https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-15 एका बँकरचे थरारक अनुभव-15

police official

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 15)

विवादित चेकवरील सही बनावट असल्या बद्दलचा CFSL संस्थेचा अहवाल मी क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिला तसेच ॲड. ऋतुराज यांनाही त्याची माहिती दिली. ते म्हणाले..

cfsl-1

cheque

“या बद्दल सध्या कुठेही वाच्यता करू नका.. हा बँकेचा अंतर्गत चौकशी संबंधी अहवाल आहे आणि बँकेलाच तिच्या नियमावली व कार्यपद्धती नुसार त्यावर यथावकाश निर्णय घेऊ द्यात. चुकून जर सुखदेवला या अहवाला बद्दल समजलं तर तो क्षणभरही थांबायला तयार होणार नाही आणि पुन्हा पेपरबाजी वगैरे करून बँकेवर दडपण आणून बँकेला तडकाफडकी नुकसान भरपाई देण्यास भाग पाडेल.”

सुदैवाने ग्राहक मंचाची पुढची तारीख दोन महिने नंतरची होती. पोलिसांनी पुण्यास पाठविलेल्या चेक वरील सहीचा हस्ताक्षर तपासणी अहवाल जर त्यांना या दरम्यान प्राप्त झाला असता तर मात्र सुखदेव पासून ही बातमी जास्त काळ लपून राहिली नसती. त्यामुळे हाती पडलेल्या हस्ताक्षर तपासणी अहवालावर बँकेने शीघ्रतेने निर्णय घ्यावा अशी मी क्षेत्रीय कार्यालयाला विनंती केली.

याच दरम्यान दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वैजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख इन्स्पेक्टर माळी यांची बदली पैठण इथे झाली. तसेच सब. इंस्पे. हिवाळे यांची देखील स्थानिक गुन्हे शाखा (LCB) औरंगाबाद इथे बदली झाली. या दोन्ही बदल्या Complaint Basis वरच झाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे रविशंकरची बदली बीड जिल्ह्यातील “मादळमोही” इथे झाली होती. त्या आडमार्गावरील गावातून आईच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी मुंबईला जाणे अवघड असल्यामुळे ही बदली रद्द करून महामार्गा जवळील ठिकाणी व्हावी यासाठी त्याची धडपड सुरू झाली.

वैजापूर पोलीस ठाण्याचे नवीन फौजदार जगन राठोड हे एक अत्यंत उग्र, रासवट आणि उर्मट असं व्यक्तिमत्व होतं. आल्या आल्या त्यांनी सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाया करून सामान्य नागरिक व गुंड या दोघांवरही ही भीतीयुक्त जरब बसवून एक प्रकारची दहशतच निर्माण केली होती. रस्त्यावर बाचाबाची, किरकोळ भांडणे करणारे नागरिक, जादा पॅसेंजर बसवणारे रिक्षा चालक, मटका खेळणारे जुगारी तसेच नशेत तर्र असणारे दारुडे यांना निर्दयीपणे भर रस्त्यात अमानुष मारहाण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

बरेच दिवसांत सुखदेव बँकेकडे फिरकला नव्हता. मुंबईत लोकपाल कार्यालयात झालेली मानहानी व अपमान तो अद्याप विसरलेला नव्हता. “पैसे देऊन न्याय विकत घेऊन ज्याप्रमाणे मला रिझर्व्ह बँकेच्या शिपायांच्या हातून बखोटं धरून बाहेर काढलं होतं, अगदी त्याचप्रमाणे.. वाट्टेल तितका खर्च करीन पण एकदा तरी ह्या साहेबांची वैजापुरातून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही..” अशा वल्गना करीत संतापाने धुमसत तो बँकेसमोरून चकरा मारीत असतो असे कस्टमर्स कडून समजत असे.

अशातच एके दिवशी राजू चहावाला घाईघाईने बँकेत शिरला. माझ्या केबिनपाशी येताच दारातच थबकून तो उभा राहिला. काकुळत्या नजरेने माझ्याकडे पहात तो म्हणाला..

sanju chaywala

“आत येण्याची मला मनाई केली आहे तुम्ही.. ठाऊक आहे मला..! पण राहवलं नाही, जीवाला चैनच पडेना म्हणून आलो साहेब तुमच्याकडे.. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा.. फक्त पाचच मिनिटं माझं बोलणं ऐकून घ्या..”

त्याच्या डोळ्यातील करुण भाव आणि अजिजीचा स्वर यामुळे मी विरघळलो.. हातानेच त्याला आत येण्याची खूण केली. तो आत येऊन बोलणं सुरू करणार, एवढ्यात त्याला थांबवून मी म्हणालो..

“पण हे बघ.. ! पोलीस स्टेशनची कोणतीही बातमी किंवा निरोप तू मला सांगायचा नाहीस..”

यावर काही न बोलता माझ्याकडे पहात दोन क्षण तो तसाच गप्प उभा राहिला. मग खाली मान घालून म्हणाला..

“आता साहेब.. दिवसभर मी पोलीस स्टेशन मधेच असतो, तेंव्हा बातमीही तिथलीच असणार.. पण मी फक्त तुम्हाला सावध करायला आलोय.. मी तिथे जे ऐकलं, जे पाहिलं तेच मी तुम्हाला सांगतोय.. तुम्ही नीट ऐकून घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा..”

“ठीक आहे.. सांग पटकन..!”

त्याला लवकर कटवण्यासाठी मी म्हणालो.

“तो सुखदेव गेले चार दिवस रोज ठाण्यात येतोय. बँकेच्या स्टाफला काहीही करून त्रास देऊन परेशान करा अशी नवीन फौजदार साहेबांना तो सतत विनंती करतोय. त्यांना गळंच घालतोय म्हणा ना ? फौजदार साहेब आधी त्याचं काही ऐकायलाच तयार नव्हते. पण ते खूप लोभी असल्यामुळे सुखदेवने जेंव्हा त्यांना पैशांची लालूच दाखवली तेंव्हा कुठे ते तयार झाले. एक दोन दिवसांत साऱ्या आरोपींना ठाण्यात बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतो असा त्यांनी शब्द दिलाय त्या सुखदेवला..”

इतकं बोलून क्षणभर थांबून राजू पुढे म्हणाला..

“साहेब, हे नवीन फौजदार खूप लालची आहेत. मारहाण करून दहशत पसरवून सर्वच अवैध धंदेवाल्यांचे हप्ते त्यांनी भरपूर वाढवून घेतले आहेत. शिवाय हप्ते घेऊनही वर पुन्हा कोणत्या धंदेवाल्यावर कधी धाड टाकतील याचाही काही नेम नाही. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा हा माणूस आहे. त्यामुळे त्याच्यापासून खूप सावध राहा.. बस ! एवढंच सांगायला आलो होतो मी..”

एवढं बोलून मागे वळून कुठेही न बघता वाऱ्याच्या वेगाने राजू निघून गेला.

पोलिसांनी केसचा तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) सुद्धा दाखल केलं असल्यामुळे त्यांचा आता आमच्या केसशी काहीही संबंध उरला नसल्याची वस्तुस्थिती मला माहित होती. शिवाय आम्ही पाचही जणांनी तसा अटकपूर्व जामीनही मिळवलाच होता. भित्र्या स्वभावाच्या राजूला असं इतरांना घाबरवून टाकण्याची सवयच आहे असं समजून मी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केलं. अशातच दोन चार दिवस निघून गेले आणि मी ही गोष्ट पार विसरून गेलो.

त्या दिवशी शनिवार होता. अर्धा दिवसच बँक असल्याने सर्वांना लवकर काम आटोपून घरी जाण्याची गडबड होती. चार साडेचार वाजेपर्यंत आपापलं काम संपवून अर्धा अधिक स्टाफ बँके बाहेरही पडला होता. येवल्याहून जाणं येणं करणारे रहीम चाचा घराकडे निघण्यापूर्वी मला “गुड बाय” करण्यासाठी केबिनमध्ये आले असतांनाच एक महिला पोलीस अधिकारी “आत येऊ का सर ?” असं अदबीने विचारून आत शिरली.

lady police officer

“मी, सब. इंस्पे. वर्षा महाले..! हिवाळे साहेबांच्या जागेवर आले आहे. एका अर्जंट कामाच्या संदर्भात फौजदार राठोड साहेबांनी चेक फ्रॉड केसच्या पाचही आरोपींना ताबडतोब ठाण्यात बोलावले असून तुम्हाला सोबत घेऊन येण्यासाठी मला इथे पाठविले आहे. तेंव्हा तुम्ही तुमची सर्व जण आपापली कामं लवकर आटोपून घ्या, आणि माझ्या सोबत चला. पाहिजे तर तोवर थांबते मी इथेच..”

आम्हाला ठाण्यात नेण्यासाठी नवीन लेडी सब. इंस्पे. स्वतःच बँकेत आल्यामुळे आता अन्य काही उपायच उरला नव्हता. “मुळीच घाबरू नका. पाहू या तरी हे नवीन आलेले फौजदार साहेब काय म्हणतात ते..” असा धीर देत सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी ठाण्यात गेलो.

आम्ही ठाणे प्रमुखांच्या दालनात शिरताच आम्हाला आपाद मस्तक न्याहाळीत आणि आपल्या टोकदार मिशांवर हात फिरवीत ते जगन राठोड नावाचे दणकट शरीरयष्टी, दमदार आवाज व रापलेला राकट चेहरा असलेले फौजदार म्हणाले..

“या ssss ! कैद्यांची हजेरी घेतोय सध्या मी.. तोपर्यंत तुम्ही या भिंतीला टेकून निमूटपणे एका रांगेत उभे रहा.. तुमच्याकडे मग नीट फुरसतीने बघतोच..!”

police-3

आम्हाला असं कोपऱ्यात उभं रहायला सांगून त्यांनी एकेका कैद्याला बोलावणं सुरू केलं. भीतीने गर्भगळीत झालेल्या एका मध्यम वयाच्या फाटक्या इसमाला धरून आणून त्याला फौजदार साहेबांच्या पुढ्यात उभं करीत तेथील हवालदार म्हणाले..

“साहेब, हा बद्रुद्दीन.. चार फटके खाल्ल्यावर, आतापर्यंत गावातून तीन सायकली चोरल्याचं कबूल केलंय ह्याने..”

“ठीक आहे, उद्या कोर्टात हजर करा ह्याला.. चल..! हात पुढे कर ..!”

फौजदार साहेबांनी असं दरडावताच त्या फाटक्या इसमाने थरथरतच आपला उजवा हात पुढे केला. टेबलावर ठेवलेला विशिष्ट आकाराचा, जेमतेम एक फूट लांबीचा चामड्याचा जाडजूड पट्टा हातात घेऊन फौजदार साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी सपकन तो त्याच्या तळहातावर मारला. प्रचंड वेदनेने त्या भुरट्या चोराचा चेहरा कसनुसा झाला. त्याच्या कळवळण्याकडे लक्ष न देता निष्ठुरपणे फौजदार म्हणाले..

“चल.. आता दुसरा हात पुढे कर !”

police beating

त्या चोराने घाबरून दुसरा हात पुढे करण्यास किंचित आढेवेढे घेतले तेंव्हा त्यांनी त्याच्या पायावरच त्या आखूड पट्ट्याने सपासप वार केले. शेवटी नाईलाजाने तो अघोरी मार चुकवण्यासाठी त्याने आपला दुसरा हात पुढे केला. फौजदार साहेबांनी यावेळी दात ओठ खाऊन त्या तळहातावर पट्ट्याने पहिल्यापेक्षाही जोरदार प्रहार केला. अतीव वेदनेपायी मारामुळे लालबुंद झालेला तो तळहात त्या सायकल चोराने आपल्या दोन्ही मांड्यांत घट्ट दाबून ठेवला. त्याला धक्का मारून बाजूला सारत फौजदार साहेबांनी पुढच्या कैद्यास बोलावले आणि त्यालाही तशीच अमानुष मारहाण केली. सलग अर्धा तास चाललेली ती कैद्यांची क्रूर, निर्दयी, माणुसकीशून्य मारझोड आम्ही धडधडत्या छातीने बघत होतो.

पोलीस कोठडीतील सर्व कैद्यांची ही यातना परेड आम्हाला घाबरवण्यासाठीच जाणून बुजून आमच्या समोर घेतली जात होती. तसंच आम्हाला बसायलाही न देता दीर्घकाळ तसंच उभं ठेवून आमचा हेतुपुरस्सर अपमानही केला जात होता. तरुण रविशंकर आणि सतरा वर्षे आर्मीत घालवलेला सैनी, हे दोघेही पोलिसांची ही थर्ड डिग्रीची पद्धत पाहून आतून हादरून गेले होते. हळव्या मनाचे रहीम चाचा आणि अल्लड, निरागस बेबी सुमित्रा हे दोघे तर भीतीने थरथरायलाच लागले होते. फौजदार साहेब मधूनच तिरप्या नजरेने आमच्याकडे पहात होते आणि आम्हा सर्वांचे भयचकित चेहरे पाहून हलकेच मिशीतल्या मिशीत हसत होते.

कैद्यांचे यातना सत्र संपल्यावर आमच्याकडे वळून ते म्हणाले..

“आमच्या असं कानावर आलं आहे की पोलिसांनी आमच्या कडून पैसे खाल्ले असं सांगून तुम्ही जनतेत पोलिसांची बदनामी करत आहात.. चार्जशीट दाखल झालं म्हणजे पोलिसांचा संबंध संपला, असं समजू नका. आम्ही चार्जशीट मध्ये कधीही आणि कितीही नवीन, खरी वा खोटी कलमं ॲड करू शकतो. त्याच्या तपासासाठी तुम्हाला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडीतही ठेवू शकतो. आणि.. आमचा तपास कसा असतो त्याची कल्पना यावी म्हणून आत्ताच एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला..”

हातातील लाकडी रूळ आमच्या दिशेने रोखत ते पुढे म्हणाले..

“आपण निर्दोष आहोत असं तुम्हाला कितीही वाटत असलं तरी आमच्या दृष्टीने तुम्हीच दोषी आणि आरोपी आहात. तसं नसतं तर आधीच्या फौजदार साहेबांना तुम्ही प्रत्येकी वीस वीस हजार रुपये दिलेच नसते. काय..? खरी आहे ना आमची माहिती ?”

फौजदार साहेबांनी दरडावून विचारलेल्या या प्रश्नावर रहीम चाचांनी घाबरून होकारार्थी मान डोलावली.

“आज आपली पहिलीच भेट होती म्हणून वॉर्निंग देऊन एवढ्यावरच सोडतोय. यापुढे जेंव्हा जेंव्हा पोलीस स्टेशनचं बोलावणं येईल तेंव्हा तेंव्हा वेळ न घालवता ताबडतोब इथे हजर व्हायचं. तसंच जसे पूर्वीचे फौजदार गेले तसेच त्यांना तुम्ही दिलेले पैसेही त्यांच्या बरोबरच गेले. आता तुम्हाला आम्हा नवीन आलेल्यांची सोय सुद्धा पहावी लागेल. तुम्ही तसे समजदार आहात.. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं असेलच.. जाऊ शकता तुम्ही आता.. !!”

