https://goodworld.in A website by Madhav Bhope

Renuka Ashtak-10 तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी- रेणुका अष्टक-10

devi image

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-10

तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी

( वृत्त : वसंततिलका )
श्रीमूळपीठ – शिखर स्थळि कोटि लक्ष
चिंतामणी सुरभि शोभति कल्पवृक्ष
मी तेथ मंदमति कां श्रमतों बसूनी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥१॥


यावी दया तुज बया ! शतशः अशांची
जो फार दीन बसला धरुनी अशाची
गेली निघून म्हणतां म्हणतां जवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥२॥


केलें तुझें भजन कीं निष्काम नाहीं
आतां असो दुर परी दुष्कामना ही
आहे विनंति इतुकी जननी ! निदानीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥३॥


वाटे पला परम घातकि मी मनुष्य
म्यां नासिलें परम दुर्लभ हें अयुष्य
काळासि केलि तुज वंचुनि मेजवानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥४॥


झाली शरीरिं विषयानलिं यातनाची
गंजी जशी समुळची जळते तणाची
यासाठी आइ ! तुज प्रार्थित दीनवाणी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥५॥


गेली बहीण, जननी, दिविं तेंवि तात
गेली वधू प्रमुख मानिली जी हितांत
ही जाहली अशि, असो, जरि सर्व हानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥६॥


जी केलि म्यां जपतपादिक साधनाही
ती व्यर्थ गेलि सहसा तरि बाध नाहीं
आलों तुला शरण मी निज – सौख्यदानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥७॥


आलीस तूं सकलही स्वरुपीं अकारा
हें नेणुनी उगिच मी करितों पुकारा
येती जशी नउ नऊ, गणितां नवांनीं
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥८॥


शक्ती असो जग – हितास्तव अंगिं बाकी
यावीण कांहिं नलगे मजलागिं बाकी
हें विष्णुदास विनवी श्रीमृगराज – यानी
तूं एक वेळ तरि दर्शन दे भवानी ॥९॥

************************************** 

Renuka Ashtak-9 ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं- रेणुका अष्टक-9

devi-1

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी काही अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-9

ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं

 

( दिंड्या )
माझि पतिताची, पापकृती खोटी ।
तुझी पावन करण्याचि शक्ति मोठी ॥
समजवंता मी, काय समजाऊं ।
ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं ॥१॥


जरी गेलिस तूं मायबाइ झोंपी ।
तरी बुडतिल भव – सागरांत पापी ।
ब्रह्मज्ञानीही लागतील वाहूं ॥ ऊठ० २॥


कामक्रोधादिक चोरटे गृहांत ।
शिरुनि पडले ते दुष्ट आग्रहांत ॥
लुटूं म्हणती हणुं, मारुं जीव घेऊं ॥ ऊठ० ३॥


काळसर्प मुख, वासुनी उशाला ।
टपत बसला तो, भीइना कशाला ॥
कितीतरि या निर्वाणिं तुला बाहूं ॥ ऊठ० ४॥


कृपा सोडुनि निजलीस यथासांग ।
उपेक्षीसी मज, काय अतां सांग ।
कृपावंते ! निष्ठूर नको होऊं ॥ ऊठ० ५॥


तुझ्याविण मी कोणासि हात जोडूं ।
आइ म्हणुनी, कोणाचा पदर ओढूं ॥
तुझे पाय सोडूनि कुठें जाऊं ॥ ऊठ० ६॥


जगीं त्राता तुज – वीण कोणि नाहीं ।
माझि कोणी कळवळ जाणिनाही ॥
तूंच जननी तूं, जनक बहिण भाऊ ॥ ऊठ० ७॥


नको सांड करुं, माझिया जिवाची ।
तुला एकविरे ! आण भार्गवाची ॥
नको सहसा जगदंबे अंत पाहूं ॥ ऊठ० ८॥


