Mind blowing experiences of a banker
*बॅंकस्य कथा रम्या..*
*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*
(भाग : 9)
अँटिसिपेटरी बेल मिळविण्यासाठी औरंगाबादला थांबलेल्या रविशंकर आणि बेबी सुमित्रा यांना अद्यापही बेल मिळालेला नव्हता. दरम्यान बँकेचे व्हीआयपी गेस्ट हाऊस सोडून रविशंकर औरंगाबादला राहणाऱ्या त्याच्या गाववाल्या बिहारी मित्राकडे शिफ्ट झाला होता. पोलिसांचे एकंदरीतच नरमाईचे वागणे पाहून तसेच पोलीस आता खऱ्या गुन्हेगारांना शोधण्याच्या बाबतीत गंभीर आहेत असे वाटल्यावरून बेबी सुमित्राला मी वैजापूरला परत बोलावून घेतले.
इकडे सुखदेव बोडखेही स्वस्थ बसला नव्हता. त्याने माहितीच्या अधिकाराखाली (RTI – Right to information) बँकेकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागितली होती. बँकेने पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या प्रकरणात अंतर्गत चौकशी (डिपार्टमेंटल इन्कवायरी) केली का ? केली असल्यास कोण कोणता स्टाफ दोषी आढळला ? दोषी स्टाफला काय शिक्षा देण्यात आली ? अशी अनेक प्रकारची बँकेला अडचणीत आणणारी माहिती RTI च्या अर्जाद्वारे मागविण्याचा त्याने सपाटाच लावला.
हे RTI अर्जाचं प्रकरण फार सेन्सिटिव्ह असतं. अर्जदाराने मागितलेली माहिती विशिष्ट मुदतीच्या आत न दिल्यास संबंधित सरकारी कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यास दंडही होऊ शकतो. तसंच कोर्टात दुय्यम पुरावा (Secondary evidence) म्हणूनही या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. एकाच प्रकारच्या माहितीसाठी कायद्यानुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त तीनच अर्ज करू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने सुखदेव RTI चे असे अर्ज करीत असे.
या व्यतिरिक्त बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचार व पिळवणुकीचे खोटे व अतिरंजित आरोप करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांकडे अर्ज करून त्याद्वारे सुखदेवने त्याच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाविरुद्ध न्याय मागितला होता. या विभागांत केंद्रीय सतर्कता आयोग (Central Vigilance Commission – CVC), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau – ACB), राज्याचे गृह मंत्रालय (State Home Ministry) अशा सरकारी खात्यांचा समावेश होता. अर्थातच या सर्व खात्यांनी सुखदेवच्या अर्जाची तात्काळ व पुरेपूर दखल घेऊन प्राथमिक चौकशीची कार्यवाहीही सुरू केली होती.
या प्रकरणातील मास्टरमाईंड रुपेश जगधनेला पोलिसांनी अद्याप अटक केली किंवा नाही हे कळण्यासही काहीच मार्ग नव्हता. रुपेशचा शर्ट बनियान काढून त्याचे दोन्ही हात उंच करून दोरीने छताला बांधले आहेत व पोलीस ठाण्यातील टॉर्चर रूमच्या भिंतीला त्याचे तोंड टेकवून गेले चार दिवस पोलीस त्याच्या उघड्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारून त्याचा कबुलीजबाब घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा बातम्याही काही अविश्वासार्ह सो कॉल्ड प्रत्यक्षदर्शींद्वारे बँकेच्या स्टाफपर्यंत पोहोचविल्या जात होत्या.
अशातच एका सकाळी साडेदहा वाजता रुपेशने बँकेत प्रवेश केला आणि काहीच न झाल्यासारखं आपल्या नेहमीच्या जागेवर बसून सिग्नेचर स्कँनिंगचं पेंडिंग काम करण्यास प्रारंभ केला. ताबडतोब त्याला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणालो..
“तुला आता सिग्नेचर स्कँनिंगचं काम करता येणार नाही. हे काम बाहेरच्या व्यक्तीकडून करून घेता येणार नाही, असं रिजनल ऑफीसनं स्ट्रिक्टली कळवलं आहे..”