काही न बोलता खाली मान घालून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर पडलो. आमच्या मागे लागलेली ही पोलिसांची साडेसाती काही केल्या संपत नव्हती.

फौजदार साहेबांनी केलेल्या दमदाटीमुळे धसका घेऊन हळव्या, कोवळ्या मनाची बेबी सुमित्रा आजारीच पडली. तर रहीम चाचांचा रक्तदाब वाढल्याने त्यांनाही येवल्यातील दवाखान्यात भरती करावे लागले. इथल्या रोजच्या टेन्शनला वैतागून सैनी पंधरा दिवसांची सुटी टाकून दिल्ली येथील आपल्या बायका पोरांना भेटायला निघून गेला.

पोलिसांच्या या त्रासापासून कायमची मुक्तता कशी करून घ्यावी याबद्दल अहोरात्र विचार करीत असतानाच एके दिवशी आपल्या गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी DySP संगीता मॅडम बँकेत आल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना फौजदार राठोड साहेबांनी स्टाफला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये बोलावून केलेल्या दमदाटी बद्दल सांगितलं. परिणामतः स्टाफच्या बिघडलेल्या मनःस्थिती बद्दलही त्यांना अवगत केलं. आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्याने आता थेट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) यांच्याकडेच दाद मागणार असल्याचे मी त्यांना सिरियसली सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तसेच देशाचे व राज्याचे गृहमंत्री यांच्याकडेही पोलिसांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल फिर्याद करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.

माझी ही तयारी, हा कृतनिश्चय पाहून DySP मॅडम अंतर्यामी किंचित भयभीत झाल्या. मी बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना मनोमन खात्री पटली. मी वर पर्यंत तक्रार केल्यास कदाचित चौकशीतून पोलिसांच्या आणखीही काही भानगडी बाहेर येतील याची त्यांना बहुदा भीती वाटली असावी. (खुद्द DySP मॅडमनी सुद्धा पुण्यातील दोन कोटींच्या फ्लॅटची किंमत फक्त 80 लाख रूपये इतकी दाखवून आमच्या बँकेकडून साठ लाख रुपयांचे दिखाऊ कर्ज घेतले होते..) माझी समजूत घालून मला शांत करून आश्वस्त करीत त्या म्हणाल्या..

“पोलिसांच्या या कृत्याबद्दल मी खेद व्यक्त करते. फौजदार साहेबांची त्यांच्या या कृत्याबद्दल चांगलीच कानउघाडणी करेन मी. यापुढे तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही स्टाफला पोलिसांकडून कसलाही त्रास होणार नाही असाही मी शब्द देते. तुम्ही आतापर्यंत दिलंत तसंच सहकार्य यापुढेही द्या आणि कृपा करून सध्या तरी पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार करू नका.. मी विनंती करते तुम्हाला..”

DySP मॅडमनी खरोखरीच आपला शब्द राखला. त्यानंतर कधीही पोलिसांकडून आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. उलट सुखदेवलाच पोलिसांनी अपमान करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले असेही आम्हाला खात्रीलायकरित्या समजले.

बेबी सुमित्राने, कसेही करून वैजापूरहुन बदली करून घ्यायचीच असा आता चंगच बांधला. औरंगाबाद येथील त्यांच्या संघटनेच्या लिडर्सनी देखील यासाठी अनुकूलता दर्शविल्याने ती उत्साहित होऊन कामाला लागली. Request transfer application तसेच स्थानिक नेत्यांमार्फत हैदराबाद येथील संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे यासाठी ती वारंवार औरंगाबादला जाऊ लागली.

रविशंकरची ट्रान्सफर ऑर्डर रिव्हाईज होऊन आता त्याची बदली बीड जिल्ह्यातीलच “शिरसाळा” या गावी झाली. हे गावही तसं आडमार्गालाच असलं तरी वैजापूर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने शिरसाळ्याला जाणेच इष्ट समजले. रविशंकर गेल्यानंतर लगेच पुढच्याच महिन्यात रहीम चाचांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ झाला. त्यापाठोपाठ सैनीची बदली परभणी जिल्ह्यातील आष्टी इथे झाल्यामुळे त्यालाही ताबडतोब रिलिव्ह करावे लागले. अशाप्रकारे मी व बेबी सुमित्रा असे बनावट चेकच्या केस मधील दोनच आरोपी वैजापूर शाखेत उरलो.farewell

बेबी सुमित्रा औरंगाबाद मधील ज्या नेत्यांना भेटायला जायची त्यापैकी एका नेत्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नसे. मी बेबी सुमित्राला त्याबद्दल अनेकदा सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र, एकदा गावाकडे बदली झाली की मग या फालतू लिडर्सना भेटण्याची गरजच पडणार नाही.. असा विचार करून तिने त्या इशाऱ्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.

एका शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणेच संघटनेच्या नेत्याला भेटायला औरंगाबादला गेलेली बेबी त्याच रात्री खूप उशिरा परत आली ती अत्यंत उद्विग्न, संतप्त, उध्वस्त मनःस्थितीतच.. वैजापूर शाखेतच काम करणाऱ्या शांतिप्रिया नावाच्या आपल्या बिहारी मैत्रिणी सोबतच एका खोलीत ती रहायची. शांतिप्रियाच्या म्हणण्यानुसार, औरंगाबादहुन आल्यापासून ती उशीत तोंड खुपसून सतत हमसून हमसून रडत होती. कितीही खोदून खोदून विचारलं तरीही नेमकं काय झालं आहे, ते ती कुणालाही सांगत नव्हती.sad woman-1

रविवार आणि सोमवार हे दोन्ही दिवस बेबी उदासपणे खोलीतच बसून होती. सोमवारी दुपारी शांतिप्रियाला सोबत घेऊन तिला भेटायला तिच्या रूमवर गेलो तेंव्हाही ती तशीच शून्यात पहात बसली होती. अल्लड, मिश्किल, चुलबुल्या खोडकर स्वभावाच्या बेबीची ती अवस्था पाहून माझ्या काळजात कालवाकालव झाली. तिला बोलतं करण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हताश होऊन मी बँकेत परतलो. माधुरी आणि मीनाक्षी या शाखेत काम करणाऱ्या अन्य दोघींना बेबीची काळजी घ्या, सतत तिच्या सोबत राहून तिला धीर द्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रभर बेबीच्या काळजीमुळे मला झोप आली नाही. सारखा तिचा तो उदास, भकास चेहरा नजरेसमोर येत होता. काय झालं असावं बेबी सोबत औरंगाबादला ? कुणी अतिप्रसंग तर केला नसेल तिच्यावर ? असे विचार सारखे डोक्यात घुमत होते.

मंगळवारी सकाळी बेबी सुमित्रा बँकेत आली तेंव्हा ती बरीच सावरलेली दिसत होती. आल्या आल्या तिने माझ्या टेबलावर आपला राजीनामा ठेवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असून पुरेशा अवधीची नोटीस न दिल्यामुळे नियमानुसार एक महिन्याचा पगार माझ्या खात्यातून कापून घ्यावा असे त्यात नमूद केले होते. आजच दुपारी मनमाडला जाऊन तेथूनच पुढे छत्तीसगडला जाणारी गाडी पकडणार असल्याचे ती म्हणाली. ठाम निश्चय करून आलेल्या बेबीने कुणाचेही काहीही ऐकून घेण्यास नम्रपणे नकार दिला. सर्वांना भेटून नमस्कार करून साधा सेंड ऑफ ही न घेता बेबी निघाली.sad woman-2

योगायोगाने वैजापूर शाखेची कॅश व्हॅन त्याचदिवशी दुपारी मनमाड शाखेतील अतिरिक्त कॅश आणण्यासाठी मनमाडला जाणार होती. त्याच व्हॅनमध्ये बेबीला तिच्या सामाना सहित बसवलं. शाखेतील बेबीचे दोन समवयस्क कर्मचारी मित्र देखील तिला मदत करण्यासाठी व्हॅन सोबत गेले. बेबीला हात हलवून निरोप देऊन परत शाखेत आलो तेंव्हा तिची ती रिकामी खुर्ची पाहून chairतिचा तो सदोदित प्रफुल्लित आनंदी चेहरा, त्या मिश्किल कॉमेंट्स, ते निरागस निर्मळ हास्य हे सारं सारं आठवलं..giggling woman

भूल जा अब वो मस्त हवा,

वो उड़ना डाली डाली..

जग की आंख का कांटा बन गई,

चाल तेरी मतवाली..

तेरी किस्मत में लिखा है,

जीते जी मर जाना..

क्या जाने अब इस नगरी में,

कब हो तेरा आना..

चल उड़ जा रे पंछी,

कि अब ये देस हुआ बेगाना..

lonely bird

या ओळी आठवल्या आणि डोळे नकळत भरून आले..

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १४   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-14 एका बँकरचे थरारक अनुभव-14

bank office

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 14)

मुंबईहून वैजापूरला परतल्यावर बँकिंग ओंबड्समन कार्यालयातील केसच्या सुनावणीचा निकाल लगेच रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसला पाठवून दिला.

लोकपालांनी आधी दिलेला प्रतिकूल निकाल व तो बदलून अनुकूल निकाल मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांबद्दल या दोन्ही वरिष्ठ कार्यालयांना काहीच कल्पना नसल्याने त्यांच्याकडून निकालाबद्दल कोणतीही अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया किंवा साधी विचारणाही करण्यात आली नाही, .. मग अभिनंदन वा कौतुक करणं तर दूरच.. ! अर्थात मला त्याची अपेक्षाही नव्हती. सरकारी यंत्रणांना चुकीची व अर्धवट माहिती पुरवून, त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळवायचा आणि आपला कुटील हेतू साध्य करायचा हा सुखदेवचा धूर्त प्रयत्न निदान काही काळापुरता तरी थोपवता आला याचंच मला समाधान होतं.

याच दरम्यान वैजापुरातील एका वजनदार राजकीय पुढाऱ्याने ईद-मिलन निमित्त आपल्या घरी शिर खुरम्याचे आयोजन केले होते. बँकेच्या साऱ्याच स्टाफला आग्रहाचे निमंत्रण असल्याने आम्ही सारे एकत्रच संध्याकाळी त्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. शहरातील सर्वच स्तरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, प्रथितयश व्यावसायिक, व्यापारी, पत्रकार, वकील आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी देखील साध्या वेशात कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात “बँकेला पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या अज्ञात इसमाचा पोलिसांनी अद्याप तपास का लावला नाही ?” असा प्रश्न कुणीतरी उपस्थित केला. आणि मग जमलेल्या जवळ जवळ सर्वच निमंत्रितांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल व त्यांच्या प्रामाणिक हेतू बद्दल शंका प्रदर्शित केली. पोलीस जाणूनबुजून या केसचा तपास करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असेच सर्वांचे मत पडले. कार्यक्रमास आलेले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी त्यांच्यावर केलेली ही टीका व निंदा नालस्ती खाली मान घालून निमूटपणे ऐकत होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी दुपारी चार वाजता चार पोलीस हवालदार व सब. इंस्पे. हिवाळेंना सोबत घेऊन फौजदार साहेबांनी बँकेत प्रवेश केला. आल्या आल्याच त्यांनी मुख्य गेटवरील सिक्युरिटी गार्डशी विनाकारण धक्काबुकी करून वर उद्धटपणे बाचाबाचीही केली. कर्ज विभागातील टेबलवर ठेवलेली पीक कर्जाची डॉक्युमेंट्स त्यांनी हवेत भिरकावून खाली फेकून दिली. कामाची रजिस्टर्स ठेवलेलं रॅक हलवून रजिस्टर्सची पाडापाड केली. फिल्ड ऑफिसरच्या टेबलावरील टेबल क्लॉथ भर्रकन खेचून वरची काचही फोडली.ransacking

एखाद्या सराईत गुंडांच्या टोळीप्रमाणे कायद्याच्या रक्षकांचा बँकेत चाललेला हा धुमाकूळ पाहून आम्ही सारे एकदम अचंभितच झालो. स्टाफला अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत, कॅश केबिन व काऊंटर्सच्या पार्टिशनवर हातातील लाकडी दंडुक्याने प्रहार करीत त्यांचा हा दहशतवादी हल्ला सुरू होता. आणि हे करताना त्यांची खालीलप्रमाणे अखंड बडबड चालू होती..

police officers

“पोलिसांचा तपास अतीसंथ गतीने सुरू आहे काय..?.. पोलीस सुस्तावले आहेत काय.. ? ..जाणून बुजून तपासात दिरंगाई करतात काय.. ? दाखवतोच तुम्हाला आता पोलिसांचा तपास कसा असतो ते..!”

पोलिसांचा हा आक्रस्ताळेपणा असह्य होऊन मी केबीन बाहेर आलो आणि त्यांना उद्देशून मोठ्याने ओरडलो..

“अरे हा काय तमाशा चालवला आहे तुम्ही.. ! तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करेन मी तुमच्या ह्या दांडगाई बद्दल.. तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्याविरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यास सांगेन त्यांना.. !!”

माझ्या त्या ओरडण्याचा पोलिसांवर काहीच परिणाम झाला नाही. उलट खुद्द फौजदार साहेबच हॉल मधूनच माझ्याकडे पहात मोठ्याने म्हणाले..

“वरिष्ठांच्या आदेशानुसारच आम्ही वेगाने तपास सुरू केला आहे..”

त्यांच्या जवळ जात मी म्हणालो..

“तुम्ही अशी नासधूस का चालवलीय..? तुम्ही काय शोधताय ते सांगा, म्हणजे आम्हालाही काही मदत करता येईल..”

दोन्ही हात कमरेवर ठेवून माझ्याकडे रोखून पहात फौजदार साहेब म्हणाले..

“आम्ही तो चेक बुक मागणीचा अर्ज शोधतोय.. जो बँकेला सापडत नाहीये..”

मी म्हणालो..

“अहो.. ! पण तो अर्ज तर कुठेतरी गहाळ झाला आहे.. आम्ही कोपरा न कोपरा शोधला आहे बँकेचा..”

त्यावर खुनशीपणे हसत फौजदार म्हणाले..

“मग..? आत्ता कसं..? अहो, टीचभर कागदाचा तुकडा शोधता येत नाही तुम्हाला सात महिन्यांपासून आणि आणि आम्ही मात्र एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावायचा.. तो ही म्हणे वेगाने.. ! ते काही नाही, आम्ही तुमच्या टेबलावरील आणि कपाटातील सर्व रजिस्टर्स आणि कागदपत्रं जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथे त्या गहाळ अर्जाचा शोध घेणार आहोत. तसंच, आम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या स्टाफ पैकी एकदोन जणांना सुद्धा धरून सोबत घेऊन जाणार आहोत..”

हतबुद्ध होऊन आम्ही सारे फौजदार साहेबांचा तो निर्बुद्ध तर्क ऐकत होतो.

पोलीस बँकेत असा हैदोस घालत असताना स्टाफ पैकी काही जणांनी मोबाईल मध्ये त्याचं व्हिडीओ शूटिंग केलं. हॉल मधील काही कस्टमर्सनी सुद्धा हा प्रकार त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. काही High Value व influential कस्टमर्सनी तर ताबडतोब Addl. DSP साहेबांना फोन करून त्यांना बँकेत चाललेल्या गोंधळाची माहिती दिली.