जरी माझी ना, करिसी तूं उपेक्षा ।
तरी वाढेल तुझें नांव याहिपेक्षां ॥
विष्णुदास म्हणे, गूण तुझे गाऊं ॥ ऊठ० ९॥

************************************** 

Renuka Ashtak-8 नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं- रेणुका अष्टक-8

devi-1

विष्णूदास कवि (परमहंस परिव्राजकाचार्य पुरुषोत्तमानंद सरस्वती) हे इ. स. १८४४ ते १९१७ या कालावधीत होऊन गेलेले एक दत्तभक्त आणि रेणुका मातेचे निस्सीम भक्त होऊन गेलेले आहेत. आयुष्यातील खूप काळ त्यांनी माहूर येथे श्री रेणुकादेवीच्या भक्तीत व्यतीत केला आणि त्यांचे निर्वाण ही तेथेच झाले. त्यांनी रचलेल्या देवीच्या आरत्या, पदें आणि अष्टकें महाराष्ट्रातील विशेषतः देवीच्या भक्तांच्या घरा घरात प्रसिद्ध आहेत. विष्णूदास हे अत्यंत आर्तपणे आपल्या आईला- रेणुकामातेला साद घालतात- भेट देण्याविषयी कळकळीची विनंती करतात- कधी कधी, बालकाच्या अधिकाराने, रेणुका मातेवर रागावतात- या भव सागरात आपल्याला विषय रूपी शत्रूंशी झुंजायला एकट्यालाच पाठविले म्हणून तिला नांवे ही ठेवतात.  विष्णूदासांची अष्टकें अत्यंत भावपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी देवीचे नवरात्र असतात, त्यांच्या घरी नवरात्रात दररोज रात्री घरात सर्व जणांनी एकत्र बसून ही  अष्टकें म्हणण्याची प्रथा आहे. अशी काही अष्टकें एका ठिकाणी मिळावी म्हणून या ब्लॉग च्या वाचकांसाठी यापूर्वी ७ अष्टकें इथे उपलब्ध केली होती. त्या सगळ्यांची लिंक खाली दिलेली आहे. आता अजून काही अष्टकें या ठिकाणी देत आहोत.


विष्णूदासाची कविता 

Renuka Ashtak-8

नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं

( वृत्तः भुजंगप्रयात )
तुझीं आसती कोटि ब्रह्मांड बाळें ।
तसें घेइ पोटीं मलाही दयाळे ॥
नको दुसर्‍या गर्भवासासि धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥१॥

तुझ्या वांचुनी होतसे जीव कष्टी ।
तुला एकदां पाहुं दे माय दृष्टीं ॥
नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥२॥

समर्थागृहीं इष्ट शिष्टाधिकारी ।
तया पंगतीं बैसलीया भिकारी ॥
नको अन्नपात्रामधें भिन्न वाढूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥३॥

जपोनी तुझें नांव मोठें प्रतापी ।
बुडाला जगीं कोणता सांग पापी ॥
नको येकट्याला मला खालिं धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥४॥

तुझ्या भेटिची लागली आस मोठी ।
परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी ॥
नको भीड त्यांची धरुं माझि तोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥५॥

तुझा पुत्र हा वाटल्या तारणें हो ।
तुझा शत्रु हा वाटल्या मारणें हो ॥
नको तीसरा याविणें खेळ मांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥६॥

पुरे झाली ही नांवनीशी कवीता ।
रसाभास होतो, बहु शीकवीता ॥
मना माउलीला नको व्यर्थ भांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥७॥

अम्ही लेकरांनीं रडावें रुसावें ।
अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे ॥
नको कायदा हा तुझा तूंचि फाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥८॥

गडे ! येउनी तूं कडे घे मुक्यानें ।
करी शांत आलिंगुनीया मुक्यानें ।
नको विष्णुदासाप्रती तूं विभांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥९॥

************************************** 

संत तुकारामांचे अभंग-6 Sant Tukaram abhang-6

tukaram-5

Sant Tukaram abhang-6 

संत तुकारामांचे अभंग-6

थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत ५ लेखांमधून आपण ढोबळपणे विविध विषयांनुसार तुकाराम महाराजांचे अभंग पाहिले. तुकाराम महाराजांचे अभंग इतके आहेत, आणि इतके हृदयस्पर्शी आहेत की कोणता अभंग घ्यावा आणि कोणता सोडावा हे ठरवणे फार अवघड आहे.

