https://goodworld.in A website by Madhav Bhope

मोबाईलचा सदुपयोग कसा करायचा touch-quiz-gita-adhyaya-mobile-addiction

mobile phone addiction

touch-quiz-gita-adhyaya-mobile-addiction

तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Bhagvad Gita Chapter 12 Quiz- Shloka-1 या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत त्या श्लोकातील शब्द random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ- पहिला श्लोक ‘अर्जुन उवाच’ पासून सुरू होतो. “अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः

यातील सर्व १२ शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील  श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल

Bhagavad Gita Chapter 12 Quiz

Bhagavad Gita Chapter 12 Quiz

मोबाईल चा सदुपयोग

आजकाल जो पहावा त्याच्या हातात मोबाईल दिसतो. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे क्षणा क्षणा ला मोबाईल मध्ये बघत असतांना दिसतात. आणि त्यात आणखी वाईट म्हणजे, त्यातील ९९ टक्के लोक काय बघत असतात? तर कुठल्यातरी रील्स, किंवा शॉर्ट व्हिडिओ, किंवा तत्सम काही. आणि बोटांनी त्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करीत जातात, करीत जातात.. ज्याला की काही अंत नसतो. एकानंतर दुसरी रील किंवा व्हिडिओ येतच जातात. तुम्ही एका प्रकारची रील किंवा व्हिडिओ एकदा पाहिला, की तसेच असंख्य व्हिडिओ येत राहतात. त्यांच्या बघण्यात काही उद्देश असतो का? तर नाही. सुरुवातीला काही तरी बघण्यासाठी किंवा एखादा whatsapp मेसेज बघण्यासाठी, किंवा गूगल वर काही तरी सर्च करण्यासाठी  मोबाईल उघडलेला असतो. पण एकदा मोबाईल उघडला, की आपण आधी whatsapp वर जातो, आणि मग मोबाईल कशाकरिता उघडला होता तेच विसरून जातो. जे सर्च करायला मोबाईल उघडला होता, ते विसरून आणि राहूनच जाते. तुमच्यापैकी किती जणांचे असे होते? माझे तर बऱ्याच वेळा असे होते.

बरं आपल्यासारख्यांचे म्हणजे सीनियर लोकांचे जाऊ द्या, (मी माझ्यासारख्या निवृत्त लोकांबद्दल बोलतो आहे). आपण आता पक्के झालो आहेत, आणि आता आपले होऊन होऊन काय नुकसान होणार? असा काही जण विचार करतात. पण लहान मुलांचे काय हो? प्रत्येक घरात, अगदी १ वर्षापासून ते कितीही वर्षांपर्यंतची जी लहान मुलें आहेत, त्यांना या मोबाईल पासून कसे आवरणार, वाचवणार, दूर ठेवणार? घरात लहान मुलांसमोर कुणीही मोबाईल बघायचा नाही- असा नियम करण्याची आहे कुणाची तयारी? एवढेच काय पण त्यांच्यासमोर टीव्ही ही पहायचा नाही.. आहे अशी कोणाची तयारी? त्यांना सतत एंगेज ठेवण्याइतकी, त्यांच्याशी त्यांच्याएवढे होऊन खेळण्याची आहे कोणाची तयारी? तितका वेळ, एनर्जी, इच्छाशक्ति, सहनशक्ति  आणि स्किल आहे कोणाकडे?  मुलांना हे स्क्रीन पाहण्याची मुळात खरंच आवड नसते हो. त्यांना खेळायला, धावायला, नाचायला, हसायला, उड्या मारायला, मोकळ्या मैदानात जायला, त्यांच्या वयाच्या मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला खरे तर आवडते. पण आज मुलांना एकटे बाहेर पाठविण्याची कोणाची हिम्मत होत नाही, इतके वातावरण असुरक्षित आहे. मग त्यांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग त्यांच्याजवळ असणाऱ्या वेळेचे आणि अमर्याद उत्साहाचे, शक्तीचे काय करायचे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. कंटाळून जातात मुलें.

मग सुरुवातीला कौतुकाने, नंतर सवयीने आणि नंतर नंतर अपरिहार्यपणे, त्यांना मोबाईल दिला जातो. मग ते त्यातील कार्टून्स आणि जिंगल्स बघत बसतात. आणि नंतर नंतर त्यातील गेम्स शिकून घेतात. हे सर्व त्यांच्या युजर्स ने जास्तीत जास्त वेळेपर्यंत ते बघावे, खेळावे, याच उद्देशाने बनवलेले असतात. आवडीची गोष्ट मिळाली, विषय मिळाला, की मनुष्यप्राण्याच्या मेंदूत dopamine (डोपामाईन) harmone secrete होते आणि त्याला आनंदाची अनुभूति होते. मग ही अनुभूति सारखी सारखी घ्यावीशी वाटते. हे मोठ्या माणसांनाही लागू होते. एखाद्या गोष्टीतून आनंद मिळतो असे समजले की ती गोष्ट वारंवार करावीशी वाटते. Dopamine हे Pleasure harmones पैकी एक आहे. आपल्या शरीराला त्याची काही प्रमाणात गरज निश्चितच आहे. पण ते habit forming -सवय लावणारे आहे. त्यामुळे मनुष्य आपल्या आवश्यक कर्तव्यांनाही सोडायला मागे पुढे पाहत नाही.

मोठ्या माणसांची ही परिस्थिति- तर लहान मुलांचे काय हो? ती बिचारी निष्पाप असतात- चांगले वाईट कळण्याची शक्ति नसते (आपल्याला तरी कुठे असते म्हणा!).

आमच्या लहानपणी लहान मुलें माती खाऊ लागली, तर त्यांना गेरू खायला देत. मग त्यांची काही तरी मातीसारखे तोंडात टाकायची खुमखुमी भागत असे, आणि मातीचे दुष्परिणाम होत नसत.

तसेंच काही मोबाईलच्या बाबतीत करता येईल का? हा विचार गेले अनेक दिवस चालू होता. मुलांना मोबाईलपासून पूर्ण वंचित किंवा दूर ठेवणे हे जवळ जवळ अशक्य आहे.

मुलांना गेम्स खेळायला आवडतात.

आपल्याला वाटते, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. मुलांनी शुभम् करोति म्हटले पाहिजे, गणेश स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र म्हटले पाहिजे, झालेच तर गीतेचा एखादा अध्यायही त्यांना यायला पाहिजे- हे तुमच्या आमच्या सारख्या घरातल्या पालकांचे स्वप्न असते. हो की नाही?

मग जर एखादा गेम किंवा क्विज असा तयार केला- तयार केले, ज्यामध्ये एखादे चांगले स्तोत्र किंवा अध्याय मुलांना पाठ होईल, आणि त्यांचे मोबाईल सोबत खेळणेही होईल, तर? ड्रॅग अँड ड्रॉप करून स्तोत्राचे योग्य शब्द जुळवता आले तर? याच दृष्टीने आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायावर आधारित हे एक क्विझ तयार केले आहे. हे क्विझ  ए. आय. चा वापर करून अनेक दिवसांच्या प्रयत्नाने, ए. आय. ला अनेक प्रकारे commands आणि prompts देऊन, trial and error method ने बनवले आहे.

तुम्ही क्विझ सुरू केल्यावर, पहिला स्क्रीन तुम्हाला येईल- Bhagvad Gita Chapter 12 Quiz- Shloka-1 या नांवाने. त्यात पहिल्यांदा फिक्या अक्षरांत त्या श्लोकातील शब्द random म्हणजेच कुठलाही क्रम नसलेले, येतील. उदाहरणार्थ- पहिला श्लोक ‘अर्जुन उवाच’ पासून सुरू होतो. “अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः

यातील सर्व १२ शब्द वर दिलेले आहेत. तुम्हाला ते शब्द योग्य क्रमाने तुमच्या बोटाने ओढून त्यांच्या योग्य जागी बसवायचे आहेत. शब्दाची जागा योग्य असेल तर तो तिथे फिट बसेल, अन्यथा बसणार नाही. वरील  श्लोकाचे सगळे शब्द योग्य जागी बसले, की तुम्हाला अभिनंदनपर मेसेज येईल, पूर्ण श्लोक पुन्हा लिहून येईल, आणि पुढील श्लोकाला जाण्यासाठी Next Shloka असे एक बटन येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढील श्लोकावर गेले, की  पुन्हा पुढील श्लोकाचे शब्द त्याच प्रकारे तुमच्यासमोर येतील. अशा प्रकारे तुम्ही १२ व्या अध्यायातील एकूण २० श्लोक पूर्ण करू शकता. शेवटी “ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः”

हा मेसेज येईल आणि तुम्ही बारावा अध्याय पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनपर मेसेज येईल. तसेच पूर्ण अध्याय एका ठिकाणी वाचण्यासाठी एक बटन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण अध्याय एके ठिकाणी वाचू शकता.

आता हा गेम म्हणा किंवा क्विझ म्हणा- कोण कोण खेळू शकते? तर ज्यांना वाचता येते अशा लहान मुलांपासून ते मोठ्या आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे क्विझ उपयोगी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बारावा अध्याय येत असेल. पण काही जणांना तो पाठ करायचा आहे पण अजून काही कारणांमुळे जमले नाही असे असेल. त्यांनी काय करायचे? चक्क कॉपी करायची! म्हणजे असे, की गीतेचे छोटे पुस्तक समोर घेऊन बसायचे, आणि त्यातील बारावा अध्याय बघून, त्याप्रमाणे शब्द जोडायचे. अनेक वेळा हे क्विझ सोडवून सोडवून बारावा अध्याय केंव्हा पाठ होऊन जाईल ते कळणार पण नाही!

