लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
*उतनूरचे दिवस…*
*थरार… (२)*
*पुलीमडगुचा हल्लेखोर वाघ..*
दुसरा दिवस उजाडला. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच रमेश स्नान, देवपूजा आटोपून कपाळाला उभं गंध लावून बँकेची मोटारसायकल घेऊन माझ्या दारात हजर झाला. गाडीच्या अर्धवट तुटलेल्या पत्र्याच्या डिक्कीतून पुलीमडगु व आसपासच्या गावांतील कर्जदारांची माहिती असलेले जाडजूड इन्स्पेक्शन रजिस्टर डोकावत होते. मी सुद्धा स्नान, चहा ई. आटोपून तयारच होतो. दहा वाजेपर्यंत परत येतो, असं घरी सांगून आम्ही निघालो.
तसं पाहिलं तर उतनूर पासून पुलीमडगु गावाचं अंतर फक्त दहा किलोमीटर एवढंच होतं. परंतु काटेकुटे, खाच खळग्यांनी भरलेल्या कच्च्या, ओबडधोबड आणि निर्मनुष्य रस्त्याने जाताना ते छोटंसं अंतरही खूप मोठं वाटत होतं. नागपूर ते निर्मल या महामार्गावरील गुढीहतनूर या गावापासून उतनूर कडे जाण्यासाठी जो फाटा फुटतो त्या मार्गावर इंद्रवेल्ली आणि शामपूर या दोन गावांच्या मध्ये थोडं आडबाजूला हे पुलीमडगु गांव होतं. हा संपूर्ण भाग तुरळक वस्तीचा व आदिवासी बहुल असून गर्द वनराईनं वेढलेल्या भीषण दऱ्यादुऱ्यांचा तसंच क्रूर नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेला म्हणून कुख्यात होता.
पुलीमडगु गावात बेधडक दिवसा ढवळ्या वाघ येतो आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत जंगलात घेऊन जातो.. अशी त्या पंचक्रोशीत वंदता होती. त्यामुळे सहसा त्या गावांत एकटं दुकटं जायला कुणीही धजावत नसे. त्यातून हे गांव दाट जंगलात वसलेलं आणि थोडं आडबाजूला असल्याने त्या गावचे रहिवासी वगळता अन्य कुणीही त्या गावाकडे चुकूनही फिरकत नसत. पूर्वी हे गाव सरस्वती ग्रामीण बँकेच्या कार्यक्षेत्रात होतं. मात्र एका दुर्दैवी घटनेनंतर त्या बँकेने लीड बँकेकडे हे कार्यक्षेत्र बदलून मागितलं. त्यांची विनंति मान्य करून लीड बँकेने पुलीमडगु हे गांव स्टेट बँकेला पुनःआवंटीत (re-allot) केलं होतं.
आम्ही पुलीमडगु गावात प्रवेश केला तेंव्हा तिथल्या रस्त्यांवर काही बेवारस कुत्री सोडली तर अन्य कुणीही दिसत नव्हतं. सर्व घरांच्या व झोपड्यांच्या खिडक्या आणि दारं आतून बंद होती. गावात जेमतेम तीस चाळीस घरं असावीत. रमेशला गावातील वेड्यावाकड्या रस्त्यांची चांगलीच माहिती असल्याचं दिसत होतं. अतिशय शिताफीने वाटेतील खड्डे, खाच खळगे, चिखल, नाल्या चुकवत उभ्या आडव्या बोळांतून तो मोटार सायकल दामटीत होता.
आम्ही एखाद्या घरासमोरून पुढे गेल्यावर त्या घरातील लोक खिडक्या दारं किंचित किलकिली करून आमच्याकडे चोरून पहात असावेत असा उगीचंच भास होत होता. डाकूंची टोळी गावात शिरते तेंव्हा गावातील लोक जसे घाबरून दारं खिडक्या घट्ट बंद करून घरात दडून बसतात तसंच काहीसं तिथलं वातावरण वाटत होतं.
आख्खं गाव ओलांडून रमेशने गावापासून दूर, अगदी टोकाला असलेल्या एका एकलकोंड्या घरासमोर गाडी उभी केली. दगडी बांधकाम असलेल्या त्या छोट्याश्या बैठ्या घरावरील नवी कोरी इंग्रजी कौलं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती.
घराभोवती बांबू व वाळलेल्या काट्याकुट्यांचं मजबूत, उंच कुंपण होतं. घरासमोर अंगणात एक मध्यम आकाराची गोल, पक्की विहीर होती. ती विहीर नुकतीच खणलेली असावी. कारण विहिरीच्या खोदकामातून निघालेल्या दगडांचा ढिगारा अंगणात अजूनही तसाच पडलेला होता. गाडीवरून खाली उतरून रमेशने हाक मारली..