एखाद्या चिडखोर आणि हट्टी मुलासारखे पोलिसांचे ते बालिश चाळे पाहून माझ्या संयमाचा बांध आता फुटण्याच्याच बेतात होता, इतक्यात Addl DSP साहेबांनी डीवायएसपी मॅडम सह बँकेत प्रवेश केला.

फौजदार साहेबांना आपला फौजफाटा घेऊन ताबडतोब परत जाण्यास सांगून ती दुक्कल माझ्या केबिन मध्ये येऊन बसली. DySP मॅडम म्हणाल्या..

“वैजापूरच्या नागरिकांनी औरंगाबादच्या कमिशनर साहेबांकडे इथल्या पोलिसांबद्दल तक्रार केली आहे. बँकेच्या केसचा तपास करण्यात पोलीस ढिलाई करीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्याच संदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहोत. पोलिसांकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ?”

एक खोल निःश्वास सोडून मी म्हणालो..

“खरं सांगू..? पोलिसांनी या केसमध्ये अद्याप काडीचाही तपास केलेला नाही. पैसे काढून नेणाऱ्या व्यक्तीचा तांतडीनं शोध घेणं अपेक्षित होतं. पण अद्याप पोलिसांनी त्या व्यक्तीचे साधे फोटोसुद्धा आसपासच्या जिल्ह्यातील पोलीसांकडे तपासासाठी पाठविले नाहीत अशी आमची माहिती आहे. त्या रुपेशला सुद्धा आम्हीच पकडून दिलं. पण पोलिस त्याला साधं बोलतं सुद्धा करू शकलेले नाहीत.”

“चेक वरील बनावट सही ही रुपेशनेच केली आहे हे आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहोत. पण पोलिसांनी तपासासाठी रुपेशच्या हस्ताक्षराचा नमुनाही अद्याप घेतलेला नाही. तसेच जर आमच्यापैकी कुणी ती बनावट सही केली आहे असा पोलिसांचा संशय असेल तर आमच्या हस्ताक्षराचे नमुने सुद्धा पोलिसांनी गोळा करून ते हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवायला हवे होते. चेक वरील सहीचा खरेपणा तपासण्यासाठी पोलिसांनी पुण्याच्या फोरेन्सिक लॅबला चेक व सहीचा नमुना पाठविला होता. परंतु आता सात महिने होत आले तरी अद्याप त्या लॅबचा रिपोर्ट पोलीस प्राप्त करू शकलेले नाहीत.”

माझ्या त्या स्पष्टोक्तीवर DySP मॅडम काहीच बोलल्या नाहीत. मात्र Addl. DSP साहेब खुर्चीवरून उठत म्हणाले..

“ठीक आहे..! उद्या त्या रुपेशच्या हस्ताक्षराचे नमुने घेण्याबद्दल मी फौजदार साहेबांना सांगतो. पोलिसांच्या आजच्या वर्तनाबद्दल आमच्या खात्याच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. पोलिसांवर आधीच कामाचा खूप ताण असतो. त्यातून लोकांचं ऐकून वरिष्ठांनी जर कानउघाडणी केली तर निराशा आणि संतापाच्या भरात कधी कधी असं कृत्य घडतं त्यांच्या हातून..”

Addl DSP व DySP मॅडमची जोडी बँकेतून निघून गेल्यावर लगेच स्टाफची छोटीशी मिटिंग घेतली. काही कस्टमर सुद्धा या बैठकीत हजर होते. पोलिसांच्या आजच्या वर्तनाचा सर्वांनीच निषेध केला आणि वरिष्ठ कार्यालयाला ही घटना कळवून स्टाफला संरक्षण पुरविण्याची मागणी करावी असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यानुसार सर्वांच्या सहीने एक निवेदन तयार करून ते क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिले. जमलेल्या कस्टमर्सनी सुद्धा या निवेदनावर उस्फूर्तपणे सह्या केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच पोलिसांचं एक पथक स्टाफच्या हस्ताक्षराचे नमुने घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपलं. एक मराठी भाषेतील प्रिंटेड पेज आम्हा पाचही जणांना देण्यात आलं आणि कोऱ्या कागदावर ते चार वेळा लिहून काढण्यास सांगण्यात आलं. विशेष म्हणजे रुपेशला सुद्धा पोलिसांनी बँकेतच आणलं होतं आणि आमच्या समोरच त्यांनी त्याच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले.

“ती” बनावट सही रुपेशनेच केली आहे याबद्दल आमच्या कुणाच्याच मनात किंचितही शंका नव्हती. त्यामुळेच रुपेश हस्ताक्षराचे नमुने देताना आम्ही सारे लक्षपूर्वक त्याचे निरीक्षण करीत होतो. आपण आता पुरते अडकलो आहोत याची रुपेशला पुरेपूर जाणीव झाल्याने या हस्ताक्षर चाचणीच्या दिव्यातून सुटण्याची त्याची केविलवाणी धडपड सुरू झाली.

हस्ताक्षराचे नमुने देताना वेलांटी व उकार यातील ऱ्हस्व दीर्घच्या रुपेश जाणून बुजून चुका करीत होता. एका पानावर सर्व उकार व वेलांट्या ऱ्हस्व काढायचा तर दुसऱ्या पानावर तोच मजकूर लिहिताना सर्व उकार, वेलांट्या दीर्घ काढायचा. तिसऱ्या पानावर ऱ्हस्व दीर्घ अक्षरे मिक्स करायचा तर चौथ्या पानावर काना, मात्रा, वेलांटी, उकार इत्यादी एकतर गाळायचा किंवा डबल डबल लिहायचा.

सर्वांची चार चार पाने लिहून झाल्यावर ती गोळा करतांनाच सब. इंस्पे. हिवाळे बँकेत आले. चार पानांऐवजी फक्त दोनच पाने गोळा करा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांना दोन पाने देऊन बाकीची पाने आम्ही आमच्या जवळच ठेवली. रुपेशने लिहिलेली जादाची दोन पाने देखील आम्ही आमच्या जवळच ठेवून घेतली. ही पाने अजूनही बँकेतच आहेत आणि दोन्ही पानांत रुपेशने सर्वच अक्षरांतील वेलांटी, उकार जाणून बुजून परस्परांच्या अगदी विरुद्ध काढले आहेत हे अगदी सहज पाहिलं तरी ध्यानात येतं.

मुंबईहून परत आल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी बँकेच्या हेड ऑफिस मधील एक अधिकारी चौकशीसाठी शाखेत आले. Banking Ombundsman (लोकपाल) कडील केस हरण्या मागील कारणे त्यांना माहीत करून घ्यायची होती. आपण केस हरलेलो नाही हे जेंव्हा त्यांना सांगितलं तेंव्हा त्यांनी मुंबई झोनल ऑफिसने पाठविलेला मेसेज दाखविला. लोकपालांनी आधीचा निकाल बदलल्याचे मुंबई झोनल ऑफिसच्या दुभाषी साहेबांना माहिती नसल्याने हा गोंधळ झाला होता. वस्तुस्थिती समजताच चौकशी गुंडाळून आणि जवळच असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन ते हेड ऑफिसचे अधिकारी परत हैदराबादला निघून गेले.

दोन दिवसांनी दुभाषी साहेबांचा फोन आला. लोकपाल केसच्या निकाला संदर्भात चुकीची माहिती कळवल्याबद्दल त्यांना हेड ऑफिसची चांगलीच बोलणी खावी लागली होती. “त्या दिवशी तुमच्या बरोबर न राहता फॅमिली सोबत वेळ घालवणं खूप महागात पडलं..” असं ते म्हणाले. मात्र लोकपालांनी निकाल बदलल्याचं ऐकून त्यांना जसं खूप आश्चर्य वाटलं तसाच आणि तितकाच आनंदही झाला. माझं मनःपूर्वक आणि भरगच्च अभिनंदन करून त्यांनी फोन ठेवला.

सुखदेवनं ग्राहक मंचात त्याची केस लढण्यासाठी जे वकील लावले होते ते खूप लालची आणि धूर्त होते. दुप्पट नुकसानभरपाई मिळवून देतो असं सांगून सुखदेवला ते चांगलंच बनवीत होते. नंतरच्या काही तारखांना ते कोर्टात हजर न राहिल्याने सारख्या पुढील तारखा पडत गेल्या आणि केसची सुनावणी लांबत गेली. अर्थात केसला असा उशीर होणं आमच्या दृष्टीने एक प्रकारे चांगलंच होतं.

बघता बघता एक वर्ष उलटून गेलं. वैजापूरच्या कोर्टातील फौजदारी केस अद्याप सुनावणीसाठी बोर्डावरच आली नव्हती. रहीम चाचांच्या रिटायरमेंटची तारीख जवळ येत चालली होती. केसची सुनावणी सुरू होताच न्यायाधीश ताबडतोब आपली निर्दोष सुटका करतील अशी त्यांची भाबडी कल्पना होती. त्यामुळे त्यांनी केस लढण्यासाठी स्वतःचा एक स्वतंत्र वकीलही नेमला होता. आपल्या रिटायरमेंट पूर्वीच केसचा निर्णय व्हावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती.

आम्हा सर्वांच्या वैयक्तिक आयुष्यात ही आर्थिक, शारीरिक, मानसिक व कौटुंबिक अडचणींची मालिका अखंड सुरूच होती. रविशंकरच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळे त्याला तिच्या ट्रीटमेंटसाठी वारंवार मुंबईला जावं लागत होतं. वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांची एकुलती एक संतान असलेल्या बेबी सुमित्राचे छत्तीसगडच्या आसपास बदलीसाठी निकराचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी “एस सी एस टी वेलफेअर ऑर्गनायझेशन” या त्यांच्या संघटनेच्या औरंगाबाद येथील लिडर्स कडे तिचं वारंवार चकरा मारणं सुरू झालं होतं. सैनीच्या दिल्ली येथे राहणाऱ्या एकत्र कुटुंबातील घरगुती वाद पराकोटीच्या विकोपाला गेले होते. तो सतत फोनवर आपल्या कुटुंबियांना धीर देत तासनतास बोलत राही.

माझा अनियंत्रित डायबेटीसही पुन्हा उफाळून आला होता. बँकेतच भोवळ येऊन पडल्यामुळे अनेकदा मला वैजापुरच्या डॉक्टरांकडे न्यावे लागले होते.

56345151

“हे सर्व कामाच्या ताणामुळे होतंय.. मी पाहतोय की तुम्ही रोज रात्री उशिरापर्यंत काम करीत असता.. सतत बँकेबद्दल, कामाबद्दल काळजी करणं, विचार करणं सोडून द्या आणि कमीतकमी महिनाभर तरी सुटी घेऊन आराम करा. कामं तर काय होतच राहतील, आणि ती कधी संपणारही नाहीत.. अधून मधून आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देणं महत्वाचं आहे.. तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी.. “

वैजापुरातील माझे डॉक्टर मित्र श्री. सुरेश जोशी नेहमी मला असा कळवळीचा सल्ला देत असत. मी त्यांच्यासमोर तेवढ्यापुरती मान डोलावीत असे आणि पुन्हा बँकेत येऊन कामात बुडून जात असे.

बँकेच्या कर्मचाऱ्यांना हर प्रकारे त्रास देऊन आपण सहज भरपूर पैसे उकळू शकू ही सुखदेवची समजूत पार खोटी ठरली होती. पोलीस, पत्रकार, वकील, रिकाम टेकडे स्थानिक राजकीय नेते आणि गुंड प्रवृत्तीची मित्र मंडळी ह्यांना पोसण्यात त्याचा बराच पैसा खर्च झाला होता. बँकेकडून पैसे मिळण्यास जसा जसा उशीर होत होता तसा तसा त्याचा धीर सुटत चालला होता. काय वाट्टेल ते करून निदान ग्राहक मंचामार्फत तरी बँकेकडून ताबडतोब चेकचे पैसे वसूल व्हावे यासाठी त्याने त्याच्या वकिलांकडे धोशा लावला होता.

अतिशय शांत, मृदुभाषी आणि कायद्याचं सखोल ज्ञान असणारे आमचे वकील ॲड. ऋतुराज ग्राहक मंचाची केस अतिशय उत्तम प्रकारे लढत होते. “चेकवरील सही बनावट असल्याचं सिद्ध झालं तरी देखील येनकेन प्रकारे आपण ही केस आणखी दीर्घ काळ पर्यंत लांबवू शकतो. मात्र असं करण्याऐवजी सुखदेवशी सन्माननीय तडजोड करून प्रकरण मिटवणंच जास्त योग्य राहील” असं त्यांचं प्रामाणिक मत होतं..

अशातच एके दिवशी हैदराबादच्या सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) कडे आम्ही पाठविलेल्या चेक वरील सही बद्दलचा हस्ताक्षर चाचणी अहवाल पोस्टाने प्राप्त झाला..

“चेक वरील सही खातेदाराने केलेली नसून बनावट (forged) आहे”

असा त्या अहवालाचा स्पष्ट निष्कर्ष होता.

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १३  भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-13 एका बँकरचे थरारक अनुभव-13

rbi guards

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 13)

लोकपाल मॅडमनी दिलेला तो प्रतिकूल निकाल ऐकल्यापासून माझ्या हातपायातील त्राणच जणू नाहीसं झालं होतं. निकालाचा लिफाफा यंत्रवत हातात धरून मी तसाच रिसेप्शन काउंटर जवळ निर्जीवपणे उभा होतो. स्नेहलता मॅडमनी आधी दुरून, हातानेच खुणावून “काय झालं ?” असं विचारलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना निकालाचा अंदाज आला असावा. बहुदा म्हणूनच आपुलकीने, सहानुभूती व्यक्त करून माझं सांत्वन करण्यासाठीच त्या मला त्यांच्याजवळ बोलावीत होत्या.

मी तसाच खिन्न, सुन्न, बधिर होऊन उभा असतांनाच लोपामुद्रा सेनगुप्ता मॅडम त्यांच्या चेंबर मधून बाहेर आल्या. स्नेहलता मॅडम जवळ जाऊन त्या म्हणाल्या..

“स्नेहा, खूप खुश आहे मी आज..! एकतर, न्यायासाठी झगडणाऱ्या एका सामान्य, गरीब कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देऊन त्यांच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळवले.. आणि दुसरं म्हणजे माझी ही शेवटची केस खूपच लवकर, अगदी एकाच हिअरिंग मध्ये निकाली निघाली. त्यातही, मनासारखा निर्णय देता आल्यामुळे खूप आनंद आणि समाधान सुद्धा प्राप्त झालंय आज मला..”

सेनगुप्ता मॅडम अस्खलित मराठी भाषेत बोलत होत्या. मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना छान मराठी बोलता येतं, हे स्नेहलता मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं. उत्साहाच्या भरात लोकपाल मॅडम आपलं पद विसरून मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारीत होत्या..

“अगं, मी त्या बँक मॅनेजरला असं काही खडसावलं की बिचारा काही न बोलता गप्पच बसला. आणि मग मी चट्कन निकाल देऊन टाकला. बरं ते जाऊ दे.. ! मी आता रिक्रिएशन रूम मध्ये जाऊन जरा आराम करणार आहे. मला जरा शांतता हवी आहे. थोडा वेळ मला कुणीही डिस्टर्ब करू नका.. मग.., दुपारी चार वाजता तुमचं ते फेअरवेल फंक्शनही आहे.. हो ना ? काय..! देणार आहात ना सेंड ऑफ मला ?”

