिकेय(शंकराचा पुत्र) हा दक्षिणेमध्ये मुरुगन, किंवा, सुब्रम्हण्यम या नावाने प्रसिध्द आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः॥12॥

अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न आहेत, आणि नाना प्रकारच्या आभूषणांनी युक्त आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित आहेत.

श्लोक १३ ते ४३:

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः।

शंख चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम्‌॥13॥

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च।

कुन्तायुधं त्रिशूलं च शांर्गमायुधमुत्तमम्‌॥14॥

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै॥15॥

या सर्व देवी क्रोधाने भरलेल्या आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी रथावर बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, शक्ति, हल, मुसळ, खेटक (म्हणजे ढाल), तोमर (म्हणजे सर्पाकृती मुख असलेला बाण), परशु, पाश, कुन्त या नावाचे आयुध (कुन्त म्हणजे English मध्ये ज्याला spear म्हणता येईल, म्हणजे भाला किंवा तत्सदृश शस्त्र), त्रिशूल, शारङ्ग नावाचे धनुष्य इत्यादि शस्त्रें धारण केली आहेत. ही शस्त्रें त्यांनी दैत्यांचे देह नाश करण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी धारण केली आहेत

आता कवचाचा प्रारंभ करण्याआधी प्रार्थना केली जाते:

नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे।

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि॥16॥

महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम आणि महान उत्साहाने भरलेल्या देवी, तू भयाचा नाश करणारी आहेस, तुला नमस्कार असो.

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

तुझ्याकडे बघणेही कठीण आहे.(दुष्प्रेक्ष्य). हे शत्रूंचे भय वाढविणाऱ्या देवी, तू माझे रक्षण कर.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-1

shailputri mata

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच

देवीचे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. या काळामध्ये व्रतस्थ राहून देवीच्या विविध रूपांमध्ये शक्तीची उपासना करण्याची परंपरा भारतात पुरातन कालापासून चालत आलेली आहे.

आपल्या १८ पुराणांपैकी मार्कंडेय पुराणात, ७०० श्लोकांमध्ये  देवीद्वारे राक्षसांचा म्हणजेच असुर प्रवृत्तींचा वध करण्याचे निरनिराळे प्रसंग अत्यंत शक्तिशाली शब्दांत वर्णन केलेले आहेत. या भागाला सप्तशती असे म्हटले जाते.

नवरात्री मध्ये, या सप्तशतीच्या पोथीचा पाठ करण्याची बऱ्याच घरी प्रथा असते. आपल्याकडे कुठल्याही देवतेचे चरित्र वर्णन करण्यापूर्वी, त्या देवतेचे आवाहन करून ‘कवच’ म्हणण्याची प्रथा आहे. जेणे करून ती देवता आपल्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करो अशी प्रार्थना केली जाते. त्याच प्रकारे, सप्तशतीचा पाठ करण्या आधी, देवीकवच, अर्गला आणि कीलक म्हणणे आवश्यक समजले जाते. यातील कीलक म्हणजे एक प्रकारे त्या चारित्राला लावलेले कुलूप उघडण्यासाठीची किल्ली समजली जाते. हे आपल्यापैकी जे या विषयाशी परिचित आहेत त्यांना माहिती असेल.  आपल्यापैकी बरेच जण या कालात कवच, अर्गला आणि कीलक, यथाशक्ति म्हणत असतात.

ही स्तोत्रें संस्कृत मध्ये असून सुरुवातीला उच्चार करायला अवघड वाटतात खरी, पण एकदा ती वाचायला जमू लागले, की शरीरात एक प्रकारचे नवचैतन्य संचार करवण्याचे सामर्थ्य या शब्दांत आहे हे नक्की. आणि जर या स्तोत्रांचा अर्थ समजून घेतला, तर ती खूप परिणामकारक होतात यात शंका नाही. मला जरी संस्कृतचे विशेष ज्ञान नसले, तरी, जमेल तसे समजून घेऊन, यातील देवी कवच वाचतांना जे समजले आणि जे विचार मनात आले ते माझ्या अल्पबुद्धिप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

खालील विवेचन हे मी आमच्या फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये ६ वर्षांपूर्वी, काही भागांत लिहिले होते. यावर्षी, त्यात थोडी सुधारणा करून आणि थोडे बदल करून या ठिकाणी, goodworld.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहे.

या स्तोत्रांचा अर्थ, आणि संदर्भ समजून घेतल्यास खूपच छान वाटेल यात संशय नाही.

हे स्तोत्र एकूण ५६ श्लोकांचे आहे. सुरुवातीला, या स्तोत्राचे पाहिले ५ श्लोक पाहूत.