आपण हळू हळू अशा प्रकारे बरीच स्तोत्रें, अध्याय, श्लोक इत्यादि घेऊन येणार आहोत. अशा प्रकारे स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधली जातील!

तर घ्या मोबाईल आणि करा सुरू! आपल्या नातवांनाही द्या!

Bhagavad Gita Chapter 12 Quiz

Bhagavad Gita Chapter 12 Quiz

उतनूरचे दिवस-3-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

image (17)

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (३ )*

उतनूर मध्ये आमच्या स्टेट बँके व्यतिरिक्त आदीलाबाद जिल्हा केंद्रीय मध्यवर्ती बँक (ADCC) व सरस्वती ग्रामीण बँक अशा दोनच अन्य बँका होत्या. त्यापैकी ADCC बँक ही अनागोंदी कारभार व पर्याप्त निधीच्या अभावी कायमची बंद पडण्याच्या मार्गावर होती तर सरस्वती ग्रामीण बँक ही स्टेट बँकेद्वाराच पुरस्कृत (sponsored) असल्याने तशी बरीचशी आमच्या अंकीतच होती.

सरस्वती ग्रामीण बँकेची शाखा आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या अगदी समोरच होती. पुरेसा व कार्यक्षम स्टाफ नसल्याने या ग्रामीण बँकेचा उतनूर परिसरात केवळ नाममात्रच बिझिनेस होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या बँकेत राजकुमार रेड्डी नावाचे नवीन शाखाधिकारी आल्यापासून परिस्थिती बदलली होती.

सहा फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, सावळा रंग आणि सदैव हसमुख चेहरा असलेले राजकुमार रेड्डी एक हुशार व तडफदार अधिकारी होते. सर्वांशी आदराने व हसून खेळून बोलण्याच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली होती. ते अतिशय कष्टाळू होते व आपल्या बँकेचा बिझिनेस वाढावा यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असायचे.reddy-2

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शाखेतील फिल्ड ऑफिसर सूर्यकुमार बाबू यांचा पुलीमडगु गावात कर्ज वसुलीसाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचून गेले होते. पर्यायाने बँकेच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. शाखेत नवीन स्टाफ येण्यास तयार नव्हता. कर्जवसुली ठप्प झाल्याने अनुत्पादित कर्जाचे (NPA- Non Performing assets) प्रमाणही खूप वाढले होते.

राजकुमार रेड्डी साहेबांना शाखेच्या वाढत्या NPA ची चिंता सतावत होती. फिल्ड ऑफिसर नसल्याने त्यांनी स्वतःच कर्जवसुली साठी खेडोपाडी जाण्यास सुरवात केली. कर्जदारांना नियमित कर्जफेडीचे फायदे गोड शब्दांत समजावून सांगत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. पाहता पाहता कर्ज वसुलीचे प्रमाण वाढले आणि शाखेचा NPA झपाट्याने कमी झाला.

रोज सकाळी सहा वाजता रेड्डी साहेब रिकव्हरी साठी बाहेर पडून साडेनऊ पर्यंत घरी परत येत असत. मग जेवण करून साडेदहा वाजता ते शाखेत येऊन बसायचे. दुपारी एक वाजता ते पुन्हा कर्जवसुली साठी बाहेर पडायचे आणि चार साडेचार वाजेपर्यंत शाखेत परत यायचे. स्टाफ शॉर्टेज असल्याने खेडोपाडी जाताना ते नेहमी एकटेच जात. कुणालाही सोबत नेत नसत.

राजकुमार रेड्डी साहेब स्वतः जरी काळे सावळे असले तरी त्यांची बायको मात्र भरपूर गोरी तसेच सौंदर्यवती सुद्धा होती. रेड्डी साहेबांना मुलबाळ नव्हते. आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या वरच्या भागातच ते नवरा बायको रहायचे. रोज संध्याकाळी रेड्डी साहेब बायकोला घेऊन गावात मोटर सायकलवर फिरायचे तेंव्हा त्या देखण्या जोडीकडे सारे गावकरी कौतुकानं बघायचे.image (17)

कर्जवसुली समाधानकारक होऊन NPA आटोक्यात आल्यावर शाखेचे डिपॉझिट वाढविण्यावर जोर देण्यास रेड्डी साहेबांनी सुरवात केली. आमची बँक सरकारी बँक असल्याने उतनूर परिसरातील बहुतांश खातेदारांची डिपॉझिट्स आमच्या स्टेट बँकेतच होती. स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी बँकांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याज देण्याची रिझर्व्ह बँकेने ग्रामीण बँकांना परवानगी दिली होती. या गोष्टीचा आक्रमक प्रचार करीत रेड्डी साहेबांनी स्टेट बँकेतील डिपॉझिट्स आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली. लोकांनी आमच्या बँकेतून आपली जमा राशी काढून ती ग्रामीण बँकेत ठेवण्यास सुरवात केली. बघता बघता आमचे बरेच खातेदार त्यांच्या डिपॉझिट्स सह ग्रामीण बँकेत शिफ्ट झाले.

रेड्डी साहेबांच्या ह्या ऍग्रेसिव्ह बँकिंग मुळे स्टेट बँकेशी असलेल्या त्यांच्या मधुर संबंधात कडवटपणा निर्माण झाला होता. असं असलं तरी त्यांच्याशी असलेली माझी मैत्री मात्र कायम होती. रोज सकाळी एकाच वेळी आम्ही दोघेही इंस्पेक्शन व कर्ज वसुली साठी गावाबाहेर निघायचो. योगायोगाने आमची दत्तक गावेही एकाच रस्त्यावर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलातील गावे स्टेट बँकेकडे तर उजव्या बाजूच्या जंगलातील गावे ग्रामीण बँकेकडे, अशी दत्तक गावांची विभागणी होती.

नेहमीप्रमाणेच आजही दुपारी एक वाजता आम्ही दोघे रिकव्हरी साठी एकत्रच निघालो होतो. मला आज बिरसाई पेटच्या डावीकडील जंगलात पाच किलोमीटर अंतरावरील “भूपेट” या गावात जायचे होते. तर रेड्डी साहेबांना बिरसाई पेट च्या उजवीकडील जंगलात आठ किलोमीटर अंतरावरील “अल्लमपल्ली” या गावात जायचे होते. आम्ही दोघेही आपल्या ह्या गावांमध्ये पहिल्यांदाच जात होतो. तसंच ही दोन्ही गावं नक्षल्यांचा मुक्त वावर असलेली धोकादायक गावं असल्यामुळे दुपारी चार वाजण्यापूर्वीच व्हिजिट आटोपून बिरसाईपेट बस स्टॉप पाशी परत यायचे असे ठरवले.image (10)

बिरसाईपेट उतनूर पासून अकरा किलोमीटर दूर असलेलं रस्त्याला अगदी लागून असलेलं गाव होतं. तिथपर्यंत आम्ही तिघेही (मी, रेड्डी साहेब व प्युन रमेश) आपापल्या मोटार सायकलींवर आलो. तिथल्या बस स्टॉप नजीकच्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो असतांनाच आम्हाला बिक्षुपती भेटला. “पाथा उतनूर” (old utnoor) नावाच्या छोट्याशा गावात राहणारा बिक्षुपती गावोगाव सायकलींवर फिरून चादरी, सतरंज्या, ब्लॅंकेट्स हप्त्याने विकायचा. त्याचा व्यवहार पाहून नुकतंच त्याला दहा हजार रुपयांचं कर्ज मी मंजूर केलं होतं. रेड्डी साहेबांशी बिक्षुपतीची ओळख करून दिली. चहा घेतल्यावर बिक्षुपती बिरसाईपेट गावात गेला तर आम्ही आपाल्याला गावांकडे निघालो.

भूपेट गावात आमचे फक्त दहा बाराच कर्जदार होते. त्यांची भेट घेऊन थोडीफार वसुली करून तीन वाजण्यापूर्वीच आम्ही बिरसाईपेटला परतलो आणि रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो. मी झाडाखाली बसून इंस्पेक्शन रजिस्टर लिहून काढत होतो तर रमेश गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करीत होता. दरम्यान बिक्षुपती ही बिरसाईपेट मधील विक्री आटोपून आमच्या समोरूनच सायकल दामटीत पुढील गावाकडे निघून गेला. साडे चार वाजले तरी अद्याप रेड्डी साहेबांचा पत्ता नव्हता.

अखेर पाच वाजले. उंच वृक्षांच्या सावल्या लांबून अंधार पडायला सुरुवात झाली. रोजची कॅश स्टीच करणे, नोटांचे बंडल बांधणे, कॅश स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे ही कामे देखील रमेशलाच करायची असल्याने तो उतनूरला परतण्याची घाई करू लागला. मला मात्र रेड्डी साहेबांना न घेताच उतनूरला परत जाणे मनाला पटत नव्हते. शेवटी साडेपाच वाजता रमेशला एकट्यालाच बँकेची मोटारसायकल घेऊन उतनूरला परतण्यास सांगून मी तिथेच रेड्डी साहेबांची वाट पहात थांबलो.

