अनेक वळणांनी जाणाऱ्या उत्कंठावर्धक कथेचा हा अंतिम भाग- श्री अजय कोटणीस यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केलेला.. ………………………………………….
लेखक
श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)
ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. या लेखमालेतील हे शेवटचे प्रकरण आज येथे , या ब्लॉगच्या वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत
Mind blowing experiences of a Banker-19
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(अंतिम भाग : 19)
रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची माझी मागणी न्यायाधीशांनी सपशेल फेटाळून लावल्यामुळे मी अंतर्यामी खूप निराश झालो. खरं म्हणजे या नवीन आलेल्या न्यायाधीशांकडे उतावीळपणे लगेच अशी मागणी करून मी तशी चूकच केली होती. पण आता त्याला इलाज नव्हता.
मात्र त्यानंतर लवकरच या नवीन न्यायाधीशांनाही आमच्या केसची सत्य परिस्थिती कोर्टातील अन्य न्यायाधिश तसेच वकिलांकडून समजली आणि त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला. आता त्यांनीही सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांची सक्त झाडाझडती घ्यायला सुरुवात केली.
“कशाच्या आधारे बँक कर्मचाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार समजून तुम्ही पोलिसांत तक्रार केली ?” या न्यायमूर्तींनी विचारलेल्या थेट प्रश्नाचे उत्तर फिर्यादी सौ. रत्नमाला बोडखे यांच्याकडे नव्हते. त्या निरुत्तर होऊन तशाच मख्खपणे उभ्या राहिल्या. न्यायाधीशांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर “मला यातले काहीही ठाऊक नसून माझे पती सुखदेव यांनी जिथे जिथे सांगितले तिथे तिथे मी सह्या केल्या..” असे सांगून त्या गप्प बसल्या.
साहजिकच न्यायाधीशांनी नंतर सुखदेवला हाच प्रश्न विचारला. त्यावर सुखदेवने संतप्त होऊन न्यायाधीशांनाच अद्वातद्वा बोलणे सुरू केले.
“आरोपींना तसंच मोकळं सोडून तुम्ही फिर्यादीलाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुमची वागणूक अत्यंत पक्षपातपूर्ण आहे. आम्हाला बँक कर्मचाऱ्यांचा संशय आला म्हणूनच त्यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. मी एका वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून मागासवर्गीय आहे. तुम्ही मला किंवा माझ्या कुटुंबियांना असे नसते गैरवाजवी प्रश्न विचारून विनाकारण त्रास दिलात तर मी खुद्द तुमच्या विरुद्धही विविध कायद्यां अंतर्गत पोलिसांत तक्रार करायला मागेपुढे पाहणार नाही..”
सुखदेवचा मानसिक तोल आता पुरता ढळल्यासारखे दिसत होते. तो वाट्टेल ते बरळत होता. मात्र हे नवीन न्यायाधीशही चांगलेच खमके होते. सुखदेवच्या धमक्यांनी जराही दबून न जाता ते म्हणाले..
“खुशाल पाहिजे तिथे तक्रार करा. मी ही मागासवर्गीयच आहे. असल्या पोकळ धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. उलट, खोटी तक्रार करून पोलिसांचा व न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याबद्दल मीच तुमच्याविरुद्ध कठोर action घेऊ शकतो. आसनस्थ न्यायाधीशांना धमक्या देऊन न्यायालयाची बे-अदबी केल्याबद्दल तुम्हाला ताबडतोब अटक करण्याचा याक्षणीच मी आदेशही देऊ शकतो..”
न्यायमूर्तींचा हा रौद्र अवतार बघून सुखदेवचे वकील भयभीत झाले. सुखदेवच्या वतीने त्यांनी न्यायाधीशांची परोपरीने क्षमा मागितली. सुखदेवही आता भानावर आला होता. न्यायाधीशांना दुखावून आपण भली मोठी घोडचूक करून ठेवली आहे याची त्याला जाणीव झाली. सारवासावर करत तो म्हणाला..