आज त्यांचे अजून काही करुणापरक अभंग आपण पाहूत.

खालील अभंगांत तुकाराम महाराजांनी तुमची आमची स्थितीच अगदी यथार्थ वर्णन केली आहे असे वाटते. आपल्याला जप तप ही साधनें जमत नाहीत, ‘न सांडवे अन्न-‘ उपास तापास पण करवत नाहीत, वनात जाता येत नाही, काही पाठांतर करावे म्हटले तर तेही होत नाही. कसलीच योग्यता नाही- आणि आयुष्य तर थोडे आहे. काय करावे? हे आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे. पंढरी राया-तुझ्यावीण सगळा शीण वाटतो. मला फक्त एकच येते- सगळी लाज सोडून तुला शरण येणे आणि तुझी करुणा भाकणे- असे सगळे भाव खालील काही अभंगांत व्यक्त होतात-

 

जपतपादि साधनें । मज चितवेना मनें

करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें

तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं

 

 

न संडवे अन्न । मज न सेववे वन

म्हणऊनि नारायणा । कींव भाकितों करुणा

नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर

तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें

 

येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया

तुजविण शीण वाटे क्षीण झाली काया

यातिहीन मतिहीन कर्म हीन माझें

सर्व लज्जा सांडोनियां शरण आलों तुज

दीनानाथ दीनबंधु नाम तुज साजे

पतितपावन नाम ऐसी ब्रीदाबळी गाजे

विटेवरी उभा नीट कटावरी कर

तुका म्हणे हेंचि आम्हां ध्यान निरंतर

 

 

_______________________

 

आणि मागणे काय? तर एकच मागणे आहे- माझे प्रपंचातील चित्त ओसरावे आणि तुझ्या पायी लागावे –

 

प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो

ऐसें करीं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा

पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता

लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा

 

 

पतित पतित । परि मी त्रिवाचा पतित

परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता

नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि

अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों

 

 

______________________

 

माझ्या मनात दुर्बुद्धि कधीही न् येवो

 

दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा

आतां मज ऐसें करीं तुझे पाय चित्तीं धरीं

उपजला भावो तुझे कृपें सिद्धी जावो

तुका म्हणे आतां लाभ नाहीं यापरता

 

____________________________

 

 

सुरुवातील हरिनाम घेतांना मन त्यामध्ये लागत नाही- पण हरकत नाही- मुखात नाम आले की ते नाम आपले काम बरोबर करेल आणि हळू हळू मनातही उतरेल.

 

नसे तरी मनीं नसो परी वाचे तरी वसो

देह पडो या चिंतनीं विठ्ठलनामसंकीर्तनीं

दंभस्फीति भलत्या भावें मज हरिजन म्हणवावे

तुका म्हणे काळांतरीं मज सांभाळील हरी

 

________________________

 

सुरुवातीला आपल्या इंद्रियांना बळजबरीने वळण लावावे लागते. पण आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, की एकदा इंद्रियांना वळण पडले- देवाच्या सुखाची गोडी लागली, की मग ती अशी लुब्धावतात  की मग तिथून हलण्याचे नांव घेत नाहीत-

 

आणीक दुसरें मज नाहीं आतां नेमिलें या चित्तापासूनियां

पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं जागृतीं स्वपनीं पांडुरंग

पडिलें वळण इंद्रियां सकळां भाव तो निराळा नाहीं दुजा

तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ तें ध्यान विटेवरी

 

_______________________

 

आपल्यापैकी काही जण गुरू नाही म्हणून स्वस्थ बसतात. पण तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे माझ्यावर असे प्रेम आहे की देव स्वतःच गुरू होतो- माझ्या मागे पुढे उभा राहून सांभाळतो- आणि तुकाराम महाराज म्हणतात- विश्वास नसेल तर पुराणात पाहा- असे कितीतरी पुरावे सापडतील.