एवढं बोलून लोपामुद्रा मॅडम रिक्रिएशन रूम कडे जाण्यासाठी वळल्या तोच त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्याबद्दल त्यांनी काढलेले हेटाळणीचे अनुदार बोल मी नक्कीच ऐकले असावेत याची जाणीव झाल्याने क्षणभर त्या ओशाळल्या. पण मग लगेच स्वतःला सावरून घेत, चेहऱ्यावर कठोर भाव आणीत रिसेप्शनिस्ट मॅडमला त्या म्हणाल्या..

“साधना sss ! ज्यांचं काम झालं असेल त्यांना इथून जायला सांग. कामाशिवाय कुणीही इथे बसता कामा नये..”

लोकपाल मॅडमची ही सूचना माझ्यासाठीच होती हे न समजण्या इतका मी खुळा नव्हतो. त्यामुळेच आता स्नेहलता मॅडम कडे जावं की न जावं या संभ्रमात असतानाच जागीच उभं राहून आग्रही स्वरात सुपरिन्टेंडेंट मॅडम म्हणाल्या..

“अहो, या नं तुम्ही..! मला बोलायचंय तुमच्याशी..”

निमूटपणे मी स्नेहलता मॅडमच्या टेबला समोरील खुर्चीत जाऊन बसलो.

“बघू, काय निकाल दिलाय लोकपाल मॅडमनी..?”

माझ्या हातातील लिफाफ्याकडे पहात त्या म्हणाल्या. मी चुपचाप तो लिफाफा त्यांच्या पुढ्यात ठेवला. लिफाफ्यातील निकालाचा कागद बाहेर काढून त्यांनी तो लक्षपूर्वक वाचला. मग माझ्याकडे रोखून पहात त्या म्हणाल्या..

“हं..! मग आता पुढे काय करायचं ठरवलंत..?”

“मी याबद्दल काहीच विचार केलेला नाही. खरं म्हणजे खूप तयारी करून आलो होतो मी. माझ्याजवळची कागदपत्रं आणि तर्कसंगत युक्तिवाद यांच्या जोरावर मी लोकयुक्तांना सत्य परिस्थिती समजावू शकेन, फिर्यादीचा खरा चेहरा त्यांच्यापुढे उघड करू शकेन असा पूर्ण आत्मविश्वास होता मला.. ! पण.. मॅडम काही ऐकून घ्यायच्या मूड मध्येच नव्हत्या. त्यामुळे नाईलाजानं मी गप्प बसलो..”

“ओके, ओके.., होतं असं कधी कधी.. !” स्नेहलता मॅडम मला धीर देत म्हणाल्या..

“मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं ना की दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी आलीय मॅडम पुढे म्हणून.. ! बरं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंत तुम्ही..? आता पुढे काय करणार आहात ?”

या मॅडम मला वारंवार हा एकच प्रश्न का विचारत आहेत हेच मला कळत नव्हतं.

“मॅडम, हे सगळं एवढं तडकाफडकी झालंय की मला काहीच सुचत नाहीय. आता, ह्या निकालाबद्दल वरिष्ठांना कळवायचं आणि पुढे ते सांगतील तसं करायचं बहुदा एवढंच आहे माझ्या हातात..”

हताश स्वरात मी उत्तरलो..

“मॅडम, अपील करता येतं का हो या निकालाविरुद्ध ?”

खोल गेलेल्या स्वरात, उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं..

“अर्थातच ! रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे 30 दिवसांच्या आत तुम्ही या निकालाविरुद्ध अपील करू शकता. पण त्यासाठी तुमच्या बँकेच्या CMD, ED किंवा CEO यांची आधी मंजुरी घ्यावी लागते. डेप्यु. गव्हर्नर एकतर निकाल तसाच कायम ठेवतात किंवा निकाल रद्द करतात अथवा पुन्हा बँकिंग लोकपालाकडे केस फेरविचारासाठी पाठवतात..”

एवढं सांगितल्यावर स्नेहलता मॅडम म्हणाल्या..

“पण.. मी विचारतेय की तुम्ही आज, आत्ता.. या क्षणी काही प्रयत्न करणार आहात की नाही हा निकाल रोखण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी ? अजूनही तुम्ही लोकपाल मॅडमला भेटून त्यांना आपली बाजू पटवून देऊ शकता. हवं तर मी तुम्हाला या कामी मदत करू शकते. तुम्ही प्रयत्न तर करा.. “

स्नेहलता मॅडमच्या शब्दांतून त्यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी, कळकळ जाणवत होती..

“तुमच्या मॅडमनी तर क्विक जजमेंट देऊन केसच गुंडाळून टाकलीय.. तो सुखदेव तर निकाल घेऊन एव्हाना वैजापूरच्या रस्त्यालाही लागला असेल. आणि.. मला नाही वाटत, तुमची मैत्रीण आता माझी बाजू ऐकून घ्यायला तयार होईल.. छे छे.. अशक्यच आहे ते..! जाऊ द्या मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल जी आपुलकी व सदभावना दाखवलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. येतो मी.. !”

images 80

एवढं बोलून उदास मनाने, दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि खुर्चीवरून उठून परत जाण्यासाठी निघालो. अचानक स्नेहलता मॅडमनी ताडकन खुर्चीवरून उठून माझा हात धरला आणि म्हणाल्या..

“कम ऑन.. चिअर अप ! मी मॅडमची आणि तुमची भेट घालून देते. तुम्ही मला जशी तुमची केस नीट समजावून दिली होतीत अगदी तशीच ती मॅडमलाही समजावून सांगा. माझी खात्री आहे, काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. तुम्ही प्लिज इथेच थांबा.. मी आलेच..!”

असं बोलून माझ्याकडे पहात पहातच स्नेहलता मॅडम रिक्रिएशन रूम मध्ये गेल्या. अवघ्या दोनच मिनिटांत आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने त्या बाहेर आल्या.

snehalata

“जा..! लोपा.. आय मीन, माझी जवळची मैत्रीण आणि तुमची लोकपाल मॅडम.. ती तयार झालीय.. आय मिन, तयार झाल्यात त्या.. तुमची वस्तुस्थिती जाणून घ्यायला.. जा लवकर..! न घाबरता, शांतपणे बोला त्यांच्याशी.. रिमेम्बर, शी इज व्हेरी हेल्पफुल, कोऑपरेटिव्ह अँड काईंड हार्टेड वूमन.. ऑल द बेस्ट.. !!”

जीव मुठीत धरून भीतभीतच मी रिक्रिएशन रूम मध्ये प्रवेश केला. सेनगुप्ता मॅडम तेथील एका झुलत्या आराम खुर्चीवर बसल्या होत्या. मला पाहून त्यांनी हलकंसं स्मित केलं. त्यांना नमस्कार करून बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्यांनी हातानेच मला थांबायची खूण केली आणि म्हणाल्या..

“माझ्या मैत्रिणीशी बोलतांना मघाशी उत्साहाच्या भरात तुमच्याबद्दल जे अपरिपक्व, अनुचित शब्द माझ्याकडून उच्चारले गेले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते. खरं म्हणजे मलाच ही केस लवकर संपवायची घाई झाली होती. चुकलंच माझं..!”

अत्यंत विनम्रतेने आणि मनापासून उच्चारलेले मॅडमचे ते शब्द ऐकून माझ्या छातीवरचं दडपण एकदम कमी झालं आणि त्यांच्याबद्दलचा मनातील आदरही दुणावला.

“मी समजू शकतो मॅडम..! एकतर आज तुमचा ऑफिसातील शेवटचा दिवस असल्याने लवकर सर्व कामं आटपायची घाई आणि त्यातून माझी केस सुद्धा तांत्रिक व कायदेशीर दृष्ट्या खूपच कमजोर होती..”

माझ्या या बोलण्यावर पुन्हा स्वच्छ, निर्मळ, मनमोकळं स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या..

lopamudra

“बसा निवांतपणे.. आणि सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते..!”

सुखदेवने त्याच्या बायकोचं बँकेत खातं उघडलं त्या दिवसापासूनचा घटनाक्रम सांगायला मी सुरुवात केली. बँकेचा अस्थायी कर्मचारी रुपेशच्या सहभागामुळे आमची केस कशी कमजोर बनली, पैसे नेणाऱ्या व्यक्तीचा फोटो व घटनेच्या दिवसभराचं CCTV फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची तपासकामातील हेतुपुरस्सर दिरंगाई, सुखदेवच्या धमक्या, पेपरबाजी, पैशाच्या मागण्या, त्याने बँकेच्या स्टाफविरुद्ध केलेली खोटी पोलीस केस, रुपेशची अटक व त्याचा अर्धवट कबुलीजबाब.. हे सर्व माझ्या तोंडून ऐकत असतांना क्षणोक्षणी मॅडमच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. माझं बोलणं संपलं तेंव्हा त्या उठून माझ्याजवळ आल्या. माझ्या पाठीवर कौतुकमिश्रित सहानुभूतीने हलकंसं थोपटून त्या म्हणाल्या..

“आय ॲम रिअली व्हेरी सॉरी..! खरंच घाईघाईत खूप मोठी चूक घडली माझ्या हातून.. ! पण.. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे व मुद्दे पाहता माझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याने देखील हाच किंवा असाच निकाल दिला असता. किंवा फार फार तर निकाल थोडा लांबवला असता..”

त्यावर मी म्हणालो..

“नाही मॅडम, तसाही हा निकाल लांबवून फारसा उपयोग झाला नसता.. कारण कन्झ्युमर कोर्टाने ग्राहकाला एका महिन्याच्या आत न्याय देण्याची म्हणजेच नुकसान भरपाई देण्याची बँकेला तंबी दिली आहे..”

माझ्या तोंडून कन्झ्युमर कोर्टाचा उल्लेख ऐकताच सेनगुप्ता मॅडमचे डोळे आनंदानं चकाकले..

“काय म्हणालात..? कन्झ्युमर कोर्ट ? म्हणजे हे प्रकरण तिथेही नेलंय का या गृहस्थाने..?”

“होय मॅडम ! पोलिस केस, फौजदारी न्यायालय, ग्राहक मंच, अँटी करप्शन ब्युरो, केंद्र व राज्य सरकारचे विविध ग्रीव्हन्स सेल, बँकेच्या हेड ऑफिस मधील फ्रॉड व तक्रार विभाग.. अशा अनेक मंचांकडे या सुखदेवने बँकेविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत..”

हे ऐकतांच मॅडम आनंदाने जवळजवळ ओरडल्याच..

“बस..बस..! झालं तुमचं काम..! जर ही केस आधीच ग्राहक मंचात सुरू असेल तर आज झालेली येथील संपूर्ण सुनावणीच Null & Void म्हणजेच व्यर्थ आहे. ताबडतोब मला हा निकाल बदलायला हवा.. तुम्ही इथेच थांबा.. आणि Revised निकाल घेऊन जा..!”

स्नेहलता मॅडमला सांगून त्यांनी ताबडतोब पीए ला बोलावून घेतलं आणि त्याला Revised Verdict डिक्टेट करायला सुरुवात केली. पीए ने सुधारित निकाल त्वरित टाईप करून मॅडमपुढे ठेवला. त्यावर सही करून मॅडमनी स्वतः तो निकाल माझ्या हातात दिला.

याच दरम्यान स्नेहलता मॅडमनी कार्यालयाच्या साऱ्याच मजल्यावरील सिक्युरिटी गार्ड व शिपायांना बोलावून सुखदेवला शोधून आणण्यासाठी त्यांना खाली रस्त्यावर पिटाळलं होतं. सुदैवाने सुखदेव RBI बिल्डिंग जवळच्या हॉटेलमध्येच कुटुंब व वकील मित्रांसह शांतपणे जेवण करीत बसला होता. लोकपाल मॅडमनी बोलावलंय म्हटल्यावर तो कुटुंबमित्रांसह धावतपळतंच लोकपाल कक्षात आला. धापा टाकीतच तो म्हणाला..

“मॅडम, जेवण झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांसाठी पेढे घेऊन येणारच होतो मी.. पण तेवढ्यात तुम्ही अर्जंट बोलावल्याचा निरोप मिळाला म्हणून मुलाला पेढे आणण्यासाठी पाठवलं आणि मी लगबगीनं इकडे आलो.. असं काय अर्जंट काम होतं मॅडम ?”

सुखदेवकडे रोखून पहात लोकपाल मॅडम म्हणाल्या..

“असं आहे की, तुमच्या केसच्या निकालात किंचित दुरुस्ती करून आता पहिल्यापेक्षा अधिक योग्य असा निकाल देण्यात आला आहे..”

सुखदेवकडून पूर्वी दिलेला निकाल आधी परत घेऊन लोकपाल मॅडमनी त्याच्या हातात नवीन निकालाचा लिफाफा ठेवला.

पूर्वीसारखाच लिफाफा उघडून सुखदेवनं अधाशा सारखा तो निकाल भराभरा वाचला.

“हे प्रकरण कन्झ्युमर कोर्टात आधीच न्यायप्रविष्ट असल्याने नियमानुसार लोकपाल कार्यालयाला या तक्रारीची दखल घेता येत नाही.. याप्रकरणी आधी दिलेला निकाल रद्द करण्यात येत आहे..”

हे शब्द वाचतांच सुखदेवने अविश्वासयुक्त क्रोधाने मॅडम कडे पाहिलं..

“हा तर सरळ सरळ दगा आहे. तुम्ही असा कसा निकाल बदलू शकता ? मला हे अजिबात मान्य नाही. मला न्याय मिळेपर्यंत मी इथेच तुमच्यापुढे बसून उपोषण करीन. मला पक्की खात्री आहे की त्या मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याकडून लाच घेऊनच तुम्ही हा निकाल बदललेला आहे. पण मी असा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही..”

सुखदेवचं आरडाओरडा करून आकांडतांडव करीत गोंधळ घालणं सुरूच होतं. मला पाहिल्यावर तो आणखीनच चेकाळला असता, म्हणून हेतुपुरस्सरच त्याच्या नजरेसमोर येण्याचं आतापर्यंत मी टाळलं होतं. लोकपाल मॅडमनी कडक शब्दात ताकीद देऊनही सुखदेवचं त्यांना शिव्या-शाप देऊन थयथयाट करीत कक्षात थैमान घालणं तसंच चालू होतं.

हा प्रकार पाहून RBI कार्यालयातील तीन चार सिक्युरिटी गार्ड धावतच लोकपाल कक्षात आले आणि त्यांनी सुखदेवची गचांडी धरून त्याला कक्षा बाहेर काढलं. तरीही सुखदेवची बेताल बडबड अव्याहतपणे सुरूच होती. त्यातच बाहेर एका कोपऱ्यात बसून वाट पहात बसलेलो मी त्याच्या दृष्टीस पडलो. मग काय विचारता..!

क्रोधाने धुमसणाऱ्या सुखदेवच्या संतापाचा जणू स्फोटच झाला. त्वेषाने दातओठ खात तो म्हणाला..