“प्रकृती अस्वास्थ्य, कौटुंबिक कलह आणि आर्थिक विवंचना यामुळे आलेल्या अतीव निराशेमुळे गेले काही दिवस माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. आणि त्यामुळेच आपल्याशी दुर्वर्तन करण्याचा घोर अपराध मघाशी माझ्या हातून घडला आहे. माझ्या ह्या उद्दाम, अरेरावीच्या वर्तना बद्दल मी लज्जित असून आपली क्षमा याचना करीत आहे. आपण उदार अंतःकरणाने मला माफ करावे..”
सुखदेव कसलेला अभिनेता तर होताच. पश्चाताप झाल्याचे ढोंग त्याने उत्तम वठवले. न्यायाधीशांवर त्याच्या या माफी मागण्याच्या वरवरच्या नाटकाचा कितपत परिणाम झाला हे जरी समजू शकले नाही तरी त्यांनी आपल्या बेअदबीचा मुद्दा जास्त ताणून धरला नाही.
परिस्थिती पाहून त्यावेळी सुखदेवने न्यायाधीशांसमोर नमतं घेतलं असलं तरी त्याचा दिर्घद्वेषी, शीघ्रकोपी, खुनशी स्वभाव मध्येच उफाळून येत असे. अशावेळी न्यायाधीशांशी त्याची अनेकदा शाब्दिक खडाजंगी होत असे. एकदा चिडून न्यायाधीश त्याला म्हणाले की
“तुम्ही कसंही वागलात तरी आम्ही काहीच करू शकत नाही असं समजू नका. तुमच्या कार्यालयाला सांगून त्यांच्यातर्फे आम्ही तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो..”
त्यावर निर्लज्जपणे हसत सुखदेव म्हणाला..
“मी केंव्हाच नोकरीतून ऐच्छिक निवृत्ती (VRS) घेतली असून आता तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही..”
तब्बल आठ वर्षे न्यायालयात हा खटला चालू होता. या दरम्यान केसशी संबंधित आम्हा सर्वांच्या आयुष्यात अनेक बऱ्यावाईट घटना घडून आल्या.
वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार रितसरपणे नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुणं सोडून मी औरंगाबादलाच कायमचा स्थायिक झालो. वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याची एक मोठी शस्त्रक्रिया वगळता माझी प्रकृती तशी ठीकठाकच होती. अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब आणि गुडघेदुखी या सारख्या कायमस्वरूपी साथीदारांना काळजीपूर्वक सांभाळत मी आपलं “हॅपी अँड हेल्दी (?) रिटायर्ड लाईफ” जमेल तसं एन्जॉय करीत होतो.
रवीशंकरच्या आईचे पूर्वीच कॅन्सरने निधन झाले होते. त्या पाठोपाठ त्याच्या सुस्वभावी, प्रेमळ पत्नीचेही ऐन तरुण वयात हार्ट अटॅकने दुःखद निधन झाले. त्याची दोन गोंडस लहान मुले आईविना पोरकी झाली. त्यांची केविलवाणी अवस्था बघून रविशंकर अक्षरशः सैरभैर झाला होता. या केसमुळे आपण महाराष्ट्रात अडकून पडलो.. शक्य असूनही आपल्याला बिहारमधील आपल्या गावी बदली करून घेता असली नाही.. तसंच केसच्या तणावामुळेच आपल्या पत्नीचे हृदय कमजोर बनले व आपणच तिच्या अकाली मृत्यूला जबाबदार आहोत अशी खंत तो वारंवार बोलून दाखवीत असे.