ॐ नमश्चण्डिकायै ||

मार्कण्डेय उवाच

ॐ यद्गुह्यम परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम्|

यन्न कस्य चिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ||१||

ब्रम्होवाच

अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम्

देव्यास्तु कवचं पुण्यं तत् श्रुणुष्व महामुने ||२||

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रम्हचारिणी

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ||३||

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ||४||

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनाः||५||

 

मार्कण्डेय मुनींनी ब्रम्हाजी, जे कि सर्व सृष्टीचे प्रजापिता आहेत, त्यांना विचारले,

हे पितामह, जे या सृष्टीत परम गोपनीय आहे (यद्गुह्यम), मनुष्य प्राण्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे  आणि जे आज पर्यन्त आपण कुणापुढेच प्रकट केले नाही असे साधन कृपया मला सांगावे

त्यावर ब्रम्हदेवाने सांगितले:

अशा प्रकारचे एकमेव साधन म्हणजे देवीचे कवचच  आहे, जे परम गोपनीय, पवित्र, आणि सर्व प्राण्यांवर उपकार करणारे आहे. हे महामुनी, ते श्रवण कर:

देवीची, नऊ रूपे आहेत, ज्यांना नवदुर्गा असे म्हणतात.

 त्यांची निरनिराळी नावे पुढील प्रमाणे आहेत:

१.    तिचे प्रथम नांव ‘शैलपुत्री’ आहे आहे. (गिरिराज हिमालयाची पुत्री , पार्वतीदेवी. ही जरी सर्वांची अधीश्वरी आहे, तरी, हिमालयाची तपश्चर्या आणि प्रार्थनेने प्रसन्न होऊन, कृपापूर्वक त्याच्या पुत्रीच्या रूपात प्रकट झाली).

२.    सच्चिदानंदमय ब्रम्हस्वरूपाची प्राप्ती करून देणे हा जिचा स्वभाव आहे, ती ‘ब्रम्हचारिणी’

३.    आल्हादकारी चन्द्रमा जिच्या घण्टेत स्थित आहे, ती, चन्द्रघण्टा

४.    कुत्सितः ऊष्मा- कूष्मा,+ त्रिविध तापयुक्त संसार रुपी अण्ड: = कूष्माण्ड, अर्थात, त्रिविध ताप युक्त संसार जिच्या उदरामध्ये स्थित आहे, ती म्हणजे कूष्माण्डा

५.    छान्दोग्यश्रुतीनुसार भगवतीच्या शक्तिने उत्पन्न झालेल्या सनत्कुमारांचे नांव ‘स्कन्द’ आहे. त्यांची माता असल्यामुळे तिचे नांव ‘स्कन्दमाता ‘ आहे.

६.    देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी देवी, महर्षि कात्यायन यांच्या आश्रमात प्रकट झाली, आणि त्यांनी तिला आपली कन्या मानले, म्हणून तिचे ‘कात्यायनी’ हे नांव प्रसिध्द झाले.

७.    सर्वांना मारणाऱ्या ‘कालाची’ ही ‘रात्री’ (विनाशिका) असल्यामुळे, तिचे नांव ‘कालरात्रि’ आहे.

८.    देवीने तपस्येने महान गौर वर्ण प्राप्त करून घेतला होता, म्हणून तिचे नांव ‘महागौरी’ आहे.

९.    ‘सिद्धि’ अर्थात मोक्ष देणारी, म्हणून तिचे नांव ‘सिद्धिदात्री’ आहे.

यानंतरच्या भागात मार्कंडेय पुराणामधील या अत्यंत प्रभावशाली कथाभागाबद्दल जाणून घेऊयात..

क्रमशः

Download Devichi ashtake देवीची अष्टके डाऊनलोड करा

devi-1

विष्णुदास कवि हे देवीचे भक्त इ. स. १८४४ ते १९१७ या काळात होऊन गेले. सुरुवातीला त्यांनी बासरला राहून सरस्वतीची उपासना केली. नंतर १८८६ मध्ये ते माहूर येथे आले. ते रेणुकामातेचे अनन्य भक्त होते. त्यांनी अत्यंत व्याकुळतेने मातेची प्रार्थना केलेली आहे. त्यांनी रेणुकेच्या भक्तिपर विविध पदें, अष्टकें, कविता, आणि आरत्या इत्यादींची रचना केली. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्याच आज महाराष्ट्रात देवीच्या नवरात्रात व इतर वेळी गायल्या जातात. नवरात्रात विष्णुदासांची अष्टकें घरोघरी अत्यंत भक्तिभावाने गायली जातात.

नवरात्रात ही अष्टकें आणि पदें सायंकाळची आरती झाल्यानंतर घरातील सर्वांनी देवीसमोर एकत्र बसून, टाळ्यांच्या तालावर, आणि आपल्याकडे टाळ किंवा इतर साहित्य असेल तर त्याच्या साथीने, तन्मयतेने गात असतांना एक वेगळेच भक्तिमय वातावरण तयार होते. 