“तरीच..! मला वाटलंच होतं की ही नक्कीच मॅनेजर साहेबांचीच करतूत असावी. आणि आता तुम्हाला इथे पाहून तर माझी त्याबद्दल खात्रीच झाली आहे.. साहेब, तुम्ही मॅडमला लाच देऊन न्याय विकत घेतला आहे.. पण मी तुम्हाला असा सोडणार नाही.. तुम्ही आणि ती आत बसलेली भ्रष्ट, पक्षपाती लोकपाल मॅडम, या दोघांनाही मी जबरदस्त धडा शिकविन.. त्या मॅडमची तर थेट RBI गव्हर्नर कडेच तक्रार करीन. शिवाय त्यांना कोर्टात खेचेन ते वेगळंच..”

सुखदेवनं माजवलेला हा तमाशा पाहून त्याचं मानगूट धरलेला सिक्युरिटी गार्ड म्हणाला..bank katha-13

“हे पहा, लोकपाल कक्षात गोंधळ घालणं आणि मॅडम बद्दल अपशब्द उच्चारणं हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला जर इथल्या मार्शलच्या ताब्यात दिलं तर तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल. तेंव्हा मुकाट्याने इथून ताबडतोब निघून जा..”

सुखदेवच्या सोबत आलेल्या वकिलांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि सुखदेवला शांत करून कशीबशी त्याची समजूत घालत त्याला लोकपाल कार्यालया बाहेर नेलं. आदळआपट करून शिव्याशाप देत, पाय आपटीत सुखदेव तिथून निघून गेला.

मला तर अजूनही आज दुपारनंतरचा सारा घटनाक्रम स्वप्नवतच वाटत होता. इतक्या लवकर असं निकालाचं पारडं माझ्याकडे झुकेल याची कल्पनाही मी केली नव्हती. स्नेहलता मॅडम आणि सेनगुप्ता मॅडमचे आभार मानून त्यांचा निरोप घेतांना माझे डोळे नकळत भरून आले. त्या दोघीही खूप भारावून गेलेल्या दिसत होत्या.

परतीची बस रात्री साडे दहाची होती. रात्रीचं जेवण झाल्यावर सरळ गेट वे ऑफ इंडिया वर गेलो. खूप वर्षांपूर्वी जेंव्हा जेंव्हा परीक्षा, इंटरव्ह्यू व अन्य निमित्ताने मुंबईला येणं व्हायचं तेंव्हा रात्रीच्या वेळी ताजमहाल हॉटेल समोरील समुद्राच्या तटरक्षक भिंतीवर बसून लाटांचं संगीत ऐकत बसायचो. आज ही तसाच समुद्राच्या सान्निध्यात बसलो होतो. वाटलं की, सागरातील भरती ओहोटीच्या लाटां प्रमाणेच जीवनातही आशा निराशेच्या लाटांचा खेळ असाच निरंतर सुरू असतो. आजच्या अकल्पित यशाबद्दल ईश्वराचे मनोमन आभार मानले.

एक छोटीशी लढाई संपली होती. भविष्यात अजून अशा अनेक लढाया आम्हाला जिंकायच्या होत्या.

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-12 एका बँकरचे थरारक अनुभव-12

ombudsman

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ombudsman

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 12)

फॅक्स मेसेज पाठोपाठ लगेच औरंगाबादच्या क्षेत्रीय कार्यालयातून फोन आला. स्वतः रिजनल मॅनेजर बोलत होते..

“उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही नरिमन पॉईंट, मुंबई येथील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचा. तिथे बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत व मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतील. तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल कार्यालयातही तेच घेऊन जातील.”

मी लक्ष देऊन ऐकत होतो. RM साहेब पुढे म्हणाले..

“या प्रकरणाची इत्यंभूत माहिती केवळ तुम्हालाच असल्याने बँकेतर्फे ही केस तुम्हालाच प्लीड करायची आहे. लक्षात ठेवा, हे बँकिंग लोकपाल बँकांच्या कार्यपद्धती व नियमावली बद्दल सखोल ज्ञान असणाऱ्या उच्चपदस्थ व अनुभवी व्यक्ती असतात. त्यांच्याशी बोलतांना सावधगिरी बाळगा व अतिशय आदराने आणि मुद्देसूद तेवढंच बोला.”

“आणि.. लक्षात ठेवा, 20 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांत ग्राहकाला त्वरित नुकसान भरपाई देण्याचे ते संबंधित बँकेला आदेश देऊ शकतात. तसेच विलंब व मानसिक त्रासापोटी एक लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ते बँकेला करू शकतात. तेंव्हा त्यांच्यापुढे अत्यंत नम्रपणे, अदबीने व सांभाळून सादर व्हा.. आणि केसचा निकाल बँकेविरुद्ध लागू नये यासाठी योग्य ते आटोकाट प्रयत्न करा.. ऑल द बेस्ट !!”

RM साहेबांचा फोन आल्यानंतर भराभर टेबलावरील कामे आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. मग डेप्यु. मॅनेजरला केबिनमध्ये बोलावून आज मुंबईला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. केस संबंधी सर्व कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी सामग्री घाईघाईत बॅगमध्ये भरली. शांत चित्ताने संपूर्ण घटनाक्रम व महत्वाचे मुद्दे थोडक्यात लिहून काढले. औरंगाबादला घरी जाण्यात उशीर झाला असता म्हणून रात्रीच्या बसने वैजापूरहूनच मुंबईला जाण्याचे ठरवले. रुमवरील एक बऱ्यापैकी ड्रेस बॅगेत टाकला आणि बस स्टँडवर निघालो.

छ. शिवाजी महाराज टर्मिनस जवळ उतरलो तेंव्हा पहाटेचे पाच वाजले होते. जवळच्याच एका हॉटेलात जाऊन सिंगल रूम बुक केली. माझ्या रूमच्या खिडकीतून व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनची सुंदर देखणी इमारत दिसत होती. तिच्याकडे पहात चहाचे घोट घेता घेता.. “आजच्या केसचा निकाल काय लागणार.. ?” याबद्दलचेच विचार मनात घोळत होते.

नरिमन पॉईंट वरील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचलो तेंव्हा किंचित स्थूल, ठेंगणे आणि जाड भिंगाचा चष्मा असलेले, दुभाषी नावाचे एक सिनियर चीफ मॅनेजर तिथे माझी वाटच पहात थांबले होते. माझं स्वागत केल्यावर “चला.. आपण आधी RBI च्या ऑफिसजवळ पोहोचू आणि मग तिथेच नाश्ता करू” असं ते म्हणाले. टॅक्सीतून आम्ही भायखळ्याच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करता करता दुभाषी साहेब म्हणाले.. “मी तुमच्या केसचा नीट अभ्यास केला आहे. सर्व मुद्दे आपल्या विरुद्ध आहेत. ही केस आपण जिंकण्याची एक टक्काही शक्यता नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो, जास्तीतजास्त पंधरा मिनिटांत लोकपाल Adverse Verdict देतील..”ro official

हे ऐकतांच माझा चेहरा एकदम पडला. बँकेने या गृहस्थांना मला मदत करण्यासाठी पाठविलं आहे की माझं धैर्य खच्ची करून मला नाउमेद करण्यासाठी ? अशी शंकाही माझ्या मनात तरळून गेली.

माझ्या चेहऱ्यावरील खिन्न भाव दुभाषी साहेबांच्या धूर्त डोळ्यांनी अचूक टिपले. काटे चमच्याचा सफाईदार उपयोग करून समोरच्या प्लेटमधील मसाला डोशाचा तुकडा तोंडात टाकीत अत्यंत निर्विकारपणे ते म्हणाले..

“मी खरं तेच सांगतोय.. पण तुम्ही असे निराश होऊ नका. या लोकायुक्त कार्यालयातील एकही केस आपण आजपर्यंत जिंकलेलो नाही. अहो, हे लोकपाल खूपच स्ट्रिक्ट असतात. राष्ट्रीयकृत बँकांचे चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर अशा उच्च पदावरील या व्यक्ती असतात. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असा ह्यांचा सडेतोड खाक्या असतो. त्यामुळे ते तडकाफडकी निर्णय देतात आणि अर्थातच तो निर्णय बहुतांशी बँकेच्या विरुद्धच जातो. असो..! तुम्ही याबाबत जास्त विचार करू नका. ही केस हरलात तरी तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही.”

मी घड्याळात पाहिलं.. अकरा वाजायला आले होते. घाईघाईत खाणं संपवून नॅपकिनने तोंड पुशीत दुभाषी साहेब म्हणाले..

“चला चला.. ! It’s time now !आयुक्तांपुढे वेळेत हजर व्हायला हवं. तुम्ही या माझ्या मागे भराभर..”

तुरु तुरु चालत दुभाषी साहेब रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या लिफ्ट जवळ पोहोचले. लोकायुक्त कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होते. तेथील रिसेप्शनिस्टने आम्ही हजर झाल्याबद्दल नोंद करून तेथील रजिस्टरवर आमच्या सह्या घेतल्या व थोड्याच वेळात तुम्हाला आत बोलावले जाईल असे सांगितले. दुभाषी साहेब तेथील सोफ्यावर बसून वर्तमानपत्रे चाळू लागले. जवळच एका टेबलवर तेथील ऑफिस सुपरिन्टेंडेंट मॅडम बसल्या होत्या. माझ्याकडे पाहून त्यांनी जुनी ओळख असल्यागत सुहास्य केले, त्यामुळे मी सरळ त्याच्या टेबलासमोरील खुर्चीवरच जाऊन बसलो.

त्या मॅडमचं नाव स्नेहलता होतं. त्यांनी सहज माझी चौकशी केली.. कुठून आलात ? कसली केस आहे ? वगैरे.. वगैरे. मीही त्यांना थोडक्यात केसची माहिती दिली. तसंच लिहून आणलेला घटनाक्रम व वर्तमानपत्रातील कात्रणेही त्यांना दाखविली. सुखदेवचा काळाकुट्ट पूर्वेतिहास, रुपेशने दिलेला घटनेतील सहभागाचा कबुलीजबाब, पोलीसांचा पक्षपातीपणा व तपासातील जाणूनबुजून केलेली दिरंगाई याबद्दलही त्यांना सांगितलं. माझी कहाणी ऐकून त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल सहानुभूती दाटून आली.

“अरेरे..! खरं म्हणजे सध्या ज्या लोकपाल मॅडम आहेत ना, त्या माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रीण सुद्धा आहेत. एरव्ही त्यांना तुमची केस समजावून तुम्हाला मदत करणं मला नक्कीच आवडलं असतं. पण.. काय करू ? दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी इथे आली आहे..!”

“म्हणजे ? मी समजलो नाही, चुकीची वेळ म्हणजे ? आणि.. लोकपाल ह्या महिला असून तुमची मैत्रीण आहेत ?”

जरासं असमंजस होऊनच मी विचारलं..

“होय.. सध्या असलेल्या Ombundsman मॅडम.. लोपामुद्रा सेनगुप्ता त्यांचं नाव.. ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे.. आम्ही इथे मुंबईतच एकत्रच शिकलो आहोत.. कार्यकाल संपल्यामुळे आज त्यांचा ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच तुमची ही एकमेव केस आज त्यांनी हिअरिंग साठी ठेवली आहे. उद्या नंतर कदाचित एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची चेअर(वू)मन किंवा RBI च्या डेप्यु. गव्हर्नर म्हणूनही त्यांची नेमणूक होऊ शकते.”

आमचं असं बोलणं सुरू असतांनाच सुखदेव बोडखेने आपली पत्नी, मुलगा व एक दोन वकिलांना घेऊन ऑफिसात प्रवेश केला. मला पाहतांच त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद प्रकटला. मोठ्याने ओरडून तो म्हणाला..

“अरे वा ! आले का साहेब रडत, बोंबलत, फरफटत.. वैजापूर टू मुंबई..! पाहिला नं, कसा आहे माझा इंगा..?”

मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आमच्या नावाचा पुकारा झाला आणि आम्ही सगळे लोकपालांच्या न्यायकक्षात गेलो.

अंदाजे चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान वय, मानेपर्यंतच केस असलेला आकर्षक प्लश बॉब कट, स्लीव्हलेस ब्लाऊझ, टपोरे सुंदर पाणीदार डोळे, धारदार नाक, गोरापान रंग, उंच कमनीय सडपातळ बांधा, चापून चोपून नेसलेली साधी पण सुंदरशी साडी अशा मोहक व्यक्तिमत्वाच्या लोपामुद्रा मॅडमनी सुहास्य वदनाने आमचं स्वागत केलं. आमच्या केसचा मॅडमनी सखोल अभ्यास केलेला असावा. रत्नमालाबाईंकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या..

banking ombudsman

“तुम्ही.. तक्रारदार मिसेस बोडखे ना ? तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा..”

लोकपाल मॅडमनी एवढं म्हणायचाच अवकाश की दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर अत्यंत दीन, असहाय भाव आणीत सुखदेव उभा राहिला आणि म्हणाला..

“तिला काय विचारता मॅडम ? दुःखाने तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही. आमची अशी काय चूक झाली की बँकेने एका रात्रीत आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब करून आम्हाला कफल्लक केलं.. बँक म्हणते की कोणीतरी आम्हाला दिलेल्या चेकबुक मधील चेकवर खोटी सही करून पैसे काढले आहेत. पण माझं चेकबुक तर माझ्याजवळच आहे. दुसरं जे चेकबुक आम्हाला दिलं होतं असं बँक म्हणते, त्या चेकबुक इश्यू रजिस्टरवर आम्हा कुणाचीही सही नाही. तसंच आमचा चेकबुक मागणी अर्ज देखील बँक दाखवू शकत नाही. मग बॅंकेच्या या निष्काळजीपणाची आम्हाला का सजा देता ?

मॅडम, मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून सरकारी खात्यातील एक जबाबदार कर्मचारी आहे. हे पैसे शेती घेण्यासाठी बायकोचे दागिने मोडून मी बँकेत जमा केले होते. मला पेन्शन नाही, त्यामुळे रिटायरमेंट नंतर शेती करून उदरनिर्वाह करण्याचा माझा विचार आहे. या प्रकरणी आधीच खूप उशीर झालेला आहे. बँकेची चौकशी व तपास जेंव्हा पूर्ण व्हायचा तेंव्हा होवो. पण आम्हाला मात्र आमचे कष्टाचे पैसे ताबडतोब व्याजासहित आपण मिळवून द्यावेत हीच हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती..!”

हुंदके देत, दुःखी, केविलवाण्या, बापुड्या अभिनयाची पराकाष्ठा करीत अवघ्या शरीराची थरथरती हालचाल करीत डोळ्यातील अश्रू पुसत सुखदेव खाली बसला. त्याच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या.. तद्दन नाटकी पण तरीही दमदार व भावपूर्ण वक्तृत्वाचा लोपामुद्रा मॅडमवर अपेक्षित परिणाम झालेला दिसला. माझ्याकडे रागाने पहात त्या कडाडल्या..