” वेंकन्ना…! ओ ssss वेंकन्ना..!”
घरामागील उंचवट्यावरून पांढऱ्या रंगाचं आदिवासी पध्दतीचं मुंडासं घातलेलं एक डोकं हळूच दगडी भिंतीबाहेर डोकावलं. लांबवरून बराच वेळ रमेशला निरखून पाहिल्यानंतर मग कुठे त्या मुंडासंवाल्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर ओळख पटल्याचं हास्य उमटलं. लगबगीनं धावतच येऊन त्यानं कुंपणाचं लाकडी फळ्यांचं फाटक उघडलं.
“आत या साहेब..” तो तेलगू भाषेत म्हणाला.
सफेद धोतर आणि खादीची बिन बाह्यांची बंडी घातलेला वेंकन्ना एक मध्यम उंचीचा किरकोळ शरीरयष्टी असलेला सामान्य शेतकरी वाटत होता. आम्ही त्याच्या घरात गेलो. बैठकीच्या खोलीत असलेल्या लाकडी सोफ्यावर बसायला सांगून त्यानं आम्हाला पिण्यासाठी आंतून तांब्याभर पाणी आणून दिलं.
“हे बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर.. महाराष्ट्रातून आले आहेत. यांना तेलगू भाषा येत नाही..”
रमेशने वेंकन्नाला तेलगूतून माझा थोडक्यात परिचय करून दिला.
“पर्वा लेदू.. ! (हरकत नाही..No problem.)” वेंकन्ना म्हणाला.. “हमको थोडा थोडा हिंदी भी आता है..”
त्यानंतर हिंदीतूनच आमच्या गप्पा सुरु झाल्या.
रमेशनं सांगितलं की वेंकन्ना हा पुलीमडगु गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असून गेली अनेक वर्षे तो गावचा सरपंच देखील आहे. पोलीस, फॉरेस्ट खातं, ITDA, मंडल परिषद अशा सर्व सरकारी खात्यांमध्येही त्याचं चांगलंच वजन आहे. सध्या त्याचं स्वतःचंच कर्ज खातं थोडं थकीत असलं तरी एरव्ही मात्र तो बँकेला कर्जवसुलीत खूप सहकार्य करतो.
रमेशचं असं बोलणं चालू असतानाच तिथल्या लाकडी अलमारीतून पाच हजार रुपये काढून ते मला देत वेंकन्ना म्हणाला..
“कालच आदीलाबादचे व्यापारी इथल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनीच दिलेले हे पैसे माझ्या कर्ज खात्यात जमा करून घ्या. आणि, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. गावातील सर्वच शेतकऱ्यांकडे मक्याचे पैसे आलेले आहेत. तुम्ही मला इथल्या थकबाकीदारांची नावं सांगा. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाता येईल..”
त्यानंतर वेंकन्नाला घेऊन आम्ही गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडे गेलो. वेंकन्नाचा गावात खूप मान आणि दरारा होता. ईरन्ना, भीमन्ना, सोमू, राजय्या, नरसय्या, लच्छन्ना अशा गावातील बऱ्याच थकीत कर्जदारांकडून त्या दिवशी भरपूर कर्ज वसुली झाली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वेंकन्ना आम्हाला पुन्हा त्याच्या घरी घेऊन गेला. मुलांच्या शिक्षणासाठी वेंकन्नाची पत्नी तिच्या माहेरी करीमनगर इथं रहात असल्याने वेंकन्ना त्या घरात एकटाच रहात होता. त्याने बनवलेला चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्याच्या घरामागील आमराई व फळबाग पहात हिंडत होतो.
वेंकन्नाचे घर गावापासून थोडे दूर एका टोकाला होते. त्याच्या घरामागील चिंच, आवळा, आंबा आणि मोहाची काही झाडे सोडली तर तिथूनच गर्द सागवृक्षांचे जंगल सुरू होत होते. घराला तिन्ही बाजूंनी बांबू व काट्यांचे उंच, भक्कम कुंपण असले तरी या मागील भागाला मात्र कुंपण नव्हते.