त्याकाळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे रेड्डी साहेब नेमके कुठे आहेत हे समजण्यास मार्ग नव्हता. अल्लमपल्ली गावातून उतनूरकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. बिरसाईपेट गावाचे सरपंच हनमांडलू गारु मला सोबत करीत बस स्टॉप वर थांबले होते. त्यांच्याजवळ मोटारसायकल असल्याने यदाकदाचित रेड्डी साहेबांची भेट न झाल्यास मला उतनूर पर्यंत सोडून देण्याचे त्यांनी कबूल केले होते.

संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रस्त्यावरची वाहतूक मंदावली. गावकरी आपापल्या घरी परत गेले. गिऱ्हाईक नसल्याने बस स्टॉप वरील हॉटेलवालाही हॉटेल बंद करून आपल्या घरी गेला. आता तिथे फक्त मी आणि सरपंच हनमांडलू गारु असे दोघेच उरलो होतो. चादर विक्रेता बिक्षुपतीही अद्याप परतताना दिसला नसल्याने त्याबद्दल सरपंचांना विचारले असता.. “बिक्षुपतीचे भरपूर नातलग या परिसरातील विभिन्न गावांत रहात असल्याने विक्री करताना जिथे संध्याकाळ होईल त्याच गावात आपल्या नातेवाईकाकडे तो रात्रीचा मुक्काम करतो..” असे त्यांनी सांगितले.

साडेसात वाजता उतनूर मधील माझा सहकारी प्रसन्ना, मला परत नेण्यासाठी बँकेची मोटारसायकल घेऊन आला. रेड्डी साहेबांचा अद्यापही काहीच ठावठिकाणा नव्हता. आठ वाजता त्या मार्गावर रात्री गस्त घालणारी उतनूर पोलिसांची जीप (Patrolling vehicle) तिथे आली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर असं एकट्या दुकट्यानं उभं राहणं धोक्याचं असल्याचं सांगून त्यांनी आम्हाला हटकलं, तेंव्हा आम्ही त्यांना रेड्डी साहेबांबद्दल सांगितलं. एवढ्या रात्री जंगलात शिरून त्यांचा शोध घेणं खूप रिस्की असल्याचं सांगून त्यांनी आम्हालाही ताबडतोब उतनूरला परतण्यास सांगितलं. नाईलाजानं रात्री नऊच्या सुमारास आम्ही उतनूरला परतलो.

एव्हाना रेड्डी साहेबां बद्दलची बातमी साऱ्या गावभर पसरली होती. आमच्या बँकेसमोर गावकऱ्यांचा घोळका जमला होता. शेजार पाजारच्या बायका रेड्डी साहेबांच्या बायकोला धीर देत होत्या. गाडी पंक्चर झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे कदाचित साहेबांना अल्लमपल्ली गावातच मुक्काम करावा लागला असेल असे सांगून लोक रेड्डी साहेबांच्या पत्नीची समजूत घालत होते. रात्री दहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेड्डी साहेबांची “मिसिंग कम्प्लेन्ट” नोंदवली.

त्या दिवशी आम्ही स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी बँकेत जमून रात्रभर जागत राहून रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो होतो. ग्रामीण बँकेचा स्टाफ ही आमच्या सोबतच होता. काही प्रतिष्ठित गावकरी, ADCC बँकेचे कर्मचारी व दोन पोलीस कॉन्स्टेबल देखील थोड्या वेळासाठी तिथे येऊन गेले. रेड्डी साहेबांची पत्नी सुद्धा अधून मधून बँकेत येऊन जात होती. पहाटे सहा वाजता सशस्त्र पोलिसांच्या दोन जीप रेड्डी साहेबांच्या शोधार्थ अल्लमपल्ली फॉरेस्ट कडे निघाल्या.

अल्लमपल्ली गावापर्यंत जाऊन पोलिसांच्या या दोन्ही जीप सकाळी दहापर्यंत उतनूरला परत आल्या. रेड्डी साहेब अल्लमपल्ली गावात आलेच नसल्याचे तेथील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या नंतर दुपारी बारा वाजता, त्या भागातील हिरापूर गावाजवळ एक मोटारसायकल अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचे तेथील गावकऱ्यांनी उतनूर पोलिस स्टेशनला कळविले. ताबडतोब रिकामी जीप पाठवून पोलिसांनी ती मोटारसायकल ग्रामीण बँकेकडे आणवून घेतली. ती रेड्डी साहेबांचीच मोटारसायकल होती.

रेड्डी साहेबांसोबत निश्चितच काहीतरी घातपात झालेला दिसत होता. हिरापूर जंगलात त्या मोटारसायकल पासून काहीच अंतरावर पोलिसांना एक पॅन्ट शर्ट व बुटांचा जोड ही फेकून दिलेला दिसला. तोही पोलिसांनी सोबत आणला होता. ते कपडे व बूट रेड्डी साहेबांचेच असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

राजकुमार रेड्डी साहेबांची ती जळालेली मोटारसायकल व बूट, कपडे पाहताच त्यांच्या पत्नीचा आतापर्यंत कसाबसा राखलेला धीर संपला. अशुभाच्या आशंकेने त्यांनी हंबरडा फोडून विलाप करण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून जमलेल्या साऱ्यांचेच काळीज पिळवटून निघत होते. ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज बँक बंदच ठेवली होती. थोड्याच वेळात ग्रामीण बँकेचे आदीलाबाद येथील रिजनल मॅनेजर आपल्या सोबत लीड बँक मॅनेजर साहेबांना घेऊन उतनूरला हजर झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बँकेभोवती जमलेल्या जमावास पांगवून तिथे पोलीस बंदोबस्त वाढविला. रेड्डी साहेबांना शेवटचे पाहणारे आम्हीच असल्याने माझी व रमेशची पोलिसांनी कसून चौकशी केली. आदीलाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षकही उतनूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना वारंवार सूचना देत तपास कार्याचा अपडेट घेत होते. अल्लमपल्ली व हिरापूरचे संपूर्ण जंगल पोलिसांनी पिंजून काढले होते. परंतु अद्यापही रेड्डी साहेबांचा कसलाही थांगपत्ता लागत नव्हता.

कदाचित नक्षलवाद्यांनी रेड्डी साहेबांचे अपहरण करून त्यांना महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात नेले असावे असा पोलिसांचा कयास होता. तसे असेल तर खंडणीसाठी तरी त्यांचा फोन येईल याचीच पोलीस वाट पहात होते. परंतु दुपारचे चार वाजले तरी अद्याप तसा कुठलाही फोन आला नव्हता.

दिवस मावळू लागला तशीतशी रेड्डी साहेबांच्या परतण्याची आशा देखील मावळू लागली. त्यांच्या पत्नीची दयनीय अवस्था तर बघता बघवत नव्हती. पतीची आठवण काढून रडता रडता दु:खातिरेकाने ती विलापिता वारंवार बेशुद्ध पडत होती.

पाच वाजण्याच्या सुमारास कमरेला मळकंसं धोतर गुंडाळलेला एक जाडजूड उघडाबंब माणूस गर्दीतून वाट काढीत बँकेत आला. त्याचा चेहरा धुळीने माखलेला होता. माझ्याकडे पहात तो म्हणाला..

“नमस्ते साब..!”image (15)

आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी त्या माणसाकडे निरखून बघितलं.. तो काय..

“अरे..! रेड्डी साब.. आप ? और इस हालत में..?”

माझ्या तोंडून आनंदाने व आश्चर्याने वरील उद्गार बाहेर पडले.

माझे ते शब्द ऐकून सर्वांच्याच नजरा त्या माणसाकडे वळल्या. ते रेड्डी साहेबच आहेत याची खात्री झाल्यावर बँकेत सर्वत्र आनंदाची एक लहर पसरली. जो तो त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी धडपडू लागला. रेड्डी साहेबांच्या पत्नीला ही बातमी समजताच ती धावतच बँकेत आली आणि सर्वांदेखत तिने आपल्या पतीला घट्ट मिठी मारली. आनंदातिरेकाने तिच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला होता. रेड्डी साहेब व त्यांची पत्नी.. या दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्यांचं ते प्रेमभरीत उत्कट मिलन पाहून आम्हालाही गहिवरून आलं.

थोड्या वेळाने भानावर आल्यावर रेड्डी साहेबांच्या पत्नीने त्यांना घरी नेऊन आधी स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्यांना पोटभर खाऊ पिऊ घालून हसतमुखाने त्यांना ती बँकेत घेऊन आली. तोपर्यंत उतनूरचे पोलीस ठाणेदारही त्यांचा जबाब घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपले होते. आम्ही सारे ही त्यांची हकीकत ऐकण्यास अत्यंत उत्सुक होतो. रेड्डी साहेबांनी माझ्याकडे पहात बोलायला सुरुवात केली.

“काल दुपारी दीडच्या सुमारास माझ्या स्टेट बँकेच्या या मित्राला ‘चार वाजेपर्यंत इथेच परत येतो..’ असं सांगून बिरसाईपेट हून मी अल्लमपल्लीच्या दिशेने निघालो. सुमारे पाच किलोमीटर आत गेल्यावर एका ठिकाणी जंगलातील तो रस्ता दोन वेगळ्या दिशांना विभागला गेला होता. त्या रस्त्याने पहिल्यांदाच जात असल्याने नक्की कुठल्या दिशेने जावे याचा अंदाज न आल्याने नेमक्या चुकीच्याच दिशेने जंगलात जाण्यास मी सुरवात केली.