“तुम्हीच रिप्रेझेंट करताय ना बँकेला ? काही वेगळं सांगायचंय का तुम्हाला ? तक्रारदाराने आत्ता जे सांगितलं ते खोटं आहे असं तुम्ही सिद्ध करू शकता काय ? तसा काही नवीन, कागदोपत्री पुरावा आहे का तुमच्याकडे ? आणला असेल सोबत तर वेळ न घालवता ताबडतोब सादर करा..!”

“पण.. मॅडम, फोरेन्सिक डिपार्टमेंटचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. त्यामुळे चेकवरील सही खरी (जेन्यूईन) आहे की बनावट (फोर्ज) आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही..”

मी कसंबसं चाचरतच म्हणालो..

“अहो, पण जर तो चेकच तक्रारदाराला दिलेल्या चेकबुक मधील नाही तर मग सहीच्या खरे खोटेपणाचा प्रश्नच कुठे येतो ? आणि.. आणखी किती वेळ घ्याल तुम्ही सहीचा खरेपणा तपासण्यासाठी ? तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही ? हे जे समोर बसले आहेत, ते तुमचेच कस्टमर आहेत ना ? त्यांची अवस्था बघा..! तुम्हाला त्यांची काहीच काळजी नाही कां ?”

मॅडमच्या त्या उग्रावतारापुढे गप्प बसणंच मी शहाणपणाचं आणि इष्ट समजलं. उद्वेगपूर्ण निराशेनं मान हलवीत माझ्याकडे पहात लोपामुद्रा मॅडम म्हणाल्या..

“ते काही नाही.. Enough is enough..! बँकेने तक्रारदाराला सात दिवसांच्या आत चेकची संपूर्ण रक्कम यथायोग्य व्याजासहित परत करावी असा मी आदेश देते. या आदेशाचं तंतोतंत पालन न झाल्यास संबंधित बँकेविरुद्ध या कार्यालयातर्फे उचित ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..”

लोकपाल मॅडमचा “फैसला” ऐकताच माझ्या शेजारी बसलेले दुभाषी साहेब आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर जाण्यापूर्वी हलक्या आवाजात मला म्हणाले..

“अगदी अपेक्षितच निकाल होता. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.. पण एक बरं झालं, उगीच ताटकळत न ठेवता लवकर निकाल दिला मॅडमनी.. आता थोड्याच वेळात मॅडम निकालाची एक प्रत तक्रारदाराला व दुसरी बँकेला.. म्हणजे तुम्हाला देतील. तुम्ही ती निकालाची प्रत तुमच्या रिजनल ऑफिसला व झोनल ऑफिसला पाठवून द्या. मीही आमच्या कार्यालया मार्फत हेड ऑफिसला निकालाची माहिती देतो. येतो मी..”

असं म्हणून दुभाषी साहेब त्या लोकपाल कक्षाच्या दारापर्यंत गेले आणि मग काहीतरी आठवल्या सारखं करून मागे फिरून माझ्याजवळ येत म्हणाले..

“मी आता परत ऑफिसात न जाता माझ्या घरी जातोय. तेवढाच फॅमिली बरोबर वेळ घालवता येईल. आता थेट उद्याच ऑफिसला जाईन. संध्याकाळी उशिरापर्यंत लोकपाल कार्यालयातच होतो, असं सांगणार आहे DGM साहेबांना.. आमच्या ऑफिसातून कुणाचा फोन आला तर तुम्हीही तसंच सांगा.. आणि हो, निकाल विरुद्ध केला म्हणून मूड खराब करून घेऊ नका. एवीतेवी इथपर्यंत आलाच आहात तर थोडीशी मुंबई फिरून घ्या. बा ssss य..!”

माझ्या खांद्यावर हलकंसं थोपटून हात हलवीत निरोप घेत दुभाषी साहेब निघून गेले. मी घड्याळात पाहिलं.. आता कुठे फक्त साडेबारा वाजले होते. सेनगुप्ता मॅडम त्यांच्या पी. ए. ला निकालाच्या आदेश व अटींबाबत डिक्टेशन देत होत्या आणि त्यानुसार तो पीए भराभर टायपिंग करत होता. डिक्टेशन संपताच टाईप केलेले कागद सहीसाठी त्याने मॅडम समोर ठेवले व त्यांनी सही करतांच ते कागद दोन लिफाफ्यात टाकून माझ्या व सुखदेवच्या हातात दिले.

सुखदेवने लिफाफा उघडून आदेशाची प्रत वाचली. त्यातील “व्याजासहित चेकची संपूर्ण रक्कम सात दिवसांच्या आत द्यावी..” हे शब्द वाचून आनंद व अतीव समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले. तिथूनच अदबपूर्ण कृतज्ञतेने मान झुकवून, कमरेत वाकून त्याने मॅडमना नमस्कार केला आणि म्हणाला..

“तुमचे खूप खूप आभार, मॅडम ! हा निकाल देऊन एका गरीब असहाय्य कुटुंबाला न्याय मिळवून दिलात तुम्ही.. तुमची सदैव प्रगती होवो, तुमचं कल्याण होवो अशाच मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो मॅडम तुम्हाला माझ्या कुटुंबातर्फे..”

लोकपाल मॅडम डायसच्या मागील दाराने त्यांच्या चेंबर मध्ये निघून गेल्यावर माझ्याजवळ येऊन माझ्याकडे कीव मिश्रित दयेच्या भावाने पहात सुखदेव म्हणाला..

“अरेरे.. साहेब..! अहो, हे काय झालं..? तुमची तर आत्ताच हवा गुल झाली. मग उद्या जेंव्हा मी वैजापुरात विजयी मिरवणूक काढून बँकेसमोर पब्लिक जमवून धांगडधिंगा करत तुमच्याविरुद्ध घोषणा देईन तेंव्हा तुमची काय हालत होईल ? आणि.. उद्याच्या पेपर मधील तुमच्या बदनामीच्या ठळक अक्षरातील बातम्या वाचून तर तुम्ही बहुदा आत्महत्याच करून घ्याल.. खूप मजा येणार आहे आता..! उद्या वैजापुरात भेटूच.. !!”sukhdev bodkhe

निकालाचा लिफाफा उंचावून जणू नाचतच आपल्या लवाजम्यासह सुखदेव निघून गेला. खिन्न मनानं जड पावलांनी मी रिसेप्शन रूम मध्ये आलो. ऑफिस सुपरिन्टेंडेंट स्नेहलता मॅडमनी ईशाऱ्यानेच मला जवळ बोलावलं.

(क्रमश:)

 

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-11 एका बँकरचे थरारक अनुभव-11

ombudsman

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

यापूर्वीचे कथानक-

सोमवारचा दिवस उजाडला.. सकाळ पासूनच आपल्यासोबत आज काहीतरी आकस्मिक, अनुचित व भयंकर अशुभ असं घडणार आहे अशी अंतर्मनात अनामिक हुरहूर लागून राहिली होती. दहा वाजता बँकेत पोहोचून केबिनमध्ये प्रवेश करतो न करतो तोच माझ्या मागोमाग चहावाला राजू घाईघाईत आत शिरला. आज नेहमी सारखी त्याच्या हातात चहाची किटली सुद्धा नव्हती. चेहऱ्यावर भीतीचे भाव असलेला आणि बोलताना थरथर कापणारा राजू आपले डोळे मोठ्याने विस्फारून सांगू लागला..
 
“साहेब घात झाला.. तुम्हाला फसविण्यासाठी पोलिसांनी भयंकर कट आखला आहे. रुपेश आत्ता पोलीस स्टेशनमध्ये बसला आहे, आणि पोलिसांनी पढविल्याप्रमाणे नवीन, सुधारित कबुलीजबाब देतो आहे.
“मॅनेजर साहेब व अन्य स्टाफच्या सांगण्या वरूनच मी या गुन्ह्यात सामील झालो होतो व या फसवणुकीचा संपूर्ण प्लॅन मॅनेजर साहेब व स्टाफ यांनीच तयार केला होता..”
असा त्याचा सुधारित कबुलीजबाब आहे..”

बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 11)

राजू चहावाल्याने आणलेली ती भयंकर बातमी माझ्यासाठी खरं तर एखाद्या बॉम्बगोळ्याच्या स्फोटा सारखीच सुन्न करून टाकणारी होती. परंतु हे प्रकरण सुरू झाल्यापासून एकामागून एक एवढी संकटे अनपेक्षितपणे येऊन आमच्यावर कोसळत होती की आता त्या संकटांची मनाला जणू सवयच झाली होती. काळीज घट्ट झालं होतं.. रोज दिवस उजाडला की आज कोणत्या नवीन आपत्तीचं ताट आपल्यापुढे वाढून ठेवलं आहे याचीच आम्ही वाट पहात असू..

या नेहमीच वाईट बातमी आणणाऱ्या राजूचाही अलीकडे मला रागच यायला लागला होता. शेवटी काही झालं तरी हा देखील एकप्रकारे पोलिसांचा वसुली एजंटच. कशावरून तो हेतुपुरस्सर आणि पोलिसांच्या सांगण्यावरूनच अशा घाबरवून टाकणाऱ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवित नसेल ? तसंही एका क्षुल्लक चहाविक्या माणसाला.., भलेही तो कितीही हितचिंतक असला तरी, सतत इतकं महत्व देणं बुद्धिसंगत नव्हतंच. मनाशी काहीतरी निश्चय करून राजूला म्हणालो..

“हे बघ, आतापर्यंत या प्रकरणात तू आम्हाला वेळोवेळी जी मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.. पण.. ! यापुढे त्या पोलीस स्टेशन मधील कोणतीही बातमी.. मग आमच्या दृष्टीने ती कितीही महत्वाची असो, तू आम्हाला सांगायची नाहीस. पोलीस काहीही करू देत, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कोणतीही चूक, कोणताही अपराध केलेला नाही. उलट पोलिसच त्यांच्या कर्तव्यात कसूर करीत आहेत. गुन्हेगारांचा शोध लावून अपराध्यांना शासन करणं हेच खरं तर त्यांचं मुख्य काम. पण ते करायचं सोडून ते आमच्या सारख्या निरपराधांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देत आहेत.

जा..! जाऊन सांग त्यांना की आम्ही त्यांना अजिबात भीत नाही. आणि..! यापुढे आम्हाला त्रास देण्याचा पोलिसांनी जराही प्रयत्न केला तर आम्ही थेट पोलीस कमिशनर पर्यंत हे प्रकरण नेऊ.”

माझा तो करारी बाणा पाहून राजू गडबडूनच गेला. दोन्ही कानांना हात लावीत तो म्हणाला..sanju chaywala

“अहो, साहेब..! तुम्ही तर नाराज झालात.. तुम्हाला वाटतंय तसं पोलिसांनी मला इथे पाठवलं नाही. तिथे प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं, ऐकलं तेच सांगून तुम्हाला सावध केलं इतकंच. याउप्पर तुमची मर्जी ! तुम्ही तुमच्या मनाला पटेल ते करा.. येतो मी..!”

एवढं बोलून राजू  परत जाण्यासाठी वळला तेंव्हा त्याला मी म्हणालो..

“थांब ! आणखी एक लक्षात ठेव.. !! बाहेर हॉल मध्ये कोणत्याही स्टाफला किंवा अगदी कस्टमरला देखील तू यापुढे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी पुरवायची नाहीस. जर मला असं आढळून आलं तर बँकेबाहेरील तुझी चहाची टपरी मी तात्काळ उखडून फेकून देईन..”

माझे शब्द ऐकून राजूने अविश्वासाने मागे वळून पाहिलं.. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्या चेहऱ्यावरील क्रुद्ध भाव पाहून खाली मान घालून निमूटपणे तो निघून गेला.

मी त्या त्रस्त, विमनस्क पण तरीही ठाम निश्चयी मूड मध्ये असतानाच माझा मोबाईल खणाणला. पलीकडून ॲडव्होकेट जोगळेकर बोलत होते. “फक्त प्रत्येकी पन्नास हजार रुपये आगाऊ जमा केल्यास चार्जशीट मधून तुम्हा साऱ्यांची नावे एक एक करून वगळून देतो..” असं ते म्हणत होते. बहुधा रश्मीनेच त्यांना आम्हाला तसा फोन करण्याची गळ घातली असावी. मला सर्वांच्याच या लुटारू वृत्तीचा मनस्वी उबग आला होता. त्या तिरिमिरीतच मी वकील साहेबांना म्हणालो..

“चार्जशीट मधून नाव गाळण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यापेक्षा त्या सुखदेवच्या तोंडावर जर दोन लाख रुपये फेकले तर तो आमच्या विरुद्धची तक्रारच मागे घेईल आणि संपूर्ण चार्जशीटच रद्द होईल. In fact, आम्ही दोन लाख रूपये न दिल्यामुळेच त्याने आम्हाला या बनावट खटल्यात गोवलं आहे. तेंव्हा आता सुखदेवला त्याचं काम करू देत, पोलिसांना पोलिसांचं काम करू देत आणि तुम्हीही तुमचं अटकपूर्व जामीन मिळवून देण्यापुरतंच काम करा. चालू दे खटला जितकी वर्षं चालायचा तो..

तसंही हस्ताक्षर तपासणी अहवालात जर चेक वरील सही बनावट असल्याचं आढळून आलं तर नियमानुसार सुखदेवला त्याच्या खात्यातून त्या चेकद्वारे काढली गेलेली संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी लागणारच आहे. आणि त्यानंतर केस आपोआपच संपुष्टात येईल. त्यामुळे सॉरी ! तुमच्या या ऑफर मध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही.. “

एवढं बोलून मी फोन कट केला.

अशाप्रकारे कोर्ट केसचं, सुखदेवचं, पोलिसांचं, रश्मीचं, वकील साहेबांचं असं सगळं टेन्शन एका झटक्यात झुगारून दूर फेकून दिल्यामुळे मला आता एकदम मोकळं मोकळं वाटत होतं.relaxed man

त्यानंतरचे दोन दिवस खूप शांततेत गेले. या काळात सुखदेव, संजू किंवा पोलीस यापैकी कुणीही बँकेकडे फिरकलं सुद्धा नाही. संजूने तर त्याचं हॉटेलही बंदच ठेवलं होतं. मध्यंतरीच्या काळात बँकेच्या दैनंदिन कामाकडे खूपच दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे महत्वाची पेंडिंग राहिलेली कामे उरकण्यात मी गुंगून गेलो.

दरम्यान रविशंकर आणि बेबी सुमित्रा ह्या दोघांनाही औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयातून रीतसर अटकपूर्व जामीन मिळाला. अर्थात त्याबद्दल आता फारसं कौतुक, नावीन्य, अप्रूप किंवा आनंद उरला नव्हता. निर्बुद्ध आणि संवेदनाहीन पोलिसांच्या हडेलहप्पी वर्तणुकीपासून बचाव करण्याची सावधगिरीची एक कायदेशीर प्रक्रिया संपली होती इतकंच. संध्याकाळी रहीमचाचा, रविशंकर, सैनी आणि बेबी हे चौघेही मला भेटण्यासाठी केबिन मध्ये आले तेंव्हा ही जामीन मिळाल्याची बातमी सांगण्यासाठीच ते आले असावेत असंच मला वाटलं.

“सर, हम सब आपसे एक रिक्वेस्ट करने आए है..”

खाली मान घालून अतिशय नम्रपणे रहीमचाचांनी बोलायला सुरुवात केली.