जंगलकडील या बाजूस एक पाच फूट उंचीचा आकर्षक नैसर्गिक उंचवटा होता आणि तिथूनच खोल जंगलात जाण्यासाठी एक पायवाट सुद्धा होती. मी त्या उंचवट्याला पाठ टेकून उभा राहिलो. माझं फक्त डोकंच त्या खांद्याएवढ्या उंच उंचवट्याच्या वरती होतं. सहज मान मागे वळवून पाहिलं तर तिथून ती जंगलात जाणारी रहस्यमय पायवाट अगदी जवळच दिसत होती. मला तसं उभं राहिलेला पाहून वेंकन्ना घाबरून मोठ्याने ओरडला..
“साब, उधर वैसा खड़े मत रहो.. इधर आ जाओ.. वहां खतरा है..!”
मी बुचकळ्यातच पडलो. खतऱ्या सारखं तर तिथं काहीच दिसत नव्हतं. मी अवतीभवती काळजीपूर्वक आणि शोधक नजरेने नीट निरखून पाहिलं. माझ्या पाठीमागे खांद्यापर्यंत तर तो नैसर्गिक उंचवटाच होता. आजूबाजूला आंब्याची, चिंचेची झाडं होती. जवळपास कुठेही विहीर, तलाव, दलदल, मधमाशांचं पोळं किंवा खोल दरी सुद्धा नव्हती. हां, मागे जंगल होतं खरं.. पण ते तिथून तीस चाळीस फुटांवरून सुरू होत होतं.
“आप पहले इधर आ जाओ..! फिर समझाता हूँ आपको..!”
वेंकन्नाने पुन्हा ओरडून मला खाली बोलावल्यावर अनिच्छेनेच त्या उंचवट्या पासून दूर होत मी त्याच्याकडे गेलो.
“दो साल पहले सूर्यकुमार बाबू उस टीले के पास ठीक उसी तरह खड़े थे, जैसे अभी अभी आप खड़े थे..”
वेंकन्ना गंभीर स्वरात म्हणाला.
“सूर्यकुमार..? कौन सूर्यकुमार ?”
मी विचारलं. तेंव्हा रमेशनं सांगितलं की सूर्यकुमार हा उतनूरच्या सरस्वती ग्रामीण बँकेचा एक तडफदार, धाडसी फिल्ड ऑफिसर होता. पूर्वी पुलीमडगु गाव ग्रामीण बँकेकडे दत्तक असल्याने कर्जमंजुरी पूर्वक निरीक्षण (Pre-sanction inspection) तसेच कर्जवसुली साठी सूर्यकुमार नेहमीच या गावात येत असे. तसंच तो निसर्गप्रेमी असल्याने जंगलात भटकणं त्याला खूप आवडत असे. पुलीमडगु लगतच्या जंगलातही तो बरेचदा फिरायला जात असे.
एकदा असाच नियमित कर्जवसुलीसाठी पुलीमडगु गावात आला असता याच उंचवट्याला पाठ टेकून तो उभा असतांनाच एका प्रचंड मोठ्या वाघाने अचानक पाठीमागून येऊन त्याचं डोकंच धरलं आणि तसाच फरफटत त्याला जंगलात घेऊन गेला. दोन दिवसांनी जागोजागी लचके तोडलेलं त्याचं शिरविरहीत धड खोल जंगलातील एका तलावाजवळ आढळून आलं.
रमेशनं असंही सांगितलं की त्या घटनेनंतर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुलीमडगु गावात जाण्यास नकार दिला आणि जिल्हा अग्रणी बँकेकडे हे गाव अन्य बँकेकडे दत्तक देण्याची विनंती केली. अशा तऱ्हेने हे गाव आमच्या स्टेट बँकेकडे दत्तक आले होते.
हकनाक बळी पडलेल्या सूर्यकुमार बाबूची हकीकत ऎकल्यावरही रमेश आणि वेंकन्नाच्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता बाजूच्या उतारावरून मी त्या उंचवट्यावर चढलो. मागील पन्नास साठ फुटांच्या त्या जागेला कसलेही कुंपण नव्हते. त्यातील जंगलात जाणारा आठ दहा फुटांचा रस्ता सोडला तर बाकी सगळीकडे जाडजूड बुंध्याचे एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेले उंच, दाट साग वृक्ष होते. तिथून कोणत्याही प्राण्याला आत येणे खूप अवघड होते. हे निरीक्षण करून मी खाली उतरलो.
तेलगू भाषेत वाघाला जसं “व्याघ्रम” म्हणतात तसंच “पुली” असंही म्हणतात. आपल्याकडे वाघलगाव, वाघोली, वाघदरा, वाघजाई (जाळी) या नावाची जशी गावं असतात तसंच हे “पुलीमडगु”. यातील “पुली” म्हणजे वाघ आणि “मडगु” म्हणजे गाव, असंच मी समजत होतो.