बऱ्याच जणांकडे याची वही किंवा पुस्तक असते. पण कधी कधी ते उपलब्ध नसले, तर संग्रही असावे, म्हणून यासोबत आपण, उपलब्ध अष्टकांची pdf फाईल देत आहोत. खाली दिलेल्या बटन वर क्लिक केल्यावर आपण ही pdf फाईल आपल्या मोबाईल वर डाऊनलोड करू शकता. 

डाऊनलोड करण्याची पद्धत-

वरील लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर “अष्टके” असे शीर्षक असलेली फाईल आपल्या मोबाईल मध्ये उघडलेली दिसेल. 

आपल्या मोबाईलच्या सगळ्यात वरील उजव्या कोपऱ्यात  ३ dots (टिंब) असतील, त्यावर क्लिक करा. त्यात डाऊनलोड चे बटन असेल (एक जाड बाण, खाली तोंड असलेला, आणि त्याच्याखाली एक रेघ) त्यावर क्लिक करा. म्हणजे ती फाईल तुमच्या मोबाईल वर डाऊनलोड होईल. 

ती फाईल तुम्ही सेव्ह करू शकता, किंवा whatsapp वर शेअर करू शकता.

Devichi Ashtake collection देवीची अष्टके संग्रह

durga devi
  1. काय कारण पुसा रेणुकेला

काय कारण पुसा रेणुकेला

माझा त्याग कशास्तव केला ? ।।धृ।।

झाला वर्षाच्या वर एक महिना । तरी अजूनि सय का हो येइ ना

अशी अगदीच नको करू दैना । तुझ्याविण मला बाप-आई ना

दूर काननी पडलो एकला ।।माझा।।१।।

भला भार्गव राम प्रतापी । गळा आपुल्या जननीचा कापी

परी तैशासि केलीस माफी । माझे अन्याय लविसी मापी

कां रुसलीस या घटकेला ।।माझा।।२।।

जन्मा घातले हा अविचार । आता जन्मदे काय विचार

प्रेमे चालवी प्रेम प्रचार । तुझे वर्णीती गुण वेद चार

तुझ्या वंदीतो मी पादुकेला ।।माझा।।३।।

माझ्या पाहशील जरि अवगुणला । उणे येईल जननीपणाला

दृढ बांधिले ब्रिद कंकणाला । याची तरि मग लाज कुणाला

कां लविसी मजसि भिकेला ।।माझा।।४।।

निज चर्माचा सदाचरणांत । जोडा घालीन तुझ्या चरणांत

तुझ्या राहीन माय ऋणांत । सडा टाकीन मी अंगणात

नित्य गुंफीन पद-मालिकेला ।।माझा।।५।।

रत कामना काममदासी । जशी गुंतली माशी मधासी

काढी यातून, आली उदासी । छाया कृपेची करि विष्णुदासी

नमो नारायणी अम्बिकेला ।।माझा।।६।।

—–00000—–

  1.  रेणुके ! मजला मुळ धाडी

रेणुके ! मजला मुळ धाडी

आता या दुःखातुन काढी

तुझ्याविण तिळ-तिळ मी तुटते । कठिण दिन काट्यांवर कंठिते

भेटिच्यासाठि उरी फुटते । पडेना चैन मला कुठ ते

निरोधुनि मन, डोळे मिटते । घडोघडी दचकुन परि उठते

पडिले भय चिंतेच्या पहाडी । आता या दुःखातुन काढी ।।१।।

पती येऊ देइना शेजारी । फजिती करितो बाजारी

सवतिने गांजियले भारी । ऐकले अससिल परभारी

मंडळी सासरची सारी । मला सुख देति न संसारी

अटकले मेल्यांचे दाढी । आता या दुःखातुन काढी ।।२।।

भेटता भार्गवरामासी । पावतिल प्राण आरामासी

जोगवा मागिन सुखवासी । अथवा राहिन उपवासी

परि मी येइन तुजपाशी । वांचवी अथवा दे फासी

वल्कले अथवा दे साडी । आता या दुःखातुन काढी ।।३।।

वाटते लटकी कां घाई । नव्हे ही लटकी कांगाई

धाडिते सांगुनि सुचना ही । उपेक्षा करणे बरे नाही !