बराच वेळ झाला तरी कुठलेही गाव किंवा वस्ती दिसेना, तेंव्हा आपण रस्ता चुकल्याची मला खात्री झाली. गाडी वळवून माघारी परत फिरण्याचा विचार करीत असतानाच खाकी रंगाचा पॅन्ट शर्ट घातलेले दोन बंदूकधारी तरुण रस्त्याच्या कडेला उभे असलेले मला दिसले. ते फॉरेस्ट गार्ड असावेत असं वाटून मी त्यांच्याकडे अल्लमपल्लीच्या रस्त्याबद्दल चौकशी केली. हा हिरापूर कडे जाणारा रस्ता आहे असं सांगून अल्लमपल्लीचा रस्ता तर मागेच राहिला असं त्यांनी सांगितलं.

त्या दोघांचे आभार मानून मी मागे फिरलो. मात्र तेवढ्यात कुठूनतरी खुणेची एक कर्कश्श शीळ जंगलात घुमली. मला अनामिक धोक्याची जाणीव झाली. पाहता पाहता आजूबाजूच्या जंगलातून हिरव्या रंगाच्या गणवेशातील आठ दहा बंदूकधारी बाहेर पडून त्यांनी मला घेरून टाकलं. मला मोटारसायकल वरून खाली उतरवून पायवाटेने त्यांनी मला खोल जंगलात नेलं.

तिथे एका ठिकाणी नक्षलवाद्यांचा तळ होता. त्यांच्या कमांडरने माझी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. माझे आयडेंटिटी कार्ड दाखवूनही मी बँक मॅनेजर आहे यावर काही केल्या त्याचा विश्वास बसत नव्हता. गाडीचे लॉग बुक, इंस्पेक्षन रजिस्टर वगैरे त्याने दूर भिरकावून दिले. माझ्या दणकट शरीरयष्टीकडे पाहून मी पोलीस अधिकारीच असल्याचा त्याचा पक्का गैरसमज झाला होता. माझ्याबद्दल त्या कमांडरने खूप बारकाईने चौकशी केली. माझे जन्मगाव, शिक्षण, नोकरी इत्यादीचा तपशील जाणून घेऊन त्याची खातरजमा करण्यासाठी ट्रान्समिटर मार्फत ती माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवली.

माझे अंगावरचे कपडे काढून घेऊन तिथल्याच एका झाडाला त्या नक्षल्यांनी मला रात्रभर बांधून ठेवलं. माझे कपडे जंगलात फेकून देऊन माझी मोटारसायकल जाळून टाकण्याचाही कमांडरने आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला. माझा “फैसला” उद्या सकाळी होईल.. असं सांगून ते सारे झोपायला निघून गेले.

सकाळी तिथला तळ हलवून व दोरीने माझे हात पाठीमागे बांधून अनवाणी पायी चालवत त्यांनी मला तेजपूरच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. पोलिसांनी जंगलात माझा शोध घेण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांना खबर मिळाली होती. अधून मधून वॉकी टॉकी आणि ट्रान्समिटर वर बोलून ते माझ्या बद्दल वरिष्ठांकडून सूचना घेत होते. अद्याप माझ्या बद्दल हाय कमांड कडे पाठविलेली माहिती त्यांच्याकडून व्हेरिफाय झाली नव्हती.

सकाळचे दहा वाजून गेले होते. जसा जसा वरिष्ठांकडून माझी माहिती व्हेरिफाय करण्यास उशीर होत होता तसा तसा आमच्या सोबत जंगलात पायपीट करणाऱ्या त्या नक्षली दलम् च्या कमांडरचा राग व अधिरपणा वाढत होता. अखेरीस, बहुदा कमांडरच्या सततच्या विचारणेला वैतागून त्यांच्या हाय कमांडने माझ्या भवितव्याचा निर्णय त्या नक्षली कमांडरवरच सोपवला.

त्या कमांडरला तर माझ्या लोढण्या पासून कधीचीच सुटका हवी होती. त्याने मला पुन्हा झाडाला बांधून माझे हात पाय तोडून शीर धडावेगळे करण्याचा निष्ठूरपणे आदेश दिला. त्यानुसार चालता चालता मधेच थांबून तिथल्याच एका झाडाला मला बांधून टाकण्यात आले. मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली. जगण्याची आशा तर मी केंव्हाच सोडून दिली होती.

हातात कुऱ्हाड आणि कत्ती घेऊन निर्विकार चेहऱ्याचे दोन क्रूरकर्मा नक्षली जणू हे नित्यकर्मच असल्याच्या अविर्भावात माझ्या समोर उभे राहिले. त्यापैकी एका नक्षल्याने माझ्यावर घाव घालण्यासाठी कुऱ्हाड उंचावली. माझ्या सर्व संवेदना बधिर झाल्या होत्या. मी डोळे गच्च मिटून घेतले.

त्या नक्षल्याचा वर गेलेला हात बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने नवल वाटून मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तो नक्षली कान देऊन कसला तरी कानोसा घेत होता. काल ऐकली होती तशी खुणेची शीळ पुन्हा जंगलात घुमली. त्या पाठोपाठ जंगलातून एका माणसाला धरून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला कमांडर पुढे आणण्यात आले. मला त्या माणसाची फक्त पाठच दिसत होती.

कमांडरने आदेश दिल्यावर त्या माणसाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पट्टी काढताच त्या माणसाने कमांडरला सॅल्युट ठोकला. कमांडरची त्या माणसाशी चांगलीच जान पहचान असावी. कारण कमांडरने त्याला आदराने आपल्या शेजारी बसवून घेतले. त्यानंतर त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो कालच ओळख झालेला चादर सतरंजी विकणारा बिक्षुपती होता. बहुदा तो नक्षल्यांचा खबऱ्या असावा. सुरवातीला त्याने मला ओळखलेच नाही. मात्र नंतर कमांडरने माझ्याबद्दल माहिती सांगताच त्याला माझी ओळख पटली. तो कमांडरला म्हणाला..

“मी ओळखतो ह्यांना. मी खात्रीनं सांगतो, हे नवीन आलेले ग्रामीण बँकेचे मॅनेजरच आहेत.”image (19)

बिक्षुपतीच्या त्या उद्गारांनी जणू चमत्कारच झाला. त्या कमांडरने माझी माझी ताबडतोब सुटका करण्याचा आदेश दिला. माझी क्षमा मागून तो म्हणाला.. “बँकवाल्यांशी आमचं कसलंही वैर नाही. केवळ तुम्ही पोलीस असल्याचा संशय असल्यानेच सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला देहदंड देण्याचे मी ठरवले होते. तुम्ही आता या बाजूने सरळ चालत जा. सुमारे दोन तास चालल्यावर तुम्हाला उतनूर कडे जाणारा रस्ता सापडेल..”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी निमूटपणे त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो. बिक्षुपतीचे साधे आभार मानण्याचेही धैर्य आणि त्राण माझ्यात उरले नव्हते. माझ्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. त्या निर्मनुष्य जंगलात एखाद्या वनमाणसा सारखा वाट काढीत मी चाललो होतो. वाटेत एका उध्वस्त झोपडी समोर वाळत टाकलेलं फाटक मळकं धोतर काढून घेऊन मी ते कमरेला गुंडाळून घेतलं.

काल पासून पोटात अन्नाचा कण ही नसल्याने मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे चालताना अनेकदा सावली पाहून तिथे थांबून मी विश्रांती घेत होतो. अशा प्रकारे कशीबशी मजल दर मजल करीत अगदी विरुद्ध दिशेने एकदाचा मी उतनूर गावात प्रवेश केला.”

रेड्डी साहेबांचे बोलणे संपले. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच ते या जिवावरच्या संकटातून बचावले होते.

बिक्षुपती हा नक्षल्यांप्रमाणेच पोलिसांचा ही खबऱ्या होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही.

या घटने नंतर ग्रामीण बँकेच्या मॅनेजमेंटने रेड्डी साहेबांची ताबडतोब अन्यत्र बदली केली. परंतु रेड्डी साहेबांनी नम्रपणे ही बदली नाकारली आणि आपल्याला उतनूरलाच राहू द्यावे अशी वरिष्ठांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व शाखेची प्रगती करण्यासाठी आपले उतनूरला राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. विशेष म्हणजे रेड्डी साहेबांच्या पत्नीनेही आपल्या पतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.

असे हे कर्तव्यनिष्ठ राजकुमार रेड्डी साहेब पुढे ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Gondavalekar Maharaj Pravachan आजचे प्रवचन

gondavalekar maharaj image

महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत  प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील

Gondavalekar Maharaj Pravachan आजचे प्रवचन

gondavalekar maharaj image

महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत  प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील

२५ मार्च

प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून करा.

एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही.’ त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यांमध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे ? ‘तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग’, असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला ‘मी सुखी आहे’ असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.

८५. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय.