मात्र काही दिवसांनी तेलगू भाषेत “मडगु” शब्दाचा अर्थ “तलाव” (lake) असा होतो, अशी ज्ञानात भर पडली. त्यावरून “वाघ जिथे पाणी प्यायला येतो तो तलाव” म्हणजे “पुलीमडगु” (मराठीत वाघतळं) असा योग्य अर्थ मी लावला. त्यानुसार त्या गावाच्या जवळपास कुठेतरी पाण्याचा तलाव आहे का याबद्दल चौकशी केली असता वेंकन्नाच्या घरामागील जंगलात एक किलोमीटर अंतरावर तसं एक मोठं तळं असल्याचीही माहिती मिळाली.
गुढी हतनूर ते उतनूर या मार्गावरील धानोरा, केसलापूर, इंद्रवेली, आंधळी, दसनापूर, खंडाळा, उमरी, शामपुर, नागापूर अशी जवळ जवळ सर्वच गावांची नावं जरी ओळखीची आणि मराठी वळणाची वाटत असली तरी प्रत्यक्षात त्या गावांत कुणालाही मराठी भाषा येत नाही. इंग्रजांपूर्वी आदिवासी गोंड राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या या भूभागात प्रामुख्याने गोंड, कोलम, चेंचू, गडाबा, बैगा आणि मुंडा ह्या आदिम आदिवासी प्रजातीच्याच लोकांची वस्ती आहे. खोल जंगलात, डोंगरकपारीच्या आणि दऱ्या खोऱ्यांच्या आश्रयाने राहणारे हे आदिवासी क्वचितच रस्त्याकडे फिरकतात. पराकोटीचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुपोषण यांनी ग्रासलेला हा भूमिपुत्रांचा समाज अतिशय भोळा आणि अल्पसंतुष्ट आहे.
पोटापुरतंच धान्य पिकवावं, लाज झाकण्या पुरतंच वस्त्र ल्यावं, तेल, मीठ, मिरचीच्या खर्चापुरता जंगलातून मध, डिंक गोळा करावा आणि कवडीमोल भावानं तो स्थानिक व्यापाऱ्यांना विकावा, मोहाची फुलं गोळा करून त्याची चविष्ट दारू तयार करावी, टोकदार बांबूचे भाले, गावठी धनुष्यबाण आणि पाळलेल्या अजस्त्र रानटी कुत्र्यांच्या मदतीने हरीण, ससे, रानडुक्कर यांची शिकार करावी, रात्री आगीवर ही शिकार भाजावी आणि मोहाची दारू प्राशन करून चांदण्या रात्री डफाच्या साथीवर शेकोटी भोवती फेर धरून नृत्य करीत मस्तीत जगावं असा त्या भाबड्या आदिवासींचा नित्य जीवनक्रम होता.
काही आदिवासी विडी उद्योगासाठी लागणारा तेंदू पत्ता गोळा करून तो नागपूर, नांदेड, निझामाबाद, जालना येथून येणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना विकत असत. वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याच साथीने उच्च प्रतीचे अस्सल सागवानी तसेच शिसवी व चंदनाचे लाकूड यांचीही चोरटी वाहतूक काही आदिवासी अत्यल्प मोबदल्यात करीत असत. या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षित व्हावे, त्यांचे जीवनमान उंचावून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे जे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जात त्याचा बहुतांश हिस्सा राजकीय नेते, सरकारी नोकरशहा आणि स्थानिक व्यापारी परस्परांच्या संगनमताने गिळंकृत करून टाकीत असत.
आदिवासींचा कष्टाचा आणि हक्काचा पैसा लुबाडून व्यापारी, पुढारी आणि सरकारी बगल बच्चे गब्बर होत चालले होते. आदिवासींना या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांना प्रस्थापितां विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारी नक्षलवाद्यांची माओवादी हिंसक विचारसरणी या संपूर्ण परिसरात चांगलीच फोफावली होती.
रस्ते, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन अशा दळण वळण आणि संदेश वहन सुलभ करणाऱ्या सरकारी खात्यांना या नक्षली लोकांचा तीव्र विरोध होता. या सोयींमुळेच आदिवासींची पिळवणूक करणारे भांडवलदार व्यापारी त्यांच्या पर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांना लुबाडतात अशी नक्षली विचारसरणी होती. तसेच पोलिस या भांडवलदारांना, प्रस्थापितांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवितात म्हणून पोलिसांशीही त्यांचे वैर होते.
नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळावी म्हणून ज्याप्रमाणे पोलिसांनी सामान्य आदिवासी जनतेत आपले खबरे पेरून ठेवले होते, अगदी तसेच नक्षलवाद्यांनी देखील प्रत्येक गावात आपले गुप्तहेर नेमलेले होते. या खबऱ्यांना व गुप्तहेरांना पोलिसांकडून तसंच नक्षलवाद्यांकडून भरपूर पैसा पुरविला जात असे.
काही चलाख, अतिधूर्त, संधीसाधू आदिवासी हे आपला जीव धोक्यात घालून, एकाच वेळी पोलिस व नक्षली, ह्या दोघांचेही विश्वासू खबरे म्हणून काम करीत आणि अशारितीने दोन्हीकडून भरपूर पैसा मिळवीत असत.
पुलीमडगु गावाचा प्रधान उर्फ सरपंच वेंकन्ना हाही असाच एक डबल एजंट होता.
ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्य कुमार बाबू याला वाघानं ओढून नेण्यापूर्वी आणि नंतरही गावातील काही दुर्दैवी गावकऱ्यांना ओढून नेऊन वाघानं त्यांचा बळी घेतला होता. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासठी गावात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वाघाच्या प्राणघातक हल्ल्याची शिकार व्हावं लागलं होतं. वाघाच्या दहशतीमुळे पुलीमडगु गावातील शाळेत शिक्षक येईनासे झाल्यामुळे ती शाळाही कायमचीच बंद पडली होती.
पुलीमडगुला मी जेंव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा वेंकन्नाच्या घरामागील पन्नास साठ फुटांच्या जंगला कडील भागाला जर काटेरी तारांचे उंच कुंपण घातले तर वाघाचे गावात येणे कायमचे बंद होईल असे मला वाटले. त्यामुळे मी वेंकन्नाला तसे सुचवतांच “त्यासाठी खूप मोठा खर्च येईल..” असे तो म्हणाला.
योगायोगाने त्याचवेळी आमच्या उतनूर स्टेट बॅंके भोवतीचे तारेचे जुने कुंपण काढून टाकून त्याजागी नवीन पक्क्या विटांचे कंपाउंड बांधण्याचे काम सुरू होते. काढून टाकलेल्या जुन्या गंजलेल्या लोखंडी काटेरी तारांचा भला मोठा ढिगारा बँकेमागे पडला होता. मॅनेजर साहेबांची परवानगी घेऊन मी त्या जुन्या तारा वेंकन्नाला देण्याची व्यवस्था केली. वेंकन्नाही मोठ्या आनंदाने त्या तारा आपल्या बैलगाडीत टाकून घरी घेऊन गेला.
त्या नंतर काही दिवसांनी पुन्हा पुलीमडगु गावात गेलो असता वेंकन्नाच्या घरामागील भागाला काटेरी तारांचे उंच कुंपण घातलेले पाहून समाधान वाटले. त्या जंगलात जाणाऱ्या पायवाटेला तर काटेरी तारे सोबतच जाडजूड लाकडी फळ्याही लावून मजबूत तटबंदी केली असल्याने तो वाघाच्या येण्याजाण्याचा मार्ग तर आता दृष्टीसही पडत नव्ह्ता.
त्यानंतर बरेच दिवस पुलीमडगु गावात वाघाच्या हल्ल्याची एकही घटना घडली नाही. वाघाची भीती नाहीशी झाल्यामुळे कामानिमित्त गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ वाढली होती. बंद पडलेली गावातील शाळा ही आता पूर्ववत सुरू झाली होती. मात्र आजकाल गावात सशस्त्र नक्षलवादी कमांडर उर्फ “अन्ना”, सर्रास उघडपणे वावरत असल्याची कुजबुजही आसपासच्या गावातील लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत असे.
एकदा सकाळी सहा वाजता बँकेच्या कामानिमित्त प्युन रमेशला सोबत घेऊन उतनूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शामपुर गावात कर्जवसुली संदर्भात एक बड्या कस्टमरला भेटण्यासाठी गेलो होतो. सुदैवाने आदीलाबादला निघालेला तो शामपुरचा कस्टमर त्याच्या घरा समोरच भेटला आणि आम्हाला पाहतांच ताबडतोब घरात जाऊन त्याने आपला कर्ज परतफेडीचा हप्ता सुद्धा आम्हाला आणून दिला.