खचित मी बाई, तुझ्यापायी । टाकिते उडि गंगा-डोही

पडो या जगण्यावर धाडी । आता या दुःखातुन काढी ।।४।।

शुभासनि अश्विन मासाची । स्थापना घटि नव दिवसांची

विलोकिन यात्रा वर्षाची । तोरणे येतिल नवसाची

परम दिनदयाळ तू  साची । माउली विष्णुदासाची

वसशी मृगराज-पहाडी । आता या दुःखातुन काढी ।।५।।

—–00000—–

  1. लक्ष कोटी चंडकिरण

 

लक्ष कोटी चंडकिरण सुप्रचंड विलपती

अंबचंद्रवदनबिंब दीप्तिमाजि लोपती

सिंहशिखर अचलवासि मूळपीठनायिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।१।।

आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणि दिव्य कुंडले

डोलताति पुष्पहार भार फार दाटले

अष्टदंडि, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।२।।

इन्द्रनीळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा

पायघोळ बोरमाळ चंद्रहार वेगळा

पैंजणादि भूषणेचि लोपल्याति पादुका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।३।।

इंद्र चंद्र विष्णु ब्रम्ह नारदादि वंदिती

आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती

प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।४।।

पर्वताग्रवासि पक्षि अंब अंब बोलती

विशाल शाल वृक्षरानी भवानिध्यानि डोलती

अवतारकृत्यसार जडमुडादि तारका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।५।।

अनंत ब्रम्हांड पोटी पूर्वमुखा बैसली

अनंत गूण, अनंत शक्ती विश्वजननि भासली

सव्यभागि दत्त अत्रि वामभागि कालिका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।६।।

पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी

अंब दर्शनासि भक्त-अभक्त येति आश्रमी

म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका । धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।७।।

—–00000—–

  1. श्री रेणुके मजकडे कधि पाहशील

साधु तुला म्हणति सर्वजगाचि आई । आलो म्हणोनि तुजपाशि करोनि घाई

ही एक आस मनि की मज पावशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।१।।

तू तारिशी भरवसा धरुनी मनांत । मी ठाकलो बघ उभा तव अंगणात

तू काय आइ दुसरे घर दाविशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।२।।

माता पिता त्यजुनिया गणगोत सारे । ध्यावे तुला हृदयी हे भरलेचि वारे

याहून काय दुसरे मज मागशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।३।।

आई मुलास करि दूर असे न कोठे । झाले जगात कवि सांगति काय खोटे

तू ती प्रचीति मजला कधि दाविशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।४।।

ज्ञाते विचारतिल खाण तशीच माती । हा दुष्ट नष्ट तरि लाज नसे तुला ती ?

तू त्यासि काय मग उत्तर सांगशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।५।।

हातास सर्व नसतात समान बोटे । श्री नारदादि बहु पुत्र तुझेचि मोठे

मी पातकी म्हणुनि का मज टाकशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।६।।

वेद स्मृती वदति की “जगदंबिका” हे । येताचि नाम मुखि पाप मुळी न राहे

निष्पाप मी तरि न का मज तारशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।७।।

संसार सागर जणू बुडवी सदैव । हाका तुला म्हणुन मारित वासुदेव

देवोनि हात वरती झणि  काढशील । श्री रेणुके मजकडे कधि पाहशील ।।८।।

—–00000—–

  1. तुला माझा जगदंबे ! नमस्कार

तुझे सुंदर रुप रेणुके विराजे

वर्णीताती मुनि देव देवि राजे

कोण स्वगुणाचा करिल गुणाकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१।।

सदानंद मुख चंद्रमा सबंध

रत्नहार, मणी, वाकि, बाजुबन्द

रत्नजडित सुवर्ण अलंकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।२।।

विलोकुन नथ नासिकी, काप कानी

मार्ग विसरावा मोक्ष साधकांनी

हाक द्यावी लक्षूनि लक्षवार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।३।।

साडि पिवळी खडिदर भरजरीची

तंग चोळी अंगात अंजिरीची

टिळा कुंकुम, निट वेणी पिळेदार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।४।।

सप्तशतिचे पुढे पाठ घणघणाट

टाळ घंटा, कंकणे, खणखणाट

पायि पैंजण घन देति झणत्काऱ । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।५।।

मूळ धाडी दर्शना यावयासी

लावि भजनी या उर्वरित वयासी

तोडी सारा हा दुष्ट अहंकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।६।।

पर्वती या बसलीस आम्हासाठी

परी अमुची खरचली जमा साठी

भरत आला स्थळ-भरतिचा आकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।७।।

माय वंची दुरदेशि मुलांनाही

अशी वार्ता ठाऊक माला नाही

अगे आई ! हा काय चमत्कार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।८।।

ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर

मला केले सरदार ना फकीर

काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।९।।

तरी आता ये, धाव, पाव, तार

त्वरित आता तरि धाव, पाव, तार

करी माझा अविलंबे अंगिकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१0।।

काय रागे झालीस पाठमोरी

तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी

केशराचा हरपेल की शकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।११।।

पहा जातो नरजन्म-रंग वाया

नये सहसा परतून रंगवाया

म्हणुनि करितो विशेष हाहा:कार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१२।।