उतनूरचे दिवस-2-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

dense forest

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (२)*

*पुलीमडगुचा हल्लेखोर वाघ..*

दुसरा दिवस उजाडला. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच रमेश स्नान, देवपूजा आटोपून कपाळाला उभं गंध लावून बँकेची मोटारसायकल घेऊन माझ्या दारात हजर झाला. गाडीच्या अर्धवट तुटलेल्या पत्र्याच्या डिक्कीतून पुलीमडगु व आसपासच्या गावांतील कर्जदारांची माहिती असलेले जाडजूड इन्स्पेक्शन रजिस्टर डोकावत होते. मी सुद्धा स्नान, चहा ई. आटोपून तयारच होतो. दहा वाजेपर्यंत परत येतो, असं घरी सांगून आम्ही निघालो. ramesh

तसं पाहिलं तर उतनूर पासून पुलीमडगु गावाचं अंतर फक्त दहा किलोमीटर एवढंच होतं. परंतु काटेकुटे, खाच खळग्यांनी भरलेल्या कच्च्या, ओबडधोबड आणि निर्मनुष्य रस्त्याने जाताना ते छोटंसं अंतरही खूप मोठं वाटत होतं. नागपूर ते निर्मल या महामार्गावरील गुढीहतनूर या गावापासून उतनूर कडे जाण्यासाठी जो फाटा फुटतो त्या मार्गावर इंद्रवेल्ली आणि शामपूर या दोन गावांच्या मध्ये थोडं आडबाजूला हे पुलीमडगु गांव होतं. हा संपूर्ण भाग तुरळक वस्तीचा व आदिवासी बहुल असून गर्द वनराईनं वेढलेल्या भीषण दऱ्यादुऱ्यांचा तसंच क्रूर नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेला म्हणून कुख्यात होता.dense forest

पुलीमडगु गावात बेधडक दिवसा ढवळ्या वाघ येतो आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत जंगलात घेऊन जातो.. अशी त्या पंचक्रोशीत वंदता होती. त्यामुळे सहसा त्या गावांत एकटं दुकटं जायला कुणीही धजावत नसे. त्यातून हे गांव दाट जंगलात वसलेलं आणि थोडं आडबाजूला असल्याने त्या गावचे रहिवासी वगळता अन्य कुणीही त्या गावाकडे चुकूनही फिरकत नसत. पूर्वी हे गाव सरस्वती ग्रामीण बँकेच्या कार्यक्षेत्रात होतं. मात्र एका दुर्दैवी घटनेनंतर त्या बँकेने लीड बँकेकडे हे कार्यक्षेत्र बदलून मागितलं. त्यांची विनंति मान्य करून लीड बँकेने पुलीमडगु हे गांव स्टेट बँकेला पुनःआवंटीत (re-allot) केलं होतं.

आम्ही पुलीमडगु गावात प्रवेश केला तेंव्हा तिथल्या रस्त्यांवर काही बेवारस कुत्री सोडली तर अन्य कुणीही दिसत नव्हतं. सर्व घरांच्या व झोपड्यांच्या खिडक्या आणि दारं आतून बंद होती. गावात जेमतेम तीस चाळीस घरं असावीत. रमेशला गावातील वेड्यावाकड्या रस्त्यांची चांगलीच माहिती असल्याचं दिसत होतं. अतिशय शिताफीने वाटेतील खड्डे, खाच खळगे, चिखल, नाल्या चुकवत उभ्या आडव्या बोळांतून तो मोटार सायकल दामटीत होता.village

आम्ही एखाद्या घरासमोरून पुढे गेल्यावर त्या घरातील लोक खिडक्या दारं किंचित किलकिली करून आमच्याकडे चोरून पहात असावेत असा उगीचंच भास होत होता. डाकूंची टोळी गावात शिरते तेंव्हा गावातील लोक जसे घाबरून दारं खिडक्या घट्ट बंद करून घरात दडून बसतात तसंच काहीसं तिथलं वातावरण वाटत होतं.

आख्खं गाव ओलांडून रमेशने गावापासून दूर, अगदी टोकाला असलेल्या एका एकलकोंड्या घरासमोर गाडी उभी केली. दगडी बांधकाम असलेल्या त्या छोट्याश्या बैठ्या घरावरील नवी कोरी इंग्रजी कौलं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती.roof tiles

घराभोवती बांबू व वाळलेल्या काट्याकुट्यांचं मजबूत, उंच कुंपण होतं. घरासमोर अंगणात एक मध्यम आकाराची गोल, पक्की विहीर होती. ती विहीर नुकतीच खणलेली असावी. कारण विहिरीच्या खोदकामातून निघालेल्या दगडांचा ढिगारा अंगणात अजूनही तसाच पडलेला होता. गाडीवरून खाली उतरून रमेशने हाक मारली..village house

” वेंकन्ना…! ओ ssss वेंकन्ना..!”

घरामागील उंचवट्यावरून पांढऱ्या रंगाचं आदिवासी पध्दतीचं मुंडासं घातलेलं एक डोकं हळूच दगडी भिंतीबाहेर डोकावलं. लांबवरून बराच वेळ रमेशला निरखून पाहिल्यानंतर मग कुठे त्या मुंडासंवाल्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर ओळख पटल्याचं हास्य उमटलं. लगबगीनं धावतच येऊन त्यानं कुंपणाचं लाकडी फळ्यांचं फाटक उघडलं.venkanna

“आत या साहेब..” तो तेलगू भाषेत म्हणाला.

सफेद धोतर आणि खादीची बिन बाह्यांची बंडी घातलेला वेंकन्ना एक मध्यम उंचीचा किरकोळ शरीरयष्टी असलेला सामान्य शेतकरी वाटत होता. आम्ही त्याच्या घरात गेलो. बैठकीच्या खोलीत असलेल्या लाकडी सोफ्यावर बसायला सांगून त्यानं आम्हाला पिण्यासाठी आंतून तांब्याभर पाणी आणून दिलं.

“हे बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर.. महाराष्ट्रातून आले आहेत. यांना तेलगू भाषा येत नाही..”

रमेशने वेंकन्नाला तेलगूतून माझा थोडक्यात परिचय करून दिला.

“पर्वा लेदू.. ! (हरकत नाही..No problem.)” वेंकन्ना म्हणाला.. “हमको थोडा थोडा हिंदी भी आता है..”

त्यानंतर हिंदीतूनच आमच्या गप्पा सुरु झाल्या.

रमेशनं सांगितलं की वेंकन्ना हा पुलीमडगु गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असून गेली अनेक वर्षे तो गावचा सरपंच देखील आहे. पोलीस, फॉरेस्ट खातं, ITDA, मंडल परिषद अशा सर्व सरकारी खात्यांमध्येही त्याचं चांगलंच वजन आहे. सध्या त्याचं स्वतःचंच कर्ज खातं थोडं थकीत असलं तरी एरव्ही मात्र तो बँकेला कर्जवसुलीत खूप सहकार्य करतो.

रमेशचं असं बोलणं चालू असतानाच तिथल्या लाकडी अलमारीतून पाच हजार रुपये काढून ते मला देत वेंकन्ना म्हणाला..

“कालच आदीलाबादचे व्यापारी इथल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनीच दिलेले हे पैसे माझ्या कर्ज खात्यात जमा करून घ्या. आणि, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. गावातील सर्वच शेतकऱ्यांकडे मक्याचे पैसे आलेले आहेत. तुम्ही मला इथल्या थकबाकीदारांची नावं सांगा. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाता येईल..”

त्यानंतर वेंकन्नाला घेऊन आम्ही गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडे गेलो. वेंकन्नाचा गावात खूप मान आणि दरारा होता. ईरन्ना, भीमन्ना, सोमू, राजय्या, नरसय्या, लच्छन्ना अशा गावातील बऱ्याच थकीत कर्जदारांकडून त्या दिवशी भरपूर कर्ज वसुली झाली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वेंकन्ना आम्हाला पुन्हा त्याच्या घरी घेऊन गेला. मुलांच्या शिक्षणासाठी वेंकन्नाची पत्नी तिच्या माहेरी करीमनगर इथं रहात असल्याने वेंकन्ना त्या घरात एकटाच रहात होता. त्याने बनवलेला चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्याच्या घरामागील आमराई व फळबाग पहात हिंडत होतो.

वेंकन्नाचे घर गावापासून थोडे दूर एका टोकाला होते. त्याच्या घरामागील चिंच, आवळा, आंबा आणि मोहाची काही झाडे सोडली तर तिथूनच गर्द सागवृक्षांचे जंगल सुरू होत होते. घराला तिन्ही बाजूंनी बांबू व काट्यांचे उंच, भक्कम कुंपण असले तरी या मागील भागाला मात्र कुंपण नव्हते.

जंगलकडील या बाजूस एक पाच फूट उंचीचा आकर्षक नैसर्गिक उंचवटा होता आणि तिथूनच खोल जंगलात जाण्यासाठी एक पायवाट सुद्धा होती. मी त्या उंचवट्याला पाठ टेकून उभा राहिलो. माझं फक्त डोकंच त्या खांद्याएवढ्या उंच उंचवट्याच्या वरती होतं. सहज मान मागे वळवून पाहिलं तर तिथून ती जंगलात जाणारी रहस्यमय पायवाट अगदी जवळच दिसत होती. मला तसं उभं राहिलेला पाहून वेंकन्ना घाबरून मोठ्याने ओरडला..

“साब, उधर वैसा खड़े मत रहो.. इधर आ जाओ.. वहां खतरा है..!”