मी घड्याळात पाहिलं तर त्यावेळी सकाळचे फक्त पावणे सातच वाजले होते. शामपुर गावात आता अन्य कोणतंही काम उरल नव्हतं. इथून पुलीमडगु गाव फक्त पाच किलोमीटर दूर होतं. त्यामुळे त्या गावात जाऊन वेंकन्नाला सहजच भेटून यावं असं ठरवलं.
तेलंगाणा, आंध्र प्रदेश मध्ये मुख्य रस्त्याला जिथे एक किंवा अनेक फाटे फुटतात, त्या ठिकाणाला (मग ती चौफुली असो वा टी पॉईंट), एक्स- रोड (X-Road) असे म्हणतात. पुलीमडगु गावाकडे जाणाऱ्या एक्स-रोड वरील एका छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. हॉटेलातील डुगडुगणाऱ्या बाकड्यावर बसून आम्ही चहा घेत असतानाच रमेशने सहज मागे बघितलं आणि तो एकदम दचकला. माझा हात गच्च दाबून धरत तो हलकेच कुजबुजला..
“साब, पिछे अन्ना लोग बैठे है..! झटसे पलटकर पिछे मत देखो.. उनको डाउट आएगा.. आयडियासे, धीरे धीरे देखो..”
रमेशने एवढं जतावून सांगितलं तरी “अन्ना” मंडळींना पाहण्याची माझी उत्सुकता एव्हढी जबरदस्त होती की उतावीळपणे झटकन मान मागे वळवून मी त्यांच्याकडे बघितलंच. मागील टेबलावर आर्मी सारख्या हिरव्या रंगाचा, जाड कापडाचा पॅन्ट शर्ट घातलेले अत्यंत बेफिकीर चेहऱ्याचे, रापलेल्या काळ्या रंगाचे दोन तरुण चहा पित पित आपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या डोक्यावर खाणीतील कामगार वापरतात तशी काळपट हिरव्या रंगाची मेटलची गोल कॅप होती. कमरेला कापडी बेल्ट व पायात मिलीटरीचे जाडजूड भक्कम बूट घातलेल्या त्या दोघांनीही भरीव, झुपकेदार मिशा ठेवल्या होत्या.
ते दोघेही गप्पांत एवढे गुंगले होते की त्यांना आसपासचं भानच नव्हतं. अर्थात त्यामुळे त्यांचं अगदी जवळून आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची आयती संधीच मला मिळाली. दोघांच्याही पाठीवर सॅक सारखी थैली बांधलेली असावी, कारण बाहेरून त्या सॅकचे खांद्यावरील पट्टे दिसत होते. त्यांच्या शर्ट पॅन्टला वरपासून खालपर्यंत भरपूर खिसे होते. एका “अन्ना” ने आपली लांब नळीची रायफल बाकड्याला टेकवून उभी केलेली होती तर दुसऱ्याच्या खांद्याला आखूड नळीची ऑटो लोडेड कार्बाईन गन लटकत होती. नंतर रमेशने सांगितले की, त्यांच्या पाठीवरील थैलीत तसेच शर्ट पॅन्टच्या मोठमोठया फुगीर खिशात वॉकी टॉकी, ट्रान्समिटर सेट, काडतुसे, हँड ग्रेनेड्स व डायनामाईटच्या कांड्या ठेवलेल्या असतात.
चहा पिऊन ते दोघे “अन्ना” काउंटरच्या दिशेने गेले. खांद्याला कार्बाईन गन लटकवलेला अन्ना हॉटेल मालकाला चहाचे पैसे देत असतानाच दुसरा अन्ना आपली जड रायफल घेऊन तिथे आला. त्याच्या दुसऱ्या हातात पांढऱ्या कापडाचं एक छोटंसं गाठोडं होतं. गोल आकाराच्या त्या गाठोड्यातून लाल रक्त बाहेर टपकत होतं. हॉटेल मालकानं त्या गाठोड्याकडे पहात विचारलं..
“काय आहे त्याच्यात..?”
डोळे बारीक करून, गंभीर, खुनशी स्वरात तो अन्ना म्हणाला..
“मुंडकं..!”
त्याचं हे उत्तर ऐकून हॉटेलमधील आम्हा सर्वांच्याच अंगावर भीतीने सरकन काटाच आला. तो हॉटेल मालकही घाबरून थोडासा चरकला. कुठून आपण ही नसती चौकधी केली, असं त्याला वाटलं. थरथर कापतंच त्यानं गळ्यात दाटून आलेला आवंढा कसाबसा गिळला. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून एकदम गडगडाटी विकट हास्य करीत तो अन्ना म्हणाला..