रहीम चाचांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या रकमेचा बराच मोठा हिस्सा जास्त परताव्याचा आशेने एका बोगस चिट फंडात गुंतवला होता. एक दिवस तो चिट फंड बुडाला आणि रहीम चाचा आपली जन्मभराची पुंजी त्यात गमावून बसले. प्राप्त निवृत्ती फंडापैकी उरली सुरली रक्कम त्यांनी एका जवळच्या गरजू नातेवाईकाला अल्पकाळासाठी उसनी म्हणून दिली होती. मात्र त्या नातेवाईकानेही तोंडाला पाने पुसल्यामुळे रहीम चाचांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. म्हातारपणाचा एकमेव आधार असलेली पैशांची उबच नाहीशी झाल्यामुळे आता कुटुंबाचे पालनपोषण आणि गलितगात्र वार्धक्यरुपी कडाक्याच्या थंडीचा मुकाबला कसा करायचा ही चिंता त्यांना रात्रंदिवस सतावत होती. अंधःकारमय भविष्यकाळाबद्दलची एक अनामिक भीती त्यांच्या भकास डोळ्यांतील भयाण नजरेत सदैव जाणवत असायची.
दिल्लीला एकत्र कुटुंबात राहणारी सैनीची पत्नी सासरच्यांच्या रोजच्या भांडणांना कंटाळून मुलाबाळांसह हरियाणातील आपल्या माहेरी निघून गेली होती. तिची समजूत घालण्यासाठी बिचारा सैनी निलंग्याहून दिल्ली, हरियाणा अशा सतत चकरा मारून बेजार झाला होता. कधी एकदा ही केस संपते आणि आपण हरियाणातील आपल्या गावाकडे आपली बदली करून घेऊन आपल्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट, सुरळीत बसवतो असं त्याला झालं होतं.
सुखदेवच्या वाया गेलेल्या आवारा मुलानं आपल्या शौकाखातर एक सेकंड हँड कार घेतली होती. दुर्दैवाने त्याच्या हातून त्या कारचा अपघात झाला आणि त्यात जखमी झालेल्या व्यक्तींना भली मोठी नुकसान भरपाई देणे सुखदेवला भाग पडले. माजी स्वातंत्र्य सैनिक असलेले सुखदेवचे म्हातारे वडीलही या दरम्यान वार्धक्यामुळे निधन पावले होते. काही अज्ञात, आकस्मिक कारणामुळे सुखदेवने आपली गावातील दोन एकर जमीन तसंच घरातील बरंचसं सोनं नाणं विकल्याचंही ऐकिवात होतं.
रुपेशचे आई वडील दुर्धर आजारामुळे दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळून बसले होते. त्याचा एकुलता एक मुलगाही खूपच अशक्त, किरकिरा आणि मंदबुद्धी निघाला होता. मुलाचा सांभाळ, सासू सासऱ्यांची सेवा, पाळलेल्या जनावरांची देखभाल, शेतीची कामं.. हे सारं करून करून रूपेशची सहनशील पत्नी कंटाळली होती. शेवटी वैतागून एके दिवशी मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली, ती पुन्हा न येण्यासाठीच. तसंही रुपेश जेलमध्ये गेल्यापासून त्याच्या कुटुंबाला साऱ्या गावानं जवळ जवळ वाळीतच टाकलं होतं.
कोर्टात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले सर्व फौजदारी खटले त्वरित निकाली काढावेत असा हायकोर्टाचा आदेश निघाल्यामुळे आमच्या केसचा निकाल आता लवकरच लागेल अशी चिन्हे दिसत होती.
आमच्या केसमधील सर्व साक्षी पुरावे संपल्यामुळे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला अंतिम युक्तिवाद (final argument) सादर करावा अशी न्यायाधीशांनी सूचना केली.
फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या हतोत्साही (half hearted) फायनल ऑर्ग्युमेंट मध्ये काहीच दम नव्हता. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींना योग्य ती शिक्षा व्हावी अशी गुळमुळीत मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती.
आमचे वकील ॲड. मनोहर यांनी आपल्या अंतिम युक्तिवादांत, हा संपूर्ण खटलाच बनावट असल्याचे सांगून पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात दाखवलेली बेपर्वाई, मुख्य आरोपी जयदेव खडकेला पकडण्यात त्यांना आलेले अपयश, गुन्ह्यात सहभागी असलेल्या रुपेश सारख्या गुन्हेगाराला संरक्षण देण्याच्या पोलिसांचा प्रयत्न, फिर्यादी सुखदेवच्या कुटुंबियांची संशयास्पद वर्तणूक आणि आरोपी बँक कर्मचाऱ्यांचे स्वच्छ चारित्र्य ह्या सर्व बाबी उत्तमरीत्या अधोरेखित करून केवळ व्यक्तिगत आकसापोटीच फिर्यादीने हा खटला दाखल केला असल्याचे कोर्टात प्रभावीपणे प्रतिपादन केले.