मी बुचकळ्यातच पडलो. खतऱ्या सारखं तर तिथं काहीच दिसत नव्हतं. मी अवतीभवती काळजीपूर्वक आणि शोधक नजरेने नीट निरखून पाहिलं. माझ्या पाठीमागे खांद्यापर्यंत तर तो नैसर्गिक उंचवटाच होता. आजूबाजूला आंब्याची, चिंचेची झाडं होती. जवळपास कुठेही विहीर, तलाव, दलदल, मधमाशांचं पोळं किंवा खोल दरी सुद्धा नव्हती. हां, मागे जंगल होतं खरं.. पण ते तिथून तीस चाळीस फुटांवरून सुरू होत होतं.

“आप पहले इधर आ जाओ..! फिर समझाता हूँ आपको..!”

वेंकन्नाने पुन्हा ओरडून मला खाली बोलावल्यावर अनिच्छेनेच त्या उंचवट्या पासून दूर होत मी त्याच्याकडे गेलो.

“दो साल पहले सूर्यकुमार बाबू उस टीले के पास ठीक उसी तरह खड़े थे, जैसे अभी अभी आप खड़े थे..”

वेंकन्ना गंभीर स्वरात म्हणाला.

“सूर्यकुमार..? कौन सूर्यकुमार ?”

मी विचारलं. तेंव्हा रमेशनं सांगितलं की सूर्यकुमार हा उतनूरच्या सरस्वती ग्रामीण बँकेचा एक तडफदार, धाडसी फिल्ड ऑफिसर होता. पूर्वी पुलीमडगु गाव ग्रामीण बँकेकडे दत्तक असल्याने कर्जमंजुरी पूर्वक निरीक्षण (Pre-sanction inspection) तसेच कर्जवसुली साठी सूर्यकुमार नेहमीच या गावात येत असे. तसंच तो निसर्गप्रेमी असल्याने जंगलात भटकणं त्याला खूप आवडत असे. पुलीमडगु लगतच्या जंगलातही तो बरेचदा फिरायला जात असे.

एकदा असाच नियमित कर्जवसुलीसाठी पुलीमडगु गावात आला असता याच उंचवट्याला पाठ टेकून तो उभा असतांनाच एका प्रचंड मोठ्या वाघाने अचानक पाठीमागून येऊन त्याचं डोकंच धरलं आणि तसाच फरफटत त्याला जंगलात घेऊन गेला. दोन दिवसांनी जागोजागी लचके तोडलेलं त्याचं शिरविरहीत धड खोल जंगलातील एका तलावाजवळ आढळून आलं.

रमेशनं असंही सांगितलं की त्या घटनेनंतर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुलीमडगु गावात जाण्यास नकार दिला आणि जिल्हा अग्रणी बँकेकडे हे गाव अन्य बँकेकडे दत्तक देण्याची विनंती केली. अशा तऱ्हेने हे गाव आमच्या स्टेट बँकेकडे दत्तक आले होते.

हकनाक बळी पडलेल्या सूर्यकुमार बाबूची हकीकत ऎकल्यावरही रमेश आणि वेंकन्नाच्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता बाजूच्या उतारावरून मी त्या उंचवट्यावर चढलो. मागील पन्नास साठ फुटांच्या त्या जागेला कसलेही कुंपण नव्हते. त्यातील जंगलात जाणारा आठ दहा फुटांचा रस्ता सोडला तर बाकी सगळीकडे जाडजूड बुंध्याचे एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेले उंच, दाट साग वृक्ष होते. तिथून कोणत्याही प्राण्याला आत येणे खूप अवघड होते. हे निरीक्षण करून मी खाली उतरलो.

तेलगू भाषेत वाघाला जसं “व्याघ्रम” म्हणतात तसंच “पुली” असंही म्हणतात. आपल्याकडे वाघलगाव, वाघोली, वाघदरा, वाघजाई (जाळी) या नावाची जशी गावं असतात तसंच हे “पुलीमडगु”. यातील “पुली” म्हणजे वाघ आणि “मडगु” म्हणजे गाव, असंच मी समजत होतो.

मात्र काही दिवसांनी तेलगू भाषेत “मडगु” शब्दाचा अर्थ “तलाव” (lake) असा होतो, अशी ज्ञानात भर पडली. त्यावरून “वाघ जिथे पाणी प्यायला येतो तो तलाव” म्हणजे “पुलीमडगु” (मराठीत वाघतळं) असा योग्य अर्थ मी लावला. त्यानुसार त्या गावाच्या जवळपास कुठेतरी पाण्याचा तलाव आहे का याबद्दल चौकशी केली असता वेंकन्नाच्या घरामागील जंगलात एक किलोमीटर अंतरावर तसं एक मोठं तळं असल्याचीही माहिती मिळाली.

गुढी हतनूर ते उतनूर या मार्गावरील धानोरा, केसलापूर, इंद्रवेली, आंधळी, दसनापूर, खंडाळा, उमरी, शामपुर, नागापूर अशी जवळ जवळ सर्वच गावांची नावं जरी ओळखीची आणि मराठी वळणाची वाटत असली तरी प्रत्यक्षात त्या गावांत कुणालाही मराठी भाषा येत नाही. इंग्रजांपूर्वी आदिवासी गोंड राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या या भूभागात प्रामुख्याने गोंड, कोलम, चेंचू, गडाबा, बैगा आणि मुंडा ह्या आदिम आदिवासी प्रजातीच्याच लोकांची वस्ती आहे. खोल जंगलात, डोंगरकपारीच्या आणि दऱ्या खोऱ्यांच्या आश्रयाने राहणारे हे आदिवासी क्वचितच रस्त्याकडे फिरकतात. पराकोटीचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुपोषण यांनी ग्रासलेला हा भूमिपुत्रांचा समाज अतिशय भोळा आणि अल्पसंतुष्ट आहे.

पोटापुरतंच धान्य पिकवावं, लाज झाकण्या पुरतंच वस्त्र ल्यावं, तेल, मीठ, मिरचीच्या खर्चापुरता जंगलातून मध, डिंक गोळा करावा आणि कवडीमोल भावानं तो स्थानिक व्यापाऱ्यांना विकावा, मोहाची फुलं गोळा करून त्याची चविष्ट दारू तयार करावी, टोकदार बांबूचे भाले, गावठी धनुष्यबाण आणि पाळलेल्या अजस्त्र रानटी कुत्र्यांच्या मदतीने हरीण, ससे, रानडुक्कर यांची शिकार करावी, रात्री आगीवर ही शिकार भाजावी आणि मोहाची दारू प्राशन करून चांदण्या रात्री डफाच्या साथीवर शेकोटी भोवती फेर धरून नृत्य करीत मस्तीत जगावं असा त्या भाबड्या आदिवासींचा नित्य जीवनक्रम होता.

काही आदिवासी विडी उद्योगासाठी लागणारा तेंदू पत्ता गोळा करून तो नागपूर, नांदेड, निझामाबाद, जालना येथून येणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना विकत असत. वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याच साथीने उच्च प्रतीचे अस्सल सागवानी तसेच शिसवी व चंदनाचे लाकूड यांचीही चोरटी वाहतूक काही आदिवासी अत्यल्प मोबदल्यात करीत असत. या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षित व्हावे, त्यांचे जीवनमान उंचावून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे जे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जात त्याचा बहुतांश हिस्सा राजकीय नेते, सरकारी नोकरशहा आणि स्थानिक व्यापारी परस्परांच्या संगनमताने गिळंकृत करून टाकीत असत.

आदिवासींचा कष्टाचा आणि हक्काचा पैसा लुबाडून व्यापारी, पुढारी आणि सरकारी बगल बच्चे गब्बर होत चालले होते. आदिवासींना या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांना प्रस्थापितां विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारी नक्षलवाद्यांची माओवादी हिंसक विचारसरणी या संपूर्ण परिसरात चांगलीच फोफावली होती.

रस्ते, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन अशा दळण वळण आणि संदेश वहन सुलभ करणाऱ्या सरकारी खात्यांना या नक्षली लोकांचा तीव्र विरोध होता. या सोयींमुळेच आदिवासींची पिळवणूक करणारे भांडवलदार व्यापारी त्यांच्या पर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांना लुबाडतात अशी नक्षली विचारसरणी होती. तसेच पोलिस या भांडवलदारांना, प्रस्थापितांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवितात म्हणून पोलिसांशीही त्यांचे वैर होते.

नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळावी म्हणून ज्याप्रमाणे पोलिसांनी सामान्य आदिवासी जनतेत आपले खबरे पेरून ठेवले होते, अगदी तसेच नक्षलवाद्यांनी देखील प्रत्येक गावात आपले गुप्तहेर नेमलेले होते. या खबऱ्यांना व गुप्तहेरांना पोलिसांकडून तसंच नक्षलवाद्यांकडून भरपूर पैसा पुरविला जात असे.

काही चलाख, अतिधूर्त, संधीसाधू आदिवासी हे आपला जीव धोक्यात घालून, एकाच वेळी पोलिस व नक्षली, ह्या दोघांचेही विश्वासू खबरे म्हणून काम करीत आणि अशारितीने दोन्हीकडून भरपूर पैसा मिळवीत असत.

पुलीमडगु गावाचा प्रधान उर्फ सरपंच वेंकन्ना हाही असाच एक डबल एजंट होता.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्य कुमार बाबू याला वाघानं ओढून नेण्यापूर्वी आणि नंतरही गावातील काही दुर्दैवी गावकऱ्यांना ओढून नेऊन वाघानं त्यांचा बळी घेतला होता. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासठी गावात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वाघाच्या प्राणघातक हल्ल्याची शिकार व्हावं लागलं होतं. वाघाच्या दहशतीमुळे पुलीमडगु गावातील शाळेत शिक्षक येईनासे झाल्यामुळे ती शाळाही कायमचीच बंद पडली होती.