त्यावर हसत रुपेश म्हणाला..
“अहो साहेब, तसा नियम तर पूर्वी पासूनच आहे. पण तरी देखील सगळ्याच बँकांच्या सगळ्याच शाखांमध्ये हे काम आमच्यासारखी बाहेरची लोकंच करतात. काही ठिकाणी तर सेव्हिंग बँक अकाउंट ओपनिंगचं आणि पीक कर्ज खात्याचं काम सुद्धा बाहेरच्या लोकांकडूनच करून घेतलं जातं..”
रुपेशच्या बोलण्यात जो आत्मविश्वास, जी सहजता होती त्यावरून पोलीसांनी त्याला अटक केली असेल असं वाटणं शक्यच नव्हतं.
“ते काहीही असो, तुला मात्र यापुढे बँकेतलं कोणतंही काम करता येणार नाही एवढं नक्की..!”
मी ठामपणे म्हणालो..
“ठीक आहे साहेब, मग तुम्ही मला आतापर्यंत केलेल्या माझ्या कामाचे पैसे देऊन टाका.. मी बिल तयार करून आणलंच आहे..”
असं म्हणत रुपेशने खिशातून बिल काढून माझ्या पुढ्यात ठेवलं..
“बिल तपासल्यावर एक दोन दिवसात तुझ्या खात्यावर याचे पैसे जमा होतील. बरं एक सांग.. इतके दिवस तू कुठे होतास ? बँकेत एवढी मोठी घटना झाली, नेमका त्या दिवसापासूनच तू गायब आहेस..”
“हो साहेब, शेतीची कामं सुरू होती आणि अचानक वडील आजारी पडले. त्यांना दवाखान्यात नेणं आणि शेतीची अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करणं यातंच बिझी होतो. बँकेतल्या घटनेबद्दल मला फार उशीरा समजलं.. काही तपास लागला का साहेब त्या पैसे नेणाऱ्या माणसाचा..?”
एखाद्या कसलेल्या नटासारखा रुपेशचा बेमालूम, निरागस अविर्भाव पाहून मी थक्कच झालो. खरोखरीच तो एक “बहुत पहुंची हुई चीज” होता. त्याचा अंदाज घेण्यासाठी म्हणालो..
“अद्याप तरी त्या माणसाचा तपास लागलेला नाही. मात्र ही घटना कुणी घडवून आणली याचा पक्का उलगडा झालेला आहे. लवकरच पोलीस त्याला अटक करतील..”
रुपेशच्या चेहऱ्यावर क्षणभर भीतीची, चिंतेची पुसटशी लहर चमकून गेली. माझ्या नजरेला नजर न भिडवता खाली पहात तो म्हणाला..
“बरं झालं साहेब..! बिलाचं काय झालं ते पहायला उद्या परवा पुन्हा येऊन जाईन. येतो साहेब..”
रुपेश गेल्यावर बराच वेळपर्यंत मी त्याच्याबद्दलच विचार होतो. माझ्या कल्पनेपेक्षाही खूपच जास्त धूर्त आणि निर्ढावलेला दिसत होता हा रुपेश.. ! पोलिसांनी तर त्याला हातही लावलेला दिसत नव्हता. आता मलाच लवकरात लवकर काहीतरी शक्कल लढवून त्याच्याकडून सत्य वदवून घ्यावं लागणार होतं.
रुपेशने दिलेलं बिल जर पास केलं तर तो पुन्हा कधीच बँकेकडे फिरकणारही नाही असं वाटल्यामुळे मी ते बिल जाणूनबुजून तसंच पेंडिंग ठेवलं. या मधल्या काळात, गेले काही दिवस रुपेश कुठे होता याची चौकशी करण्यासाठी नंदूला रुपेशच्या गावी घायगावला पाठवलं. तसंच रुपेशच्या नकळत त्याचा पाठलाग करून तो कुठे जातो, कुणाला भेटतो याबद्दल माहिती काढण्याची कामगिरीही नंदूवरच सोपविली. त्याने आणलेल्या माहितीनुसार गेले काही दिवस रुपेश परगावी गेला असल्याने गावातच नसल्याचे गावकऱ्यांनी त्याला सांगितले होते. तसेच रुपेश अलीकडे वारंवार पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे त्याला खूप आदराने वागविले जाते, खुर्चीवर बसवून चहाही पाजला जातो हे सुद्धा नंदूने प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते.