तत्पूर्वी न्यायमूर्तींनी “आरोपींपैकी कुणाला आपल्या बचावार्थ काही सांगायचे आहे काय ?” असे विचारले असता मी म्हणालो..
“आरोपींचा गुन्ह्यामागील हेतू (motive), गुन्हेगारांचा पूर्वेतिहास (track record), प्रथमदर्शनी पुरावा (primafacie evidence) व परिस्थितीजन्य पुरावा (circumstancial evidence) यापैकी कोणतीही गोष्ट आमच्याविरुद्ध सिद्ध करण्यात पोलिसांना घोर अपयश आलेले आहे. हा संपूर्ण खटलाच धादांत खोटा आहे याबद्दल कुणाच्याही.. अगदी पोलिसांच्याही, मनात तिळमात्र शंका नाही. आदरणीय न्यायमूर्ती या खटल्याचा काय निकाल देतील हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. मात्र माझी त्यांना अशी नम्र विनंती आहे की जर या खटल्यातून आमची निर्दोष मुक्तता करण्याचे न्यायमूर्तींनी ठरविले तर कृपया निकाल देताना “सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता” असे न म्हणता “पूर्णपणे निर्दोष असल्याने सन्मानपूर्वक मुक्तता” अशा शब्दांचा आवर्जून उपयोग करावा.”
माझी ही विनंती ऐकल्यावर न्यायमूर्तींनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
पुढील सोमवारी खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल असे घोषित करून न्यायमूर्तीनी कोर्टाचे कामकाज तहकूब केले आणि आम्ही सारे आपापल्या गावी परतलो.
त्यानंतर जेमतेम दोनच दिवस उलटले असता सुखदेवच्या वकिलांनी आम्हा चौघा आरोपींशी फोनवरून संपर्क साधून “सोमवारच्या निकालात न्यायमूर्ती तुम्हाला शिक्षा ठोठावणार असून तत्पूर्वीच आम्हाला प्रत्येकी फक्त वीस हजार रुपये दिल्यास आम्ही तडजोड करून आत्ताच खटला मागे घेण्यास तयार आहोत..” असा निरोप दिला. आश्चर्य म्हणजे त्या पाठोपाठ रुपेशच्या वकिलांनीही आमच्याशी संपर्क साधून अगदी तसाच निरोप दिला. फरक एवढाच की रुपेशचे वकील प्रत्येकी फक्त दहा हजार रुपये घेऊन तडजोड करण्यास तयार होते.
अत्यंत घाबरट आणि उतावळ्या स्वभावाच्या रहीम चाचांनी तर लगेच हुरळून जाऊन खटल्यातून मुक्तता होण्याच्या आशेने त्यांना पैसे देण्याचे आनंदाने कबूलही केले. मात्र माझ्याशी संपर्क करून जेंव्हा त्यांनी विरोधी पक्षाच्या वकिलांना पैसे देण्याचा आपला निर्णय सांगितला तेंव्हा महत्प्रयासाने मी त्यांची समजूत काढली आणि त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त केले.
होता होता पुढील सोमवार उजाडला. आज आमच्या केसचा निर्णय होणार होता. ठीक अकरा वाजता न्यायमूर्ती आपल्या डायसवर येऊन बसले आणि त्यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण निकालात जागोजागी न्यायमूर्तींनी पोलिसांच्या सदोष तपासावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. रुपेश जगधनेच्या तपासात जाणूनबुजून ढिलाई करून त्याला मदत केल्याबद्दल संबंधित जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी जाब विचारून त्यांच्याविरुद्ध उचित ती कार्यवाही करावी अशी देखील न्यायमूर्तींनी सूचना केली. वैयक्तिक आकस किंवा धमकी देऊन पैसे उकळणे अशा हेतूनेच बोडखे कुटुंबीयांनी बँक कर्मचाऱ्यांवर हा खटला दाखल केल्याचे दिसते असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी नोंदविले. सरतेशेवटी न्यायमूर्ती म्हणाले..