 

खालील अभंग मी खुलताबाद येथे असतांना माझ्या रूम वर (तेंव्हा बॅचलर होतो) रात्री पडल्या पडल्या, कुठल्या तरी देवळात, रात्री भजनी मंडळातील गायक तल्लीन होऊन गात असतांना कानावर आला आणि तो तसाच हृदयावर कोरला गेला. पूर्वी आपल्याकडे दर गुरुवारी, एकादशीला, किंवा पर्वाला कोणाच्या तरी घरी किंवा मंदिरात लोक एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भजने म्हणत, रामकृष्ण हरि कीर्तन करत. मला आठवते, मी मॅट्रिकला असतांना माझे वडीलही भजनी मंडळात जाऊन या भजनात सामील होत. मी कधी कधी त्यांच्या सोबत जात असे. आता अशी भजनें दुर्मिळ झाली आहेत.

 

 

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु

पढियें देहभाव पुरवी वासना अंतीं तें आपणापाशीं न्यावें

मागें पुढें उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे

योगक्षेम त्याचें जाणे जडभारी वाट दावी करीं धरूनियां

तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं पाहावें पुराणीं विचारूनी

 

आणि संसार करतांना देवाची आठवण कशी करावी, असा कोणाला प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर ही महाराजांनी देऊन ठेवले आहे-

 

दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी

ध्यान लागो ऐसें हरी तुझे चरणीं तैशापरी

 

अशाच अर्थाचा एक अभंग आपण नामदेव महाराजांचाही पाहिला होता.

 

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें तियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

 

___________________________

 

खालील एक अभंगही मला खूप आवडतो. अगदी प्रॅक्टिकल आणि matter of fact असा हा अभंग आहे. शेवटी ‘औट’ म्हणजे साडेतीन हात तुझी जागा आहे. कशाला तृष्णा आणि हांव वाढवतोस- एक राम विसरला तर सगळे श्रमच आहेत.

 

एक शेर अन्ना चाड येर वाउगी बडबड

कां रे तृष्णा वाढविसी बांधवूनि मोहपाशीं

औट हात तुझा जागा येर सिणसी वाउगा

तुका म्हणे श्रम एक विसरतां राम

 

_________________

 

खालील एक अभंग फारच गमतीशीर आहे. जेंव्हा दोन स्वार्थी लोक एकमेकांना भेटतात, तेंव्हा ते स्वतःच्या स्वार्था साठी दुसऱ्याला कसे ठकवायचा प्रयत्न करतात याचे फारच विनोदी उदाहरण दिले आहे.

 

वाघें उपदेशिला कोल्हा सुखें खाऊं द्यावें मला

अंतीं मरसी तें चुके मजही मारितोसी भुके

येरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडें झाला

देह तों जाणार घडेल हा परउपकार

येरू म्हणे मनीं ऐसें जावें समजोनि

गांठी पडली ठका ठका त्याचें वर्म जाणें तुका

 

एकदा एक वाघ कोल्ह्याला उपदेश करतो की तुझे शरीर तू मला सुखाने खाऊ दे कारण शेवटी हा देह पडणारच आहे, अंत हा कोणाला चुकणार नाही, त्यामुळे निदान माझा तरी भुकेने चाललेला जीव वाचव, त्याने तुझ्या पदरी पुण्यच पडेल.