“अरे ! ऐसे डरो नहीं..!”
आणि मग ते रक्त टपकणारं गाठोडं उंच करून हॉटेल मालकाच्या डोळ्यांपुढे नाचवीत तो म्हणाला..
“माणसाचं नाही, बकऱ्याचं मुंडकं आहे ह्याच्यात..! काल आमच्या “क्रांती दलम्” चे एरिया कमांडर आले होते पुलीमडगु कॅम्प मध्ये.. त्यांच्यासाठी कापलं होतं हे बकरं..!”
असं म्हणून पुन्हा दणदणीत राक्षसी हास्य करीत हॉटेलच्या बाहेर पडून ते आपल्या मोटर सायकलवर स्वार झाले आणि नागापूर जंगलाच्या दिशेने निघून गेले.
अशारितीने अन्ना लोकांचं पहिलं वहिलं दर्शन मला झालं होतं. रमेशने सांगितलं की, पोलिसां कडून त्वरित ओळखलं जाण्याची भीती असल्याने हे अन्ना लोक असा युनिफॉर्म घालून व शस्त्रं घेऊन कधीही एकट्या दुकट्याने जंगला बाहेर पडत नाहीत. ते नेहमी सामान्य वेशांतच जनतेत वावरतात. कधी कधी नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याची बनावट तक्रार घेऊन ते चक्क पोलीस ठाण्यातही जातात आणि पोलिसांच्या तयारीचा व पुढील हालचालींचा अंदाज घेतात.
काही काळ थांबलेला पुलीमडगु गावातील वाघाचा जीवघेणा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला होता. दोन गावकरी व तीन पोलिसांचे शीर धडावेगळं केलेले क्षतविक्षत देह तेथील जंगलात आढळून आले होते. जनतेच्या वाढत्या आक्रोशामुळे पत्रकारांनी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणी कसून पाठपुरावा केल्याने पोलिसांनी नक्षल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेंकन्ना जरी पोलिसांचा खबऱ्या असला तरी नक्षल्यांनाही तोच आश्रय देतो व पोलिसांबद्दल बित्तंबातमी पुरवून त्यांना मदतही करतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे वेंकन्नाला अटक करून पोलिसांनी त्याची रवानगी लॉकअप मध्ये केली होती.
लवकरच जादा कुमक मागवून पोलिसांनी पुलीमडगु जंगल परिसरात व्यापक सर्च कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं. नक्षलवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त करण्यात आले. त्या दरम्यान झालेल्या चकमकींत काही नक्षली ठार झाले तर बरेचसे पकडलेही गेले. उरलेले नक्षलवादी छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातील दाट जंगलात पळून गेले.
पोलिसांनी वेंकन्नाच्या घराची कसून झडती घेतली तेंव्हा त्याच्या घरात जमिनीखाली पुरलेला दारुगोळा, शस्त्रे, माओवादी क्रांतिकारी साहित्य व छुपा ट्रान्समिटर आढळून आला. अनेक कुख्यात नक्षली कमांडर्स सोबत असलेले त्याचे फोटोही पोलिसांना सापडले. त्यावरून वेंकन्ना हा जुना, प्रशिक्षित व हार्ड कोअर नक्षली असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. मात्र त्यानंतर अल्पावधीतच नक्षलींसाठीच्या सरकारी “आत्मसमर्पण योजने”त सहभागी होऊन धूर्त वेंकन्नाने नाममात्र शिक्षा भोगून आपली सुटका करून घेतली.
पुलीमडगु गावातील काही कस्टमर एकदा उतनूरला बँकेत आले असता त्यांनी सांगितलं की ज्या ज्या पोलिसांना व गावकऱ्यांना वेंकन्ना बद्दल संशय येत असे त्यांना नक्षल्यांच्या मदतीने वेंकन्ना यमसदनाला पाठवीत असे आणि वाघाने ओढून नेले असा कांगावा करीत असे. प्रत्यक्षात वेंकन्ना व्यतिरिक्त अन्य कुणीही त्या वाघाला आपल्या डोळ्यांनी कधी पाहिलं नव्हतं.
ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्यकुमारला जंगलात फिरण्याचा छंद होता. असंच फिरत असताना एकदा त्याने पुलीमडगुच्या जंगलातील नक्षल्यांचा तळ पहिला आणि त्या तळावर वेंकन्नाला नक्षल्यांशी हास्यविनोद करतानाही पाहिलं. ही गोष्ट त्याने काही गावकऱ्यांच्याही कानावर घातली. वेंकन्नाला हे समजताच आपले बिंग फुटू नये म्हणून नक्षल्यांकरवी बिचाऱ्या सुर्यकुमारचा त्याने हकनाक बळी घेतला.