*”अभियोक्ता पक्ष (वादी), विरोधी (प्रतिवादी) पक्षा वरील आरोप सिद्ध करण्यात संपूर्णतः अयशस्वी ठरल्यामुळे आरोपी रुपेश जगधने व तथाकथित आरोपी जयदेव खडके वगळता अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ही मुक्तता सन्माननीय मुक्तता (honourable acquital) असून या मुक्ततेविरुद्ध उच्च न्यायालयाच्या विशेष परवानगी शिवाय फिर्यादी पक्षाला वरच्या कोर्टात अपील करता येणार नाही. रुपेश जगधनेचीही सबळ व पुरेशा पुराव्या अभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच फरारी आरोपी जयदेव खडके याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्याचेही पोलिसांना निर्देश देण्यात येत आहेत.”*
न्यायमूर्तींनी निकालाचे वाचन संपविल्यावर खटल्यातील आम्ही चौघा निर्दोष आरोपींनी एकमेकांचे अभिनंदन केले. हळव्या रहीम चाचांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. वारंवार दोन्ही हात उंचावून आकाशाकडे पहात ते खुदाचा शुक्रिया अदा करीत होते. आमचे वकील ॲड. मनोहर तसेच कोर्टातील सर्व वकील वृंदाने आणि कर्मचारी वर्गानेही आमचे अभिनंदन केले. तब्बल दहा वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीच्या आमच्या न्यायासाठीच्या अथक, चिवट लढ्याची अखेर आज यशस्वी सांगता झाली होती.
काही अंशी या केसमुळेच आपली पत्नी गमावून बसलेल्या रविशंकर व सैनी यांच्या अंतर्यामी खिन्न चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेल्या हास्यात एक करुण, उदास झाक दिसून येत होती. त्यांच्याकडे पाहिल्यावर Justice delayed is justice denied ही उक्ती खरी असल्याची प्रचिती येत होती.
कोर्टाबाहेर आल्यावर आमचे वकील ॲड. मनोहर व आम्ही चौघांनी राजू चहावाल्याच्या आग्रहास्तव त्याच्या टपरीवर चहा घेतला. नंतर एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या रस्त्याने निघून गेले. रेल्वेची वेळ होत आल्याने मीही रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे निघालो. स्टेशनवर आल्यावर रेल्वे कॅन्टीन जवळील झाडाखालच्या बाकावर बसून गाडीची वाट पहात असतानाच सुखदेव बोडखे माझ्या दिशेने येताना दिसला.
“मनःपूर्वक अभिनंदन साहेब..!”
माझ्या जवळ येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करीत तो म्हणाला. त्याच्या आजच्या बोलण्यात नेहमीसारखा विखार, उपहास, उपरोध किंवा कुत्सितपणा नव्हता.
“धन्यवाद आणि नमस्कार ! या बसा..”
मी प्रत्युत्तरादाखल त्याला नमस्कार करून बाकावर शेजारी बसण्याची विनंती केली. बाकाच्या एका टोकाला संकोचत अंग चोरून बसत तो म्हणाला..
“साहेब, तुम्ही जिंकलात मी हरलो.. आज तुमची क्षमा मागायला आलोय इथे. तुमची काहीही चूक नसतांना तुम्हाला खूप त्रास दिलाय मी. माफ करा मला..”
सुखदेवच्या नजरेतील नेहमीचा बेरकीपणा नाहीसा होऊन त्या जागी प्रामाणिक पश्चाताप दिसत होता. त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो..
“जाऊ द्या हो, चालायचंच.. त्या जुन्या गोष्टी झाल्या. मी केंव्हाच विसरलोय सगळं.. ! पण एक गोष्ट मात्र अजून समजली नाही की, मी तुमचा असा कोणता घोर अपराध केला होता की ज्यामुळे तुमचा माझ्यावर एवढा प्रचंड राग होता ?”