कृपासुत्रे वोढोनि पाय दावी

जशी बांधी कृष्णासि माय दावी

अहो मीही अन्यायि अनिवार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१३।।

मीच अथवा तुज हृदय-मंदिरात

प्रेमसूत्रे बांधीन दिवस-रात

यथातथ्य परि नसे अधिकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१४।।

कसा एका पुष्पाचिया आवडीने

मुक्त केला गजराज तातडीने

तसा मीही अर्पितो सुमनहार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।१५।।

केली दुल्लड ही पदर पंधराची

तुझ्यासाठीची, आण शंकराची

विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार । तुला माझा जगदंबे ! नमस्कार ।।६।।

—–00000—–

 

  1. हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला

तू विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी

रक्तमांसअस्थिच्या गृहात जीव कोंडसी

प्राण कंठि पातल्याहि सोडसी न का मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१।।

तरिलेस, तारतीस, तारशील, पातकी

अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात की

हेचि पाय हासतील कौतुके तुला मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।२।।

एकदाहि दाविसी न आत्मरूप रेखडे

घालसी सुलोचनात राख खूपरे खडे

तारसी न मारसी न बारसीन का मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।३।।

मुख्य कार्यकारणात तूचि होसि वाकडे

दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे

आवघे तुझेचि कृत्य हे कळोनि ये मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।४।।

तू दीनाचि माय साचि, होसि का ग मावशी

विद्यमान हे सुशील नाम का गमावशी

नित्य मार शत्रुहाति मारवीसि का मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।५।।

जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा

मी तसा कधी न काहि बाई ! कापला गळा

हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।६।।

रासभीण नारदादि आहिराजी वासना

जी अटोपली प्रत्यक्ष नाहि राजिवासना

ती उनाड संगतीस आटपावया मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।७।।

ओढती न पेरु देति हात चालु चाडिचे

दुष्ट काम-क्रोध मांग जातिचे लुचाडिचे

त्यांचि पाठ राखितेस हे कळोनि ये मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।८।।

काय जन्म घातलासि, लविलीस काळजी,

काळजात इंगळीच खोचलीस काळ जी

ही जराचि धाड धाडलीस खावया मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।९।।

काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वती

काय घातलासि हा अनाथ देह कर्वती

काय लोटलेसि घोर दुःखसागरी मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१0।।

काय लीहीलेसि दैवि गर्भवास सोसणे

काय दीधलेसि जन्म-मृत्युलागि पोसणे

काय लाविलेस नित्य तोंड वासणे मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।११।।

आदि मध्य-आवसानि सर्व विश्व चाळसी

होसि तू तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी

विष्णुदास व्यक्त नाम रूप गूण का मला

हे विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ।।१२।।

—–00000—–

  1. सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती

 

शिवे चित्कल्लोळे परम विमले मंगलमये

मुखे वर्णू काये सकल गुणानंद निलये

दयाळे श्रीबाळे विधि-हरि हरादीक जपती

 सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।१।।

अहो अंबाबाई परात्पर रूपे प्रगटसी

किती ही ब्रम्हांडे त्याजुनि स्थिति संहार करिती

पुराणे षट्शास्त्रे स्तुति बहू तुझी ख्याति वादती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।२।।

तुवा भक्तासाठी सगुण सदये रूप धरिले

श्रिये वेणी कानी लखलखित तटांग युगुले

बरे नाकी मुक्ताफळ बहू अलंकार वसती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।३।।

बरे नेत्रांबूजे अरुण तनु अष्टादशभुजा

महोत्साही तुझी करुनि सुरसंपादन पुजा

उदो शब्दे हाती धरुनि दिवट्या नृत्य करिती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।४।।

श्रिये पुष्पे गंधे घवघवित ताम्बूल वदनी

अनेकांच्या सिद्धि वसति तुजपाशी निशिदिनी

तुझ्या तेजे दुर्गे अघतम विदारूनि पुढती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।५।।

नमो विश्वाधारे अभिनव तुझा खेळ जननी

प्रतापे दुष्टाला वधुनि विजयी तू त्रिभुवनी

उभे द्वारी इंद्रादिक निकट सेवेत असती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।६।।

मला पावे वेगी हृदय न करी निष्ठुर कदा

कृपेने तू पाही चुकविसि जगी घोर समुद्रा

तुझ्या भक्ती वींना विषय मज काही न लगती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।७।।

चिदानन्दे देवी निज भजनतेने श्रम हरे

प्रपंचाचा धंदा सधन बघ येथोनि विसरे

स्वभावे गोसावी सुत करितसे हीच विनती

सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।८।।

—–00000—–

 

 अशाला कशाला गया आणि काशी

 

मनी ध्याय जो रेणुकेच्या पदासी

मुखी गाय जो रेणुकेच्या पदासी

पदी जाय जो रेणुका मंदिरासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।१।।