तीन चार दिवस झाले तरी बिलाचे पैसे खात्यात जमा न झाल्याचे पाहून अपेक्षेप्रमाणेच पाचव्या दिवशी रुपेश सकाळी दहा वाजताच बँकेत हजर झाला. माझ्या केबिनच्या एका कोपऱ्यातील खुर्चीत त्याला बसवलं आणि “मी सांगेपर्यंत जागेवरून उठायचं नाही..” असा कडक शब्दात त्याला दम दिला. दिवसभर माझ्या केबिनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची वर्दळ होती. आत येणारा प्रत्येक जण कोपऱ्यात खाली मान घालून निमूटपणे बसलेल्या रुपेशकडे विचित्र नजरेने बघायचा. सततच्या तशा नजरांमुळे रुपेश खजील होऊन अस्वस्थ होत होता. त्याची तळमळ, तगमग, चुळबुळ वाढत चालली होती.
बघता बघता दुपारचे अडीच वाजले. लंच टाईम झाला. वॉचमनने बँकेचे ग्रील डोअर बंद करून शटर अर्धे खाली खेचले. हॉलमध्ये तुरळकच कस्टमर उरले. रुपेशला एकाच जागी बसवून आता चांगले साडेचार तास उलटून गेले होते. त्याचा धीर सुटत चालल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून आता सहज कळून येत होते. काहीतरी बोलण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण धाडस होत नसल्याने तोंडातून शब्दच फुटत नसावेत असाच भास होत होता.
“साहेब, मला माफ करा ! फार मोठी चूक झाली माझ्या हातून..”
अखेर रुपेशच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्याच्या संयमाचा बांध आता पुरता फुटला होता.
“मी मोहाला बळी पडलो.. तुमचा विश्वासघात झाला माझ्या हातून..”
पश्चातापदग्ध होऊन रुपेश बोलत होता..
“थांब..! तुला जे काही सांगायचं आहे, ते तू साऱ्या स्टाफ समोर सांग..”
असं म्हणून त्याला थांबवित बेल वाजवून लगेच प्युनला बोलावलं आणि लंच घेत असलेल्या बँकेतील सर्व स्टाफ सदस्यांना ताबडतोब हॉलमध्ये जमण्यास सांगितलं. नंदूने भराभर हॉलमध्ये गोलाकार खुर्च्या लावल्या. त्यावर सर्व स्टाफ बसल्यानंतर मी खूण केल्यावर एका कोपऱ्यात उभं राहून रुपेश बोलू लागला..
“साधारण महिनाभर पूर्वीची गोष्ट आहे.. तीन अनोळखी माणसं मला बँकेजवळ भेटली. जर रत्नमाला बोडखे यांच्या नावाचे दुसरे चेकबुक आम्हाला आणून दिले तर आम्ही तुला वीस हजार रुपये देऊ असे ते म्हणाले. एवढी मोठी रक्कम ऐकून माझं इमान डगमगलं. मी त्यांना होकार दिला. नंतर जेंव्हा दुसरं चेकबुक तयार झालं तेंव्हा संधी पाहून मी ते चेकबुक माझ्या ताब्यात घेतलं आणि त्या माणसांना नेऊन दिलं.”
खूप मोठा कबुलीजबाब रुपेशने दिला होता. त्याच्याकडे आsss वासून बघणाऱ्या स्टाफ पैकी सर्वप्रथम रहीम चाचांनी विचारलं..
“वो लोग कौन थे ? उनका कोई नाम वाम, अता पता.. तुमको कुछ मालूम है क्या ?”
“नाही..! पण ती माणसं गावातल्या देवीच्या मंदिराजवळच कुठेतरी राहतात. अजूनही बरेचदा ती माणसं तिथेच उभी असलेली मला दिसून येतात. ते दुसरं चेकबुक ही मी त्यांना त्या देवीच्या मंदिरा जवळच दिलं होतं..”