हे ऐकून कोल्हा म्हणतो हे तू बरे केलेस, स्वतःच्या तोंडानेच काय बरोबर आणि काय चूक याचा निवाडा केला. देह सगळ्यांचाच पडतो त्यामुळे मला सोडून देऊन आणि भुकेने जात असेलेले स्वतःचे प्राण त्यागून तूच का हे पुण्य स्वतःच्या पदरी पडून घेत नाहीस? जेव्हा एका ठकाची दुसऱ्या ठकाशी गाठ पडते तेव्हा ते एकमेकांना असेच स्वार्थी सल्ले देतात, त्यामूळे अशा स्वार्थी लोकांच्या स्वार्थी उपदेशांचे वर्म मला आता कळून चुकले आहे.

 

यावरूनच ‘गाठ पडली ठका ठका’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

 

यापुढील लेखात आपण तुकाराम महाराजांचे आणखी काही प्रत्ययकारी अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

 

माधव भोपे

A glimpse of Vedic knowledge-3

yagya

A glimpse of Vedic knowledge-3

A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.

पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.

सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.

चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र.  यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही  जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.

क्र.

वेद

मंत्र संख्या

शैली

विवरण

1

ऋग्वेद

10462

मन्त्रपरक

सगळ्यात  प्राचीन वेद

2

यजुर्वेद

1975

गद्यात्मक

कर्मकांडपरक, शुक्ल आणि  कृष्ण भागात विभाजित

3

सामवेद

1875

गेयात्मक

संगीतमय, यातील बहुतेक  मंत्र ऋग्वेदातीलच आहेत.

4

अथर्ववेद

5987

प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक

सगळ्यात नवीन वेद

ऋग्वेदात काय आहे?

ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१

पदच्छेद- ओ३म्  अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१

agni

ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि  ब्रह्मा.  ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा.  ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन  करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!

yagya

सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.

पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.    

1) संहिता –

संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई

२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.

3) आरण्यके –

अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.

4) उपनिषदे –

सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग  उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.

उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.

अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.

ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.

  1. देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
  2. निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति  अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  3. समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
  4. तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
  5. स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि,  आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
  6. पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.

प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.

पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic knowledge-2

संत तुकारामांचे अभंग-5 Sant Tukaram abhang-5

tukaram-5

Sant Tukaram abhang-5 

संत तुकारामांचे अभंग-5 

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील काही अभंग आपण मागील 4 लेखांमधून पाहत आहोत. मागील काही लेखांत आपण पाहिले की संतांचा रुसवा देवापाशी, प्रेम देवाशी, भांडण देवाशी, जे काही मागायचे, हक्काने, तेही देवापाशीच. कुठल्याही प्रकारे, प्रत्येक क्षण हा देवाशी जोडला गेला पाहिजे. गीतेतील

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥अ.९-२२ ॥

“जे लोक अनन्य भावाने निरंतर माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो” या वचनावर दृढ श्रद्धा संतांची असते. त्यामुळेच ते देवाशी भांडूही शकतात.  

तुकाराम महाराजांचे काही अभंग असे देवाशी भांडण व्यक्त करणारे आहेत.

तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति आश्‍चर्य हें चित्ती वाटतसे

काय जाणों देवा होसील निजला नेणों जी विठ्ठला मायबापा

तुका म्हणे माझें दचकलें मन वाटे वायांविण श्रम केला

 देवाला इथे तुकाराम महाराज चक्क, ‘झोपला होता काय?’ असे खडसावून विचारीत आहेत! (भक्तांवर, तुझे नांव घेणाऱ्यांवर विपत्ति येतात, त्यावेळी धावून न येता नुसती गंमत पाहतोस). आणि देवा, तुझे नांव घेण्याचा उगाच खटाटोप केला असे म्हणत आहेत!