पुलीमडगुला मी जेंव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा वेंकन्नाच्या घरामागील पन्नास साठ फुटांच्या जंगला कडील भागाला जर काटेरी तारांचे उंच कुंपण घातले तर वाघाचे गावात येणे कायमचे बंद होईल असे मला वाटले. त्यामुळे मी वेंकन्नाला तसे सुचवतांच “त्यासाठी खूप मोठा खर्च येईल..” असे तो म्हणाला.

योगायोगाने त्याचवेळी आमच्या उतनूर स्टेट बॅंके भोवतीचे तारेचे जुने कुंपण काढून टाकून त्याजागी नवीन पक्क्या विटांचे कंपाउंड बांधण्याचे काम सुरू होते. काढून टाकलेल्या जुन्या गंजलेल्या लोखंडी काटेरी तारांचा भला मोठा ढिगारा बँकेमागे पडला होता. मॅनेजर साहेबांची परवानगी घेऊन मी त्या जुन्या तारा वेंकन्नाला देण्याची व्यवस्था केली. वेंकन्नाही मोठ्या आनंदाने त्या तारा आपल्या बैलगाडीत टाकून घरी घेऊन गेला.

त्या नंतर काही दिवसांनी पुन्हा पुलीमडगु गावात गेलो असता वेंकन्नाच्या घरामागील भागाला काटेरी तारांचे उंच कुंपण घातलेले पाहून समाधान वाटले. त्या जंगलात जाणाऱ्या पायवाटेला तर काटेरी तारे सोबतच जाडजूड लाकडी फळ्याही लावून मजबूत तटबंदी केली असल्याने तो वाघाच्या येण्याजाण्याचा मार्ग तर आता दृष्टीसही पडत नव्ह्ता.

त्यानंतर बरेच दिवस पुलीमडगु गावात वाघाच्या हल्ल्याची एकही घटना घडली नाही. वाघाची भीती नाहीशी झाल्यामुळे कामानिमित्त गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ वाढली होती. बंद पडलेली गावातील शाळा ही आता पूर्ववत सुरू झाली होती. मात्र आजकाल गावात सशस्त्र नक्षलवादी कमांडर उर्फ “अन्ना”, सर्रास उघडपणे वावरत असल्याची कुजबुजही आसपासच्या गावातील लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत असे.

एकदा सकाळी सहा वाजता बँकेच्या कामानिमित्त प्युन रमेशला सोबत घेऊन उतनूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शामपुर गावात कर्जवसुली संदर्भात एक बड्या कस्टमरला भेटण्यासाठी गेलो होतो. सुदैवाने आदीलाबादला निघालेला तो शामपुरचा कस्टमर त्याच्या घरा समोरच भेटला आणि आम्हाला पाहतांच ताबडतोब घरात जाऊन त्याने आपला कर्ज परतफेडीचा हप्ता सुद्धा आम्हाला आणून दिला.

मी घड्याळात पाहिलं तर त्यावेळी सकाळचे फक्त पावणे सातच वाजले होते. शामपुर गावात आता अन्य कोणतंही काम उरल नव्हतं. इथून पुलीमडगु गाव फक्त पाच किलोमीटर दूर होतं. त्यामुळे त्या गावात जाऊन वेंकन्नाला सहजच भेटून यावं असं ठरवलं.

तेलंगाणा, आंध्र प्रदेश मध्ये मुख्य रस्त्याला जिथे एक किंवा अनेक फाटे फुटतात, त्या ठिकाणाला (मग ती चौफुली असो वा टी पॉईंट), एक्स- रोड (X-Road) असे म्हणतात. पुलीमडगु गावाकडे जाणाऱ्या एक्स-रोड वरील एका छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. हॉटेलातील डुगडुगणाऱ्या बाकड्यावर बसून आम्ही चहा घेत असतानाच रमेशने सहज मागे बघितलं आणि तो एकदम दचकला. माझा हात गच्च दाबून धरत तो हलकेच कुजबुजला..

“साब, पिछे अन्ना लोग बैठे है..! झटसे पलटकर पिछे मत देखो.. उनको डाउट आएगा.. आयडियासे, धीरे धीरे देखो..”utnoor

रमेशने एवढं जतावून सांगितलं तरी “अन्ना” मंडळींना पाहण्याची माझी उत्सुकता एव्हढी जबरदस्त होती की उतावीळपणे झटकन मान मागे वळवून मी त्यांच्याकडे बघितलंच. मागील टेबलावर आर्मी सारख्या हिरव्या रंगाचा, जाड कापडाचा पॅन्ट शर्ट घातलेले अत्यंत बेफिकीर चेहऱ्याचे, रापलेल्या काळ्या रंगाचे दोन तरुण चहा पित पित आपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या डोक्यावर खाणीतील कामगार वापरतात तशी काळपट हिरव्या रंगाची मेटलची गोल कॅप होती. कमरेला कापडी बेल्ट व पायात मिलीटरीचे जाडजूड भक्कम बूट घातलेल्या त्या दोघांनीही भरीव, झुपकेदार मिशा ठेवल्या होत्या.

ते दोघेही गप्पांत एवढे गुंगले होते की त्यांना आसपासचं भानच नव्हतं. अर्थात त्यामुळे त्यांचं अगदी जवळून आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची आयती संधीच मला मिळाली. दोघांच्याही पाठीवर सॅक सारखी थैली बांधलेली असावी, कारण बाहेरून त्या सॅकचे खांद्यावरील पट्टे दिसत होते. त्यांच्या शर्ट पॅन्टला वरपासून खालपर्यंत भरपूर खिसे होते. एका “अन्ना” ने आपली लांब नळीची रायफल बाकड्याला टेकवून उभी केलेली होती तर दुसऱ्याच्या खांद्याला आखूड नळीची ऑटो लोडेड कार्बाईन गन लटकत होती. नंतर रमेशने सांगितले की, त्यांच्या पाठीवरील थैलीत तसेच शर्ट पॅन्टच्या मोठमोठया फुगीर खिशात वॉकी टॉकी, ट्रान्समिटर सेट, काडतुसे, हँड ग्रेनेड्स व डायनामाईटच्या कांड्या ठेवलेल्या असतात.

चहा पिऊन ते दोघे “अन्ना” काउंटरच्या दिशेने गेले. खांद्याला कार्बाईन गन लटकवलेला अन्ना हॉटेल मालकाला चहाचे पैसे देत असतानाच दुसरा अन्ना आपली जड रायफल घेऊन तिथे आला. त्याच्या दुसऱ्या हातात पांढऱ्या कापडाचं एक छोटंसं गाठोडं होतं. गोल आकाराच्या त्या गाठोड्यातून लाल रक्त बाहेर टपकत होतं. हॉटेल मालकानं त्या गाठोड्याकडे पहात विचारलं..

“काय आहे त्याच्यात..?”

डोळे बारीक करून, गंभीर, खुनशी स्वरात तो अन्ना म्हणाला..

“मुंडकं..!”

त्याचं हे उत्तर ऐकून हॉटेलमधील आम्हा सर्वांच्याच अंगावर भीतीने सरकन काटाच आला. तो हॉटेल मालकही घाबरून थोडासा चरकला. कुठून आपण ही नसती चौकधी केली, असं त्याला वाटलं. थरथर कापतंच त्यानं गळ्यात दाटून आलेला आवंढा कसाबसा गिळला. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून एकदम गडगडाटी विकट हास्य करीत तो अन्ना म्हणाला..

“अरे ! ऐसे डरो नहीं..!”

आणि मग ते रक्त टपकणारं गाठोडं उंच करून हॉटेल मालकाच्या डोळ्यांपुढे नाचवीत तो म्हणाला..

“माणसाचं नाही, बकऱ्याचं मुंडकं आहे ह्याच्यात..! काल आमच्या “क्रांती दलम्” चे एरिया कमांडर आले होते पुलीमडगु कॅम्प मध्ये.. त्यांच्यासाठी कापलं होतं हे बकरं..!”

असं म्हणून पुन्हा दणदणीत राक्षसी हास्य करीत हॉटेलच्या बाहेर पडून ते आपल्या मोटर सायकलवर स्वार झाले आणि नागापूर जंगलाच्या दिशेने निघून गेले.

अशारितीने अन्ना लोकांचं पहिलं वहिलं दर्शन मला झालं होतं. रमेशने सांगितलं की, पोलिसां कडून त्वरित ओळखलं जाण्याची भीती असल्याने हे अन्ना लोक असा युनिफॉर्म घालून व शस्त्रं घेऊन कधीही एकट्या दुकट्याने जंगला बाहेर पडत नाहीत. ते नेहमी सामान्य वेशांतच जनतेत वावरतात. कधी कधी नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याची बनावट तक्रार घेऊन ते चक्क पोलीस ठाण्यातही जातात आणि पोलिसांच्या तयारीचा व पुढील हालचालींचा अंदाज घेतात.