“जर आज संध्याकाळी आपण देवीच्या मंदिराजवळ गेलो तर ती माणसं तिथे भेटतील का आणि तू त्यांना ओळखून पकडून देऊ शकशील का ?”
मी विचारलं..
“हो, साहेब ! ती माणसं रोज तिथेच असतात. मी त्यांना ओळखून पकडून देऊ शकतो..”
रुपेशचे हे आश्वासन ऐकून सर्वांना हायसं वाटलं. आनंदित मुद्रेने मी म्हणालो..
“ठीक आहे ! पुढे काय झालं ते सांग.. ती बनावट सही तूच केली होतीस ना ? आणि.. तो जयदेव खडके कोण, कुठला आहे ? ते त्याचं खरं नाव आहे का ?”
आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
“सगळं सांगतो साहेब.. पण त्यापूर्वी कृपा करून माझी एक छोटीशी विनंती मान्य करा.. गेले सहा सात तास मी घराबाहेर आहे. सकाळ पासून माझ्या पोटात अन्नाचा कण ही नाही. माझी बायको जेवणासाठी माझी वाट पहात असेल. माझे वडील आजारी आहेत, त्यांच्यासाठी औषधही घेऊन जायचं आहे. तेंव्हा फक्त अर्ध्या तासासाठी मला घरी जाऊन येण्याची परवानगी द्या. मी शपथ घेऊन सांगतो की घरून जेवून आल्यावर मला माहीत असलेली सर्व स्टोरी मी तुम्हाला डिटेल मधे सांगेन..”
रुपेशची विनंती योग्यच होती. सकाळी दहापासून तर तो बँकेतच होता. त्याला घरी जाऊन येण्याची परवानगी दिल्यावाचून गत्यंतरच नव्हतं. त्याचं गावही अगदी जवळच.. अवघ्या दोन कि.मी. अंतरावरच होतं. रुपेश घराकडे निघाला असतानाच रहीम चाचांनी त्याला थांबवलं..
“दो मिनट के लिए रुको..! अब तक तुमने जो कहा वो मैंने इस कागजपे लिख लिया है..! तुम इसे पढ़ कर उसपर तुम्हारे दस्तखत कर दो.. “
रहीम चाचांनी त्यांच्या हातातील रजिस्टरच्या मोठ्या कागदावर शुद्ध मराठीत रुपेशचा आतापर्यंतचा कबुलीजबाब जसाच्या तसा लिहून काढला होता. तो वाचून संमतीदर्शक मान हलवीत रुपेशने त्या कागदावर सही केली. त्याच्या सही खालीच साक्षीदार म्हणून रहीम चाचांनी बँकेच्या अन्य स्टाफच्याही सह्या घेतल्या. रुपेश गेल्यानंतर सगळे परत आपापल्या कामाला लागले.
सुमारे दोन तास झाले तरी रुपेश परत आला नाही तेंव्हा आपण त्याला घरी जाऊ देण्यात चूक तर केली नाही ना ? असं अनेकदा मनात येऊन गेलं. उरलेला कबुलीजबाब लिहून घेण्यासाठी हातात रजिस्टर घेऊन रहीम चाचा वारंवार माझ्या केबिनमध्ये डोकावीत रुपेशच्या परतण्याची उतावीळपणे वाट पहात होते. घड्याळाकडे पाहून मान हलवीत ते म्हणाले..
“रूपेशके लिए यहीं पर, आपकी केबिनमेही बाहरसे खाना मंगवा लिया होता तो बेहतर होता..”
एवढ्यात रुपेशने केबिन मध्ये प्रवेश केला. उन्हातून आल्याने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता.
“ये.. बैस ! जेवण नीट झालं ना ?”
रुपेशला खुर्चीवर बसवलं, त्याच्यासाठी चहा मागवला आणि काउंटर वर ड्युटी नसलेल्या सर्व स्टाफला केबिनमध्ये बोलावून घेतलं. सगळे जमल्यावर रुपेशला म्हणालो..
“हं.. सांग आता तुझी पूर्ण स्टोरी.. डिटेलमधे..”
रुपेशने डोळे मिटून खाली मान घातली. दोन मिनिटं तसाच मौन राहून मग मान वर करून नजरेला नजर भिडवीत तो म्हणाला..