माझ्या या प्रश्नावर शरमेनं खाली मान घालून तो म्हणाला..
“बदनामीची, पोलिस कंप्लेंटची, अटकेची भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याची मला सवयच लागली होती. तुम्ही पांढरपेशे कर्मचारी पोलिसांना व बदनामीला खूप घाबरता. त्यामुळे एखाद्या क्षुल्लकशा चुकीबद्दल किंवा हलगर्जीपणा बद्दल वरिष्ठांकडे व पोलिसांत तक्रार करण्याची केवळ धमकी देऊन मी बँक कर्मचारी, शिक्षक तसेच अन्य अनेक सरकारी खात्यांतील कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी भरपूर पैसे लुबाडले होते. आजपर्यंत कुणीही मला पैसे देण्यास विरोध केला नव्हता. त्यामुळे मला माझ्या दुष्ट, खुनशी, विकृत बुद्धीचा प्रचंड अहंकार झाला होता. तुम्ही मात्र माझ्यापुढे झुकण्यास ठाम नकार दिलात. त्यामुळे माझा अहंकार डिवचला गेला. कोणत्याही प्रकारे तुम्हाला माझ्यापुढे झुकण्यास भाग पाडायचेच असा मी टोकाचा, हट्टी निर्धार केला. तुमची बदनामी करण्यासाठी मी पोलीस, पत्रकार, वकील तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनाही हाताशी धरलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही साऱ्यांना पुरून उरलात. तुम्हाला घाबरवण्यासाठी मी पोलीस कंप्लेंट केली खरी पण पुढे त्यातच मी फसलो. पोलिसांनी मला ओरबाडून ओरबाडून संपूर्ण लुटलं. माझी जमीन, घरातील सगळं सोनं नाणं या पोलिसांची कधीच न भागणारी पैशांची भूक भागविण्यासाठी मला विकावं लागलं. मी या प्रकरणात आता पुरता कफल्लक झालो आहे. आणि माझा गर्व, माझा अहंकार.. ? तो तर केंव्हाच कापरासारखा उडून नाहीसा झाला आहे.”
एखाद्या शक्तीहीन, म्हाताऱ्या, थकलेल्या सिंहासारखा सुखदेव असहाय्य आणि केविलवाणा भासत होता.
“असं आहे तर मग गेल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या वकिलांकरवी तडजोड करण्याची ऑफर देऊन आमच्याकडे पैशाची मागणी का केलीत ?”
माझा हा प्रश्न सुखदेवला अपेक्षितच असावा. खाली घातलेली मान क्षणभरही वर न करता तो म्हणाला..
“वकिलांना त्यांची फी देण्यासाठी माझ्याकडे तसेच रुपेश कडेही काहीच पैसे उरले नव्हते. त्यामुळे “आमची थकलेली फी वसूल करण्यासाठी तुमच्या नावाने आम्ही बँकवाल्यांकडे तडजोडीची ऑफर देऊन पैसे मागितले तर चालेल का ?” असं आम्हा दोघांच्या वकिलांनी आम्हाला विचारलं, तेंव्हा नाईलाजानं त्यांना आम्ही होकार दिला..”
सुखदेवचं हे स्पष्टीकरण पटण्यासारखंच होतं. त्याचं सांत्वन करीत म्हणालो..
“जाऊ द्या..! झालं गेलं गंगेला मिळालं.. !! माझा कुणावरही कसलाही राग नाही. मात्र यापुढे कुणा निरपराधाला चुकूनही असा विनाकारण त्रास देऊ नका एवढीच तुमच्या कडून अपेक्षा करतो. तुमच्या आईवडिलांनी केवढ्या प्रेमानं तुमचं नाव ‘सुखदेव’ असं ठेवलं असेल. मात्र तुमच्या चुकीच्या वर्तनामुळे तुम्ही लोकांना दुःख देणारे ‘दुखदेव’ च ठरलात. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा दृष्टिकोन, तुमचं वर्तन बदला. अन्यायाने, अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा कधीही खरं सुख आणि आनंद देत नाही, हे ध्यानात ठेवा. आपला स्वभाव बदला. लोकांवर प्रेम करणारे, त्यांना सुख देणारे ‘सुखदेव’ बनून मातापित्यांनी दिलेलं नाव सार्थक करा.”