करी प्रत्यही मातृतीर्थात स्नान

मनी रेणुकेचे सदोदीत ध्यान

असे नित्य मातापुरक्षेत्रवासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।२।।

सदा देई तातास मातेस मान

परस्त्रीस जो मानि माते समान

न जो हात लावी पराया धनासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।३।।

न उच्चारि जो दोष वाचे पराचे

गुणा वर्णितो नित्य जो ईश्वरीचे

परद्रोह ज्याच्या शिवेना मनासी । अशाला कशाला गया आणि काशी ।।४।।

मिळे नीतिने तेवढ्यानेच तुष्ट

न कोणासवे ही जयाचे वितुष्ट

न जो दूखवी वाणिने आणिकांसि । अशाला कशाला गया आणि काशी ।।५।।

सदा ज्याचिया वास चिती दयेचा

सदा लागला ध्यास ज्या रेणुकेचा

गिळीना कधी जो अधर्माचि माशी । अशाला कशाला गया आणि काशी ।।६।।

झिजे देह ज्याचा सदा देवकाजी

वसेना कधी दुर्जनांच्या समाजी

न निंदि न वंदी निखंदी परासि । अशाला कशाला गया आणि काशी ।।७।।

सदा रेणुका भक्तिने धन्य झाला

मनस्ताप निःशेष ज्याचा निवाला

वदे त्या विशी वासुदेव प्रकाशी । अशाला कशाला गया आणि काशी ।।८।।

—–00000—–

  1. उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ

 

माझी पतिताची पापकृती खोटी

तुझी पावन करण्याची शक्ति मोठी

समजवंता मी काय समजाऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।१।।

जरी गेलिस तू मायबाई झोपी

तरी बुडतिल भवसागरत पापी

ब्रम्हज्ञानी ही लागतील वाहू

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।२।।

कामक्रोधादिक चोरटे गृहात

शिरूनि पडले ते दुष्ट आग्रहात

लुटू म्हणती हाणु, मारू जीव घेऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।३।।

काळसर्प मुख, वासुनी उषाला

टपत बसला तो भिइना कशाला

कितीतरि या निर्वाणी तुला वाहू

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।४।।

कृपा सोडुनि निजलीस यथासांग

उपेक्षीसी मज, काय आता सांग

कृपावंते ! निष्ठूर नको होऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।५।।

तुझ्याविण मी कोणासि हात जोडू

आई म्हणुनी कोणाचा पदर ओढू

तुझे पाय सोडूनि कुठे जाऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।६।।

जगी त्राता तुजवीण कोणी नाही

माझि कोणी कळवळ जाणिनाही

तूच जननी तू जनक बहिण भाऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।७।।

नको सांड करू माझिया जिवाची

तुला एकविरे आण भार्गवाची

नको सहसा जगदंबे अंत पाहू

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।८।।

जरी माझी ना करिशी तू उपेक्षा

तरी वाढेल तुझे नाव याहिपेक्षा

विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ

उठ अंबे ! तू झोपी नको जाऊ ।।९।।

—–00000—–

  1. दयाळे ! तुझ्या कोटि ब्रम्हाण्ड पोटी

दयाळे ! तुझ्या कोटि ब्रम्हाण्ड पोटी

स्वये पाळिशी जीव कोट्यानकोटी

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१।।

कधी आपुले दाविसी मूळपीठ

मिळो ना मिळो खावया गूळ-पीठ

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।२।।

तुझ्यापाशि राहीन खाईन भाजी

जगामाजि सांगेन ही माय माझी

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।३।।

बरा नाहि का मी धुया लुगडे हो

अशा पूरवावी दयाळू गडे, हो

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।४।।

तुझी भक्ति अंगामधे संचरावी

तुझी माउली वेणि म्या विंचरावी

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।५।।

तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी

तुझ्या द्वारि राहीन, वाहीन पाणी

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।६।।

नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला

तुझ्या पंक्तिला येउ दे द्वादशीला

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।७।।

जिवाहूनि आता करू काय दान

आईने रुसावे असा कायदा न

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।८।।

सदा विष्णुदसाचिया हे अगाई

दया येउ दे जाहलो गाइ-गाई

नुपेक्षी मला आदिमाये! परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।९।।