“कोणती स्टोरी साहेब ?”
“अरे ! कोणती म्हणून काय विचारतोस ? तीच.., तू दुपारी अर्धवट सांगितलेली स्टोरी..!”
मी जवळ जवळ ओरडूनच म्हणालो.
“ती sssss ? ती स्टोरी तर तेवढीच होती. त्यापेक्षा जास्त मला काहीच माहीत नाही..”
रुपेशने सरळ सरळ “घुमजाव” करीत आपला शब्द फिरविला होता.
“मग तू इथे कशासाठी आलास ? घरून जेवून आल्यावर तू पूर्ण स्टोरी डिटेल मधे सांगणार होतास ना ?”
नक्कीच कुणाच्या तरी सांगण्यावरून रुपेशने आपला जबाब बदलला होता.
“मी तर इथे माझ्या बिलाच्या पैशासाठी आलो आहे. आणि माझा पूर्ण जबाब मी लेखी स्वरूपात सही करून तुम्हाला दुपारी दिलाच आहे. तोच माझा पूर्ण जबाब आहे. मला या प्रकरणाबद्दल फक्त तेवढीच माहिती आहे..”
खरोखरीच रुपेशला घरी जाऊ देण्यात आम्ही खूप मोठी चूक केली होती. आता तर तो नक्की घरीच गेला होता की आणखी कुठे दुसरीकडेच गेला होता, याचीही शंका यायला लागली होती. त्यातल्या त्यात एक बरं होतं की निदान आपल्या लेखी जबाबाचा तो इन्कार तरी करीत नव्हता. अर्थात रुपेश हा अत्यंत चलाख, धूर्त आणि धोकेबाज असल्यामुळे भविष्यात तो आपल्या लेखी जबाबावर ठाम राहीलच याची कोणतीही खात्री देता येत नव्हती.
रुपेशच्या पूर्ण कबुली जबाबानंतर केसचा उलगडा होऊन आपोआपच ती संपुष्टात येईल या आमच्या आशेवर रुपेशने पाणी फेरलं होतं. तरी देखील सब इंस्पे. हिवाळेंना फोन करून ताबडतोब बँकेत बोलावून घेतलं आणि रुपेशचा अर्धामुर्धा लेखी जबाब त्यांच्या हवाली केला. तो कागद वाचल्यावर ते म्हणाले..
“खरं म्हणजे या रुपेशला आम्ही आधीच अटक करायला हवी होती. तुम्ही दिलेला cctv फुटेजचा पुरावाही तसा मजबुतच होता. पण दुसऱ्या महत्वाच्या कामात गुंतल्यामुळे या केसकडे आमचं थोडं दुर्लक्षच झालं. पण काळजी करू नका, हा लेखी कबुलीजबाब त्याला तुरुंगात धाडण्यासाठी पुरेसा आहे..”
हिवाळेंना मधेच थांबवून मी म्हणालो..
“रुपेश या गुन्ह्यात सहभागी आहे. त्याला अन्य गुन्हेगारांबद्दलही माहिती आहे. या केसच्या तपासात आपल्याकडे असलेली ही एकमेव लिंक आहे. तुम्ही त्याला तुरुंगात नाही धाडलंत तरी चालेल पण अगोदर त्याला तुमची ती थर्ड डिग्री दाखवून त्याच्याकडून त्या जयदेव खडकेची माहिती काढून घ्या. केस सक्सेसफुली सॉल्व्ह झालीच म्हणून समजा.”
माझा सल्ला ऐकून हिवाळेंच्या चेहऱ्यावरील झर्र्कन बदललेले भाव पाहून त्यांचा इगो चांगलाच दुखावल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं.
“आमचं काम कसं करायचं ते आमचं आम्ही पाहून घेऊ. त्या बाबत तुमचा सल्ला घेण्याची वेळ अद्याप तरी आमच्यावर आलेली नाही.. बरंय, येतो मी..”