काही काळ थांबलेला पुलीमडगु गावातील वाघाचा जीवघेणा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला होता. दोन गावकरी व तीन पोलिसांचे शीर धडावेगळं केलेले क्षतविक्षत देह तेथील जंगलात आढळून आले होते. जनतेच्या वाढत्या आक्रोशामुळे पत्रकारांनी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणी कसून पाठपुरावा केल्याने पोलिसांनी नक्षल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेंकन्ना जरी पोलिसांचा खबऱ्या असला तरी नक्षल्यांनाही तोच आश्रय देतो व पोलिसांबद्दल बित्तंबातमी पुरवून त्यांना मदतही करतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे वेंकन्नाला अटक करून पोलिसांनी त्याची रवानगी लॉकअप मध्ये केली होती.

लवकरच जादा कुमक मागवून पोलिसांनी पुलीमडगु जंगल परिसरात व्यापक सर्च कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं. नक्षलवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त करण्यात आले. त्या दरम्यान झालेल्या चकमकींत काही नक्षली ठार झाले तर बरेचसे पकडलेही गेले. उरलेले नक्षलवादी छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातील दाट जंगलात पळून गेले.

पोलिसांनी वेंकन्नाच्या घराची कसून झडती घेतली तेंव्हा त्याच्या घरात जमिनीखाली पुरलेला दारुगोळा, शस्त्रे, माओवादी क्रांतिकारी साहित्य व छुपा ट्रान्समिटर आढळून आला. अनेक कुख्यात नक्षली कमांडर्स सोबत असलेले त्याचे फोटोही पोलिसांना सापडले. त्यावरून वेंकन्ना हा जुना, प्रशिक्षित व हार्ड कोअर नक्षली असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. मात्र त्यानंतर अल्पावधीतच नक्षलींसाठीच्या सरकारी “आत्मसमर्पण योजने”त सहभागी होऊन धूर्त वेंकन्नाने नाममात्र शिक्षा भोगून आपली सुटका करून घेतली.

पुलीमडगु गावातील काही कस्टमर एकदा उतनूरला बँकेत आले असता त्यांनी सांगितलं की ज्या ज्या पोलिसांना व गावकऱ्यांना वेंकन्ना बद्दल संशय येत असे त्यांना नक्षल्यांच्या मदतीने वेंकन्ना यमसदनाला पाठवीत असे आणि वाघाने ओढून नेले असा कांगावा करीत असे. प्रत्यक्षात वेंकन्ना व्यतिरिक्त अन्य कुणीही त्या वाघाला आपल्या डोळ्यांनी कधी पाहिलं नव्हतं.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्यकुमारला जंगलात फिरण्याचा छंद होता. असंच फिरत असताना एकदा त्याने पुलीमडगुच्या जंगलातील नक्षल्यांचा तळ पहिला आणि त्या तळावर वेंकन्नाला नक्षल्यांशी हास्यविनोद करतानाही पाहिलं. ही गोष्ट त्याने काही गावकऱ्यांच्याही कानावर घातली. वेंकन्नाला हे समजताच आपले बिंग फुटू नये म्हणून नक्षल्यांकरवी बिचाऱ्या सुर्यकुमारचा त्याने हकनाक बळी घेतला.

पुलीमडगुच्या गावकऱ्यांच्या तोंडून हे वास्तव ऐकताच स्वार्थी, दुष्ट वेंकन्ना बद्दल आम्हा सर्वांच्या मनात तीव्र चीड, तिरस्कार व घृणा निर्माण झाली.

त्या गावकऱ्यांनी अशीही माहिती पुरवली की, वेंकन्नाने घरामागील जंगलाकडे जाणाऱ्या वाटेला फळ्या व काटेरी तारांचे जे कुंपण लावले होते तेही प्रत्यक्षात फसवेच होते. सहजपणे हातांनी उचलून तो कुंपणाचा भाग बाजूला ठेवता येत असे. वेंकन्ना रोज रात्री ते कुंपण बाजूला करून नक्षल्यांसाठी जंगलचा रस्ता खुला करून ठेवत असे.

पुलीमडगु भागातील नक्षल्यांचा तात्पुरता बिमोड झाला असला तरी जीवावर उदार झालेले, झुंजार व अतिशय चिवट नक्षली असे सहजासहजी हार मानणारे नव्हते. आत्मसमर्पण केलेल्या वेंकन्नावर तर त्यांचा विशेष राग होता. वेंकन्नाने पोलिसांना पुरवलेल्या अचूक माहितीमुळेच त्या भागातील नक्षल्यांचे मजबूत जाळे पोलीस एवढ्या सहजपणे उध्वस्त करू शकले, असा त्यांचा संशय होता.

“विश्वासघातकी वेंकन्नाला लवकरच गद्दारीची सजा दिली जाईल..” अशा आशयाच्या ठळक लाल अक्षरातील घोषणा लवकरच पुलीमडगुच्या घराघरांवर लिहिलेल्या दिसू लागल्या. नक्षलवादी त्या भागात पुन्हा सक्रिय होऊ लागल्याचीच ती चिन्हे होती.

घाबरलेल्या वेंकन्नाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. वेंकन्नाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुलीमडगु गावात एक पर्मनंट चौकीच स्थापित केली.

एके दिवशी नक्षल्यांनी हँड ग्रेनेड्सचा तुफान मारा करून वेंकन्नाचे घर उध्वस्त करून टाकले. सुदैवाने वेंकन्ना त्यावेळी गावातील पोलीस चौकीतच बसला असल्याने त्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. मात्र आता तो सावध झाला. पुलीमडगु गाव कायमचे सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. गावातील आपली जमीन व राहते घर येईल त्या किमतीला त्याने विकून टाकले. तसंच आमच्या बँकेत येऊन आपल्या बचत खात्यातील सर्व पैसे काढून घेऊन त्याने खाते बंद केले.

“आजच दुपारी पोलीस बंदोबस्तात करीम नगरला कायम वास्तव्यासाठी जाणार आहे..”

असेही आमचा निरोप घेताना तो म्हणाला.

उतनूर-करीमनगर रोड वरील निर्मल- मंचेरियाल बॉर्डर जवळील इंधनपल्ली फाट्यापर्यंत पोलीसांनी वेंकन्नाला आपल्या जीपने सोडले. वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ त्याला घेण्यासाठी इंधनपल्ली पर्यंत आले होते. पोलिसांचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबियांसह वेंकन्ना करीमनगरला जाणाऱ्या बसमध्ये बसला.

त्याच दिवशी संध्याकाळी वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ आक्रोश करीत उतनूर पोलीस स्टेशन मध्ये आली. इंधनपल्लीहून थोडं पुढे जाताच सशस्त्र नक्षलवाद्यांनी बस अडवून वेंकन्नाला जबरदस्तीने खाली उतरवून घेतल्याचे ते सांगत होते. पोलिसांनी ताबडतोब इंधनपल्लीच्या ग्रे-हाउंड (Greyhound) नावाच्या नक्षल विरोधी स्पेशल टास्क फोर्सशी संपर्क साधून त्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली आणि वेंकन्नाचा तांतडीने शोध घेण्यास सांगितले.

त्यानंतर दोन दिवस वेंकन्नाचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

1873124 death

तिसऱ्या दिवशी वेंकन्नाचा छिन्नविच्छिन्न, रक्तबंबाळ, शीर विरहित देह पुलीमडगु गावातील त्याच्या उध्वस्त घरावर फेकून दिलेला आढळून आला..

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Sunita Williams return to earth- Watch Live

sunita williams-1

Sunita Williams to return to earth tomorrow morning at 3.27 a.m.I.S.T

sunita-3

 

 

 

Sunita Williams return to earth- Watch Live

Astronauts Sunita Williams and Butch Wilmore, who were stuck at the International Space Station (ISS) for more than nine months, began their return journey on Tuesday morning. According to NASA, Williams and Wilmore undocked from the ISS at 10:35 am IST and set on a 17-hour trip back to Earth.sunita-4

The spacecraft, Elon Musk-led SpaceX’s Dragon, will splash down off the coast of the American state of Florida around 3:27 am IST Wednesday.

The two astronauts flew to the orbital lab in June last year, on what was supposed to be a days-long roundtrip to test Boeing’s Starliner on its first crewed flight. The spaceship, however, developed propulsion problems and was deemed unfit to fly them back and instead returned empty.

Watch her return to earth LIVE by clicking on the link below.

Sunita Williams Return Live: Sunita Williams, Butch Wilmore will be carried on stretchers after reaching Earth

Nasa astronauts Sunita Williams, Butch Wilmore, Nick Hague are expected to reach earth on March 19; the splashdown is expected at 3.27am as per Indian Standard Time. Fans and followers of the astronauts who have been praying for their safe return are worried about their health, especially how they will adjust to the earth’s gravitational force.

One of the biggest challenges astronauts face is the inability to walk on earth. Many astronauts struggle to stand or move normally, often requiring assistance. This phenomenon is primarily due to the effects of microgravity on the human body. As soon as they reach Earth, they are carried on stretchers.

“A lot of them don’t want to be brought out on a stretcher, but they’re told they have to be,” John DeWitt, director of applied sports science at Rice University in Texas and a former senior scientist at Nasa’s Johnson Space Center told Live Science. He has developed methods to improve astronaut health during spaceflight.

Primarily for this reason, astronauts are typically rolled out on a stretcher after their landing as a precautionary measure, DeWitt said.

Another factor that explains why astronauts find it difficult to walk, is fluid redistribution. In space, blood and fluids shift toward the upper body. Upon returning to Earth, astronauts may experience dizziness or fainting due to a sudden drop in blood pressure when standing up. This is because the body needs time to recondition its ability to regulate blood flow under Earth’s gravity.