“बात ये है कि हमे कहींसे मालूम पड़ा के आपने रश्मी मॅडम की ऑफर स्वीकार कर ली है और जल्द ही आप का नाम पुलिस की चार्जशीट से हटाया जाएगा..”

“किसने बताया आपको ? ये सरासर झूठ है…” मी गडबडून उत्तरलो. पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रहीम चाचांनी आपलं बोलणं तसंच सुरू ठेवलं.

“सर, हम जानते है कि इस पूरे मामले में आपका दूर दूर तक कोई ताल्लुक नही है और आपके खिलाफ कोई भी गुनाह पुलिस या फिर्यादी के वकील साबित नही कर सकते। लेकिन हमारे हालात आपसे बिलकुल विपरीत है। सभी सबूत हमारे खिलाफ है। अगर सावधानी और होशियारी से काम न लिया गया तो कोर्ट हमे दोषी करार दे सकता है। सिर्फ और सिर्फ आप के भरोसे ही हम ये केस लड़ने की हिम्मत जुटा पा रहे है। अगर आपनेही खुद को इस मामले से अलग कर लिया तो फिर हम तो पूरी तरह बर्बाद हो जाएंगे..”

बोलता बोलता रहीम चाचांचे डोळे भरून आले.

“हे पहा, अशी कोणतीही शंका तुम्ही आपल्या मनात आणू नका. ही केस आपण सगळे मिळून एकत्रच लढणार आहोत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्याला या खोट्या केस मधून कोर्टाद्वारे निर्दोष मुक्तता करून घ्यायची आहे..”

मी त्या चौघांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावरील भय अजूनही तसेच दिसत होते. थरथरत्या आवाजात रहीम चाचा म्हणाले..

“सर, ये बेचारा रविशंकर.. दूर बिहार से आया है.. अभी अभी प्रमोशन मिला और इस संकट में फंस गया.. इसकी पत्नी और माँ, दोनों चिंता के मारे बेहाल है.. ये सैनी.. इसके बिबीबच्चे दिल्ली में रहते है और मिलने के लिए यहां आना चाहते है, लेकिन इस केस के कारण इसने उन्हें रोक रखा है.. सुमित्रा बेबी तो ये नौकरीही छोड़ने का मन बना चुकी है.. मेरे भी नौकरी के सिर्फ दो साल ही बचे है.. मेरा क्या होगा ? मुझे पेन्शन मिलेगा के नहीं ? ये चिंता मुझे रात दिन सताती है.. मै हाथ जोड़कर आपसे बिनती करता हूँ, प्लीज प्लीज.. आप खुद को इस केस से अलग मत कीजिए..”

आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी हाथ जोडून उभे असलेल्या माझ्या त्या चारही सहकारी कर्मचाऱ्यांना पाहून मला गलबलून आलं. खुर्चीवरून उठून मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना खांद्यावर थोपटलं आणि म्हणालो..

“तुम्ही असे घाबरून जाऊ नका. आपण प्रामाणिक आहोत आणि आपल्या कुणाच्याही हातून कोणतीही चूक किंवा गुन्हा घडलेला नाही, हे तर आपल्याला पक्कं ठाऊक आहे ना ? मग झालं तर ! हा पोलिसांचा आणि बदनामीचा त्रास.. हा तात्पुरता आणि अल्पकाळासाठी आहे. तो तर आपल्याला सहन करावाच लागेल. मात्र या दुर्दैवी घटनेत आपण पूर्णपणे निर्दोष आहोत याबद्दल या वैजापुरातील प्रत्येकाला खात्री आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या वरिष्ठांचाही या प्रकरणात आपल्याला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य आहे. तेंव्हा थोडा धीर धरा आणि निश्चिन्त रहा. तुम्हाला पोलिसांकडून किंवा अन्य कुणाकडून ही यापुढे कसलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन..”

त्या चौघांनाही बसायला सांगून त्यांच्यासाठी चहा मागवला. वरवर जरी ते सारे शांत झाल्यासारखे दिसत असले तरी मधूनच त्यांच्या डोळ्यात अविश्वासाचे भाव उमटून जात होते. चहा पिऊन निमूटपणे केबिन बाहेर जाताना ते सारखे मागे वळून माझ्याकडेच पहात होते.

तत्पूर्वी, खोदून खोदून विचारलं तरीही “रश्मी मॅडमची ऑफर मी स्वीकारली आहे.. ही बातमी कोठून समजली ?” या माझ्या प्रश्नावर त्या चौघांनीही “माफ करा, आम्ही ते सांगू शकत नाही..” असं म्हणत मौनच स्वीकारणं पसंत केलं होतं..

सुखदेवने ज्या विविध न्याय यंत्रणांकडे बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यातीलच एक न्याय व्यवस्था होती “डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम” अर्थात जिल्हा ग्राहक मंच. ग्राहकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असून सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत सिव्हिल जजला असणारे सर्व अधिकार या संस्थेतील जजला असतात. बँकेकडून 30 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण न झाल्यास एक साधं ॲफिडेव्हीट दाखल करून कोणताही ग्राहक या मंचाकडे तक्रार दाखल करू शकतो. सुखदेवची तक्रार दाखल करून घेतल्यावर औरंगाबादच्या ग्राहक मंचाने नियमानुसार कोर्टापुढे हजर राहण्यासाठी बँकेविरुद्ध समन्स जारी केलं. बँकेचा प्रतिनिधी म्हणून ही केस सुद्धा अर्थात मलाच लढावी लागणार होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टात हजर झालो तेंव्हा तिथे अगोदरपासूनच सुखदेव आपल्या तीन वकिलांच्या ताफ्यासह जय्यत तयारी करून आलेला दिसला. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर “आता कशी जिरली..!” चे भाव उमटले. माझ्या जवळ येऊन तो म्हणाला..

“तरी चांगलं सांगत होतो तुम्हाला की मला हवे तेवढे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाका म्हणून.. पण तुम्ही पडले तत्ववादी.. अती इमानदार..! आता भोगा आपल्या इमानदारीची फळं.. अहो, ही तर फक्त सुरवात आहे. वेगवेगळ्या कोर्टांच्या, सरकारी कार्यालयांच्या एवढ्या फेऱ्या मारायला लावीन तुम्हाला की त्या येरझारांनीच तुमचा अर्धा जीव जाईल.. मग केस परत घ्यायची विनंती करत याल तुम्ही माझ्याकडे.. हात जोडून माफी मागत.. “

सुखदेवची अशी उपरोधिक, उर्मट बडबड सुरू असतानाच माझ्या नावाचा पुकारा झाला.

“चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही का घेतली नाही ?”

“कस्टमरचा चेक बुक मागणी अर्ज कुठे आहे ?”

“बँकेने अद्याप कस्टमरला नुकसान भरपाई का दिली नाही ?”

सुखदेवच्या वकिलांनी तसेच कन्झ्युमर कोर्टाच्या जजने विचारलेल्या वरील पैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माझ्याजवळ नव्हते.

“विवादित चेक वरील सहीचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी बँकेने हैदराबाद येथील फोरेन्सिक डिपार्टमेंट कडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसान भरपाई देण्याबद्दल बँक आपल्या नियमानुसार योग्य तो निर्णय घेईल..”

कसेबसे एवढेच उत्तर मी त्यांना देऊ शकलो. माझ्या उत्तराने कोर्टाचे अजिबात समाधान झाले नाही. या प्रकरणी होत असलेल्या बिलंबा बद्दल व ग्राहकांप्रतीच्या असहानुभतीपूर्ण वागणुकीबद्दल बँकेला दोषी मानून, लवकरात लवकर ग्राहकाला न्याय न मिळाल्यास नुकसान भरपाईचा एकतर्फी आदेश देण्यात येईल अशी कोर्टाने तंबी दिली.

ग्राहक मंचाचा निकाल सहसा ग्राहकाविरुद्ध जात नाही. त्यामुळे या कोर्टाचा निकाल नक्कीच आमच्या विरुद्धच जाणार याची मनोमन जाणीव असल्यामुळे रिजनल ऑफिसला कोर्टाने दिलेल्या तंबीबद्दल कळवून या प्रकरणी बँकेतर्फे ताबडतोब सक्षम वकील नेमण्याची विनंती केली. त्यानुसार प्रसिद्ध ॲडव्होकेट ऋतुराज यांची बँकेने या प्रकरणी वकील म्हणून नेमणूक केली.

चेकवरील सहीचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी पोलिसांनी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे विवादित चेक व बँकेकडील ग्राहकाच्या सहीचा नमुना पूर्वीच पाठविला होता. मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यास खूप उशीर लागेल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आमच्या बँकेच्या सूचनेनुसार हैदराबाद स्थित सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) या नामांकित संस्थेकडे मी चेकची कलर झेरॉक्स व सहीचा नमुना (Speciman Signature) पडताळणीसाठी पाठवून दिला होता. त्यांचाही अहवाल अजून प्राप्त झाला नव्हता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टातून बाहेर पडताना विजयी हास्य करीत सुखदेव म्हणाला होता,

“आता महिन्याभरातच तुमच्या बँकेकडून चेकची रक्कम 11 टक्के व्याजासहित वसूल करेन आणि मग तुम्ही दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल भली मोठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी वेगळा दावा याच ग्राहक मंचात ठोकेन. त्यानंतर फौजदारी खटल्यातून तुम्हा पाचही जणांना कठोर शिक्षा होईल याचीही पुरेपूर काळजी घेईन.. या सुखदेवशी पंगा घेतल्याचे काय परिणाम होतात ते समजेल तुम्हाला आता.. उद्याचा पेपर बघाच.. कशी चविष्ट बातमी छापून आणतो तुमच्या आजच्या कोर्टातील फजितीची..”

बोलल्याप्रमाणे खरोखरीच सुखदेवने दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत कन्झ्युमर कोर्टाने केलेल्या कानउघाडणीची बातमी छापून आणली होती. मात्र ती बातमी वाचून पोलिसांचे कान मात्र उगीच ताठ झाले. ह्या सुखदेवने जर बँकेकडून परस्परच रक्कम वसूल केली तर मग आपल्या हिश्श्याचं काय ? तो कसा वसूल करणार ? असा प्रश्न बहुदा त्यांना पडला असावा. त्यामुळेच फौजदार साहेबांनी ताबडतोब मला फोन करून “कुठल्याही परिस्थितीत पोलिसांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बोडखे कुटुंबाला चेकची रक्कम देण्यात येऊ नये..” असे निक्षून बजावले.

केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग तसेच अन्य अनेक सामाजिक संस्थांकडे तक्रार अर्ज करून सुखदेवने या प्रकरणी त्याच्या कुटुंबाला त्वरित न्याय देण्याची मागणी केली होती. त्या सर्व सामाजिक संस्था व सरकारी कार्यालयांनी पाठविलेल्या नोटिसींना उत्तरे देण्यात तसेच बोगस अर्जाद्वारे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागविलेली अर्थहीन माहिती पुरविण्यातच माझा दिवसातील बराच वेळ खर्च होत होता. निरुपद्रवी दिसणाऱ्या या सुखदेवने आणखी कुठे कुठे दाद मागितली असावी ? याबद्दल विचार करत बसलो असतांनाच टेबला शेजारील फॅक्स मशीनवरून रिजनल ऑफिसचा अर्जंट मेसेज आला..

“उद्या सकाळी ठीक अकरा वाजता रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल (Banking Ombundsman) कार्यालयात सौ. रत्नमाला बोडखे यांनी वैजापूर शाखेविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची सुनावणी असून बँकेचा प्रतिनिधी म्हणून तिथे हजर राहण्यासाठी ताबडतोब मुंबईला निघावे..”

(क्रमशः)

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

आठवणीतले झाकीरभाई- remembering Zakir bhai

zakir hussain

 

सहेली.. शब्द प्रांगण या ग्रुप मध्ये, श्री सौरभ जोशी यांचा आलेला लेख, खूप आवडल्याने, इथे, मूळ लेखकाच्या नांवासकट प्रकाशित करत आहोत.

 

आठवणीतले झाकीरभाई

 

सौरभ जोशी

 

 

 

झाकीरभाई अनंताच्या प्रवासाला गेले, आणि माझ्या मनात त्यांच्या आठवणींचं मोहोळ उठलं. अर्थात त्यांचा भरपूर सहवास लाभावा, इतका मी भाग्यवान नव्हतो. पण माझ्याकडच्या चिमुटभर पुण्याईच्या शिदोरीवर माझ्या आयुष्यात त्यांच्याबरोबर जे काही चार क्षण घालवायचं भाग्य मला लाभलं, ते क्षण म्हणजे साक्षात अमृतशिंपण करणारे होते. त्याविषयी हा छोटा लेखनप्रपंच.

तर, मी चार वर्षांचा असताना झाकीरभाईंना पहिल्यांदा पाहिलं. त्याचं झालं असं की, बोरिवलीला भाटिया हॉलमध्ये इतर काही कलाकारांबरोबरंच अब्बाजी आणि झाकीरभाईंच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. तेव्हा झाकीरभाईंनी जो काही तबला वाजवला, त्याने मी जो संमोहित झालो, तो कायमचा. मला त्यांचं वादन आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं आवडलं, की चार वर्षांचा मी आई बाबांना म्हणालो, “माझी मुंज भाटिया हॉलमध्ये करायची, कारण तिथे झाकीरभाई येतात”. आपण किती मोठ्या कलाकाराबद्दल असं म्हटलं, याची तेव्हा माझ्या बालमनाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचं मोठेपण नंतरच्या जीवनात त्यांच्या कार्यक्रमांतून, त्यांना भेटण्यातून, त्यांच्याशी थोडंफार जेव्हा केव्हा बोलायला मिळालं, त्यातून उलगडत गेलं.

 

कलाकार किती नम्र असावा, याचा मूर्तिमंत वस्तुपाठ झाकीरभाई पदोपदी घालून देत असंत. त्याविषयी काही आठवणी सांगतो.