हिवाळे साहेब जरी तावातावाने निघून गेले असले तरी आता त्यांना रुपेशला अटक केल्याशिवाय गत्यंतरच नाही याची आम्हा सर्वांनाच पक्की खात्री होती. त्यामुळेच आम्ही आता निर्धास्त होतो. त्या आनंदातच चार पाच दिवस निघून गेले. रुपेशला पोलिसांनी अटक केल्याची बातमी अजूनतरी आमच्या कानावर पडली नव्हती. एवढ्या मोठ्या गुन्ह्याच्या केसमध्ये गुन्हेगाराबद्दल एवढे सारे पुरावे देऊनही पोलीसांनी अजूनपर्यंत त्याला मोकळं का सोडलं आहे ? या मागचं रहस्यच कळत नव्हतं.
त्याच दरम्यान एकदा सकाळी साडे दहा वाजता नित्याप्रमाणे केबिन मध्ये बसलो असता कोट, टाय घातलेला एक हसऱ्या चेहऱ्याचा गोरापान, देखणा तरुण वारंवार केबिनमध्ये डोकावून जाताना दिसला. कदाचित त्याला मला काही विचारायचं असेल असं वाटल्यामुळे त्याला केबिनमध्ये बोलावून घेतलं. आत आल्या आल्या माझ्याकडे निरखून पहात तो म्हणाला..
“राजू..? आय मीन.. अजय कोटणीस..? अकोला..? मी.. सुहास पटवर्धन.. एल आर टी कॉलेज.. !!”
मी थक्क होऊन त्या रुबाबदार तरुणाकडे काही क्षण पहातच राहिलो. कॉलेज मधील तो अशक्त, दुबळा, लाजाळू, बुजरा सुहास आता सुटबुटात एखाद्या हिरो सारखा स्मार्ट दिसत होता.
“अरे सुहास..! मी ओळ्खलंच नाही.. किती बदललास रे तू..? आणि आज इकडे कुठे..? जर्नालिझमचा कोर्स करून मुंबईला गेला होतास ना तू..?”
“हो रे..! मुंबईला काही दिवस “टाइम्स ऑफ इंडिया” त वार्ताहर म्हणून काम केलं.. आता “झी टीव्ही” त रिपोर्टर आहे. महोत्सवाची न्यूज कव्हर करण्यासाठी शिर्डीला आलो होतो. आता औरंगाबादला निघालोय. पैशांची गरज पडली म्हणून चेक एनकॅश करण्यासाठी मित्राबरोबर इथे आलो होतो..”

मग सुहासशी आणि त्याच्या मित्राशी खूप गप्पा टप्पा झाल्या. सुहासचा मित्र “आज तक” चा रिपोर्टर होता. बँके बाहेर “झी टीव्ही” आणि “आज तक” चॅनेलच्या ओबी व्हॅन उभ्या होत्या. चेकचे पैसे घेतल्यावर माझा निरोप घेऊन सुहास केबिन बाहेर पडतो न पडतो तोच Addl. DSP साहेब व Dy. SP मॅडम हे दोघे माझ्यासमोर येऊन खुर्चीत बसले. थेट मुद्द्यालाच हात घालीत Addl. DSP साहेब मोतीराम राठोड म्हणाले..
“तुम्ही व तुमचा स्टाफ केसच्या तपासात पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे ठाणेदार साहेब मला वारंवार कळवीत आहेत. बँकेची बदनामी होऊ नये म्हणून अद्याप तरी तुमच्या विरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करण्याची मी त्यांना परवानगी दिलेली नाही. मात्र तुमची वर्तणूक अशीच असहकाराची राहिली तर नाईलाजाने मला तुमच्याविरुद्ध ॲक्शन घेण्याबाबत ठाणेदार साहेबांना “फ्री हँड” द्यावा लागेल. तसंच तुम्ही लोकांनी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचंही माझ्या कानावर आलं असून ही अत्यंत गंभीर बाब आहे..”
हा तर उघडउघड “चोराच्या उलट्या बोंबा” असाच प्रकार होता. पण आता या लोकांना अजिबात घाबरायचं नाही असा मी ठाम निश्चय केला होता.