—–00000—–

  1. सदा सर्वदा मोरया, शारदाही

सदा सर्वदा मोरया, शारदाही

सदा सर्वदा सद्गुरूंच्या पदाही

नमावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१।।

सदा सर्वदा नित्यनेमे प्रभाते

विधी-श्रीहरी-पार्वतीवल्लभाते

स्मरावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।२।।

सदोदीत माता, पिता, ज्येष्ठबंधू

सदोदीत धेनू, यती, विप्र, साधू

भजावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।३।।

षडन्यास, मुद्रा, योगसूत्रे पदेची

अनुष्ठान, संध्या, मालिका त्रीपदेची

जपावी, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।४।।

सदा सर्वदाही तपोयज्ञदान

यथासांगची देवपूजाविधान

करावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।५।।

बहू देव, देवी, रवी, चंद्र, तारा

बहू रंग लीला, बहू अवतारा

गणावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।६।।

सदा वेद शास्त्रे, पुराणे, कवीता

सदाsभंग, ज्ञानेश्वरी, मूळगीता

पढावी, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।७।।

अयोध्यापुरी, द्वारका-पुण्यक्षेत्री

प्रयगी, त्रिवेणी, महातीर्थ यात्री

भ्रमावे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।८।।

प्रकशीत नानाsकृती-रंग-रूपे

शिळा, हेम, ताम्र, लोह, वंग, रूपे

आकारे, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।९।।

सदा विष्णुदासाचिया सन्निधानी

रहावे अता निर्वाणी निधानी

नुपेक्षी, परंतू परंतू परंतू

अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तू ।।१0।।

—–00000—–

  1. साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके

जय जय विश्वपते, हिमाचल सुते, सत्यव्रते भगवते

वांछा कल्पलते, कृपर्णव धृते, भक्तांकिते, सन्मते

साधू वत्सलते, अधर्मरहिते, सद्धर्म श्रीपालके 

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।१।।

अष्टादंडभुजा प्रचंड सरळा, विक्राळ दाढा शुळा

रक्त श्रीबुबुळा प्रताप अगळा, ब्रम्हांड माळा गळा

जिंव्हा ऊरस्थळा, रुळे लळलळा, कल्पांत कालांतके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।२।।

कोटीच्या शतकोटी बाण सुटती, संग्राम प्राणार्पणे

तेवी रूप प्रचंड देख भ्रमती, मार्तंड तारांगणे

सोडीले तव सुप्रताप पाहता, गर्वास श्रीत्र्यंबके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।३।।

युद्धी चाप करी फिरे गरगरा, चक्रापरी उद्भीटा

आरोळी फुटता धरा थरथरा, कापे उरी तटतटा

साक्षात काळ पळे बहू झरझरा, धाके तुझ्या अम्बिके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।४।।

अंगी संचरता सकोप उठती, ज्वाळा मुखी भडभडा

भूमी आदळता द्वीपाद उठती, शैले-मुळे तडतडा

चामुंडे उररक्त तू घटघटा महिषासुर प्राशके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।५।।

आशापाश नको, जगी भिक नको, परद्रव्य दारा नको

कायाक्लेश नको, दया त्यजु नको, निर्वाण पाहू नको

कामक्रोध नको, महारिपु नको, निंदा नको या मुखे

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।६।।

त्वद्भक्ती मज दे, भवानि वर दे, पायी तुझ्या राहु दे

सद्धर्मी मति दे, प्रपंचि सुख दे, विघ्ने दुरी जाऊ दे

धैर्य श्री बल दे, सुकीर्ति यश दे, बाधो न दे पातके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।७।।

स्वापत्या छ्ळणे कृपा विसरणे, अश्लाघ्य की हे अहा

तूझा तूचि पहा विचार करुनी, अन्याय की न्याय हा

विष्णुदास म्हणे कृपाचि करणे, आता जगन्नायके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके ।।८।।

—–00000—–

  1. नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू

 

तुझी आसति कोटी ब्रम्हांड बाळे

तसे घेइ पोटी मलाही दयाळे

नको दूसर्‍या गर्भवासासि धाडू

 नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।१।।

तुझ्या वाचुनि होतसे जीव कष्टी

तुला एकदा पाहूदे माय दृष्टी

नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।२।।

समर्थागृही इष्ट शिष्टाधिकारी

तया पंगती बैसलीया भिकारी

नको अन्नपात्रामधे भिन्न वाढू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।३।।

जपोनि तुझे नाव मोठे प्रतापी

बुडाला जगी कोणता सांग पापी

नको येकट्याला मला खालि धाडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।४।।

तुझ्या भेटीचि लागली आस मोठी

परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी

नको भीड त्यांची धरू माझि तोडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।५।।

तुझा पुत्र हा वाटल्या तारणे हो

तुझा शत्रु हा वाटल्या मारणे हो

नको तीसरा याविणे खेळ मांडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।६।।

पुरे झालि ही नावनीशी कवीता

रसाभास होतो , बहू शीकवीता

मना माउलीला नको व्यर्थ भांडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।७।।

आम्ही लेकरांनी रडावे रुसावे

अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे

नको कायदा हा तुझा तूचि मोडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।८।।