 

१९९३ साली फेब्रुवारी महिन्यात उ.अमीर हुसेन खॉं साहेबांच्या बरसीनिमित्त दादरला छबिलदास विद्यालयात एकल तबलावादनाचे कार्यक्रम होते. त्यात शेवटी झाकीरभाईंचं एकल तबलावादन होतं. नगम्याला सारंगीवर उ.सुलतान खाँसाहेब. मी आणि माझा भाऊ दीपक जोशी इतके भाग्यवान होतो, की कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होऊन सगळे गिचमिडीत बसले असताना, फूटभरच उंची असलेल्या स्टेजच्या अगदी पुढ्यात, झाकीरभाईंपासून अगदी दोन हात अंतरावर स्टेजला खेटूनंच आम्ही बसलो होतो आणि अख्खा कार्यक्रम ऐकला. पं.पढरीनाथ नागेशकर, पं.अरविंद मुळगावकर, पं.सुरेश तळवलकर पं.भाई गायतोंडे, पं.सुधीर माईणकर, अशी अनेक बुजुर्ग खानदानी तबलाविद्यालयं बाजूला बसली होती. झाकीरभाई आणि खाँसाहेब मंचावर स्थानापन्न झाल्यावर निवेदक श्रीकृष्ण जोशी यांनी “ज्यांचं एकल तबलावादन ऐकण्यासाठी आपण सारे खूप वेळ उत्सुक आहोत, ते उस्ताद झाकीर हुसेन मंचावर विराजमान झाले आहेत” असं म्हणून त्यांचं स्वागत केलं. तेव्हा त्यांचं निवेदन पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना थांबवून झाकीरभाईंनी माईक हातात घेतला, आणि म्हणाले, “मै एक correction करवाना चाहता हूं l जहा इतने ग्यानी बुजुर्ग कलावंत सामने बैठे हो, जहा उ.अमीर हुसैन खॉंसाहाब जैसे तबलियाकी बरसी हो रही है, जहा बाजू मै यही मंच पे सुलतान खाँसाहाब बैठे हो, ऐसी जगह सरस्वती के मंदिर जैसी बन जाती है l वहा (स्वतःच्या छातीवर हात ठेवून) हम जैसे बच्चोंको उस्ताद कहना ठीक नही है l अगर उस्ताद कहनाही हो, तो उस्ताद सुलतान खां (त्यांच्याकडे हात दाखवून) कहीये l हम तो अभीभी सिख रहे है l गुरजनोंकी कृपा से जो थोडा बहोत बजाता हूं, वो ही बजाकर मै और हम सब मिलके ये बरसी के अवसरपर माता सरस्वतीके चरण मे पूजा करेंगे l” यश आणि कीर्तीच्या परमोच्च शिखरावर पोचलेला हा कलाकार भर मैफिलीत स्वतःला बच्चा म्हणतो, अजूनही शिकतोय, असं म्हणतो, ही किती नम्रता? कलाकार बरेच असतात. पण आपल्यातील कलेच्या अचाट अविष्काराबद्द्ल जराही गर्व न बाळगता इतका साधेपणा, इतका विनयशीलपणा दाखवणारा झाकीरभाईंसारखा कलाकार विरळाच, नव्हे, ऐसा होणे नाही.

 

अशीच अजून एक आठवण. पार्ल्याला लोकमान्य सेवा संघात एकदा झाकीरभाईंचं एकल तबलावादन ऐकायला आणि पाहायला (हो, पाहायला देखील कारण, त्यांचं वादन हे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असं दोन्ही होतं) गेलो होतो. तेव्हाही असाच त्यांच्या पुढ्यात स्टेजला चिकटून बसलो होतो. सारंगीवर उ. सुलतान खाँसाहेब. खॉंसाहेबांनी सारंगीवर सुंदर आलापी सादर करून वातावरण भारून टाकलं, आणि झाकीरभाईंनी आपल्या वादनास सुरूवात केली. पेशकार संपवून कायदा घेतला वाजवायला, त्याची दीडपट करून झाली, दुगुन केली आणि कायदाविस्तार करण्यासाठी पलट्यांमध्ये शिरले. इथपर्यंत वादन सुरू करून साधारण अर्धा तास-चाळीस मिनिटं झाली असतील, आणि प्रख्यात संवादिनीवादक पं.अप्पा जळगावकर सभागृहात प्रवेशते झाले, आणि स्टेजच्या समोरच भारतीय बैठकीवर येऊन बसले. ते पाहून झाकीरभाई वाजवायचे थांबले. प्रेक्षकांना कळेना काय झालं. झाकीरभाई मग स्टेजवरून उतरून अप्पांजवळ आले, भर मैफिलीत स्टेजच्या पुढ्यात गुडघे टेकून अप्पांच्या पायावर डोकं ठेवलं, आणि अप्पांना स्टेजवर घेऊन आले.

तबल्यावरचा माईक हातात घेतला आणि म्हणाले, “आज अप्पाजी का जनमदिन है l मेरा परमसौभाग्य है, की अप्पाजी के जनमदिनपर उनके सामने मै बजा रहा हूं l” असं म्हणून स्वतःला स्वागतपर मिळालेली शाल अप्पांवर घातली, आणि पुन्हा स्टेजवर त्यांना नमस्कार केला. हे सगळं झाल्यावर अप्पा स्टेजवरून खाली भारतीय बैठकीवर, जिथे आधी बसले होते, तिथे उतरून जायला लागले. तेव्हा झाकीरभाई त्यांना म्हणाले, “अप्पाजी, कहा जा रहे हो? रुकीये l” मग श्रोत्यांना उद्देशून म्हणाले,”अप्पाजी जैसे महान कलाकार जब सभागृह मे हो, तो उन्हे स्टेजके सामने बैठकपर बिठाके हम जैसे छोटे लोगोंने स्टेजपर बैठ के बजाना गलत है l” मग अप्पांना उद्देशून म्हणाले, “अप्पाजी, आप यही स्टेजपर मेरे बाजू मे बैठकर मुझे तबला बजाने के लिये आशीर्वाद देते रहीये”, असं म्हणून अप्पांना स्वतःच्या बाजूला बसवून अख्खा सोलो वाजवला. आणि हे सगळं भर कार्यक्रमात, शेकडो प्रेक्षकांसमोर, वादन सुरू करून अर्धा तास होऊन गेल्यावर. झाकीरभाई तबलावादकाबरोबरंच एक माणूस, एक कलाकार म्हणून हे असे होते. इतकी नम्रता मी आजवर कुठल्याही कलाकारात पाहिली नाही. म्हणूनच झाकीरभाई हे व्यक्तिमत्व नव्हतं, तर पुलंच्या भाषेत सांगायचं तर विभूतिमत्व होतं.

 

आता झाकीरभाईंच्या मिश्किलपणाच्या एक दोन आठवणी सांगतो. १९९१ सालची गोष्ट. हरिजींनी त्यांच्या वृंदावन गुरुकुलातर्फे एक पूर्ण रात्र ५ जुगलबंदीचा कार्यक्रम शिवाजी पार्क ला ठेवला होता. त्यात अर्थातच झाकीरभाई देखील तबला वाजवणार होते. मला झाकीरभाईंचा कुठलाही कार्यक्रम मागे बसून पाहायला आवडायचं नाही. कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे मला त्यांचं वादन नुसतं ऐकायचं नसायचं, तर ते पहायचं ही असायचं. त्याचबरोबर झाकीरभाईंच्या मुद्रा, डोळे, उडणारे कुरळे केस, मात्रांचा हिशोब डोक्यात चालू असताना हवेत एका जागी पाहत स्थिर राहणारे त्यांचे पाणीदार डोळे, हे सारं डोळे भरून पाहायचं असायचं. त्याप्रमाणे, मी पुढील रांगेतील महाग तिकिटे असतात वगैरे कसलाही विचार न करता सरळ पहिल्या रांगेतील सोफ्यावर जाऊन बसलो. पण दुर्दैवाने हरिजी आणि झाकीरभाईंची जुगलबंदी सुरु झाल्यावर आमंत्रितांपैकी कोणीतरी हस्ती सोफ्यावर बसण्यास आल्या, आणि मला उठावं लागलं. पण मी इतका बेशरम की, मुकाट्याने मागे आपल्या जागी यायचं सोडून मी सरळ स्टेज च्या झाकीरभाईंच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीवर जाऊन बसलो, आणि झाकीरभाईंना वाजवताना पाहत राहिलो. ती पायरी स्टेज च्या बऱ्यापैकी जवळ होती, म्हणजे अजून २-३ पायऱ्या चढल्या कि थेट स्टेज वरंच…हरिजींबरोबर तबला वाजवताना मध्येच झाकीरभाईंनी मी पायरीवर येऊन बसलोय हे पहिलं. त्यांच्या जागी इतर दुसरा कुठला कलाकार असता, तर त्याने मला तडक उठवलं असतं, किंवा आयोजकांना मला तिथून उठवायला सांगितलं असतं. पण झाकीरभाई माझ्याकडे पाहून मिश्किल हसले, आणि “आता इतक्या जवळ येऊन बसलाच आहेस, तर आता माझ्या बाजूलाच येऊन बस” अशा अर्थी स्व:च्या मांडीच्या बाजूला स्टेज वर हाताने थाप देऊन खूण केली, आणि पुन्हा हसले. हे सगळं हरिजींना तबला साथ चालू असताना …! मी ती संपूर्ण जुगलबंदी तिथेच त्या स्टेज च्या पायरीवर बसून झाकीरभाईंना मनसोक्त डोळ्यात साठवत ऐकली. त्या वेळी रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत झाकीरभाईंनी सलग पाच जुगलबंदींमध्ये वादन केलं. झाकीरभाई आणि अब्बाजी, झाकीरभाई आणि पं.बिरजू महाराज, झाकीरभाई पं.जसराज आणि, झाकीरभाई आणि हरिजी, झाकीरभाई, पं.बिरजू महाराज आणि पं.केलूचरण महापात्रा. झाकीरभाईंच्या वादनातील clarity, वजन, आणि शक्ती जशी आदल्या रात्री नऊ ला होती, तशीच सकाळी पाच ला पाच जुगलबंद्या सलग वाजवून झाल्यावरंही होती. काय अचाट शक्ती आणि उत्साह. हे फक्त आणि फक्त झाकीरभाईच करू जाणोत.

 

त्यांच्या spontaneous sense of humor आणि मिश्कीलपणाची अजून एक आठवण. असंच एकदा नेहरू सेंटर ला गुणीदास संगीत संमेलनामध्ये उ.सुलतान खानसाहेबांचं सारंगीवादन आणि साथीला झाकीरभाई, असं सत्र होतं. खॉंसाहेब आणि झाकीरभाई मंचावर येऊन बसले. निवेदकाने झाकीरभाईंची भरभरून ओळख करून दिली, आणि त्यात एक वाक्य फेकलं, “उम्र के तीन सालसे आपने तबले की शिक्षा प्राप्त करने की शुरुवात की, सात साल की उम्र मे पेहेला प्रोग्राम बजाया, और तभी से अबतक कभी भी पीछे मुडकर नही देखा l” हे वाक्य झाकीरभाईंनी ऐकलं, आणि त्वरीत निवेदकाकडे मागे वळून पाहिलं, आणि म्हणाले “अभी तो देखा l” त्यावर सभागृहात जो हशा पिकला, की विचारायची सोय नाही.

 

आपल्यापेक्षा वयाने, यशाने, कीर्तीने ,ज्ञानाने कितीही छोट्या असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कमी लेखायचं नाही, हा कटाक्ष झाकीरभाईंनी आयुष्यभर पाळला. याचीच साक्ष देणारा माझ्या जीवनात झाकीरभाईंनीच दिलेला अजून एक अनुभव. माझे गुरु पं. मल्हारराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक वर्षी झाकीरभाई आणि फाझलभाई  अशी जुगलबंदी बोरिवली ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित केली होती. त्यादिवशी कार्यक्रमस्थळी झाकीरभाईंना घेऊन यायची जवाबदारी राघुदादाने (श्री. राघवेंद्र कुलकर्णी, म्हणजे माझ्या गुरुजींचे ज्येष्ठ सुपुत्र) माझ्यावर सोपवली होती, नव्हे, राघुदादाकडे हट्ट करून मीच माझ्याकडे खेचली होती…! संध्याकाळी ५-३० च्या सुमारास सांताक्रूझ विमानतळाबाहेरील हॉटेल ऑर्किड मधून झाकीरभाईंना घेऊन बोरिवली ला प्रबोधनकार नाट्यगृहात गाडीने घेऊन यायचे होते. माझ्यासाठी तो उत्सवाचा दिवस होता. झाकीरभाई दिल्लीहून विमानाने मुंबईत येऊन, ऑर्किड ला येऊन, फ्रेश होऊन, कपडे करून पुढे आमच्या कार्यक्रमाला यायचे होते. मी अर्धा तास आधीच ऑर्किड ला पोचलो. ६ वाजून गेले तरी झाकीरभाई दिल्लीहून आले नाहीत. विमान अर्धा पाऊणतास लेट झालं होतं. मग सव्वा सहा च्या सुमारास झाकीरभाई आले. एक साधा डेनिमचा फुल शर्ट आणि जीन्स ची पॅन्ट असा त्यांचा पेहेराव होता. त्या पेहरावात मी झाकीरभाईंना त्यावेळी प्रथम पाहिलं. माझ्या झब्ब्यावरील volunteer च्या बॅचवरून त्यांनी मला लगेच ओळखलं, आणि मी काही बोलायच्या आतच, उशीर झाल्याबद्दल माफी मागितली. मलाच लाजल्यासारखं झालं. इतका महान, जगद्विख्यात, आणि कीर्तीच्या अत्युच्च शिखरावरील कलासूर्य, माझ्यासारख्या किस झाड की पत्ती असणार्या काजव्याची विमानाला उशीर झाल्याने आणि त्यांची काही चुकी नसताना उशीर झाला म्हणून माफी मागतो, याला काय म्हणावे? मी म्हटलं, “झाकीरभाई, it’s ok, आप क्या मुझ जैसे बच्चे को sorry बोल रहे हो l Flight delay हुआ, तो क्या करूं सक्ती है l” मग म्हणाले, “नही नही, आप को इंतजार करना पडा, मुझे अच्छा नही लगा l आप आप यही लॉबी मे बैठो, में १० मिनिट मे तय्यार होके आता हूं l” असं म्हणून त्यांच्या रूमवर गेले, आणि दहाव्या मिनिटाला सलवार कुडता घालून हजर झाले. म्हणाले चलिये. ऑर्किडवरून निघताना तिकडच्या security guard च्या विनंतीस मान देऊन, त्याच्याबरोबर फोटो काढून दिला. आपल्यासमोर जो माणूस येईल, मग तो लहान, थोर, कुणीही असो, त्याला सन्मानानेच वागवून, त्याच्यावर आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचं जराही दडपण येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं तत्व, मला तेव्हा उमगलं. झाकीरभाईंबरोबर सांताक्रूझ ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली असा आमच्या गाडीतून केलेला प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल स्मृतीकुंभ आहे. त्या पाऊण एक तासात त्यांच्याशी झालेल्या गप्पा मी आयुष्यभर माझ्या हृदयात जपून ठेवल्या आहेत.

 

आज माझे शब्द अबोल झालेत, बोटं बधिर झाली आहेत…

आज झाकीरभाई या जगात नाहीत हे सत्य जरी असलं, आणि जरी एक ना एक दिवस हे अटळ होतं, तरीही माझं मन हे अजून स्वीकारूच शकत नाहीये… नव्हे, ते सत्य असलं तरी कधीही स्वीकारणारंच नाही. कारण वर कथन केल्याप्रमाणे मी चार वर्षांचा असताना जेव्हा मी झाकीरभाईंना प्रथम पाहिलं आणि ऐकलं, तेव्हापासूनच माझ्या हृदयात झाकिरभाईंसाठी एक स्वतंत्र सिंहासन तयार झालं, जे माझं हृदय चालू असेपर्यंत राहील, आणि त्यावर झाकीरभाई कायम विराजमान असतील.

 

बहुत काय लिहिणे, इति लेखनसीमा.

 

– सौरभ जोशी

१८.१२.२०२४

————————-

ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..

सहेली.. शब्द प्रांगण

What’sapp group 10

 

https://chat.whatsapp.com/Bz3uFrE8LpSB3h7BBa5hK0

 

सहेली.. शब्द प्रांगण