तेथे कर माझे जुळती
कर्तव्यदक्ष आणि मायाळू परदेशी मावशी
आपल्या सर्वांच्या घरी बहुधा भांडी घासणे, कपडे धुणे व स्वयंपाक या कामांसाठी मोलकरणी लावलेल्या असतात.बहुतेक वेळा गृहिणी आपल्या मोलकरणीच्या कामाबाबत खूष नसते . अर्थात त्याला कारणही तसंच आहे.आजकालच्या मोलकरणी पाट्या टाकल्या सारखं कसंतरी काम करतात . अर्थात सर्वजणी तशा नसतात, त्यात खूप जणी खूप चांगल्या पण असतात. पण बऱ्याच जणी पूर्व कल्पना न देता सर्रास गैरहजर राहतात.दोन दिवस येणार नाही असं सांगून प्रत्यक्षात आणखी कांही दिवस गैरहजर राहतात.मोबाईल फोन लवकर घेत नाहीत किंवा घेतच नाहीत आणि असे का केले म्हणून विचारले तर बॅटरी संपली होती , हे किंवा असेच कांहीतरी थातुरमातुर कारण सांगतात .त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार कित्येक वर्षापासून रूढ झाला आहे .म्हणजेच जेवढा एका महिन्याचा पगार तेवढाच दिवाळीचा बोनस.तसेच आपण कांही दिवस गावी गेलो किंवा मोलकरीण गावी गेली तर त्या कालावधीचा पगार कापायचा नाही.पुन्हा दोन तीन वर्ष झाली की हमखास पगारवाढ द्यावीच लागते.
बरं , मोलकरीण बदलावी म्हटलं तर लवकर दुसरी मोलकरीण मिळत नाही . आणि समजा यदाकदाचित मिळालीच तर ती आहे तिच्यापेक्षा कामचुकार निघाली तर काय घ्या. त्यामुळे आहे त्या मोलकरणी कडून काम करून घेणेच ठीक आहे अशी भूमिका बहुतेक वेळी घेतली जाते…असो ….
मी ज्यावेळी औरंगाबादला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो त्यावेळी किरायाची खोली घेऊन रहात होतो. आमच्या त्या वाड्यात बरेच विद्यार्थी रहात होते.मी स्वयंपाकासाठी ज्या मावशी लावल्या त्या परदेशी मावशी म्हणून ओळखल्या जात होत्या. परदेशी मावशींचं खरं नांव कुणालाच माहित नव्हतं . रोज दोन वेळ स्वयंपाकासाठी एका विद्यार्थ्यासाठी महिन्याचा पगार वीस रूपये होता.यामध्ये भांडी घासणे समाविष्ट होते .
मावशीच्या हाताला खरंच चव होती.
मी रूमची एक किल्ली मावशींकडे देऊन ठेवली होती.मी बाहेर असलो तर मावशी परस्पर रूमवर येऊन स्वयंपाक करून जायच्या.
रूममधल्या सुतळीच्या तुकड्याला सुध्दा मावशींनी कधी हात लावला नाही..
मावशी अजब नगर मधे कुठेतरी रहात होत्या.माझ्या खोलीपासून सुमारे एक किलो मिटर अंतर होते.
मावशीला मूलबाळ नव्हते असे मला समजले. वाड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्या मुलासारखी माया करायच्या.
एकदा माझ्याकडे पीठ संपले होते. गहू दळून आणायला मला जमले नाही . कॉलेजला गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संध्याकाळी रूम वर आलो तर मावशी छान पोळ्या करीत होत्या. मी विचारले , मावशी कणीक तर संपली होती ना ? मग ह्या पोळ्या कशा ? मावशी म्हणाल्या , सदाफुले (माझा मित्र आणि शेजारी) कडून पीठ आणलं .तुम्हाला उपाशी कसं ठेऊ ? नाही जमत कधी कधी पोरांना दळण आणायला . तेंव्हा मी असंच दुसऱ्या मुलाकडून पीठ आणून पोळ्या करते. तुमचं गिरणीतून पीठ आलं की सदाफुलेला त्यांचं उसनं घेतलेलं पीठ परत करील.
माझा भाचा, शंकर, याला त्याच्या परिक्षेच्या काळात मी माझ्या रूमवर एक महिना ठेऊन घ्यायचो. एकदा संध्याकाळचा स्वयंपाक करून मावशी निघून गेल्या. थोड्या वेळाने शंकर आला. माझ्याकडे राहण्यासाठी. त्याच्यापाठोपाठ मावशीही आल्या. मी म्हटले , आत्ताच तर तुम्ही स्वयंपाक करून गेलात ना. मग पुन्हा कशाला आल्या ? त्यावर मावशी म्हणाल्या शंकरसाठी स्वयंपाक करायचा म्हणून आले .
आणि त्यांनी कांही मिनिटात शंकरसाठी जास्तीचा स्वयंपाक केला ..
मावशींमध्ये किती माणुसकी, सहृदयता, extreme devotion towards duty हे दुर्मिळ गुण होते याचं आणखी एक उदाहरण देतो ..
एकदा शहरात कुठेतरी दंगल झाली होती त्यामुळे शहरात कर्फ्यू लागला होता. त्यामुळे जेवणाची अडचण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.कर्फ्यूमुळे मावशी येणार नाहीत असं मी समजत होतो. पण माझा अंदाज सपशेल खोटा ठरला. मावशी त्यांच्या नेहमीच्या वेळेत रुमवर हजर झाल्या. मी म्हटलं , अहो मावशी , गावात संचारबंदी लागलीय. तुम्ही कशा आल्या आणि कशाकरता आल्या ?
मावशी म्हणाल्या मी मेन रोड चुकवून गल्लीबोळातून आले. पोरांना उपाशी कसं ठेवू? स्वयंपाक करून मग अशीच गल्लीबोळातून घरी परत जाईन .येतांना नाही का आले ? कुठे काय झालं ?’
मी अवाक् झालो !!!
आणि निरूत्तरही झालो.मनात म्हटले केवढ्या मोठ्या मनाची, कर्तव्यदक्ष आणि हिकमतीची आहे ही माय माऊली.
आमच्या वाड्यातल्या मुलांचा स्वयंपाक करूनच मग मावशी गल्लीबोळातून अजबनगरला आपल्या घरी गेल्या .
मित्रांनो , जगात चांगली माणसे कमी प्रमाणात आहेत आणि अतिशय चांगली माणसे तर त्यापेक्षा कमी प्रमाणात आहेत .पण आहेत जरूर. अशा माणसांमुळेच जग चालले आहे.
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र सरकार