पुलीमडगुच्या गावकऱ्यांच्या तोंडून हे वास्तव ऐकताच स्वार्थी, दुष्ट वेंकन्ना बद्दल आम्हा सर्वांच्या मनात तीव्र चीड, तिरस्कार व घृणा निर्माण झाली.
त्या गावकऱ्यांनी अशीही माहिती पुरवली की, वेंकन्नाने घरामागील जंगलाकडे जाणाऱ्या वाटेला फळ्या व काटेरी तारांचे जे कुंपण लावले होते तेही प्रत्यक्षात फसवेच होते. सहजपणे हातांनी उचलून तो कुंपणाचा भाग बाजूला ठेवता येत असे. वेंकन्ना रोज रात्री ते कुंपण बाजूला करून नक्षल्यांसाठी जंगलचा रस्ता खुला करून ठेवत असे.
पुलीमडगु भागातील नक्षल्यांचा तात्पुरता बिमोड झाला असला तरी जीवावर उदार झालेले, झुंजार व अतिशय चिवट नक्षली असे सहजासहजी हार मानणारे नव्हते. आत्मसमर्पण केलेल्या वेंकन्नावर तर त्यांचा विशेष राग होता. वेंकन्नाने पोलिसांना पुरवलेल्या अचूक माहितीमुळेच त्या भागातील नक्षल्यांचे मजबूत जाळे पोलीस एवढ्या सहजपणे उध्वस्त करू शकले, असा त्यांचा संशय होता.
“विश्वासघातकी वेंकन्नाला लवकरच गद्दारीची सजा दिली जाईल..” अशा आशयाच्या ठळक लाल अक्षरातील घोषणा लवकरच पुलीमडगुच्या घराघरांवर लिहिलेल्या दिसू लागल्या. नक्षलवादी त्या भागात पुन्हा सक्रिय होऊ लागल्याचीच ती चिन्हे होती.
घाबरलेल्या वेंकन्नाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. वेंकन्नाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुलीमडगु गावात एक पर्मनंट चौकीच स्थापित केली.
एके दिवशी नक्षल्यांनी हँड ग्रेनेड्सचा तुफान मारा करून वेंकन्नाचे घर उध्वस्त करून टाकले. सुदैवाने वेंकन्ना त्यावेळी गावातील पोलीस चौकीतच बसला असल्याने त्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. मात्र आता तो सावध झाला. पुलीमडगु गाव कायमचे सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. गावातील आपली जमीन व राहते घर येईल त्या किमतीला त्याने विकून टाकले. तसंच आमच्या बँकेत येऊन आपल्या बचत खात्यातील सर्व पैसे काढून घेऊन त्याने खाते बंद केले.
“आजच दुपारी पोलीस बंदोबस्तात करीम नगरला कायम वास्तव्यासाठी जाणार आहे..”
असेही आमचा निरोप घेताना तो म्हणाला.
उतनूर-करीमनगर रोड वरील निर्मल- मंचेरियाल बॉर्डर जवळील इंधनपल्ली फाट्यापर्यंत पोलीसांनी वेंकन्नाला आपल्या जीपने सोडले. वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ त्याला घेण्यासाठी इंधनपल्ली पर्यंत आले होते. पोलिसांचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबियांसह वेंकन्ना करीमनगरला जाणाऱ्या बसमध्ये बसला.
त्याच दिवशी संध्याकाळी वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ आक्रोश करीत उतनूर पोलीस स्टेशन मध्ये आली. इंधनपल्लीहून थोडं पुढे जाताच सशस्त्र नक्षलवाद्यांनी बस अडवून वेंकन्नाला जबरदस्तीने खाली उतरवून घेतल्याचे ते सांगत होते. पोलिसांनी ताबडतोब इंधनपल्लीच्या ग्रे-हाउंड (Greyhound) नावाच्या नक्षल विरोधी स्पेशल टास्क फोर्सशी संपर्क साधून त्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली आणि वेंकन्नाचा तांतडीने शोध घेण्यास सांगितले.
त्यानंतर दोन दिवस वेंकन्नाचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
तिसऱ्या दिवशी वेंकन्नाचा छिन्नविच्छिन्न, रक्तबंबाळ, शीर विरहित देह पुलीमडगु गावातील त्याच्या उध्वस्त घरावर फेकून दिलेला आढळून आला..
(क्रमश:)
श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही सेवा केली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.