माझा उपदेश शांतपणे ऐकून सुखदेवने होकारार्थी मान डोलावली.
आमच्या केसशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्न, ज्यांची उत्तरे सुखदेवकडे निश्चितच असावी, माझ्या डोक्यात अद्यापही घोंगावत होते. सुखदेवकडून त्यांचा उलगडा करून घ्यावा असा क्षणभर मला मोहसुद्धा झाला. पण आता या सगळ्या कटू आठवणी विसरुन या प्रकरणावर कायमचा पडदा टाकायचा असं ठरवून मी तो मोह आवरला.
तोच.. दूरवरून स्टेशनकडे येणाऱ्या ट्रेनचा हेड लाईट चमकला. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ, लगबग सुरू झाली. मीही माझ्या बाकावरून उठलो. सुखदेवनं माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातात गच्च धरला आणि गदगदत्या स्वरात म्हणाला..
“तुम्हाला विनाकारण दिलेल्या त्रासाबद्दल मी तुमची मनापासून क्षमा मागतो. माझ्यावर दया करा आणि मोठ्या मनानं मला माफ करा..”
बोलता बोलता अचानक तो खाली वाकला आणि चक्क माझ्या पायावर त्यानं आपलं डोकं टेकलं. त्याच्या या अनपेक्षित कृतीनं अचंबित होऊन मी भांबावून गेलो. कसंबसं त्याला उठवून उभं केलं. किंचित मागे सरुन तो म्हणाला..
“कधीही आपला संयम जराही ढळू न देता अत्यंत शांतपणे तुम्ही ज्या धीराने एकूण सर्व विपरीत परिस्थितीला इतका दीर्घ काळपर्यंत अतिशय समर्थपणे आणि सदैव प्रसन्न मुद्रेने जे तोंड दिलंत त्याला खरंच तोड नाही. मी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला चढविला, अनेक कुटील डावपेचही लढवले पण तुम्ही कधीही न डगमगता अतिशय स्थिर बुद्धीने माझा मुकाबला केलात आणि शेवटी माझा डाव माझ्यावरच उलटवलात. तुमच्या या शांत, संयमी, सुसंस्कृत आणि स्थिर बुद्धीच्या विजयी लढ्याला माझा मनापासून सलाम.. !!”
ताठ उभं राहून उजव्या हाताचा तळवा आपल्या कपाळासमोर नेत सुखदेवनं मला कडक मिलिटरी सॅल्युट ठोकला.
एव्हाना माझी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली होती. एखाद्या पुतळ्यागत सलामीच्या पोझ मध्ये स्थिर उभ्या असलेल्या सुखदेवकडे पुन्हा पुन्हा वळून पहातच मी गाडीत शिरलो.
गाडी प्लॅटफॉर्म वरून हलली. मी दरवाजातच उभा होतो. सुखदेव माझ्याकडे पहात अजूनही त्याच पोझमध्ये निश्चलपणे उभा होता. प्लॅटफॉर्म वरील अंधुक प्रकाशातही त्याच्या डोळ्यातील अश्रू स्पष्टपणे चकाकताना दिसत होते.
हळूहळू गाडीनं वेग पकडला. मी पार दिसेनासा होईपर्यंत माझ्याकडे एकटक पहात सुखदेव प्लॅटफॉर्मवर अजूनही तशाच अवस्थेत स्तब्धपणे उभा होता..
(समाप्त)
(संपूर्ण काल्पनिक)
श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही सेवा केली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.
त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १८ भाग त्यांनी प्रसारित केले होते. या त्यांच्या चित्त थरारक दीर्घ कथेचे हे शेवटचे प्रकरण……………………………
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.