गडे ! येउनी तू कडे घे मुक्याने

करी शांत आलिंगुनीया मुक्याने

नको विष्णुदासाप्रती तू विभांडू

नको रेणुके ! आपुले ब्रीद सोडू ।।९।।

—–00000—–

  1. आळस नको करू ये गुरुराया

 

आळस नको करू ये गुरूराया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।धृ।।

या भवकाननी भव भय वाटे

डोंगर अजगर कंटक वाटे

षड्रिपु वृकव्याघ्र टपलेत खाया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।१।।

संसार शिरि भार थोर पसारा

पळता नये आशा चिखलचि सारा

सर्पदशेंद्रिये वेष्टिले पाया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।२।।

पडला गळ्यामध्ये पहा काळफासा

अपपर जन सारे पहाति तमाशा

स्त्रीसूत प्रियमित्र नये सोडवाया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।३।।

अज्ञान तमदरी जो घसरावे

सुचले भले तुझे पाय स्मरावे

प्रगटविसी ज्ञान भास्करोदया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।४।।

करशील सत्य दया विष्णुदासा

आहे तुझा मनी दृढ भरोसा

अशिच सदा मती दे गुण गाया

तुजवीण नरतनू जाईल वाया ।।५।।

—–00000—–

  1. श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी

 

अंबे महात्रिपुरसुंदरि आदिमाये

दारिद्र्य दुःख भवहारिणि दावि पाये

तुझा अगाध महिमा वदती पुराणी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।१।।

लज्जा समस्त तुजला निज बालकाची

तू माऊली अति स्वये कनवाळू साची

व्हावे प्रसन्न करुणा परिसोनि कानी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।२।।

हे चालले वय वृथा भुललो प्रपंची

तेणे करोनि स्थिरता न घडे मनाची

दुःखार्णवात बुडतो धरि शीघ्र पाणी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।३।।

निष्ठूरता जरि मनि धरिशील आई

रक्षील कोण तुजवाचुनि ओ तुकाई

तूझाचि आश्रय असे जरि सत्य मानी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।४।।

तू वंद्य या त्रिभुवनात समर्थ कैसी

धाके तुझ्या पळ सुटे अरि दानवासी

येती पुजेसि सुर बैसुनिया विमानी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।५।।

जाळीतसे मजसि हा भवताप अंगी

त्याचे निवारण करी मज भेट वेगी

आनंद सिंधु लहरी गुण कोण वाणी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।६।।

नेणे पदार्थ तुजवाचुनि आणि काही

तू माय बाप अवघे गणगोत पाही

आणिक देव दुसरा हृदयात नाही

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।७।।

आता क्षमा करिशि गे अपराध माझा

मी मूढ केवळ असे परि दास तूझा

तू सोडिशील मजला झणी हो निदानी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।८।।

जैसे कळेल जननी जन पाळि तैसे

मी प्रार्थितो सकळ साक्षचि जाण ऐसे

गोसावि नंदन म्हणे मजलागि ध्यानी

श्री रेणुके करि कृपा वरदे भवानी ।।९।।

—–00000—–

अभंग

 

माझी रेणुका माऊली । कल्पवृक्षाची साउली ।।१।।

जैसी वत्सालागी गाय । तैसी अनाथासी माय ।।२।।

हाके सरशी घाईघाई । वेगे धावतची पायी ।।३।।

आली तापल्या उन्हात । नाही आळस मनात ।।४।।

खाली बैस घे आराम । मुखावरती आला घाम ।।५।।

विष्णुदास आदराने । वारा घाली पदराने ।।६।।

—–00000—–

जोगवा

 

अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी

मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनि

त्रिविध तापाची तापाची करावया झाडणी

भक्ता लागी तू , भक्ता लागी तू । पावसी निर्वाणी ।।१।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन ।।धृ।।

आता साजणी साजणी झाले मी निःसंग

विकल्प नवर्‍याचा नवर्‍याचा सोडियला मी संग

काम क्रोध हे क्रोध हे झाडियले मातंग

झाला मोक्षाचा झाला मोक्षाचा सुरंग ।।२।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

विवेक रसाची रसाची भरीन परडी

आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी

मनो विकार मनो विकार करीन कुर्वंडी ।।३।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालिन

हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन

भेद रहीत भेद रहीत वारिसी जाईन ।।४।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

नवविध भक्तीचे भक्तीचे करुनी नवरात्र

नवस करोंनी करोंनी मागेन ज्ञानपुत्र

दंभ सासरा दंभ सासरा सांडीन कुपात्र ।।५।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

आईचा जोगवा जोगवा मागून ठेविला

जाउनि महाद्वारी महाद्वारी नवस म्यां फेडीला

एका पणे हो पणे हो जनार्दन देखिला

जन्ममरणाचा जन्ममरणाचा फेरा चुकवीला ।।६।।

आईचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

अंबेचा जोगवा जोगवा जोगवा मागेन

—–00000—–