“सर, एकतर बनावट सहीचा चेक वटवून बँकेला फसविणाऱ्या आणि पैसे घेऊन गायब झालेल्या जयदेव खडके नावाच्या माणसाचा पोलिसांनी अद्याप शोधच घेतलेला नाही. पोलिसांपेक्षा तर बँकेचा स्टाफच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. गुन्ह्यात सहभागी असलेला बँकेचा टेम्पररी कर्मचारी रुपेश जगधने याच्या बद्दलचे cctv फुटेज आणि त्याचा लेखी कबुलीजबाब देऊनही त्याला अटक करण्याबाबत पोलीस अक्षम्य दिरंगाई करीत आहेत. पोलिसांचा केसच्या तपासा बाबतचा निरुत्साह पाहून त्यांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी तर केलेली नाही ना ? अशीच आम्हाला शंका येते आहे. आज संध्याकाळ पर्यंत जर रुपेशला अटक झाली नाही तर वरिष्ठांच्या परवानगीने पत्रकार परिषद घेऊन आम्हीच टीव्ही चॅनेल्स व अन्य पब्लिक मीडियाकडे हे प्रकरण घेऊन जाऊ आणि पोलिसांचा नाकर्तेपणा जगजाहीर करू..”
माझ्या ह्या सडेतोड प्रत्युत्तराचा व गर्भित धमकीचा त्वरित परिणाम दिसून आला. DSP आणि Dy SP या दोघांच्याही चेहऱ्याचा रंगच उडाला. घाईघाईत त्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. कदाचित बाहेर उभ्या असलेल्या टीव्ही चॅनेल्सच्या आउटसाईड ब्रॉडकास्टिंग व्हॅन बघून त्यांना माझी धमकी खरी वाटली असावी.
त्या दिवशी दुपारीच पोलिसांनी रुपेशच्या घरी जाऊन त्याला तडकाफडकी अटक केली. त्याला कोर्टासमोर उभे केले गेले तेंव्हा लेखी कबुली जबाबात उल्लेख असलेल्या सर्व गोष्टी रुपेशने मान्य केल्या. कोर्टाने एक महिन्याच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावून हर्सूल, औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली.
प्रकरणातील पहिला अध्याय संपला होता. ह्या यशामुळे आगामी संकटांना झुंज देण्यासाठी एक नवा जोम, नवा हुरूप प्राप्त झाला होता. त्या उत्साहातच प्रफुल्लित मनाने दैनंदिन काम उरकत असतानाच माझा मोबाईल किणकिणला. नंबर अनोळखी होता. पलीकडून हळुवार, कोमल, मधाळ, मादक स्वरात विचारणा झाली..
“हॅलोsss, कोण बोलतंय ? मॅनेजर साहेब का ?”
“हो, मीच बोलतोय.. आपण कोण ?”
“हाय हँडसम.. ! मी, ॲडव्होकेट रश्मी बोलतेय.. जोगळेकर वकिलांची असिस्टंट आणि पर्सनल सेक्रेटरी.. एका अत्यंत अर्जंट आणि इंपॉर्टन्ट मॅटर बाबत तुमच्याशी बोलायचं होतं.. तुम्ही आज रात्री नऊ वाजता माझ्या घरी मला भेटू शकाल का ? घराचा पत्ता तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवला आहे.. मी एकटीच राहते इथे.. तुमची हरकत नसेल तर छोटीशी रंगीत पार्टी सुद्धा करू या. ड्रिंक्स घेता घेता छान गप्पा मारता येतील आणि कामाबद्दलही बोलता येईल.. तेंव्हा.. येताना प्लिsssज ? आणि हो, येतांना एकटेच या आणि आपल्या या भेटीबद्दल माझे बॉस, जोगळेकर साहेबांना इतक्यातच अजिबात काहीही कळू देऊ नका.. मग.. ? वाट पाहू नं मी तुमची ?”
रश्मीचं ते लाडिक आर्जव ऐकून मला अनामिक धोक्याची जाणीव झाली..
“आज तर मी खूप बिझी आहे.. उद्या शनिवार असल्यामुळे तसाही मी घरी, औरंगाबादला येणारच आहे. तेंव्हा उद्या किंवा परवा भेटू..”
असं म्हणून घाईघाईत मी फोन ठेवला आणि या रश्मीचं माझ्याकडे काय बरं अर्जंट आणि इम्पॉर्टन्ट काम असावं..? या विचारात बुडून गेलो..
(क्रमशः 10)