____________________

तसेंच खालील अभंगात, तुम्ही निर्गुणाची ‘खोळ’ ओढून बसला आहात, मग आम्हालाच का डोळे आणि कान दिले, या डोळ्यांनी आणि कानांनी तुमची अपकीर्ति पाहिली आणि ऐकली जात नाही, असे सांगतात.

तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे आम्हां कां हे डोळे कान दिले

नाइकवे तुझी अपकीर्ति देवा अव्हेरली सेवा देखवे

आपुले पोटीं तों राखियेला वाव आम्हांसी कां भाव अल्प दिला

तुका म्हणे दु:खी असें हें कळों द्या पुढलिया धंद्या मन नेघे

________________________

आणि खालील अभंगात तर, हरि तूं  निष्ठुर असेही म्हणतात! आणि पुढे त्या अभंगात, हरिश्चंद्राचे, शिबी राजाचे, बळी राजाचे, उदाहरण देऊन म्हणतात, की या तुझ्या भक्तांचे तू सर्वस्व हरण केलेस. तुला भावाने जे भजतात, त्यांच्या संसाराची तू ही गति करतोस,

हरि तूं निष्ठुर निर्गुण नाहीं माया बहु कठिण

नव्हे तें करिसी आन कवणें नाहीं केलें तें

घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव राज्य घोडे भाग्य सर्व

पुत्र पत्नी जीव डोंबा घरीं वोपविलीं

राजा शिबी चक्रवर्ती कृपाळु दयाळु भूतीं

तुळविलें अंतीं तुळें मांस तयाचें

बळी सर्वस्वें उदार जेणें उभारिला कर

करूनि काहार तो पाताळीं घातला

तुज भावें जे भजती त्यांच्या संसारा हे गति

ठाव नाहीं रे पुढती तुका म्हणे करिसी तें

__________________

आणखी एका अभंगात, देवा तू आंधळ्याची काठी हिरावून घेऊन त्याला कड्यावर लोटून देतोस, आणि साखर म्हणून हातात माती देतोस असेही म्हणतात.

अंधळ्याची काठी हिरोनियां कडा लोटी

हें कां देखण्या उचित लाभ किंवा कांहीं हित

चाळवूनि हातीं साकर म्हणोनि द्यावी माती

तुका म्हणे वाटे देवा पसरावे सराटे

__________________

तसेच खालील अभंग “आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण” इतक्या अटीतटीने देवाशी भांडणारे आहेत.

आम्हां गांजी जन तरि कां मेला नारायण

झालों पोरटीं निढळें ठाव नाहीं बुड आळें

आम्हीं जना भ्यावें तरि कां लाजिजे देवें

तुका म्हणे देश झाला देवाविण ओस

 

कामधेनचें वासरू खाया मिळे काय करूं

ऐसें आम्हां मांडियेलें विठो त्वां कां सांडियेलें

बेसुनि कल्पद्रुमातळीं पोटासाठी तळमळी

तुका म्हणे नारायणा भले लोकीं हें दिसेना

दुष्काळात जेंव्हा खायलाही मिळत नव्हते, तेंव्हाही भांडण विठ्ठलाशीच होते! त्यांनी कोणापुढेही हात पसरला नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला धनाचा नजराणा, त्यांनी आदरपूर्वक परत पाठविला, ही कथा प्रसिद्धच आहे.

दिवट्या, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।
पुढे ते म्हणतात,
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।

 _____________________

 देवाशी भांडणात एके ठिकाणी तर ते म्हणतात, देवा, आम्ही पतित नसतो, तर तू पतितपावन कसा झाला असतास?

जरी मी पतित नव्हतों देवा तरि तूं पावन कैंचा तेव्हां

म्हणोनि माझें नाम आधीं मग तूं पावन कृपानिधी

लोहो महिमान परिसा नाहीं तरी दगड जैसा

तुका म्हणे याचकभावें कल्पतरु मान पावे

 देवा, आम्ही मोठ्या नवसाने तुला झालोत, नाहीतर तुझे नांव कोणी घेतले असते, एवढेच काय, तुला पिंडदान तरी कोणी केले असते!?

 नवां नवसांचीं झालों तुम्हासी वाणीचीं

कोण तुझें नाम घेतें देवा पिंडदान देतें

कोण होतें मागे पुढें दुजे बोलाया रोकडें

तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतासि वोसंगा

__________________

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संत आपली माऊली मानत. तुकाराम महाराजही ज्ञानेश्वरांबद्दल बोलतांना आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त करतात-

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ अंगीं ऐसें बळ रेडा बोले

करील तें काय नव्हे महाराज परि पाहे बीज शुद्ध अंगीं

जेणें हे घातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची

तुका म्हणे तेथें सुखा काय उणें राहे समाधानें चित्ताचिया

 

बोलिली लेंकुरें वेडी वांकुडीं उत्तरे

करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध

नाहीं विचारिला अधिकार म्यां आपुला

तुका म्हणे ज्ञानेश्‍वरा राखा पायांपें किंकरा

____________

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजूनच प्रभावीपणे व्यक्त केला आहे-

ज्ञानियांचा राजा हा अभंग येथे ऐकू शकता

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां

मज पामरा हें काय थोरपण पायींची वाहाण पायीं बरी

ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें इतर तुळणें काय पुढें

तुका म्हणे नेणें युक्‍तीची ते खोली म्हणोनी ठेविली पायीं डोई

 __________________

 शरीराबद्दल बोलतांना शरीर हे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तसे पाहायला गेले तर शरीर हे दुःखाचे कोठार, घाणीचे आगर आहे. पण हेच शरीर हरिभजनासाठी कामाला येते म्हणून हे शरीर चांगले आहे, असे सांगतात.

 शरीर दुःखाचें कोठार शरीर रोगाचें भांडार

शरीर दुर्गंधीची थार नाहीं अपवित्र शरीरा ऐसें

शरीर उत्तम चांगलें शरीर सुखाचे घोसुलें

शरीरें साध्य होय केलें शरीरें साधलें परब्रह्म

शरीर विटाळाचें आळें मायामोहपाश जाळें

पतन शरीराच्या मुळें शरीर काळें व्यापिले

शरीर सकळ हें शुद्ध शरीर निधींचाही निध

शरीरें तुटे भवबंध वसे मध्यभागीं देव शरीरा

शरीरा सुख नेदावा भोग द्यावें दु: करीं त्याग

शरीर वोखटें ना चांग तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं

 ____________

आजकाल, सगळे आयते मिळाले तर बरे, असा विचार असतो. पण हा विचार आजकालचाच नाही, तर त्याकाळीही लोकांना एखाद्या बाबाजीच्या मागे लागावे, आणि त्याने आपल्याला आयते मोक्षपद द्यावे, अशी इच्छा असे. पण तुकाराम महाराज हे अशा लोकांचा मोहभंग अत्यंत निर्भीडपणे करतात. इंद्रियांचा जय साधून, मन एकाग्र करून, निर्विषय करूनच हे साध्य होईल असे बजावतात. आणि स्वप्नातील घावाने काय विव्हळतोस, हे सर्व मिथ्या आहे, असे समजावतात.

 नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें आणूनि निराळें द्यावें हातीं

इंद्रियांचा जय साधूनियां मन निर्विषय कारण असे तेथें

उपवास पारणीं अक्षरांची आटी सत्कर्मा शेवटीं असे फळ

आदरें संकल्प वारीं अतिशय सहज तें काय दुःख जाणे

स्वप्नींचिया घायें विवळसी वायां रडे रडतियासवें मिथ्या

तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं शरण देवासी जाय वेगीं

 

आपण आज तुकाराम महाराजांचे आणखी काही स्फुट अभंग पाहिले. पुढील लेखात अजून काही अत्यंत परिणामकारी अभंग पाहणार आहोत.

 

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे